दिवाळी.. आकाशकंदील..आठवणी...

Submitted by Prashant Mathkar on 10 November, 2022 - 10:39
ठिकाण/पत्ता: 
अथर्व सोसाइटी, गोरेगाव पूर्व, मुंबई 400065 <strong></strong>

दिवाळी.. आकाशकंदील..आठवणी...

दर दिवाळीच्या आधी आठ पंधरा दिवस बाजारात दिसणारे आकाशकंदिल आणि ते घेण्यासाठी उडालेल्या गर्दीत बच्चे कंपनीचा भरणा पाहून मला माझ्या लहानपणीचे गावचे दिवाळीअगोदरचे दिवस आठवतात. त्या काळात सहसा विकतचा आकाशकंदिल घरात येत नसे. आकाशकंदिल घरीच बनत आणि घरातील आणि शेजारपाजारातील बच्चे कंपनीकडे ते बनवण्याच कंत्राट असे.
माझ्या सावंतवाडीच्या घरी मी आणि शेजारच्या चार-पाच घरातले सात आठ सवंगडी असा आमचा कंपू होता. दिवाळीआधी महिनाभर कंदिल बनवायच्या तयारीला सुरवात व्हायची. आमच्या खळ्यात (अंगणात) घरमालकांच एक छोटस औदुंबराच मंदिर होत. ती आमची कंदिल बनवायची जागा. या दिवसांत तिथे आमचंच राज्य. प्रत्येकाची तिथली जागा निश्चित आणि सर्वांचा डेरा दिवसभर तिथेच. शाळेच्या सुट्टीच्या दिवशी सकाळी लौकर आंघोळ, नाश्ता करून सर्व मंडळी आपली आयुधं घेऊन तिथे जमा व्हायची ती संध्याकाळी काळोख पडेपर्यंत. फक्त जेवण आणि चहासाठी हलायच तेही घरच्यांचा ओरडा झाल्यावरच.
कंदीलासाठी लागणारा सर्वात महत्वाचा कच्चा माल म्हणजे हिरवा बांबू. असे दोन तरी बांबू आम्हाला लागायचे. सावंतवाडीच्या जवळ म्हणजे दोन एक मैलांवर रहाणाऱ्या शेजाऱ्यांच्या नातेवाईकांच्या जागेत बांबूच बेट होत. त्यांच्याकडून कंदिलांसाठी बांबू आणण हा मोठा कार्यक्रम असायचा. अख्खे बांबू दोन मैल रस्त्यावरून ओढत आणण्यात मोठ थ्रिल असायच. सकाळी सात वाजताच आमची कंपनी तयार होऊन बाहेर पडायची. मोठ्या मुलांकडे नेतृत्व असायच. साडे आठ नऊ पर्यन्त तिथे पोचल्यावर पहिल्यांदा त्या मावशी सगळ्या बच्चे कंपनीला अल्पोपहार द्यायच्या आणि मग काका आम्हाला हवे ते बांबू तोडून द्यायचे. बांबू हाती पडले की आम्ही बालवीर विजयश्री मिळवल्याच्या थाटात घरी यायचो.
एके वर्षी मात्र गंमतच झाली. त्या वर्षी काही कारणाने आमच्या नेहमीच्या ठिकाणाहून बांबू मिळण्यासारखे नव्हते. त्यामुळे दुसरं ठिकाण शोधण गरजेच होत. तस घरातल्या मोठ्यांच्या हस्तक्षेपानंतर बांबू कुठूनही सहजपणे मिळाले असते. पण मग त्यात आम्हाला थ्रिल कसलं. आम्ही सर्व बच्चे कंपनीने हा प्रश्न आपल्या पद्धतीने सोडवायच ठरवल पण त्यासाठी निवडलेला मार्ग मात्र थोडा धोकादायक होता. आमच्या समोरच्या पांदणीत राहणाऱ्या गावातल्या एका प्रसिद्ध व्यक्तीच्या जागेत बांबुच बेट होत. तिथून गपचूप बांबू तोडून आणण्याच ठरल. सीनियर बच्चे कंपनीच्या मार्गदर्शनाखाली एका दुपारी जेवणानंतर थोडी सामसुम झाल्यावर आमची सेना या गुपचुप मोहिमेवर रवाना झाली. मोठ्या मंडळीची दुपारची डुलकी काढण्याची ती वेळ असल्याने पांदणीत सार काही शांत होत. दोन बांबू निवडून तोडायच मुख्य काम निर्विघ्न पार पडल आणि आता ते घेऊन आम्ही माघारीची वाट पकडणार तोच समोरुन खुद्द बांबूच्या बेटाचे मालकच येताना दिसले आणि सर्वांच्या तोंडच पाणीच पळाल. फत्ते झालेली मोहीम पलटायची वेळ आली. तोपर्यंत आम्हा चिल्लर मंडळीला तोफेच्या तोंडी देऊन आमच्या मोठ्या नेतृत्वाने पोबारा केला होता. आता मालकांच्या निशाण्यावर पहिला मीच होतो. ‘तू मठकरांचो मारे .. आणि माणगे कशाक आणि कोणाक ईचारून तोडलात रे..’ अशी प्रश्नांची सरबत्ती झाली आणि माझ्या मागच्या शिल्लक चिल्लर फौजेनेही धूम ठोकली. मालक माझ्या समोरच असल्याने मला पळायला वावच नव्हता. मग मी त्यांना घाबरत घाबरत ‘आमका कंदिलासाठी माणगे होये म्हणून तोडलोव’ अस उत्तर देऊन पुढच्या शिक्षेची वाट पहात उभा राहिलो. पण शिक्षेऐवजी जेव्हा त्यांचे ‘आता तोडलात तर जाया घेवन आणि बरेशे कंदिल बनवा’ हे त्यांच वाक्य कानी पडल तेव्हा लगेच दोन्ही बांबू घेऊन मी धूम ठोकली. तोपर्यंत बाकी पळपुटी सेनाही परत आली आणि आम्ही विजेत्याच्या थाटात आमच्या गढिवर म्हणजे देवळात परतलो. आता आमच्या सीनियर मंडळीत माझा भाव वधारला.
बांबू आले की ते तोडून त्याचे प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे योग्य आकाराचे तुकडे करण हे काम मोठ्या मुलांच. कंदिल चांगला बनण्यासाठी बांबूचे चांगले तुकडे मिळण खूप महत्वाच असे आणि त्यासाठी सीनियर मंडळीकडे वशिला लागे. ते मिळाले की मग त्यापासून आपल्या गरजे प्रमाणे कंदिल, चांदणीसाठी लागणाऱ्या काड्या बनवायच काम सुरू व्हायच. प्रत्येकाचा कमीत कमी एक कंदिल आणि एक चांदणी असे दहा बारा नग तरी बनायचे. काड्या कापून झाल्या की त्या तासून गुळगुळीत करून त्या बांधण्यासाठी खाचा पाडल्या जात. अशा सर्व काड्या तयार झाल्या की कंदिल बांधणीच्या कामाला सुरवात होई आणि हळू हळू एक एक सांगाडा तयार होत असे. चांदणी न तोडता फुगवण खूप नाजुक काम. जास्त ताणल तर काडी तुटण्याची शक्यता. मग लहान मंडळी मोठ्यांना मस्का मारून त्यांच्याकडून हे काम करून घेत. कंदिल विविध प्रकारचे..चौकोनी, षटकोनी, धावती चित्र दाखवणारे (कोकणात त्यांना रोवळीचे कंदिल म्हणत)..तशाच चांदण्याही लहान.. मोठ्या.
सांगाडे तयार झाले की पुढच काम त्यावर रंगीत कागदाचा साज चढवण. त्या आधी प्रत्येकाने आई वडिलांच्या मागे लागून रंगीत कागद पैदा केलेला असे. आमचा प्रिंटिंग प्रेसच असल्याने माझ्याकडे तर कागदाची खाणच होती. शिवाय प्रेसमध्ये मैदयाची चिकी (खळ) कायमच तयार असल्याने सगळ्याच्या कंदिलांच्या साजशृंगारासाठी लागेल ती खळ पुरवण्याच कंत्राट माझ्याकडे असे. कंदीलाच्या आकाराप्रमाणे कागद कापण हेही एक कौशल्यपूर्ण काम. त्यातही सिनियर्सची मदत होई. सर्व तयारी झाल्यावर कागद चिकटवण्याच काम. सांगाड्याला कागद चिकटवून झाले की चौकटीना बॉर्डर्स, कागदी फूलं, कंदिलाच्या वर खाली रंगीबेरंगी कागदी करंज्या या सारख्या आभूषणांनी एकएक कंदील, चांदणी नटवली जाई. पण कंदीलाला खरी शोभा आणणारा दागिना म्हणजे झुळझुळणाऱ्या रंगीबेरंगी शेपट्या. त्या चिकटवल्या की झाला कंदिल तयार.
सर्व कंदील, चांदण्या तयार झाल्या की आमच ते देऊळ म्हणजे कंदिलांचा एक रंगीबेरंगी कोलाजच होई. मग प्रत्येक घरची सीनियर मंडळी कंदिल पहायला येत आणि आपला अभिप्राय देत. कोणी आपला कंदिल चांगला झाला अस म्हटल की कृतकृत्य झाल्यासारख वाटे. आमच्यातली काही सीनियर मंडळी मोठे, जास्त कलाकुसरीचे कंदिल बनवत. त्यांच काम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चाले. दिवाळीच्या आदल्या रात्री सर्व कंदिल आणि चांदण्या घराच्या बाहेर लटकवण्याच, त्यात लाइट सोडण्याच काम चाले. खूप पूर्वी गावी घरी वीज आली नव्हती त्या काळात कंदीलात पणती लावली जाई. दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे कोंकणी भाषेत ‘चाव दिवस’, पहाटे उठून सर्वात आधी अंगणात प्रकाशमान झालेले आपले कंदील, चांदण्या पहाणं हीच आमच्यासाठी दिवाळी पहाट असे.
आता जमाना रेडिमेडचा. जा बाजारात आणि घ्या कंदील.. तोहि इंपोर्टेड.. चीनी बनावटीचा. दर वर्षी दिवाळी आली की माझ्या डोळ्यासमोर सावंतवाडीच आमच जून घर, ते औदुंबराच देऊळ, दिवाळी अगोदरचे ते मंतरलेले दिवस आणि स्वत:च्या हातानी बनवलेले ते आकाशकंदिल उभे रहातात. परत कंदिल बनवायची सुरसुरी येते आणि एखादे वर्षी योग्य सामान सहजी हाती लागल तर कंदिल बनतोही. यावर्षी आमची दिवाळी अमेरिकेत मुलीकडे. तिच्याकडच्या क्राफ्ट बॉक्स मध्ये काही काड्या आणि रंगीत कागद हाती लागला आणि त्यातून अमेरिकेत लेकीच्या घरी दिवाळीला छोटीशी चांदणी उगवली. (प्रशांत मठकर मोबाइल 9619036406)

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Thursday, November 10, 2022 - 10:28 to शनिवार, December 10, 2022 - 10:28
Group content visibility: 
Use group defaults

सर्व प्रथम मायबोलीवर स्वागत.

छान लिहिल्या आहेत आठवणी. मजा आली वाचताना. ह्या वर्षी केलेल्या कंदिलाचा फोटो इथे ही पाहायला आवडेल.

इथे मायबोलीकरांचे कंदिल बघायला मिळतील. कंदिल घरी करायला आवडणारे आपल्या सारखे अनेक जण आहेत हे वाचून छान ही वाटेल. पुढच्या वर्षी कंदिल करायला जास्त हुरूप येईल.

खूप छान लिहिलं आहे. फोटो हवाच.
चांदणीचा आणि षटकोनी, धावत्या चित्रांचा कंदील काड्यांपासून कसा करायचा तेपण लिहा ना.

मायबोलीवर स्वागत
त्याबरोबरच घरी आकाशकंदील करणाऱ्यांच्या गँगमधेही स्वागत. वरती मनीमोहोर ह्यांनी त्या धाग्याची लिंक दिली आहे.

अरे वाह छान आठवणी.
आम्हीही लहानपणी चाळीत असेच कंदील बनवायचो आणि सर्व चाळीत वाटायचो.
खळ हा शब्दही आज बरेच दिवसांनी ऐकला आणि हा मोठाला टोप डोळ्यासमोर आला Happy

बाई दवे,
लेखात पॅराग्राफ नाही आलेत. ते संपादन करून घेतले तर वाचायला सुटसुटीत होईल.