चिकवावरून चिकटवा- चित्रपट परीक्षण-ब्रह्मास्त्र

Submitted by अस्मिता. on 22 September, 2022 - 11:26

https://www.maayboli.com/node/81454?page=54

'ब्रह्मास्त्र' बघून आलो आताच.
अमिताभचे नाव 'रघू' आहे , मला फिस्सकन हसू आलं. त्याला 'रघूगुरु' असं एकदोनवेळा म्हटलेलं, मला 'लघुगुरु' सारखं ऐकू आलंय. ह्याने फक्त औपचारिकता म्हणून हजेरी नोंदवली आहे. तो वेगवेगळे जॅकेट घालून 'लँड्स एन्डची' जाहिरात असल्यागत मिरवताना, फक्त प्रीतिभोजासाठी लग्नाला तयार होऊन आलेल्या दूरच्या नातलगासारखा वाटतो. ('आजोबा उठा, सुन्मुखाची वेळ झाली.' आजोबा कशाचे उठतात , प्रीतिभोजानंतर डायरेक्ट विहिण पंगतीला उठायचे ठरवूनच झोपलेले असतात. हे खरे वानप्रस्थ !) यांचे आश्रम हिमालयाच्या पायथ्याशी असून मागून मोकळे व 'सुरक्षिततेसाठी' समोरून कुलूपबंद आहे. हे गुप्त जागी असून गेटच्या बाजूस 'आश्रम' असे स्पष्ट लिहिलेय , तरी व्हँप गँग याच्या शोधात आहे. त्यामुळे व्हिलन यायचे तेव्हा येतातच, हिरो मात्र कुलूपाशी झगडत बसतो.

मौनी रॉयच्या गळ्यावर कांजण्या आल्यासारखी चित्रं गोंदवलीत. मौनी दंडाला पेडोमिटर लावून हिंडल्यासारखं अस्त्राचा तुकडा लावून फिरते, हे जेव्हाजेव्हा लाल होतं, तिचे डोळेही लाल होतात. जसं फोनवरचा मेसेज अॅपल वॉचवरून वाचता येतो, तेच तंत्रज्ञान आहे ते ! ही आणि हिची फौज सतत स्नोबूट्स घालून हिंडतात व प्रार्थनाही करतात. हे सगळे मिळून 'नागीण, क्राईम पेट्रोल व देवों के देव महादेव' मधल्यासारखेच दिसतात. पण हिरोची गँग इतकी लेम आहे की हे ताकतवान वाटत राहतात. हिरोच्या टीममधल्या मुलींची नावं राणी व रवीना व मुलाचे नाव शेर आहे. नावंच नाहीत म्हटलं तरी चालेल. अकबराच्या गोष्टीत जसे तो 'हातही न लावता रेष लहान करून दाखव' म्हटल्यावर बिरबल दुसरी मोठी रेष काढतो. तसेच पण उलट म्हणजे बी ग्रेड व्हिलनटीमसाठी हिरोची सी ग्रेड टीम तयार केलीये.

जेव्हा अस्त्राचा तुकडा कसाबसा वाचवून काशीहून हिमाचलच्या आश्रमात न्यायचा असतो. तेव्हा तो कारमधे जिपीएससारखा ठेवला होता. मला आपलं, 'अरे पूर्ण पृथ्वी नष्ट होणारे ना याने , निदान प्लॅस्टिकच्या पिशवीत तरी ठेवा' झाले. फारच अंडरव्हेल्मिंग झालं.

रघूसरांच्या आश्रमात सगळे ज्येना हास्यक्लबात हात वर करून हसतात तसंच काहीतरी गेटटुगेदर करत अस्त्र अॅक्टिव्हिटी करतात. डिम्पल हेलिकॉप्टरच्या फेरीची ड्रायव्हर आहे. एअरलिफ्ट करायची कुठलीही अर्जन्सी नसताना व बाकी ज्येना कारने ये-जा करताना, ही मात्र ईशाला हेलिकॉप्टरने सोडते-आणते. झालं तेवढंच !

आलियाचे एकदोन कपडे वगळता सगळे कपडे 'फॉरेव्हर ट्वेन्टीवन'चे वाटतात. डेनिम पँट्स आणि व्हाईट टँकमधे(फना-फना) कटरीना इतकं कुणीच एकाचवेळी सेक्सी आणि स्ट्रॉन्ग दिसत नाही हे मला लक्षात आलंय. आलियाला दुर्गापूजेच्या सीनमधे एक लाल साडी दिली आहे, त्यात ती फार सुंदर दिसलीये.

हे सगळे वँपला शोधत हिंडल्यामुळे तिला यांना फार शोधावे लागत नाही. हे लगेच सापडतात, अक्षरशः मागेच २० फुटावर असतात व 'उसको हमारे बारे में पता चल गया है' म्हणतात.  त्यामुळे जेव्हा यांना ती दणके देते, मला यांच्याविषयी सहानुभूतीही न वाटता, 'मरा मूर्खांनो, कशाला तरफडलात मागेच' वाटले. नागर्जुनाचा रोल फार छोटा आहे व फार संवाद नाहीत. शाखाचे संवाद अत्यंत भंगार आहेत. व्हिलनशी पकडापकडी खेळताना त्याला 'तू घोडा आहेस... नाही, तू तर हत्ती आहेस, गेंडा आहेस' असं अत्यंत वैताग वाटावा असं बोलत राहतो. मगं मौनी रॉय त्याला जादूने बार्बेक्यू/ब्रॉईल करत करपवून टाकते. अर्थात आधी आणलेल्या वैतागामुळे आपल्याला वाईटही वाटत नाही. हे चालू असताना शाखा मक्याच्या कणसासारखा तांबडालाल होत असतो, त्यामुळे भुट्ट्याची आठवण येऊनही प्रेक्षकांना भुट्टाही मिळत नाही.

संवाद अतिशय टुकार आहेत. शिवाय दोन संवांदांच्यामधे जो शून्य काळ असतो तो गरजेपेक्षा जास्त वाटतो, त्यामुळे समोरची व्यक्ती दरथोड्यावेळाने क्लूलेस दिसत राहते. सर्वच संवाद अनैसर्गिक आहेत. शिवाय दोन संवादातील केमिस्ट्रीही विचित्र आहे. कोवीड काळात कंटाळा घालवण्यासाठी घरोघरी बायकांनी ड्रेसवरून एकदम साडीवर जाण्याचे जे व्हिडिओ केले होते , त्या सगळ्या काकवा, वैन्या, ताया, मावश्या, माम्या यांना एकत्र केल्यावर शेवटी जी काही ' ईनऑरगॅनिक आणि ऑकवर्ड' क्लिप तयार होते, त्याचीच आठवण आली.

जमेच्या बाजू म्हणजे रणबीर-आलिया अत्यंत सुंदर दिसलेत, VFX अगदीच वाईट नाहीत. मुलगा 'आमच्यापेक्षा लहान मुलांचा सिनेमा आहे' म्हणाला व मुलगी 'शार्क बॉय अँड लाव्हा गर्ल' सारखा म्हणाली. मला 'छोटा भीम ऑन स्टेरॉईड्स' वाटला. तसा सुरवातीचा अर्धातास सोडला तर एन्गेजिंग आहे.

मला रणबीर व आलिया दोघेही आवडतात. माझी फार अपेक्षा नसते( झिम्मा आवडलेल्यांपैकी )आणि मला पैसे वाया गेले वगैरे वाटले नाही. मी बघणारच होते व बघितलाही. दॅट्स दॅट ! केसरिया गाणे, वाराणसी, आश्रमाचा परिसर, डोंगर-दऱ्या वगैरे फ्रेम्स सुंदर आहेत, मला मजा आली. फक्त या कास्ट व बजेटमधे कथेला नीट बांधून, संवांदातली केमिस्ट्री व दर्जा सुधारून अजून चांगला बनवणे सहज शक्य होते. एक फ्रँचाईज म्हणून पुढे काय करतील याची उत्सुकताही आहे.

©अस्मिता

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भन्नाट - अ‍ॅडिशन्सही आवडल्या Lol

'अरे पूर्ण पृथ्वी नष्ट होणारे ना याने , निदान प्लॅस्टिकच्या पिशवीत तरी ठेवा' >>> Lol होना. झिपलॉक सारखे एखादे प्रॉडक्ट प्लेसमेण्ट होउन गेले असते.

ऑकवर्ड क्लिपचा संदर्भही सुपरलोल

अ‍ॅडिशन्स पण भारी आहेत Lol अजून काही आठवल्यास अ‍ॅड करत रहा Happy
पेडोमिटर, अरे पूर्ण पृथ्वी नष्ट होणारे ना याने , निदान प्लॅस्टिकच्या पिशवीत तरी ठेवा' >> Lol

Oh my god ! हेपण भारी, हहहहहहहहहहहहह Lol Lol ( सध्या फ्रेंड्स फिवर चढ्या है मेरेकू Wink )

महान लिहिलंय.. आम्हीपण बघितला. आवडला Happy
20 वर्षांपूर्वी आला असता तर बेक्कार चालला असता. पण आजकाल सगळं कसं वास्तववादी किंवा काहीतरी संदेश देणारे किंवा सामाजिक विषय किंवा बायोपिक अशा चित्रपटांची फॅशन आहे ना त्यामुळे बहुतेक पब्लिक ला आवडला नसावा.
जाऊदे झालं. आलिया ची लाल साडी बेस्ट. आणि चिकनी चमेली गाण्यावर डान्स सुरू करते ना एकदम तेव्हा फारच चिकणी दिसली आहे.

वास्तववादी वगैरेची अपेक्षा नव्हती गं मलाही स्मिता Happy , साय-फाय जॉन्रा मला आवडतो (वास्तववादी नकोच होतं कधीकधी)
पण कन्व्हिक्शन दिसावं(खोटं बोला पण रेटून (तरी) बोला.) एवढी माफक अपेक्षा असते. कन्विक्शन व तांत्रिक बाजू यात कमी पडलाय हा सिनेमा.

ट्रेलर पहिला तेव्हा त्यात की सारखी आग दाखवली आहे, ती ही केवढी कृत्रिम वाटते. "हो जाएग खंड खंड" असा काही डायलॉग (आधी पण कुठल्या चित्रपटात होता ना असा.) हे सगळं पाहून लक्षात येतं एक रत्न असावं हे म्हणून.

अस्मिता Lol
20 वर्षांपूर्वी आला असता तर बेक्कार चालला असता. पण आजकाल सगळं कसं वास्तववादी किंवा काहीतरी संदेश देणारे किंवा सामाजिक विषय किंवा बायोपिक अशा चित्रपटांची फॅशन आहे ना त्यामुळे बहुतेक पब्लिक ला आवडला नसावा.>>
चॉइस करायल भरपुर गोष्टी उपलब्ध आहेत. त्यामुळ आवडला नसावा. आता हम आपके है कौन तरी कुठे चालेल ? परवा कुणीतरी लिहिलेलं तस बॉलीवूडच्या त्याच त्याच गोष्टींचा कंटाळा आला आहे.
साय फाय मुव्हीज का कोण जाणे पण बॉलीवुडला अजुनही जमत नाहीत किंवा मग आपल्याला पौराणीक गोष्टी त्या स्वरुपात बघायला आवडत नाहीत.

भन्नाट आहे रिव्ह्यू Lol खरंच यातल्या काही काही गोष्टी खटकतात. पण तरी पिक्चर बघायला मजा आली मला. असे पिक्चर बघताना उगाच डोकं वगैरे वापरायचं नसतं हे फार पूर्वीच ठरवून टाकलेलं आहे Proud

तो कारमधे जिपीएससारखा ठेवला होता. मला आपलं 'अरे पूर्ण पृथ्वी नष्ट होणारे ना याने , निदान प्लॅस्टिकच्या पिशवीत तरी ठेवा' झाले >>> अगदी अगदी! मला तर इतक्या कॅज्युअली सँडविच पण नाही ठेवता येत Proud त्यांची गाडी ठोकल्यावर मलाच काळजी की अरे उतरताना तो तुकडा घ्या बरोबर Lol

हे सगळे वँपला शोधत हिंडल्यामुळे तिला यांना फार शोधावे लागत नाही. हे लगेच सापडतात, अक्षरशः मागेच २० फुटावर असतात व 'उसको हमारे बारे में पता चल गया है' म्हणतात. त्यामुळे जेव्हा यांना ती दणके देते, मला यांच्याविषयी सहानुभूतीही न वाटता, 'मरा मूर्खांनो, कशाला तरफडलात मागेच' वाटले >>> +१

परत एकदा तेवढाच हसलो. Lol
प्लॅस्टिक पिशवी, >>
, त्यामुळे समोरची व्यक्ती दरथोड्यावेळाने क्लूलेस दिसत राहते. >>
inorganic आणि ऑकवर्ड' क्लिप तयार होते >> आणि ( झिम्मा आवडलेल्यांपैकी ) ला तर सिक्सर! Lol

मला आपलं 'अरे पूर्ण पृथ्वी नष्ट होणारे ना याने , निदान प्लॅस्टिकच्या पिशवीत तरी ठेवा' झाले. फारच अंडरव्हेल्मिंग झालं.>>> लोल ! हे फार भारिये .
कन्विक्शन व तांत्रिक बाजू यात कमी पडलाय हा सिनेमा.>>> अरे देवा ! मग ४०० कोटी आणी ८-१० वर्ष नक्कि कशात खर्च झाले म्हणे?

झिम्मा आवडलेल्यांपैकी >> या शब्दांना कसलाच अर्थ नाहीये. कुणालाच माहिती नाही असे म्हणजे नेमके कसे. शिवाय न आवडलेली लोकंही आईच्या मायेने तुमच्याकडे बघतात. 'झिम्मास्त्र' आहे हे! Lol

तर, तर लंपन आता कोणी खूप चांगलं किंवा खूप वाईट म्हटल्यावरच बघायची उत्सुकता वाटते. बाकी आर्थिक गणिताशी व अजेन्ड्याशी काही देणंघेणं नाही.
तुका म्हणे आता
उरलो टाईमपास पुरता Lol

अ‍ॅडिशन बाबत केस हाताबाहेर गेली आहे फा आणि मै , नेकी और पुछ पुछ Wink

हा प्रश्न मलाही पडला होता प्राजक्ता, रिव्यू लिहिल्यावर विसरून गेले. Happy

टू लेट च्रप्स , टाईमपास तेवढा सिरियसली करते मी Wink

अरे उतरताना तो तुकडा घ्या बरोबर>>> मलाही Lol

Lol Watching this deserves a gallantry medal!! Empire_Gallantry_Medal,_obverse.png (क्रेडीटः विकीपिडीया)

झकास चिरफाड Rofl

व्हिलनशी पकडापकडी खेळताना त्याला 'तू घोडा आहेस... नाही, तू तर हत्ती आहेस, गेंडा आहेस' असं अत्यंत वैताग वाटावा असं बोलत राहतो. >> कैच्याकै Lol

हे गुप्त जागी असून गेटच्या बाजूस 'आश्रम' असे स्पष्ट लिहिलेय तरी व्हँप गँग याच्या शोधात आहे.

मला आपलं 'अरे पूर्ण पृथ्वी नष्ट होणारे ना याने , निदान प्लॅस्टिकच्या पिशवीत तरी ठेवा' झाले.

हे सगळे मिळून 'नागीण, क्राईम पेट्रोल व देवों को देव महादेव' मधल्यासारखेच दिसतात.

. मगं मौनी रॉय त्याला जादूने बार्बेक्यू/ब्रॉईल करत करपवून टाकते. अर्थात आधी आणलेल्या वैतागामुळे आपल्याला वाईटही वाटत नाही.
>>>> Rofl Rofl

Pages