मोझाइक प्रवास

Submitted by अल्पना on 11 October, 2022 - 15:18

अशात मी काही मोझाइक केले. कोणतेही नविन आर्ट/ क्राफ्ट शिकले आणि केले की मी नेहमी मायबोली वर शेयर करत आले आहे. हे राहूनच गेलं होते.

१० -१२ वर्षांपूर्वी कधीतरी मी फेसबूक वर सिंगापूर ला राहणाऱ्या अंजली व्यंकट नावाच्या एका कलाकाराच्या काही कलाकृती बघितल्या. काचेच्या बाटल्यांना फरनेस मध्ये सपाट करून ट्रे बनवले होते तिने. Bottle slumping म्हणतात बहूतेक त्याला. अजूनही काचेच्या बऱ्याच कलाकृती होत्या तिच्या पेजवर. मला पण ते सगळेच शिकायची इच्छा झाली. पण त्यासाठी लागणारे सामान आणि अवजारे घेणं शक्यच नव्हते. प्रचंड खर्चिक काम आहे हे बघूनच कळलं होते. तरी मी तिच्याशी संपर्क साधून मला काचेसंदर्भात काही शिकता येईल का विचारले आणि तिने मला मोझाइक करून बघ असे सुचवले. पण त्यासाठी लागणारे टूल्स पण भारतात त्याकाळी कुठेही मिळत नव्हते.
५-६ वर्षांपूर्वी काहीतरी शोधताना मला mosaic India नावाची एक वेबसाईट आणि त्याच नावाचा फेसबुक ग्रूप सापडला. तिथे भारतातले या क्षेत्रातले बरेच कलाकार भेटले. तिथल्याच एका कलाकाराकडे मी एक अर्ध्या दिवसाचे वर्कशॉप केले. सिरॅमिक टाइल्स कट करायला थोडे शिकले पण परत जवळपास कुठे त्याचे टूल्स न मिळाल्याने पुढे काही केले नाही.

पण मोझाइक करायचेच हे मी अगदी पक्के ठरवले होते. आमच्या फेसबूक ग्रूप वरून काचेच्या टाइल्स आणि त्या कापायचे टूल्स विकणाऱ्या एका कंपनी चा पत्ता मिळाल्यावर मी थोडे सामान मागवून बघितले ३ वर्षांपूर्वी. पण मला धड कट करायला जमत नव्हते.

लॉक डाऊन मध्ये मी माझा पहिला मोझाइक प्रोजेक्ट केला. घरातल्या खराब झालेल्या नॉन स्टीक फ्रायपॅन वर हाफ फ्राय ऑमलेट. पण या प्रोजेक्ट मध्ये मी काचेच्या टाइल्स किंवा स्टेन ग्लास न वापरता घरातले जुने फुटके कप वापरले. सुरवातीला तर कपड्यात गुंडाळून कप बत्त्याने फोडले. आणि मग नंतर ते मोठे तुकडे wheeled nipper वापरून कट केले.

omlet.jpg

या वर्षी मे मध्ये मात्र मी कसेही करून प्रत्यक्ष कुणाकडे तरी शिकायचे ठरवले आणि माझे पहिले vitreous glass tiles mosaic पूर्ण झाले. या मोझाइक साठी माझेच एक पेंटिंग रेफेरन्स साठी घेतले आहे.

painting_mosaic.jpg

हा ग्राऊट करायच्या आधीचा फोटो -
Tray_ungrouted.jpgTray_mosaic_grouted.jpg
आणि हा नंतरचा. अजून ट्रे च्या बाजू रंगवायच्या राहिल्या आहेत.
माझे आई बाबांनी अशातच घराचे पूर्ण नूतनीकरण केले आहे. त्यांच्यासाठी घराचा नंबर मोझाइक मध्ये करायचा हे माझे मोझाइक लवकर शिकण्याचे महत्त्वाचे कारण होते. जून च्या सुट्टीत आई बाबांकडे जाताना मी माझे सगळे टूल्स आणि थोडया काचा घेवूनच गेले होते. लागणाऱ्या टाइल्स मात्र तिथे मागवून घेतल्या. उरलेल्या एका सिरॅमिक फरशी च्या मागच्या बाजूला हे मोझाइक केलं आहे. माझ्या मूळ डिझाईन मध्ये पांढऱ्या रंगात आकडे आणि काळे बॅकग्राऊंड इतकेच होते. पण बॅकग्राऊंड करायला सुरवात केल्यावर काळ्या टाइल्स कमी पडणार हे लक्षात आले. औरंगाबाद मध्ये कुठेच टाइल्स मिळाल्या नाहीत. ऑनलाइन मागवायला पुरेसा वेळ नव्हता म्हणून मग माझ्याकडे असलेल्या टाइल्स आणि स्टेन्ड ग्लास चे तुकडे वापरून डिझाईन बदलले थोडे.

हा ग्राउट करायच्या आधीचा फोटो.
house number.jpg

आणि हा नंतरचा
grouted house.jpg

गेल्या २-३ महिन्यात दोन छोटे प्रोजेक्ट केलेत ६"*६" चे.
abstract_mosaic.jpg
हे पहिले डिझाईन मायबोली वरच्या प्राजक्ता पाटवे च्या एका डिझाईन वरून इन्स्पायर होवून केलं आहे. मोझाइक मध्ये curve करून बघायचे होते मला.
आणि हा दुसरा ड्रॅगनफ्लाय गेल्या आठवड्यातच पूर्ण झालाय. dragonfly_mosaic.jpg

या दोन्ही मोझाइक चित्रांमध्ये अजून ग्राउट भरायचा राहिला आहे. दोन्ही साठी ग्रे ग्राउट वापरायचा विचार आहे माझा.
याच्या पुढची डिझाईन्स - एक पग चे पोट्रेट, एक छोटी कार आणि ख्रिसमस ट्री असे ठरवून सुरवात केली आहे. पूर्ण झाले की इथे दाखवेनच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम कलाकारी. पतंग आणि ते कर्व्हचं डीझाईन खूपच आवडलं. फुलाच्या मोझाइकमध्ये ग्राउट करायच्या आधीचा लूक खूप सुंदर आहे, दोन तुकड्यांमधल्या त्या काळसर जागांमुळे खूप मस्त वाटतय ते. अर्थात मा वै म आहे.

धन्यवाद.

Grouting is kind of hit or miss thing.
बऱ्याचदा योग्य ग्राऊट नसेल तर मोझाइक डल दिसते किंवा जास्त तुटक दिसते. पण त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे जर ग्राऊट योग्य नसेल तर त्यावर परत दुसऱ्या रंगाचा ग्राऊट वापरता येतो.
मला पण तो ट्रे सध्या थोडा डल वाटतोय. बघेन दुसरा रंग वरून वापरून काही दिवसांनी. अजून शिकतेय मी चुकत माकत.
पण हे करताना मजा येतेय. हल्ली डोक्यात फक्त मोझाइक असतात माझ्या.

खुप छान कलाकृती.
फुलाच्या मोझाइकमध्ये ग्राउट करायच्या आधीचा लूक खूप सुंदर आहे >>> मलाही असच वाटल

दोन टाइल्स च्या फटी मध्ये जो सिमेंट सारखा जिन्नस भरतात त्याला grout म्हणतात. बऱ्याच रंगांमध्ये मिळतो हा grout. हल्ली ट्रांस्परंट आणि एपॉक्सी grout पण मिळतात. मी वापरले किंवा बघितले नाहीत. मी आपले नेहेमीचे बाथरूम टाइल्स ना वापरतात तेच grout वापरते.

पेशन्स लागतो खूप. अजून मला स्टेन्ड ग्लास नीट कापता येत नाही. मी स्विमिंग पूल च्या टाइल्स असतात तश्या टाइल्स वापरते. त्या कापताना बोटे दुखतात कधीकधी. अगदी बारीक तुकडे करताना त्या टाइल्स टोचतात. जखमा होवू शकतात. शिवाय तोडताना ते तुकडे आणि काचेचा भुगा उडत असतो. म्हणून जरा जपून आणि काळजी घेवून करावे लागते. काम झाले की खोलीत कुठे तुकडे पडले तर नाहीत ना हे काळजी पूर्वक शोधावे लागते. मी माझ्या लेकाच्या बेडरूम मध्ये एका कोपऱ्यात टेबल ठेवून काम करतेय सध्या. सुरवातीला तुकडे खूप उडायचे काचेचे. रोज त्याच्या पलांगावरची चादर झटकून घ्यावी लागायची. तिथपर्यंत तुकडे उडायचे.
आता बराच कंट्रोल आलाय हातांवर. माझ्या टेबलावर आणि त्याच्या खाली थोडा भुगा उडतो फक्त काचेचा.

अच्छा.
सांभाळून काम करावं लागतं असणार हे तर नक्कीच.

सर्व कलाकृती खूप सुरेख झाल्या आहेत. मेहनतीचे काम आहे. वरून ग्लेझ करावे लागते का? पूर्वीच्या काळी काही टेरेस पक्षी गच्ची ची जमीन अशी केलेली असे. रोमन मोझाइक तर प्रसिद्ध आहेत. पाँपे शहरात पण अशी मोझाइक सापडली आहेत.

नाही अमा, याला ग्लेझ करायची गरज नाही. रंगीत काचांचे किंवा टाइल्स चे हव्या त्या आकाराचे तुकडे करायचे. डिझाईन मध्ये सुतारकडच्या फेविकॉल नी किंवा सिलिकॉन glue ने किंवा ardelite टाइप glue ने चिटकवायचे. जर टाइल्स च्या मध्ये जागा सोडली असेल तर सिमेंट टाईप grout त्यात भरायचा. बास्स. बाकी काही नाही.
रोमन मोझाइक खूप सुंदर असतात. आपल्याकडे पण हल्ली काही ठिकाणी पब्लिक स्पेस वर मोझाइक दिसायला लागले आहेत. आमच्याकडे करोल बाग मेट्रो स्टेशन च्या जवळच्या ४-५ मेट्रो पिलर वर आयामच्या शाळेने आणि त्यांच्याच संस्थेच्या दुसऱ्या शाळांनी छान मोझाइक केली आहेत.

सुरेखच. भिंतीतला एखादा भाग जरी असा मोझाइकने भरला तरी जागेला एकदम उठाव येइल व वेग ळे टेक्सचर शोभून दिसेल. मेन काम डिझाइन शोधून डोक्यात पक्के करणे आहे. रंगां चे सिलेक्षन. पुढची कारागिरी एकदम आनंददायी प्रोसेस.

खूप मेहनतीचं आणि किचकट काम वाटलं.
घराची नंबर प्लेट जास्त छान वाटली.
मी हा शब्द मोझेsक असा वाचत आलो म्हणून शोधलं . उच्चार मोझेयक असा ऐकू येतोय.
https://dictionary.cambridge.org/pronunciation/english/mosaic

खूपच सुंदर अल्पना! मला सर्वच आवडली. एकदम आकर्षक. ऑम्लेटचे तर एकदम क्रिएटीव् आहे. एखाद्या रेस्टाँरंटमध्ये शोभेल अगदी.
कुठला तुकडा कुठे लावायचा हे कसं ठरवायचं? आधी कागदावर कच्चे चित्र वगैरे करतेस का?

खूपच भारी आहे हे. मेहनतीचे काम आहे.

ऑम्लेट >>> मला आधी खरंच वाटलं

नंबर प्लेट आणि ते केशरी पिवळं खूपच मस्त झालंय.

आज सकाळी लिहिलेला एक जरा मोठा प्रतिसाद लिहून झाल्यावर चुकून डिलीट झाला.
सगळ्यांना खूप धन्यवाद.

हा शब्द मोझेsक असा वाचत आलो म्हणून शोधलं . उच्चार मोझेयक असा ऐकू येतोय>> मी मोझेक असा उच्चार ऐकला होता पण तरी का कोण जाणे नेहेमी मोझाइक असाच चुकीचा उच्चार करत आलेय.

घराची नंबरप्लेट मला पण खूप आवडली आहे. कुणाच्या मदतीशिवाय व्यवस्थित नीटनेटके एकटीने डिझाईन करून ७-८ दिवसांत बनवलेले पहिले काम आहे ते.

ऑम्लेटचे तर एकदम क्रिएटीव् आहे. एखाद्या रेस्टाँरंटमध्ये शोभेल अगदी.>>> मी माझ्या किचन मध्ये भिंतीवर लावले आहे.

कुठला तुकडा कुठे लावायचा हे कसं ठरवायचं? आधी कागदावर कच्चे चित्र वगैरे करतेस का?>> बरेचजण कच्चे चित्र करतात. फोटो चे रंगीत आणि ब्लॅक अँड व्हाइट फोटो घेतात. काहीजण खूप डिटेल मध्ये कच्चे चित्र काढून ठेवतात.
मी बहूतेक वेळा डायरेक्ट पेन्सिल ने चित्र काढते माझ्या बेस वर. टाइल्स चे किती लहान तुकडे वापरायचे आहेत हे डोक्यात ठरलेले असते. जसे की कर्व्ह असेल तर एका टाईल चे चार चौरस तुकडे करून घ्यायचे. ते तुकडे डिझाईन वर ठेवायचे आणि मग जो भाग डिझाईन च्या बाहेर येतो तो मार्क करून तेवढा भाग कट करायचा.
एखादा प्रोसेस चा फोटो टाकते.

Pages