अज्ञातवासी - S02E11- चार भुते!

Submitted by अज्ञातवासी on 7 January, 2023 - 12:27

याआधीचा भाग -
https://www.maayboli.com/node/82848

मनोगत किंवा काहीतरी मनातलं - सगळ्यांसाठी.

अज्ञातवासी ही कथा दीड वर्षानंतर पुन्हा सुरू करताना धाकधूक होतीच, पण तुम्हा सगळ्यांचे प्रतिसाद बघून खूप खूप धीर आला, आणि मी लिहीत सुटलो.
हा या सिजनचा शेवटून दुसरा भाग. सीजन फिनाले आता सोमवारी येईन. त्यानंतरचा प्लॅन, पुढच्या भागात Happy

"पहारा वाढवा, सगळे लोक बंदुका घेऊन उभे रहा... राक्षस केव्हाही येईल..." जाधव त्याच्या माणसांना सूचना देत होता.
"साहेब, कोण राक्षस?"
"अरे मोक्ष शेलार मूर्खा. तो येईल, मारून टाकेन तो मला."
"मोक्षदादा?" त्याने प्रतिप्रश्न केला.
"महाजन, प्रश्न विचारू नकोस. माणसं तयार कर."
सातपूरच्या अरुंद गल्लीत जाधवचं मोठं घर होतं. आजूबाजूला लहान लहान घरे होती. प्रत्येक घरात जाधवची माणसे होती. जाधवला आयुष्यभर साथ देणारी. किंबहुना जाधवचा संपूर्ण कारभारच त्यांच्या भरवशावर चालत होता.
महाजन काहीही न कळल्यासारखा उभा होता.
"अरे पळ, ज्याक्षणी मोक्ष शेलार दिसेल, त्याक्षणी त्याला गोळ्या घाल."
महाजन तिथून निघाला.
जाधवनेही स्वतःची रायफल घेतली, व तो लोड करू लागला.
मोक्षची गाडी सातपूरच्या रस्त्याला लागली, आणि शिवाजीनगरमध्ये घुसली.
शिवाजीनगरची ती गल्ली टक्क जागी होती.
मोक्षने गाडी बाजूला लावली.
"दादा, परत जा." महाजनचा आवाज आला.
"कुठे जाऊ महाजन? हे नाशिक माझं आहे."
"दादा, मी पुन्हा सांगतो निघा इथून."
"महाजन, मी पुन्हा सांगतो, हे नाशिक माझं आहे, ही माणसे माझी आहेत. तुमच्या कुणाच्या केसालाही धक्का लागला ना, तर मी त्या माणसाचा जीव घेईन...."
...मोक्ष अंधारातून बाहेर येत म्हणाला...
त्याच्या हातात एके - ५६ होती.
महाजन भांबावून त्याच्याकडे बघतच राहिला.
"दादा... कृपा करा. परत फिरा."
"महाजन शांत हो. जाधवनंतर तुलाच सगळं सांभाळायचं आहे. जाधव चुकला, आपण चुकायचं नाही."
मोक्षने रायफल खाली टाकली.
"बोलव तुझ्या माणसांना. बसून बोलूयात." तिथल्याच एका महानगरपालिकेच्या बाकावर तो बसला.
महाजनने शिट्टी मारली. दहा बारा सशस्त्र माणसे बाहेर पडली.
मोक्ष बसालेलाच होता. त्याने दोन्ही हात बाकाच्या पाठीवर ठेवले, आणि उजव्या पायावर डावा पाय ठेवला.
"नमस्कार. माझं नाव, मोक्ष शेलार. माझ्या वडिलांचं नाव, राजशेखर शेलार, माझ्या आजोबांचं नाव, जगनअण्णा शेलार."
ते लोक आता पूर्णपणे भांबावले होते.
"मी, काही दिवसांपूर्वी एकाच रात्रीत पन्नास माणसे मारलीत. आताच तुम्ही बॉम्बस्फोट बघितला असेल तर तोही मी केला, त्यात शंभर तरी गेले असतील.
पण मी वचन दिलंय स्वतःला, माझ्या एकही माणसाच्या केसाला मी धक्का लावणार नाही. आणि तुम्ही सगळे तर माझीच माणसे आहात.
म्हणून आपापल्या घरी जा, निवांत बघत रहा. जाधवची जागा तुमचाच माणूस घेईल." त्याने महाजनकडे बोट दाखवला.
"दादा आम्ही सर्व जाधवसाहेबांची..."
"...नाही, तुम्ही शेलारांची माणसे आहात. आणि आज शेलार तुम्हाला सांगतोय. कळलं? चला निघा." तो रागातच म्हणाला.
घाबरून लोक तिथून निघून गेले.
"महाजन थांब."
"बोला दादा."
"जाधव बरोबर आता घरात कोण कोण असेल?"
"कुणीही नाही. त्यांचा कुणावर विश्वास नाही, म्हणून स्वतःच पाच सहा रायफली घेऊन घरात बसलेत. त्यांची बायको आणि दोन मुली मुंबईला राहतात."
"ठीक आहे. ती बोलेरो कुणाची आहे?"
"माझी दादा."
"जुनी झालीय. नवीन घेऊ आपण. चावी दे."
महाजनने चावी मोक्षकडे दिली.
मोक्षने गाडी सुरू केली, आणि सटासट गियर बदलत वेगाने जाधवच्या दरवाजावर ठोकली.
धाडकन दरवाजा निखळून पडला.
आत बसलेला जाधव पूर्णपणे बिथरला. त्याने रायफलीतून गाडीवर बेछूट गोळीबार सुरू केला. अक्षरशः गोळ्या संपेपर्यंत त्याचा गोळीबार सुरू होता.
त्याने पुन्हा पुन्हा ट्रिगर दाबून बघितला. गोळ्या संपल्या होत्या.
...आणि मागून मोक्ष निवांत चालत आला.
गाडी दरवाजाला ठोकण्याआधीच त्याने बाहेर उडी घेतली होती.
त्याच्या हातात आता एक एके -५६ आणि एक एके - ४७ होती.
"मोक्ष, जवळ येऊ नको. येऊ नको जवळ. मी मारून टाकेन."
"काका शांत व्हा." त्याचा आवाज अतिशय खोल होता.
जाधवची चर्या बदलली.
"तुम्हाला मी मारेन, असं तुम्हाला वाटलं? नाही काका, तुम्ही मला हवे आहात. चुका सगळ्यांकडून होतात. राहणार ना माझ्या सोबत?"
"हो...हो... मोक्ष, माफ करा मला दादा... खरच चुकलो." माफ करा.
"केलं माफ काका. आता तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा." त्याने एके ४७ जाधवच्या समोर टाकली.
"मी जातोय काका, पूर्ण लोडेड बंदूक तुमच्या समोर आहे. आता तुमच्या हातात आहे, मला मारायचं की..."
मोक्ष पाठमोरा झाला, व जायला निघाला.
जाधव त्याच्याकडे बघतच राहिला.
त्याने क्षणभरही विचार केला नाही, समोर पडलेली एके ४७ उचलली आणि ट्रिगर दाबला...
क्षणार्धात एके ४७ चा स्फोट होऊन जाधव मृत्युमुखी पडला.
"काका, चूक केलीत." मोक्ष शांतपणे म्हणाला, आणि तिथून निघाला.
"महाजन, उद्या सकाळी दहा वाजता वाड्यावर..." तो गाडीत बसता बसता म्हणाला.
"हो दादा." महाजन सुन्नपणे म्हणाला. "पण तुम्हाला आता मला काहीतरी सांगायचय. जाधव साहेब असताना मी सांगू शकलो नाही. पण आता..."
"... तुला हे म्हणायचं आहे का महाजन, की देवराज जाधव साहेब अमली पदार्थांची तस्करी करत होते."
"तुम्हाला कसं कळलं दादा?" महाजन घाबरून म्हणाला.
"महाजन, यापुढे नाशकात जर कुणी अमली पदार्थांची तस्करी केली, तर मोक्ष शेलार त्याच्या शरीराची चाळणी करेल." मोक्ष म्हणाला, आणि तिथून निघून गेला.
महाजन त्याच्याकडे बघतच राहिला.
*****
मोक्षने गाडी खानसाहेबांच्या हवेलीकडे घेतली.
हवेलीत त्याला कुणीही अडवलं नाही.
विस्तवावर पातेलं तापत होतं. रात्रीचे दोन वाजले होते.
समोरचं एक मोठं वाढणं पडलेलं होतं. त्याशेजारीच एक छोटी बादली होती. मात्र कुठेही ताट किंवा वाडग नव्हतं.
तो हसला...
त्याने पातेल्यावरचं भलंमोठं झाकण काढलं.
बिर्याणीचा सुगंध दरवळला...
त्याने वाढण्याने बिर्याणी बादलीत भरली.
एका हातात झाकण, व दुसऱ्या हातात बादली घेऊन तो समोर जमिनीवर जाऊन बसला.
त्याने बादली पूर्ण उपडी केली. भाताचा छोटा डोंगर तयार झाला.
...आणि त्याने मोठमोठे घास घ्यायला सुरुवात केली.
(याचं चित्ररूप तुम्ही इथे बघू शकता.)

https://youtube.com/shorts/JvKyx5aQ2Wo?feature=share

*****

वायनरीची राख झाली होती. पोलिस, मीडिया, अग्निशामक दल, रुग्णवाहिका, सगळ्या गाड्या तिथे उभ्या होत्या.
एक मर्सिडीज एस यू व्ही तिथे उभी राहिली.
तिच्यातून एक माणूस उतरला.
त्याने उंची शर्ट - पँट घातलेली होती. हातात रोलेक्सचं घड्याळ होतं, पायात काळेभोर लेदरचे बूट होते.
अंधारात तो पाठमोरा दिसत होता.
तो भराभरा पावलं टाकत वायनरीचा मागच्या बाजूला गेला.
तिथे एक खोल खड्डा पडलेला होता. वेगवेगळं केमिकल लॅबचं साहित्य, मशिनरी बारीक तुकड्यांमध्ये विखुरली होती...
तो डोकं धरून खाली बसला...
"शेलार!!!!" त्याने अंधार चिरणारी किंकाळी फोडली.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त, छान पकड घेतलीय.

हा या सिजनचा शेवटून दुसरा भाग. सीजन फिनाले आता सोमवारी येईन. त्यानंतरचा प्लॅन, पुढच्या भागात >> please आता break घेऊ नका, सलग येऊ द्या. Happy

4×4 ड्राईव्हच्या ताकदीनं कथानक सुरू आहे....
पुन्हा लिखाण सुरू केल्याबद्दल वाचक म्हणून आभारी आहे.

@ आभा - धन्यवाद! धन्यवाद! (दोनदा प्रतिसाद आला म्हणून)
@गौरी - धन्यवाद! पण आता अज्ञातवासीतून ब्रेकची नितांत आवश्यकता आहे हो. मात्र तुमची निराशा होणार नाही, याची खात्री बाळगा.
@झकासराव - धन्यवाद!
@ धनवंती - धन्यवाद! आणि आभार कसले, उलट मीच तुमचा आभारी आहे, प्रोत्साहनाबद्दल आणि माझ्यासारख्या लहरी लेखकाला सांभाळून घेतल्याबद्दल. आय होप मी मध्येच गायब होणार नाही आता.
@दत्तात्रय साळुंके - दादा खूप खूप धन्यवाद!
@रूपाली विशे पाटील - धन्यवाद!

खुपच छान लिखाण आहे तुमचे! वेगवान आणि न कंटाळाता वाचावेसे वाटणारे कथानक, चित्रदर्शी शैली त्यामुळे मजा येतेय. मी गेल्या ३/४ दिवसात भा ग १ पासून सग्ळे भाग वाचून काढले.

काहीतरी केमिकल लोचा आहे की काय? >> मला असे वाटतेय की अमली पदार्थांची लिंक असावी! आणि त्यात कुणीतरी शेलार असावा जाधव बरोबर.

मस्त चाललीयं कथा . एकदम थरारक. बहुतेक लेखकांनी कथा अर्धवट सोडल्यामुळे कथा पूर्ण झाल्यावरच वाचायचे असे ठरवलेले . पण न राहवून सगळे भाग वाचून काढलेच. कथेचा ट्रैक , कथेतील पात्रे , प्लॉट कसा काय सुचतो तुम्हा लेखकांना याचे कायम कौतुक वाटते मला. कथा पूर्ण करालच तरी वाचकांच्या विनंतीला मान देऊन लिहिताय हे पण महत्वाचे आहे. उत्सुकता वाढली आहे . आता ब्रेक घेऊ नका.

@आबा - धन्यवाद. Happy
@diggi - धन्यवाद. अजून तर अनेक खेळाडू बाकी आहेत. Happy
@निकु - धन्यवाद . पुढच्या भागात कळेलच. Happy
@सामी - धन्यवाद. आणि बहुतेक आता ब्रेक घेणार नाही, घेतला तरी लहान असेन. Happy