भिकार्‍यांना भिक देणे योग्य आहे का?

Submitted by छावा on 7 December, 2009 - 08:00

आजकाल शहरात रस्त्यांवर, मंदिरांच्या बाहेर भिकार्‍यांची मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुर्वी पाच्-दहा पैशाची भिक मागणारे आज एक रुपया ते पाच रुपये मागतात. चार-आठ आणे दिलेत तर ही मंडळी आपली इज्जत काढते.
काही जण पुण्य मिळवण्यासाठी तर कधी देवाच्या भितीने भिकार्‍यांना काहीना काही भिक्/दान देतात, तर काही लोक भिकार्‍याची कटकट आपल्या मागुन लवकर जावी म्हणुन का होईना पण भिक देतात.
या भिकार्‍यात धष्टपुष्ट, अपंग, कुष्ठरोगी, लहान मुले अशांचा भरणा असतो. मग देव देवतांचे फोटो गळ्यात लटकविले जातात. त्यांच्या भिक / दानाची रक्कम त्याच्या असहायतेनुसार ही वाढते. या पैश्या पैकी मोठा भाग भिकारी नशा पाणी व मजा करण्या साठी खर्ची करतात. यात भिकारी मुलेही मागे नाहीत.

मग भिकार्‍यांना भिक देणे योग्य आहे का? हा विचार मनात येतो.
याचा विचार करतांना खालिल मुद्दे समोर येतात-
यात पहिल्यांदा भिकार्‍यांचे वर्गिकरण करणे आवश्यक आहे.
अ) धष्ट्पुष्ट भिकारी
ब) म्हातारे भिकारी
क) बाल भिकारी
ड) अपंग भिकारी
इ) वेडे भिकारी
ई) व्हाईट कॉलर भिकारी.

अ) धष्ट्पुष्ट भिकारी :- आजकाल मजुरांचा प्रचंड तुटवडा असुन ही मंडळी भिक मागते. आणि आपण देतो. याची काम करण्याची द्यानतच नसते. अशांना सर्वांनी भिक देणे बंद केले पाहिजे. म्हण्जे त्याना जगण्यासाठी काम करावेच लागेल.

ब) म्हातारे भिकारी:- म्हातारा काम करु शकत नाही म्हणून त्यांची मुले त्या म्हातार्‍याला भिक मागुन कमाई करायला लावतात. जर खरोखर असहाय्य असतिल तर वृध्दाश्रमात त्यांना भरती होता येईल. पण असे खुप कमी असतात.

क) बाल भिकारी:- आई वडील बळजबरी आपल्या मुलाला भिक मागण्यास भाग पाडतात. लहान मुलांनी भिक मागितल्यावर कोणीही लवकर भिक देतो. अशा मुलांचे शिक्षण बंद होते. यामुळे ही मुले व्यसनी ही होतात. ते मोठे झाल्यावर भिक मिळत नाही आणि काम करण्याची द्यानत नाही. म्हणुन ही मंडळी गुन्हेगारी कडे वळतात. उदा. चोरी, हप्तावसुली, खुन व इतर अनेक.

ड) अपंग भिकारी:- अपंगाचा बाऊ करुन ही मंडळी भिक मागते. परंतु जेष्ठ समाजसेवक मा. बाबा आमटे नी हे आनंदवन अपंग आणि कुष्ठरोग्यांच्या उपचार आणि पुर्नवसनासाठी सुरु केले. आज किती तरी लोकांचा आधार हे आनंदवन झाले आहे. तेथे अपंगांना ही स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षित केले जाते.याच धर्तीवर काम करणार्‍या अनेक शासकिय-अशासकिय संस्था आहेत. असे असतांना बर्‍याच अपंग लोकांनी भिक मागण्याचा सोपा मार्ग पत्करला आहे. त्यानी ठरवले तर त्यांनाही स्वयंपुर्ण होता येईल. पण त्याना आता कष्ट करण्याचे जिवावर येते म्हणुन बाय चॉईस ते भिकारी झालेत.

इ) वेडे भिकारी:- यांचे प्रमाण नगण्य आहे. परंतु अशा लोकांना पोलिस, तहसिदार यांच्या मदतीने वेड्यांच्या इस्पितळात नेऊन चांगले आणि स्वयंपुर्ण बनवता येऊ शकते.

ई) व्हाईट कॉलर भिकारी:- नव्या जमाण्यात असेही भिकारी निर्माण झालेत. चांगले कपडे घालायचे आणि माझे पाकिट चोरीला गेले. मला इंटरव्ह्युव ला जायला आणि घरी जायला पैसे नाहीत. मला मदत करा. मी घरी गेल्यावर तुमचे पैसे तुमच्या पत्त्यावर MOने परत पाठविन. कृपया मदत करा. असे सांगणारे व्यवसाईक भिकारी ही निर्माण झाले आहेत.
अशांना तर पोलिसांच्या ताब्यातच दिले पाहिजे. हे भिक मागत नाहीत तर लोकांची फसवणुक करतात.

मग अशा भिक मागणार्‍यांना आपण भिक /दान देऊन चांगले काम करतो कि वाईट?
आपणच भिक देणे बंद केले तर भिकार्‍यांना जगण्या करिता काम करावेच लागेल ना.
म्हणुन, भिकार्‍यांना भिक देणे योग्य आहे का?
आपल्याला काय वाटते?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्विनी,
तू म्हणलीस हे खरे असले तरी आपण पैसे देण्याने सगळ्या विकृत सिस्टीमलाच खतपाणी घातले जाते असं मला वाटतं.

मी कुणालाही भीक देत नाही... मला यांच्याबद्दल राग नाही पण दया-माया सुद्धा वाटत नाही..
काहीही कष्ट न करता आयता मिळालेला पैसा कधीही वाईटच...

मी असे ऐकलेले आहे.. की सिख लोकांच्यात भीक मागणे हा गुन्हा समजतात.. पंजाबात नावाला सुद्धा भिकारी आढळणार नाही असे एका पंजाबी मित्राने सांगितले होते.. हे कितपत खरे आहे ?

रस्त्यावरचे भिकारी संस्कारहीन असतात, हे मला तरी पटत नाही... मला एका हिजड्याने चांगला धङा दिलेला आहे..

सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन आम्ही शेअर टॅक्सीने दादरला येत होतो.. मी खिडकीजवळ होतो. बाहेर एक हिजडा आला आणि पैसे मागू लागला. मी दहा रूपये तरी जनरली देतो. पण माझ्याकडे नेमके १०० ची नोट होती, ती त्याला दिली आणि ९० रू द्यायला सांगितले.बायकोकडेही सुट्टे २ रु होते.. .. नेमकी त्या हिजड्याने कनवटीला पैशाची जी बारीक पिशवी लावली होती, तिची गाठ निघेना.. तोपर्यन्त टॅक्सी भरली.. मी ड्रायवरला जरा थांबायला सांगितले, पण लोक कुरकुरु लागले.. या हिजड्याला पैसे परत द्यायचे नसतील, म्हणून तो नाटक करतोय असे म्हणू लागले..तो आता असाच वेळ काढणार आणि पसार होणार असे लोक म्हणत होते...
आणि अनपेक्षितपणे त्या हिजड्याने मला १०० रु परत दिले.. आणि बायकोच्या हातातील दोन रु घेतले.. टॅक्सी चालू झाली... मी मागे वळून पाहिलं. मला वाटले होते, तो/ती नाराज असेल, पण नाही, हात वर करून 'भला हो तेरा' म्हणत होता..दहा रुच जर द्यायचे होते, तर त्याला दोन लाडू दिले असते तरी चालले असते, पण मला तेही सुचले नाही.. कारण १० द्यायचे आहेत, यापेक्षा ९० परत घ्यायचे आहेत, हे डोक्यात जास्त भिनले होते...
ढीगभर सुखे मिळूनसुद्धा सिद्धीविनायकाच्या देवळात नव्या अपेक्षेने रांग लावणारे आणि थोडे अपेक्षेपेक्षा कमी मिळाले तरी देव्/नशीब यांच्या नावाने खडी फोडणारे आपण.... आणि तो हिजडा... मला हे व्यस्त प्रमाण आजही वारंवार आठवते... यात हिजड्याचा प्रोफेशनलपणा असू शकतो, पण काहीही असले तरी हा एक धडा होता, हे नक्की...

भिकारी, गलितगात्र लोक हे आपला अहंकार कमी करायला मदत करतात. राजा आणि कुणीतरी भिकारी यांची गोष्ट प्रसिद्धच आहे. भिकारी राजाकडे भीक मागायला जातो, तर राजा देवासमोर मला आणखी राज्य दे, पैसा दे म्हणत याचना करत असतो... भिकारी उलट पावली परत जातो, म्हणतो, हा तर आपल्यापेक्षा मोठा भिकारी... तसा आपल्यासमोरुन भिकारी उलट पावली न जाणे, हे मला जास्ती महत्वाचे वाटते... त्या पैशाचे रॅकेट, फ्लॅट काही का होईना.... तो आपला प्रांत नाही... आणि नशापाणीचाच विचार केला तर, काही नशा अशा आहेत, की ज्या फक्त खासदारांच्या आणि मंत्र्यांच्या पोरानाच परवडतात... भिकार्‍याना कशाला नावे ठेवायची? भिकार्‍याना रॅकेटमध्ये राबवणारे सुशिक्षितच तर असतात...

अश्विनी,
<<<<समतोल सारख्या संस्थांची गरज आहे. >>>
समतोल संस्थे विषयी आणखी काही समजू शकेल का ?
सुनिता.

वर उल्लेख आलेला आहेच, भिक्षापात्र अवलंबणे, नको जिणे लाजिरवाणे असं तुकारामबोवा म्हणतात.. त्यामुळे मी तरी सत्पात्री दान होतय ना हे पाहून पैसे देतो.. पैशांव्यतिरीक्त अन्नदान, वस्त्रदान केव्हाही उत्तम..
तसेच पावत्या फाडणे, धर्मक्षेत्रांच्या आणि तिर्थस्थळांच्या इथे होणारी लुबाडणूक म्हणजे धार्मिक दहशतवादाने मागितलेली भीकच.. अतिशय चीड येते असल्या प्रकाराची.

मी असे ऐकलेले आहे.. की सिख लोकांच्यात भीक मागणे हा गुन्हा समजतात.. पंजाबात नावाला सुद्धा भिकारी आढळणार नाही असे एका पंजाबी मित्राने सांगितले होते.. हे कितपत खरे आहे ?

<< खरच का ?
अता आठवून पाहिलं तर खरोखर एकही सीख भिकारी अत्ता पर्यंत आठवत नाही खरं !
लंगर सेवेचा उद्देश पण याला कारणीभूत असेल का?
गुरुद्वारा मधल्या लंगर सेवेत कुठल्याही जातीच्या/धर्माच्या माणसाला पोटभर आणि अतिशय आदरानी जेवायला घालतात् म्हणून कदाचित पोटासाठी भीक मागणार्‍यांची संख्या तरी नक्कीच कमी असु शकेल !

>>तू म्हणलीस हे खरे असले तरी आपण पैसे देण्याने सगळ्या विकृत सिस्टीमलाच खतपाणी घातले जाते असं मला वाटतं.
नुसते पैसे द्यावेत असे मी म्हंटले नाही. एकंदर जो सूर जाणवला की ही मुलं आळशी असतात, काम करायला नको, व्यसन करायला पैसे हवेत म्हणून भीक मागतात त्याच्या विरोधात ते लिहीलं होतं. असा विचार करून आपण फक्त आपली जबाबदारी झटकून टाकतो आहोत. पैसे द्यायचे नसले तर नका देऊ. पण किमान त्यांना नावं नका ठेवू. 'मी भीक देत नाही' ह्यात फार काही अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे असं मला वाटत नाही. त्याने ही विकृत सिस्टीम बदलणार नाही. भीक देत नसाल तर मग दुसरं काय करता येईल याचा विचार केला पाहिजे. 'मला काय त्याचं?' अशी धारणा सगळ्या समाजालाच घातक आहे.

>>मुळात लहान मुलांनि स्वतः काम करुन पोट भरावे अशि अपेक्षा करणे मला तरि पटत नाहि
रमा, या वाक्याला सहस्त्र अनुमोदने. जोपर्यंत लहान मुलांना पोटासाठी अन्न, डोक्यावर छप्पर आणि सर्व प्रकारच्या मानसिक, लैंगिक शोषणांपासून सुरक्षितता यासाठी तीळ तीळ झिजायला लागतय तोपर्यंत कुठलाही समाज प्रगत म्हणवण्याच्या स्थितीला येत नाही.

>>समतोल संस्थे विषयी आणखी काही समजू शकेल का ?
सुनिता, इथे मायबोलीवरच झुलेलाल यांनी समतोलविषयी पहिल्यांदा लिहीले होते. रेल्वे स्टेशन इ. ठिकाणी घरातून पळून आलेली मुले वाममार्गाला लागण्याचा, गुन्हेगारी टोळ्यांमध्ये अडकण्याचा किंवा वरच्या रॅकेटमध्ये सापडण्याचा जो धोका असतो, तो वेळीच ओळखून अश्या मुलांना परत घरी पाठवण्याचे, त्यांना पालकांशी रियुनाईट करण्याचे काम 'समतोल फाऊंडेशन' करते.

http://www.maayboli.com/node/2864

जामो, अश्विनी अनुमोदन.

परवा मुम्बैतील टॅक्षीवाल्या कडून दोन गोष्टी कळल्या.

१) माहीम चर्च समोरील सिग्नल जवळ एक माय बेटी भीक मागतात. ती बेटी काहीही करून लोकांना उल्लु बनविते. व माय चे नेहमीचे गाणे म्हणले मेरा पती मर गया उस्की मय्यत को पैसे नही वगैरे. एकदा एका माणसाने जाताना तिला ५०० रु. दिले. येतानाही तोच टेक्षीवाला होता व तोच प्याशिन्जर. हिने परत रड्गाणे चालु केले. तो सट्कला. म्हणला तुझे नक्की किती पती मेले आहेत. सगळ्यांना आण. एकदमच जाळून टाकतो. ती गायब झाली.

२) काही मुल भिकारी स्त्री वाहन चालकांना घेरतात. दीदी पैसा देदो वगैरे चालू करतात. तिचे लक्ष हट्ले की तो परेन्त एक बारके पोर खाली जावुन पेट्रोल चा पाइप काढून टाकते. सिग्नल पड्ला की गाडी सुरू होत नाही
मग एक माणूस मेकॅनिक हवा का म्हणून येतो. व २०००- ३००० चा खर्च त्या बाइ कडून घेतात. या ड्रायवर ने
ते एकदा पाहिले व एका बाइचे पैसे चक्क वाचविले होते.

मी असे ऐकलेले आहे.. की सिख लोकांच्यात भीक मागणे हा गुन्हा समजतात.. पंजाबात नावाला सुद्धा भिकारी आढळणार नाही असे एका पंजाबी मित्राने सांगितले होते.. हे कितपत खरे आहे ?>>>>>>

हे खरे आहे!
मी ही पोष्ट वाचुन लगेच माझे बॉस जे शिख आहेत त्यांना फोनवर विचारले.
त्यांनी यास दुजोरा दिला. त्यांनी सांगितले कि, " पंजाब मध्ये भिक मागितली जात नाही.
पंजाब मध्ये मजुरांचा तुटवडा आहे, म्हणुन बिहारी खुप आले आहेत. आता काही बिहारी भिक मागतांना कुठेतरी दिसतात. बिहारींनी तिथे ही प्रवेश केला आहे. अशा भिकार्‍यांना तेथिल लोक गुरुव्दाराच्या लंगर मध्ये घेऊन जातात. पोट भर जेऊ घालतात. आणि परत भिक मागतांना आढळला तर पोलिसात जमा करतात. त्यामुळे शक्यतो परत कोणी भिक मागत नाही."
मी पंजाबला या बद्दल सलाम करतो.

ही मुलं ड्रग्स का करतात माहित आहे? अवचटांचे लेख वाचा म्हणजे उत्तर मिळेल.पोटाची खळगी भरायला जेंव्हा अन्नाचा तुकडाही मिळत नाहीना तेंव्हा ७-८ वर्षापासूनची ही छोटी मुलं मिळेल त्या साधनाने (बूट पॉलिश, आयोडेक्स आणि इतर अश्याच चीप आणि हानीकारक गोष्टींनी) नशा मिळवण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून पोटाची आग जाणवणार नाही. किती सोपं आहे हे म्हणणं की त्यांना व्यसनांसाठी पैसेच लागतात. >>>>>>>>>>>>>>>>>>>
हे मनाला पटत नाही.
अहो! नशेसाठी बुट पॉलिश, आयोडेक्स साठी निदान २० ते ३० रुपये तरी लागतात. मग त्या ऐवजी या पैशात काही तरी ते खाऊ शकतात ना? आणि ही नशा केले नंतर भुक लागत नाही हे कोणी सांगीतले. जगण्या करता त्यांना काहीतरी खावेच लागेल. नुसते बुट पॉलिश, आयोडेक्स वर होत नाही.

मुले पळवून आणून भीकेला लावणे हे केव्हढे मोठे रॅकेट आहे याची कल्पनासुद्धा करता येणार नाही.>>>>>
आपल्यासारख्या लोकांनी त्यांना जमेल तशी पैशाची मदत केली तर त्यांना अजून बळ मिळेल.>>>>>
तुम्हाला काय वाटते? अशा मुलांना पैसे आणल्या नंतर ते गुंड त्रास देत नाहीत? पोटभर जेवायला देतात?
अहो, अशा मुलांना भुकेल्या पोटी ही मंडळी रोज त्रास देतातच.
म्हणजे आपण दिलेले पैसे शेवटी गुंडाच्याच खिशात जातो ना? म्हणजेच आपणच त्याला प्रोत्साहन देत नाही का? या पापात आपण भागिदार होत तर नाहीत ना? आपण लोकांनीच भिक देणे बंद केले पाहिजे. कोणी जर भिक दिली नाही तर आपोआप भिक मागणे ही बंद होईल. थोडे दिवस त्या पोरांनाही त्रास होईल. पण लोक भिक देत नाहीत. ही गोष्ट जेव्हा त्या गुंडांच्या लक्षात येईल तेव्हा हा धंदा आपोआप बंद होईल. आणि त्या मुलांची या जाचातुन सुटका तरी होईल आणि भविष्यात इतर बालक ही या अघोरी सिस्टीम चे बळी होणार नाहीत. तुम्हाला जर वाटलेच तर भिकार्‍यांना खायला जरुर द्या, पण भिक देऊ नका.
असे ऑर्गनाझ सिस्टीमने भिक मागितली जात असेल तर आपण शासनास, प्रसिध्दी माध्यमांना कळवुन याला आळा घालु शकतो. यात आपले नाव गुपित ठेवता येते. ही खरी आपली सामाजिक जबाबदारी आहे. असे मला वाटते.
पंजाब राज्य याचे चांगले उदाहण आहे. तेथिल लोक सधन आहेत. त्यांनी ठरवले तर ते ही भिक देऊ शकतील. पण ते भिक देत नाहीत. बिहारींनी भिकारी सिस्टीम सुरु करणेचा प्रयत्नही केला पण कोणी भिकच देत नाही. लंगर मध्ये जेऊ मात्र घालतात. बाकी वर लिहलेच आहे. Light 1

नीधपशी सहमत. गाणारे कलाकार (त्याना भिकारी कसे म्हणू?) असले तर मला त्यांच्याबद्दल कणवे ऐवजी आदर वाटतो.माझ्यापेक्षा यांच्याकडे जास्त काहीतरी आहे असे वाटते. त्यामुळे गाणार्‍याना मीही पैसे देतो. अंध अपंगाना साम्भालणे हे खेरे तर समाजाचे कर्तव्य आहे. भिकेची भिकार्‍याना इतकी सवय लागून जाते की त्याना काम करावसे वाटतच नाही. सरकारने काही ठिकाणी बेगर्स होम बांधले आहेत तिथे अंगमेहनतीचे काम देऊन अल्प मोबदला व जेवण खाण दिले जाते. नगर जिल्ह्यात श्रीगोन्दा तालुक्यात असे बेगर होम आहे...

परत भिक मागतांना आढळला तर पोलिसात जमा करतात >>
खरच सगळ्या देशात हे अवलंबले पाहिजे....
बिहारींनी तिथे ही प्रवेश केला आहे >> Rofl

म्हणजे आपण दिलेले पैसे शेवटी गुंडाच्याच खिशात जातो ना? म्हणजेच आपणच त्याला प्रोत्साहन देत नाही का? या पापात आपण भागिदार होत तर नाहीत ना? आपण लोकांनीच भिक देणे बंद केले पाहिजे.>>>>>>> अनुमोदन. कोण जाने हे पैसे पुढे देशविघातक कार्यांसाठीही वापरले जात असतील..जसे pirated Cds रकेट (अर्धचंद्र कसा द्यायचा?)

मला त्या रस्त्यावर अथवा फुटपाथवर रांगोळी काढणार्‍यालाही मदत कराविशी वाटते.. काहीतरी तर कष्ट करतात ते आयती भीक मागण्यापेक्शा.. बाकी भिकारी मुलांना तर खायला घालणे ही सर्वात चांगली मदत आहे अर्थात त्यांनी accept केली तर!

अजुन एक, हिजड्यांना मात्र पैसे देते मी.. त्यांना रोजगाराच्या समान संधी मिळत असतील असे नाही वाटत.. Sad

>>अहो! नशेसाठी बुट पॉलिश, आयोडेक्स साठी निदान २० ते ३० रुपये तरी लागतात. मग त्या ऐवजी या पैशात काही तरी ते खाऊ शकतात ना? आणि ही नशा केले नंतर भुक लागत नाही हे कोणी सांगीतले. जगण्या करता त्यांना काहीतरी खावेच लागेल. नुसते बुट पॉलिश, आयोडेक्स वर होत नाही.

बर्‍याचदा ही मुले बूट पॉलिश करणारी असतात. जी नसतात त्यांना फेव्हर म्हणून (अन्य मार्गाने त्याचा मोबदला घेऊन) त्यांना बूट पॉलिशचा वास घेऊ दिला जातो. ही नशा केली तर आतडे जाळणार्‍या भूकेपासून तात्पुरती सुटका होऊ शकते. जगण्याकरता खावेच लागेल, मान्य. पण नाहीच मिळाले तर कुठून आणणार? अशीच मालन्यूट्रीशन होऊन खुरडत खुरडत जगतात आणि अकाली मरण पावतात. पण आपल्याला काय फरक पडतो? आपण 'भीक न देण्याचे' महान तत्व जोपासणे हे महत्वाचे. माणसाच्या जीवाला काय किंमत आहे. किडामूंगीसारखी मरणारच ती.
तुम्हाला जर अजून माहिती हवी असेल नशेची साधने ह्या मुलांना कशी उपलब्ध होतात आणि का त्यांना ती वापरावी लागतात तर अनिल अवचटांचे 'धागे उभे आडवे' वाचा.
हे खरे आहे की एकदा त्या नशेची सवय झाली की त्यासाठी वाट्टेल ते करायची त्यांची तयारी असते. पण ते तर भिकारी नसलेल्या आणि वयाने मोठे झालेल्या इतर लोकांबाबतपण खरे आहे.

>>मुले पळवून आणून भीकेला लावणे हे केव्हढे मोठे रॅकेट आहे याची कल्पनासुद्धा करता येणार नाही.>>>>>
आपल्यासारख्या लोकांनी त्यांना जमेल तशी पैशाची मदत केली तर त्यांना अजून बळ मिळेल.>>>>>म्हणजे आपण दिलेले पैसे शेवटी गुंडाच्याच खिशात जातो ना?

पैशाची मदत हे मी समतोलसारख्या संस्थांना म्हंटलं होतं. गुंडांना नाही.

>>असे ऑर्गनाझ सिस्टीमने भिक मागितली जात असेल तर आपण शासनास, प्रसिध्दी माध्यमांना कळवुन याला आळा घालु शकतो.

हे तर प्रचंड विनोदी. तुम्हाला काय वाटतं, हे कुणाला माहित नसतं? पोलिसांपासून मोठ्या अधिकार्‍यांपर्यंत सगळ्यांना ठाऊक असतं हे. पण सगळ्यांचे हात गुंतलेले असतात ह्यात. तुम्हाला खरच माहित नसेल तर ही लिंक पाहा.
http://www.loksatta.com/lokprabha/20091120/baldin01.htm

'मी भीक देत नाही' हे जेव्हढ्या अभिमानाने आपण सांगतो, तितक्या पोटतिडीकेने सांगा ना, तुम्ही काय करता यासाठी. आणि हे मी फक्त छावा ह्यांना उद्देशून म्हणत नाहीये. पण मूळात प्रॉब्लेम आहे हेच मान्य करायचे नाही मग तो रिझॉल्व्ह करण्याची जबाबदारी पण नाकारता येते. मग ती मुलच कशी दोषी आहेत आणि आपण मदत करायची त्यांची लायकीच नाही हे सांगितलं की आपलं नाकर्तेपण झाकता येतं.

माझ्यापुरते मी सोल्युशन काढले आहे ते असे:

१. जेंव्हा शक्य असेल तेंव्हा ह्या मुलांना खायला देणे, कपडे देणे, इतर जीवनोपयोगी वस्तू देणे. किमान त्यांना हिडिसफिडीस न करता माणूस़कीच्या दृष्टीकोनातून संवाद साधणे.
२. समतोल फांऊडेशन, आसरा सारख्या संस्थांना तसेच वरती कुणीतरी म्हंटल्याप्रमाणे बेगर्स होम, लंगर, इत्यादिना आर्थिक मदत करणे.
३. स्वतःच्या खिशातले पैसे काढून आर्थिक मदत प्रत्येक वेळी शक्य असेलच असे नाही. पण फंड रेझींगचे कार्यक्रम करून देणग्या देणे. हे करताना संस्था विश्वासार्ह आहे याची मात्र खात्री करून घेतली पाहिजे.

असो. कुणीतरी हिजड्यांचा विषय काढला आहे. ते ज्या गोष्टी करतात त्या अतिशय घृणास्पद असतात. आणि मला पण त्यांची भीति वाटते. खोटं कशाला बोलू? पण किती जणांना हे माहित आहे की भारतातले ९९% हिजडे हे फोर्सफुली हिजडे बनवलेले असतात. जन्माला येतात तेंव्हा ती आपल्यासारखीच नॉर्मल मुलं असतात. पण भीक मागण्यासाठी त्यांना जबरदस्तीने हिजडे केलं जातं. त्या सगळ्या गोष्टी, ते हावभाव, त्या टाळ्या शिकवल्या जातात. Sad इतकं भयाण आहे हे सगळं. जितकं वाचू तितकी वेड लागायची पाळी येते.

मला माहित आहे की ह्या उपायांनी सगळी समस्या सुटणार नाही. खूप खूप मोठा प्रॉब्लेम आहे हा. कधी कधी खूप निराश वाटतं. काहीही केलं तरी आकाशाला ठिगळ लावल्यासारखच आहे हे जाणवतं. पण झोपडपट्टीत राहून स्वतःची परिस्थिती नसताना अनाथ मुलांचा सांभाळ करणारे लोक आहेत. आपण आपला खारीचा वाटा तरी उचलू शकतो.

अश्विनी यांच्या मताशी सहमत... जेव्हा, जिथे, जेव्हढी शक्य आहे तेव्हढी मदत करा... मला जेव्हा शक्य होत नसते तेव्हा मनातल्या मनात माफी (त्यांना बघुन मला तरी थोडे गुन्हेगारा सारखे वाटते, लहान मुलांना बघुन तर पोटात कालवते) मागुन पुढे जातो. दैनंदिन जिवनात, प्रत्येक व्यावसायात खरे- खोटे पणा आहेच तसाच तो येथेही आहे, पण म्हणुन नकारात्मक दृष्टी नको. काहीच नाही जमले तर किमान माणुसकीने वागवा.... त्याला काहीच पैसे नाही लागत.

म्हणजे आपण दिलेले पैसे शेवटी गुंडाच्याच खिशात जातो ना?
--- आपण कष्टाने कमावलेल्या पैशातुन जेव्हा कर भरतो, त्यापैकी काही वाटा राजकारण्यांच्या (गुंडांच्याच) खिशात जातो... अर्थात आपले नियंत्रण नाही त्यामुळे मुकाटपणे सोसतो आहेच.

अश्विनी, अगदी सहमत!

>>> मग ती मुलच कशी दोषी आहेत आणि आपण मदत करायची त्यांची लायकीच नाही हे सांगितलं की आपलं नाकर्तेपण झाकता येतं.
किती खरं! Sad

प्रेग्नंट भिकारणींबद्दल वाचलं/ऐकलं होतं. त्यातल्या काही बलात्काराच्या बळी असतात! Sad त्यांचे बाळंत होतानाचे हाल ऐकवत नाहीत इतके भयानक आहेत.

मी पण अश्विनीशी सहमत आहे.

मायबोलीवर 'सुपंथ' नावाचा ग्रूप या वर्षाच्या सुरूवातीस, म्हणजे जानेवारीत, काही मायबोलीकरांनी पुढाकार घेऊन (केदार, उपास, वगैरे) सुरू केला होता. ह्या उपक्रमा अंतर्गत गरजू संस्थांना दर महिन्याला एकदा अशी देणगी देण्यात येते. ग्रूपने नोव्हेंबरपर्यंत (११ महिन्यात) 'निराधार बाल संगोपन अनाथाश्रम' आणि 'समतोल फाउंडेशन' या संस्थांना मिळून सुमारे ८५,००० रू देणगी दिली आहे.

सांगण्याचा उद्देश हा आहे की नुसती हळहळ व्यक्त करून काहीही होत नाही. बर्‍याच लोकांना मदत करायची इच्छा असते. पण आपली मदत विश्वासार्ह लोकांतर्फे योग्य ठिकाणी पोचली पाहिजे असेही वाटत असते. ज्यांना मदत करायची इच्छा आहे त्यांनी ह्या ग्रूपला जरूर सामील व्हावे. मला असेही वाटते की रस्त्यावर पैशांच्या स्वरूपात शक्यतो मदत करू नये, उलट तेच पैसे व्यवस्थित साठवून अशा संस्थांना देणगी स्वरूपात नियमितपणे द्यावेत.

सुपंथची जाहिरात करण्याचा अजिबात उद्देश नाही. बाफ उघडला गेला, समतोल आणि मदतीचा विषय निघाला म्हणून मग सांगावेसे वाटले.

>>>>लहान मूल दाखवत भीक मागणार्‍यांनाही मी काही देत नाही. मूल जन्माला घालायची गरज/ अधिकारच काय जर भीक मागितल्याशिवाय एक कण त्या मुलाच्या पोटात तुम्ही घालू शकत नाही तर?
मजा तुमची, मूल तुमचं आणि आम्ही काय म्हणून आमच्या कष्टाचा पैसा द्यायचा...
सगळ्यांचिच मुले काहि मजा करुन झालेलि नसतात. प्रेग्नंट भिकारणीं काही बलात्काराच्या बळी असतात.घर नसताना बाहेर फुट्पाथ वर राहाताना त्यांना कशा कशा ला सामोरे जावे लागते हे त्यांनाच माहित.त्यांचे मुले देखिल रस्त्यावरच जन्माला येतात. कुठुन शक्ति येणार आहे त्यांना काम करायचि?
त्यात बरेच लोक धडधाकट बायाना काहीच देऊ नये या मताची असतिल तर बिचार्‍यांना पोट भरण्यासाठि मुलांना पुढे करायला लागते.
बर्‍याचदा चांगल्या घरातिल लोकांना परिस्थिति मुळे रस्त्यावर यावे लागते. काहि महिन्यांपुर्वि इथे एक लेख वाचला होता सिंधूताई सपकाळांबद्दल. त्यांनाहि काहि काळ भिक मागुन पोट भरावे लागले होते.

अलिकडे अंध किंवा अपंग हे शब्दही अपमानास्पद समजले जातात. त्याऐवजी 'शारीरिक दुर्बल व्यक्ती' असे म्हणतात आणि दलित, हरिजन, मागास असे अपमानास्पद शब्द मागे पडून 'वंचित समाज' असा शब्द प्रयोग रूढ झाला आहे.>> अनुमोदन

सुपंथची जाहिरात करण्याचा अजिबात उद्देश नाही. बाफ उघडला गेला, समतोल आणि मदतीचा विषय निघाला म्हणून मग सांगावेसे वाटले.
>>> फचिन, आणि जाहिरात केली तरी काय वाईट आहे त्यात? सुपंथ काही प्रॉफिट मिळवणारा ग्रुप नाहिये. चांगल्या व निरपेक्ष निस्पृहपणे केलेल्या कामांचं कौतुक केलं तर काय बिघडलं? जे मनाने निर्मळ असतील त्यांना यात काहीच वावगं दिसणार नाही, ज्यांना ज्यात त्यात वाईट, काळबेरं शोधायची सवय असेल त्यांना ते कुठेही दिसेल Happy

त्यात बरेच लोक धडधाकट बायाना काहीच देऊ नये या मताची असतिल तर बिचार्‍यांना पोट भरण्यासाठि मुलांना पुढे करायला लागते.<<
अर्ध्याहून अधिक वेळेला भीक मागण्यासाठी मूल भाड्यानेही आणलेले असते.

आणि माफ करा जो भीक देत नाही आणि भिकार्‍यांसाठी स्पेशली काहीच करत नाही म्हणजे लगेच त्यांना नावे ठेवायला पुढे येऊ नये.
प्रत्येक जण कितीही कणव वाटली तरी प्रत्येक विषयात काम करूच शकेल असं नाही. आणि ते करता येत नसेल तर भीक दिली पाहिजे असं म्हणणं अजूनच गमतीशीर वाटतं.

प्रत्येक जण कितीही कणव वाटली तरी प्रत्येक विषयात काम करूच शकेल असं नाही. आणि ते करता येत नसेल तर भीक दिली पाहिजे असं म्हणणं अजूनच गमतीशीर वाटतं. >>> अगदी अगदी. प्रत्येकाचे कन्सेप्ट्स वेगळे असतात.

हे भिकारि तासाला १०० रु मिळवतात्.खर तर ते सामन्य मध्यम वरगाच्या माणसा पेक्षा जास्त मिळवात.
पुण्याच्या जहागिर हॉस्पिटल समोर्च्या चौकात्(माझे नातेवाइक दवाखान्यात असताना मला तिथे राहण्याचा प्रसंग आला होता) मि काहि दिवस पाहणि करुन प्रत्यक्ष पाहिले कि हे भिकारि उर्मट असतात व चान्गले धट्धाकट असतात्.यात बहुधा पर प्रांतिय च असतात .या भिकार्‍याना अजिबात भिक घालु नये.या मुळे
रिकाम टेकड्याना प्रोस्ताहन मिळते

परंतु काहि बावळट लोकांना हे कळत नसल्या मुळे ते भिक देतात व त्या मुळे हल्लि पुण्यात या भिकार्‍यांचा सुळ सुळाट झाला आहे.

||||||अपंगाना भिक द्यावी का?
>> छावा असे चुकुनही विचारू नका. त्या व्यक्तींना सहानुभूती नको असते तिथे ते भीक काय स्वीकारणार? |||||

प्रयोग,

दिल्लीला साई मंदिरासमोर काही अपंग भिकारी असतात. सरकारने त्यांना जयपूर फूट बसवून दिले. ते तो नकली पाय काढून ठेवतात आणि भीक मागतात. रात्री परत जाताना मग पाय चढवून जातात.

शरद

धन्यवाद फचिन. मी सुपंथ बद्दल लिहिणारच होतो, ज्या कोणांस सुपंथ बद्दल अधिक माहिती हवी असेल त्यांनी माझ्याशी, केदार जोशी किंवा रश्मी ओक ह्यांच्याशी संपर्क साधायला हरकत नाही.
सुपंथ विषयी अधिक माहिती इथे मिळेल -
सुपंथ ब्लॉग

Pages