
आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी नक्की वाचा ही उसाच्या रसाची गोड रसाळ गोष्ट.
उसाचा गारेगार रस
मागच्या आठवड्यात सकाळी कामासाठी बाहेर पडले होते, सगळी कामं करता करता उशीर झाला. दुपारची वेळ, ऑक्टोबर महिन्याची हिट, वरून तळपणारा सूर्य ह्यामुळे तहान लागली, पाण्याचा शोष पडला. नेमकच पाणी नव्हतं माझ्याकडे त्या दिवशी. त्यामुळे उन्हातून भराभर चालता चालता सहाजिकच थंडगार उसाच्या रसाची आठवण झाली. रसाच्या नुसत्या आठवणीने ही छान गारेगार वाटलं आणि मन एकदम भूतकाळात गेलं.
आमच्या लहानपणी बाटली बंद किंवा ट्रेटा पॅक मधील पेय सामान्य लोकांपर्यंत पोचली नव्हती. गोल्ड स्पॉट फक्त लग्नाच्या रिसेप्शन मध्येच मिळत अशी आमची समजूत होती. हॉटेल मध्ये जाऊन चहा, कॉफी, सरबत घेणं ही फार कॉमन नव्हतच. जनरली सरबत, पन्हं, अमृत कोकम घरीच केलं जाई. ऊसाचा रस मात्र तेव्हा अतिशय लोकप्रिय होता. उसाच्या रसाची गुऱ्हाळ जरी वर्षाचे बारा ही महिने चालू असली तरी रस पिण्याची खरी मजा उन्हाळ्यातच. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात कधीतरी गुऱ्हाळात जाऊन बर्फ घातलेला गारेगार उसाचा रस आई घेऊन देत असे. संध्याकाळी गुऱ्हाळातल्या बाकड्यावर बसून, चरकाला लावलेल्या घुंगरांचा मंजुळ नाद ऐकत बर्फ घातलेला तो गोड उसाचा रस पिताना जणू स्वर्गसुख मिळत असे आम्हाला. रस पिऊन झाला की ग्लासच्या तळाशी राहिलेला छोटासा बर्फाचा खडा चोखत चोखत खाताना घर कधी आलं ते कळत ही नसे. आनंदाच्या आणि मजेच्या कल्पना अगदीच साध्या असणारे ते सोनेरी दिवस होते.
कधी कधी कोणी खास पाव्हणे आले अचानक तर त्यांच्यासाठी किटलीतून रस घरी आणला जाई. क्वचित् काही घरात चैत्रातल्या हळदी कुंकवाच्या वेळी कैरीच पन्हं न देता उसाचा रस दिला जाई. अर्थात गुऱ्हाळात बसून रस पिण्याची मजा घरी रस पिण्याला नसे हे वेगळे सांगणे नल गे. राम नवमी ला आमच्या शेजार घरात उसाचा रस घालून भिजवलेल्या कणकेच्या पोळ्या प्रसाद म्हणून करत असत. उसाच्या रसाचा स्वाद असलेल्या त्या गोड पोळ्या चवीला छानच लागत असत. संक्रांतीला रस नाही पण उसाचे करवे सुगडात आवर्जून घातले जात आणि तुळशीच्या लग्नाला ही ऊस लागतोच.
लहानपणी फार प्रवास होतच नसे आणि कधी झाला तर तो एस टी बसनेच होत असे. उन्हाळ्याच्या दिवसात मजल दर मजल करत दुपारच्या वेळी बस एखाद्या डेपोत प्रवेश करी. गाडी डेपोमध्ये थांबता क्षणी “आल्टाक लिम्टाक ,उसाचा गारेगार रस “ अशी आरोळी ठोकत लोखंडी जाळीदार क्रेटमध्ये सहा उसाच्या रसाचे ग्लास ठेवलेल्या पोरांचा गाडी भोवती एकच गराडा पडे. उन्हाळ्याचे दिवस, तापलेली एस टी बस, तो सततचा खडखडाट, तिच्या इंजिनाची ऐकू येणारी घरघर, बसला बसणारे आचके, गचके आणि धक्के , बस मधली गर्दी , भांडण , उन्हाच्या लागणाऱ्या झळा ह्यांनी हैराण झालेल्या प्रवाश्यांना तो रस वाळवंटातील ओएसिसच वाटे. पोरं तर रसासाठी रडून गोंधळ घालत गाडीच छप्पर डोक्यावर घेत. गाडीतले बहुतेक जण तो रस पिऊन आपला जीव शांत करत असत. बघता बघता त्या पोऱ्यांचे सगळे ग्लास रिकामे होतं.
गावोगावच्या जत्रा हा पूर्वी फारच जिव्हाळ्याचा आणि मनोरंजनाचा विषय होता. विजेची रोषणाई, तंबूतले सिनेमे, जादूचे प्रयोग, गोल गोल फिरणारे पाळणे आणि चक्र, फुगे, खेळणी, मिठाई, भजी, वडे, साखरफुटाणे, असा सगळा उत्साहवर्धक माहोल असे जत्रेचा. गरमागरम तिखट वडे खाऊन झाले की त्यावर उतारा म्हणून उसाच्या रसासाठी आमची आईकडे भूणभूण सुरू होई. जत्रेत ऊसाचं गुऱ्हाळ असे पण तो चरक फिरवायला बैलाला जुंपले जाई. सतत गोल गोल फिरल्या मुळे बैलाला चक्कर येऊ नये म्हणून त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधत असत. त्या अजाणत्या वयात ही बैलाला असं डोळे बांधून गोलगोल फिरवण मला आवडत नसे. अर्थात त्या साठी रसावर पाणी सोडायची मात्र माझी तयारी नसे हे ही तितकेच खरे…
तसं बघायला गेलं तर उसाचा रस मला कुठला ही आवडतोच पण माझा सर्वात आवडता रस आहे पुण्याच्या चितळ्यांच्या मेन दुकानासमोर जे गुऱ्हाळ आहे तिथला. नाव मात्र लक्षात नाही त्या गुऱ्हाळाच. आज अनेक वर्ष मी पुण्यात गेले की तो रस पितेय पण चव मात्र अगदी तीच राखली आहे त्यांनी. चांगल्या प्रतीच्या उसाची ताजी पिळलेली मोळी आणि अगदी योग्य प्रमाणात घातलेलं आलं, लिंबू आणि बर्फ ही त्यांच्या रसाची वैशिष्ट्ये आहेत. तसेच गुऱ्हाळात सहसा न बघायला मिळणारी स्वच्छता हे वेगळेपण ही आहेच त्या गुऱ्हाळाच. थंडीच्या दिवसात कोल्हापूर साईडला प्रवास केला कधी तर वाटेत शेतात लागलेल्या गुऱ्हाळात रस उकळण्याच्या घमघमणाऱ्या गोड वासाने पावलं आपोआप तिकडे वळतात. मग तिथे ताजा रस पिणे, गुळ कसा तयार करतात हे पहाणे आणि उपलब्ध असेल तर काकवी, ताजा गुळ विकत घेणे ह्या गोष्टी ही ओघाने केल्या जातातच. आपल्याकडे मिळतो तसा ताजा नाही पण बाटलीबंद उसाचा रस मी परदेशात ही पहिला आहे पण रस ताजाच हवा अशी मानसिकता असल्याने त्या रसाची चव घेण्याचं धैर्य काही अजून झालेलं नाही माझं.
बेळगावची स्पेशालिटी असलेल्या “आले पाक “ ह्या प्रसिध्द स्ट्रीट फुड बद्दल लिहील्याशिवाय उसाच्या रसाची गोष्ट पूर्ण होऊच शकत नाही. आले पाक म्हणजे आल्याच्या वड्याच येतात डोळ्यासमोर त्यामुळे साहजिकच तुम्ही म्हणाल आले पाक आणि रसाचा काय संबंध ? “ तर हा बेळगावचा आलेपाक म्हंजे पात्तळ पोहे , थोडा नारळ आणि बरोबर मिरची, आलं, डाळवं आणि इतर मसाले वगैरेच्या अजब रसायनाचे आपल्या तीळगुळाच्या लाडवा एवढे छोटे छोटे लाडू असतात. आपल्याला जसं हवं असेल तसं किंवा जेवढं तिखट झेपत असेल त्या प्रमाणात लाडू पोह्यात मिसळायचा , मिश्रण सारखं करायचं आणि पोह्यांची फक्की मारायची . पोह्यांच्या झणझणीतपणामुळे तोंड खवळून उठत, ते शमविण्यासाठी त्यावर दोन घोट गोड गार ऊसाचा रस प्यायचा. ते तिखट पोहे आणि बरोबर गोड गार रस असं भन्नाट मिश्रण एकत्र खाताना जी काय मजा येते त्याला तोड नाही. घरातल्या सगळ्यांबरोबर गोल बसून गप्पा मारत कधी पोहे तर कधी रस अस करता करता किती पोहे आणि किती रस रिचवला जातो त्याला गणतीच नाही.
ऊसाचा रस पिण्याचे अनेक फायदे आहेत. रसामुळे शरीर हायड्रेटेड राहतं. त्यातील नैसर्गिक साखरेमुळे थकवा लगेच कमी होऊन तरतरीत वाटत. इन्स्टंट शक्ती मिळते. पोट छान भरल्याने मानसिक समाधान मिळते. रसामध्ये अनेक प्रकारची खनिज, नैसर्गिक शर्करा आणि इतर ही उपयुक्त घटक असतात. काविळीच्या आजारात यकृताच कार्य सुधारण्यासाठी हा रस उपयुक आहे असं आयुर्वेद सांगतो. किडनीच्या विकारावर ही रस दिलासा देतो असं म्हणतात. इतके गुण असून ही ह्याची किंमत ही कमीच म्हणजे सर्व सामान्य जनतेला परवडेल अशीच असते.परंतु अश्या ह्या बहुगुणी आणि अल्पमोली रसाची लोकप्रियता हल्ली काही प्रमाणात कमी होते आहे असं माझं निरीक्षण आहे. आरोग्य, स्वच्छता ह्या बाबतीत झालेली जागरूकता हे प्रमुख कारण आहे असं मला वाटतं. रसात असलेल्या साखरेमुळे किती ही प्रयत्न केले तरी तिथे माश्या न येणं शक्यच नाही त्यामुळे लोक रस पिणं टाळतात. तसेच प्रचंड आणि प्रभावी मार्केटिंग मुळे कोकाकोला सारख्या शीतपेयांचा तरुण पिढीवर पडलेला प्रभाव, त्या बाटलीबंद पेयांची असणारी सहज उपलब्धता आणि किंमत ही परवडेल अशी इतर कारणं ही आहेतच.
काही वर्षांपूर्वी एका नेहमीच्या गुऱ्हाळात बरेच दिवसांनी गेले होते. त्या गुऱ्हाळालत रसाबरोबर पान मसाल्याची पाकीट ही विक्रीला ठेवलेली पाहून मी चकित झाले. माझ्या चेहऱ्यावरचे भाव बघून तेच म्हणाले, “ अहो, हल्ली रस फार खपत नाही आणि ह्याला चांगला उठाव आहे म्हणून ठेवावी लागतात. शेवट चरितार्थ चालायला हवा ना , ह्या वयात आता दुसरं काही कारणं कठीण आहे.” गुऱ्हाळात पान मसाल्याची पाकीट ठेवावी लागणं ह्याहून अधिक रसाची शोकांतिका काय असू शकेल ?
हेमा वेलणकर
(फोटो आंतर जालावरून साभार )
मस्त. भयंकर आवडतो उसाचा रस.
मस्त. भयंकर आवडतो उसाचा रस. भारतात गेल्यावर प्रत्येकवेळी प्यायला जातोच असं नाही. ह्यावेळी इथेच एका साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये चांगला मिळाला उन्हाळ्यात. तिथल्यासारखी चव मिळणार नाहीच पण तुका म्हणे त्यातल्यात्यात.
सायो, धन्यवाद पहिल्या
सायो, धन्यवाद पहिल्या प्रतिसाद बद्दल.
तिकडे ही चांगला मिळाला रस हे छान आहे.
मस्त लिहिलंय ममो!
मस्त लिहिलंय ममो!
चितळ्यांच्या दुकानासमोरचं ते मुरलीधर रसवंती गृह.
मुरलीधरसाठी तुम्हाला + १०१ आणि एसटी स्टँडवरच्या तारेच्या क्रेटमधल्या काचेच्या सहा ग्लासांसाठीही! 'शैलेश'ही फेमस आहे पुण्यातलं आणि तेही मला आवडायचं पण हल्ली खूप वर्षांत तिकडे गेले नाही. मुरलीधरमध्ये मात्र हमखास जाते त्या बाजूला गेल्यावर.
मला लहानपणी उसाचा रस खूप म्हणजे खूप आवडायचा. त्याचं कदाचित प्रमुख कारण हे होतं की तो प्रवासाला गेल्यावरच प्यायला मिळायचा. एसटीचा प्रवास, उसाचा रस आणि ठकठक-चंपकसारखे अंक, हे एकमेकांना जोडून यायचे.
मध्यंतरीच्या काळात मला उसाचा रस आवडेनासा झाला होता. अति गोड वाटायचा. पण मग नंतर 'मुरलीधर'मधला प्यायल्यावर तो मात्र आवडला. लहानपणी कुठलाही आवडायचाच. आता चॉईस आलाय. बंगलोरमध्येही एका विशिष्ट ठिकाणचा आवडतो. मुरलीधरसारखं प्रसिद्ध ठिकाण नाहीये ते. साधी गाडी आहे.
मस्त! हा उसाचा रस
मस्त! हा उसाचा रस महाराष्ट्रातील सर्वच भागात लोकप्रिय असावा असे वाटते.
गुऱ्हाळात पान मसाल्याची पाकीट ठेवावी लागणं
>>>>
अर्र.. सरबत शीतपेये ठेवायचे होते. आमच्याकडे असे केले आहे.
रस हल्ली पित्ताची भीती म्हणून क्वचित पिणे होते.
पण लेकीला जाऊन पाजतो. तिच्याताच एक घोट चव बघणे होते तितकेच. पण त्यातही फालतू कोल्ड्रिंक्स पिण्यापेक्षा ती उसाचा रस पितेय हे समाधान मिळते. आणि अर्थात माझ्याही आठवणी सुखावतात. आठवी ते दहावी शाळा सुटल्यावर दादर स्टेशनला चालत जाताना वाटेत गोळा सरबत प्रमाणे उसाचे रस हे रूटीन होते. तिथे बसायला बाकडे असल्याने दहा मिनिटे गप्पा सुद्धा रंगायच्या. कधी ट्रेन ऐवजी बस ने जायचो तेव्हा दादर टीटीला पिणे व्हायचे. फरक इतकाच की मित्रांचा ग्रूप थोडा फार बदलायचा.
मस्त! हा उसाचा रस
डबल
हेमाताई, मुरलीधर रसवंतीगृह
हेमाताई, मुरलीधर रसवंतीगृह म्हणताय तुम्ही बहुतेक, चितळ्यांच्या दुकानासमोर. मीपण ऐन उन्हाळ्यात जेव्हा बाजारात येते तेव्हा तिथला रस प्यायल्याशिवाय जात नाही. आणि चैत्रात तर नव्या पालवीचा, पाडवा-नवमीचा असा काही सुंदर माहौल असतो ना, की बास! मोगरा घमघमत असतो, आंबे दिसायला लागतात... म
मला उमाच्या वेळी रस प्यावासा वाटला होता पण बेड रेस्ट होती आणि पथ्यामुळे प्यायचा नव्हता, तर तिच्या जन्मानंतर एकदा कधीतरी तिला घरी ठेवून जेव्हा मी पहिल्यांदाच पेठेत आले तेव्हा मन भरून रस प्यायले होते.
शैलेश पूर्वीसारखं वाटलं नाही
शैलेश पूर्वीसारखं वाटलं नाही मला 1-2 वेळा.
मस्तच गं… ऊसाचा रस माझाही
मस्तच गं… ऊसाचा रस माझाही आवडता. वाडीला गेलो की पितेच मी.
आले पाक करुन बघीन. आरतीने रेसिपी दिलीय बहुतेक इथे. मी वालय भात विकत घेऊन पोहे करुन घेतलेत. ते लाल पोहे अवर्णनिय चविष्ट लागतात. तेच वापरेन पातळ पोह्यांच्या जागी.
मस्तच लिहिलंय ममो!
मस्तच लिहिलंय ममो!
केन हाऊस.. फर्ग्युसन जवळचे…
केन हाऊस.. फर्ग्युसन जवळचे… उसाच्या शेतातून ताजा ताजा ऊस तोडून रस मिळायचा… सुबोध क्लासेस संपले की तिकडे चक्कर असायची आमची…
सुरेखच.....
सुरेखच.....
खुप छान लिहिलय...
खुप छान लिहिलय...
शनि शिंगणापुरला जाताना वाटेत बरीच गुर्हाळ असतात.. खुप जिव थंड होतो तो ताजा ताजा रस पिवुन.
छान लिहिलंय .गोंदवले रोडवरही
छान लिहिलंय .गोंदवले रोडवरही यमाई ला जाताना बरीच रसाची गुराळं लागतात तिथे रस पिल्याशिवाय पुढे जाताच येत नाही.
ऊसाचा रस खूप आवडीचा पण मध्यंतरी अमिता गद्रे चा 10 चमचे साखर एका रसाच्या ग्लासात असते वाला पॉडकास्ट ऐकूण कधीतरीच आणि जरा जपूनच पिते.
मस्त गारेगार वाटलं नुसतं
मस्त गारेगार वाटलं नुसतं वाचून. गोरेगावात आमच्या इथे बरीच आहेत गुर्हाळं. पण तिथे जाऊन फारसा प्यायले नाही. लहान पणी नदीवर पोहायला जायचो त्या रस्त्यावर एक रसवंती गृह होते ( एन आर सी ला) तेव्हा पोहून आल्यावर जाम भूक लागलेली असायची. आई खायला करून ठेवायची. त्यामुळे क्वचित चं त्या रसवंती गृहात जाऊन रस प्यायलो आहोत. मी दादरला बऱ्याच वेळा प्यायलेय उसाचा रस. चुलत बहीणी बरोबर.रानडेरोडवर.
छान लेख आहे.
छान लेख आहे.
उसाचा रस अतिशय आवडतो. घरी परतताना गुऱ्हाळ दिसलं तर मी बरोबर असलेली पाण्याची स्टील ची बाटली रिकामी करून त्यात रस भरून घेते.
हा लेख वैनतेयच्या शतकपूर्ती अंकात प्रकाशित झाला आहे का? तो अंक अजून वाचला नाही पण अनुक्रमणिका वाचली त्यात नाव पाहिलं. तोच असेल तर अभिनंदन.
खूप छान लिहलयं.
खूप छान लिहलयं.
बसप्रवास आणि उसाचा रस हे त्यावेळी कॉम्बिनेशन होतेच. पण माझ्यासाठी नव्हते. मी लहान असताना जेव्हा गावी बसने जात असू तेव्हा ठाणे ते पनवेल एक बस आणि एक पनवेल ते उरण असा प्रवास असे. त्यावेळी पनवेलला उतरल्यावर सोबतचे सगळेच उसाचा रस पीत असत. मला बस लागते त्यामुळे मी काही खातपित नसे. पण एकदा मी उसाचा रस प्यायले तेही पहिल्यांदाच आणि जसा तो पोटात गेला तिथपासून ज्या मला उलट्या सुरु झाल्या ते पार गावी पोहचेपर्यंत. तो डेपोचा, बसचा वास, बसच्या तापलेल्या सिट्स आणि पत्रा या सगळ्यामुळे उलट्या झालेल्या पण मी मात्र उसाच्या रसाला जबाबदार ठरविले. तेव्हापासून उसाचा रस माझा दुश्मन झाला. मला गुर्हाळाजवळ गेले किंवा बाजूला कोणी रस पित असेल तरी मळमळायचे. जवळजवळ ३० वर्षे मी रस प्यायले नसेल पण आता माझ्या मुलाला रस फार आवडतो त्यामुळे बरेचदा त्याच्यासाठी गुर्हाळात जाणे होते. सुरवातीला मी बाहेर उभी रहायचे आणि नवरा लेकाला दुकानात नेऊन रस पाजून आणायचा. नंतर मला कळले की आता मला मळमळ होत नाही म्हणून मी एकदा दुकनात बसून लेकाला घेतलेल्या रसामधील रस प्यायले आणि मला चक्क तो आवडला. त्यावेळी खरचं अगदी गारेगार वाटले त्यामुळे आता कधीमधी उसाचा रस पिणे होऊ लागले आहे.
छान लेख
छान लेख
रसवंतीगृह मलाही खूप आवडतं... माझ्या आठवणीतलं रसवंतीगृह...
गावाकडचं गु-हाळ हे याचं विस्तृत रुप..
इथं रस आटवायला चुलाण, त्त्याला पेटते ठेवणारे जाळवे, त्यावर ठेलेली मोठी कढई, रस हाटायला मोठी उलथणी, रस घोळून आटवणारा व त्यात भेंडी आणि अन्य घटक टाकणारा गुळव्या, एका मांडवात गुळ बनवण्यासाठी ठेवलेली कढई, बाजूला ढेपेचा आकार द्यायला ठेवलेल्या बादल्या आणि त्या रसाची काकवी, साय ( चिक्की), शेंगदाणा आणि कुरमुरे लाडू अहाहा आणि...
बाजूला सणंग (चरक) रस गाळायला, त्याच्या मोठ्या लाकडी लाटी, त्यात उस सरकवणारा, त्याला जुंपलेले बैल आणि....
टाकीत पडणारा बर्फाशिवाय फेसाळणारा रस आणि....
तिथंच मी तोटीला पितळी तांब्या धरलाय मस्त रस घेतलाय तांब्याभर खाक्या चड्डीच्या खिशातून लिंबू काढलय, कापून पिळलय आणि एक तांब्या,दोन तांबे बापरे पोट भरलं, ढेकर आला...पांढरी मिशी मनगटानं पुसून चालू पडतो.
दुसरं शहरी रसवंती..
रस्त्याच्या कडेला हातगाडी खूप घाई असेल तर नाहीतर मस्त कानिफनाथ, नवनाथ रसवंती गृह, आत सिनेमा पोस्टर लावलेत, मांडवाच्या झालरी आहेत, छोटी टेबलं त्यावर मीठ मसाला, दर्शनी भागात चरक मोटारीवर फिरणारा, त्याला लावलेलं घुंगरू येणा-या जाणा-याला म्हणतयं...
रस पी, रस पी, रस पी
माझी फर्माईश बीना बरफ एक फूल
ग्लास हाजर, मसाला घातला , नवटाक, पावशर झालं आता फुटा उगा पोष्टर बघू नका...
माझे एक स्नेही कुणाला चहा पाजत नसत पण रसाचं दुकान दिसलं की तिथं रस पाजत आणि चहा का नाही हे सांगत.
आता डायबेटिक आहे आणि माझ्या बेडरूममध्ये तो गोड आवाज रस पी, रस पी असा सारखा निनादतोय. खूप रस पिऊन मरावं पण असा कोंडमारा नको होतोय.
मस्तच. नेहमीप्रमाणे सुंदर,
मस्तच. नेहमीप्रमाणे सुंदर, स्मरणरंजन करणारा लेख.
मलाही उसाचा रस आवडतो. लहानपणी बर्फ टाकून आवडायचा आता बिनाबर्फाचा.
एका दुकानात हाफ आणि फुल ग्लाससाठी अमिताभ जया असे लिहलेले आठवले.
एसटी स्टँडवर "गाssss रे, गोssss डे, थंssss डे उसाचा रस" ही आरोळी अजूनही आठवते.
उसाच्या रसातील भाकऱ्या ही कुठेतरी वाचल्यासारखी वाटते (दुर्गा भागवत - खमंग?).
कोल्हापूरला रसासोबत काकवी पण घेतली जायची.
यावरच मस्त, विडंबनात्मक, माझं आवडीच गाणं (Despasito)... ऐका नक्की.
https://youtu.be/404epk4YB2g?si=EiGAU5B1f4qVDzjb
मस्त विडंबनात्मक माझं आवडीच
मस्त विडंबनात्मक माझं आवडीच गाणं (Despasito)... ऐका नक्की.>> भारीच आहे ऋतुराज. आवडलं बघ गाणं.
भारी! उसाचा रस मलाही भयंकर
भारी! उसाचा रस मलाही भयंकर म्हणजे अतीमहाभयंकर आवडतो!
)
तुम्ही लिहिलंय तसा
पयल्या धारेचागावच्या गुर्हाळावरचा कळशीतून स्टीलच्या ग्लासात ओतून घेतलेला दाट रसही प्यायला आहे आणि शेहरातला रसवंती गृहातला घुंगुरवाळावाला रसही!हे रसवंतीगृहवाले सगळे नवनाथ/कानिफनाथ वगैरे नाथसांप्रदायातलेच कसे असतात काय माहीत! आणि ते पांढरे गुरूशर्ट-लेंगा-गांधीटोपी याच गणवेशात कसे असतात?
इथे अमेरिकेतही 'ताजा', बाटलीतला आणि पावडरीचा असे इंडियन/मेक्सिकन दुकानात दिसतील ते सगळे रस प्यायले आहेत, पण ते काही खरं नाही बाप्पा! (थू!
आमच्या गिरगावातली बरीच गुर्हाळं एकएक करत बंद झाली. एक पोर्तुगीज चर्चच्या समोरचं तेवढं आहे अजून. तिथे जमेल तितकं डोकावून येते प्रत्येक भारतवारीत. ताराबागेत भेळबीळ खायचा सोहळा या रसाच्या भैरवीशिवाय पूर्ण होत नाही!
तिथल्या बाकांच्या कडांना ते रिकामे ग्लास खोचून ठेवता येतील अशी गोलाकार भोकं असलेले साइडपॅनल्स आहेत, अजून आहेत - त्यांचं का कोण जाणे मला लहानपणी फार अप्रूप वाटायचं!
संध्याकाळी समोर गजरे विकणार्या बाया मोगरा, जाई-जुई, चमेली, सोनचाफे, सोनटक्के असला जीवघेणा ऐवज टोपल्यांत घेऊन बसलेल्या असतात. त्यांचा आणि रसवंतीनाथांच्या उदबत्तीचा दरवळ, तो चरकाला लावलेल्या घुंगरांचा आवाज, जिभेवर ती गोडगार चव... समोरच्या चौकातलं ते रानोमाळ ट्रॅफिक त्या ग्लासाच्या काचेमागून निर्ममपणे पाहताना समाधीच लागते म्हणा ना!
वावे, ऋ, प्रज्ञा , साधना
वावे, ऋ, प्रज्ञा , साधना शर्मिला, च्रप्स, शशांक, भावना, सिमरन, धनुडी, सावली, निल्सन, द सा ऋतुराज सर्वांना धन्यवाद.
वावे धन्यवाद, छान लिहिलं आहेस, मुरलीधर नाव सांगितलंस थँक्यु. शैलेश कुठे आहे , हे ऐकिवात नाहीये माझ्या अर्थात मी थोडेच दिवस होते पुण्यात आणि ते ही अनेक वर्षांपूर्वी.
ऋ धन्यवाद, अर्र.. सरबत शीतपेये ठेवायचे होते. आमच्याकडे असे केले आहे. >>मी पाकीट बघितली त्याला ही अनेक वर्ष झाली. हल्ली गुटखा पानमसाला ह्यांना बंदी आहे त्यामुळे शीतपेय ठेवत
असावेत.
मीपण ऐन उन्हाळ्यात जेव्हा बाजारात येते तेव्हा तिथला रस प्यायल्याशिवाय जात नाही. आणि चैत्रात तर नव्या पालवीचा, पाडवा-नवमीचा असा काही सुंदर माहौल असतो ना, की बास! मोगरा घमघमत असतो, आंबे दिसायला लागतात... >> मस्तच वर्णन प्रज्ञा,
तसं ही आपल्याकडे निषिद्धच मानतात प्रेग्नंसी मध्ये पपई ऊसाचा रस, आंबे फणस ह्या गोष्टी डॉक्टर सगळं खा सांगतात तरी. असो.
साधना लाल पोहे एकदमच भारी लागतील आले पाका बरोबर , नक्की करून बघ.
केन हाऊस.. फर्ग्युसन जवळचे >> हे कुठे होता, रुपाली समोर का ?
ऊसाचा रस खूप आवडीचा पण मध्यंतरी अमिता गद्रे चा 10 चमचे साखर एका रसाच्या ग्लासात असते वाला पॉडकास्ट ऐकूण कधीतरीच आणि जरा जपूनच पिते. >> जनरली साखर नको, वाढता डायबेटिस ह्यांचा नक्कीच परिणाम झाला असेल रस पिण्यावर .
हा लेख वैनतेयच्या शतकपूर्ती अंकात प्रकाशित झाला आहे का? तो अंक अजून वाचला नाही पण अनुक्रमणिका वाचली त्यात नाव पाहिलं. तोच असेल तर अभिनंदन. >> थँक्यु, होय तोच आहे लेख. त्याचे संपादक प्रशांत मठकर माझे कार्यालयीन स्नेही ...
निल्सन बरं झालं त्यातून मळमळण्यातून बाहेर पडून कधी तरी तरी रस प्यायला लागू शकलीस म्हणून.
द सा मस्त वर्णन गुऱ्हाळाचं. शेवट वाचून वाईट वाटलं काळजी घ्या.
ऋतुराज मस्त लिहिलं आहे. विडंबन बघितल , भारीच आहे.
प्रत्येकाची आवडीची गुऱ्हाळ वेगवेगळी आहेत, छान आठवणी लिहिल्या आहेत सर्वांनी.
>>>हे रसवंतीगृहवाले सगळे
>>>हे रसवंतीगृहवाले सगळे नवनाथ/कानिफनाथ वगैरे नाथसांप्रदायातलेच कसे असतात काय माहीत!...>>
ताई पुणे जिल्ह्यातील बोपगाव जवळ बोपदेव घाटात डोंगरावर कानिफनाथ मंदिर आहे. बोपगावच्या आणि आसपासच्या लोकांचा हा पारंपारिक व्यवसाय. मुंबईत लालबागला सकाळी उसाच्या गाड्या येत. तिथून ऊसाचे वितरण होई. कानिफनाथ किंवा नवनाथ नावाचा संबंध असा जुळतो.
आमच्या गावात, पटेल
आमच्या गावात, पटेल ब्रदर्स्च्या बाहेर गुर्हाळ आहे. आले वगैरे चरकात, ऊसाबरोबर घालून, नंतर ते पादेलोण वगैरे मसाला घालून रस देतो. अप्रतिम लागतो पण प्युअर शुगर
ओह असं आहे का, हे माहीत
ओह असं आहे का, हे माहीत नव्हतं. धन्यवाद, द.सा.
अच्छा, हे बोपदेव घाटाचं
अच्छा, हे बोपदेव घाटाचं कनेक्शन माहिती नव्हतं. मलाही प्रश्न पडायचा की एसटी स्टँडवरची सगळी रसवंती गृहं नवनाथ/कानिफनाथ का? धन्यवाद द. सा.
ममो, शैलेश सदाशिव पेठेत कुठेतरी आहे. लक्षात नाही आता नेमकी जागा.
> शैलेश कुठे आहे
> शैलेश कुठे आहे
SP कॉलेज पासून टिळक रोड कडे जाताना ग्राहक पेठ ओलांडून लगेच डावीकडे वळले कि पहिल्या चौकात
किंवा
उद्यान प्रसाद कार्यालयाच्या शेजारी कोपऱ्यावर
किंवा
CASP च्या ऑफिस समोर
किंवा
SP बिर्याणीज पासून बाजीराव रोड कडे जाणारा जो रस्ता आहे तिथे चौकात आहे.
छान लेख
छान लेख
दत्तात्रय साळुंखे तुमचा प्रतिसाद तर एकदम नॉस्टॅल्जिक करून गेला.
मामाच्या गावी गेलो होतो. कॉलेजमध्ये असतानाची गोष्ट. सुट्ट्या होत्या.
त्याच्या घरापासून 50 मिटर वर गुर्हाळ सुरू झालेले.
गुर्हाळ म्हणजे गूळ बनवतो ते.
तिथं जाउन बसलो होतो.
मी जरी त्यांना ओळखत नसलो तरी ते मला ओळखत होते.
ह्याचा भाचा, त्याचा नातू , हिचा पोरगा असे.
पूर्ण प्रोसेस पाहिलेली.
तेव्हा भरपूर रस पिला होता.
काकवी देखील मार कपभर म्हणून आग्रह झालेला.
मुतखडा गायब होईल म्हणे तुझा.
तितकं गोड पिणे शक्य नव्हते म्हणून नाही म्हणालो.
ते भेंडी चेचून घालणे, मळी बाजूला काढणे ( ह्यापासून कुटीरोउद्योग करून गावठी दारू बनवतात ) सगळे पाहिले.
नंतर गरम गरम बनलेला ताजा गूळ खाल्लेला.
ती चव अजून विसरलो नाहीये.
साळुंखे सर फार भारी आठवण तुमच्यामुळे
झकासराव अनुभव झकासच की
झकासराव अनुभव झकासच की
स्वाती , गिरगाव च्या रसाच
स्वाती , गिरगाव च्या रसाच वर्णन एकदम मस्त, गजरे फुलं वाल्या बायका, समोरचा रस्ता, समोरचा इराणी, सगळं एकदम नजरेसमोर फ्लॅश झालं. जनरली भेळ पाणीपुरी असले पदार्थ मी नाही खात पण अपवाद तारा बागेतली सुखी भेळ.
आमच्या बिल्डिंग च्या खाली ही ऊसाचा रगाडा होता . त्याला ही
गेली अनेक वर्ष घरघर लागली होती, सध्या तो आहे की बंद झाला
कोण जाणे ? एका बाजूला पणशीकर मिठाई एका बाजूला
पणशीकर हॉटेल आणि मध्ये हा रगाडा ...
ताई पुणे जिल्ह्यातील बोपगाव जवळ बोपदेव घाटात डोंगरावर कानिफनाथ मंदिर आहे. बोपगावच्या आणि आसपासच्या लोकांचा हा पारंपारिक व्यवसाय. मुंबईत लालबागला सकाळी उसाच्या गाड्या येत. तिथून ऊसाचे वितरण होई. कानिफनाथ किंवा नवनाथ नावाचा संबंध असा जुळतो. >
द. सा धन्यवाद , ही माहिती नवीन आहे.
वावे ,चुन्नाड थँक्यु शैलेश कुठे आहे लिहिलं म्हणून.
अप्रतिम लागतो पण प्युअर शुगर , >> साखर नको हे ही कारण असू शकेल रसाची लोकप्रियता कमी होण्याचं. असो.
झकासराव मस्तच आठवण , छान लिहिलंय.
मस्त लेख...आमच्या कोल्हापुरात
मस्त लेख...आमच्या कोल्हापुरात अंबाबाई मंदिराजवळ पण दोन दुकाने आहेत रसांची..फार मस्त रस मिळतो तिकडे..सासरी उसाची शेती आहे त्यामुळे गुऱ्हाळ मधील ताजा रस पण अनेकदा पिलाय..तो जरा रंगाने काळपट असतो पण चव अफाट असते..
Pages