दिवस तुझे ते ऐकायचे....

Submitted by कुमार१ on 12 February, 2020 - 21:26

नमस्कार ! आज १३ फेब्रुवारी. आज एक विशेष ‘जागतिक दिन’ आहे. काय चमकलात ना? किंवा तुम्हाला असेही वाटले असेल, की हा माणूस लिहिताना एका दिवसाची चूक करतोय. कारण उद्याचा, म्हणजेच १४ फेब्रुवारीचा ‘प्रेमदिन’ सर्वांच्या परिचयाचा असतो. पण वाचकहो, मी चुकलेलो नाही. मी तुम्हाला आजच्या काहीशा अपरिचित विशेष दिनाचीच ओळख करून देत आहे.

हा दिन कुठल्याही व्यक्तीसंबंधी किंवा नात्यासंबंधी नाही, हा कुठलाही उत्सव नाही. एखाद्या चळवळ, शारीरिक वा मानसिक दुर्बलता किंवा जागरुकतेसंबंधीही नाही. एखाद्या कटू स्मृतीबद्दल देखील नाही. जागतिक पातळीवरील न्याय, अन्याय किंवा शांतता यांचाही याच्याशी संबंध नाही. बर मग साहित्य, कला, क्रीडा किंवा पर्यावरण किंवा संशोधन यांचा तरी काही संबंध?

नाही !
मग, आहे तरी कसला हा दिन?
ठीक आहे, आता उत्सुकता अधिक ताणत नाही, सांगतोच....

तर १३ फेब्रुवारी हा ‘जागतिक रेडीओ दिन’ म्हणून साजरा केला जातो. टीव्हीच्या आगमनापूर्वी रेडीओ या श्राव्य माध्यमाने आपल्यावर अधिराज्य केले होते. किंबहुना तो आपला जीवनसाथी होता. आपल्यातील काहींचे संपूर्ण शालेय जीवन हे रेडीओच्याच संगतीने पार पडले आहे. तेव्हा त्यावरील शांत बातम्या, माहिती, निवेदने आणि करमणुकीचे विविध कार्यक्रम ऐकण्यासाठी आपले कान आसुसलेले असायचे. कुटुंबातील अनेकांच्या सकाळच्या आवरायच्या वेळा या रेडीओवरील कार्यक्रमांशी घट्ट निगडीत होत्या. सकाळी सातच्या बातम्या देणारा निवेदक हा तर सर्व श्रोत्यांच्या कुटुंबाचाच सदस्य मानला जाई ! कित्येक तरुण कुटुंबे ही विविध भारतीचा ‘बेला के फूल’ हा रात्रीचा गाण्यांचा कार्यक्रम ऐकल्यावरच झोपी जात. घरातील वा मनगटावरील घड्याळांच्या अचूक वेळा या ‘रेडिओ-टाइम’नुसार लावल्या जात ! अनेक व्यावसायिकांना आणि गृहिणींना आपले काम करता करता रेडीओची साथसोबत मोलाची वाटत असे; किंबहुना आजही वाटते.

पूर्वी रेडीओवर सादरीकरण करणाऱ्या अनेक कलाकारांना ‘रेडीओ-स्टार’ ही उपाधी आदराने लावली जात असे. तमाम भारतीयांना प्रिय असणाऱ्या क्रिकेट सामन्यांचे त्या काळचे रेडीओवरचे धावते समालोचन तर अगदी कान आणि मन लावून ऐकले जाई. इंग्लीश, हिंदी आणि मराठी अशा तिन्ही भाषांतले क्रिकेट समालोचक अगदी लोकप्रिय होते. संध्याकाळी ७.०५ चा सैनिक बांधवांसाठी असलेला ‘जयमाला’ हा गीतांचा कार्यक्रम म्हणजे तर आपल्या रेडीओची आजही शान आहे ! विविध भारतीवर दोन गाण्यांच्या दरम्यान ज्या मंजूळ जाहिराती ऐकवल्या जात त्यादेखील लोकांच्या अगदी ओठावर असायच्या. महत्वाचे म्हणजे या जाहिरातींनी कधी मुख्य कार्यक्रमावर कुरघोडी केली नाही.

Radio-philips-capella_hg.jpg

प्रसारमाध्यमांच्या इतिहासात डोकावता रेडिओने दीर्घकाळ आपले ‘युग’ गाजवले. त्यानंतर टीव्ही, संगणक आणि आंतरजाल अशी दृक्श्राव्य माध्यमांची प्रगती झाली आणि ती आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊन बसली. तरीसुद्धा आजही रेडीओवर प्रेम करणारे शौकीन बरेच आहेत. डोळ्यांना ताण नाही आणि आपले काम करतानाही तो एकीकडे ऐकता येणे, ही त्याची वैशिष्ट्ये खासच आहेत. आजच्या टीव्हीवरच्या झगमगाटाशी तुलना करता तर रेडीओची ‘शांत’ प्रवृत्ती अधिकच भावते. किंबहुना गेल्या दोन दशकांत रेडीओने देखील कात टाकून श्रोत्यांना अधिक आपलेसे केले आहे. अजून एक मुद्दा. अतिरिक्त टीव्ही अथवा जाल करमणुकीचे व्यसन हे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. रेडीओपासून मात्र तसा धोका नाही ! तो कितीही ऐका, मुळात त्याचे ‘व्यसन’ लागत नाही.

तर असे हे सुश्राव्य माध्यम विस्मरणात जाऊ नये म्हणूनच या विशेष जागतिक दिनाची संकल्पना पुढे आली. प्रथम ती २०११च्या ‘युनेस्को’च्या बैठकीत मांडली गेली. त्यानंतर २०१२ पासून दरवर्षी हा जागतिक दिन साजरा केला जातो. आता १३ फेब्रुवारी हाच दिनांक म्हणून का निवडला गेला? तर १३/२/१९४६ ला संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) आपली रेडीओ सेवा चालू केली होती, त्याची आठवण म्हणून.

तर अशा या आजच्या दिनी सार्वजनिक स्तरावर काही कार्यक्रम साजरे होतीलच. माझा हा धागा काढण्याचा उद्देश आता सांगतो.
सन २००५ मध्ये मी जुन्या माबोवर या विषयावर धागा काढला होता. आता त्याला १५ वर्षे झाली. या दरम्यान बरेच जुने सभासद इथून निघून गेलेले दिसतात आणि बऱ्याच नवीन लोकांचीही आता भर पडलेली आहे. तेव्हा ‘रेडीओची पुनर्भेट’ असे या धाग्याचे उद्दिष्ट आहे. जे सभासद ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्याजवळ गतायुष्यातील रेडीओच्या कार्यक्रमांच्या अनेक मधुर आठवणी असतील. त्यांची इथे उजळणी आपण करूयात. आजही आपल्यातील काहीजण दिवसाचे काही तास रेडीओ ऐकत असतील. पण आपण जरा पूर्वीच्या काळाचे स्मरणरंजन करूयात. विशेषतः तो काळ, जेव्हा ‘सरकारी रेडीओ’ हेच श्राव्य माध्यम लोकांसाठी उपलब्ध होते. त्याच्या जोडीला रेडीओ ऐकणाऱ्या इथल्या तरुण पिढीने आजच्या सरकारी आणि खाजगी रेडीओ वाहिन्यांबद्दलही लिहायला हरकत नाही.

आता थोडे ‘रेडीओ’ उपकरणांबद्दल. पूर्वी भला मोठा रेडीओ, मग ट्रांझिस्टर, खिशात मावणारा रेडीओ, रेडीओची संकेतस्थळे आणि आता मोबाईलमधले रेडीओ- अ‍ॅप अशी स्थित्यंतरे आपण पाहिली असतील. त्याच्या गमतीजमती देखील लिहा. फार पूर्वी व्हाल्वचा रेडीओ नीट ऐकू येण्यासाठी त्याची एरीअल घरातून गच्चीत सोडावी लागत असे. कोणे एके काळी रेडीओ ऐकण्यासाठी सशुल्क सरकारी परवाना काढावा लागत असे. तसेच त्याचे वार्षिक नूतनीकरणही पोस्टात जाऊन करावे लागे. हे ऐकून आताच्या तरुणांना चक्क हसू येईल ! माझ्या आठवणीनुसार तो परवाना १९८० –८२ दरम्यान मा. वसंत साठे हे केंद्रीय नभोवाणी मंत्री असताना रद्द करण्यात आला होता (चू भू दे घे). त्यानंतर खऱ्या अर्थाने रेडीओ-सेवा ही जनतेसाठी ‘फुकट’ उपलब्ध झाली.
....
तर असा आहे या धाग्याचा उद्देश. यावर मोठा लेख मी एकट्याने लिहिण्यापेक्षा आपण सर्वजण मिळून या आठवणी जागवूयात. ते खरे स्मरणरंजन असेल.
याचबरोबर या ‘आकाशवाणी’ वरील माझे निवेदन संपले ! आता तुमच्या आठवणी आणि प्रतिसादांचे स्वागत.
*********************************************

.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हवामेहेल चा अजुन कुणीच >>>> हवामहेल ही आमची जेवणाची वेळ, मस्त निवांत गप्पा मारत जेवायचे आणि हवामहेल ऐकून उठायचे! रात्री बेला के फूल ऐकत झोपायचे, दुपारी काहीतरी असच जुन्या गाण्याचा कार्यक्रम असायचा ते ऐकत गप्पा, खेळ असे चालायचे.. सकाळी ७च्या बातम्या घरात म्हणजे शाळेला उशीर नक्की, त्या संस्कॄत बातम्या सुरु झाले की निचायचे आणि मराठी बातम्या संपेपर्यंत शाळेत पोहोचायचे.. अगदी सकाळी रस्त्यावर चालताना देखील बातम्या इए ऐकू येत असत इतक्या त्या घरोघरी लावल्या जात. रेडिओचे दिवस मस्त च होते.. अजुनही अधूनमधून ऐत कायला आवडते पण विविध भारतीच. आता रेडिओ सिलोन आहे का ?

अजून एक म्हणजे बी बी सी वरिल बातम्या आणि खेळाचे समालोचन! बी बी सी वर बातमीची खातरजमा केली जाई. इंदिरा गांधी गेल्याची बातमी मला आठवतेय लोकांनी बी बी सी वर ऐकली होती खात्री करण्यासाठी

कुमारजी तुमची लेखन शैली खुपच छान आहे.. नुसते मेडिकल क्षेत्रातीलच नाही तर हे असे अवांतर लेखन ही तुम्ही छान करता! तुम्हाला शुभेच्छा!

नीलाक्षी, धन्यवाद.
छान अनुभव आहेत तुमचे.

आता रेडिओ सिलोन आहे का ?
>>>
नंतर याचे नाव बदलले होते.
"श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन का विदेश विभाग" इथपर्यंत ऐकल्याचे आठवते.
सध्या काही कल्पना नाही

प्रख्यात निवेदक अमीन सायानी उद्या, २१ डिसेंबर २०२२ रोजी ९०व्या वर्षात पदार्पण करताहेत. त्या निमित्ताने त्यांच्यावरील विशेष लेख :
https://www.aksharnama.com/client/article_detail/6481

सुरुवातीला सायानी रेडिओच्या हिंदी निवेदकाच्या परीक्षेत चक्क अनुत्तीर्ण झाले होते! कारण त्यांची वाचनाची शैली चांगली होती, पण हिंदी उच्चारणात गुजराती आणि इंग्रजी भाषांचा प्रभाव होता...........
.......त्या वेळी आपण अमिताभला भेट नाकारली, याचा सायानींना खेद होतो. मात्र ‘‘जे झालं ते आमच्या दोघांसाठी चांगलंचं म्हणावं लागेल. अमिताभ रेडिओ निवेदक झाले असते, तर मी रस्त्यावर आलो असतो आणि सिनेरसिकांना महानायकाच्या अभिनयापासून वंचित राहावं लागलं असतं’’, असं त्यांनी म्हणून ठेवलंय!

भारीच !
त्यांना शुभेच्छा !

सारेगमच्या कारवां मध्ये अमीन सायानींची गीतमाला हे एक वेगळं चॅनेल आहे. त्यात गीतमालेच्या आठवणींसोबत त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व्यक्तींच्या घेतलेल्या मुलाखतीही आहेत. अमिताभचीही आहे. त्यात अमिताभने आपल्याला ऑल इंडिया रेडियोने नाकारल्याचा उल्लेख आहे. पण आपण सायानींना भेटायला गेलो होतो आणि त्यांनी भेट नाकारली हे आलेलं नाही. कदाचित दोघांसाठीही ती बाब अवघड वाटेल अशी असल्याने आली नसावी.

तुम्ही सारेगम कारवाँ घ्या. आवडेल तुम्हांला. लता आणि मीनाकुमारी मुलाखतींत वाचून दाखवावं तसं एकदम नीटस बोलल्यात.
अमीन सायानी एस कुमार्स का फिल्मी मुकदमाही चालवायचे. त्यात आणि मुलाखतीत किशोरकुमारने त्यांना गप्पच केलंय. अर्थात कारवाँ मध्ये त्यातले अंश आहेत.

क्रिकेटप्रमाणेच कबड्डी, खो-खो, टेबल टेनिस आदी खेळांचे आकाशवाणीवरील मराठीतील प्रभावी धावते समालोचन करणारे पत्रकार वि. वि. करमरकर यांचे निधन.

https://www.loksatta.com/sampadkiya/features/article-about-marathi-sport...
आदरांजली !

सध्या सारेगम कारवांवर गीतमाला की छाँव में ऐकतोय. त्यात अमीन सायानी यांनी सांगितलं की ऑल इंडिया रेडियोवर हिंदी चित्रपट संगीताला बंदी घातली गेली होती. या बंदीचा फायदा सिलोन रेडियोने घेतला. बिनाका गीतमाला ही सिलोन रेडियोचाच कार्यक्रम.

भरत,
ती बातमी वाचून खरंच गंमत वाटली ! कालानुरूप झालेला बदल आपण पाहतोच आहोत.

अच्छा! म्हणून ते सिलोनवर लागायचं होय! तसंच ऑ इं रेडियोने एकेकाळी हार्मोनियमवर बंदी घातली होती. शास्त्रीय गायनाला सहसा सारंगीचीच साथ असे. अनेक वर्षांच्या लढ्यानंतर हार्मोनियमवादक रेडियोवर येण्यात यशस्वी झाले.

Pages