मक्तू SSSSSSब !!...(The Destiny … ) भाग -५

Submitted by Sujata Siddha on 23 January, 2023 - 01:48

https://www.maayboli.com/node/82900

मक्तू SSSSSSब !!...(The Destiny … )
भाग - ५

एके दिवशी ऑफिस मध्ये यु.डी.नी डिक्लेअर केलं की शनिवार , रविवार सर्व बॅचेस ना घेऊन खानापूरला ट्रिप ला जायचं , प्रत्येक कोर्स च्या एन्ड ला ते त्यांच्या स्टुडंस ना अशी ट्रीट द्यायचे , मला ते म्हणाले की तुम्ही तुमच्या ,मुलीलाही घेऊन या , या वेळेस प्रथमच मला त्यांनी ट्रिप चं विचारलं त्यावर मी घरी विचारून सांगते असं त्यांना म्हटलं , घरी आल्यावर आधी ते मानस ला सांगितलं , तो अर्थात लगेच हो म्हणाला , सासूबाई आणि जाऊबाईंनी धुसफूस करण्याव्यतिरिक्त काही केलं नाही .
शनिवारी पहाटेच निघणार होतो , माझं पिल्लू आईबरोबर जायला मिळणार म्हणून खूष होतं , शुक्रवारी रात्री मी बॅग भरत असताना मानस आला आणि म्हणाला , “उल्का , रविवारी सकाळी आपल्याला माझ्या एका चुलत मित्राच्या फार्म हाऊस वर जायचं आहे ,(मित्राचा मित्र असेल तर तो चुलत मित्र असं मानस म्हणायचा ) मी विचारलं अरे असं अचानक? तर म्हणाला हो अचानक ठरलं , आपण दोघे , अभय (मानस चा मित्र ) आणि त्याची फॅमिली आणि शंतनु ( मानसचा एक चुलत भाऊ) आणि सोनाली , ते ऐकून मला आनंद झाला म्हटलं चला बरं झालं आपल्या लोकांबरोबर जास्त मजा येईल , मी म्हटलं मग माझं इकडचं कॅन्सल करू का? तर म्हणाला नको ,तु उद्या जा ,आम्ही तुला परवा जाता जाता पिक अप करतो , अभय ची गाडी आहे , आणि फार्महाऊस त्याच वाटेवर आहे , मी बरं म्हटलं .
ठरल्याप्रमणे निशी ला घेऊन सकाळी सहा वाजता मी ऑफिसपाशी पोहोचले , दोन मोठ्या बस ऑफिसच्या दाराशी उभ्या होत्या , आणि सगळे सहाच्या ही आधीच जमून गप्पा मारत उभे होते ,रोज कडक ऑफिस वेअर मध्ये असणारे यु .डी . चक्क टी शर्ट आणि थ्री - फोर्थ मध्ये, सगळीकडे उत्साहाचं वातावरण , निशी सुरूवातीला थोडी बिचकली मग छान रमली . ‘गणपती बाप्पा मोरया , पुंडलिक वरदा हा sssss री विठ्ठल , च्या गजरात जल्लोषात गाड्या निघाल्या खानापूरला , रिसॉर्ट वर पोहोचेपर्यंत सुरेख पाऊसही झाला होता , गर्द हिरवा गार परीसर , आणि जोडीला धम्माल युथ , मज्जा आली नसती तरच नवल . सगळी कार्टी यु .डी .च्या जाम प्रेमात आणि यु.डी. पण त्यांच्या प्रेमात, वेगवेगळे खेळ खेळत तिथल्या स्वदिष्ट जेवणाचा फन्ना उडवत, हसत खेळत दिवस कधी संपला कळलंही नाही , रात्री प्रत्येकाने काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची ठरली असल्यामुळे मी काही जुनी गाणी म्हटली . सगळ्यांना ती आवडली , काही गाण्यांना वन्स मोअर मिळाला , त्यानंतर आम्ही सगळे मराठी व्याकरण , पुस्तके , लेखक आणि साहित्य या विषयांवर खूप भेंड्या लावल्या , कोडी खेळलो , यु.डी. च्या साहित्य ज्ञानाला ला टक्कर देणारी फक्त मी एकटीच होते .मग मराठी गाण्यांच्या भेंड्या , पु लं चे किस्से , बोरकरांच्या , ग्रेस च्या दुर्मिळ कविता , कुसुमाग्रज , गोविंदाग्रज , जी,ए. यावर माझं आणि यु डी चं खूप जोरदार डिबेट झालं , सगळे विद्यार्थी या खेळात रंगले , आपल्या सरांना कोणीतरी beat करू शकतं याची सगळ्यांना मजा वाटत होती , आणि यु डी ? ते तर आपण हरतोय हे मान्य करायला तयारच नव्हते . सरते शेवटी ,
“परतून कधी येशी अंत नाही तमाला ..
तमभर घर माझे चंद्र नाही उशाला ..!
या ग्रेस च्या मी म्हटलेल्या ओळींनंतर यु डी नी जाहिरपणे पराभव कबूल केला ,आणि सांगितलं की ही कविता त्यांना माहिती नव्हती . मग हुर्र्रे म्हणत आम्ही सगळ्यांनी त्यांच्याकडून पेनल्टी म्हणून आईस्क्रीम उकळलं , नंतर कॅम्प फायर केलं आणि मध्यरात्री कधीतरी सगळे झोपलो , पुन्हा पहाटेच मफलर आणि कानटोपी घातलेल्या यु डी ने सगळयांना उठवायला सुरुवात केली मग परत गप्पा चालू झाल्या , सगळी मुलं आणि यु डी आम्ही गोल करून बसलो होतो ,चहा झाला , नाश्ता झाला ,सगळं झालं , सकाळचे दहा वाजत आले तरी गप्पा चालू होत्या , तेव्हड्यात कुणीतरी बागेतले लिंबू पाहून सरबत बनवायची टूम काढली आणि आम्ही सगळे मिळून सरबत बनवायला लागलो , लिंब तोडायला काही जण पळाले ‘मी मध्यभागी टेबल वर भलं मोठं पातेलं घेऊन , बर्फ टाकून बाकीची तयारी करायला घेतली . त्या दरम्यान आम्ही ‘गुलजारच्या खूबसूरत मधल्या काफियाचा खेळ खेळायला सुरुवात केली होती , मैफल चांगली रंगात आली होती, नेमका त्याच वेळी चौकशी करत मानस समोरून येताना दिसला , त्याला बघून “बाबा ssss “ म्हणत निशी त्याच्याकडे झेपावली , एव्हाना मी तर विसरूनच गेले होते की तो घ्यायला येणार आहे , मग मी ही मग हातातलं पातेलं जाईच्या कडे देऊन ,रूम वर गेले , बॅग घेतली आणि निघाले. सगळे निरोप द्यायला रिसॉर्ट च्या गेट पर्यंत आले होते ,हसता हसता एकदम शांतता झाली , माझंही मन थोडं खट्टू झालं पण , ईकडे आपल्या माणसांबरोबर जायचीही ओढ होतीच ,निघताना मला आठवलं मानस ची यु डी बरोबर ओळख करून द्द्यायला पाहिजे ,म्हणून मग मी यु डी ना शोधू लागले तर ते कुठे दिसले नाही तेव्हा जाई जवळ निरोप देऊन ,आम्ही निघालो मानस बरोबर फार्म हाऊस ला .

यु डी आणि टीम बरोबरच्या घालवलेल्या आनंदाचा हँगओव्हर होता माझ्या डोक्यात ,त्या धुंदीतच मी मानस बरोबर निघाले होते , केवढी आनंदात होते मी , रस्ताभर अखंड बडबड करत होते , शंतनुला आणि सोनालीला आश्चर्य वाटलं मला एवढं बोलताना बघून , त्यांनी ते बोलूनही दाखवलं , साधारण तासाभराने आम्ही फार्म हाऊस ला पोहोचलो . गाडीतून उतरलो मात्र , समोरचं दृश्य बघून माझा भ्रमनिरास झाला , मानस ज्याला फार्म हाऊस म्हणत होता ते म्हणजे नुसत्या विटांनी बांधलेलं शेतातलं दोन खोल्यांचं पत्र्याचं घर होतं , तिथे बाथरूमची वैगेरे सोय नव्हती ,आणि स्वयंपाक आपला आपणच बनवायचा होता ,आम्ही तिथे पोहोचल्याबरोबर मानस , शंतनु आणि अभय त्या फार्म हाऊसच्या मालकांबरोबर त्याच्या शेतात भटकायला निघून गेले .मागे राहिलो आम्ही तिघी आणि आमची मुलं ,मग थोडा वेळ गप्पा मारून आम्ही स्वयंपाकाला लागलो , पुरूष मंडळींना नॉनव्हेज जेवणाचं आमंत्रण मालकांच्या घरीच होतं ,आणि बायकांनी आपलं जेवण आपणच बनवायचं होतं , समोर कारल्याचा वेल होता , त्याला इवली इवली कारली लागलेली , ती पाहून अभयची बायको खुश झाली , पटकन जाऊन तिने ती तोडून आणली आणि आम्ही त्याची भाजी बनवायला घेतली , त्या दोघींची फारशी तक्रार दिसली नाही , पण ईकडे माझं मन मात्र वारंवार यु डी च्या ट्रीप शी ह्या ट्रिप ची तुलना करत राहिलं . स्वयंपाक , मुलांची जेवणं झाली ,मग जरावेळ शेतात फिरण्यात ,गप्पा मारण्यात गेला ,मात्र अंधार झाल्यावर एकदम भकास वाटायला लागलं ,आजुबाजुला रातकिडयांची किरकिर , आणि इंगळ्या , विंचू , मुंगळे यांची गर्दी , त्यातून पाऊस सुरू झाला , पत्र्याचं दार कितपत तग धरेल याची खात्री वाटेना , त्या दोन रूमध्ये मिळून एकच मरतुकडी ट्यूबलाईट होती , त्यामुळे आजूबाजूच्या गडद अंधारात ते एकाकी फार्म हाऊस अंगावर येत होतं , वॉश रूम ची काही सोय नसल्या कारणाने लांब जावं लागत होतं , मध्यरात्री कधीतरी भरपूर पिऊन ऑफ झालेले तिघे आले ,त्यांच्याबरोबर फार्म हाऊस चा मालक देखील आला होता , सकाळी जाताना तो विशेष बोलला नाही पण ज्या पद्धतीने बघत होता ती नजर मला आवडली नव्हती , रात्री मात्र भरपूर घेतली असल्याकारणाने तो बोलायचा प्रयत्न करू लागला मला अगदी किळस आली ,त्यामुळे मी त्याच्याशी बोलले नाही पण याचा मानस ला राग आला , बाकीच्या दोघी बोलत होत्या मग तुला काय झालं बोलायला ? त्याही तुझ्याच वयाच्या आहेत ना ? तुला काय सोनं लागलंय का ? ई मुक्ताफळं त्याने मला ऐकवली आणि मग तो झोपून गेला . बाकीचेही झोपले . मला मात्र झोप येईना , मनातून मानसचा मला खूप राग येत होता . ही कसली ट्रिप ?स्वतः:लाच एन्जॉय करायचं होतं तर बायका-मुलांची वरात कशाला आणली होती बरोबर ? मी रागाने धुसफुसत राहिले , कशी बशी सकाळ झाली आणि एकदाचे तिथून निघालो . सोमवारी ऑफिसला सुट्टी होती ,मी आज घरात आहे म्हटल्यावर सासूबाईंनी लगेच आठवड्याची कामं काढली , मग डबाभर तांदूळ निवडले , दाण्याचं कूट करून ठेवलं ,कडधान्य भाजून ठेवली , पितळी समई , तेलाची किटली ई वेळखाऊ गोष्टी घासून ठेवल्या ,दुपारी हॉल च्या भिंती आणि वरचे आढे मी पुसून घ्यावेत असं नुसतं सुचवून त्या थांबल्या नाहीत तर पट्कन एका घमेल्यात साबणाचं पाणी आणि फडकं आणून ठेवलं . ते पुसताना माझी अख्खी दुपार गेली , संध्याकाळी स्वयंपाक घराच्या ओट्याशी मी चहा करत असताना जेव्हा शिवाय हिला फार कामाची सवय नाही म्हणून ,एवढी सुट्टी असून फार काही काम झालंच नाही अशी खंत त्यांनी जाऊबाईंजवळ बोलून दाखवलेली ऐकली , तेव्हा मात्र मी कधी एकदा माझ्या ऑफिसला जाते असं मला झालं .
पुढच्या दिवशी ऑफिसला गेल्या गेल्या , पुढे सर्वांनी आणखी काय धमाल केली , याचा आढावा घ्यायला खरं तर मी खूप उत्सुक होते पण गंमत म्हणजे मला असं कळलं की मी गेल्यानंतर , खुद्द यु.डी अचानक शांत झाले , झालं उत्सव मूर्ती गप्प बसल्यामुळे मग बाकीचे सगळेच उदास झाले आणि ट्रिप सोमवारी सकाळी परत यायची ती रविवारी संध्यकाळीच परत आली . मला नवल वाटलं , माझी अनुपस्थिती कोणाला जाणवावी अशी मी आहे ? हे नवीनच होतं , घरी तर मी सतत रागाचा सामना केलेला. सतत मला नावं ठेवली गेलेली , मानसही सतत काही ना काही नावं ठेवत असायचा , सासूबाई , जाऊबाई यांनी कधीच मला एखादाही कौतुकाचा शब्द दिला नव्हता . आपण अगदीच अनवॉन्टेड कॅटॅगिरीत मोडत नाही याचं मला बरं वाटून गेलं
‘आमीर खान चा ‘ ‘दिल चाहता है’ तेव्हा नुकताच रिलीज झालेला , ही मंडळी तेव्हा तो मूव्ही ऑफिसमध्ये लावून बसायचे. प्रत्येकाने आपआपले कॅरॅक्टर्स ठरवून घेतलेले त्याप्रमाणे डॉयलॉग सुरू व्हायचे, कधी कधी गुलजारचे किंवा असेच इंटलेक्चुअल मुव्हीज लावलेले असायचे , गुलजारच्या चित्रपटातल्या प्रत्येक संवादाचा अर्थ , गाण्यातल्या प्रत्येक ओळीचा अर्थ याचं रसग्रहण चाललेलं असायचं , शेरो -शायरी रंगात आलेली असायची , शास्त्रीय गाण्यांचे प्रोग्रॅम , सगळ्यांची रेलचेल असायची .ऑफिस ला जेव्हा काम असेल तेव्हा कामही मान मोडून करायचे , खुद्द यु डी दरवेळी नवीन सर्टिफिकेशन कोर्स करत असत आणि त्यासाठी वीस वीस तास अभ्यास करत असत असा एक अतिशयोक्ती वाटावा असा किस्साही मी ऐकला होता , पण तो खरा होता. भरपूर मेहनत करायची आणि भरपूर एन्जॉय करायचा , आयुष्यचा प्रत्येक क्षण आनंदाने आणि पूर्णपणे जगायचा , उपभोगायचा हा त्यांचा फंडा , हळू हळू माझ्या आयुष्यातही छोटे मोठे बदल घडवायला यु डी नी सुरूवात केली , माझं थांबलेलं गाणं त्यांनी पुन्हा सुरू करायला लावलं , रोज मला विचारायचे गाण्याचा क्लास लावलात का ? मी म्हणायचे नाही, चौकशी करायला वेळच मिळाला नाही , मग शेवटी त्यांनीच क्लास शोधून काढला , ऑफिस च्या वेळेत एक तासाची सवलत दिली आणि मला सांगून ठेवलं पहिल्या दिवशीच फी देऊन ठेवायची म्हणजे मग आपण आपोआप जातो , मी तस्संच केलं ,माझी लायब्ररीही त्यांनी चालू करायला लावली, त्यांची आवडती पुस्तक मला हवी तेव्हा त्यांच्या केबिन मध्ये बसून वाचायची मुभा मिळाली , ऑफिसची अनेक महत्वाची कामं ते माझ्या अंगावर विश्वासाने टाकू लागले , जिथे चुकेल तिथे मी ओरडाही खायचे , पण त्यांच्यामुळे मला बऱ्याचशा बारीक सारीक गोष्टी शिकायला मिळाल्या , त्यांनी त्या वेळेला लावलेल्या काही सवयी अजूनही माझ्या अंगवळणी पडल्या आहेत , जसं की बाहेर सार्वजनिक ठिकाणी किंवा कुठेही चहा/कॉफी प्यायची झाली तर कप डाव्या हातात धरून डाव्या साईड नेच प्यायचा . कारण जवळपास सगळेच लोक तो उजव्या साईडने पितात, आपलं व्हिजिंटिंग कार्ड दुसऱ्याला देताना आपणच ते दोन्ही हातात धरून अदबीने दिल्यावर समोरच्याच्या मनातही आपोआप तो आदर reflect होतो , कधीही कुणाशीही डील करताना ,विरोधकाला आधी आपल्या गोटात घायचे मग बाकीच्यांशी डील करायचे , एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला दुसऱ्याबद्दल काही चुगल्या सांगायला येते तेव्हा आधी सांगणाऱ्या व्यक्तीचा हेतू काय आहे हे जाणून घेतले पाहिजे .. वैगेरे वैगेरे, खरं तर या गोष्टी खूप सामान्य होत्या पण मला त्या नवीन होत्या , यु डी ने सांगितलेलं सगळं मी डोळे मिटून फॉलो करायचे , स्वतः ते उत्तम गुणग्राहक होतेच त्यामुळे वाचन आणि ईतर बौद्धिक विषयावर आमच्यात बरेचदा डिबेट व्हायचे ,ते जिंकले तरी तेच सर्वांना पार्टी द्यायचे आणि मी जिंकले तरी तेच पार्टी द्यायचे.

यु.डी. आल्यापासून माझ्या रडक्या , रखरखीत आयुष्याला एक विलक्षण वेगळं वळण लागलं होतं आणि वेग आला होता , माझ्यातले प्रत्येक गुण तावून सुलाखून लखलखीत करायचं काम त्यांनी सुरू केलं , वेळप्रसंगी रागवून ,चिडून देखील ते माझ्याकडून सगळ्या गोष्टी करून घायचे . त्यांची प्रत्येक गोष्ट , त्यांचा प्रत्येक डिसिजन अचूक असायचा ,सतत नवीन विषयांचा अभ्यास करायची अजून एक त्यांची सवय मला आवडायची , ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेली प्रत्येक गॅझेट्स कुणाकडेही यायच्या आधी ती यु डी कडे असायची, आणि धाडसीपणा ,हा हि अजून एक गुण , यातली कुठलीच गोष्ट मानस मध्ये मी पाहिली नव्हती , साधं माझं आणि जाऊबाईंचं वाजलं तरी तो उंबऱ्यातच डोक्याला हात लावून बसायचा . यु डी चा प्रत्येक गोष्टीतला कॉन्फिडन्स , रुबाब ,मला अचंबित करून जाई . मी खूप आदर करायचे त्यांचा , असं वाटायचं सगळ्या प्रॉब्लेम्स चं सोलुशन यु.डी . कडे आहे .अशातच एके दिवशी एक चमत्कारिक घटना घडली .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ स्मिता श्रीपाद , आबा., अज्ञातवासी : सर्वांची आभारी आहे , प्रतिसादा मुळे लिहायला नवीन हुरूप येतो . काही खटकले तर नक्की सांगा म्हणजे दुरुस्ती करता येईल