पणजी आज्जीच्या रेसिपिज - तिखटा-मिठाचा सांजा, जनसेवा स्टाईल (फोटोसकट)

Submitted by मेधावि on 18 February, 2016 - 08:39

sanja (2)-min.jpgही पण अगदी साधी व सोपीच रेसिपी. पण जुन्या पुण्यात व जुन्याच पुणेकरांमधे अतिप्रिय. जनसेवात मिळायचा हा सांजा, तेव्हा चवीढवीचे जे. ना येऊन मजेत खाताना दिसायचे. दुर्दैवाने जनसेवा आता बंद झाले.

पण आमच्या आज्जींची व त्यांची चव अगदी सेम.

साधारणत: खूप मोठ्या पावसाच्या आळशी संध्याकाळी,आजारी व तोंडाला चव नसलेल्या नातवंडांना खाउ घालायचा पदार्थ. अतिशय कमी सामानात चविष्ट व पटकन होणारा पदार्थ.

साहित्य -
बाआआआ री इ इ इ क रवा १ वाटी, हो, त्याशिवाय हवा तस्स्सा रेशमी पोत येत नाही सांज्याला.
कढिपत्ता - ताजा १ टाळं- हिरवी पाने असलेला. काळी पाने नकोतच.
कोथिंबीर - मूठभर- हिरवी गाआआर हवी शक्यतो.
गोडं तेल
मोहोरी, घरचा हिंग, हळद,
सुके खोबरे किसणीवर किसलेले - जरास्से वरून शिवरायला
लिंबू १-२
किसलेले आले १ चमचा
जिरं, १ हिरवी तिखट मिरची
उगीच आपला नावाला - घातला न घातला असं - तीळ व ओवा ( चिमूट-चिमूट)
उकळलेले पाणी - ३ वाट्या.
साजूक तूप - १ मोठा चमचा.

हा पण लोखंडी कढईतच करायचा.
ला आआआ ल भाजलेला रवा घ्यायचा. तो असतोच घरी कायम. भाजलेला असला तरीही कढईत जरा गरम होउ द्यायचा.

तोवर बारीइइइक चिरलेली तिखट हि. मिरची व मिठ पोळपाटावर तर कढिपत्ता हातानेच चुरून घ्यायचा. तीळ व ओवाही लाटण्यानं जरास्से दुखवून घ्यायचे. पदार्थ जरा जुना असला ना, तरी असं केल्यानं त्याची अंगची चव जरा सुधारते.

एकीकडे दुसर्‍या गॅसवर ३ वाट्या पाणी उकळायला ठेवायचं

मग तेलाची फोडणी करायची. मोहोरी व थोडे जिरे, अर्धा चमचा हिंग, तीळ व ओवा असे घालून फोडणी करायची. हळद फार नाही घालायची. जर्द पिवळ्या रंगाचा सांजा चांगला दिसत नाही. हळद जरा बेतानंच घालायची, कढीपत्ता, आलं, मिरची तेही फोडणीत जरा चरचरीत होईतो परतायचे व वरून फोडणीत २ वाट्या गरम पाणी घालायचं. चांगलं खळखळून उकळलं की मग साखर व मिठ जरा चढंच घालायचं. पाण्याची चव बघायची. आणि मग एका कड असलेल्या पातेल्यात रवा भरून एका धारेत एका हातानं रवा फोडणीतल्या उकळत्या पाण्यात ओतायचा व दुसर्या हाताने ढवळायचं. आयत्या वेळेस सांजा कोरडा वाटला तर अजून थोडं गरम पाणी घालायचं आणि झाकण ठेवून द्यायचं. ३-४ मिनिटांनी एक दणदणीत वाफ आली की झाकण काढून त्यात एक चमचाभर तूप घालायचे ( वरून तूप घातले की पदार्थ चमकतो), १ आख्खे लिंबू पिळायचे व लगेचच गॅस बंद करून सांजा दूसर्‍या वाढायच्या पातेल्यात काढून ठेवायचा. लिंबाने लोखंडातला पदार्थ कळकतो त्यामुळे ही काळजी घ्यायची. मग सांज्यावर कोथिंबीर व किसलेले खोबरे शिवरायचे. बरोबर खायला मिरगुंडं तळून द्यायची.

आंबट, गोड, तिखट व मिठ ह्या सर्व चवी बरोब्बर साधल्या की हे अद्भुत रसायन तयार होते.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगो मस्त जमलाय. कधीकधी नवसुगरणींना मनापासून सांगावेसे वाटते की घरातल्या वडिलधार्‍यांकडच्या रेसिप्या पटापटा शिकून घ्या. Happy मी देखील उशीरच केला शिकायला. बर्‍याच गोष्टी शिकायच्या राहून गेल्या आहेत त्याची चुटपुट लागून राहिली आहे.

माझी आजी पण अस्साच करायची.
>>> १ आख्खे लिंबू पिळायचे व लगेचच गॅस बंद करून सांजा दूसर्‍या वाढायच्या पातेल्यात काढून ठेवायचा. लिंबाने लोखंडातला पदार्थ कळकतो त्यामुळे ही काळजी घ्यायची. ---> एकदम बरोब्बर बारकाइचे नमूद.

साखर टाकल्याबद्दल निषेध.. साखरेने मूळ घटकाण्च्या चवीवर आक्रमन होते. तसेच टोम्याटो ने देखील

साखर नाही घातली तर तो जनसेवासारखा नाही लागणार. जनसेवाचा उपमा म्हणजे पहिला घास घेताना पहिलटकरांना आपण चुकून शिरा तर नाही ना मागवला असं वाटावं इतका गोड असे. पण बरोबरीनं आंबट, खारट आणि इतर चवी आल्या की तो गोडपणाही भारी वाटे.

विष्णू मनोहर तर अगदीच चोर निघाला की! निदान क्रेडिट तरी द्यायला हवं होतं. मायबोलीची यावर काय भूमिका असते जनरल/?

मी पण साखर घालत नाही. सध्या मटार टोमॅटो घालून बनवत आहे आक्षी पाच मिनिटात होतो. व पोटभरीचा गरम गरम.

Pages