रमा.....

Submitted by युगंधर. on 27 April, 2016 - 03:53

rama 3_opt.jpgrama 5_opt.jpg

(माऊली या संस्थेच्या माध्यमातून मी डॉ.राजेंद्र व माझी पत्नी डॉ.सुचेता रस्त्यावर व विविध तीर्थक्षेत्री जगणाऱ्या बेघर बेवारस,मनोरुग्ण व मरण्यासाठी सोडून दिलेल्या महिलांसाठी त्यांची काळजी व उपचार करण्यासाठी एक घर चालवतो.सध्या या त्यांच्या हक्काच्या घरात १०० महिला व इथेच जन्माला आलेली १७ मुले कायमस्वरूपी राहतात.या कामाच्या निमित्ताने येणारे वेगवेगळे अनुभव व हेआपल्या सारख्या माणसांच्या कधी कल्पनेच्या विश्वातहि न जाणवणारे जग लेखनातून मांडण्याचा हा प्रयत्न.मी सध्या या अनुभवावर "प्रकाशाशी दोन हात" या शीर्षकाचे पुस्तक लिहतो आहे.त्यातील काही अंश मायबोलीकरांसाठी देण्याचा हा प्रयत्न.)

बाबासाहेबांची रमा....

प्रसंग १ –
एक ख्रिश्चन गृहस्थ माऊलीच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी येतात.
बघून भारावून वगैरे जातात.येथे सगळ्या जाती आणि धर्माच्या महिला असाव्यात आणि त्या गुण्यागोविंदाने राहतात असं ते अनुमान काढतात आणि खुश होतात. मग विषय होतो त्यांच्या जगण्याचा....आणि शेवटी मरण्याचा ...ते अस्वस्थ होतात आणि मला खूप काळजीने विचारतात ,पण मग एखादी ख्रिश्चन महिला वारली तर तिचे अंत्यसंस्कार तुम्ही कसे करता? ते त्या त्या धर्मा प्रमाणे व्हायलाच हवेत !
प्रसंग २ –
एक सज्जन मुस्लीम गृहस्थ असेच भेटीसाठी येतात .असचं बोलण होत.इथे असणाऱ्या महिलांच्या जाती ..धर्माबद्दल ते सहज चौकशी करतात आणि सहजच बोलून जातात ,इथे कुणी मुस्लीम महिला वारली तर तिचे अंत्यसंस्कार आम्ही करू ...आम्हाला जरूर कळवा.

प्रसंग ३-
एक हिंदू महाराज भेटतात आणि येथील हिंदू महिलांचे क्रियाकर्म हिंदू शास्रा नुसारच व्हायला हवे असे सुचवतात.शेवटी प्रश्न त्यांच्या आत्म्याच्या गतीचा आहे...असेही ते सांगतात.

इथे माणसाला माणूस म्हणून जगू द्यायचच नाही.
त्याला जात आणि धर्माच कोंदण लावून त्यात बद्ध करायचं आणि आपापल्या सोयी प्रमाणे त्या माणसाच जगण...त्याच कर्तुत्व आणि मरणही त्याप्रमाणे साचेबंद ठरवायचं.
बऱ्याच वेळेला माऊलीला भेट देण्यासाठी आलेल्या अभ्यागताला सर्वप्रथम कार्यालयातील मदर मेरीचा खूप सुंदर पुतळा दिसतो.त्यावरून अनुमान काढून खूप लोकांनी कार्यालयात त्या त्यावेळी उपस्थित असणाऱ्याना डॉक्टर ख्रिस्ती आहे काय ? असे विचारले आहे.त्यानंतर तिथेच भिंतीवर राधा आणि गायीच खूप छान पेंटीग आहे.ते बघून अजूनच गोंधळ उडतो.नंतर आतमध्ये साई बाबांचा आणि मेहेरबाबाचा फोटो दिसतो.भिंतीवर कृसस्थ येशू दिसतो.मदर तेरसा आणि बाबा आमटे विभाग दिसतात.आणि शेवटी तथागत बुद्ध सभागृह आणि त्यात असणारी विवेकानंदाची प्रतिमा......
गोंधळ उडतो.अनुमान लागत नाही.मला हे खूप छान वाटते .
नुकतीच काही दिवसापूर्वी एक महिला माउलीमध्ये दाखल झाली.आली तेव्हा तिची ती भयाण अवस्था बघवत नव्हती.नीट चालता येत तर नव्हतच पण सगळ्यात भयाण प्रकार म्हणजे तिचे दोनही कान कापलेले होते....
अगदी मुळापासून ...दिसत होती फक्त कानाची भोकं ...आणि पूर्णपणे सडलेली तिची भयानक जखम.
महाराष्ट्रातील एका शासकीय रुग्णालयात तिला पूर्वी कुणीतरी दाखल केले होते.त्यांनी काही दिवस त्यांच्या परीने उपचार करण्याचा प्रयत्न केला पण तिच्या सोबत तिचे कुणी नातेवाईक नाहीत.तिची परिस्थिती हाताबाहेर चाललेली. तिची जबाबदारी कोण घेणार ?
आणि ते बिचारे तरी काय करणार? शेवटी काही सरकारी नियम असतात.…. ! ज्यांची ओळख नाही अश्या माणूस नावाच्या प्राण्याला इथे कोण बरे विचारणार ? शिवाय हा भयाण त्रास ,ती येणारी दुर्गंधी ...सरकारी इस्पितळात काय इतकीच कामे असतात काय ? त्यांनी तिला तेथून बाहेर सोडण्याचे ठरवले.आता ती कुठे जायील पुढे कसे जगेल याचा विचार करण्याची अजिबात गरज नाही.नाहीतरी अश्या माणसांनी जगावेच कश्याला ???
जगण्याचा ,उत्तम सेवा सुविधा आणि उत्तम जगण्याचा अधिकार या चेहरा हरवलेल्या लोकांना कसा मिळावा बरे ?
शेवटी तेच झाल . ती बाहेर पडली मग तिला माउलीत आणण्यात आलं.
तिच्या त्या भयाण जखमा बघून आम्ही हादरूनच गेलो.बापरे ती जगते तरी कशी ?
चेहरा उदास ,डोळे खोल गेलेले अंगात त्राण नाही ,हलता फिरता येत नाही आणि शी शु हि जागेवरच.
माउलीत तिला डायपर घालण्यात आले .मग तिच्या जखमा बऱ्या कश्या करता येतील याचा विचार सुरु झाला.तिची प्रकृती इतकी नाजूक झाली होती कि कुठलही तीव्र प्रतीजैवक औषध तिला चालत नव्हत.
तीच हिमोग्लोबिन अगदी ३.५० इतक .
दररोज तीच ड्रेसिंग करण म्हणजे दिव्यानुभव .सगळी औषधे वापरली पण जखमेतील पु काही थांबेना आणि दुर्गंध जायीना .मग होमियोपथी उपयोगाला आली क्यालेन्डूला आणि क्यान्थारीस या औषधांच्या अर्काने लेपण आणि ड्रेसिंग सुरु केले काही औषधी पोटातूनही दिली . काही दिवसात पु थांबला आणि जखमाही कोरड्या झाल्या.
आता ती जगेल असं वाटू लागलं.ती देखील आता मला बर वाटू लागलाय मी आता जगणार असं म्हणायची.
आता जरा बरी होती म्हणून मी तिला तीच नाव विचारल ..ती सहज म्हणाली माझं नाव रमा हाये बाप्पा...
रमा...मी बाबासाहेबाची रमा...
तीच ते वाक्य काळीज चिरून गेलं.
बाबासाहेबाची रमा..
काय बोलून गेली ती ...अश्या किती रमा ..
तीन मला हे असं सांगून काय प्रतीत केलं ? ती दलित होती....?
माझ्या दृष्टीने ती एक माणूस होती...
माउलीत अश्या कितीतरी रमा आहेत .कोण कुठल्या जातीची आणि धर्माची माहिती नाही.पण मनाचा आजार झालेल्या या भगिनींनी अंतर्मनात आपली जात जागी ठेवलेली असते.आपला धर्म जागा ठेवलेला असतोच.त्याचा परिणाम म्हणून त्या मला आणि सुचेताला त्यांच्या जाती ,धर्माच्याच मानतात.
माउलीतील कुठल्याही भगिनीला विचारा डॉक्टर कोण आहे ? तेव्हा त्यांची जी जात आणि धर्म आहे तोच त्या माझा म्हणून सांगतात आणि मोठ्या अभिमानाने डॉक्टर आमच्याच जातीचा आहे असेही न विसरता सांगतात.
काही दिवसापूर्वी अशीच महिला आम्हाला महामार्गावर सापडली.तिची भाषा काही केल्या उमजेना ...पण ती सगळ्यापासून अंतर राखून असायची .पाणी प्यायचं असेल कि वरून ओतायला सांगायची आणि खायला दिल कि हातावर द्या म्हणायची ...ताटात नको म्हणायची.जेवणात काही गोड पदार्थ असेल तर नको म्हणायची..
आम्हाला काही केल्या तिच्या या वर्तनाचा अर्थ लागत नव्हता मग एक दिवस तिनेच खुलासा केला कि ती अछूत आहे. ती बिहारमधील मल्लाह समाजाची असून सर्वांनी तिच्यापासून दूर राहावे .तिने हेही सांगितले कि फुलनदेवी त्यांच्याच जातीची ...नंतर जेव्हा मी हि त्याच जातीचा आहे हे तिला समजावलं तेव्हा ती हळू हळू रुळली .
मला ती हिरवा बाबू किंवा हकीम अशी हाक मारत असे.
त्यापूर्वी आमची सिंधू अशीच एका शहरातून आलेली .सारखी बुजलेली .काही बोलत नसायची .डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निम्मित काही कार्यकर्ते माऊलीला भेट देण्यासाठी आलेले.त्यांनी येताना मी मागितले म्हणून बाबासाहेब आणि तथागत गौतम बुद्धाचे फोटो आणलेले.
सिंधू दुरून हे सगळ बघत होती.आणि ते कार्यकर्ते दूर गेल्यावर धावतच माझ्याकडे आली...
डॉक्टर तुमची जात कोणती ? तिने मला प्रश्न केला .मी गोंधळून गेलो .मला काय उत्तर द्यावे ते समजेना तेव्हा मी सहजच म्हणालो तू ज्या जातीची तीच माझी जात..
सिंधू खुश झाली ..तिला प्रचंड आनंद झाला .मला म्हणाली मला वाटलच होत तुम्ही आमच्याच जातीचे असणार.त्याशिवाय का तुम्ही बाबासाहेबांची जयंती साजरी करता?
त्या दिवसापासून हि माझी बहिण सिंधू कमालीची बदलली.झपाट्याने बरी झाली आणि आज माझ्या बरोबर काम करते.मुलांच्या विभागात मुलांची काळजी घेते.
आजारामधून बऱ्या होत असणाऱ्या महिला अगरबत्ती तयार करतात.काही दिवसापूर्वी माऊलीला अगरबत्ती तयार करण्याच मशीन मिळालं. तेव्हा मी मनगाव प्रकल्पाबद्दल बोलत असे.
तेव्हा हीच एकदा मला म्हणाली होती आम्ही रात्र –दिवस अगरबत्या तयार करू आणि आपल्या मनगाव साठी पैसे जमवू.
किमान तिने तसा विचार करण मला खूप कौतुकास्पद आणि प्रेरणादायी वाटत.
जात इतकी खोल गेलीय कि ती आपल्या डी एन ए मध्ये खोल रुतली आहे.मन बिघडल तरी त्या मनाच्या अंतर्मनात खोलवर दडलेली हि व्याधी काही जात नाही . आपल्या संस्कृतीच हे असं ओंगळवाण योगदान म्हणाव का याला ?
विषय रमेचा सुरु होता. रमा दिवसेंदिवस अधिकाधिक अशक्त होत होती.पण मनाने ती तशी खंबीर होती.
तिची सेवा करण्यात सगळेच पुढाकार घेत होते. नव्याने माऊली मध्ये काम करत असणारी आमची नीलिमा सिस्टर,माउलीची मदर मेरी मोनिका. आणि बऱ्या होवून सगळ्या कामात योगदान देणाऱ्या सीमा,संगीता आणि अजून खूप...
आमच्या जेष्ठ कवयत्री मंगलाताई देशपांडे रमाला दुध पाजायच्या तेही अगदी वेळेवर.चमच्याने .
पण रमा नाही जगली....
एके दिवशी भल्या पहाटे रमा गेली..
मला वाटत ती जाणे गरजेचे होते.त्या मरणप्राय वेदना आणि तरीही जगण्याची तीव्र इच्छा ..या दोन टोकाच्या परिस्थितीत ती कशी हे सगळ सहन करून जगत असेल याची कल्पनाच केलेली बरी.
रमा अशी मानवी विकृतीने घायाळ होते,कुणी वयस्क आजी तिच्यावर झालेल्या बलात्काराने गलितगात्र होते.
रस्त्यावर दिसणाऱ्या आणि रेल्वे स्थानकावर ,बस स्थानकावर निराश्रीत जगणाऱ्या देहभान हरपलेल्या माय भगिनीवर जी भयाण वेळ येते आणि जे लैंगिक अत्याचार होतात त्या वेळी त्या महिलेची जात आणि धर्म नाही बघितला जात.
कुठलाही धर्म जगण शिकवतो.

माणसाचे माणूसपण कश्यात आहे?
तो सतत देव शोधण्याचा आणि देव होण्याचा विचार का करतो ? नक्की आपण कोण असतो आणि आपण निरर्थकपणे आपली कुळे,जाती आणि धर्माच्या आत्मप्रौढीने इतके आत्ममग्न का होतो?
मी जेव्हा हे सगळ सतत अनुभवत असतो आणि वेदनेचा सामना करणाऱ्या माझ्या माता भगिनी बघतो तेव्हा आपण सगळे किती स्वमग्न होत आभासी जगात सुख मानतो ते बघतो .आणि मग उबग येतो या सगळ्या मुखवट्यांच्या जगाचा.
जाती धर्माच्या नावाने,सहिष्णुता आणि असहिष्णुतेच्या नावाने चांगभलं म्हणत ,गोंधळ घालत त्यालाच पुजणारा समाज आणि त्या समाजच नेतृत्व करणारा वर्ग किती ढोंगी आणि माणूसपण गमावत कुठे चालला आहे हे उमजत नाही.
मला वरील प्रसंगात मोठी गम्मत वाटते.
जिवंत असताना रस्त्यावर तिच्यावर अनन्वित अत्याचार होत असताना कुणी जावून ती आपल्या धर्माची ,जातीची आहे काय याची चौकशी नाही करत किंवा ती महिला वेदनेच्या महापुरात बुडत असते तेव्हा तिला आपआपल्या धर्माच्या नावाने किंवा त्या त्या धर्माच्या तत्वाने तिला जगण्यास ,उभे राहण्यास मदत करण्यास कुणाला गांभीर्य नसते .पण तिचे कलेवर झाले कि त्या निष्प्राण देहाला आपापल्या धार्मिक परंपरांनी बद्ध करत त्या प्रेतावर उपचार करत आपल्या धार्मिक परंपरा जपण्याचा हा भाबडा किंवा किळसवाना विचार अस्वस्थ करून जातो.
कुठल्याही महिलेवर अत्याचार होतात ती कुठल्या विशिष्ठ जाती धर्माची असते म्हणून नाही तर ती फक्त बाई असते.एक सहज प्राप्त होणारी मादी असते म्हणून.
त्यामुळे एखाद्या बलात्कारास जाती आणि धार्मिकतेचा रंग देताना प्रसारमध्यमे आणि हवसे ,नवसे पुढारी दिसले कि पुन्हा एकदा इथे अति झालेल्या उजेडाची दाहकता मला जाणवत जाते.
मरणारी महिला या अतिउजेडी व्यवस्थेची बळी असते.इथे जेत्यांना मोठेपण मिळते.त्यांना आवाज असतो आणि या व्यवस्थेत तो सक्षमपणे सगळ्यांच्या कानी कपाळी उद्घोषला जातो.
जेत्यांच सगळ खपवून घेतल जात.बळी जाणाऱ्याला कुठला आलाय आवाज आणि उद्घोष ?
आपल्याकडे बोलले खूप जाते.काय करावे ,काय करू नये..काय चांगले आणि वाईट ??? खूप बोलतो आपण.अर्थात कृतीची वेळ आली कि आपण काहीतरी कारण सांगतो.
बोलणे...प्रश्न घोळवत ठेवत त्यावर चर्चा करणे पण तो सोडवायचा मात्र नाही.
हे म्हणजे एकच रस्त्याच दरवर्षी दुरूस्तीच टेंडर काढून वर्षोन वर्षे तो रस्ता तसाच खाच खळग्याचा ठेवण्यासारख झाल. खर्च होतो पण उपाय नाही.रस्ता नाहीच.
चर्चा प्रचंड पण प्रश्नाची सोडवणूक नाही.
खरतर आपल्याला प्रश्न सोडवायचा नसतोच.त्याचा आपल्या वैयक्तिक जीवनात कसा उपयोग आणि तो हि खुबीने करून घेता येयील हे बघितल जात.
एखाद्या रोहित येमुलाच्या आत्महत्येवर रकाने भरून लिहल जात.दूरचित्रवाणी वाहिन्यावर चर्चा करून विद्वानाच्या तोंडाला फेस येतो.कुठे आंदोलने केली जातात.आमच्या रस्त्यावर मरणाऱ्या,कुणी कान कापून विकृतीचा कळस गाठलेल्या,सतत बलात्कार होणाऱ्या,त्या बलात्कारामुळे लादलेल्या सक्तीच्या गर्भारपणावर बोलायची कुणाची तयारी नसते.किंबहुना या भारतात हा विषय खूप गंभीरपणे घेतला जावा हेही कुणाला वाटत नाही.समाजवादी,डावे आणि उजवे,आडवे आणि तिडवे काही उभे.… आणि अजून खूप काही होण्यामध्ये आपण धन्यता मानतो पण आपल्याला अद्यापही माणूस मात्र होता येत नाही...किती रमा अजून .....किती रमा हव्या आहेत वेदनेच्या वेदीवर ,मग हा समाज, स्वतःला न्यायधीश समजणारी माध्यमे आणि शिक्षण संस्था काढत त्यालाच समाजसेवा म्हणणारे पुढारी आणि आपल्यासारखी सरळमार्गी मध्यमवर्गीय माणसे बदलतील ?
माणसाला माणूस म्हणून जगू देणंही आता दुर्मिळ होत चालल आहे.
कधी बदलणार आहोत आपण.
रमा जाताना वेदना तुडवत गेली पण तिने मला आणि आपल्या सगळ्यांना विचार करण्यास प्रवृत्त केलं.

डॉ.राजेंद्र धामणे
+९१९८६०८४७९५४

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जात इतकी खोल गेलीय कि ती आपल्या डी एन ए मध्ये खोल रुतली आहे.मन बिघडल तरी त्या मनाच्या अंतर्मनात खोलवर दडलेली हि व्याधी काही जात नाही >>>> मनापासुन पटल....

जगाच दुर्दैवी सत्य वाचताना नकळ्त डोळ्यातुन पाणि आल ..ज्या स्त्रियांवर हे लादल गेलय त्यांच काय होत असेल Sad

तुमच्या कामाला खरंच सलाम. अगदी बोचणारे प्रश्न विचारले आहेत तुम्ही की ज्यांची काही उत्तरे सापडणार नाहीत आता. असेच कार्य करत रहा , शुभेच्छा आणि काही मदत लागली तर नक्की इथे सांगा.

बाप रे.
https://www.msp.org.in/ इथे जाउन ब्लॉग पाहीला.
केवढं मोठं काम करताय तुम्ही. बाप रे!!! काटा आला माझ्या अंगावरती हा लेख वाचून.

डोनेशन लिंक काम करत नाही

फार मोठं कार्य आहे तुमचं आणि तुम्ही मांडलेली निरिक्षण पण खुप अस्वस्थ करणारी आहेत. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. तुमचं पुस्तक प्रकाशित झाले की नक्की वाचेन. तुमच्या माऊली आश्रमाला भेट देण्याचा प्रयत्न करीन आणि कार्यासाठी यथाशक्ती मदत करण्याचा पण प्रयत्न करीन.