पणजी आज्जीच्या रेसिपिज - तिखटा-मिठाचा सांजा, जनसेवा स्टाईल (फोटोसकट)

Submitted by मेधावि on 18 February, 2016 - 08:39

sanja (2)-min.jpgही पण अगदी साधी व सोपीच रेसिपी. पण जुन्या पुण्यात व जुन्याच पुणेकरांमधे अतिप्रिय. जनसेवात मिळायचा हा सांजा, तेव्हा चवीढवीचे जे. ना येऊन मजेत खाताना दिसायचे. दुर्दैवाने जनसेवा आता बंद झाले.

पण आमच्या आज्जींची व त्यांची चव अगदी सेम.

साधारणत: खूप मोठ्या पावसाच्या आळशी संध्याकाळी,आजारी व तोंडाला चव नसलेल्या नातवंडांना खाउ घालायचा पदार्थ. अतिशय कमी सामानात चविष्ट व पटकन होणारा पदार्थ.

साहित्य -
बाआआआ री इ इ इ क रवा १ वाटी, हो, त्याशिवाय हवा तस्स्सा रेशमी पोत येत नाही सांज्याला.
कढिपत्ता - ताजा १ टाळं- हिरवी पाने असलेला. काळी पाने नकोतच.
कोथिंबीर - मूठभर- हिरवी गाआआर हवी शक्यतो.
गोडं तेल
मोहोरी, घरचा हिंग, हळद,
सुके खोबरे किसणीवर किसलेले - जरास्से वरून शिवरायला
लिंबू १-२
किसलेले आले १ चमचा
जिरं, १ हिरवी तिखट मिरची
उगीच आपला नावाला - घातला न घातला असं - तीळ व ओवा ( चिमूट-चिमूट)
उकळलेले पाणी - ३ वाट्या.
साजूक तूप - १ मोठा चमचा.

हा पण लोखंडी कढईतच करायचा.
ला आआआ ल भाजलेला रवा घ्यायचा. तो असतोच घरी कायम. भाजलेला असला तरीही कढईत जरा गरम होउ द्यायचा.

तोवर बारीइइइक चिरलेली तिखट हि. मिरची व मिठ पोळपाटावर तर कढिपत्ता हातानेच चुरून घ्यायचा. तीळ व ओवाही लाटण्यानं जरास्से दुखवून घ्यायचे. पदार्थ जरा जुना असला ना, तरी असं केल्यानं त्याची अंगची चव जरा सुधारते.

एकीकडे दुसर्‍या गॅसवर ३ वाट्या पाणी उकळायला ठेवायचं

मग तेलाची फोडणी करायची. मोहोरी व थोडे जिरे, अर्धा चमचा हिंग, तीळ व ओवा असे घालून फोडणी करायची. हळद फार नाही घालायची. जर्द पिवळ्या रंगाचा सांजा चांगला दिसत नाही. हळद जरा बेतानंच घालायची, कढीपत्ता, आलं, मिरची तेही फोडणीत जरा चरचरीत होईतो परतायचे व वरून फोडणीत २ वाट्या गरम पाणी घालायचं. चांगलं खळखळून उकळलं की मग साखर व मिठ जरा चढंच घालायचं. पाण्याची चव बघायची. आणि मग एका कड असलेल्या पातेल्यात रवा भरून एका धारेत एका हातानं रवा फोडणीतल्या उकळत्या पाण्यात ओतायचा व दुसर्या हाताने ढवळायचं. आयत्या वेळेस सांजा कोरडा वाटला तर अजून थोडं गरम पाणी घालायचं आणि झाकण ठेवून द्यायचं. ३-४ मिनिटांनी एक दणदणीत वाफ आली की झाकण काढून त्यात एक चमचाभर तूप घालायचे ( वरून तूप घातले की पदार्थ चमकतो), १ आख्खे लिंबू पिळायचे व लगेचच गॅस बंद करून सांजा दूसर्‍या वाढायच्या पातेल्यात काढून ठेवायचा. लिंबाने लोखंडातला पदार्थ कळकतो त्यामुळे ही काळजी घ्यायची. मग सांज्यावर कोथिंबीर व किसलेले खोबरे शिवरायचे. बरोबर खायला मिरगुंडं तळून द्यायची.

आंबट, गोड, तिखट व मिठ ह्या सर्व चवी बरोब्बर साधल्या की हे अद्भुत रसायन तयार होते.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Barr

अवनी Blush

सविस्तर पाककृतीसाठी अत्यंत आभारी आहे. इथे फोटो टाकता येत नाहीये, पण मी शनिवारी करुन पाहिला हा सांजा .
उत्तम चव आली होती.

खूप खूप धन्यवाद. लोखंडी कढईत केल्याने खरंच फरक वाटला चवीत.

अशा मऊसूत सांज्याच्या फार दिवस (वर्षं) शोधात होते. तुमच्या मुळे हा भाग्ययोग आला. Happy

आमच्याकडे तर सणावाराला गावाहून आलेली लोकं जमली घरची आणि कांदालसूण खायचा नसेल तर हा सांजा असतोच.

आमच्याकडे तर सणावाराला गावाहून आलेली लोकं जमली घरची आणि कांदालसूण खायचा नसेल तर हा सांजा असतोच.>> म्हणजे कांदालसूण हा एक फरक आहे उपम्यात आणि सांज्यात? कारण मी उपम्यात कांदा आणि (आल-लसूण पेस्ट) वापरतो.

दुर्दैवाने जनसेवा आता बंद झाले. >>>> डेक्कनवर आहे ना चालु जनसेवा संभाजीपुतळ्याजवळ. नुकतीच जेवलेय तिथल..

३-४ मिनिटांनी एक दणदणीत वाफ आली की >>> माझ्या माहेरचा शब्दप्रयोग आणि रेसिपी पण तिकडचीच. साबा पूर्वी करायच्या पण आमचे चुलत सासरे त्याला आमटीतल उप्पीट म्हणुन चिडवायचे. मग त्यांच्या साबांनी त्यांना वेगळ्या पद्धतीने शिकवला आता त्या तसा करतात.

डेक्कनवर आहे ना चालु जनसेवा >> ते जनसेवा वेगळं. तिथे थाळी मिळते. लक्ष्मी रस्त्यावर जनसेवा दुग्धालय असं दुकान होतं, ते उपहारगृह होतं. मोजकेच पण उत्तम महाराष्ट्रीयन पदार्थ इथे मिळायचे. आता त्याच जागी वामन हरी पेठेंचं दुकान सुरू झालं आहे.

ऑथेंटिक रेसिपी. आई, सासूबाई कशाला, मीही अगदी अशीच करते. यात दाणेही घालते. आलं आणि लिंबाचा स्वाद मस्त येतो याला.

पण या तिखटमीठाच्या सांज्यापेक्षा उपमा अधिक आवडतो Happy

मॅगी, ते नजरेतून सुटले माझ्या. Happy

अमित, भा.रा. तांब्यांनी व्याकरणात चुक केली. 'तिन्हीसांजा सखे मिळाल्या' च्या ऐवजी 'तिन्ही सांजा सखे मिळाला' असे हवे होते ते. Wink

मेधे कधी येऊ खायला? Happy
तु माझ्या घरी केलेल्या उपम्यात वाटिभर ताक घातलं होतंस.

जनसेवा दुग्धालय - साखि, साव, खरवस, आंबावडी, दूध तर होतेच, सगळेच सुंदर चवीला.
खिचडी संपली, असा बोर्ड लावायचे सुरुवातीला आणि नंतर फक्त सोमवार गुरुवार शनिवार संपेपर्यंत असा काहीसा बोर्ड लावायचे.

काय मस्त लिहिलं आहे.

करुन बघणार आहे लवकरच. चिमूटभर तीळ, ओवा आणि सुकं खोबरं हे घटक उपम्यात खाल्ले नाहीयेत. त्याची चव इमॅजिन करुन छान वाटतंय.

हायला माधव खरंच की!!!
ते गाणं सांजा मिळाल्यावर प्रियकर तो कसा हृदयाला जीवे अधिक हवाय ते सांगतोय. पुढेही बघा की, 'कनकगोल हा' म्हणजे गोल दाणेदार मोहोरी आणि 'मरीचिमाली' म्हणजे मिरची मारून 'जोडी जो सुयशा' म्हणजे असा तिन्ही गोष्टी घालून सांजा केला (इथे शेल्षही आहे बरंका) की त्यात यश हे आलंच म्हणून समजा.
पुढेही रस जसा द्राक्षात, पाणी जसे मोत्यात इ. मधून त्यात साखर, पाणी त्याचं प्रमाण सगळं सगळं सांगितलं आहे. द्राक्षासवाबरोबर घ्यावा असाही गर्भितार्थ आहेच. वा वा.
तांबे माफी करा. (इतके दिवस हे समजलंच नाही म्हणून)

लिहीण्याची पद्धत एकदम आवडली. आजीच्या तोंडून रेसीपी ऐकतेय असंच वाटलं. Happy काल रेसीपी वाचल्यावर लक्षात आलं की कित्येक दिवसात सांजा केला नाहीये. लगेच घरी गेल्यावर करून खाल्ला. Happy
पूनम म्हणाली तसं मी पण दाणे घालून केला.

जसा आहे तसा केला फक्त मीठ चढं घाला ही टीप फॉलो केली नाही. ती केली असती तर अजून छान झाला असता.
पुढच्या वेळी आणखी नीट वाचून कुठेही लक्ष न देता केला पाहिजे. Happy

एंजॉय.

Saanja.jpg

हो सांजा छानच दिसतोय .. Happy

पण मला वाटलं होतं की ही रेसिपी मऊसूत, ओल्या उपम्याची/सांज्याची असेल .. वेका, तुझा सांजा छानपैकी खमंग भाजून जरा मोकळा मोकळा दिसतो आहे ..

क्वेरी क्विन आत्ता आठवलं मी शेवटचं तूप घालायला (भुकेमुळे) विसरले आहे. लिहिलं आहे नं वरती की पुढच्या वेळी कुठेही लक्ष देणार नाही Wink

आभार्स मेधावि पुन्हा एकदा ही रेस्पि माझ्यापर्यंत पोहोचवल्याबद्द्ल. मला आठवत पण नाही मी या चवीचा सांजा खाल्ला आहे का? आमच्याकडे अशा नाश्ता आयट्म्स मध्ये कांदा आणि भाज्यांमध्ये बटाटा घालून वाढवावाढवी केली नाही तर फाउल असावा Proud

हल्लीच्या हल्ली हा सांजा दोनदा करुन पाहिला. मुलीला उपमा अज्ज्जाबात आवडत नाही पण ह्या सांज्याचा पहिला घास तोंडात जाताच मान हलवुन म्हणाली 'शाळेत अगदी अस्साच उपमा मिळायचा'. पदार्थ तिच्या शाळेत मिळायचा तसा झाला म्हणजे पदार्थ चांगला झाल्याचे शिक्कामोर्तब झाले Happy बाकी तिला खाण्याशी मतलब, सांजा, उपमा, उप्पीट हवे ते मह्णा, तिला फरक पडत नाही. मी हा सांजाच असे ठासुन सांगितले.

खुप खुप आभार पणजी आज्जीची रेसिपी आवर्जुन इथे दिल्याबद्दल.

करायला पाहिजे.

कित्येक वेळा नुसते माय्बोलीवर पदार्थ आलेत पाहूनच अगदी विस्मरणात गेलेले पदार्थ केले जातात.

बरीच मोठी लिस्टाहे.

मउ लुसलुशीत सांजा आजीच्या हाताचा मिळणं हे नशीबच आहे तुमचं.

खूप वर्षे झाली हा खावून. आठवतही नाही चव. आता फक्त उपमाच करतो चणाडाळ व उडीदडाळ घालून. Happy

डी, ही सुचना बघ. मी हाच रंग असेल अशी कल्पना करत होते.
>> हळद फार नाही घालायची. जर्द पिवळ्या रंगाचा सांजा चांगला दिसत नाही. हळद जरा बेतानंच घालायची,

बीराव, गुड कँच Happy कुणीतरी भारतीय मातीच्या वाडग्यातला फोटु टाका बरं Happy

मेधावि, धन्यवाद ह्या रेसिपीबद्दल. फार मस्त होतो. शाळेतले चटपटीत जेवण जेवायला सरावलेल्या माझ्या मुलाला हल्ली आपले साधे पदार्थ आवडेनासे झालेत. आज नाश्त्याला काय करु असे विचारल्यावर त्याने तो त्या दिवशीचा उपमा कर असं सांगितलं चक्क Happy

IMG_20160313_104532_1459573824795.jpg

Pages