आवडती, आवश्यक आणि आरोग्यदायी

Submitted by कुमार१ on 7 January, 2024 - 23:29

नमस्कार !
नववर्षातील पहिला लेख सादर करताना आनंद होत आहे.
सन 2020मध्ये ‘सुखी झोपेचा साथी’ हा लेख इथे लिहिला होता (https://www.maayboli.com/node/73074). त्यामध्ये फक्त मेलाटोनिन या झोपेशी संबंधित एकाच हॉर्मोनचा विचार केलेला होता. त्या धाग्यावरील चर्चेदरम्यान वाचकांनी सूचना केली की, झोपेची एकंदरीत प्रक्रिया या विषयावर सविस्तर लेखन करावे. या चांगल्या सूचनेचा विचार करून हा लेख लिहीतोय. यामध्ये आपण झोपेची आवश्यकता, तिच्या दरम्यान होणारे शारीरिक बदल, तिचे शास्त्रीय प्रकार, तिचा वयाशी संबंध आणि झोप-जाग चक्र या मूलभूत गोष्टींचा विचार करणार आहोत.

झोप कशासाठी ?
रोजची झोप हा माणसाच्या जीवनातील अत्यावश्यक भाग आहे. दमलेल्या शरीराला दैनंदिन विश्रांती देणे हा त्याचा मुख्य हेतू. आपल्या जागृत अवस्थेतून झोपेत गेल्यानंतर आपली इच्छाशक्ती काही काळासाठी स्थगित होते. जीवनातल्या छोट्या मोठ्या त्रासदायक गोष्टींपासून काही काळ तरी आपली सुटका होते. झोपेत आपण स्वप्नांच्या राज्यात अगदी मनमुराद विहार करतो. तसं पाहायला गेलं तर आपल्या झोपेवर आपले निस्सीम प्रेम असते. उगाच नाही आपण आपले एक तृतीयांश आयुष्य झोपेसाठी राखून ठेवत ! झोप ही जरी विश्रांतीची अवस्था असली तरी त्या त्या काळात मेंदू जागृतावस्थेइतकीच ऊर्जा वापरत असतो हा मुद्दा महत्त्वाचा.

झोपेला प्रवृत्त करणारे घटक

मेंदूला सतत पोचणाऱ्या संवेदना कमी होणे हे झोप येण्यासाठी आवश्यक असते. त्या दृष्टीने खोलीतील अंधार, शांतता आणि सुखकर बिछाना या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. या उलट जेव्हा मन चिंताग्रस्त असते किंवा काही कारणांनी मनात भावनांचा अतिरेक झालेला असतो तेव्हा शरीरात एपिनेफ्रीन या हार्मोनचा प्रभाव राहतो आणि त्यामुळे मेंदू जागृत ठेवला जातो. हा अर्थातच झोप येण्यातील मोठा अडथळा ठरतो. इथे एक मुद्दा रोचक आहे. जेव्हा अतिशय श्रमाने माणूस खूप दमलेला असतो तेव्हा झोपेला पोषक असणारे आजूबाजूचे वातावरण नसले तरी देखील तो शांत झोपू शकतो.

शरीरक्रियेतील महत्त्वाचे बदल
1. हृदयगती रक्तदाब आणि श्वसनगती कमी होतात
2. स्नायू शिथिल पडतात
3. शरीरातील विविध स्राव कमी होतात पण काहींच्या बाबतीत जठरस्राव वाढू शकतो.

झोपेचा कालावधी

दैनंदिन जीवनात जाग-झोप असे एक जैविक चक्र कार्यरत असते. प्रौढ व्यक्तीत साधारणपणे १६ तास जागृतावस्था आणि ८ तास झोप असे ते चक्र आहे. झोपेच्या एकूण कालावधीत आपण दोन प्रकारची झोप घेतो :
. 80 टक्के झोप : शांत किंवा मंदतरंग स्वरूपाची असते
. 20 टक्के झोप : ही काहीशी ‘खळबळजनक’ असते तिला विरोधाभासी झोप असेही म्हणतात. आता हे दोन प्रकार विस्ताराने पाहू.

१. मंदतरंग झोप : या झोपेचे साधारण तीन टप्पे असतात : हलकी , मध्यम आणि गाढ.
पहिल्या टप्प्यात शरीराचे स्नायू शिथिल पडू लागतात. डोळ्यांच्या गोल गोल फिरल्यासारख्या सौम्य हालचाली होत राहतात. या टप्प्यात बाह्य आवाज किंवा हालचाल यामुळे संबंधित व्यक्ती झोपेतून सहज उठण्याची शक्यता राहते. हा टप्पा पार पडल्यानंतर खरी झोप सुरू होते आणि हळूहळू ती गाढ स्वरूपाची होते. त्या टप्प्यात मात्र झोपलेल्या व्यक्तीला उठवायचे असल्यास मोठे आवाज किंवा गदागदा हलवणे या गोष्टींची गरज भासते.

या प्रकारच्या झोपेत डोळे बऱ्यापैकी स्थिर आणि शांत राहतात. म्हणूनच तिला ‘नॉन रॅपिड आय मुव्हमेंट (NREM)’ या प्रकारची झोप म्हणतात. या झोपेत मेंदूतील पिच्युटरी ग्रंथीतून ग्रोथ हॉर्मोन आणि gonadotropins ही हॉर्मोन्स टप्प्याटप्प्याने स्रवतात. तसेच शरीराला खऱ्या अर्थाने विश्रांती मिळून त्याचा चयापचय पुनर्स्थापित होतो (restoration). तान्ह्या मुलांच्या बाबतीत या झोपेचा त्यांच्या शारीरिक वाढीशी बऱ्यापैकी संबंध आहे.

ˌही झोप साधारण एक तास पूर्ण झाल्यानंतर तिच्यातून बाहेर येण्याची उलटी प्रक्रिया चालू होते. म्हणजेच,
गाढ >> मध्यम >> हलकी
अशी प्रक्रिया पूर्ण झाली की आता झोपेचा पुढे वर्णन केलेला दुसरा प्रकार चालू होतो.

२. ‘खळबळजनक’ झोप : या प्रकारात डोळ्यांच्या हिसके मारल्यागत वेगवान हालचाली ही महत्त्वाची घटना असते. आपले डोळे अक्षरशः एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे झपाझप हलत राहतात. त्यांच्या हालचालींनी ते जणू काही एखादे संपूर्ण दृश्य त्यांच्या पूर्ण आवाक्यात आणू पाहतात. या वैशिष्ट्यपूर्ण घटनेमुळेच या प्रकारच्या झोपेला ‘रॅपिड आय मुव्हमेंट (REM) प्रकारची झोप असे म्हणतात.
डोळ्यांचा अपवाद वगळता शरीराचे इतर स्नायू मात्र आता कमालीचे शिथिल होतात. जेव्हा जीभ शिथिल पडते तेव्हा ती श्वसनमार्गात अंशतः अडथळा आणते. त्यातूनच घोरण्याचा उगम होतो ! जेव्हा एखादी व्यक्ती पाठ टेकून (supine) झोपलेली असते तेव्हा या प्रकारचा अडथळा सर्वाधिक असतो.

झोपेच्या या स्थितीतून एखाद्याला उठवायला खूपच कष्ट पडतात; त्यातून जर काहीजण कुंभकर्ण असतील तर मग काय विचारायलाच नको ! अर्थातच झोपमोड झाल्याची त्रस्तता त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसून येते. अशा झोपेतून उठल्या किंवा उठवल्यानंतर सुमारे 90% लोक त्यांना स्वप्न पडल्याचे सांगतात. स्वप्नरंजन हा या प्रकारातील अर्थातच विशेष भाग. स्वप्नांच्या संदर्भात विज्ञानात जे अभ्यास झाले आहेत त्यातले बरेचसे ‘गृहीतक’ या स्वरूपाचे आहेत.
एखादी व्यक्ती या झोपेत असताना दर जर तिच्या मेंदूचा विद्युत आलेख (EEG) काढला तर तो जागे असतानाच्या अवस्थेसारखाच असतो. या वैशिष्ट्यपूर्ण विरोधाभासामुळेच झोपेच्या या प्रकाराला विरोधाभासी (paradoxical) झोप असेही म्हटले जाते.

या झोपेची अन्य वैशिष्ट्येही महत्त्वाची आहेत. तिच्यात आपल्या नाडीचे ठोके, श्वसनगती आणि रक्तदाब अनियमित होतात. लिंग (किंवा शिश्निकेची ताठरता) आणि स्नायूंचे बारीक झटके येऊ शकतात. मुलांमध्ये दात खाणे बऱ्यापैकी दिसते. या झोपेदरम्यान मेंदूत काही महत्त्वाचे दीर्घकालीन रचनात्मक आणि रासायनिक बदल होतात. त्यातून आपल्याला मानसिक स्वास्थ्य लाभते. तान्ह्या मुलांच्या बाबतीत तर ही झोप आकलन व स्मरणशक्ती जोपासण्यासाठी पूरक ठरते.

साधारण 20 ते 25 मिनिटे या स्वरूपाची झोप झाल्यानंतर आपण त्यातून बाहेर येऊन पुन्हा एकदा पहिल्या प्रकारच्या, म्हणजे मंदतरंग झोपेत प्रवेश करतो. या प्रमाणे प्रकार १ व प्रकार २ चे एकआडएक चक्र आपण उठेपर्यंत चालू राहते. जर रात्रभराची झोप शांत लागली असेल तर सकाळ होण्याच्या सुमारास विरोधाभासी झोपेचा कालावधी काहीसा वाढतो.

sleep  cycle.jpg

वरील चित्रानुसार आतापर्यंत आपण प्रौढांचे झोपचक्र पाहिले. एक वर्षाखालील मुलांमध्ये यात एक महत्त्वाचा फरक असतो. तो म्हणजे, त्यांच्या बाबतीत झोपेचे वरील दोन प्रकार (१ व २) प्रत्येकी ५०% असतात. या बालकांच्या बाबतीत अजून एक उल्लेखनीय मुद्दा. त्यांना झोप लागण्यासाठी आपण त्यांना मांडीवर घेऊन डोक्यावर आणि अंगाच्या काही भागावर सातत्याने थोपटत राहतो. आपल्या या क्रियेमुळे त्यांच्या त्वचेतील विशिष्ट भाग (mechanoreceptors) उत्तेजित होतात आणि त्यांच्यापासून निघालेल्या संवेदना मेंदूत पोचून झोप लागणे सुलभ होते.

मेंदूचे नियंत्रण व रासायनिक घडामोडी
मेंदूमध्ये झोपेचे विविध विभाग असतात. त्यांना शरीराकडून येणारे विविध चेतातंतू योग्य ते संदेश पुरवतात. त्याचबरोबर मेंदूतील दृष्टी विभागाचे सहकार्य देखील महत्त्वाचे असते. या सर्वांच्या समन्वयातून झोपेचे नित्य चक्र कार्यरत राहते. या संदर्भात ज्या रासायनिक घडामोडी घडतात त्यामध्ये अनेक रसायनांचा वेगवेगळ्या पद्धतीने सहभाग असतो. त्यापैकी काही प्रमुख रसायने अशी :
Serotonin, prostaglandin, norepinephrine & acetylcholine

आपले दैनंदिन झोपजागचक्र नियमित राहण्यासाठी मेंदूच्या hypothalamus या विभागात एक जैविक घड्याळ असते. या संदर्भात असलेल्या मेलाटोनिनच्या कार्याचा परिचय उपरोल्लेखित स्वतंत्र लेखात यापूर्वीच करून दिलेला आहे.

वय आणि झोप
वाढत्या वयानुसार झोपेचे तास कमी होत जातात हे आपण जाणतोच. सर्वसाधारणपणे वयानुसार ते तास असे असतात :
• 0 ते 1 वर्ष :16 तास
• बालपण : 10 तास
• प्रौढावस्था : 6-8 तास
अर्थात व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीनुसार प्रौढपणी झोपेच्या कालावधीत फरक राहतो.
Sleeping-baby.jpg

जन्मापासून जसे वय वाढत जाते तसे मेंदूतील झोपेच्या जैविक घड्याळात बदल होत जातात. जन्मानंतर पहिल्या तीन महिन्यात असे जैविक घड्याळ तयार झालेले नसते. त्यामुळे ही बालके त्यांची झोप संपूर्ण 24 तासात निरनिराळ्या वेळी हवी तशी विभागून घेतात. तसेही ते राजेच असतात ना ! यानंतर जसे वय पुढे सरकते तसतसे मेंदूत जैविक घड्याळ तयार होऊ लागते आणि रात्रीच्या वेळी अधिकाधिक झोपण्याकडे आपला कल होतो.

शालेय मुलांच्या बाबतीत शाळेच्या वेळा हा घटक झोपेच्या वेळा आणि कालावधी ठरवण्याच्या बाबतीत खूप महत्त्वाचा ठरतो. या विषयावर अलीकडेच आपण जोरदार राज्यस्तरीय चर्चा अनुभवली ! प्रौढ व्यक्तींच्या बाबतीत दैनंदिन जीवनातले अनेक घटक झोपेच्या कालावधीवर परिणाम करतात. त्यामध्ये डोळ्यांवर सातत्याने पडणारा कृत्रिम प्रकाश (e-screens), बैठी जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव, चहा, कॉफी आणि कृत्रिम शीतपेयांचा अतिरेक, कौटुंबिक समस्या आणि विविध औषधांचा परिणाम यांचा समावेश आहे. व्यावसायिक कसरतपटूना सामान्य प्रौढापेक्षा जास्त झोपेची (सुमारे 9 तास दैनंदिन) गरज असते.

ज्येष्ठ नागरिकांची झोप
मध्यमवयाशी तुलना करता ज्येष्ठ वयात एकंदरीत झोप कमी होते हे साधारण निरीक्षण आहे. या वयात झोपेसंदर्भात खालील महत्त्वाचे बदल बऱ्याच जणांमध्ये जाणवतात :
1. ‘लवकर निजे आणि लवकर उठे’ ही सवय वाढीस लागते.
2. रात्री प्रत्यक्ष झोप लागण्यास बराच वेळ घेतला जातो

3. झोपेचा एकूण कालावधी कमी होतो
4. मंदतरंग झोपेतील गाढपणा कमी होतो - हे विशेषतः पुरुषांमध्ये अधिक दिसून येते. मात्र खळबळजनक झोप कमी होण्याचा परिणाम स्त्री व पुरुष दोघांमध्ये सारखाच होतो.

5. झोपेत वारंवार व्यत्यय येतात आणि थोडंसं कुठे खुट्ट वाजलं की जाग येते
6. काहींच्या बाबतीत दिवसा डुलक्या घेण्याचे प्रमाण वाढते- विशेषता जर अनेक दीर्घकालीन आजार मागे लागलेले असतील तर. पण काहींच्या बाबतीत दुपारची झोप अजिबातच येत नाही.

वर लिहिलेली निरीक्षणे सर्वसाधारण आहेत. त्यातील प्रत्येकाला अपवाद देखील दिसून येतात.

वाढत्या वयानुसार वरीलप्रमाणे झोपेतील बदल होण्यास मेंदूच्या विविध भागांमधले चेतारासायनिक बदल कारणीभूत असतात. त्याचबरोबर या वयोगटात असणाऱ्या इतर व्याधी आणि समस्यांचा देखील झोपेवर परिणाम होतो. यामध्ये रात्रीची लघवीची वारंवारिता, औषधांचे परिणाम आणि मद्यपानाचा समावेश आहे. पुरुषांमध्ये मंद-झोपेचे प्रमाण कमी होण्यामागे पुरुष हॉर्मोनची पातळी कमी होण्याचा संबंध असू शकतो. वृद्धांच्या बाबतीत त्यांच्या अवतीभवती असणारे वातावरण- म्हणजे घर की वृद्धाश्रम- याचाही झोपेच्या कालावधीवर बराच प्रभाव पडतो.

या वयात झोप कमी झाल्यामुळे स्मरणशक्ती देखील कमी होते, की दोन्ही स्वतंत्रपणे कमी होतात, या विषयावर सातत्याने संशोधन चालू आहे.
सरतेशेवटी एक लाखमोलाचा प्रश्न उपस्थित होतो :

“म्हातारपणी शरीराची झोपेची गरजच कमी होते, का गरज (पूर्वीइतकीच) असूनही अथक प्रयत्नांती झोप येत नाही?”

हा प्रश्न वादग्रस्त असून त्यावर अद्याप समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. मात्र बऱ्याच संशोधकांचे मत, “म्हातारपणी झोप निर्माण करण्याची क्षमता कमी होत असावी’, या गृहीतकाकडे झुकलेले आहे.

झोपेचा आदर्श कालावधी ?
स्पष्ट सांगायचे झाल्यास, “रोज किती तास झोपावे” या प्रश्नाचे एकचएक असे शास्त्रीय उत्तर नाही ! निरनिराळ्या देशांमध्ये संबंधित वैद्यकीय संघटनांनी वेगवेगळ्या शिफारसी केलेल्या आहेत. परंतु झोपेचा ठराविक कालावधी हा शेवटी व्यक्तीसापेक्ष आहे. झोप झाल्यानंतर ताजेतवाने वाटले पाहिजे आणि दिवसभरातील कामे उत्साहाने करता आली पाहिजेत, हाच निकष महत्त्वाचा. तसेच, ‘ प्रौढपणी दिवसा झोपावे की नाही”, याचे उत्तरही पुन्हा व्यक्तीसापेक्ष आहे. आपापल्या नोकरी-व्यवसायाच्या स्वरूपानुसार आणि गरजेनुसार आपली झोप दिवस आणि रात्र या वेगवेगळ्या सत्रात विभागली जाऊ शकते.

समारोप

दैनंदिन झोपेची मूलभूत प्रक्रिया, त्या संदर्भातील मेंदूतील घडामोडी आणि वयानुसार झोपेत होणारे बदल यांचा आढावा या लेखात घेतला. उत्तम आरोग्यासाठी शरीराच्या भरणपोषण आणि व्यायामाबरोबरच यथायोग्य झोपेची नितांत आवश्यकता असते. निद्राराज्यातील स्वप्नसृष्टी हा कुतुहलजनक विषय असला तरी तो स्वतंत्र अभ्यासाचा आणि लेखनाचा विषय आहे. झोपेसंबंधीच्या विविध समस्या आणि आजार हा विशेष तज्ञांचा प्रांत असून तो या लेखाच्या कक्षेबाहेर आहे.

सुमारे पन्नास वर्षांपूर्वी प्रसिद्ध साहित्यिक अनंत काणेकर यांनी लिहिलेला ‘यथेच्छ झोपा’ हा लघुनिबंध गाजला होता आणि तो शालेय अभ्यासक्रमातही होता. त्याची स्मृती कायम राहिलेली आहे. आपल्या रोजच्या झोपेचा कालावधी हा व्यक्तीसापेक्ष असल्याचे आपण वर पाहिलेच. तेव्हा आपापल्या दिनक्रम आणि गरजेनुसार प्रत्येकाने आपापल्या झोपेचे वेळापत्रक ठरवलेले उत्तम !
****************************************************************
संदर्भ :
१. विविध वैद्यकीय पाठ्यपुस्तके
२. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5440010/#:~:text=62%20The%2....
३. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5810920/#:~:text=Advancing%...(4)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झोपेचे कर्ज >>>
हा जो विषय आहे त्यावरील शास्त्रीय संकल्पना गेल्या एक-दोन दशकांमध्ये बदलत गेलेल्या दिसतात.

“झोपेचे कर्ज : सत्य की मिथक?” या स्वरूपाचे स्फुट लेखन जालावर वाचायला मिळते. यावर सखोल विश्वासार्ह माहिती मिळावी म्हणून काही विज्ञान-निबंधांचा शोध घेतला. त्यातून असे मुद्दे मिळाले :
१. झोपेचे कर्ज “वसूल” करण्याबाबत व्यक्तीभिन्नता आहे. काही लोक ते आठवड्याच्या अखेरीस वसूल करतात आणि काही जण करू शकत नाहीत. अशा दोघांचाही शास्त्रीय अभ्यास झालाय.

२. जर आठवड्यातली अपुरी झोप भरून काढली गेली नाही तर शरीरावर जे दुष्परिणाम होतात ते आठवड्या-अखेरीस “वसूल” करण्याने देखील होतात(च) असं दिसलं आहे.
म्हणजेच, रोज नियमित स्वरूपात पुरेशी झोप मिळालेली चांगली.

३. झोपेचे कर्ज “वसूल” झालेच नाही तर आकलनावर आणि मेंदूच्या तत्सम कार्यांवर खरंच परिणाम होतो का ? याबाबतीत एक महत्त्वाची माहिती अशी मिळाली :
These experiments also reveal that individuals differ markedly in their cognitive vulnerabilities to sleep restriction, which suggests a trait-like (possibly genetic) basis for the response.
(https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC1978335/)

म्हणजेच, प्रत्येकाच्या शरीरधर्मानुसार (? जनुकीय घटनेनुसार), कमी झोप मिळण्याचे दुष्परिणाम हे सुद्धा व्यक्तीसापेक्ष आहेत.

ह्या मध्ये पण एक दुसरी बाजू आहे हे स्व अनुभव नी बनलेले मत आहे शास्त्रीय आधार देवू शकतं नाही.
तुम्ही किती तास झोप घेतली म्हणजे झोप पूर्ण झाली असे कोणते कोष्टक नाही.

तुमची झोप कोणत्या दर्जा ची आहे हे ठरवते तुमची झोप पूर्ण झाली की नाही.
म्हणजे.
आठ तास झोपून पण झोपेचा दर्जा चांगला नसेल तर झोप पूर्ण होत नाही.
पण चार तासात पण झोप पूर्ण होते जर तुमच्या झोपेचा दर्जा उत्तम असेल तर.

झोपेच्या आरोग्यासाठी टाळावे लागणारे पदार्थ
झोपेला प्रोत्साहन देणारे पदार्थ जास्त प्रमाणात खाणे हे चांगले झोपेसाठी पुरेसे नाही. झोपेसाठी वाईट ठरणारे काही पदार्थ टाळणे देखील महत्त्वाचे आहे. येथे काही मुख्य दोषी आहेत:

सॅच्युरेटेड फॅट्स, जसे की बर्गर आणि फ्राईज आणि प्रक्रिया केलेले पदार्थ, कमी स्लो-वेव्ह स्लीप होऊ शकतात , जी सर्वात पुनर्संचयित झोप मानली जाते .
परिष्कृत कार्बोहायड्रेट्स, जसे की पांढरी ब्रेड आणि पास्ता, चयापचय लवकर होते. जर तुम्ही हे पदार्थ रात्रीच्या जेवणासाठी खाल्ले तर ते भुकेने जागे होऊ शकतात .
अल्कोहोलमुळे झोपेची गुणवत्ता खराब होते . जरी अल्कोहोलच्या शामक प्रभावामुळे सुरुवातीला झोप लागणे सोपे होते, तरीही ते REM चे प्रमाण कमी करून झोपेच्या पद्धतींमध्ये व्यत्यय आणते, किंवा डोळ्यांची जलद हालचाल , रात्रीच्या पहिल्या भागात झोप येते आणि अधिक रात्री जागरण होते.
झोपायच्या सहा तास आधी कॅफिनचे सेवन केल्याने झोप लागणे कठीण होते कारण ते एडेनोसिन हार्मोन अवरोधित करते, ज्यामुळे झोपेची भावना वाढते.
कॅलरींचा सतत जास्त वापर केल्याने वजन वाढू शकते, हे अडथळा आणणाऱ्या स्लीप एपनियाचे सर्वात मजबूत भविष्यसूचक आहे . जास्त वजन असणे हे एक घटक आहे कारण ते डायाफ्राम आणि फुफ्फुसांवर अतिरिक्त दबाव आणू शकते आणि गळ्यात आणि घशात चरबी जमा झाल्यास श्वासनलिका अरुंद होऊ शकते

सायन्स अलर्ट वरून कॉपी पेस्ट केले आहे.
उच्च गुणवत्ता असलेली झोप आणि आहार ह्याचा जवळचा संबंध आहे ह्या विषयावरील लेख होता

तुम्ही किती तास झोप घेतली म्हणजे झोप पूर्ण झाली असे कोणते कोष्टक नाही.
>>>> +११ अगदी
म्हणून लेखात दिलंच आहे :
झोपेचा आदर्श कालावधी ?
स्पष्ट सांगायचे झाल्यास, “रोज किती तास झोपावे” या प्रश्नाचे एकचएक असे शास्त्रीय उत्तर नाही !

..
झोपेचा दर्जा >>> +११
मंदतरंग झोप गाढ आणि विनाव्यत्यय होणे महत्त्वाचे

अति झोपेने फार मांद्य येते. दिवसभर लेथार्जिक वाटते, या उलट झोप जरा कमी पडली की खूप छान वाटते. मूड चीअरफुल रहातो.
पण आदर्श म्हणजे - न आति ना कमी. हवी तेवढीच निद्रा.

काही दुखत खुपत असेल ते योग्य झोपेनंतर अगदी पूर्ण बरे झालेले आढळून येते. किती औषधी आहे झोप.

Dr. Matt Walker या न्यूरोसायंटिस्टने 'झोपेच्या अभ्यासा'ला वाहून घेतलं आहे. त्यांचे या विषयावर अनेक TED Talks तसंच स्वतःचा पॉडकास्टही आहे (ज्यांचे दुवे इथे स्पीकर आणि पॉडकास्ट या टॅब्जमध्ये मिळतील). जरूर ऐका.

लेख, प्रतिसाद दोन्ही माहितीपूर्ण.
झोपेचा आणि प्रतिकारशक्ती चा संबंध असतो का?

धन्यवाद !
1. अति झोपेने फार मांद्य येते >>> +1 विशेषतः दुपारच्या. दुपारची डुलकी जास्त बरी पडते.

2. Dr. Matt Walker >> निद्राविकारांची बरीच विस्तृत माहिती आहे. सवडीने पाहतो.

३. झोपेचा आणि प्रतिकारशक्तीचा संबंध >>>
चांगला प्रश्न. होय, आहे.

प्रतिकारशक्तीशी संबंधित ज्या T लिंफपेशी असतात त्यांचा शरीरातील लिंफग्रंथीशी संवाद झोपेत चांगला होतो. परिणामी पेशीमधल्या विविध cytokinesचा निचरा चांगल्या प्रकारे केला जातो.
झोपेदरम्यान होणारे हार्मोन्सचे बदल हे सुद्धा या कामी पूरक ठरतात.

मला सकाळी खूप खूप झोप येते. रात्री व्यवस्थित झोप झालेली असली तरी सकाळी आंघोळ करून अभ्यासाला बसलं की झोप यायला लागते. घरी सगळ्यांना वाटतं की मी उगीच नाटकं करतेय. उपाय म्हणून बाबाने सुचवलं की अधे मध्ये chair मधून उठून उभं राहून जोरात उड्या मार, डोळ्यांवर पाणी मार, पण सगळं करूनही सकाळी फ्रेश वाटत नाही. Lazy वाटतं. संध्याकाळचे 5 वगरे वाजले की मग नंतर झोप अजिबात येत नाही. अभ्यास नीट होतो.
हे कशामुळे होत असेल? मी मुद्दाम काही करत नाहीये. आणि मला अभ्यासाचा कंटाळा नाहीये.
उलट guilt येतं सकाळची झोप येते तेव्हा...

हे कशामुळे होत असेल? मी मुद्दाम काही करत नाहीये.
>>>
लेखात रात्रीच्या झोपेचे दोन प्रकार अर्थात टप्पे दिले आहेत. त्यातील पहिल्या प्रकारची झोप 80 टक्के असते. ती झोप विनाव्यत्यय होणे महत्त्वाचे असते. कदाचित त्यात अडथळे येत असावेत अशी शक्यता आहे.

तरुण वयात असे वारंवार होत असेल आणि त्याचा दैनंदिन कामावर परिणाम होत असेल तर तज्ञांचा सल्ला घेतलेला बरा.

झोप 'व्यवस्थित तास' क्वांटीटी आहे,व्यवस्थित क्वालिटी आहे का हेही बघायला हवं. गाढ झोप किती आणि अस्वस्थ झोप किती ते.रात्री तळपायाला तेल लावून फायदा होईल.

मीही रात्री कितीही जागू शकते पण सकाळी लवकर उठायचं जीवावर येतं. तुमचं झोपेचं नैसर्गिक सायकल तसं असू शकतं. तेव्हा गिल्टी वाटून घेऊ नका. अभ्यास रात्री होत असेल तर तसं करा. सकाळी लवकर उठायची सवय लावून घ्यायची असेल तर उठल्यावर किमान ३० मिनीट व्यायाम (एरोबिक/कार्डिओ) करा. मग अभ्यास करा.
नावडता किंवा किचकट विषय अभ्यासत असाल तरी कंटाळा येऊन झोप येऊ शकते. नुसता वाचून अभ्यास करत असाल तर पद्धत बदलून ( गणितं सोडवणे, नोटस् काढणे, फ्लॅश कार्डस, मेमरी मॅप्स बनवणे) पहा.

1) चांगली झोप येणे ही दैवी देणगी आहे त्या वर कृत्रिम उपाय हा फक्त उपचार आहे उपाय नाही.
२) चांगली झोप येणे हे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे ह्या मधील अनेक गोष्टी माणसाच्या हातात आहेत.
शारीरिक दोष फक्त माणसाच्या हातात नाही.

सल्ला सर्व देवू शकतात ते खूप सोप असते पण नियमात राहणे हे सोप नसते.
ते खूप अवघड आहे.
म्हणून झोपेच्या गोळ्या कंपन्या उत्पादित करतात ..व्यवसाय वाढणार ह्याची खात्री असल्या मुळे.

आपले जीवन शेवटी आपल्या हातात असते अपवाद गोष्टी सोडून.
ह्या अपवाद गोष्टी माणसाच्या हातात कधीच नसतात.
रोज जाहिराती येत असतील तरी

त्यातील पहिल्या प्रकारची झोप 80 टक्के असते. ती झोप विनाव्यत्यय होणे महत्त्वाचे असते. कदाचित त्यात अडथळे येत असावेत अशी शक्यता आहे. >>> असू शकतं. पण मी एकदा झोपले की पुन्हा मला रात्री जाग येत नाही. Directly सकाळी उठते. स्वप्न रोज पडतात. आणि एक नाही, 3 ते 4 irrelevant किंवा कधी कधी relevant सुद्धा.
तरुण वयात असे वारंवार होत असेल आणि त्याचा दैनंदिन कामावर परिणाम होत असेल तर तज्ञांचा सल्ला घेतलेला बरा.
नवीन Submitted by कुमार१ on 21 January, 2024 - 13:47 >>> हो. प्रतिसादाबद्दल Thankyou!

झोप 'व्यवस्थित तास' क्वांटीटी आहे,व्यवस्थित क्वालिटी आहे का हेही बघायला हवं. >>> अनु, 6 ते 7 तास झोप होते. पण एक- माझा झोपण्याचा टाइम fix नाही. म्हणजे काही लोकं कसं रोज 11 वाजताच झोपतात किंवा 10 वाजताच झोपतात, माझं तसं नाही. अभ्यास करता करता 12 किंवा 1 किंवा 2 होतात...
रात्री तळपायाला तेल लावून फायदा होईल. >>> अच्छा करून बघायला हवं, प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

मीही रात्री कितीही जागू शकते पण सकाळी लवकर उठायचं जीवावर येतं. तुमचं झोपेचं नैसर्गिक सायकल तसं असू शकतं. तेव्हा गिल्टी वाटून घेऊ नका. अभ्यास रात्री होत असेल तर तसं करा. >>> mazeman, अहो मला सकाळी लवकर उठून अभ्यास कधीच जमला नाही. Not an early bird Sad
नावडता किंवा किचकट विषय अभ्यासत असाल तरी कंटाळा येऊन झोप येऊ शकते. नुसता वाचून अभ्यास करत असाल तर पद्धत बदलून ( गणितं सोडवणे, नोटस् काढणे, फ्लॅश कार्डस, मेमरी मॅप्स बनवणे) पहा. >>> हो, ह्या techniques छान आहेत! Online Lectures बघताना पण सारखं rough नोट्स काढत राहिलं तर maybe अशी झोप येणार नाही.

सकाळी लवकर उठायची सवय लावून घ्यायची असेल तर उठल्यावर किमान ३० मिनीट व्यायाम (एरोबिक/कार्डिओ) करा. मग अभ्यास करा. >>> Yes. Thankyou! Last year सौरभ बोथराचे ऑनलाईन Yoga sessions attend केलेले. परत consistently सुरू करायला हवं.
आणि मला नुसतं संजना म्हणा please! Happy

झोपेचा सर्वात मोठा आनंद शालेय जीवनात मिळाला.
तेव्हा गावी होतो .

आम्ही तीन मित्र कधी चार मित्र रोज एकत्र झोपायचो .
घराच्या अंगणात ,मस्त वारे वाहत असायचे,थंड वातावरण .
आणि गरम अंथरुणात पडून आकाशात चांदण्या बघत गप्पा .

खूप मस्त अनुभव.
काय सुख होते झोपेचे .

सकाळी पाच ला उठून घरामागचा डोंगर चढून जायचो सकाळी सात पर्यंत अगदी फ्रेश.
गव्हाचा चिक खाण्यासाठी ( हा पदार्थ खूप कमी लोकांना माहीत असेल)

शहरी लाईफ मध्ये सर्व सोयी नी युक्त शयन कक्ष आहेत पण ती मजा नाही.

आयुष्यात परत त्या काळानंतर ते दैवी सुख मिळाले नाही.

दीर्घकालीन कोविड19 बाधित ४०% लोकांना निद्रानाशाची समस्या आहे.
या विषयावर २ संशोधन प्रकल्प चालू आहेत :

https://covid19.nih.gov/news-and-stories/understanding-sleep-problems-lo....

झोपेत असतानाच उठून चालायला लागतात
>>
हा झोपेतला एक प्रकारचा बिघाड आहे. त्याला Somnambulism असे शास्त्रीय नाव आहे.
रात्रीच्या लवकरच्या प्रहरात जेव्हा तो माणूस मंद तरंग झोपेच्या गाढ अवस्थेत पोचतो तेव्हा हा प्रकार घडतो. हे जास्ती करून ७ ते १५ वर्षाच्या मुलग्यामध्ये अधिक दिसते. ते काही मिनिटे टिकते. या प्रसंगात जर दुसऱ्या माणसाने त्याला पाहिले तर तो जागा असल्यासारखा वाटतो परंतु तो दुसऱ्या माणसाच्या कुठल्याच कृतीला प्रतिसाद देत नाही. दुसऱ्या दिवशी तो झोपेतून उठल्यानंतर त्याला या घटनेची आठवण सुद्धा नसते.

याचे शास्त्रीय स्पष्टीकरण असे आहे :
झोप आणि जागृत अवस्था वेगळ्या न राहता एकमेकात मिसळून जातात (amalgam) किंवा काही वेळेस या दोन अवस्थांची वेगाने आलटून पालटून आंदोलने (oscillations) होत राहतात.

झोपेत चावळणे/ बरळणे याचे काय कारण असावे ?
अनेकदा दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीला त्याबद्दल काहीच माहिती नसते.

झोपेतील बरळणे >>
चांगला प्रश्न.

• हा प्रकार ३ ते 13 या वयोगटातील बऱ्याच मुलग्यांमध्ये नियमित आढळतो
• पौगंडावस्थेत ज्यांची झोप वारंवार अपुरी राहते त्यांच्या बाबतीत हे जास्त प्रमाणात दिसते.
• सुमारे 24% प्रौढांमध्ये देखील हे असते.

बऱ्याच जणांच्या बाबतीत असे होण्यामागे कोणताही आजार नसतो परंतु झोपेच्या अन्य काही बिघाडांच्या जोडीने हा प्रकार होऊ शकतो.
असे काही बिघाड म्हणजे :
झोपेतील श्वसनावरोध, दीर्घ डोकेदुखी, खळबळजनक झोपेतील बिघाड. झोपेतील चालणे आणि बरळणे हे बऱ्याचदा जोडीने आढळते. या प्रकारामागे आनुवंशिकतेचा बऱ्यापैकी संबंध आहे.
तसेच मोठा ताप आला असताना किंवा ताणतणाव व चिंतेमुळे सुद्धा याचे प्रमाण वाढू शकते.

सूड !
2010 च्या दशकात चीनमध्ये बहुतेक खाजगी उद्योगांमध्ये आठवड्याला ७२ तास काम करणे हा नियम झाला होता. त्यातून कर्मचाऱ्यांचे ताणतणाव वाढले. दिवसभर शिणल्यामुळे स्वतःसाठी विरंगुळ्याचा असा वेळच काढता येईना. बरं, प्रत्येकाला आंतरजालावरील करमणुकीची ओढ तर लागलेलीच !

याचा परिणाम म्हणून लोक रात्री जाणीवपूर्वक उशिरापर्यंत जागू लागले. अंथरुणावर पडले तरी हातातल्या मोबाईलवर सतत स्क्रोल चालू. या प्रकारातून त्यांच्या झोपेवर परिणाम झाला. हा प्रकार त्यांनी जाणीवपूर्वक अवलंबिला असल्यामुळे त्याला
"revenge bedtime procrastination"
असे एक विचित्र नाव दिले गेले.

अलीकडे या विषयावर संशोधन आणि विचारमंथन होत आहे :
https://en.wikipedia.org/wiki/Bedtime_procrastination

2010 च्या दशकात चीनमध्ये बहुतेक खाजगी उद्योगांमध्ये आठवड्याला ७२ तास काम करणे हा नियम झाला होता. त्यातून कर्मचाऱ्यांचे . दिवसभर शिणल्यामुळे स्वतःसाठी विरंगुळ्याचा असा वेळच काढता येईना. बरं, >> त्या नारायण मुर्तीला सांगा जरा समजावुन.

आता झोपतो, उठल्यावर ही ही कामे करायची आहेत असं जोपर्यंत असतं तोपर्यंत आरोग्य असतं. कुणीतरी दिलेली वेळेची कोष्टके काही कामांची नसतात. जगाच्या दृष्टीने कोणती वेळ योग्य हे फेकून द्या.

एक महत्वाचं काम संपवायचं होतं ऑफिस चं, सकाळी उठूम करु असं ठरवून झोपायला गेले, झोपच येईना. सारखी screen दिसू लागली डोळ्यासमोर
खूप प्रयत्न केला. मग शेवटी दीड ला उठून कामाला सुरुवात केली. ४ वाजता सकाळी काम संपलं. आणि मी झोपले परत साडेसहाला उठून तयारी. पण ही झोप भयानक होती. वाईटसाईट स्वप्ने आणि बेचैनी. आज नुसतं डोकं दुखत आहे.. I am not night owl हे पुन्हा एकदा समजलं आहे.

Pages