चिकवावरून चिकटवा- चित्रपट परीक्षण-ब्रह्मास्त्र

Submitted by अस्मिता. on 22 September, 2022 - 11:26

https://www.maayboli.com/node/81454?page=54

'ब्रह्मास्त्र' बघून आलो आताच.
अमिताभचे नाव 'रघू' आहे , मला फिस्सकन हसू आलं. त्याला 'रघूगुरु' असं एकदोनवेळा म्हटलेलं, मला 'लघुगुरु' सारखं ऐकू आलंय. ह्याने फक्त औपचारिकता म्हणून हजेरी नोंदवली आहे. तो वेगवेगळे जॅकेट घालून 'लँड्स एन्डची' जाहिरात असल्यागत मिरवताना, फक्त प्रीतिभोजासाठी लग्नाला तयार होऊन आलेल्या दूरच्या नातलगासारखा वाटतो. ('आजोबा उठा, सुन्मुखाची वेळ झाली.' आजोबा कशाचे उठतात , प्रीतिभोजानंतर डायरेक्ट विहिण पंगतीला उठायचे ठरवूनच झोपलेले असतात. हे खरे वानप्रस्थ !) यांचे आश्रम हिमालयाच्या पायथ्याशी असून मागून मोकळे व 'सुरक्षिततेसाठी' समोरून कुलूपबंद आहे. हे गुप्त जागी असून गेटच्या बाजूस 'आश्रम' असे स्पष्ट लिहिलेय , तरी व्हँप गँग याच्या शोधात आहे. त्यामुळे व्हिलन यायचे तेव्हा येतातच, हिरो मात्र कुलूपाशी झगडत बसतो.

मौनी रॉयच्या गळ्यावर कांजण्या आल्यासारखी चित्रं गोंदवलीत. मौनी दंडाला पेडोमिटर लावून हिंडल्यासारखं अस्त्राचा तुकडा लावून फिरते, हे जेव्हाजेव्हा लाल होतं, तिचे डोळेही लाल होतात. जसं फोनवरचा मेसेज अॅपल वॉचवरून वाचता येतो, तेच तंत्रज्ञान आहे ते ! ही आणि हिची फौज सतत स्नोबूट्स घालून हिंडतात व प्रार्थनाही करतात. हे सगळे मिळून 'नागीण, क्राईम पेट्रोल व देवों के देव महादेव' मधल्यासारखेच दिसतात. पण हिरोची गँग इतकी लेम आहे की हे ताकतवान वाटत राहतात. हिरोच्या टीममधल्या मुलींची नावं राणी व रवीना व मुलाचे नाव शेर आहे. नावंच नाहीत म्हटलं तरी चालेल. अकबराच्या गोष्टीत जसे तो 'हातही न लावता रेष लहान करून दाखव' म्हटल्यावर बिरबल दुसरी मोठी रेष काढतो. तसेच पण उलट म्हणजे बी ग्रेड व्हिलनटीमसाठी हिरोची सी ग्रेड टीम तयार केलीये.

जेव्हा अस्त्राचा तुकडा कसाबसा वाचवून काशीहून हिमाचलच्या आश्रमात न्यायचा असतो. तेव्हा तो कारमधे जिपीएससारखा ठेवला होता. मला आपलं, 'अरे पूर्ण पृथ्वी नष्ट होणारे ना याने , निदान प्लॅस्टिकच्या पिशवीत तरी ठेवा' झाले. फारच अंडरव्हेल्मिंग झालं.

रघूसरांच्या आश्रमात सगळे ज्येना हास्यक्लबात हात वर करून हसतात तसंच काहीतरी गेटटुगेदर करत अस्त्र अॅक्टिव्हिटी करतात. डिम्पल हेलिकॉप्टरच्या फेरीची ड्रायव्हर आहे. एअरलिफ्ट करायची कुठलीही अर्जन्सी नसताना व बाकी ज्येना कारने ये-जा करताना, ही मात्र ईशाला हेलिकॉप्टरने सोडते-आणते. झालं तेवढंच !

आलियाचे एकदोन कपडे वगळता सगळे कपडे 'फॉरेव्हर ट्वेन्टीवन'चे वाटतात. डेनिम पँट्स आणि व्हाईट टँकमधे(फना-फना) कटरीना इतकं कुणीच एकाचवेळी सेक्सी आणि स्ट्रॉन्ग दिसत नाही हे मला लक्षात आलंय. आलियाला दुर्गापूजेच्या सीनमधे एक लाल साडी दिली आहे, त्यात ती फार सुंदर दिसलीये.

हे सगळे वँपला शोधत हिंडल्यामुळे तिला यांना फार शोधावे लागत नाही. हे लगेच सापडतात, अक्षरशः मागेच २० फुटावर असतात व 'उसको हमारे बारे में पता चल गया है' म्हणतात.  त्यामुळे जेव्हा यांना ती दणके देते, मला यांच्याविषयी सहानुभूतीही न वाटता, 'मरा मूर्खांनो, कशाला तरफडलात मागेच' वाटले. नागर्जुनाचा रोल फार छोटा आहे व फार संवाद नाहीत. शाखाचे संवाद अत्यंत भंगार आहेत. व्हिलनशी पकडापकडी खेळताना त्याला 'तू घोडा आहेस... नाही, तू तर हत्ती आहेस, गेंडा आहेस' असं अत्यंत वैताग वाटावा असं बोलत राहतो. मगं मौनी रॉय त्याला जादूने बार्बेक्यू/ब्रॉईल करत करपवून टाकते. अर्थात आधी आणलेल्या वैतागामुळे आपल्याला वाईटही वाटत नाही. हे चालू असताना शाखा मक्याच्या कणसासारखा तांबडालाल होत असतो, त्यामुळे भुट्ट्याची आठवण येऊनही प्रेक्षकांना भुट्टाही मिळत नाही.

संवाद अतिशय टुकार आहेत. शिवाय दोन संवांदांच्यामधे जो शून्य काळ असतो तो गरजेपेक्षा जास्त वाटतो, त्यामुळे समोरची व्यक्ती दरथोड्यावेळाने क्लूलेस दिसत राहते. सर्वच संवाद अनैसर्गिक आहेत. शिवाय दोन संवादातील केमिस्ट्रीही विचित्र आहे. कोवीड काळात कंटाळा घालवण्यासाठी घरोघरी बायकांनी ड्रेसवरून एकदम साडीवर जाण्याचे जे व्हिडिओ केले होते , त्या सगळ्या काकवा, वैन्या, ताया, मावश्या, माम्या यांना एकत्र केल्यावर शेवटी जी काही ' ईनऑरगॅनिक आणि ऑकवर्ड' क्लिप तयार होते, त्याचीच आठवण आली.

जमेच्या बाजू म्हणजे रणबीर-आलिया अत्यंत सुंदर दिसलेत, VFX अगदीच वाईट नाहीत. मुलगा 'आमच्यापेक्षा लहान मुलांचा सिनेमा आहे' म्हणाला व मुलगी 'शार्क बॉय अँड लाव्हा गर्ल' सारखा म्हणाली. मला 'छोटा भीम ऑन स्टेरॉईड्स' वाटला. तसा सुरवातीचा अर्धातास सोडला तर एन्गेजिंग आहे.

मला रणबीर व आलिया दोघेही आवडतात. माझी फार अपेक्षा नसते( झिम्मा आवडलेल्यांपैकी )आणि मला पैसे वाया गेले वगैरे वाटले नाही. मी बघणारच होते व बघितलाही. दॅट्स दॅट ! केसरिया गाणे, वाराणसी, आश्रमाचा परिसर, डोंगर-दऱ्या वगैरे फ्रेम्स सुंदर आहेत, मला मजा आली. फक्त या कास्ट व बजेटमधे कथेला नीट बांधून, संवांदातली केमिस्ट्री व दर्जा सुधारून अजून चांगला बनवणे सहज शक्य होते. एक फ्रँचाईज म्हणून पुढे काय करतील याची उत्सुकताही आहे.

©अस्मिता

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धमाल लिहलयं!
मी सिनेमावर पैसे खर्च करीत नाही त्यामुळे हे वाचून त्या बचतीत अजून भर !! Wink

कुमारसर, अजनबी, कृष्णा, वावे , सस्मित ,भरत, माझेमन,AMIT, अवलताई,हर्पा, अन्जुताई, लोना, प्राजक्ता, च्रप्स, फारेन्ड, लंपन, अमितव, अनु, सीमा, मानवदादा , स्मिता ,मृ , ऋ, मैत्रेयी, अमरेन्द्र बाहुबली, भाग्यश्री, आबा ,rmd, सस्मित......
सर्वांचे मनापासून आभार. Happy

व्हिडिओ नक्की बघेन अजनबी Happy

हो बघेन की सस्मित Proud

बहुधा यानंतर 'रूद्राक्ष' ची टर्न येईल >>>आपलं कामंच आहे हे रमड Proud

नक्शाची नोंद घेतलीये बाहुबली. Happy

लोना, गॅलेन्ट्री मेडल Proud

साय फाय मुव्हीज का कोण जाणे पण बॉलीवुडला अजुनही जमत नाहीत किंवा मग आपल्याला पौराणीक गोष्टी त्या स्वरुपात बघायला आवडत नाहीत.>>>>+१ सीमा , डॉ स्ट्रेंज तिथे परकायाप्रवेशच नाही तर परमुडदा प्रवेश करतो, वॉन्डा ध्यानात सूक्ष्मरूपात या-त्या ब्रह्मांडात गावभर हिंडून लीलया मुडदे पाडते पण आपले हे असे होते.

'ब्रह्मास्त्र' बघून आलो आताच.

खूपच छान लिहिलं आहे तुम्ही. अनेक मुद्यांशी सहमत आहे. विशेषत: संवादा बाबत अगदी सहमत.

>> संवाद अतिशय टुकार आहेत. शिवाय दोन संवांदांच्यामधे जो शून्य काळ असतो तो गरजेपेक्षा जास्त वाटतो, त्यामुळे समोरची व्यक्ती दरथोड्यावेळाने क्लूलेस दिसत राहते. सर्वच संवाद अनैसर्गिक आहेत. शिवाय दोन संवादातील केमिस्ट्रीही विचित्र आहे.

अगदी अगदी! मला वाटतंय हॉलिवूडची नक्कल करण्याच्या आगीत "संवाद भी उस अग्नी की चपेट मे आ गये". बच्चन साहेबांच्या संवादातून तर बऱ्याचशा कथानकाचा उलगडा होत जातो पण ते संवाद स्पष्ट कसे होतील यापेक्षा गरगरीत कसे होतील हेच अधिक पाहिले गेले आहे.

सर्वाधिक गंमत तेंव्हा वाटली जेंव्हा अस्त्राची शक्ती अंगी असलेला सुपर ह्युमन रणबीर उर्फ शिवा हा आलिया उर्फ ईशा ला फोन करतो तेंव्हा "हॅलो हॅलो, ईशा तुम्हारी आवाज ब्रेक हो रही है" असा डायलॉग आहे Lol हे म्हणजे अगदीच टुकार प्रोजेक्ट वर काम करताना बोलले जाणारे वाक्य. ते तिथे का घातले असेल? आताच्या काळात घडणारी कथा म्हणून जरी असेल तरी हे जरा अतीच झाले.
.
'व्हिफएक्स अतिप्रमाणात असलेले चित्रपट निदान मला तरी कधीच भावत नाहीत. इथे तर व्हिफएक्सचा राडा च आहे. दीर्घकाळासाठी जाऊदे निदान उद्या सकाळपर्यंत तरी आपण चित्रपट बघितला होता हे लक्षात राहील की नाही शंकाच आहे.

माझ्या दृष्टीने जमेची बाजू इतकीच की शेवटची व्हीएफएक्स ची आतषबाजी छान आहे. मला गाणी आणि नृत्ये सुध्दा खूप आवडली.

हे जबरी लिहिलंय!! मुद्दाम विकेंडला वाचायला बाजूला काढून ठेवलं होतं and I’m not disappointed! Happy

टुकार संवाद आणि कॅरेक्टर्स अजिबात न फुलवणारी कथा हे व्यवच्छेदक लक्षण आहे ह्या सिनेमाचं आणि ते ह्या रिव्ह्यूत मस्त पकडलंय. ‘तुम कौन हों’, ‘तुम क्या हों?’ अशासारख्या निरर्थक संवादांची रेलचेल आहे.

आपलं कामंच आहे हे रमड >>> मजा येईल वाचायला. खरं तर बाहुबलींनी नक्शाची आठवण काढली म्हणून मी ते लिहीलं होतं की आता कोणीतरी ब्रम्हास्त्र पेक्षा रूद्राक्ष पण चांगला होता असं म्हणेल या अर्थी. पण माझ्या वाक्याचा असा फायदा होत असेल तर भारीच की! Proud

<<अजुन शिनमे बघा की ताई Lol
Submitted by सस्मित on 23 September >>>
अतिचशय सहमत..
टीप- अतिचशय हा शब्द इथल्याच एका "राफा" या जुन्या रत्नाचा आहे.

धन्यवाद अतुल Happy
हॅलो हॅलो, ईशा तुम्हारी आवाज ब्रेक हो रही है" असा डायलॉग आहे  हे म्हणजे अगदीच टुकार प्रोजेक्ट वर काम करताना बोलले जाणारे वाक्य. ते तिथे का घातले असेल? >>>>+१

शिवाय जे सुपरज्येना ईशाला वाचवतात त्यांचा वावर इतका लो एनर्जी-लो प्रोफाइल होता की मला ते कोण होते हेही आता आठवतच नाहीये.

धन्यवाद फेरफटका Happy
तुम्ही एका वाक्यात अगदी पर्फेक्ट सांगितलं !

बघते की धनवन्ती , 'ईस हरकतनेंही बरकतदी है क्यूं Wink ' मगं का नाही. अतिचशय धन्यवाद Happy

रमड, असं झालं का? ...मी 'रूद्राक्ष'ची क्लीप बघून हसूनही आले. Proud

संपूर्ण लेख मस्त झालाय. हहपुवा एकदम Lol
पंचेस एकदम मस्त. लहान मुलांनी लिहीलेले संवाद हे सर्वात आवडले. Proud
शमशेरा पाहिल्यावर आपटलेले सिनेमे उगीचच आपटत नाहीत हे समजलेच होते. हे परीक्षण वाचल्यावर आम्ही सगळे थोडक्यात वाचलो असे वाटले Proud ओटीटीवर आल्यावर बघू.

थँक्स अदिति Happy
थँक्स राभु Happy
लहान मुलांनी लिहीलेले संवाद हे सर्वात आवडले. >>> Lol
सगळे थोडक्यात वाचलो>>>> Lol

काल (इतक्या सगळ्यांनी वॉर्निंग देऊनही) ब्रह्मास्त्र बघितला. बघताना या लेखातील कितीतरी गोष्टी आठवुन हसू येत होतं.
एकही संवाद तीन किंवा फारतर चार शब्दांच्यापेक्षा जास्त नाही. ट्रंपला संवाद लेखनात सेकंड करिअर करायचं असेल तर वाव आहे.
क्या हो तुम? कोन हो तुम. पासून चालू करुन... 'गुरू कहा आश्रम कहा सायंटिस्ट दिखाओ' हे ती विरामचिन्ह विरहितच बोलते. म्हणजे वेगात बोलते असं नाही. संथपणे बोलते. पण आपल्याला शाळेत जरी विरामचिन्हे ही पॉझ घ्यायची जागा शिकवलं असलं तरी एकाच पेस मध्ये बोलून ती पॉझ घेऊनही विरामचिन्हे गाळायची किमया करुन दाखवते.
मी थोडा उशीरा पोहोचलो त्यामुळे आधी काय मिस केलं माहित नाही पण पहिली शारुखची हातापायी होईस्तोवर काही टोटलच लागेना. हिंदी कळत असुनही मला सबटायटल्स वाचुन सुरुवातीला काय चाललं आहे ते समजुन घ्यायला लागलं. सबटायटल मात्र स्मार्ट माणसाने लिहिली आहेत. बिटविन लाईन्स... न्हवे बिटविन द वर्ड्स काय सांगायचं आहे हे हिंदीपेक्षा इंग्रजी वाचुन लवकर आणि चांगलं समजतं. मला दाट शंका आहे की सगळे संवाद आधी इंग्रजी मध्ये लिहिलेले असावेत आणि मग गूगल ट्रांसलेट (किंवा लोकसत्ता ट्रांन्सलेट)ला देऊन त्याचं हिंदीकरण केलं असावं. कर्ता कर्म क्रियापदही रानोमाळ हरवली होती वाक्यांत.

मै आगसे जलता नही. कुछ रिश्ता है मेरा आग से. आग मुझे जलाती नही. (परत चार-पाच वाक्यांचे संवाद... ) वगैरे होतं तेव्हा काही वाटतच नाही इतकं मॅटर ऑफ फॅक्ट. आलियानेही बेताचा अभिनय केला आहे. गेट इट डन टाईप आहे सगळं.
रणबीरच्या कॅरेक्टरला थोडी अक्कल कमी आहे बहुतेक. प्यारका बटन है. वो अबि ऑफ है. उसे सिर्फ सच्चा प्यार ऑन कर सकता है. वो है इशा. ... टाळ्या... प्रचंड टाळ्या. तर हे function at() { [native code] }यंत बोरिंग पद्धतीने सतराव्यांदा उगाळूनही बुकल बुकल बुकलतात तेव्हा त्याला पटकन इशा आठवावी का नाही? पण नाही. इशा त्या फ्रंटयार्ड मधुन बाहेर पडते आणि बटण ऑफ. काय गंमत आहे.
बाकी ते हेलिकॉप्टर कशाला येतं मध्येच? आणि डिंपल कोण आहे. आय वॉज टोटली लॉस्ट. आणि व्हिलन नाही तर हास्यक्लब मध्ये अमिताभ पण स्नो बुट्स मध्ये आहे. ते पण गुडघ्यापर्यंत. हिमालय आहे पण स्प्रिंग मध्ये!
बाकी व्हिएफएक्स बघण्याचं वय आणि काळ गेला. ते आता टेकन फॉर ग्रँटेड आहे. आणि गच्चीवरुन उड्या मारताना तंगड तुटेल हाच विचार आलेला. ते सेटिंग समहाऊ मला फँटसी वाटून घ्यावं असं झालंच नाही.
बाकी कार लॉक करताना आयपॅड सिटवर ठेवलं तर मुलांना ओरडू की नको?

Lol
बाकी कार लॉक करताना आयपॅड सिटवर ठेवलं तर मुलांना ओरडू की नको?>>>> 'निदान प्लास्टिकच्या पिशवीत तरी ठेवत चला रे' म्हणायचं Proud
लोकसत्ता Lol

बाकी व्हिएफएक्स बघण्याचं वय आणि काळ गेला. ते आता टेकन फॉर ग्रँटेड आहे. >>>>+१ शिवाय व्हिएफएक्स आहेत म्हणून कथेचा प्लॉट वीक असला तरी किंवा पूर्ण कथाच अँटीक्लायमॅटिक असली तरी चालेल असं होत नाही नं.

'प्यार की ताकतच' पृथ्वीला वाचवणार होती, तर तुकड्याच्या मागे का लागले . दीड तास 'प्यार की रोशनी' होतीच, तेव्हाच काय तो 'उजेड' पाडायचा. प्यार आहे का च्यवनप्राश , किती वेळ लागला. आम्हाला का यडं बनवलं, 'अपना लाईट ढुंढो' म्हणून !

त्यांचा सगळा बिजनेस इन्ट्रेस्ट पार्ट २ होता. पार्ट १ मधे विलनची नावंही शाखानेच ठेवलेली होती , खरी नावं कधी कळलीच नाहीत. देव आणि अमृताचे महायुद्ध होऊन तिने त्याला हरवले पण स्वतःला घरगुती आगीपासून वाचवू शकली नाही, ह्याचं काहीच स्पष्टीकरण दिलं नाही. यात किती वेळ गेला.

आणि ह्या शिवाला आग जाळत नाही ठीक आहे. पण स्मोकचे काय? त्याने सफोकेट होईल याची भीती होती मला! इतके व्हिफअक्स केले तर त्या बाळाला आगीत वाल्या शॉट मध्ये इतकी आग लांब कशाला ठेवली? आणि एकच शॉट चारीठाव कसा दाखवून चालेल?

शिवा स्वतः आगीत जळत नाही हे तर आहेच, पण कोणालाही न जाळणारे व्हिएफएक्स निखारे/स्पार्क सुद्धा त्याला बनवायला येतात.
ते नाय का, सगळीकडे स्पार्क उधळतो, घराला आग कशी लागत नाही काय माहित.

शुद्ध पांचटपणा आहे ब्रम्हास्त्र आणि तो आदिपुरुषचा tailor म्हणजे अति अति महा पांचटपणा। यापेक्षा सब tv वरचा बालवीर किंवा colors वरची नागीन बरी.

इथेच म्हटल्याप्रमाणे ओटीटीवर आलाय म्हणून सुरू केलाय. ५५ मिनिटे तग धरला. आता मात्र सहनशक्ती संपली.
किमान लालसिंग चढ्ढा ऑफिशियल रीमेक होता. यात इन्फिनिटी वॉर चे प्रसंग जसेच्या तसे उचललेत. स्टोरीलाईनपण उचलली आहे, फक्त कथेला पौराणिक वस्त्रे चढवली आहेत आणि देव, देवता यांचा वापर लपण्यासाठी केलाय.
बाकी, परीक्षण एव्हढा सिनेमा पाहिल्यावर एकदमच पटले.
आता अजून बघू काय काय ढापाढापी केलीय म्हणून बघायचा कि नाही याचा विचार चाललाय. इतका पाहिलाच आहे तर पूर्ण करावा म्हणूनच बघत असतो आपण एरव्ही. काही लोकांच्यात आपण मोडू याची कल्पना असतानाही आपण नेटाने हा उद्योग करतो. Proud

इथला रिव्हू भन्नाट आहे. शब्द आणि शब्दाशी सहमत... @अस्मिता

कालच हॉटस्टार वर ब्रम्हास्त्र पाहिला. झक मारली आणि पाहिला असे वाटले. त्या शाहरूख व नागार्जूनला असले कॅमिओ करायची का अवदसा आठवली कोण जाणे. नसते तरी चालले असते. मुलीने आधीच वॉर्नींग दिली होती. तरी पाहिला. लवस्टोरी पार्ट खूपच ताणलाय. त्या नागार्जूनला वाचवायला जातात आणि तिथे ते काम सोडून लवस्टोरी चालूच.... आलियाचे शिवा शिवा ओरडणे, रणबीरचा सुमार अभिनय, अमिताभचा थंड अभिनय याने वैतागलो.

Hot star वर बघायला सुरुवात केली .
काहीच मिनिट बघू शकलो दहा मिनिटं नंतर हा सिनेमा बघायची बिलकुल इच्छा झाली नाही

शाहरुख,अमिताभ, हे सर्व आता म्हातारे झाले आहेत.
अजून त्यांना घेवून सिनेमा तयार होतात हे जगातील आश्चर्य आहे

Pages