मक्तू SSSSSSब !!...(The Destiny … ) भाग -4

Submitted by Sujata Siddha on 21 January, 2023 - 02:57

https://www.maayboli.com/node/82897-

मक्तू SSSSSSब !!...(The Destiny … )
भाग -4

एके दिवशी नेहेमीप्रमाणे बातम्या देऊन रात्री साडे नऊ ला घरी पोहोचले ,तेवढ्यात फोन खणखणला ,(हो या काही महिन्यात घरी फोन आला ही एक डेव्हलपमेंट झाली होती ) मी तिथेच उभी होते त्यामुळे चट्कन उचलला, “हॅलो मॅडम ,मी उदयन सहस्त्रबुद्धे‘ बोलतोय , मी एकदम ताड्कन उडाले . “सरांचा घरी फोन? , या वेळी ? मी काही गंभीर चुका केल्या की काय ? “ एक आवंढा गिळून मी म्हटलं “ येस सर !..” यावर त्यांनी विचारलं “कशा आहत ?
“मी ? छान आहे , “ मी म्हटलं , यावर पलीकडून उत्तर आलं , “तुम्ही छानच आहात ते मला माहिती आहे “ ते तसे हजारजबाबी होते .
“ मॅडम उद्या संध्याकाळी आपले C.A. यायचे आहेत ,तर तुमची त्यांची ओळख करून द्यायची आहे, उद्या तुम्ही सकाळच्या ऐवजी संध्याकाळी चारच्या शिफ्ट ला या , जमेल ना ? “ मी एक-दोन सेकंद थांबले तेवढ्यात मानस मागून आला , “कोणाचा फोन आहे उल्का? “ रिसीव्हरच्या माऊथ पीस वर हात ठेवून मी हळूच त्याला म्हटलं , “ अरे उदयन सरांचा आहे , मला विचारतायत की उद्या संध्याकाळची शिफ्ट करणार का? “
“ अगं मग हो म्हण की त्यात काय एवढं ..जा जा नाही म्हणू नकोस .बातम्या नको देऊस एक दिवस ,नाहीतरी पेमेंट कुठे देतात वेळेवर ? दोन महिन्यातून एकदा निघतं , ” मानसने असं म्हटल्याबरोबर मी फोनवर सरांना कळवून टाकलं की येते .
संध्याकाळी चार वाजता मी ऑफिसला पोहोचले , बॉस आणि टीम कुठेतरी निघण्याच्या तयारीत होती , उदयन सहस्र्बुद्धेच्या म्हणजेच यू .डी . च्या टीममध्ये ‘मंदार ,जाई ,आणखी दोन मुली ज्या आधी स्टुडंट म्हणून आलेल्या आणि इथेच नोकरीला लागलेल्या , त्यापैकी एकीचं नाव अनघा आणि दुसरी अपर्णा , स्वभावाने जरा गंभीर असलेले वैद्य सर ,असे पाच जण होते . यु डी,आणि वैद्य सर मॅरीड ,बाकी सर्व बॅचलर . ऑफिसच्या दाराशी मी पोहोचताच सगळ्यांनी एकजात गलका केला , “गुड ईव्हीनीग मॅडम sss .. !.. अचानक झालेल्या त्या स्वागताने मी जरा बावरले ,सगळे जण एकदम माझ्या भोवती येऊन म्हणाले चला बाहेर जायचंय , “ पण मग ऑफिस ? “ मी चाचरत’ यु.डी .’ न कडे बघत विचारलं , “ते किंचित हसले आणि म्हणाले , आज सी ए बाहेरच भेटणार आहेत चला ,” असं म्हणून ते स्वतः खाली तरातरा निघून गेले ,बाकीचे त्यांच्यामागे मलाही ओढत घेऊन गेले , त्यांची टाटा एस्टीम होती , जाई त्यांच्या शेजारी , आणि आम्ही तिघी मागे , बाकीचे दोघे बाईक वरून येत होते . रस्त्याने जाताना खूप धमाल चालली होती , एकदम त्यांच्यात असं मोकळेपणाने वावरायची सवय नसल्यामुळे मी गप्प होते . काही वेळाने आम्ही लांब , शहराच्या बाहेर , डोंगरवजा ठिकाणी पोहोचलो , तिथे उतरल्यावर मग गाडीच्या डिकीतून त्यांनी भरपूर शोभेची दारू आणली होती, त्यांची आतषबाजी केली , खूप सुंदर दृश्य दिसत होतं , रात्रीच्या अंधारात रंगेबीरंगी लाईट्सचा खेळ बघताना माझं भान हरपून गेलेलं . मनातून आश्चर्य वाटलं , हे असलं ऑफिस कधी पाहिलं नव्हतं “ सगळं झाल्यावर आम्ही निघालो ,कार मध्ये सर्वजण उत्सहात बोलत होते , मी एकटी शांत होते , यु.डी . नी माझ्याकडे पाहिलं , “कसं वाटलं सरप्राईज मॅडम ? कसे वाटले आमचे सी.ए. ?“
मी हसून म्हटलं “ छान !.. “ , पण मला त्यांची पांढऱ्या रंगाची टाटा एस्टीम खूप आवडली त्यामुळे मी शेजारी बसलेल्या अनघाला हळूच म्हणाले , “मला ही गाडी खूप आवडली , याची डिक्की आत असल्यामुळे मस्त ऐसपैस बसता येतं “ त्याचवेळी मला पुढून यु डी चा कुजबुजता स्वर ऐकू आला , “बास !..आता ही गाडी आयुष्यभर माझ्याकडेच राहील !.. “ मी जरा चमकुन त्यांच्याकडे बघितलं , पण ते समोर बघत गाडी चालवत होते ,मला वाटलं मला भास झाला , असं काही ते बोलले नसावेत . तितक्यात मागे वळून ते म्हणाले “ बघा तुमच्या वेळेत परत जातोय आपण , किती वाजता येते म्हणून सांगितलंत घरी ? “
“ नऊ पर्यंत येते म्हणून सांगितलंय “
“ओ हो !.. मंदार … ?..”
“येस बॉस ? “
आपल्याकडे किती वेळ आहे ? “
“ भरपूर SSS नऊ वाजायला खूप अवकाश आहे , साडे सात तर होतायत आत्ता कुठे “
“मग वळवायची गाडी ? “
“हुर्रे SSSSS … चलो sss “
‘ पुन्हा भरधाव गाडी निघाली , मंदार गाणं गात होता , “आजसे पेहले ,आजसे ज्यादा ख़ुशी आजतक नही मिली SSSSS “ सर्वजण त्याला बॅकग्राउंड म्युझिक देत होते , दुसरं कडवं आलं “ईसको संजोग कहे या , किस्मत का मेला, हम जो अचानक मिले है … “ यावेळी मला उगीच भास झाला की यु डी माझ्याकडे बघतायत , मला एकदम कसंतरी झालं , मनातले विचार मी पटकन झटकून टाकले , आणि गाडी पिझ्झा हट पाशी थांबली , त्यावेळेस ते नवीनच सुरू झालं होतं , मलाच काय कोणत्याही सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना ते परवडणार नव्हतं , असं असताना यु.डी. आम्हा सहा लोकांना घेऊन गेले , मला ते सगळं वातावरण नवखं होतं , एवढ्या लोकांचं बिल किती होईल याचं उगाच टेन्शन , म्हणजे ते बील आपल्या पगारातून कापतात की कसं ? या विवंचनेत मी होते , तेवढ्यात वेटर आला, यु डी ने सफाईदार पणे ऑर्डर दिली ,’रोस्टेड गार्लिक ब्रेड ,विथ चीज’ ६ कोक आणि ४ लार्ज पॅन एक्झॉटीका पिझ्झा . हे सगळे पदार्थ माझ्यासाठी नवखे होते पण आवडले मला खूप , एकीकडे हे सगळं एन्जॉय करत असताना मनावर प्रचंड मोठं दडपण होतं ,एक म्हणजे आपण आपल्या नवऱ्याला सोडून हे सगळं परक्या लोकांबरोबर एन्जॉय करतोय आणि दुसरं आपलं लहानग लेकरू चातकासारखी घरी आपली वाट पाहत असेल ,आपल्या सहवासाठी आसुसलेलं असेल , तरीही आपण ईथे मजेत खात बसलोय , माझ्या मनाची चाललेली घालमेल यु.डी . ना कळली असावी , त्यांनी सर्वाना लवकर आटोपतं घ्यायला सांगून , मला लगेच घरी सोडायची व्यवस्था केली , घरी आले , पण मन उगाच स्वतः:ला खात होतं ,अपराधी वाटत होतं , रात्री मानस ला सगळं सांगितलं ,अगदी सगळं सगळं सांगितलं , यु .डी . माझ्याकडे सतत बघत होते हे हि सांगितलं, पण त्याने त्या गोष्टीला फारसं महत्व दिलं नाही , मग मलाच आपण फार बाऊ करतोय की काय असं वाटायला लागलं .आणि माझा अपराधी भाव कमी झाला . ‘निशी’ ला कुशीत ओढून मी गाढ झोपी गेले .

दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये जाईशी बोलताना तिने सांगितलं की ‘ यु डी ‘ ना तुझा राग यायचा हे खरं असलं तरी तु एवढ्या सगळ्या गोष्टी करतेस हे त्यांना माहिती नव्हतं , तुझ्या कामातल्या चुका या तुझ्या अस्थिर मनामुळे होत असतील हे त्यांच्या लक्षात आलं ,आता बहुतेक ते तुला नीट समजून घेतील . हे ऐकल्यावर माझ्या डोक्यावरचं मोठं ओझं उतरलं . अपराधीपणाचा बोजा कमी झाला त्यामुळे साहजिकच कामंही मी व्यवस्थित करू लागले , आता ‘यु डी ‘ च्या ग्रुप मध्येही मला एन्ट्री मिळाली . ‘यु डी जे काही करत ते सर्वांबरोबर करायला त्यांना आवडत असे , एकट्याने मौज करायला त्यांना आवडायचं नाही , सगळ्यांना सतत वेगवेगळ्या महागाड्या रेस्टोरंन्टस ना आपल्या खर्चाने घेऊन जायचं , एरवी जे कधी लांबून पाहायचं म्हटलं तरी पैसे पडतील की काय असं वाटावं अशा ठिकाणी फिरायला जायचं , कधी पिक्चर ला जायचं , कधी सर्कस , कधी गाजलेलं नाटक , कधी शास्त्रीय संगीताचा प्रोग्रॅम ,मग त्या नंतर डिनर . फक्त एक मात्र खटकायचं या सगळ्यात त्यांची बायको कधीच नसायची , त्यांनाही निशीच्याच वयाचा एक मुलगा आहे हे मला जाई कडून कळलं होतं , शिवाय जाई आणि त्यांचीही विशेष मैत्री आहे हे हि माझ्या लक्षात आलं होतं , त्यांची बायको म्हणजे माझ्या बरोबर बातम्या देणारी माझी colleague होती , तिनेच मला या जॉब ची ऑफर दिली होती , पण तिच्या आणि माझ्या बातम्यां देण्याचे दिवस तसेच वेळाही वेगवेगळ्या असल्या कारणाने आमची जास्त भेट होत नव्हती . तसंही सगळं मी मानस ला विचारूनच करायचे पण तरीही मी पहिल्यांदा जितकी बिचकायचे तितकीच अजूनही बिचकत होते , खूप एन्जॉय करायची मला सवय नव्हती . किंवा स्वभाव थोडा इन्ट्रोव्हर्ट असल्यामुळे मला सतत हसणं खिदळणं आवडायचं नाही ,काय असेल ते असो मला जमेल तितकं मी टाळायचा प्रयत्न करायचे , पण ते सगळे विशेषतः यु.डी.इतके गळ घालायचे की मला जाणं भाग पडायचं , गेलेल्या प्रत्येक जागेचा आणि घालवलेल्या प्रत्येक क्षणांचा तपशील मी मानस ला द्यायचे पण आश्चर्य म्हणजे त्याने त्याकडे कायम दुर्लक्ष केलं , त्यावेळेस माझ्या त्याचं कारण लक्षात आलं नाही, खूप वर्षांनी आलं ,एकतर त्याचा माझ्यावर विश्वास होताच आणि दुसरं म्हणजे माझा दर महिन्याला न चुकता माझ्याकडून त्याला मिळणारा पगाराचा चेक . त्या वेळेला ही गोष्ट माझ्या लक्षात नाही आली, मानस शांत होता त्यामुळे मला वाटायचं की जे चाललंय ते योग्य चाललंय .हळू हळू मी अपराधाच्या बोजातून बाहेर येऊन स्वतःशी मोकळेपणाने कबूल करायला लागले की हे मलाही करायला आवडतं , कधी कधी असंही वाटत असे की मी या लोकांबरोबर आनंदात राहू शकते , यांचे विचार , यांची जगण्याची फिलॉसॉफी मला सूट होतेय , खरंच सुख जर माझ्याकडे येऊ पाहतंय तर त्याने विशिष्ट मार्गानेच माझ्या कडे यावं असा अट्टहास मी का करतेय? घरातल्या लोकांकडून केलेल्या प्रेमाच्या अपेक्षा जर इकडून पूर्ण होत असतील तर मी का डावलू ? आणि माझ्या घरातली सगळी कर्तव्य पूर्ण करून मी माझा वेळ ईकडे घालवला तर काय बिघडलं ? अशा आणि यासारख्या बऱ्याच प्रकारच्या आंदोलनात मनाचं हेलकावे खाणं चालू होतं .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users