ही काही गोष्ट असू शकत नाही...

Submitted by संप्रति१ on 25 December, 2022 - 02:18

त्याचं झालं असं की कालपरवाकडे एकीने 'एक्सक्युज मी अंकल' म्हणून माझा अपमान केला. मी पण 'बोला मावशी' म्हणून परतफेड केली. त्यावेळी मी चेहऱ्यावर नेहमीचंच भंपक हाफ-स्माईल धारण केलेलं. त्यामुळे ती हसायला लागली. अपमान परिणामकारक झाला नसावा, असं मला वाटलं.
पत्ता शोधत होती बाय द वे.

"एफसी रोडला कुठून जायचं काका ?" तिनं पुन्हा एकदा
अपमान केला.. ह्यावेळी ठरवून. आणि मातृभाषेतून..!

"आता ह्या वयात एफसी रोडला जाऊन काय करणार मावशी तुम्ही??" मी जवाबी हमला केला.

ह्यावर काहीतरी पुटपुटत ती निघून गेली. 'चावट आहे म्हातारा' वगैरे काहीतरी बोलली असणार. पण मी काही हरकत घेतली नाही. कारण नंतर मला ताबडतोब मोफत वाचनालयाकडं जायचं होतं. तिथं फुकट वर्तमानपत्रं वाचायला मिळतात. दिवसभर बसून मला सगळी वर्तमानपत्रं पाठ करायची असतात. नाहीतर मग रात्री करमत नाही. आणि आता ह्या वयात रात्री दुसरंही काही करता येत नाही.
परंतु हे सगळं आता चालायचंच म्हणा. हे असं काठी टेकत टेकत हळूहळू जायचं म्हटल्यावर फारच वेळ वाया जातो. वाढत्या वयाला काही इलाज नाही आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या दुःखांनाही इलाज नाही. व्याधिपि दु:खम्.. जरापि दु:खम्.. मरणमपि दु:खम् .. दु:खमपि दु:खम्..!

तर अलीकडे रोज जातायेता चौकात हा एक नवीन फ्लेक्स दिसतो. त्यावर क्रुद्ध मुद्रेत तलवार धरलेली एक ऐतिहासिक स्री. कुठल्या तरी सिरीयलची जाहिरात आहे. ही घनघोर मेकअपवाली आणि दागिन्यांनी लगडलेली अभिनेत्री. कायम घुश्शातच असते. क्रोध प्रकट करण्याच्या नावाखाली हिचं बेगडी सौंदर्यच उठून दिसेल, अशा पद्धतीने केलेलं फोटोशूट..! एकाच आरपार ओलसर नजरेत समोरच्या पुरुषाला तोलणारी, त्याला स्वतःबद्दल चांगलं वाटायला लावणारी, स्मिता पाटील हिला माहिती असण्याचं कारण नाही.

तुम्ही म्हणाल की तुम्ही निराशावादी आहात काय? तुम्ही सांप्रतकाळाबद्दल नाराज आहात काय? ऐंशीचं दशक पुन्हा
माघारी येणार नाही, म्हणून तुम्ही मनापासून खट्टू आहात काय?
तर नाही. तसं नाही. मी काही नेहमीच असा नसतो. मी बरंवाईट वेडंवाकडं वाचत राहतो. तो माझा पिंड आहे. पिंड म्हणजे आता कसं सांगायचं..!! ती शंकराची पिंड असते ना, ती नव्हे. पिंड म्हणजे स्वभावधर्म. पॅशन.
हल्लीची तरूण मुलं मुली चांगलं लिहितात. आमच्याकाळी तसं नव्हतं.
दोन-चार सन्माननीय अपवाद सोडले तर बाकीच्या मराठी लेखिका महाबोअरिंग काहीतरी लिहितात, असं एक माझं जुनंच मत आहे.

'आता हे लिहिलं नाही तर जीव जाईल', अशा आंतरिक मजबूरीची काही भानगड नसायची त्यावेळी..!
आणि ठोस भूमिका असणं, त्यापाठी जबरदस्त वाचनाची धार असणं, भाषेच्या सघन डोलाव्यावर डोलता येणं, वैयक्तिक अनुभव समुहाला नेऊन भिडवणं, असलंही फार काही सापडायचं नाही..!

त्यांना हौस असायची. परिस्थितीही बऱ्यापैकी टकाटक असायची. आणि बाई म्हटल्यावर भरमसाट बोलायची सवयही असायची..! त्यामुळे लिहायला बसल्या की त्यांना थोडक्यात आवरता यायचं नाही..!
मग शहरी बायकांच्या चाकोरीबद्ध सुख-दु:खांची रांगोळी..! कसं मी कित्ती कित्ती सोसलंय आयुष्यात..! आणि कसा मला समजून घेणाराच कुणी भेटला नाही..! तरीही कसं मी आयुष्य कृतार्थपणे जगले अशा स्वरूपाच्या मध्यमवर्गीय भाकडकथा..!! वाचा आणि बेशुद्ध पडा..!

तेव्हापासूनच हुरहूर, काहूर, हळहळ, विरह, बावरी, कळी खुलणे, स्मितहास्य, जिवाभावाचा सखा अशा शब्दांचा मी धसका घेतला आहे..! ह्यातला एखादा शब्द दिसला तरी मी घाबरून बंदच करून टाकतो पुस्तक..!
अर्थात ही सगळी माझी खाजगीच मत असल्यामुळे काहींनी लगेच उभं राहून टाळ्या वाजवाव्या, किंवा इतरांनी लगेच हा कुणीतरी स्रीद्वेष्टा भामटा मनुष्य दिसतोय असा निकाल लावावा, ह्याची तशी काई जरोर नाही..!
कारण आता आपल्याला धक्का देणारं मराठीत काही लिहिलं गेलेलं नसेल, असं आपण धरून चाललेलो असतो. तेवढ्यात तो गैरसमज कुणीतरी दूर करतं. वाचणाऱ्याचं हे असं होतच असतं.
माझ्याही वरच्या खाजगी मतांनाही इतक्यातच एका लेखिकेने जबरदस्त धक्का दिलेला आहे..! आणि हे कबूल करताना मला बिलकुल किंतु परंतु वाटत नाही..!
'मनस्विनी लता रवींद्र' ह्या लेखिकेचा 'हलते डुलते झुमके' म्हणून एक कथासंग्रह आहे..! एकेक कथा कोरून कोरून काढली गेलेली आहे. सभोवतालची दृश्यं स्वतःत मस्तपैकी मुरवणं, माणसांची मनं ॲबसॉर्ब करणं हिला चांगलं जमलेलं आहे. एकतर तिच्याकडं सांगण्यासारखं खूप आहे. शिवाय सांगण्याची शैलीही अगदी कानांजवळ गुणगुणल्यासारखी आहे. आणि महत्वाचं म्हणजे भावनांचं वहन कसं करायचं हे तिला बरोब्बर समजलेलं आहे..!

राही अनिल बर्वे हे असेच अजून एक.
त्यांची 'आदिमायेचे' नावाची एक कादंबरी आहे. फारच मानसिक हिंदकळीतून जात लिहिली गेलेली असणार.
म्हणजे आयुष्यात काय चव बीव नसते, असं वाटायला लागलेलं असतं कधीतरी..! आणि त्यात हे असलं काही वाचलं की आपण पुन्हा चार दिवस भवतालापासून बाद होऊन बसतो.

तर ह्यात तरंग म्हणून एक मुख्य पात्र आहे. त्याच्या नजरेतून घटना, आठवणी, प्रसंगांचं सरकतं जाळं उभं केलं आहे. अर्थात, ते तेवढंच नाही. कादंबरीत काही सनकी स्त्री पुरुष आहेत, आतल्या आत कायमची गोठून बसलेली लहान मुलं आहेत, फ्रस्टेटेड म्हातारे कम्युनिस्ट आहेत..! त्यांचं आयुष्यभर साचून राहिलेलं, कुरवाळलेलं ॲक्यूट डिप्रेशन, शिवाय सूडाची धग, त्यातून बेसुमार व्यसनं..! त्यामुळे ही पात्रं कधी काय करतील ह्याचा नेम नाही..!
लेखक तरूण आहे. त्यामुळे भाषा जालीम आहे. पण शंभर टक्के ओरिजनल आहे. एवढ्या कोरडेपणाने आणि एवढ्या कमी शब्दांत क्रोर्य, हिंसा, वैफल्य पोचवणं म्हणजे मानलं पाहिजे.
राही अनिल बर्वे हे 'तुंबाड' या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत, एवढी एकच ओळख सांगितली तर पुरे..!

असं मी आणखीही लिहू शकतो. किंवा त्या माध्यमातून तुम्हाला बोअर करू शकतो. म्हातारा असल्यामुळे मी बोअर करण्याची अफाट ताकद बाळगून आहे. परंतु आता मला खरंच निघावं लागेल. मोफत वाचनालय बंद व्हायची वेळ झाली आहे. शिवाय उशीर झाला की घरी म्हातारी फार आरडाओरडा करते.. आणि काठी टेकत टेकत जायला वेळ फार लागतो, हे वरती सांगून झालंच आहे. बाकी 'ही असली काही गोष्ट असू शकत नाही', असा ठराव तुम्ही मांडलात तर त्यास माझं अनुमोदनच असेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

असं मी आणखीही लिहू शकतो. किंवा त्या माध्यमातून तुम्हाला बोअर करू शकतो. म्हातारा असल्यामुळे मी बोअर करण्याची अफाट ताकद बाळगून आहे. >>
म्हातार्‍या, बोअर कर पण शैलीचा ओव्हरडोस नको.
लिहीत जा अधून मधून Proud

हौसला अफजाई बद्दल वाचकांचे आभार.
तुमची दाद हेच ह्या वयात जीवाला सुख.
ढेरों आशिर्वादों के साथ.
- आपका हि. मा. (हिरवट माथारा)
Happy

आणि आता ह्या वयात रात्री दुसरंही काही करता येत नाही. >>>हा हा.. ईथे येत जायचे. मायबोली आपलीच आहे. तरणेताठेही पडीक असतात ईथे.. छान लिहिले आहे.. आवडले Happy