माझी अमेरिका डायरी - ५ - वाचनालये आणि वाचन संस्कृती

Submitted by छन्दिफन्दि on 12 March, 2023 - 01:28

अमेरिकेतील अतिशय कौतुकास्पद वाटणारी एक गोष्ट म्हणजे इकडची सार्वजनिक वाचनालये! जाणून घेऊ या थोडंसं त्याविषयी …
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मुलांच्या शाळा सुरु झाल्या तसं माझ्या लक्षात आलं की इकडचा अभ्यासक्रम आणि मुलं तिकडे जे शिकून आली होती त्यात बराच फरक आहे, विशेषतः इंग्लिश मध्ये.
आपण इंग्रजी शिकतो तर इकडे बऱ्याच मुलांची ती मातृभाषा किंवा प्रथम भाषा असल्यमुळे त्यांना बरेचसे नेहमीचे शब्द, वाक्यरचना मुळातच येत असते, बोलता येत असते.
इकडे शाळामध्ये वाचनावर मुख्य भर दिला जातो. किंडरगार्डनच्या शेवटच्या महिन्यात शाळा सुरु केलेली तेव्हा माझ्या मुलासाठी, पुस्तक वाचणे हा प्रकार नवीन होता. त्याच्या भारतातील शाळेत त्याला साईट रिडींगने बरेच शब्द माहित होते, नंबर्स कळत होते. पण पुस्तक उचलून वाचायला लागणे त्याच्यासाठी आव्हानात्मक होते. तिसरीतल्या मुलालाही इंग्लिश व्याकरण, वाक्ये बनविणे, लिहिणे हे जमत होते. पण टेक्स्ट बुक व्यतिरिक्त फारसे बाहेरचे वाचन करायची त्यालाही सवय नव्हती. जरी घरी मी भारंभार पुस्तकं आणत होते पण मुलांकडून ती वाचून घ्यायचे कष्ट/जाणीव बहुदा कमी पडली असावी.

छोट्याच्या बाईंनी मला सांगितले की एक “BOB बुक सिरीज “ येते. त्याचे बरेच खंड आहेत. तर तू सुट्टीत त्याच्याकडून वाचून घे. ते कुठल्याही लायब्ररीत मिळतील.
मला स्वतःला पुस्तकांची आणि वाचनाची खूप आवड असल्यामुळे मी भारतात पण नेहेमी पुस्तके आणत असे अगदी मुलांसाठी सुद्धा. त्यामुळे मी विचार केला “लायब्ररी कशाला? आपण विकतच घेऊ. “
आम्ही लगेचच्या वीकेण्ड ला “बार्न्स & नोबल”, पुस्तकांच्या दुकानात गेलो. इतकं मोठं पुस्तकांचं दुकान मी प्रथमच बघत होते. त्याविषयी परत कधीतरी सविस्तर लिहेन.
पण माझ्या लक्षात आलं कि इकडे पुस्तक भयंकर महाग आहेत. उत्कृष्ट प्रतीचा कागद, बांधणी, छपाई हे सगळं आकर्षक वाटलं तरी एक पुस्तक १०-१२$ ना (७००-८००रु ). एखाद पुस्तक घेणं वेगळं पण १०-१२ सेट्स घेणं खिशाला ( आणि विशेषतः डोक्यातल्या calculator ला ) झेपणारं नव्हतं.
त्यामुळे मग घराजवळच बसने जात येईल असं वाचनालय शोधून काढलं. एका संध्याकाळी मी तिकडे धडकले. पत्ता वगैरे देऊन सदस्यत्व घेतले. तेव्हा मला कळलं की इकडे सार्वजनिक वाचनालये रहिवाशांसाठी मोफत असतात.

मी एवढं मोठं वाचनालय पहिल्यांदाच बघत होते. गेल्या गेल्या पहिल्यांदा छोट्या मुलांचा विभाग. त्यातील शेल्फही छोटी मुलांचा सहज हात पोहोचेल अशी. एका सेक्शन मध्ये फक्त picture books. लेखकांच्या नावानुसार मांडलेली. मला महत्प्रयासांनी कळले अगदी छोट्या म्हणजे पहिली पर्यंतच्या मुलांना ती वाचून दाखवणे अपेक्षित असते. - मी खूप मागे लागून जेव्हा ती पुस्तके मुलाला वाचायला लावायचे , तेव्हा एकतर अक्षरं लावून लावून वाचल्यामुळे खूप वेळ लागत असे. मग गोष्टीतला सगळं रस संपून जात असे. माझा त्रागा, त्यांचा त्रागा. मग त्याच्या शिक्षिकेकडून कळलं की पुस्तकं “Read Aloud “, म्हणजे मोठ्यांनी मुलांबरोबर बसून वाचून दाखवायची असतात .
पुढचा सेक्शन पहिली ते तिसरीच्या मुलांसाठी. त्यातही वेगवेगळ्या कठीण पातळ्यांप्रमाणे त्यात हळू हळू एका पानावरती वाक्य वाढत जातात, कठीण शब्द येऊ लागतात.
चौथी ते पाचवी-सहावीच्या मुलांसाठी दुसरा सेक्शन तिथे परत लेखकांच्या नावाप्रमाणे पुस्तके मांडून ठेवलेली असतात. त्यानंतर मोठा सेक्शन NON FICTION, म्हणजे माहिती पूर्ण पुस्तकांचा असतो, मग त्यात चरित्रे, आत्मचरित्रे, विज्ञान, सामान्यज्ञान, भूगोल, कला, पाककला अशी पुस्तके सेक्शनप्रमाणे मांडून ठेवलेली असतात.

Cupertino-Library-Downstairs-Childrens-Picture-Books-670x447.jpg

एक सेक्शन ऑडिओ बुक्स चा. तर पलीकडे सगळ्या मुलांसाठीच्या विडिओ CDs.
एका कोपऱ्यात चार पाच कॉम्प्युटर्स, मुले मेम्बरशिप कार्डच्या मदतीने ते वापरू शकतात. सगळ्यात मागच्या साईडला एक मोठं रिकामा कोपरा होता. तिथे एक दोन छोटी स्टूल्स ठेवलेली. तो मुलांचा स्टोरी टाईम एरिया होता. आठवड्यातल्या ठराविक दिवशी तेथे मुलांसाठी वयाप्रमाणे गोष्टी वाचून दाखवल्या जातात , काही छोटे मोठे इतर वोर्कशॉप्स असतात.
मग येतो मुलांसाठीचा ऍक्टिव्हिटी / रिड़ीन्ग एरिया. पाच सहा छोटी टेबले, प्रत्येकाभोवती चार-पाच छोट्या खुर्च्या, एक दोन सोफे, असा सगळा जामा-निमा. तिकडे तुम्हाला काही मुलं पुस्तक वाचताना दिसतील, काही मुलं आणि त्यांचे पालक मिळून होमवर्क करताना दिसतील, एखादा मुलगा काहीतरी रंगवताना दिसेल, तर कधी एखादी आजी नातीबरोबर बोर्ड गेम्स खेळताना दिसेल- एका वेगळ्या शेल्फवरती मुलांसाठी बोर्ड गेम्स, रंगीत खडू, रंगकाम करायला कागद, लेगो ब्रिकस वेगवेगळ्या छोटी बॉक्सेस मध्ये ठेवलेले असतात. स्ट्रॉलर्स मध्ये छोट्या भावंडाना घालून, त्यांच्या मोठ्या भावंडांसाठी लायब्ररीत ताटकळणाऱ्या आया/ बाबा, मधेच किरकिरणार एखाद बाळ ह्या सगळ्यात हा वाचनालयाचा सेक्शन एकदम लाइव्हली असतो. “टाचणी पडली तरी ऐकू येईल” हा वाचनालयाचा नियम इकडे अजिबात लागू होत नाही.
hand-4092627_1920.jpg

मग teens सेक्शन, त्यांची पुस्तकं , CDs , त्यांना अभ्यासासाठी जागा, छोट्या केबिन्स (ग्रुपवर्क साठी ) त्या मात्र बुक करायला लागतात. मासिकांचा आणि वर्तमान पत्राचा अजून वेगळा एरिया , तिथे परत बसून वाचायला , काम करायला जागा.

Cupertino-Library-Downstairs-Childrens-Computers-670x447.jpg

आता दुसरा मजला (काही ठिकाणी बेसमेंट) फक्त मोठ्या माणसांसाठी. तिकडे मात्र “पिन ड्रॉप सायलेन्स”. तिथे वेगवेगळ्या साहित्य प्रकारांनुसार सेक्शन्स जस मुख्यत्वे FICTIONs (कथा -कादंबऱ्या ) & NON-FICTIONS (माहितीपूर्ण लिखाण).
मग त्यात परत कादंबरी, प्रेमकथा, विज्ञानकथा, गूढकथा असे वेगवेगळे विभाग. तर एकीकडे कला, पाककला , विणकाम , शिवणकाम , फॅशन , इंटिरियर डिझाईन, बागकाम, कायदा इ. इ. बऱ्याच व्यवसायानुसार, छंदानुसार अनेक sections. वाचण्यासाठी जागा. काम करायला कॉम्प्युटर्स.

पुस्तकांव्यतिरिक्त मग एक विभाग music CDs चा- तिकडे इतर हजारो अल्बम्स बरोबरच आपल्या, लता दीदी, आशाताई , मोहम्मद रफी, बर्मनदा, किशोरदा, हरिप्रसाद चौरासिया अशा अनेक मात्तबरांच्या CDs बघून एकदम खुश झाले. व्हिडिओ सेक्शनमध्ये परत हजों VCDs, चित्रपटांच्या आणि TV सिरीयलच्या.

अमेरिका इमिग्रण्टसचा (बाहेरील देशातील लोकं) देश, त्यामुळे इकडच्या लायब्ररीमध्ये सुद्धा “World language” सेक्शन असणारच, नाही का? तर त्या सेक्शन मध्ये चायनीज, जापनीज, कोरियन, रशियन, स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन, मल्याळी , तेलगू, गुजराथी, पंजाबी, हिंदी (एका लायब्ररीत अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी मराठी ) अशी अनेक भाषांमधील पुस्तके दिसली.

आमच्या लायब्ररीच्या नियमांनुसार मला वाटतं १०० पर्यंत पुस्तके /CDs / VCDs घेता येतात. मी स्वतः हि मर्यादा कधी आजमावली नाहीये त्यामुळे छातीठोकपणे नाही सांगता येणार.

पुस्तके घेताना आपला लायब्ररी क्रमांक टाकून मशीन वरती स्वतःच chekout करता येतात. रिटर्न करताना सुद्धा एक खिडकी असते त्यातून पुस्तके सरकवत जायची. मशीन पुस्तकांचे बारकोड वाचून तुम्हाला पुस्तके परत केल्याची पावती देतं.

ते वाचनालय बघून मला तर हर्षवायूच झाला. होता होईल तेवढी पुस्तके (म्हणजे जेवढं वजन उचलता येईल तेव्हढी ) आणि हो “बॉब’स बुक सिरीज” घेऊन मी (मनातल्या मनात ) उड्या मारतच घरी गेले.

ह्या इतक्या सुंदर वाचनालयांचा खरंच किती आणि कसा उपयोग होतो. मुख्य म्हणजे मुलं, मोठी माणसं वाचतात का ? इकडच्या वाचन संस्कृती विषयी पुढच्या भागात जाणून घेऊ या.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी वाटलं वाचून.
अमेरिकेत सरकार शिक्षण , वाचनालये यांच्यावर इतका खर्च करतं. कॅपिटलिझम मधला हा सोशलिझम पाहून नवलही वाटलं.

भरत, अनिल अवचटांनी गमतीने तसं लिहिलंही आहे.. नेमकं वाक्य आठवत नाही, पण रेगनच्या नकळत इथे समाजवादी राज्य आलं की काय, असं काही तरी आहे.

छान लिहिले आहे.

कॅनडा व अमेरिका वाचनालयाबाबत सढळ हाताने पैसे खर्च करतात. लायब्ररी कार्ड फुकट असतं, एका कार्डावर आमच्याकडे एकावेळी चाळीस पुस्तकं नेता येतात. कोविड काळात त्यांनी मुलांच्या पुस्तकावरची ओव्हर ड्यू फीस काढून टाकली. कुणी होल्ड केलेलं पुस्तक नसेल तर तुम्ही तीन वेळा रिन्यू करता येते. एकावर तीन आठवडे ठेवता येतात.

लायब्ररीत गोष्टी सांगण्याचे, क्राफ्ट मेकिंगचे मोफत क्लासेस असतात. मुलांनी ग्रहण बघावे म्हणून फुकट चष्मे वाटतात. कॉलेज काऊन्सलिंग व करिअर काऊन्सलिंगचे फुकट क्लासेस असतात. इथली वाचनालये फक्त वाचनाची नसून तुम्हाला या समाजाचा भाग करण्याचा प्रयत्न करतात. कम्युनिटी सर्व्हिसेसचे बरेच दुवे इथं मिळतात.

प्रत्येक राष्ट्रपतीच्या नावाने एक वाचनालय असते. Simi Valley ला रोनाल्ड रेगन यांच्या नावाने वाचनालय आहे. लोकांना पुस्तक डोनेट करायला आवडते. आमच्या लायब्ररी बाहेर दोनतीन स्वयंसेवक आज्या पुस्तकांचे दुकान चालवतात. तिथे एकदोन डॉलर्सना मोठीमोठी जुनी पुस्तकं मिळून जातात, जी लायब्ररीतून रिसायकल होत रहातात. ते दुकान भलतंच गोंडस आहे. तिथे समोर सुविचार लिहिलेले असतात, मागे मोठी झाडं व खुर्च्या आहेत. तिथे सावलीत वाचत बसता येते. इथं वॅगन मधे फुकट पुस्तके ठेवलेली आहेत.
Screenshot_20230312_095601.jpg

पहिला फोटो बघताना मी शिकवायला जायचो त्या ऑर्फनेजमध्ये बुकवाला या NGO ने सुरू केलेल्या वाचनालयाची आठवण झाली. अगदी अशीच मांडंणी , रंगसंगती, मुलांनीच तयार केलेल्या पोस्टर्सनी सजलेल्या भिंती . ही अमेरिकन संस्थाच आहे. त्यांनी आणलेली बहुतेक पुस्तक त्यांना अमेरिकेत देणगी रूपात मिळाली होती.
त्यांच्या संकेतस्थळावरून
Bookwallah was inspired by events in Founder & CEO's Seena Jacob’s own life where the solace of great books available in United States public libraries helped her get through some hardships

या (पब्लिक लायब्ररीज) विरोधात आवाज करणारं पब्लिकही आहे, असं दिसतं.

छान.

विनामूल्य सार्वजनिक वाचनालये सरकारी मालकीच्या इमारतीत असावीत बहुतेक. सीड कॅपिटल, कर्मचाऱ्यांचा पगार वगैरे सरकार / म्युनिसिपाल्टी देत असावी, वरचे थोडेफार काम व्हॉलेंटियर्स करत असावेत.

हे सर्व उत्तम करण्यासाठी आणि नीट चालवण्यासाठी प्रचुर इच्छाशक्ती, पैसा आणि समाजभान लागत असणार.

इथली वाचनालये म्हणजे भन्नाट आहेत. आपण पुस्तक नेतोय म्हणजे आपणच उपकार करतोय असा अविर्भाव असतो स्टाफ चा. शिवाय अमूक एक पुस्तक आहे का विचारले तर अगदी नम्रपणे इथे नाही पण शेजारच्या गावात आहे तिथून मागवून ठेवते, तसदीबद्दल क्षमस्व !.

लहानपणी आम्च्या गावच्या वाचनालयात 'पुल एक साठवण' मगितले तर तो लाब्ररियन माझ्यावरच खेकसला होता की तुला यातले काय कळणार ? 'राजकुमार व जादुचा दिवा' हातात देऊन हाकलले !

<<अमेरिकेत सरकार शिक्षण , वाचनालये यांच्यावर इतका खर्च करतं. कॅपिटलिझम मधला हा सोशलिझम पाहून नवलही वाटलं.>>
सोशलिझम नाही, सरकारकडून मदत मिळते त्यापेक्षा जास्त देणग्यांतून मिळते. बरेच लोक निरनिराळ्या कार्यक्रमांसाठी विनावेतन काम करतात.

कुमार१, वावे, अश्विनीमामी , देवकी , भरत, अस्मिता, अनिंद्य, vijaykulkarni, हरचंद पालव , सगळ्यांना धन्यवाद !

ह्या खालील लिंकवर अमेरिकेतील सार्वजनिक वाचनालयाचा इतिहास खूप छान पद्धतीने सांगितलाय
https://www.bloomberg.com/news/articles/2019-02-19/how-american-cities-g...

The Giver of Stars हे एक छान पुस्तक वाचलेल , चार बायका त्यांच्या गावामध्ये लायब्ररी चालवायला किती आणि कसे कष्ट घेतात त्या काळी असा एकूण आशय
https://www.goodreads.com/book/show/43925876-the-giver-of-stars

लहानपणी आम्च्या गावच्या वाचनालयात 'पुल एक साठवण' मगितले तर तो लाब्ररियन माझ्यावरच खेकसला होता की तुला यातले काय कळणार ? 'राजकुमार व जादुचा दिवा' हातात देऊन हाकलले !<<< Sad Sad Sad
आमच्याकडे ठाण्यात ठाणे वाचन मंदिर आणि मराठी ग्रंथ संग्रहालय यांत बरीच पुस्तके होती. शाळेची लायब्ररी पण बऱ्यापैकी चांगली होती. पण म्हणजे एव्हढं अद्ययावत आणि मोठ काही नव्हते हेही खरेच.

लहानपणी आम्च्या गावच्या वाचनालयात 'पुल एक साठवण' मगितले तर तो लाब्ररियन माझ्यावरच खेकसला होता की तुला यातले काय कळणार ? 'राजकुमार व जादुचा दिवा' हातात देऊन हाकलले !<<< Sad Sad Sad
आमच्याकडे ठाण्यात ठाणे वाचन मंदिर आणि मराठी ग्रंथ संग्रहालय यांत बरीच पुस्तके होती. शाळेची लायब्ररी पण बऱ्यापैकी चांगली होती. पण म्हणजे एव्हढं अद्ययावत आणि मोठ काही नव्हते हेही खरेच.

अस्मिता, तुमच्या येथील लायब्ररीमधील उपक्रम सांगितल्याबद्दल धन्यवाद.
असा काळा फळा मी कितीतरी वर्षांनी बघतला, छान वाटलं.
पुढच्या लेखात मी इकडच्या वाचनालयाचे उपक्रम, वाचन संस्कृती आणि इतर माहिती देईन

विनामूल्य सार्वजनिक वाचनालये सरकारी मालकीच्या इमारतीत असावीत बहुतेक. >>
आम्ही आधी रहायचो तिथली लायब्ररी कार्नेगी यांनी दिलेल्या देणगीतून बांधलेली असे वाचले होते. त्यांनी बर्‍याच ठिकाणी लायब्ररी बांधायला आर्थिक सहाय्य दिले होते असेही ऐकले होते.

A Carnegie library is a library built with money donated by Scottish-American businessman and philanthropist Andrew Carnegie. A total of 2,509 Carnegie libraries were built between 1883 and 1929, including some belonging to public and university library systems.

छान चालू आहे लेख मालिका.
हे धागे 'अमेरिकेतील आयुष्य' ह्या ग्रुपात जास्त योग्य असतील ना.

ईथल्या पाळणाघरांवर सुद्धा असाच छान माहितीपर लेख होईल. मुले शाळेच्या वयातच ईथे आली त्यामुळे डे केअर आणि प्री स्कूल एक्स्प्लोर करायची संधी हुकली. तुम्हाला अनुभवातून वा माहितीतून ईथल्या डे केअर सिस्टीमबद्दल लिहिता आले तर वाचायला नक्कीच आवडेल.

अमूक एक पुस्तक आहे का विचारले तर अगदी नम्रपणे इथे नाही पण शेजारच्या गावात आहे तिथून मागवून ठेवते, तसदीबद्दल क्षमस्व !. >> हा प्रकार भन्नाटच असतो. हवे ते पुस्तक हवे तिथून आटापिटा करून मिळवून देतात. परत आपण पर्चेस सजेशन पण देऊ शकतो नि पुस्तकाच्या प्रकारावर ते मान्य किंवा अमान्य केले जाते.

अमूक एक पुस्तक आहे का विचारले तर अगदी नम्रपणे इथे नाही पण शेजारच्या गावात आहे तिथून मागवून ठेवते, तसदीबद्दल क्षमस्व !. <<< आमच्याकडे सगळे claims त्यांच्या सनकेत स्थळावरून करावे लागतात, पुस्तक सुचविणे पण website वरूनच. पुस्तके देणे - घेणे यंत्रावरूनच होते. त्यामुळे गेल्या काही वर्षात लायब्ररीत गेलो तरी तिकडच्या लोकांशी खूप क्वचित संपर्क येतो.

हे धागे 'अमेरिकेतील आयुष्य' ह्या ग्रुपात जास्त योग्य असतील ना.<<< चालेल मी शोधते.
छान चालू आहे लेख मालिका.<< thank you

हो, मला इकडे मुलांसाठी पाळणाघर लागले नाही पण ओळखीच्याची मुले पाळणा घरात होती. फक्त एकदा "जिनिअस किड्स " हे नाव ऐकूनच मी इतकी इंप्रेस झाले, म्हणून चौकशी केली होती. मला आधी वाटलं कदाचित जिनिअस मुलांना तरी घेत असावेत किंवा इकडे मुलं जिनिअस होऊन बाहेर पडतात. Lol Lol Lol
पण आठवड्याला ३-४ तासांचे ३००-३५० डॉलर्स ऐकून परत त्या वाटेल गेले नाही.

परवा इकडे वादळामुळे खूप मोठा विजेचा घोटाळा झाला होता. खूप ठिकाणचे, शाळांमधले लाईट्स गेले होते. पण ह्या कठीण प्रसंगी वाचनालये मदतीला धावून आली.
काल जवळ जवळ कितीतरी (शे ) विद्यार्थी, मोठी माणसे चार्जिंग पासून इंटरनेट ,wifi साठी, अभ्यासासाठी वाचनालयाच्या आश्रयाला आली होती.
अजूनही काही ठिकाणी वीज परत यायची आहे

हवे ते पुस्तक हव्या त्या लायब्ररीतून मिळते. आणि हवी ती म्हणजे इथे कॅनडात आमच्या गावातील लायब्ररीत नव्हतं तर पार अमेरिकेतूनही आणून देतात. ते ही बहुतेक विनामूल्यच. तसा करारच नसेल तर अगदी नॉमिनल चार्जेस पडले तर ते घेतात.
मध्यंतरी शिवाजी - द हिंदू किंग असंच वाचलेलं.
लायब्ररीत पुस्तके, इ-बुक्स, ऑडिओ बुक्स, एक्स बॉक्स -पी एस गेम्स सीडीज, टीव्ही शो- चित्रपटांच्या डिव्हिडी, म्युझिअम्सचे फुकट पासेस, स्टेट पार्क्सचे पासेस, कम्प्युटर अ‍ॅक्सेस, प्रिंटर अ‍ॅक्सेस अशा अनेकोनेक गोष्टी असतात. आमच्या इथे तरी लायब्ररी गावातली म्युन्सिपालटी चालवते. साधारण त्याच आवारात बरेचदा स्केटिंग अरिना, स्विमिंग पूल, जिम इ. सीटीनेच दिलेल्या सोयी असतात. हल्ली वर अस्मिताने लिहिलंय तसे लेट फी चार्जेस पूर्ण माफ केलेले आहेत. लेट फी लागते म्हणून लोक वाचत नाहीत असा आक्षेप घेतलेला, त्यामुळे लोकांची वाचावं म्हणून ते पूर्ण पणे काढूनच टाकले आहेत.
आमचं गाव राजधानीचं असलं तरी तसं लहान आहे. टोरांटोची लायब्ररीची मेन ब्रांच बघुन डोळे दिपलेले. इतकी भव्य आणि वेमकमिंग आहे. पुस्तक वाचायला हवंय म्हटल्यावर तुम्ही त्या गावातले नसाल तरी काही तरी करुन तुम्हाला लायब्ररी कार्ड तयार करुन देऊन पुस्तक देतीलच. असा प्रकार आहे.
आमच्या आणि मुलांच्या वाढीत लायब्ररीचे अनन्य स्थान आहे आणि उपकार आहेत! Happy

बॉब बुक्स! Happy पोरांची पहिली अक्षर ओळख! काय आठवण काढलीत! आपली कमल नमन कर, जगन नमन कर ची इंग्रजी आवृत्ती! Proud
रच्याकने: वरचे फोटो बॅस्कम वरच्या सॅन होजे पब्लिक लायब्ररीचे आहेत का हो? Happy
मला कँम्पबेल सिटी हॉलची लायब्ररी जास्त आवडायची. ती सँटाक्लारा लायब्ररीज मधली होती. मग सॅन होजेत रहायला गेल्यावर तिकडचं कार्ड घेतलेलं पण सँटा क्लाराचं परत न्हवतं केलं. मी लांब पडलं तरी तिकडूनच आणायचो पुस्तकं.

मी पहिल्यांदा अशी सुसज्ज वाचनालय बघून हरखून गेलेले. आजूबाजूला 4 5 वाचनालय. कुठेही जा, पुस्तकं मिळतात एका कार्डवर . लहान मुलांसाठी किती तरी प्ले किट्स. Us मध्ये 15 पुस्तक नेता येत होती, कॅनडात 50...ते पण प्रत्येक लायब्ररी मधून. मला ही अशी वाचनालय भारतात आवडतील. या लोकांच्या दैनंदिन जीवनातला वाचन हा एक भाग आहे. रात्री झोपताना काहीतरी वाचूनच झोपायचं. जर इथून एक गोष्ट मला भारतात न्यायची असेल तर ती असेल जागोजागी विनामूल्य सुसज्ज वाचनालय. छान लिहिलंय तुम्ही.

लहानपणी आम्च्या गावच्या वाचनालयात 'पुल एक साठवण' मगितले तर तो लाब्ररियन माझ्यावरच खेकसला होता की तुला यातले काय कळणार ? 'राजकुमार व जादुचा दिवा' हातात देऊन हाकलले !

नवीन Submitted by vijaykulkarni on 12 March, 2023 - 11:55 >>>>मोठेपणी कधी गेलात का ? तुमच्या गावच्या लायब्ररीत कदाचित ते काका बदलले असतील , बघा आता नक्की देतील तुम्हाला ते पुस्तक .

आज लेख आणि प्रतिसाद दोन्ही वाचले. फार सुंदर माहिती आहे दोन्हीमध्ये.
लेख वाचनीय.
असे वातावरण इथे कधी निर्माण होईल..! त्या आधी, इथे १०० % साक्षरता, सुशिक्षितता आणि सुसंस्कृतता ह्या पायऱ्या कधी गाठल्या जातील..

Pages