अज्ञातवासी - S02E12- सीजन फिनाले

Submitted by अज्ञातवासी on 9 January, 2023 - 10:32

मनोगत -

सीजन फिनाले लिहून संपवताना एक समाधानी भावना आहे. अज्ञातवासी अजून फक्त वीस टक्के पूर्ण झालेली आहे, पण एका क्षणाला विसावा घेणं उत्तम असतं, एवढं नक्की. त्यामुळे आता जरा ब्रेक, जरा विसावा इतकंच.
...पण... अजून एक कथा येतेय. याची आधीच हींट देणं चालू झालं होतं, जी अज्ञातवासीच्या विश्वातच घडेन, पण तिची विषयवस्तू पूर्ण वेगळी असेन. स्टे ट्यून.

याआधीचा भाग - https://www.maayboli.com/node/82857

एका हॉटेलात दोन लोक बसलेले होते.
संपूर्ण हॉटेल रिकामी होती.
"मोक्ष, अजून किती दिवस दिल्लीत?"
"एका प्रोजेक्टवर काम चालू आहे. ते करून जाईन."
दादासाहेब हसले.
"नाशिकला कधी येशील?"
मोक्ष कसानुसा हसला.
"कधीही नाही. मला माहितीये."
"बाबा, तुम्हीच चला माझ्यासोबत."
"नाही मोक्षा, मला नाही सोडता येणार नाशिक."
"सगळं सोडता येतं बाबा."
"काही गोष्टी नाही सोडता येत बाळा.
शेलार असण्याचं, खुर्चीवर बसण्याचं प्रायश्चित्त फार मोठं असतं."
"बाबा प्रायश्चित्त?" मोक्ष आश्चर्यचकित झाला.
"हो बाळा. अश्वत्थामा बनून आयुष्यभराची वेदना उराशी बाळगावी लागते. म्हणून सांगतो, कधीही नाशिकला परत येऊ नकोस. मी जिवंत असेल तोपर्यंत तरी..."
"बाबा..." तो उठला, आणि त्याने दादासाहेबांना घट्ट मिठी मारली.
"माझ्या बाळा, जीव आहेस रे तू माझा. मी जगतोय फक्त तुझ्यासाठी."
दादासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांनी मिठी अजूनच घट्ट केली.
******
सकाळीच वाड्यात अप्पा आणि संग्राम उभे होते...
"अप्पा, काल सगळी वायनरी उडाली. काय स्फोट झाला बघितलं का?"
"संग्राम बघितलं सगळं."
"काय वाटतं, कुणी केलं असेल."
"मी केलं," मोक्ष त्यांच्या जवळ येत म्हणाला.
दोघेजण वेड्यासारखे त्याच्याकडे बघत राहिले...
"काल वायनरी एक टन आरडीएक्सच्या स्फोटात उडाली. त्यात डिसुझा गेला. म्हणजे गेलाच असेल, कारण तिथे राख उरलीय फक्त."
"तुला कळतंय का, तू काय बोलतोय?" संग्राम म्हणाला.
"शांत हो. अरे जोशी आले."
तिकडून एक बटू, जाड चष्मा घातलेली प्रौढ व्यक्ती येत होती.
"श्रेयालाही बोलावलंय. येईल इतक्यात. आणि पाटणकरसुद्धा येणार आहेत. आपण छोट्या हॉलमध्येच बसू. काय? चला जोशी."
मोक्ष छोट्या हॉलकडे निघाला.
त्याच्या मागोमाग अप्पा निघाले. संग्राम त्याच्याकडे रागाने बघतच होता.
"राजे, चला..." अप्पा रागाने त्याच्याकडे बघत म्हणाले.
संग्राम दातओठ खात निघाला.
"तर जोशी, श्रेयाने मला आधीच सगळं समजावलं आहे. तुम्ही फक्त आता मी सांगतो त्याच्यावर काम करा."
जोशींनी मान हलवली.
"एक. दादासाहेबांनी कुणाच्या नावावर किती स्थावर मालमत्ता केलेली आहे, आणि त्यांच्यापैकी कोण कोण एका हाकेवर ती माझ्या नावावर करेल..."
...अप्पा बघतच राहिले...
"मग ज्यांनी नाही केली, त्यांना तू उडवणार?"
"पर्याय नाही अप्पा. त्यांना कळायला हवं शेलार देऊ शकतात, तर परत घेऊही शकतात. शिस्त नावाची गोष्ट उरलेली नाहीये या वाड्यात."
जोशींनी मान हलवली.
"दुसरी गोष्ट, रोकड कुठे, कुणाकडे किती आहे याची यादी.
तिसरी गोष्ट, सोनं कुणाकडे किती आहे, याची यादी. चांदीचा हिशेब आजपासून बंद. ज्याच्याकडे आहे, त्याचीच."
जोशी आश्चर्याने त्याच्याकडे बघत राहिले.
"चौथी गोष्ट, जरा सिरीयस आहे. त्या गोष्टीचं नाव आहे, संग्रमचा मासिक खर्च. टाळ्या..."
"मोक्ष..." संग्राम ओरडला.
"आवाज हळू. जोशी, सांगा."
"मी काय सांगणार?" जोशी भेदरले.
"मग मी सांगतो. मासिक पाच कोटी रुपये फक्त...फक्त... फक्त..."
"काय?" अप्पानी आ वासला.
"ये, माझ्या बापाचा पैसा आहे, मी कसाही उडवेन." संग्राम भडकला.
"पैसा माझ्या बापाचा आहे कळलं? फक्त आणि फक्त माझ्या बापाचा. बस खाली. शांतपणे बोलतोय तर शांत उत्तर दे. पूर्ण हिशेब दिलास, तर पाच कोटींचे सहा कोटी करेन, नाहीतर एक रुपया मिळणार नाही."
"...मोक्षा, दोनशे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत त्याच्याकडे. त्यांना त्यालाच पोसावं लागतं." अप्पा आर्जवीने म्हणाले.
"जोशी, सायखेडकरांशी बोला आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना एखाद्या कंपनीच्या रोलवर दाखवायला लावा. तीस हजार रुपये महिना इन हॅण्ड आणि त्यावर पीएफ, बोनस सगळं चालू करा. चाळीस हजार होतील जास्तीत जास्त. ऐशी लाख झाले. पुढे?"
अप्पा गप्प बसले.
"अप्पा चार कोटी वीस लाख?" मोक्षने विचारले.
"कार्यकर्ते काय नुसते पगारावर चालतात का?"
"नाही रे, त्यांना बाया लागतात. उंची दारू लागते. कोकेनपासून गांजापर्यंत सगळं लागतं. तू त्यांना गाड्या पुरवतो. मुंबईच्या डान्सबारमध्ये लाखो उडवतो... बरोबर? त्याशिवाय कार्यकर्ता कसा टिकणार?" मोक्ष म्हणाला.
"मग?" संग्रामने बेदरकारपणे विचारले.
"बंद होईल सगळं. बाया आणि नशा सोडून तुला कशासाठीही पैसा हवा असेल सांग. या गोष्टींसाठी मी एक रुपया देणार नाही."
"मग मला नवीन गाडी घ्यायचीय आज."
"कोणती?"
"फोरच्युनर."
"किती हवेत?"
"चाळीस लाख. आताच. कॅश."
मोक्ष हसला.
"लेजेंडर घे. फोरच्युनरचं टॉप मॉडेल. जोशी, याला साठ लाख कॅश द्या. मोक्ष म्हणाला."
"जी दादा." जोशी म्हणाले.
"जोशी अभ्यास सुरू करा. उद्या मला सगळी माहिती पाहिजे. चला, कामाला लागूयात."
मोक्षचा इशारा समजून तिघेही तिथून निघून गेले.
आणि ते जाताच श्रेया आणि पाटणकर आत आले.
"श्रेया, तू कधी आलीस?"
"आताच. तुझी मीटिंग चालू होती, म्हणून पाटणकर आणि मी गप्पा मारत होते बाहेर."
"पाटणकर, कसे आहात?" मोक्षने विचारले.
पाटणकर कसेनुसे हसले.
"माहितीये मला. मीडिया पिसाळली आहे. ऑफिशियल स्टेटमेंट द्या. बॉयलरचा स्फोट झाला, आणि अल्कोहोलिक पदार्थांमुळे पूर्ण वायनरी जळून खाक झाली."
"दादा, वाईनमध्ये इतकं अल्कोहोल नसत." पाटणकर म्हणाले.
"ते आपल्याला माहितीये, मिडीयाला अभ्यास करू द्या. तोपर्यंत राख शांत होईल."
"ठीक आहे दादा." पाटणकर निःश्वास सोडत म्हणाले.
"आणि डिसुझानंतर कोण, याचीही तयारी करायला हवी. आपल्याकडे तशी एक व्यक्ती आहे, पण तिची परवानगी लागेल."
"कोण?" श्रेयाने विचारले.
"श्रेया देवदत्त राणे!" तो म्हणाला.
"मी?" श्रेया भांबावली. "नो नो, मला माझं हॉस्पिटल चालवायचंय."
"मला एक सांग, शेवटची सर्जरी तू कधी केली होतीस? ते जाऊ दे, शेवटचं तू हॉस्पिटलला कधी गेली होतीस."
"अरे पण..."
"पाटणकर, तुम्ही या आता. श्रेया भेटेल तुम्हाला लवकर. तुम्हाला दोघांना मिळूनच हे सगळं उभं करायचंय." मोक्ष म्हणाला.
पाटणकर तिथून निघाले.
पाटणकर तिथून निघताच मोक्ष म्हणाला
"श्रेया सॉरी, तुला वाटत असेल मी खूप घाई करतोय, पण हे जरुरी आहे."
"मोक्ष अरे मला नाही वाटत मी करू शकेल."
"श्रेया वायनरी उभी करायला आता हजार कोटी तरी लागतील. शिवाय कमीत कमी वर्षभर काम चालेल. वायनरीचा फंड फ्लो पूर्णपणे आता बंद होईल. शिवाय मला अजून एका गोष्टीचा संशय आहे."
"काय?" तिने विचारले.
"दादासाहेबांनी एक ग्रॅम ड्रग नाशिकमध्ये येऊ दिलं नाही. तरीही नाशिकमधून सगळीकडे अमली पदार्थांचा पुरवठा होत होता."
"तुला म्हणायचं तरी काय आहे?"
"वायनरीच्या खालीच डिसुझाने एक गुप्त फॅक्टरी बनवली होती. तिथे अतिशय घातक असे अमली पदार्थ बनवले जात होते."
"काय?" श्रेया चक्रावली.
"आणि यात डिसूजा बरोबर अजून कोणीतरी काम करत होता. त्याचा पत्ता अजून लागायचा आहे श्रेया."
"अरे पण हे सगळं तुला कसं कळलं?"
"खानसाहेबांची काही माणसे वायनरीमध्ये कामाला होती. त्यांच्यापैकी काही माणसांकडून बॉम्ब प्लांट करताना मला या गोष्टीचा मला सुगावा लागलाय. ती फॅक्टरी उध्वस्त झालीय, पण तो डीसुझाचा पार्टनर अजूनही काम करत असेल श्रेया."
"मोक्ष हे प्रचंड विचित्र आहे."
"म्हणून आता वायनरीमध्ये मला कुठलाही गोंधळ नकोय, आणि अजून एक..."
"आता काय?"
"वायनरीची संपूर्ण मालकी तुझीच राहील श्रेया. संपूर्ण स्वतंत्र. शेलारांचा तिच्यावर काहीही हक्क राहणार नाही."
श्रेया हसली.
"मग तू दुसरी व्यक्ती शोध." ती म्हणाली.
"काय झालं आता." मोक्ष वैतागला.
"कारण वायनरीवर जरी शेलारांचा हक्क नसला, तरीही मोक्ष शेलार, तुझ्यावर काय माझा हक्क राहील कळलं? शेलार साम्राज्याची अशी शकले होऊ देणार नाही मी."
मोक्षने थोडावेळ विचार केला.
"डील. थॅन्क्स मॅडम, सो काईंड ऑफ यू."
"आय एम." ती हसली.
*****
'समशेर, पांडे, सायखेडकर. तिघांनी उद्या मला रात्री बंगल्यावर भेटा. उद्याच.' शेखावतने मेसेज केला.
त्याने डोक्याला हात लावला. कधीच त्याची झोप उडाली होती.
त्याच्या डोळ्यासमोर आता फक्त युद्ध दिसत होतं!
भयंकर युद्ध!
जे संपूर्ण नाशिक हादरवून टाकणार होतं.
दुबई विरुद्ध नाशिक...
शेलार विरुद्ध....
त्याच्या अंगावर सरसरून काटा आला.
'नाही, आताच...' तो आत पळाला.
त्याने प्रत्येकाला फोन लावायला सुरुवात केली.
दोन तासात तिघेही शेखावतकडे हजर होते.
"शेखावत. तुझं डोकं कुठे चालतय माहिती नाही, पण आपण खूप मोठी चूक केली हे कळतय का तुला?"
"चूक केली नाही, करवली गेली पांडे."
"म्हणजे?" पांडे आश्चर्यचकित होत म्हणाला.
"तुला नाही कळणार पांडे. हा खेळ तू, मी याच्यापेक्षा खूप मोठा आहे. तुला काय वाटतं? दादासाहेब गेले? राजशेखर शेलार गेला? नाही पांडे, तो आता खराखुरा वेताळ बनलाय, आणि त्याने एका राक्षसाला झपाटलंय. मृत्यूच्या पलीकडे जाऊन तो आता राज्य चालवतोय. कसलीही भीडभाड न बाळगता."
पांडे न कळून शेखावतकडे बघतच राहिला.
"चिंता करू नकोस पांडे. फक्त मला आता तुम्हा तिघांची परवानगी हवी आहे. शेवटच्या वारासाठी!!!"
"म्हणजे?"
"शेवटचा वार, मोक्ष शेलारवर..."
"तू युद्ध पुकरणार आहेस?"
"नाही, फक्त लढाई. हरलो तर मात्र युद्ध होईल."
"आपण हरलो तर मेलो असं समज शेखावत." सायखेडकर म्हणाला.
"आता मृत्यूची भीती नको सायखेडकर..."
"मला आहे शेखावत. म्हणून तुझे प्लॅन आता तुलाच लखलाभ. मी निघालो. आता दादासाहेबांच्याच जागी मला मोक्ष शेलार. मरेपर्यंत त्याची साथ देऊ." सायखेडकर जायला निघाला.
शेखावत उठला आणि त्याने सायखेडकरला मिठी मारली.
"दोस्त था तू मारा!" तो म्हणाला.
आणि पुढच्याच क्षणी त्याने सायखेडकरचा डोक्यात गोळी झाडली.
"शेखावत!" सिंग ओरडला.
"सिंग गप्प बस. या मुर्खांना कळत नाहीये, आपण काय करतोय. अरे तो मोक्ष शेलार, हळू-हळू सगळ्यांचा जीव घेईल. आता माघार नाही सिंग. लढाई सुरू होईल." आपला सरदार थोड्याच वेळात येईल.
तेवढ्यात एक मर्सिडीज त्याच्या लॉनजवळ येऊन थांबली.
"आला. मित्रानो आपल्या नवीन मित्राला भेटा, मानस नागरे..."
तो तरुण गाडीतून उतरला, आणि त्याने सर्वांना हात जोडून नमस्कार केला...
"याची ओळख," शेखावतने दीर्घ श्वास घेतला.
"नाशिकचा पाबलो एस्कोबार!!!"
*****
"खानसाहेब. बिर्याणी जबरदस्त झाली होती."
"ताट तरी मागायच होतं. "
"सोडा. भूकच तेवढी लागली होती. एक चांगली बातमी आहे."
"काय?"
"श्रेया पूर्ण वायनरीचं काम बघणार आहे."
"माशाल्ला!" खानसाहेब म्हणाले.
मोक्ष हसला. पण तो पुन्हा गंभीर झाला.
"काय झालं दादा."
"खानसाहेब, ती लॅब, तो सेटप. राहून राहून मला वाटतंय, खेळ फार मोठा होता."
"काहीतरी धागेदोरे सापडायला हवेत दादा."
"आपली माणसे कामाला लावा. मला असं वाटतंय, अजून खूप काहीतरी आपल्याला सापडायचंय."
"म्हणजे?"
"अजून खूप काहीतरी बाकी आहे खानसाहेब... बस एवढंच. चला मी निघतो. आज पिंकीला पिकप करायचंय."
"दुसरं कुणाला पाठवा दादा. तुम्ही स्वतः जायची काय गरज?"
"तिला मैत्रिणीसमोर भाव खायचाय, मोक्ष शेलार माझा भाऊ आहे असं. ठीक आहे."
त्याने पिंकीला फोन लावला.
"हॅलो, किती वेळ अजून?"
"दादा, अरे लाईफ केयर हॉस्पिटलला ये."
"का? काय झालं."
"अरे एक अंकल अचानक रस्त्यात पडले. मग आम्ही मैत्रिणींनी मिळून त्यांना इकडे आणलं. आता त्यांचे घरातले आले आहेत, म्हणून आम्ही निघतो."
"ठीक आहे. येतो." त्याने फोन ठेवला.
"चला खानसाहेब, येतो." मोक्ष निघाला.
त्याने गाडी मुंबई हायवेला घेतली, आणि लेखानगरला वळला.
गाडी पार्किंगमध्ये लावून तो आत गेला.
समोरच पिंकी उभी होती.
"ताई, काय छान काम केलं तुम्ही. खरच." तो तिच्याकडे बघत म्हणाला.
पिंकीचा उर अभिमानाने भरून आला. उगाच चार मैत्रिणीसमोर तिला मोठं झाल्याची जाणीव झाली.
"हँडसम आहे." एक मैत्रीण खुसफुसली.
"गप्प," पिंकीने डोळे वटारले.
"कसे आहेत ते काका आता."
"अरे अजून काहीच कळलेलं नाही. बघू काय होतं ते. त्याची मुलगी बघ, बिचारी किती उदास होऊन बसलीय."
मोक्षची तिकडे नजर गेली.
उंच, मध्यम अंगकाठी, मोठे डोळे, गव्हाळ रंगाची पोपटासारखं बाकदार नाक, डोळ्यावर एक ओव्हल शेपचा चष्मा...
'शरा....' मोक्षला सगळं जग त्याच्याभोवती फिरत असल्याचा भास झाला...
ती चमकून उठली.
त्याची पावले केव्हा त्याला तिच्याकडे खेचून घेऊ लागली, हे त्यालाही कळलं नाही.
कधीकधी, आयुष्यात जी व्यक्ती कधीही भेटणार नसते, तीच नियती समोर घेऊन येते.
'मोक्ष शेलार, विहिरीत जीव देईन, पण तुझ्याशी लग्न करणार नाही.'
' तू जरा मोठा असायला हवा होतास.'
' हे ओबसेशन बाजूला ठेव. नेहमी वाईटच विचार करत नको जाऊस.'
सगळ्या आठवणी अक्षरशः उसळी मारून वर येत होता.
शेवटी दोघेही समोरासमोर आले...
...नियती अजून एक खेळ रचत होती...

सीजन २ समाप्त.
सीजन ३ - एका ब्रेकनंतर!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय विलक्षण कथा आहे !! काय रचली आहे , काय तो अभ्यास, लय भारी !!! पूर्ण झाल्यावरच अभिप्राय द्यावा असे ठरवले होते.. वेगाने पूर्ण केलीत त्याबद्दल धन्यवाद..

भारी!!
पुढील लेखनास खूप शुभेच्छा!

@आशिशगुन - धन्यवाद! Happy
@ अनघा - धन्यवाद Happy
@ आनंदा - धन्यवाद Happy
@गौरी - धन्यवाद Happy
@झकासराव - धन्यवाद Happy
@sharadg - धन्यवाद Happy
@आबा - धन्यवाद Happy

सर्व वाचकांचे धन्यवाद... एक वर्षानंतर कुणी या कथेत इंटरेस्ट घेईन की नाही, शंकाच होती. पण तुम्हा सगळ्यांचे प्रतिसाद बघून छान वाटलं.
पुढील सीजनची तयारी चालूच आहे. पुढचा सीजन थोडा कमी वेगात, आणि जास्त ब्रॉड लिहायचं मनोगत आहे. पुढील सीजन, नवीन लोक आणि अजून अजून मोठा प्लॉट असा असेन.
संक्रांतीला एक नवीन कथा येईल, जी अज्ञातवासीच्याच विश्वाशी कनेक्टेड असेन. तिलाही आपल्या सर्वांचं असच प्रेम लाभो, हीच प्रार्थना!

पहिल्या सीझन पासून वाचतेय. विलक्षण स्टोरीलाईन आहे. दुसऱ्या सीझन चे भाग इतक्या नियमितपणे टाकल्याबद्दल मनापासून धन्यवाद!
पुढील लेखनासाठी शुभेच्छा आणि त्या कथेचे भागही असेच वेळेवर येऊद्यात ही विनंती

जबरदस्त सिझन..... मजा आली वाचताना...मोक्ष रॉक्स, नाशिक शॉक्स...
पण जास्त विसावा घेउ नका... आमची मेमरी फार काही भारी नाही. खूउउउउप दिवसांनी नवीन भाग आला की मग सगळे जुने भाग रीपीट वाचावे लागतात आम्हाला. मग ऑफिस ची कामं बाजुला ठेवावी लागतात. मग मॅनेजर ओरडतात... बरेच प्रॉब्लेम होतात.. काय काय सांगायचं. असो Happy
ते कास्ट का काय ते देणार होतात "थोड्याच वेळात" त्याचं काय झालं Wink

@गोगा - धन्यवाद! पहिल्या सीजन पासून वाचताय, त्यामुळे सॉरी for keep you waiting. Happy आणि I hope दुसऱ्या कथेचे भाग वेळेवर येतील.
@स्मिता श्रीपाद - प्रतिसादाबद्दल धन्यवाद. And I'm really sorry. मी इतका troublemaking असेल असं वाटलं नव्हतं. Lol
अवांतर I can totally relate to you problem, फरक एवढाच आहे की मी ऑफिस मध्ये कथा लिहीत बसतो, म्हणून कामे बाजूला ठेवावी लागतात. आपण सम:दुखी आहोत. आणि कास्ट साठी सेपरेट धागा काढण्याचा विचार आहे.
@ धनवंती - धन्यवाद, आणि सॉरी टू! Lol
@सामी - धन्यवाद, आणि नक्कीच Happy

अज्ञातवासी : जबरदस्त कथा आहे. आत्तापर्यंत प्रतिक्रिया दिली नव्हती. कारण सिरीज संपल्यावर द्यायचे ठरवले होते. याची वेब सिरीज होऊ शकते. किंवा आटोपशीर सिरीयल. रादर तुमच्या सगळ्याच लिखाणात ती ताकद आहे. पुढचे भाग काढायला ट्विस्टही चांगले ठेवता तुम्ही.

कास्ट साठी सेपरेट धागा काढण्याचा विचार आहे. >>>नेकी और पूछपूछ Wink

ते फायरींग imagine करताना मला मोक्ष च्या जागी KGF चा हिरोच आठवला .

@mazeman - खूप खूप धन्यवाद! मला आधी याची कादंबरी काढायची आहे, मग बघू. पण सध्या फक्त स्वानंदासाठी आणि चांगल्या प्रतिक्रियांनी हुरळून जाण्यासाठी लेखन करतोय.

@आबा आणि धनवंती - casting lakshat घेतलेली आहे.