ऊसाचा गारेगार रस

Submitted by मनीमोहोर on 31 December, 2024 - 23:27
Sugarcane juice

आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी नक्की वाचा ही उसाच्या रसाची गोड रसाळ गोष्ट.

उसाचा गारेगार रस

मागच्या आठवड्यात सकाळी कामासाठी बाहेर पडले होते, सगळी कामं करता करता उशीर झाला. दुपारची वेळ, ऑक्टोबर महिन्याची हिट, वरून तळपणारा सूर्य ह्यामुळे तहान लागली, पाण्याचा शोष पडला. नेमकच पाणी नव्हतं माझ्याकडे त्या दिवशी. त्यामुळे उन्हातून भराभर चालता चालता सहाजिकच थंडगार उसाच्या रसाची आठवण झाली. रसाच्या नुसत्या आठवणीने ही छान गारेगार वाटलं आणि मन एकदम भूतकाळात गेलं.

आमच्या लहानपणी बाटली बंद किंवा ट्रेटा पॅक मधील पेय सामान्य लोकांपर्यंत पोचली नव्हती. गोल्ड स्पॉट फक्त लग्नाच्या रिसेप्शन मध्येच मिळत अशी आमची समजूत होती. हॉटेल मध्ये जाऊन चहा, कॉफी, सरबत घेणं ही फार कॉमन नव्हतच. जनरली सरबत, पन्हं, अमृत कोकम घरीच केलं जाई. ऊसाचा रस मात्र तेव्हा अतिशय लोकप्रिय होता. उसाच्या रसाची गुऱ्हाळ जरी वर्षाचे बारा ही महिने चालू असली तरी रस पिण्याची खरी मजा उन्हाळ्यातच. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात कधीतरी गुऱ्हाळात जाऊन बर्फ घातलेला गारेगार उसाचा रस आई घेऊन देत असे. संध्याकाळी गुऱ्हाळातल्या बाकड्यावर बसून, चरकाला लावलेल्या घुंगरांचा मंजुळ नाद ऐकत बर्फ घातलेला तो गोड उसाचा रस पिताना जणू स्वर्गसुख मिळत असे आम्हाला. रस पिऊन झाला की ग्लासच्या तळाशी राहिलेला छोटासा बर्फाचा खडा चोखत चोखत खाताना घर कधी आलं ते कळत ही नसे. आनंदाच्या आणि मजेच्या कल्पना अगदीच साध्या असणारे ते सोनेरी दिवस होते.

कधी कधी कोणी खास पाव्हणे आले अचानक तर त्यांच्यासाठी किटलीतून रस घरी आणला जाई. क्वचित् काही घरात चैत्रातल्या हळदी कुंकवाच्या वेळी कैरीच पन्हं न देता उसाचा रस दिला जाई. अर्थात गुऱ्हाळात बसून रस पिण्याची मजा घरी रस पिण्याला नसे हे वेगळे सांगणे नल गे. राम नवमी ला आमच्या शेजार घरात उसाचा रस घालून भिजवलेल्या कणकेच्या पोळ्या प्रसाद म्हणून करत असत. उसाच्या रसाचा स्वाद असलेल्या त्या गोड पोळ्या चवीला छानच लागत असत. संक्रांतीला रस नाही पण उसाचे करवे सुगडात आवर्जून घातले जात आणि तुळशीच्या लग्नाला ही ऊस लागतोच.

लहानपणी फार प्रवास होतच नसे आणि कधी झाला तर तो एस टी बसनेच होत असे. उन्हाळ्याच्या दिवसात मजल दर मजल करत दुपारच्या वेळी बस एखाद्या डेपोत प्रवेश करी. गाडी डेपोमध्ये थांबता क्षणी “आल्टाक लिम्टाक ,उसाचा गारेगार रस “ अशी आरोळी ठोकत लोखंडी जाळीदार क्रेटमध्ये सहा उसाच्या रसाचे ग्लास ठेवलेल्या पोरांचा गाडी भोवती एकच गराडा पडे. उन्हाळ्याचे दिवस, तापलेली एस टी बस, तो सततचा खडखडाट, तिच्या इंजिनाची ऐकू येणारी घरघर, बसला बसणारे आचके, गचके आणि धक्के , बस मधली गर्दी , भांडण , उन्हाच्या लागणाऱ्या झळा ह्यांनी हैराण झालेल्या प्रवाश्यांना तो रस वाळवंटातील ओएसिसच वाटे. पोरं तर रसासाठी रडून गोंधळ घालत गाडीच छप्पर डोक्यावर घेत. गाडीतले बहुतेक जण तो रस पिऊन आपला जीव शांत करत असत. बघता बघता त्या पोऱ्यांचे सगळे ग्लास रिकामे होतं.

गावोगावच्या जत्रा हा पूर्वी फारच जिव्हाळ्याचा आणि मनोरंजनाचा विषय होता. विजेची रोषणाई, तंबूतले सिनेमे, जादूचे प्रयोग, गोल गोल फिरणारे पाळणे आणि चक्र, फुगे, खेळणी, मिठाई, भजी, वडे, साखरफुटाणे, असा सगळा उत्साहवर्धक माहोल असे जत्रेचा. गरमागरम तिखट वडे खाऊन झाले की त्यावर उतारा म्हणून उसाच्या रसासाठी आमची आईकडे भूणभूण सुरू होई. जत्रेत ऊसाचं गुऱ्हाळ असे पण तो चरक फिरवायला बैलाला जुंपले जाई. सतत गोल गोल फिरल्या मुळे बैलाला चक्कर येऊ नये म्हणून त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधत असत. त्या अजाणत्या वयात ही बैलाला असं डोळे बांधून गोलगोल फिरवण मला आवडत नसे. अर्थात त्या साठी रसावर पाणी सोडायची मात्र माझी तयारी नसे हे ही तितकेच खरे…

तसं बघायला गेलं तर उसाचा रस मला कुठला ही आवडतोच पण माझा सर्वात आवडता रस आहे पुण्याच्या चितळ्यांच्या मेन दुकानासमोर जे गुऱ्हाळ आहे तिथला. नाव मात्र लक्षात नाही त्या गुऱ्हाळाच. आज अनेक वर्ष मी पुण्यात गेले की तो रस पितेय पण चव मात्र अगदी तीच राखली आहे त्यांनी. चांगल्या प्रतीच्या उसाची ताजी पिळलेली मोळी आणि अगदी योग्य प्रमाणात घातलेलं आलं, लिंबू आणि बर्फ ही त्यांच्या रसाची वैशिष्ट्ये आहेत. तसेच गुऱ्हाळात सहसा न बघायला मिळणारी स्वच्छता हे वेगळेपण ही आहेच त्या गुऱ्हाळाच. थंडीच्या दिवसात कोल्हापूर साईडला प्रवास केला कधी तर वाटेत शेतात लागलेल्या गुऱ्हाळात रस उकळण्याच्या घमघमणाऱ्या गोड वासाने पावलं आपोआप तिकडे वळतात. मग तिथे ताजा रस पिणे, गुळ कसा तयार करतात हे पहाणे आणि उपलब्ध असेल तर काकवी, ताजा गुळ विकत घेणे ह्या गोष्टी ही ओघाने केल्या जातातच. आपल्याकडे मिळतो तसा ताजा नाही पण बाटलीबंद उसाचा रस मी परदेशात ही पहिला आहे पण रस ताजाच हवा अशी मानसिकता असल्याने त्या रसाची चव घेण्याचं धैर्य काही अजून झालेलं नाही माझं.

बेळगावची स्पेशालिटी असलेल्या “आले पाक “ ह्या प्रसिध्द स्ट्रीट फुड बद्दल लिहील्याशिवाय उसाच्या रसाची गोष्ट पूर्ण होऊच शकत नाही. आले पाक म्हणजे आल्याच्या वड्याच येतात डोळ्यासमोर त्यामुळे साहजिकच तुम्ही म्हणाल आले पाक आणि रसाचा काय संबंध ? “ तर हा बेळगावचा आलेपाक म्हंजे पात्तळ पोहे , थोडा नारळ आणि बरोबर मिरची, आलं, डाळवं आणि इतर मसाले वगैरेच्या अजब रसायनाचे आपल्या तीळगुळाच्या लाडवा एवढे छोटे छोटे लाडू असतात. आपल्याला जसं हवं असेल तसं किंवा जेवढं तिखट झेपत असेल त्या प्रमाणात लाडू पोह्यात मिसळायचा , मिश्रण सारखं करायचं आणि पोह्यांची फक्की मारायची . पोह्यांच्या झणझणीतपणामुळे तोंड खवळून उठत, ते शमविण्यासाठी त्यावर दोन घोट गोड गार ऊसाचा रस प्यायचा. ते तिखट पोहे आणि बरोबर गोड गार रस असं भन्नाट मिश्रण एकत्र खाताना जी काय मजा येते त्याला तोड नाही. घरातल्या सगळ्यांबरोबर गोल बसून गप्पा मारत कधी पोहे तर कधी रस अस करता करता किती पोहे आणि किती रस रिचवला जातो त्याला गणतीच नाही.

ऊसाचा रस पिण्याचे अनेक फायदे आहेत. रसामुळे शरीर हायड्रेटेड राहतं. त्यातील नैसर्गिक साखरेमुळे थकवा लगेच कमी होऊन तरतरीत वाटत. इन्स्टंट शक्ती मिळते. पोट छान भरल्याने मानसिक समाधान मिळते. रसामध्ये अनेक प्रकारची खनिज, नैसर्गिक शर्करा आणि इतर ही उपयुक्त घटक असतात. काविळीच्या आजारात यकृताच कार्य सुधारण्यासाठी हा रस उपयुक आहे असं आयुर्वेद सांगतो. किडनीच्या विकारावर ही रस दिलासा देतो असं म्हणतात. इतके गुण असून ही ह्याची किंमत ही कमीच म्हणजे सर्व सामान्य जनतेला परवडेल अशीच असते.परंतु अश्या ह्या बहुगुणी आणि अल्पमोली रसाची लोकप्रियता हल्ली काही प्रमाणात कमी होते आहे असं माझं निरीक्षण आहे. आरोग्य, स्वच्छता ह्या बाबतीत झालेली जागरूकता हे प्रमुख कारण आहे असं मला वाटतं. रसात असलेल्या साखरेमुळे किती ही प्रयत्न केले तरी तिथे माश्या न येणं शक्यच नाही त्यामुळे लोक रस पिणं टाळतात. तसेच प्रचंड आणि प्रभावी मार्केटिंग मुळे कोकाकोला सारख्या शीतपेयांचा तरुण पिढीवर पडलेला प्रभाव, त्या बाटलीबंद पेयांची असणारी सहज उपलब्धता आणि किंमत ही परवडेल अशी इतर कारणं ही आहेतच.

काही वर्षांपूर्वी एका नेहमीच्या गुऱ्हाळात बरेच दिवसांनी गेले होते. त्या गुऱ्हाळालत रसाबरोबर पान मसाल्याची पाकीट ही विक्रीला ठेवलेली पाहून मी चकित झाले. माझ्या चेहऱ्यावरचे भाव बघून तेच म्हणाले, “ अहो, हल्ली रस फार खपत नाही आणि ह्याला चांगला उठाव आहे म्हणून ठेवावी लागतात. शेवट चरितार्थ चालायला हवा ना , ह्या वयात आता दुसरं काही कारणं कठीण आहे.” गुऱ्हाळात पान मसाल्याची पाकीट ठेवावी लागणं ह्याहून अधिक रसाची शोकांतिका काय असू शकेल ?

हेमा वेलणकर

(फोटो आंतर जालावरून साभार )

240180320suger-cane-juice_1584599999.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वाती , गिरगाव च्या रसाच वर्णन एकदम मस्त, गजरे फुलं वाल्या बायका, समोरचा रस्ता, ..... आवडीचे रसाचे दुकान.
दा सा,छानच माहिती.हा प्रश्न नेहमी पडायचा.

मलाही आवडतो. मुंबईत स्वस्त का मिळतो हे अजूनही कळलेले नाही. काही जिल्ह्यांमध्ये खूप दाट रस मिळतो.
पण हल्ली रसाची धास्ती घेतली आहे. कारण बर्फ. तो कुठून असा येतो, कुठे ठेवतात वगैरे. टाईफॉड होण्याचं कारण शाळेत असताना शिकलेले. उघड्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नका. त्यावर माशा बसतात. त्याच नंतर घाणीवर बसतात. रसाच्या बाबतीत जरा सावधान राहावे लागते. मग त्यापेक्षा चहा कॉफी बरी.

पूर्ण रस तयार होण्याची प्रोसेस पाहिलेली नाही पण भेंडी का चेचून घालतात? म्हणजे हे एकदमच विचित्र वाटलं वाचायला.

मुंबईत स्वस्त का मिळतो हे अजूनही कळलेले नाही.
>>> बर्फ स्वस्त मिळतो… मॉर्ग मधून सप्लाय करतात स्वस्तात…

नॉस्टॅल्जिक लेख !
उन्हाळा, उसाचा रस, भेळ, गजरे, सारसबाग, असं काहीबाही डोळ्यापुढे आलं.
खूप वर्षांनी भारतात एकदा उन्हाळ्याच्या सिझनला गेले होते. तेव्हा मनसोक्त रस प्यायला होता. ती चव आठवली. बर्फ न घालता प्यायले. पण खरंच काय गारेगार झाला जीव.
धन्यवाद ममो या आठवणींसाठी ! Happy

नेहमीप्रमणे छान लेख ममो.
आमच्या गावात एसटी स्टँडजवळ नवनाथ रसवंती गृह होते. तालुक्याचे गाव, जवळच थिएटरही त्यामुळे तिथे सतत गर्दी असे. नवनाथांचे फोटो आणि जोडीला रंगीत कॅलेंडर्सनी सजलेल्या भिंती, लाकडी बाकं आणि टेबलं, आणि पाठच्या खोलीतच त्यांचा संसार. लहानपणी उन्हाळ्यात आठवड्यातून एकदा तरी आम्ही केवळ रस पिण्यासाठी म्हणून मुद्दाम स्टँडपर्यंत चालत जात असू. दोन फुल, दोन हाफ ग्लास आणि बर्फ नाही ही ऑर्डर ठरलेली. तो हाफ ग्लासही आमच्यासाठी खरे तर भरपूर होई. 'बर्फ नाही' प्रकारा मुळे तिथल्या भुशाने आच्छादलेल्या बर्फाच्या लादीचेही त्या वयात अप्रुप वाटे.

आहाहा काय लिहिलंय.

प्रतिसाद वाचते सवडीने.

आधीच सांगते मला उसाचा रस अजिबातच आवडत नाही, मी एकमेवच अशी असेन. मला उसाचे तुकडे चघळत खायला आवडतात पण रस नाही. लहानपणापासून बाबा उसाचा रस प्यायला न्यायचे, मी अनिच्छेने प्यायचे. मला वाटायचं इथे लिंबू सरबत वगैरे का नाही ठेवत. मला उसाचा रस काढतानाचा घुंगरांचा आवाज मात्र आवडायचा, ते ऊस यंत्रात टाकून रस निघतो ते बघायलाही आवडायचं, प्यायला नाही. अजूनही आवडत नाही पण सर्वांना हवा असेल तेव्हा जाते बरोबर, घेतेच असं नाही. उसाच्या रसाच्या दुकानात माशा मात्र खूप असायच्या, लहानपणी जास्त होत्या, आता कमी असतात.

बाबांच्या शेवटच्या दिवसांत त्यांना उसाचा रस हवा असायचा आणि बाबांना बर्फ घातलेला आवडत नाही, आम्हालाही बर्फाशिवाय प्यायला लावायचे. माझ्या जवळ मेन रोडवर गुऱ्हाळ आहे, तिथून मी बाबांसाठी पार्सल न्यायचे, बर्फ न घालता. ती आठवण आहे.

मस्त लेख.. आमचा सोलापूर जिल्हा तर ऊसाच आगर झाला आहे. शहरातले पाच सहा रसवाले अतोनात प्रसिद्ध आहेत. पुणेकर कामठे, वसंत पैलवान;कंदले रसपान गृह; रूपाभवानी मंदिराच्या आवारातले एक अन मेन बाजारपेठेत असलेले एक.
त्यात वसंत पैलवान अन पुणेकर कामठे कडे स्टील ची टेबल ईतकी चकचकीत असतात की आपल तोंड एकदम नीट दिसत.
स्वच्छ काचेच्या ग्लासात वरपर्यंत भरलेला हलका फेस असलेला रस त्याच किंचीत आलं लिंबू याची चव.. पोट मन एकदम भरून जातं.
सोलापूर ला cold drinks च ईतक वारं नाही अद्याप. बारा महिने चोवीस तास या रसवंती गृहात गर्दी अन वेटिंग असत.

सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद.
प्रतिसाद ही सगळे छानच , प्रत्येकाच्या आवडीच्या गुऱ्हाळाच्या आठवणी सांगणारे...
गूळ करताना भेंडीचा रस घालतात हे नवीन आहे माझ्यासाठी ही.
बर्फ स्वस्त मिळतो मुंबईत म्हणून रस स्वस्त हे ही नवीनच माझ्यासाठी.

बाबांच्या शेवटच्या दिवसांत त्यांना उसाचा रस हवा असायचा आणि बाबांना बर्फ घातलेला आवडत नाही, आम्हालाही बर्फाशिवाय प्यायला लावायचे. माझ्या जवळ मेन रोडवर गुऱ्हाळ आहे, तिथून मी बाबांसाठी पार्सल न्यायचे, बर्फ न घालता. ती आठवण आहे. >> अंजू किती छान वाटलं वाचून.
त्यात वसंत पैलवान अन पुणेकर कामठे कडे स्टील ची टेबल ईतकी चकचकीत असतात की आपल तोंड एकदम नीट दिसत. >> हे एकदम दुर्मिळ पण फारच छान प्राजक्ता .
Srd तुमच्या सारखा विचार करून रस न पिणारी ही बरीच जण असतील म्हणूनच रसाचा खप कमी झाला असेल.

हो हेमाताई आणि थोडं अवांतर आहे पुढचं. अगदी शेवटच्या दोन दिवसांत आंबा हवा होता बाबांना. आपल्याकडचे आंबे लवकर असतात, ते संपलेले. जुन महीन्याचा पहीला आठवडा होता. माहेरचे थोडे आंबे आलेले, भाचा गेलेला गावाला मे महीन्यात त्याच्याबरोबर, त्यातले मला भावाने दिलेले आणि त्यातले एक दोन उरलेले. बाबा आंबा मागायला लागले, भावाकडचे आंबे संपले होते. बहीणीचा फोन आला, बाबा आंबा मागतायेत, म्हटलं माझ्याकडे आहे आणि मी नेऊन दिला (तसं बाहेर लंगडा वगैरे मिळाला असता पण घरचा तो घरचा, माहेरी एकच कलम आहे बाकी रायवळ). त्यांच्याच घरचा आंबा त्यांना देता आला याचं समाधान. त्यांची सेवा करु शकले नाही पण आवडीच्या दोन गोष्टी एक म्हणजे उसाचा रस, दुसरं आंबा देता आला, हे समाधान.

मस्त स्मरणरंजन.
मला पण ठराविक ठिकाणचाच रस आवडतो. त्यात पहिला डोंबिवलीच्या शिव मार्केटच्या गल्ली मधला. कित्येक वर्षे फक्त इथे रस प्यायला आहे. मग त्याचं दुकान आक्रसत, अतिक्रमण/ बिल्डिंग री डेव्हलपमेंट यात पडलं. तरी चालू होतं. सध्याचं माहित नाही.
मग स्टेशन जवळ केळकर रस्ता चालू व्हायच्या आधी आहे तिकडे प्यायचो. कधी फडके रोडला पोस्ट ऑफिसच्या इथे ही प्यायलेला आठवतो.

कित्येक वर्षे ठाण्यात छान रसवाला माहितच न्हवता. आता मामलेदार मिसळीच्या इथे प्रकाश रसवंती गृह आहे. आता लिहिताना जाणवलं कानिफनाथ नाही हा. तिकडे पितो.
पुण्यात शनिपार आणि खजिन्याच्या विहिरीच्या इथला शैलेश दोन्हीकडे अनेकोनेक वेळा प्यायला आहे. शैलेश मध्ये स्टेनलेसस्टीलच्या चरकावर किती हॉर्स पॉवरची मोटर चालते ते ब्रॅंगिंग केल्याचे बोर्ड आठवतात. Lol तिकडे असा ग्लासाच्या हिशेबात रस मागितला की त्या बाया फक्त तुक देतात. तिकडे प्यायचा तो लिटर मध्ये. Lol

अमितव यांनी लिहिलेलं त्याव्यतिरिक्त कस्तूरी प्लाझा होण्याआधी एक रसाचे दुकान होतं, मानपडा रोडला तिथे जाणं व्हायचं लहानपणी प्लस फडके रोडला, स्टेशनरोड म्हणजे जुनी बाग आहे तो रोड तिथे जायचो. स्टेशनजवळ आहे बहुतेक, कैलास लस्सीजवळ. मी आपली सोबत जाते. दोन वर्षांपूर्वी शिवमार्केटजवळ बहिणीमुळे गेलेलो, मी नव्हता घेतला. आता ते आहे की नाही बघेन. कुठे फिरायला जातो तेव्हा मला चाट, पाणीपुरी, वडापाव खायला जास्त आवडतं. एम आय डी सी मोठ्या रोडवर (नानासाहेब धर्माधिकारी मार्ग, हे नाव पण मी कावेरी दुकान रोड म्हणते )मध्ये बैल घेऊन रसवाले वगैरे असतात पण मी मसाला ताक वगैरे घेते त्या एरियात.

त्यांची सेवा करु शकले नाही पण आवडीच्या दोन गोष्टी एक म्हणजे उसाचा रस, दुसरं आंबा देता आला, हे समाधान. >> खूप छान अंजू... कोकणातल्या लोकांना घरचा आंबाच हवा असतो, आणि तो तू देऊ शकलीस हे केवढ समाधान आहे.

अमितव बरं झालं तो रसवाला चांगला आहे हे कळलं. मला ही कुठला ही रस प्यायच डेअरिंग होत नाही हल्ली. नक्की जाईन आता.

Pages