आवडती, आवश्यक आणि आरोग्यदायी

Submitted by कुमार१ on 7 January, 2024 - 23:29

नमस्कार !
नववर्षातील पहिला लेख सादर करताना आनंद होत आहे.
सन 2020मध्ये ‘सुखी झोपेचा साथी’ हा लेख इथे लिहिला होता (https://www.maayboli.com/node/73074). त्यामध्ये फक्त मेलाटोनिन या झोपेशी संबंधित एकाच हॉर्मोनचा विचार केलेला होता. त्या धाग्यावरील चर्चेदरम्यान वाचकांनी सूचना केली की, झोपेची एकंदरीत प्रक्रिया या विषयावर सविस्तर लेखन करावे. या चांगल्या सूचनेचा विचार करून हा लेख लिहीतोय. यामध्ये आपण झोपेची आवश्यकता, तिच्या दरम्यान होणारे शारीरिक बदल, तिचे शास्त्रीय प्रकार, तिचा वयाशी संबंध आणि झोप-जाग चक्र या मूलभूत गोष्टींचा विचार करणार आहोत.

झोप कशासाठी ?
रोजची झोप हा माणसाच्या जीवनातील अत्यावश्यक भाग आहे. दमलेल्या शरीराला दैनंदिन विश्रांती देणे हा त्याचा मुख्य हेतू. आपल्या जागृत अवस्थेतून झोपेत गेल्यानंतर आपली इच्छाशक्ती काही काळासाठी स्थगित होते. जीवनातल्या छोट्या मोठ्या त्रासदायक गोष्टींपासून काही काळ तरी आपली सुटका होते. झोपेत आपण स्वप्नांच्या राज्यात अगदी मनमुराद विहार करतो. तसं पाहायला गेलं तर आपल्या झोपेवर आपले निस्सीम प्रेम असते. उगाच नाही आपण आपले एक तृतीयांश आयुष्य झोपेसाठी राखून ठेवत ! झोप ही जरी विश्रांतीची अवस्था असली तरी त्या त्या काळात मेंदू जागृतावस्थेइतकीच ऊर्जा वापरत असतो हा मुद्दा महत्त्वाचा.

झोपेला प्रवृत्त करणारे घटक

मेंदूला सतत पोचणाऱ्या संवेदना कमी होणे हे झोप येण्यासाठी आवश्यक असते. त्या दृष्टीने खोलीतील अंधार, शांतता आणि सुखकर बिछाना या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. या उलट जेव्हा मन चिंताग्रस्त असते किंवा काही कारणांनी मनात भावनांचा अतिरेक झालेला असतो तेव्हा शरीरात एपिनेफ्रीन या हार्मोनचा प्रभाव राहतो आणि त्यामुळे मेंदू जागृत ठेवला जातो. हा अर्थातच झोप येण्यातील मोठा अडथळा ठरतो. इथे एक मुद्दा रोचक आहे. जेव्हा अतिशय श्रमाने माणूस खूप दमलेला असतो तेव्हा झोपेला पोषक असणारे आजूबाजूचे वातावरण नसले तरी देखील तो शांत झोपू शकतो.

शरीरक्रियेतील महत्त्वाचे बदल
1. हृदयगती रक्तदाब आणि श्वसनगती कमी होतात
2. स्नायू शिथिल पडतात
3. शरीरातील विविध स्राव कमी होतात पण काहींच्या बाबतीत जठरस्राव वाढू शकतो.

झोपेचा कालावधी

दैनंदिन जीवनात जाग-झोप असे एक जैविक चक्र कार्यरत असते. प्रौढ व्यक्तीत साधारणपणे १६ तास जागृतावस्था आणि ८ तास झोप असे ते चक्र आहे. झोपेच्या एकूण कालावधीत आपण दोन प्रकारची झोप घेतो :
. 80 टक्के झोप : शांत किंवा मंदतरंग स्वरूपाची असते
. 20 टक्के झोप : ही काहीशी ‘खळबळजनक’ असते तिला विरोधाभासी झोप असेही म्हणतात. आता हे दोन प्रकार विस्ताराने पाहू.

१. मंदतरंग झोप : या झोपेचे साधारण तीन टप्पे असतात : हलकी , मध्यम आणि गाढ.
पहिल्या टप्प्यात शरीराचे स्नायू शिथिल पडू लागतात. डोळ्यांच्या गोल गोल फिरल्यासारख्या सौम्य हालचाली होत राहतात. या टप्प्यात बाह्य आवाज किंवा हालचाल यामुळे संबंधित व्यक्ती झोपेतून सहज उठण्याची शक्यता राहते. हा टप्पा पार पडल्यानंतर खरी झोप सुरू होते आणि हळूहळू ती गाढ स्वरूपाची होते. त्या टप्प्यात मात्र झोपलेल्या व्यक्तीला उठवायचे असल्यास मोठे आवाज किंवा गदागदा हलवणे या गोष्टींची गरज भासते.

या प्रकारच्या झोपेत डोळे बऱ्यापैकी स्थिर आणि शांत राहतात. म्हणूनच तिला ‘नॉन रॅपिड आय मुव्हमेंट (NREM)’ या प्रकारची झोप म्हणतात. या झोपेत मेंदूतील पिच्युटरी ग्रंथीतून ग्रोथ हॉर्मोन आणि gonadotropins ही हॉर्मोन्स टप्प्याटप्प्याने स्रवतात. तसेच शरीराला खऱ्या अर्थाने विश्रांती मिळून त्याचा चयापचय पुनर्स्थापित होतो (restoration). तान्ह्या मुलांच्या बाबतीत या झोपेचा त्यांच्या शारीरिक वाढीशी बऱ्यापैकी संबंध आहे.

ˌही झोप साधारण एक तास पूर्ण झाल्यानंतर तिच्यातून बाहेर येण्याची उलटी प्रक्रिया चालू होते. म्हणजेच,
गाढ >> मध्यम >> हलकी
अशी प्रक्रिया पूर्ण झाली की आता झोपेचा पुढे वर्णन केलेला दुसरा प्रकार चालू होतो.

२. ‘खळबळजनक’ झोप : या प्रकारात डोळ्यांच्या हिसके मारल्यागत वेगवान हालचाली ही महत्त्वाची घटना असते. आपले डोळे अक्षरशः एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे झपाझप हलत राहतात. त्यांच्या हालचालींनी ते जणू काही एखादे संपूर्ण दृश्य त्यांच्या पूर्ण आवाक्यात आणू पाहतात. या वैशिष्ट्यपूर्ण घटनेमुळेच या प्रकारच्या झोपेला ‘रॅपिड आय मुव्हमेंट (REM) प्रकारची झोप असे म्हणतात.
डोळ्यांचा अपवाद वगळता शरीराचे इतर स्नायू मात्र आता कमालीचे शिथिल होतात. जेव्हा जीभ शिथिल पडते तेव्हा ती श्वसनमार्गात अंशतः अडथळा आणते. त्यातूनच घोरण्याचा उगम होतो ! जेव्हा एखादी व्यक्ती पाठ टेकून (supine) झोपलेली असते तेव्हा या प्रकारचा अडथळा सर्वाधिक असतो.

झोपेच्या या स्थितीतून एखाद्याला उठवायला खूपच कष्ट पडतात; त्यातून जर काहीजण कुंभकर्ण असतील तर मग काय विचारायलाच नको ! अर्थातच झोपमोड झाल्याची त्रस्तता त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसून येते. अशा झोपेतून उठल्या किंवा उठवल्यानंतर सुमारे 90% लोक त्यांना स्वप्न पडल्याचे सांगतात. स्वप्नरंजन हा या प्रकारातील अर्थातच विशेष भाग. स्वप्नांच्या संदर्भात विज्ञानात जे अभ्यास झाले आहेत त्यातले बरेचसे ‘गृहीतक’ या स्वरूपाचे आहेत.
एखादी व्यक्ती या झोपेत असताना दर जर तिच्या मेंदूचा विद्युत आलेख (EEG) काढला तर तो जागे असतानाच्या अवस्थेसारखाच असतो. या वैशिष्ट्यपूर्ण विरोधाभासामुळेच झोपेच्या या प्रकाराला विरोधाभासी (paradoxical) झोप असेही म्हटले जाते.

या झोपेची अन्य वैशिष्ट्येही महत्त्वाची आहेत. तिच्यात आपल्या नाडीचे ठोके, श्वसनगती आणि रक्तदाब अनियमित होतात. लिंग (किंवा शिश्निकेची ताठरता) आणि स्नायूंचे बारीक झटके येऊ शकतात. मुलांमध्ये दात खाणे बऱ्यापैकी दिसते. या झोपेदरम्यान मेंदूत काही महत्त्वाचे दीर्घकालीन रचनात्मक आणि रासायनिक बदल होतात. त्यातून आपल्याला मानसिक स्वास्थ्य लाभते. तान्ह्या मुलांच्या बाबतीत तर ही झोप आकलन व स्मरणशक्ती जोपासण्यासाठी पूरक ठरते.

साधारण 20 ते 25 मिनिटे या स्वरूपाची झोप झाल्यानंतर आपण त्यातून बाहेर येऊन पुन्हा एकदा पहिल्या प्रकारच्या, म्हणजे मंदतरंग झोपेत प्रवेश करतो. या प्रमाणे प्रकार १ व प्रकार २ चे एकआडएक चक्र आपण उठेपर्यंत चालू राहते. जर रात्रभराची झोप शांत लागली असेल तर सकाळ होण्याच्या सुमारास विरोधाभासी झोपेचा कालावधी काहीसा वाढतो.

sleep  cycle.jpg

वरील चित्रानुसार आतापर्यंत आपण प्रौढांचे झोपचक्र पाहिले. एक वर्षाखालील मुलांमध्ये यात एक महत्त्वाचा फरक असतो. तो म्हणजे, त्यांच्या बाबतीत झोपेचे वरील दोन प्रकार (१ व २) प्रत्येकी ५०% असतात. या बालकांच्या बाबतीत अजून एक उल्लेखनीय मुद्दा. त्यांना झोप लागण्यासाठी आपण त्यांना मांडीवर घेऊन डोक्यावर आणि अंगाच्या काही भागावर सातत्याने थोपटत राहतो. आपल्या या क्रियेमुळे त्यांच्या त्वचेतील विशिष्ट भाग (mechanoreceptors) उत्तेजित होतात आणि त्यांच्यापासून निघालेल्या संवेदना मेंदूत पोचून झोप लागणे सुलभ होते.

मेंदूचे नियंत्रण व रासायनिक घडामोडी
मेंदूमध्ये झोपेचे विविध विभाग असतात. त्यांना शरीराकडून येणारे विविध चेतातंतू योग्य ते संदेश पुरवतात. त्याचबरोबर मेंदूतील दृष्टी विभागाचे सहकार्य देखील महत्त्वाचे असते. या सर्वांच्या समन्वयातून झोपेचे नित्य चक्र कार्यरत राहते. या संदर्भात ज्या रासायनिक घडामोडी घडतात त्यामध्ये अनेक रसायनांचा वेगवेगळ्या पद्धतीने सहभाग असतो. त्यापैकी काही प्रमुख रसायने अशी :
Serotonin, prostaglandin, norepinephrine & acetylcholine

आपले दैनंदिन झोपजागचक्र नियमित राहण्यासाठी मेंदूच्या hypothalamus या विभागात एक जैविक घड्याळ असते. या संदर्भात असलेल्या मेलाटोनिनच्या कार्याचा परिचय उपरोल्लेखित स्वतंत्र लेखात यापूर्वीच करून दिलेला आहे.

वय आणि झोप
वाढत्या वयानुसार झोपेचे तास कमी होत जातात हे आपण जाणतोच. सर्वसाधारणपणे वयानुसार ते तास असे असतात :
• 0 ते 1 वर्ष :16 तास
• बालपण : 10 तास
• प्रौढावस्था : 6-8 तास
अर्थात व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीनुसार प्रौढपणी झोपेच्या कालावधीत फरक राहतो.
Sleeping-baby.jpg

जन्मापासून जसे वय वाढत जाते तसे मेंदूतील झोपेच्या जैविक घड्याळात बदल होत जातात. जन्मानंतर पहिल्या तीन महिन्यात असे जैविक घड्याळ तयार झालेले नसते. त्यामुळे ही बालके त्यांची झोप संपूर्ण 24 तासात निरनिराळ्या वेळी हवी तशी विभागून घेतात. तसेही ते राजेच असतात ना ! यानंतर जसे वय पुढे सरकते तसतसे मेंदूत जैविक घड्याळ तयार होऊ लागते आणि रात्रीच्या वेळी अधिकाधिक झोपण्याकडे आपला कल होतो.

शालेय मुलांच्या बाबतीत शाळेच्या वेळा हा घटक झोपेच्या वेळा आणि कालावधी ठरवण्याच्या बाबतीत खूप महत्त्वाचा ठरतो. या विषयावर अलीकडेच आपण जोरदार राज्यस्तरीय चर्चा अनुभवली ! प्रौढ व्यक्तींच्या बाबतीत दैनंदिन जीवनातले अनेक घटक झोपेच्या कालावधीवर परिणाम करतात. त्यामध्ये डोळ्यांवर सातत्याने पडणारा कृत्रिम प्रकाश (e-screens), बैठी जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव, चहा, कॉफी आणि कृत्रिम शीतपेयांचा अतिरेक, कौटुंबिक समस्या आणि विविध औषधांचा परिणाम यांचा समावेश आहे. व्यावसायिक कसरतपटूना सामान्य प्रौढापेक्षा जास्त झोपेची (सुमारे 9 तास दैनंदिन) गरज असते.

ज्येष्ठ नागरिकांची झोप
मध्यमवयाशी तुलना करता ज्येष्ठ वयात एकंदरीत झोप कमी होते हे साधारण निरीक्षण आहे. या वयात झोपेसंदर्भात खालील महत्त्वाचे बदल बऱ्याच जणांमध्ये जाणवतात :
1. ‘लवकर निजे आणि लवकर उठे’ ही सवय वाढीस लागते.
2. रात्री प्रत्यक्ष झोप लागण्यास बराच वेळ घेतला जातो

3. झोपेचा एकूण कालावधी कमी होतो
4. मंदतरंग झोपेतील गाढपणा कमी होतो - हे विशेषतः पुरुषांमध्ये अधिक दिसून येते. मात्र खळबळजनक झोप कमी होण्याचा परिणाम स्त्री व पुरुष दोघांमध्ये सारखाच होतो.

5. झोपेत वारंवार व्यत्यय येतात आणि थोडंसं कुठे खुट्ट वाजलं की जाग येते
6. काहींच्या बाबतीत दिवसा डुलक्या घेण्याचे प्रमाण वाढते- विशेषता जर अनेक दीर्घकालीन आजार मागे लागलेले असतील तर. पण काहींच्या बाबतीत दुपारची झोप अजिबातच येत नाही.

वर लिहिलेली निरीक्षणे सर्वसाधारण आहेत. त्यातील प्रत्येकाला अपवाद देखील दिसून येतात.

वाढत्या वयानुसार वरीलप्रमाणे झोपेतील बदल होण्यास मेंदूच्या विविध भागांमधले चेतारासायनिक बदल कारणीभूत असतात. त्याचबरोबर या वयोगटात असणाऱ्या इतर व्याधी आणि समस्यांचा देखील झोपेवर परिणाम होतो. यामध्ये रात्रीची लघवीची वारंवारिता, औषधांचे परिणाम आणि मद्यपानाचा समावेश आहे. पुरुषांमध्ये मंद-झोपेचे प्रमाण कमी होण्यामागे पुरुष हॉर्मोनची पातळी कमी होण्याचा संबंध असू शकतो. वृद्धांच्या बाबतीत त्यांच्या अवतीभवती असणारे वातावरण- म्हणजे घर की वृद्धाश्रम- याचाही झोपेच्या कालावधीवर बराच प्रभाव पडतो.

या वयात झोप कमी झाल्यामुळे स्मरणशक्ती देखील कमी होते, की दोन्ही स्वतंत्रपणे कमी होतात, या विषयावर सातत्याने संशोधन चालू आहे.
सरतेशेवटी एक लाखमोलाचा प्रश्न उपस्थित होतो :

“म्हातारपणी शरीराची झोपेची गरजच कमी होते, का गरज (पूर्वीइतकीच) असूनही अथक प्रयत्नांती झोप येत नाही?”

हा प्रश्न वादग्रस्त असून त्यावर अद्याप समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. मात्र बऱ्याच संशोधकांचे मत, “म्हातारपणी झोप निर्माण करण्याची क्षमता कमी होत असावी’, या गृहीतकाकडे झुकलेले आहे.

झोपेचा आदर्श कालावधी ?
स्पष्ट सांगायचे झाल्यास, “रोज किती तास झोपावे” या प्रश्नाचे एकचएक असे शास्त्रीय उत्तर नाही ! निरनिराळ्या देशांमध्ये संबंधित वैद्यकीय संघटनांनी वेगवेगळ्या शिफारसी केलेल्या आहेत. परंतु झोपेचा ठराविक कालावधी हा शेवटी व्यक्तीसापेक्ष आहे. झोप झाल्यानंतर ताजेतवाने वाटले पाहिजे आणि दिवसभरातील कामे उत्साहाने करता आली पाहिजेत, हाच निकष महत्त्वाचा. तसेच, ‘ प्रौढपणी दिवसा झोपावे की नाही”, याचे उत्तरही पुन्हा व्यक्तीसापेक्ष आहे. आपापल्या नोकरी-व्यवसायाच्या स्वरूपानुसार आणि गरजेनुसार आपली झोप दिवस आणि रात्र या वेगवेगळ्या सत्रात विभागली जाऊ शकते.

समारोप

दैनंदिन झोपेची मूलभूत प्रक्रिया, त्या संदर्भातील मेंदूतील घडामोडी आणि वयानुसार झोपेत होणारे बदल यांचा आढावा या लेखात घेतला. उत्तम आरोग्यासाठी शरीराच्या भरणपोषण आणि व्यायामाबरोबरच यथायोग्य झोपेची नितांत आवश्यकता असते. निद्राराज्यातील स्वप्नसृष्टी हा कुतुहलजनक विषय असला तरी तो स्वतंत्र अभ्यासाचा आणि लेखनाचा विषय आहे. झोपेसंबंधीच्या विविध समस्या आणि आजार हा विशेष तज्ञांचा प्रांत असून तो या लेखाच्या कक्षेबाहेर आहे.

सुमारे पन्नास वर्षांपूर्वी प्रसिद्ध साहित्यिक अनंत काणेकर यांनी लिहिलेला ‘यथेच्छ झोपा’ हा लघुनिबंध गाजला होता आणि तो शालेय अभ्यासक्रमातही होता. त्याची स्मृती कायम राहिलेली आहे. आपल्या रोजच्या झोपेचा कालावधी हा व्यक्तीसापेक्ष असल्याचे आपण वर पाहिलेच. तेव्हा आपापल्या दिनक्रम आणि गरजेनुसार प्रत्येकाने आपापल्या झोपेचे वेळापत्रक ठरवलेले उत्तम !
****************************************************************
संदर्भ :
१. विविध वैद्यकीय पाठ्यपुस्तके
२. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5440010/#:~:text=62%20The%2....
३. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5810920/#:~:text=Advancing%...(4)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

. ते संदेश मेंदूत कुठेतरी ही जाणीव 'जागृत' ठेवतात.

मानवी शरीर म्हणजे एक अत्यंत विकसित यंत्र आहे ह्याची जाणीव असे काही वाचले की होते.
मेंदू च किती घट्ट नियंत्रण शरीरावर आहे ते जाणवते.
मेंदू जसा पूर्ण शरीरावर पूर्ण नियंत्रण ठेवतो तसा च राज्यकर्ता असायला हवा.पूर्ण प्रशासनावर त्याचे नियंत्रण हवे.
तेव्हाच सर्व कारभार शरीरा सारखा सुरळीत चालेल

मेंदूचे किती घट्ट नियंत्रण शरीरावर आहे
>>> +११
proprioception यंत्रणा म्हातारपणी दुबळी होऊ लागते. मेंदूतील विविध तंतूचा ऱ्हास त्यासाठी कारणीभूत असतो. असे झाले की मग विविध ठिकाणाहून तोल जाण्याचे / खाली पडण्याचे (पलंग, इ.) धोके वाढतात.
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC6853739/#:~:text=The%20prop...(10%2C%2019).

गेल्या वर्षी आमचे एक 85 वर्षाचे चांगले प्राध्यापक यालाच बळी पडले. ते झोपेमध्ये पलंगावरून खाली पडले आणि त्यानंतर मेंदूत रक्तस्त्राव होऊन त्यांचे निधन झाले.

सुरेख लेख...! नेहेमीप्रमाणेच उपयुक्त माहीतीपूर्ण... Happy
मी बरोबर पावणेसात वर्षे (हो अग्दी बराब्बर पावणेसात) ग्रेवयार्ड शिफ्ट (१९३०-०४३०) केलेय आणि रात्रीच्या झोपेचं महत्त्व काय हे चांगलच कळून चुकलंय.

@मानव, मीही गेले चार महिने GERD ने त्रस्त आहे. तुमच्या विपुतही या संबंधाने चर्चा वाचली. अनुभवांचं आदानप्रदान करण्यासाठी याच ग्रुपात क्लोज्ड धागा काढावा का?

अभिप्रायाबद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद !
.....................................................
पावणेसात वर्षे (ग्रेवयार्ड शिफ्ट (१९३०-०४३०) केलेय
>>> त्याबद्दल तुमचे कौतुक !

एका सहकारी डॉक्टर मित्राचा अनुभव सांगतो. अतिशय हुशार आणि ध्येयवादी असलेल्या त्याने जाणीवपूर्वक ग्रामीण भागात रुग्णालय चालू केले. खालच्या मजल्यावर रुग्णालय आणि वरच्या मजल्यावर त्याचे घर. सुरुवातीच्या काळात, “डागदर साहेब म्हणजे अगदी देव”, वगैरे प्रशंसा झाली. परंतु त्याच्या पुढच्या आयुष्यात “रुग्ण तपासणीच्या वेळा” या पाटीला काहीही अर्थ उरलेला नव्हता. कुठल्याही प्रकारचे रुग्ण अगदी सामान्य प्रकारच्या तक्रारी घेऊन रात्री अपरात्री येऊन त्रास देऊ लागले.

त्याच्या वडिलांना एक गंभीर autoimmune आजार होता. ही जनुकीय पार्श्वभूमी आणि त्यात वरील प्रकारचे व्यावसायिक आयुष्य, यात तो भरडला गेला. वीस वर्षात त्याने सलग झोप म्हणजे काय ते जवळजवळ अनुभवले नव्हते. पन्नाशीच्या मध्यावरच त्याला एका तीव्र autoimmune आजाराने ग्रासले आणि त्याला नाईलाजाने त्याचा व्यवसाय बंद करावा लागला.

समाजाच्या अनेक क्षेत्रातील असे अनेक व्यावसायिक समाजाच्या भल्यासाठी स्वतःच्या झोपेची आहुती देत असतात. त्या सर्वांना अभिवादन !

अतिशय आवडत्या विषयावरील उत्तम लेख.

मला एकदम गाढ झोप लागते. ( टचवूड )
आजूबाजूने आवाज झाला वै काही जाग येत नाही.
खुट्ट वाजले की जाग येणारे लोकं मग मला नावं ठेवतात.
फक्त झोपेची ट्रेन पकडतानाच्या वेळी शांतता हवी.
दुपारी झोपत नाही. कारण एकदा डुलकलो की 2 तास तरी जाग येत नसते.

बाकी आयुष्यात नोकरीनिमित्त विचित्र शिफ्टमध्ये काम करावे लागले आहे.
रात्री 8 ते सकाळी साडेपाच अशी अघोरी शिफ्ट आणि अर्धा तास ब्रेक देउन 2 तास जबरदस्तीचा ओव्हरटाईम हा प्रकार देखील सहन केला आहे आम्ही. मेंटल आणि फिजिकल हरासमेंट झाली ही indirect.
नंतर ती शिफ्ट timing बदलली.
मला आठवतंय तेव्हा 2 महिन्यात 6 की 8 किलो वजन कमी झालेल.

झोपमोड माझी पण अशी किरकोळ आवाजाने वैगेरे होत नाही.
झोपलो की झोपलो.

फक्त काही अनुभव माझे आहेत.
माझे routine सकाळी ६ पासून वॉकिंग नी चालू होते .

पण कधी मी हे सकाळी उठणे आणि वॉकिंग skip केले तर दुपारी १२ वाजे पर्यंत झोपलो तरी झोप पूर्ण होत नाही.
आळस दिवसभर राहतो.

गाढ झोपेत असताना कोणी जबरदस्ती नी उठवले तर खूप त्रास होतो .
डोके दुखणे वैगरे.
एक पूर्ण रात्र जागणे त्रास दायक वाटत नाही पण झोपेतून मध्येच उठणे खूप त्रासदायक वाटते
1),

ज्यांना पुरेशी आणि वेळेत झोप लागत नाही त्यांच्यासाठी तज्ञ डॉनी सुचवलेला " झोपेच्या आधी ३:२:१ हा नियम " उपयुक्त आहे. तो जीवनशैलीशी निगडित आहे.
जरूर वाचा :
https://www.loksatta.com/chaturang/dr-sumit-pawar-article-about-memory-f...

झोपेच्या गोळ्या खूप धोकादायक आहेत.
मेडिकल वाले सर्व गोळ्या ओळखीने देतील पण झोपेच्या गोळ्या कधीच किती ही ओळख असली तरी देणार नाही.

झोप खूप महत्वाची आहे.

संडास दोन मिनिटात साफ होणे हे लक्षण पचन संस्था न शी संबंधित आहे ( मी खूप नशीबवान आहे दोन मिनिटं पेक्षा जास्त वेळ संडास करण्यासाठी मला कधीच लागत नाही ते पण २४ तासात एकदाच) हे आणि दोन मिनिट हा काळ अगदी योग्य आहे.
तशी झोप आपण ठरवल्या नंतर काहीच मिनिटात लागली पाहिजे.
हे निरोगी असण्याचेच लक्षण आहे.

Medicine वर झोप अवलंबून नको

सकाळी लिहायचं होतं हे... पण कामाच्या गडबडीत राहीलं...

मी बरोबर पावणेसात वर्षे (हो अग्दी बराब्बर पावणेसात) ग्रेवयार्ड शिफ्ट (१९३०-०४३०) केलेय आणि रात्रीच्या झोपेचं महत्त्व काय हे चांगलच कळून चुकलंय.>>>>
त्याचे विपरीत परीणाम झालेत की. शुगर तर आहेच मागे लगलेली. झोप न होणे हे मुख्य कारण असावं त्यामागे असा माझा एक अंदाज. आताशा झोप तर येते टीकठाक पण सलग अशी व्हायला सगळे परीमाणं लागतात - पुरेसा व्यायाम झालेला हवा, जेवण झोपायच्या आधी २ तास तरी झालेलं हवं. शक्यतो अंधार हवा रूम मध्ये इ. इ.

एचबीएवनसी आताशा कुठे ६.५ पर्यंत खाली आणलंय (दोन वर्षांपूर्वी ते ११ होतं) अर्थात मी विशेष ट्राय म्हणजे आठवड्याच्या सात दिवसांपैकी पाच दिवस तरी दहा हजार पावलं रोज चालल्या गेली पाहीजेत असं पाहतो आणि चहात गोड अन इतरही गोड खातच नाही. प्रसंगी जे काही गोडाचं असेल ते १ पीस फक्त (वाटी नी घेण्यासारखं असेल तर फारतर अर्धीवाटी)... असो.

धन्यवाद !
..
त्याचे विपरीत परीणाम झालेत की. शुगर तर आहेच मागे लगलेली. >>>
अगदीच शक्य आहे.
दीर्घकाळ अपुरी झोप मिळण्यामुळे खालील आजार होण्याचा धोका वाढतो हे बऱ्याच संशोधनांमध्ये दिसून आलेले आहे :

मधुमेह( प्रकार२), उच्चरक्तदाब/ हृदयविकार, लठ्ठपणा
नैराश्य

वरती अंगावर वारा घेण्यासंदर्भात आलेले आहे. लहानपणी उन्हाळ्ञाच्या सुट्टीत, आंबे, आमरस-पुरी वगैरे जेवण करुन, खाली सतरंजी घालून, आणि वरती गरागरा पंखा लावून, मस्त झोपा काढलेल्या आठवतात. मग संध्याकाळी पश्चिम वार्‍यावरती मैत्रिणींबरोबर पायी रपेट घेणे किंवा सायकलने कॅम्पात लायब्ररीत जाउन, वि आ बुवा, रत्नाकर मतकरी, रमेश मंत्री, धारप, खांडेकर, ना सी फडके वगैरे लेखकांची पुस्तके आणणे, हे अगदी नियमित असे. कॅन्टॉन्मेन्ट एरिया फार मस्त होता आमचा. टेकडी होती. पावसाळ्यात मेंढ्या चारायला मेंढपाळ येत. बालपण फार सुंदर गेले.

अजुनही उन्हाळ्ञात एसी आवडत नाही त्यापेक्षा गरागर पंखा आवडतो Happy

नेहमीप्रमाणे चांगला लेख!
काल बऱ्याच महिन्यांनी शांत झोप लागली.अगदी झोपेतून आपोआप जाग आल्यावर फ्रेश वाटते.नाहीतर बरेच दिवस,रात्री एक नाकपुडी बंद रहाते.मग जाग बरेचदा येते.शेवटी उठल्यावर डोके जड होते.
मागच्या वर्षी याचा भरपूर त्रास झाला होता.सर्दी नाही की इतर प्रॉब्लेम नाही. फॅमिली डॉक्टरना विचारून झाले आहे.ते काहीच बोलले नाहीत.
दुपारी फारच क्वचित झोपते.

थंड वातावरणात छान झोप लागते.

पण फास्ट पंखा आणि ac ह्यांची हवा सरळ डोक्यावर येत असेल तर डोकं झाकून घेणे गरजेचे आहे,बाकी शरीर उघडे राहिले तरी काही हरकत नाही.
डोक्याला हवा लागली की सर्दी होते .

या धाग्यावरून मी पूर्वी लिहलेली एक कविता आठवली...

" झोप "....!

आईच्या कुशीत उबदार...
अजून अज्ञात... अजून अगम्य...
उद धुपाच्या वासात.. दुधाभाताच्या घासात...
खास शिवलेल्या गोधडीत...
छान .गुरफटलेली ....
.....गूढ गहिरी,"गोजिरवाणी झोप"...!

हॅरी पाँटरचा पिक्चर....
उडणाऱ्या चेटकिणी...तरंगणारे डॄँगन...
काळयाकुट्ट अंधारात... घुमणारे पडघम...
लांब लांब सावल्यांनी घेरलेली...
कोंडलेल्या श्वासांची...
..... घाबरलेली,थरथरणारी,"भित्री झोप"....!

फिजीक्सच दुपारचं लेक्चर
उडप्याच्या इडलीचा सरपटणारा ढेकर...
न्युटनच्या तीन नियमांची घिसीपिटी अंगाई...
आईनस्टाईन मधल्या "आ" एवढी मोठ्ठी जांभई...
जडावलेल्या डोळ्यातून....
.....रेंगाळणारी,पेंगुळलेली,"आळशी झोप"....!

उधाणलेल्या मनाची लहर...
होस्टेल मधल्या विलक्षण उपद्व्यापांचा कहर...
कॉटखाली घुसमटलेली पहिली नि शेवटची सिगारेट...
पोस्टर मधली ऐश्वर्या,मध्यरात्री मिठीत थेट....
कळकट अंथरुणात, बेधुंद ,भन्नाट...
.......बिनधास्त "बँचलर झोप"...!

तिच्यामाझ्यातल मिटलेलं अंतर....
तिच्या मोगार्यातल मी टिपलेलं अत्तर....
धुंद जांभळ्या स्वप्नात...अवखळ पैन्जनांशी...
थोडी हवीशी...थोडी नवीशी...
मंद मधाळलेली...
.....गर्द गंधाळलेली, "गुलाबी झोप"... !

वैतागून मारलेली एक क़्वारटर
ऑफिसमध्ये ओवरटाईम ...घरातही करकर...
धाकटीचा अभ्यास..मोठ्याचा संगीतक्लास...
थकलेले कर्ज...आईची बायपास..
तणावात ताणलेली...
...... आयुष्यातून उडालेली, "रडवी झोप."..!

दवाखाना,तपासण्या,आणि डॉक्टर....
आता बहुधा, माझी ही अखेरचीच रात्र...
रेंगाळणारे चार श्वास आणि थकलेली गात्र...
उद्यापर्यंत संपेल बहुतेक सगळं...
मी माझ्यातून मोकळा नि जगही वेगळं..
आणि मग सुरु होईल...
.....शांत निवांत..."कायमची झोप".....!!

स्वा सु
सुंदर कविता. विविध अंगी झोप अर्थातच आवडली !
.....शांत निवांत..."कायमची झोप".....!!
>>>
ओ हो ! एकदम, "जगण्याने छळले होते" ची आठवण झाली..

> >>>स्वा सु
सुंदर कविता. विविध अंगी झोप अर्थातच आवडली !
.....शांत निवांत..."कायमची झोप".....!!>>>> +1

द सा
तुमची पण एखादी कविता असणार या विषयावर !
येऊ द्यात .. Happy

>>>>पण फास्ट पंखा आणि ac ह्यांची हवा सरळ डोक्यावर येत असेल तर डोकं झाकून घेणे गरजेचे आहे,
होय वारा थेट कानावरती सहन नाही होत.

झोपताना सरासरी टेंशन वाल्या बातम्या,देशाचे राजकारण, असले कोणतेच प्रकार ना बघायचे ना ऐकायचे.
मस्त कपिल शर्मा शो किंवा आपल्या आवडीचे संगीत, मालिका , बघायच्या .

मस्त झोप लागते.
काही लोकांस विनाकारण चिंता लागून राहिलेली असते किंवा आपला जिथे सबंध पण नाही त्या गोष्टीचे टेंशन आलेले असते.
अशी लोक च निद्रा नाशेचे शिकार असतात


झोपताना सरासरी टेंशन वाल्या बातम्या,देशाचे राजकारण, असले कोणतेच प्रकार ना बघायचे ना ऐकायचे.

>>>
अतिशय चांगला मुद्दा. मी झोपण्याआधी दीड तासापासून असा क्रम ठेवतो :
इ-स्क्रीन बंद >> छापील वाचन आणि जोडीला रेडिओवरील विविध भारती ऐकणे >>> शेवटची वीस मिनिटे वाचन बंद, दिवा मंद आणि फक्त संगीत ऐकणे >>> त्या वेळेचे संगीत साधारण ‘जुनं ते सोनं’ या प्रकारातले असते. त्यातली एखादी सुरावट सोबतीला घेऊन पलंगावर जाणे.

अगदी शांत आणि मस्त वाटते.

>>>>जोडीला रेडिओवरील विविध भारती ऐकणे
विविध भारती हे आयुष्यातील अनमोल देणं मानते मी Happy कै च्या कै जुना बाज राखून आहेत.
हम है राही प्यार के, हवामहल, सखी सहेली, शाम सिंदूरी, भारत की गुंज
पैकी भारत की गूंज सुरू होते वेळी जी सिग्नेचर ट्युन वाजते ती कोणत्या वाद्याची आहे. मला खूप असं गलबलून येतं प्रत्येक वेळी. म्हणजे कधीतरी त्या ट्युनशी माझा संबंध आलेला आहे असे वाटते. गूढ वाटते.

Pages