अजनबी इक शहर में - १

Submitted by संप्रति१ on 28 January, 2023 - 12:03

रिकाम्या मनानं मी त्या शहरात उतरले. परतीचे रस्ते बंद. मागं आपलं कुणी नाही. पुढंही कुणी नाही.
निर्णय घेतले त्या त्या वेळी. चुकले. दोष द्यायला कुणी नाही. आयुष्यातली काही वर्षे एके ठिकाणी एका आशेवर खर्ची घातली. मग मन उडालं. सगळंच हास्यास्पद वाटायला लागलं. सोडलं. उद्यापासून येत नाही बोलले ऑफिसला. काही कुणाचा निरोप नाही, गुडबाय नाही आणि कसलाही तमाशा नाही. पुस्तकं सगळी एका मित्राकडं ठेवून दिली.

मित्र चांगला. कुठे चाललीयस विचारलं नाही.

एक फक्त व्हिक्टर फ्रॅंकलचं 'मॅन्स सर्च फॉर मिनिंग' सोबत ठेवलंय. त्या माणसानं छळछावणीतही मन अभंग ठेवलं, त्याही जगण्यात अर्थ ओतला, निरीक्षणं नोंदवली..! आपलं अजून तेवढंही काही वाईट झालं नाही. शोधू आपणही आपल्यापुरतं. काहीतरी भलं बुरं असेलच की आपल्याही वाट्याचं.. ते काही कुणी चोरून नेत नाही. फक्त पुस्तकांचा बिनकामाचा नाद याउप्पर बंद केला पाहिजे. करता आला पाहिजे.

बाकी मग शरीर आहे. आजूबाजूला काळाचा समुद्र डुचमळतो आहे. त्यात शरीर ठेवून देऊ. व्हायची ती जैविक प्रक्रिया होत राहिल. हे एक आर्ष वाक्य इथं विनाकारण आलं आहे. कलाबिला शोधत इथं आलेल्यांनी ह्याच ओळीत सगळं गोड मानून घ्यावं, ही विनंती. इतरांनी फार दचकण्याचं कारण नाही. पुन्हा मी असलं काही लिहिणार नाही. शब्द देते.

बाकी आता जगण्याचा निर्णय झाला आहे, तर अंमलबजावणी करावी लागेल. त्यासाठी काय लागतं असं?
अंग टाकायला एक पीजी होस्टेल.‌ ते कुठल्याही शहरात मिळतंच. इथेही मिळेल. माणसांची एवढी गजबज आहे इथे. लाखो बिनचेहऱ्याची माणसं वावरतायत सर्वत्र. आपल्या गुमनामीला ते बरं आहे, पोषक आहे.

आणि जॉब. तो आहे हातात सध्या. दुसरा जॉब मिळाल्याशिवाय हातातला सोडायचा नाही, हा उदात्त मध्यमवर्गीय विचार सांभाळला आहे आजवर.

बाकी मग मी कुणाची नाही. सिंगल आहे. सध्यातरी.
मला क्लिक होणारे पुरुष तसेही कमीच. देवानं किंवा देवाच्या आईनं, तसे पुरूष घडवणं बंद केलं असावं कदाचित.

उगाच छाती काढून वावरणारे पुरूष मला अश्लील वाटतात. आणि सांप्रतकाळानुसार लिबरल दिसण्याची चढाओढ करणारे मजनू गंमतीशीर..! अर्थात, तशा मजनूंमध्येही काही वेळा दुर्दम्य चिकाटी सापडते.. तर त्यांच्याशी हेल्दी फ्लर्टींग करायला माझी काही हरकत नसते. वेळ चांगला जातो.

पण एकेकाळी होता एकजण, बाय द वे..! भेटला होता एके ठिकाणी. किंवा तसं तरी कशाला? 'सवाई गंधर्व'ला मंडपामागे खाण्याचे स्टॉल्स असतात ना, तिथे भेटलेला पहिल्यांदा..! आमच्याच एका ओळखीच्या ग्रुपमध्ये हा राजदार उभा.. ! हाफ कुर्ता, गोल चष्मा, भिरभिर नजर आणि कात्रीसारखी तिरकस चालणारी जीभ.

सहज नजरानजर झाली तर श्वासच अडकला..! म्हटलं की अरेच्चाss..! हा कोणाय.! आणि हे काय नवीनच? हे असं शरण बिरण जावंसं का वाटतंय ?
पळा इथून..! नाहीतर आपण आत्ताच वेड्यासारखं त्याला काहीतरी बोलून बसायचो. आणि चारचौघात चर्चेला विषय व्हायचा.

पण पळून पळून पळणार कुठं‌ ? मन असतं..! ते रेंगाळतं ना..!
ढिम्म हलत नाही तो नजरेपुढून. गळ्यापर्यंत बुडवून घेतो आपण. कामाचे डोंगर तयार करतो. आणि उपसत राहतो. तरीही बॅक एंडला एक आल्हाददायक गलबला चाललेलाच असतो. एव्हाना आत शिरकाव करून बसलेलं ते धुकं हटता हटत नाही. हवीहवीशी चीडचीड होते. आपण मारे पटवून देत असतो स्वतःला की आपल्याला आता ह्या गोष्टींनी काहीही फरक पडत नाही..! परंतु फरक तर ऑलरेडी पडलेला असतो बॉस्स..!

या हाफ कुर्तेवाल्यानं स्वप्नात बिप्नात घुसखोरी करायला लागणं म्हणजे जरा अतिच झालं ना.
मग करावी लागते ना आपल्याला निर्णायक हालचाल..! फडकवतो आपण पांढरं निशाण..! घ्यावा लागतो पुढाकार..! टाकावी लागते फ्रेंड रिक्वेस्ट..! येतं कालांतरानं नोटीफिकेशन ॲक्सेप्टेडचं..! मग वरपासून खालपर्यंत पालथी घालतो सगळी टाईमलाईन बारकाईनं..! सापडत नाही खटकणारं काहीच..! सगळं आवडणारंच कसं काय आहे बाई ह्याच्यात..!

आता मी काही आडनाव बघून लगेच खांद्यावर हात टाकणाऱ्यांपैकी नाही समजा..! माणूस पटतो की नाही, एवढंच पुरेसं वाटतं समजा..!

बाकी याचं तर आडनावही तसं जरा कॉमनच आहे..! मराठा आहे म्हणे..! बघावं लागेल आता त्यांच्यात कसं कसं असतं ते..! चलो, ये भी देख लेंगे..! अगदीच भविष्यात काही डोक्यावरून पदर-बिदर तर घ्यायला सांगणार नाही..! आणि आपला आता स्पष्ट बॉयकटच दिसतोय म्हटल्यावर पदराचा प्रश्न उपस्थित होईलसं वाटतही नाही..! बाकी तशी मी मूळचीच अगदी रॉयल दिसते. बघितलंय मी आरशात, अगदी आदबशीर हात वगैरे जोडून..!
तर हे असं होतं. किंवा हे असं झालं समजा.

आणि मग सुरू झालं जनरल इकडचं तिकडचं..! कला, साहित्य, नाटकं, फिल्म्स फलाना ढिमकाना..! मी म्हटलं की बाई कुठून कुठून काय काय बिनकामाचं लिहित बसतात लोकं..! म्हणजे आता हा इथं प्रबंधच्या प्रबंध लिहून ओततोय इनबॉक्समध्ये, पण मुद्द्याचं काही बोलतच नाहीये..! अरे जरा प्रेमपत्रं वगैरे लिही.. जरा कौतुक वगैरे कर माझं..! जरा मोरपीस वगैरे फिरव..! जरा काही व्याकुळ व्याकुळ मेसेजेस पाठव..! भेटायचा बिटायचा सूचक इशारा कर..! आता हे पण मीच बोलायचं का ? ई ना चॉलबे बाबूमोशाय..!

पण ह्या नकली फिलॉसॉफरच्या भरवशावर बसले तर वाट बघून म्हातारपण येईल, म्हणून मग एकदा वाईन थोडी जास्तच झाल्यावर मीच विचारलं की बाबा तुझा प्रॉब्लेम काय आहे ?? बोल पटकन आता..! तेही कमी शब्दांत आणि अचूक..!
ह्यावर त्याचं म्हणणं पडलं की च्यायला हे सगळं असं एवढं सोपं असतं होय??

मी म्हटलं की बाबा सोपंच असतं हे.‌ तूच जरा यडबंबू आहेस. हरकत नाही. आपण सोपं करून घेऊ. तू ये जरा वीकेंडला अशा अशा ठिकाणी अशा अशा वेळी.

मग एका दुपारी समजा चार वाजता भेटलो असेन.
आणि मग पहिला किस केला तेव्हा समजा साडेसात वगैरे वाजले असतील..! साधारण साडेतीन तास मोह आवरला असणार..! बिच्चारा..! जे हवं आहे, आणि जे हक्काचं आहे, तेही स्वतःसाठी मागून घेता येत नाही..! आणि बोलतो नुसता मोठं मोठं..! कुठून शब्द तरी हुडकून काढतो काय माहित..!
शिवाय हा किस त्याच्या सबंध आयुष्यातला पहिलाच, हे मला समजलंच समजा..!
म्हणून विचारलं की इथून सुरुवात आहे तर..!!! अजून काय काय शिकवावं लागणारे बाबा तुला..!!! सांगून टाक..!! म्हणजे मीही त्याप्रमाणे माझी प्रॅक्टिस जराशी ब्रश-अप करून येत जाईन..!! खरंतर असं तासनतास तुझ्याकडं बघतही राहू शकते मी, आवडेलही मला..!! पण तसं करून तुला घाबरवून सोडण्याचा माझा बिलकुल इरादा नाहीये..!!!

तर तो हाफ कुर्तेवाला एवढंच बोलला की थिअरी माहितीय तशी. पण ठीके. आय एम ओपन टू चेंज.

असो. बाकी मग निरखून बघितल्यावर आणखीही काही दिसतं समजा की लाजताना ह्याच्या एकाच गालावर खळी वगैरे पडते. अगदीच काही राहुल गांधींसारखी नाही समजा. पण ठीके. तेवढं चालतंय.

डोळे आरपार आहेत. तळ्यासारखे. पण कुणीतरी सहज खडा टाकेल आणि आतला आयडेंटिटीचा झगडा सरफेसवर येईल, म्हणून नजरेला नजर मिळवून बोलायला नाखुश.
पण हातांचे तळवे मऊ ऊबदार आणि बोटं समजा कलावंत टाईपची आहेत, हे चांगलंय. तर एकूण दहापैकी नऊ मार्क..!
मार्क देण्याच्या बाबतीतला माझा खडूसपणाचा ट्रॅक रेकॉर्ड बघता हे फारच झालं. डोक्यावरून पाणी.

तर सुरुवात साधारण अशीच असते समजा. किंवा सुरूवातीच्या आधीची सुरूवात समजा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधी नेमाडे आठवले...मग पाचपाटील आठवले ..मग लेखन शैली पाचपाटलांसारखी आहे की कथानायक हाफकुरतेवाला पाचपाटील आहेत असे कनफ्युजन झाले...

काहीही असो...
छान लिहिलंय..वाचताना लड्डू फुटत होते किंवा आधीचे फुटलेले आठवत होते समजा...!!

अभिप्राय कळवल्याबद्दल तुमचे आभार अस्मिता, sharadg, धनवन्ती आणि स्वान्तसुखाय Happy

[ Loud Thinking :
इथले जुनेजाणते लोक काय बोलून राह्यले ते काय कळूनच नाय राह्यलं..! कायतरी सांकेतिक भाषा दिसून राह्यली त्येंची त्येंची..!
खैर, हम भी बडे आशावादी टाईप के ठहरे..! इधरीच खेळते-खेळते बागडते-बागडते हमभी कभी जुनेजाणते बन जाएंगे..!
फिर देखेंगे..! क्या है क्या नहीं..! Happy
फिलहाल, तबतक हमारी वकालत करने के लिये 'निदा फाजली' जैसे बेहतरीन लॉयर को पेश करना चाहेंगे..

जब भी देखो उसे, अपनी नजर से देखो
कोई कुछ भी कहे, तुम अपने खयालात लिखो
]

मस्त खुसखुशीत लिहिलय.. आवडलं.
पाचपाटिल हा इथला १ आयडी आहे त्यांची शैली अशीच खसखस पिकवणारी असल्याने कॉमेंट तश्या आल्यात Happy