माझी अमेरिका डायरी - ५ - वाचनालये आणि वाचन संस्कृती

Submitted by छन्दिफन्दि on 12 March, 2023 - 01:28

अमेरिकेतील अतिशय कौतुकास्पद वाटणारी एक गोष्ट म्हणजे इकडची सार्वजनिक वाचनालये! जाणून घेऊ या थोडंसं त्याविषयी …
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मुलांच्या शाळा सुरु झाल्या तसं माझ्या लक्षात आलं की इकडचा अभ्यासक्रम आणि मुलं तिकडे जे शिकून आली होती त्यात बराच फरक आहे, विशेषतः इंग्लिश मध्ये.
आपण इंग्रजी शिकतो तर इकडे बऱ्याच मुलांची ती मातृभाषा किंवा प्रथम भाषा असल्यमुळे त्यांना बरेचसे नेहमीचे शब्द, वाक्यरचना मुळातच येत असते, बोलता येत असते.
इकडे शाळामध्ये वाचनावर मुख्य भर दिला जातो. किंडरगार्डनच्या शेवटच्या महिन्यात शाळा सुरु केलेली तेव्हा माझ्या मुलासाठी, पुस्तक वाचणे हा प्रकार नवीन होता. त्याच्या भारतातील शाळेत त्याला साईट रिडींगने बरेच शब्द माहित होते, नंबर्स कळत होते. पण पुस्तक उचलून वाचायला लागणे त्याच्यासाठी आव्हानात्मक होते. तिसरीतल्या मुलालाही इंग्लिश व्याकरण, वाक्ये बनविणे, लिहिणे हे जमत होते. पण टेक्स्ट बुक व्यतिरिक्त फारसे बाहेरचे वाचन करायची त्यालाही सवय नव्हती. जरी घरी मी भारंभार पुस्तकं आणत होते पण मुलांकडून ती वाचून घ्यायचे कष्ट/जाणीव बहुदा कमी पडली असावी.

छोट्याच्या बाईंनी मला सांगितले की एक “BOB बुक सिरीज “ येते. त्याचे बरेच खंड आहेत. तर तू सुट्टीत त्याच्याकडून वाचून घे. ते कुठल्याही लायब्ररीत मिळतील.
मला स्वतःला पुस्तकांची आणि वाचनाची खूप आवड असल्यामुळे मी भारतात पण नेहेमी पुस्तके आणत असे अगदी मुलांसाठी सुद्धा. त्यामुळे मी विचार केला “लायब्ररी कशाला? आपण विकतच घेऊ. “
आम्ही लगेचच्या वीकेण्ड ला “बार्न्स & नोबल”, पुस्तकांच्या दुकानात गेलो. इतकं मोठं पुस्तकांचं दुकान मी प्रथमच बघत होते. त्याविषयी परत कधीतरी सविस्तर लिहेन.
पण माझ्या लक्षात आलं कि इकडे पुस्तक भयंकर महाग आहेत. उत्कृष्ट प्रतीचा कागद, बांधणी, छपाई हे सगळं आकर्षक वाटलं तरी एक पुस्तक १०-१२$ ना (७००-८००रु ). एखाद पुस्तक घेणं वेगळं पण १०-१२ सेट्स घेणं खिशाला ( आणि विशेषतः डोक्यातल्या calculator ला ) झेपणारं नव्हतं.
त्यामुळे मग घराजवळच बसने जात येईल असं वाचनालय शोधून काढलं. एका संध्याकाळी मी तिकडे धडकले. पत्ता वगैरे देऊन सदस्यत्व घेतले. तेव्हा मला कळलं की इकडे सार्वजनिक वाचनालये रहिवाशांसाठी मोफत असतात.

मी एवढं मोठं वाचनालय पहिल्यांदाच बघत होते. गेल्या गेल्या पहिल्यांदा छोट्या मुलांचा विभाग. त्यातील शेल्फही छोटी मुलांचा सहज हात पोहोचेल अशी. एका सेक्शन मध्ये फक्त picture books. लेखकांच्या नावानुसार मांडलेली. मला महत्प्रयासांनी कळले अगदी छोट्या म्हणजे पहिली पर्यंतच्या मुलांना ती वाचून दाखवणे अपेक्षित असते. - मी खूप मागे लागून जेव्हा ती पुस्तके मुलाला वाचायला लावायचे , तेव्हा एकतर अक्षरं लावून लावून वाचल्यामुळे खूप वेळ लागत असे. मग गोष्टीतला सगळं रस संपून जात असे. माझा त्रागा, त्यांचा त्रागा. मग त्याच्या शिक्षिकेकडून कळलं की पुस्तकं “Read Aloud “, म्हणजे मोठ्यांनी मुलांबरोबर बसून वाचून दाखवायची असतात .
पुढचा सेक्शन पहिली ते तिसरीच्या मुलांसाठी. त्यातही वेगवेगळ्या कठीण पातळ्यांप्रमाणे त्यात हळू हळू एका पानावरती वाक्य वाढत जातात, कठीण शब्द येऊ लागतात.
चौथी ते पाचवी-सहावीच्या मुलांसाठी दुसरा सेक्शन तिथे परत लेखकांच्या नावाप्रमाणे पुस्तके मांडून ठेवलेली असतात. त्यानंतर मोठा सेक्शन NON FICTION, म्हणजे माहिती पूर्ण पुस्तकांचा असतो, मग त्यात चरित्रे, आत्मचरित्रे, विज्ञान, सामान्यज्ञान, भूगोल, कला, पाककला अशी पुस्तके सेक्शनप्रमाणे मांडून ठेवलेली असतात.

Cupertino-Library-Downstairs-Childrens-Picture-Books-670x447.jpg

एक सेक्शन ऑडिओ बुक्स चा. तर पलीकडे सगळ्या मुलांसाठीच्या विडिओ CDs.
एका कोपऱ्यात चार पाच कॉम्प्युटर्स, मुले मेम्बरशिप कार्डच्या मदतीने ते वापरू शकतात. सगळ्यात मागच्या साईडला एक मोठं रिकामा कोपरा होता. तिथे एक दोन छोटी स्टूल्स ठेवलेली. तो मुलांचा स्टोरी टाईम एरिया होता. आठवड्यातल्या ठराविक दिवशी तेथे मुलांसाठी वयाप्रमाणे गोष्टी वाचून दाखवल्या जातात , काही छोटे मोठे इतर वोर्कशॉप्स असतात.
मग येतो मुलांसाठीचा ऍक्टिव्हिटी / रिड़ीन्ग एरिया. पाच सहा छोटी टेबले, प्रत्येकाभोवती चार-पाच छोट्या खुर्च्या, एक दोन सोफे, असा सगळा जामा-निमा. तिकडे तुम्हाला काही मुलं पुस्तक वाचताना दिसतील, काही मुलं आणि त्यांचे पालक मिळून होमवर्क करताना दिसतील, एखादा मुलगा काहीतरी रंगवताना दिसेल, तर कधी एखादी आजी नातीबरोबर बोर्ड गेम्स खेळताना दिसेल- एका वेगळ्या शेल्फवरती मुलांसाठी बोर्ड गेम्स, रंगीत खडू, रंगकाम करायला कागद, लेगो ब्रिकस वेगवेगळ्या छोटी बॉक्सेस मध्ये ठेवलेले असतात. स्ट्रॉलर्स मध्ये छोट्या भावंडाना घालून, त्यांच्या मोठ्या भावंडांसाठी लायब्ररीत ताटकळणाऱ्या आया/ बाबा, मधेच किरकिरणार एखाद बाळ ह्या सगळ्यात हा वाचनालयाचा सेक्शन एकदम लाइव्हली असतो. “टाचणी पडली तरी ऐकू येईल” हा वाचनालयाचा नियम इकडे अजिबात लागू होत नाही.
hand-4092627_1920.jpg

मग teens सेक्शन, त्यांची पुस्तकं , CDs , त्यांना अभ्यासासाठी जागा, छोट्या केबिन्स (ग्रुपवर्क साठी ) त्या मात्र बुक करायला लागतात. मासिकांचा आणि वर्तमान पत्राचा अजून वेगळा एरिया , तिथे परत बसून वाचायला , काम करायला जागा.

Cupertino-Library-Downstairs-Childrens-Computers-670x447.jpg

आता दुसरा मजला (काही ठिकाणी बेसमेंट) फक्त मोठ्या माणसांसाठी. तिकडे मात्र “पिन ड्रॉप सायलेन्स”. तिथे वेगवेगळ्या साहित्य प्रकारांनुसार सेक्शन्स जस मुख्यत्वे FICTIONs (कथा -कादंबऱ्या ) & NON-FICTIONS (माहितीपूर्ण लिखाण).
मग त्यात परत कादंबरी, प्रेमकथा, विज्ञानकथा, गूढकथा असे वेगवेगळे विभाग. तर एकीकडे कला, पाककला , विणकाम , शिवणकाम , फॅशन , इंटिरियर डिझाईन, बागकाम, कायदा इ. इ. बऱ्याच व्यवसायानुसार, छंदानुसार अनेक sections. वाचण्यासाठी जागा. काम करायला कॉम्प्युटर्स.

पुस्तकांव्यतिरिक्त मग एक विभाग music CDs चा- तिकडे इतर हजारो अल्बम्स बरोबरच आपल्या, लता दीदी, आशाताई , मोहम्मद रफी, बर्मनदा, किशोरदा, हरिप्रसाद चौरासिया अशा अनेक मात्तबरांच्या CDs बघून एकदम खुश झाले. व्हिडिओ सेक्शनमध्ये परत हजों VCDs, चित्रपटांच्या आणि TV सिरीयलच्या.

अमेरिका इमिग्रण्टसचा (बाहेरील देशातील लोकं) देश, त्यामुळे इकडच्या लायब्ररीमध्ये सुद्धा “World language” सेक्शन असणारच, नाही का? तर त्या सेक्शन मध्ये चायनीज, जापनीज, कोरियन, रशियन, स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन, मल्याळी , तेलगू, गुजराथी, पंजाबी, हिंदी (एका लायब्ररीत अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी मराठी ) अशी अनेक भाषांमधील पुस्तके दिसली.

आमच्या लायब्ररीच्या नियमांनुसार मला वाटतं १०० पर्यंत पुस्तके /CDs / VCDs घेता येतात. मी स्वतः हि मर्यादा कधी आजमावली नाहीये त्यामुळे छातीठोकपणे नाही सांगता येणार.

पुस्तके घेताना आपला लायब्ररी क्रमांक टाकून मशीन वरती स्वतःच chekout करता येतात. रिटर्न करताना सुद्धा एक खिडकी असते त्यातून पुस्तके सरकवत जायची. मशीन पुस्तकांचे बारकोड वाचून तुम्हाला पुस्तके परत केल्याची पावती देतं.

ते वाचनालय बघून मला तर हर्षवायूच झाला. होता होईल तेवढी पुस्तके (म्हणजे जेवढं वजन उचलता येईल तेव्हढी ) आणि हो “बॉब’स बुक सिरीज” घेऊन मी (मनातल्या मनात ) उड्या मारतच घरी गेले.

ह्या इतक्या सुंदर वाचनालयांचा खरंच किती आणि कसा उपयोग होतो. मुख्य म्हणजे मुलं, मोठी माणसं वाचतात का ? इकडच्या वाचन संस्कृती विषयी पुढच्या भागात जाणून घेऊ या.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरचे फोटो बॅस्कम वरच्या सॅन होजे पब्लिक लायब्ररीचे आहेत का हो?<<<<< वरचे फोटो कूपरटिनो लायब्ररीचे आहेत.
आम्ही सुद्धा कॅम्पबेल लायब्ररीत जातो. दोन्ही लायब्ररी santa clara काउंटी च्या असल्यामुळे आलटून पालटून कशाही वापरता येतात.
covid पासून कॅम्पबेल लायब्ररी community सेंटर मध्ये तात्पुरती हलवली आहे, मुख्य लायब्ररीत बहुदा नूतनीकरण चालू असावे.
साराटोगाची सॅन होजे सिटी लायब्ररी पण आम्ही मध्ये वापरायचो. <<<:D Lol Lol
लोकडाऊन काळात त्यांच्या कडे स्पॅनिश वगैरे भाषांचे चांगले ऑनलाईन वर्ग होते. जावा आणि पायथॉन चे पण वर्ग होते. आम्हाला तेव्हा थोडा उशीर झाल्यामुळे आमची ऍडमिशन हुकली.

वाचनालयाची अतिशय सुरेख अमेरिकेत रुळलेली नागरिक व्यवस्था भारतात कधीच अवतरेल व रुळणार नाहीका , हा प्रश्न मनात आला. फार चांगल्या माहितीसाठी धन्यवाद...

असे वातावरण इथे कधी निर्माण होईल..!<<<माझ्या डोक्यातही ह्या लायब्ररी बघून तोच प्रश्न आला.

आपल्याकडे भारतात पण हे शक्य आहे. पालक- शाळा - सरकारी यंत्रणा- सेवाभावी संस्था आणि खाजगी कंपन्यांकर फंडिंग असे घटक एकत्र आले तर होऊ शकत. पण लहान पणापासून वाचन संस्कृती तयार करण्याचं काम / प्रयत्न जाणीवपूर्वक करायला लागतील.
मला वाटतं काही संस्था जस क्वेस्ट (किंवा इतरही बऱ्याच असतील) मुलांना वाचत करायचे प्रयत्न करतायत. कोकणात पण बऱ्याच संस्था वाचनालये देण्यासाठी प्रयत्नशील आहेत असे ऐकले होते
सुधा मूर्तीनचि इन्फोसिस फौंडेशन कर्नाटक आणि तिकडच्या बऱ्याच गावांमध्ये वाचनालये चालू केल्याचं वाचनात आले होते.

ठाण्याला खूप वर्षांपासून अल्मेडा आणि भारत (नाव कदाचित चुकलं असेल ) लायब्ररी मुलांना अभ्यासासाठी जागा उपलब्ध करून देत आहेत. अल्मेडा लायब्ररीत त्यावेळी शंभर -दोनशे मुलं तरी एकावेळी अभ्यास करायची.

सार्वत्रिकीकरण व्हायला हवे हे खरे!

वाचून दिलेल्या प्रतिक्रियांसाठी मनापासून धन्यवाद!

Pages