पाककला उपक्रम ...नेवैद्यम् समर्पयामि ...अवीट गोडीचा साखरभात

Submitted by मनीमोहोर on 2 September, 2022 - 05:13
Sakharbhat, kesharibhat

साखरभात

लहानपणी आमच्या घरी गणपती येत असत. (हो गणपतीचं , तेव्हा नुसतं “ बाप्पा ” हे नाव नव्हतं मिळालं गणपतीला. ) आणि आमच्या गणपतीचं विसर्जन गौरींबरोबर होत असे. शाळेला सुट्टी, गणपतीची आरास, फुलं दुर्वा, घरीच केलेले हार, आरत्या, खिरापत, पाच सहा दिवस रोज जेवणात नेवैद्या साठी म्हणून केलेलं काही तरी गोड अशी आमची मजा असे पाच सहा दिवस.

पहिल्या दिवशी तर आई मोदकच करत असे पण नंतर एक दिवस कधीतरी साखरभाताचा ही नंबर येई. साखरभात ( हो , तेव्हा केशरीभात न म्हणता आम्ही साखरभातच म्हणत होतो. ) ही आमच्या आईची सिग्नेचर डिश होती . तिचा साखरभात अप्रतिम होत असे. गणपतीत मोदकांएवढीच तिच्या हातच्या साखरभाताची ही वाट पहात असू आम्ही.

तेव्हा म्हणजे जवळ जवळ पन्नास साठ वर्षांपूर्वी गूळ स्वस्त आणि मुबलक तर साखर महाग आणि दुर्मिळ असं चित्र होतं त्यामुळे गुळांबा, नारळीभात असे पदार्थच जास्त होत. गोड शिरा, खीर, पन्ह, पुरणपोळी आणि कधी तरी चहा देखील गूळ घालूनच होत असे. त्यामागे गूळ तब्बेतीला चांगला वगैरे विचार नव्हता तर तो साखरेपेक्षा स्वस्त आणि त्याही पेक्षा दुकानात मिळतोय हेच कारण होतं. साखरभात , साखरांबा, पाकातल्या पुऱ्या असे साखरेचे पदार्थ त्यामानाने क्वचित होत असत आणि म्हणून त्यांची अपूर्वाई ही अधिक होती.

त्या काळात भारतात अन्नधान्याची अभूतपूर्व टंचाई होती. अलीकडे फक्त कोरोना काळाच्या सुरवातीला परदेशात सुपर मार्केटमध्ये असे खाद्यपदार्थांचे रिकामे रॅक्स बघितलेत फोटोमध्ये. असो. आपल्याकडे हरित क्रांतीनंतरच मुबलकता आली आहे अन्नधान्याची. रेशनिंगचेच दिवस होते ते. तुम्हा तरुण मुलांना कल्पना नाही येणार पण गेलं दुकानात आणि आणलं काय हवंय ते अशी परिस्थितीच नव्हती. साखर तर रेशनवर माणशी अमुक ग्रॅम महिना एवढी लिमिटेड मिळत असे. त्यासाठी ही दोन दोन तास रांगेत ही उभं राहावं लागे. वाण्याकडून मागच्या दाराने थोडी चढ्या भावाने साखर आणणं आर्थिक दृष्ट्या आम्हाला फार कठीण नसलं तरी आमचे वडील तत्वनिष्ठ होते. त्यांचा ह्या गोष्टीला सक्त विरोध होता. " तत्वनिष्ठ " वगैरे वाचायला किती ही छान वाटलं तरी सगळं मॅनेज करताना आईची किती तारांबळ होत असेल हे आता मोठं झाल्यावर कळतंय.

तर एका वर्षी गणपती मध्ये साखरभात करण्यासाठी पुरेशी साखर नव्हती घरात. ह्या वर्षी नेवैद्यासाठी आणि आम्हा मुलांसाठी ही करता नाही येणार साखरभात ह्याची आईला फार चुटपुट वाटत होती. “ नसेल साखर तर दुसरं करा काही तरी “असं म्हणून वडिलांनी जरी तो विषय संपवला असला तरी तिच्या मनातून ते जात नव्हतं. दुकानातून साखर आणण्याची ही तिची प्राज्ञा नव्हतीच. अशी तिची दोन्ही कडून कोंडी झाली होती.

गणपतीचे दिवस रोज इतर काहीतरी गोड करून साजरे होत होते पण मला वाटत तिची साखरभा त करण्याची इच्छा एवढी उत्कट होती की त्या वर्षीच्या गौरी “ रेशनच्या दुकानात गौरी गणपती सणासाठी जास्तीची साखर आलीय “ ही बातमी घेऊनच आल्या. मीच रांगेत उभी राहून तिला साखर आणून दिल्याचं मला आठवतंय. आई खूप खुश झाली साखर बघून . त्यातलीच थोडी साखर लगेच गणपतीपुढे ठेवत हात ही जोडले तिने. दुसऱ्या दिवशी घावन घाटल्या बरोबर तिने थोडा साखरभात ही केला. त्या दिवशी लिमिटेड मिळालेल्या त्या साखरभाताची गोडी अवीट होती हे काय सांगायला हवं का ?

ही आठवण म्हणून मी ही दरवर्षी गणपतीत एकदा तरी करते साखरभात. आता खरं तर इतक्या वर्षात त्या भाताची चव ही विसरायला झाली आहे पण केशर, वेलची, बासमती तांदूळ, आणि सढळ हस्ते सुका मेवा घालून ही ती चव आली नाहीये असं ही अगदी दरवर्षी नेमाने वाटतच मला.

नमनाला भरपूर तेल घालून झालंय आणि साखर भाताची कृती कुठे ही मिळेल तुम्हाला पण तरी थोडक्यात सांगते.

तुपावर लवंगा घालून मग त्यात धुतलेले एक वाटी बासमती तांदूळ हलक्या हाताने थोडा वेळ परतायचे. गरम पाणी घालून त्यांचा मऊ मोकळा भात करून तो परातीत गार होण्यासाठी काढून ठेवायचा.

तांदुळाच्या सव्वा पटीने साखर (किंवा आपल्या आवडीनुसार कमी जास्त ) घेऊन तिचा पक्का गोळीबंद पाक करायचा. त्यात एक लिंबाचा रस , थोडा नारळाचा चव , रंगासाठी थोडं केशर किंवा खायचा केशरी रंग, चिमूटभर मीठ आणि गार झालेला भात घालायचा. भात घातला की ते मिश्रण पातळ होत. जाड तवा पातेल्याखाली ठेवून आणि पातेल्यावर ही नीट झाकण ठेवून मंदाग्नीवर मध्ये मध्ये हलवत भात कोरडा करून घ्यायचा. गॅस बंद करून शेवटी तुपात परतलेला सुका मेवा, वेलदोडा जायफळ पूड घालून मिक्स करायचं आणि झाकण ठेवून एक दोन तास भात मुरवत ठेवायचा आणि मगच खायचा.

हा फोटो

20220902_142406.jpg

नीट शिजलेला भात, लिंबाचा मध्येच लागणारा आंबटपणा आणि साखरेचा गोडवा, केशर वेलचीचा स्वाद, आणि सुक्या मेव्याचा क्रंच असं सगळं एकत्रित मिळून चव मस्तच लागते. गोड शिऱ्या बरोबर जसं खारातली मिरची किंवा लोणचं लागतंच तसंच साखरभाताबरोबर भजी, बटाटेवडे, अळूवड्या, मुगडाळ बोण्ड किंवा अगदीच काही नाही जमलं तर पापड कुरडया अस तरी तळण असलं की त्याची गोडी अधिक वाढते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय.
साखरभातही छान दिसतोय.

वाह किती सुरेख कलरफुल साखरभात. सोबत आईची आठवण हृदयस्पर्शी.

गणपती दिवसात नाही पण इतर सणाला कधीतरी, माझी आईही साखरभात फार सुरेख करायची, ते आठवलं.

मस्त लिहिलंय!
इतक्या वर्षात त्या भाताची चव ही विसरायला झाली आहे पण केशर >>
तत्वनिष्ठ " वगैरे वाचायला किती ही छान वाटलं तरी सगळं मॅनेज करताना आईची किती तारांबळ होत असेल >> हे तुम्ही असं निखळ (बृटली ऑनेस्ट) तरी प्रेमाने लिहिता म्हणून तुमचा फॅन आहे मी. Happy

माझा खूप आवडता पदार्थ (पण करता येत नाही. काही तरी बिनसतं प्रत्येक वेळी)
सुरेख दिसतोय. माझी आई सगळं एकदम कुकरला लावते. मस्त होतो तिचा साखरभात. पण मला तसं करायची भीती वाटते, भात शिजणार नाही अशी. त्यामुळे मी तुम्ही लिहिलाय तसाच करते, पण नाही चांगला होत.

छान आठवणी जोडली गेलीये साखरभाताशी. तुझं सगळं करणं फार सुरेख आणि निगुतीचं असतं ममो.
( इथेच सांगते, तुझी मोदकांच्या पिठीची रेसिपी माझ्या धाकट्या बहिणीला दिली, ती आनंदाने नाचतेय, मस्त झाले तिचे मोदक. मला म्हणाली तुझ्या मैत्रिणीला थॅंक्यू सांग)

Happy किती सुरेख!!! असं कृती, साहित्य इ इ रकान्यात न बसवता आई-काकू सांगतात तशी सरळ साधी रेसिपी किती दिवसाने ऐकली.

धन्यवाद सगळ्यांना

हे तुम्ही असं निखळ (बृटली ऑनेस्ट) तरी प्रेमाने लिहिता म्हणून तुमचा फॅन आहे मी. Happy >> अमितव, थॅंक्यु हो ...

ती आनंदाने नाचतेय, मस्त झाले तिचे मोदक. मला म्हणाली तुझ्या मैत्रिणीला थॅंक्यू सांग) >> धनुडी मस्तच वाटलं वाचून.

असं कृती, साहित्य इ इ रकान्यात न बसवता आई-काकू सांगतात तशी सरळ साधी रेसिपी किती दिवसाने ऐकली. >>सि , Happy

वावे अंजली डायरेक्ट कुकरात करून बघा एकदा , नारळीभात मस्त होतो तर साखरभात पण होईल असं वाटतंय. तरी ही साधा करणार असाल तर एक टिप म्हणजे भात कुकरात मऊ मोकळा शिजवून घ्या. म्हणजे साखर घालून तो परफेक्ट होतो. तसेच थोडा सैल असतानाच गॅस बंद करा गार झाला की मोकळा होतो छान.

गणपती दिवसात नाही पण इतर सणाला कधीतरी, माझी आईही साखरभात फार सुरेख करायची, ते आठवलं. >>> अंजू हो ना

छान लिहिलेय ममो, तुम्ही वास्तवापासून दूर न जाता , हळुवार व गोडवा असलेले लिहिता, हे लेखनकौशल्य आवडते. तुमचे बहुतेक सगळेच लेख वाचलेत. Happy
माझी आईही साखरभात फार सुरेख करायची, ते आठवलं. >>> +१

मस्त लिहीलेस गं. खुप आवडले. साखरभात मला फारसा आवडत नाही पण तुझा फोटो अगदी कातील आलाय.

तेव्हाचे दिवसही आठवले. मला कित्येक वर्षे रेशन दुकानाव्यतिरिक्त बाहेर तांदुळ, गहु, साखर, रॉकेल मिळते हे माहित नव्हते, जेव्हा कळले तेव्हा धक्का बसलेला. आजच्या पिढीला हे वाचुन धक्का बसेल. Happy

६०-७० च्या मध्यात भारतात अभुतपुर्व म्हणता येणार नाही पण अभविष्यती असा दुष्काळ पडला, धान्य मोठ्या प्रमाणात आयात करावं लागलं आणि ह्या समस्येवर कायमचा तोडगा म्हणुन हरितक्रांतीचा जन्म झाला. अडाण्यांच्या ह्या देशात हरितक्रांती आज शाप ठरलेली आहे. ती झाली नसती तर तेव्हापासुन आतापर्यंत त्रासच झाला असता. झाली याचा त्रास आता दिसायला लागलाय.

हृद्य आठवण!
टंचाईची नाही, पण रेशनसाठी रांग लावल्याची आठवण आहे. पुढे पुढे रेशन वरची फक्त साखरच घ्यायचो.

आईने एकदा माझ्या वाढदिवसाला केलेला साखरभात आठवला. तिने तो एवढा नटवला नव्हता. वावे म्हणतात तसं सगळं एकत्रच शिजवलं असावं.

सर्वांना धन्यवाद
तुम्ही वास्तवापासून दूर न जाता , हळुवार व गोडवा असलेले लिहिता, हे लेखनकौशल्य आवडते. >> अस्मिता थॅंक्यु.

साधना , सगळ्या प्रतिसदलाच मम म्हणते. Perfect लिहिलं आहेस.

टंचाईची नाही, पण रेशनसाठी रांग लावल्याची आठवण आहे. पुढे पुढे रेशन वरची फक्त साखरच घ्यायचो. >> आम्ही ही. पण काही काळ साधनाने लिहिलय तस सगळं रेशन दुकानातच मिळे. पुढे पुढे मुबलकता आल्यावर कार्ड चालू रहाण्यासाठी ओळखीतल्या गरजूना ही कार्ड देत होतो आम्ही. रेशन कार्ड हे एक चांगलं address identity proof होत म्हणून ते जपून ठेवावं लागत असे. अजून ही कार्ड जपून च ठेवलं आहे.

अनु, नारळी भाता पेक्षा खूप वेगळी चव लागते साखरभाताची. करून बघ एकदा यु ट्यूब वर खूप रेसिपी आहेत बिनपाकाच्या ही. पूर्वी साखरेच्या दुर्मिळतेमुळे हे एक प्रतिष्ठित पक्वान समजले जाई. अजून ही साग्रसंगीत पंचापक्वान करतो तेव्हा साखरभात असतोच .

नेहमीप्रमाणेच रसाळ आणि हृदयस्पर्शी आठवणींनी भरलेला लेख. >>+११

रेशनच्या रांगेत मी ही उभी राहिले आहे, त्यामुळे ते रिलेट झाले अगदी.

एखाद्या तलम वस्त्राची घडी अलगद नाजूक हाताने उलगडावी तसे तुमचे लेख असतात.

एखाद्या तलम वस्त्राची घडी अलगद नाजूक हाताने उलगडावी तसे तुमचे लेख असतात. >> + ११११
निकु छान व्यक्त केलेत मनातले विचार. मलापण खूप आवडते मनीमोहोर यांचे लिखाण. पण तुमच्यासारखे व्यक्त नाही करायला जमत.

लेख आवडला. लेखानिमित्त स्मरणरंजनही झाले. : स्मित
"गोड" भाताविषयी पूर्वग्रह असल्यामुळे चाखूनही पाहिलेला नाही. भात नेहमी साधा, खारा किंवा तिखटच हवा ! घरातल्या मंडळींनी खाण्याबाबत सहकार्य केलं तर साखरभात करून बघेन एकदा.

रेशनच्या रांगा लहानपणी लावलेल्या आहेत! शनिवारी शाळा अर्धा दिवस असे. त्यानंतर दुपारी रेशनसाठी जात असू . टंचाई त्या बालवयात जाणवत नसली तरी वृत्तपत्रांत विशेषतः सणासुदीच्या दिवसांत साखर, डालडाच्या टंचाईच्या बातम्या असत. रेशन दुकानात साखर , डालडा , रवा, केरोसीन इ. उपलब्ध झाले की ती बातमी कर्णोपकर्णी होई आणि मोठाल्या रांगा लागत. कधी कधी रव्यात कचही निघत असे. त्याचे आमची माऊली काय करीत असे ते आता आठवत नाही पण त्या पिढीने फार कष्ट उपसले हे मात्र खरे.