एफर्टलेस मॅगी नूडल्स - रोहीत शर्मा

Submitted by अंड्या on 13 November, 2013 - 12:34

६ नोव्हेंबर २०१३. भारत बनाम वेस्टईंडिज. पहिला कसोटी सामना. सारा प्रकाश झोत सचिन रमेश तेंडुलकर वर. कारण देखील तसेच. क्रिकेटच्या या देवाची अखेरची कसोटी मालिका. कारकिर्दीतली शेवटून दुसरी आणि १९९ वी कसोटी. पहिल्या दिवशी टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणारी वेस्टईंडिज २३४ ला गारद आणि भारत बिनबाद ३७. दुसर्‍यादिवशी सचिन बॅटींगला येणार म्हणून काही जणांनी चक्क सुट्ट्या टाकलेल्या. ज्यात एक मी देखील होतो, जो दुकान सोडून घरी थांबलेलो. सचिन बॅटींगला २ गडी बाद झाल्यावर येतो म्हणून घरी तशी सक्त ताकीदच देऊन ठेवली होती की दुसरी विकेट पडल्यापडल्याच मला उठवा. पण झोप लागतेय कोणाला, सामना सुरू व्ह्यायच्या आधीपासूनच एक्स्पर्ट कॉमेंट ऐकत मी टीव्हीसमोर ठाण मांडून. देवाकडे एकच प्रार्थना, सलामीवीरांना कमीतकमी खेळायची बुद्धी दे रे, अन देवाने ती ऐकली. अर्ध्या तासातच सचिन मैदानावर दिसू लागला. भारताची दुसरी विकेट पडल्यावर टाळ्यांचा एवढा कडकडाट आजवर झाला नसेल. पण आता पुढचे काही क्षण श्वास रोखून बसायचे होते, जो पर्यंत सचिन सेट होत नाही तो पर्यंत टीव्हीवरून नजर न हलवण्याचे होते. ऑन साईडला दोन सुरेख चौकार लगावत मी आज क्रिकेटरसिकांना पर्वणी द्यायला सज्ज आहे असा इशारा त्याने देताच मी जरा रिलॅक्स झालो, अन इथेच नियतीने डाव साधला. कांदेपोह्याचा चमचा तोंडाजवळ नेतो न नेतो तोच अचानक प्रतिस्पर्धी खेळाडूंचा एकच कल्ला. वर पाहिले तर एलबीडब्ल्यूची अपील, स्ट्राईकला सचिन, कॅमेरा अंपायरवर. त्या चेंडूवर नक्की काय घडले हे पाहिले नसल्याने श्वास घशात. जो पर्यंत तो अंपायर नकारार्थी मान हलवत नाही तोपर्यंत. पण त्याने बोट उचलले आणि खेळ खल्लास, रंगात भंग, क्रिकेटप्रेमींचा पचका. पुढचे काही क्षण एकच शांतता. तिथेही आणि इथेही. रिप्लेमध्ये निर्णय संशयास्पद दिसत असल्याने थोडी निराशा, थोडी चीडचीड. मात्र थोड्याच वेळात परिस्थितीचे भान राखून ग्राऊंडबाहेर पडणार्‍या सचिनसाठी पुन्हा टाळ्यांचा कडकडाट. कारण एका अपयशी इनिंगने त्याच्या आजवरच्या कामगिरीचे मोल तीळमात्र कमी होणार नव्हते. सचिन निराश मनाने मानवंदना स्विकारत पॅवेलियनमध्ये दाखल..!

- एण्ड ऑफ पार्ट वन -

.
.
.

अ‍ॅण्ड नाऊ,
- पार्ट टू -

सचिन बाद झाल्यावर टिव्ही बंद करायचे दिवस आता गेले. नव्या दमाचे खेळाडू या बिकट परिस्थितीतून बाहेर काढतात का यावर आता सार्‍यांच्या नजरा. धवन, विजय, पुजारा हे तिघे सचिनच्या आधीच तंबूत परतले होते तर फॉर्मातला आणि भरवश्याचा कोहली सचिनपाठोपाठ माघारी. बिनबाद ३७ ने झालेली दिवसाची सुरुवात तासाभरात ८३ धावा ५ बाद या स्थितीत परिवर्तित. खेळपट्टीवर संकट मोचक धोनी आणि आपला पहिलावहिलाच कसोटी सामना खेळणारा रोहित शर्मा. वेस्टईंडिज फिरकी गोलंदाज शिलिंगफोर्डने विणलेल्या जाळ्यातना बाहेर पडायच्या प्रयत्नात असलेला भारतीय संघ पाहताना नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत स्वान आणि पानीसरने आपली उडवलेली धांदल सर्वांच्या ताजी स्मरणात. आपल्या सदोष तंत्रासह बचाव करावा की आपले शक्तीस्थान वापरून काऊंटर अ‍ॅटेक करावा या चक्रव्यूहात फसलेला कर्णधार माही. इथून आपण एका पराभवाच्या दिशेनेच प्रवास करणार आहोत असे समजून चुकलेला प्रेक्षक. मात्र इथेच सर्वांचे अंदाज चुकवून गेला तो आपला सध्याचा सर्वात लाडका फलंदाज रोहित गुरुनाथ शर्मा !

पण खरेच तो अंदाज चुकवून गेला का???
माझ्यासाठी तरी याचे उत्तर - नाही.
इतर कोणाला नसेल पण मला त्याच्याबद्दल पुरेपूर खात्री होती.

माझ्या रिकाम्या पोह्यांची प्लेट उचलायला म्हणून आलेल्या वहिनीची स्कोअरबोर्ड वर नजर जाताच ती ओरडली, अरे देवा ..!! जेमतेम क्रिकेट समजणार्‍या जगातल्या सर्वच बायकांची उत्स्फुर्त प्रतिक्रिया नेहमीच अशीच अतिउत्साही असते. त्यातही रोहित शर्माला खेळपट्टीवर पाहताच तिने सरळ पाचाच्या सहा विकेट मोजल्या. कारण एकेकाळी त्याचे खराब दिवस चालू असताना, जेव्हा तो बरेचदा आल्याआल्याच हजेरी लाऊन परत जायचा तेव्हा आमच्या दादाने त्याला "मॅगी नूडल्स" हे नाव दिले होते. मॅगी नूडल्स म्हणजे बस्स, दोन मिनिटांचाच खेळ..! आणि हेच तिच्या लक्षात राहिले होते. कदाचित गेल्या वर्षभरात त्याने केलेली लक्षवेधी कामगिरी त्यांचे लक्ष वेधून घेण्यास कमी पडल्याने अजूनही ते दोघे त्याला त्याच नावाने हाक मारायचे. आज आपल्या कारकिर्दितील पहिल्याच कसोटीत संघातली स्वताची जागा बनवायच्या दडपणाव्यतिरीक्त आता भारताचा डाव सावरायचे अतिरीक्त दडपण पाहता दादा देखील वहिनीच्या हो मध्ये हो मिसळवून मोकळा झाला. पण मला मात्र कमालीचा विश्वास होता की कदाचित स्वताची जागा टिकवण्याच्या दडपणाखाली तो बाद झाला असता, मात्र संघहिताचे दडपण त्याच्या पथ्यावरच पडणार होते. कारण हेच त्याला आवडते, अश्या परिस्थितीत खेळणे हिच त्याची खासियत आहे आणि म्हणूनच इथूनच सुरू होणार होती एक लेझी एलिगन्स असलेली एफर्टलेस फटक्यांनी भरपूर खेळी !

धोनीबरोबर त्याने केलेल्या ७३ धावांच्या भागिदारीने नामुष्कीच नाही टाळली तर सामन्यात आपल्याला थोडेफार परत आणले होते. तरीही धोनीच्या बाद होण्यानंतर डाव पटकन गुंडाळला जाण्याचा धोका होताच. कमी धावांच्या सामन्यात पाचपन्नास धावांचा लीड देखील कोण घेतो याने फरक पडतो. मात्र आश्विनच्या जोडीने त्याने आपला सहजसुंदर खेळ तसाच सुरू ठेवला. बघता बघता त्याचे शतक धावफलकावर लागले तर आश्विनचे अर्धशतक. धावगती कसोटीला अनुसरून असली तरी बघता बघता एवढ्यासाठीच म्हणालो कारण रोहित टोटल चान्सलेस इनिंग खेळत होता, कधीही आता हा पटकन बाद होईल आणि वेस्टईंडिज सामन्यात परत येईल असे वाटत नव्हते. त्यामुळे घड्याळाचा काटा जसा सरकत होता तसे धावांचे चक्र फिरत होते. आपण वेस्टईंडिजचा स्कोअर केव्हाच पार करून आता त्यांना लीड द्यायला सुरुवात केली होती. दडपण दडपण ज्याला म्हणतात ते केव्हाच झुगारले गेले होते, नव्हे आता ते दोघांनी मिळून वेस्टईंडिजच्या माथ्यावर नेऊन टाकले होते. तरीही, खराब होत जाणार्‍या खेळपट्टीवर चौथ्या डावात कमीतकमी फलंदाजी करण्यासाठी हा डाव शक्य तितका लांबवणे गरजेचे होते आणि नेमके हेच त्याने ओळखून शतकानंतरही कुठलीही घाईगडबड न करता आपली रनमशीन चालूच ठेवली. पलीकडून आश्विनचे शतक झाले आणि इथे रोहित शर्माने रेकॉर्डबूकमध्ये आपले नाव नोंदवले होते. पहिल्याच सामन्यात द्विशतक झळकावणार्‍या निवडक खेळाडूंच्या पंक्तीत बसायचा मान त्याने थोडक्यात गमावला असला तरी तब्बल १७७ धावांची बोहणी केली होती. ज्या स्थितीतून त्याने सामना खेचून आणला ते पाहता सामनावीराचा बहुमान अर्थातच त्यालाच देण्यात आला. मुंबईकर सचिनचा खेळ पहायला आलेल्या कोलकतावासीयांची नाराजगी कमी कशी करता येईल हे एका दुसर्‍या मुंबईकराने पाहिले होते !

जे क्रिकेट नियमित फॉलो करतात त्यांना रोहितच्या गेल्या वर्षभरातील कामगिरी बद्दल खोलात जाऊन सांगायला नकोच. तरीही आकड्यांचा खेळ न करता सांगायचे झाल्यास यंदाच्या वर्षी एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा त्याच्याच असाव्यात. त्यातही नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावलेले धडाकेबाज आणि सोळा षटकारांनी सजलेले द्विशतक कोण कसे विसरणार. आयपीएल आणि चॅम्पियन ट्रॉफी या ट्वेंटी-२० क्रिकेटच्या फॉर्मेटमध्येदेखील त्याच्या मोक्याचा क्षणी भरभरून केलेल्या धावांमुळेच मुंबईने या दोन्ही चषकांवर आपले नाव कोरले. एक कर्णधार म्हणून दडपण न घेता खेळ उंचावण्याची त्याची क्षमता विशेषच. आता कसोटीत देखील त्याने आपला पहिलाच शिक्का खणखणीत उमटवला आहे आणि हे तो पुढेही करणार यात कोणतीही भविष्यवाणी नाहीये. सामना जिंकवून द्यायची क्षमता असलेल्या एखाद्या खेळाडूला आपण मॅचविनर असे संबोधतो मात्र त्याच निकषावर मी रोहितचा उल्लेख सिरीज विनर म्हणून करेन.

एक गंमतीशीर तुलना करायची झाल्यास, रोहितची आजवरची कारकिर्द मला "कोई मिल गया" चित्रपटातील हृतिक रोशन सारखी वाटते. त्यात हृतिकचे नाव "रोहित मेहरा" होते, तर हा आपला रोहित शर्मा. तेच नाव, तसेच आडनाव बस्स काही अल्फाबेट्स आपली जागा बदलून येतात, पण कमाल मात्र तीच. त्या सिनेमात आधी इतरांपेक्षा दुबळा म्हणून गणल्या गेलेल्या हृतिकमध्ये अचानक जादू’च्या चमत्काराने एवढी ताकद येते की की तो बास्केटबॉलचा बॉल लीलया आकाशात भिरकाऊन देतो. तर इथेही एकेकाळी संघात जागा मिळवण्यासाठी धडपड करत असलेला रोहित आजकाल चमत्कार झाल्यासारखे क्रिकेटचा चेंडू लीलया सीमारेषेच्या पार भिरकाऊ लागला आहे.

पण हा कायापालट चमत्काराने नक्कीच झाला नाहीये ना यामागे कुठली जादू आहे. त्याच्यात असलेल्या टॅलेंटबद्दल सुरूवातीपासूनच कोणालाही शंका नव्हती. क्रिकेटचे जाणकार हे वेळोवेळी बोलून दाखवायचे तर सामान्य क्रिकेटरसिकाला देखील त्याच्या काही खास ठेवणीतल्या फटक्यातून ते जाणवायचे. पण नेमके काय गंडले आहे ते समजत नव्हते आणि त्यामुळे त्याच्यातले फलंदाजीचे असामान्य स्किल धावांमध्ये परावर्तित होत नव्हते. काहींच्या मते त्याचे शॉट सिलेक्शन चुकायचे तर काहींच्या मते टेंपरामेंटचा प्रॉब्लेम होता. पण ते जे काही होते त्याला तो आता दूर भिरकाऊन देऊन सज्ज झाला आहे एवढे मात्र नक्की.

असे म्हणतात की टॅलेंट आणि ग्रेटनेस एका पिढीतून दुसर्‍या पिढीत पास होत असते. हेच जर फलंदाजीच्या कौशल्याबद्दल असेल तर ते नेहमी एका मुंबईकराकडून दुसर्‍या मुंबईकराकडे पास होत आलेय. ‘लिटील मास्टर’ सुनिल गावस्करच्या पर्वानंतर ‘मास्टर ब्लास्टर’ सचिनने या खेळावर आपली हुकुमत गाजवली, तर येणारा काळ नक्कीच ‘एफर्टलेस वंडर’ रोहित शर्माचा असेल. सचिनच्या अंतिम कसोटी मालिकेत रोहितचे होणारे पदार्पण हा निव्वळ योगायोग नक्कीच नसावा नाही का !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

Rohit Sharma becomes first ever captain in the history of cricket to have achieved No.1 ICC team rankings in all three formats at the same time ...

ते 'ओन्ली पर्सन ऑन द प्लॅनेट' म्हणणं काहीच्या काही फनी वाटते.
बोल्टला 'फास्टेस्ट मॅन ऑन द प्लॅनेट' म्हणणं समजू शकते पण ईन मीन पाच-सात देशांच्या मध्ये खेळल्या जाणार्‍या खेळात असे काही म्हणणे अगदीच लेम क्लेम आहे.

पण ईन मीन पाच-सात देशांच्या मध्ये खेळल्या जाणार्‍या खेळात
>>>>

१०० देशात क्रिकेट खेळले जाते. १०० देशांचे राष्ट्रीय संघ आहेत. नेमका आकडा नंतर सांगतो.

Credit goes to Viraat.
>>>
विराटचे श्रेय आहेच.
पण शर्माचा विजयाचा धडाका मोठा आहे. मालिकांवर मालिका खिश्यात टाकत सुटलाय. मग मायदेशात असो वा परदेशात.

#OnThisDay in 2021

Scored 127 v ENG at Oval

With This Inning, He became

- 1st Opener to Score Century in all formats in England

- 1st Visiting player to Score Century in 7 Different England Venues

- Most Centuries in Eng by Indian (9)

- 1st Indian to Win M.O.M.Award in England in all formats

- Only Asian to Score 10 Centuries in SENA Wins

- 2nd Fastest to 11000 runs as Opener

- 1st player to score Centuries in all formats in 2 different countries (IND, ENG)

Test Centuries against SENA in won matches -

• S Tendulkar - 09 (62 Inns)
• Virat Kohli - 07 (60 Inns)
....

Rohit Sharma - 06 (31 Inns)

Hitman - The Test batsman has always been the most underrated player.

Pages