भिकार्‍यांना भिक देणे योग्य आहे का?

Submitted by छावा on 7 December, 2009 - 08:00

आजकाल शहरात रस्त्यांवर, मंदिरांच्या बाहेर भिकार्‍यांची मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुर्वी पाच्-दहा पैशाची भिक मागणारे आज एक रुपया ते पाच रुपये मागतात. चार-आठ आणे दिलेत तर ही मंडळी आपली इज्जत काढते.
काही जण पुण्य मिळवण्यासाठी तर कधी देवाच्या भितीने भिकार्‍यांना काहीना काही भिक्/दान देतात, तर काही लोक भिकार्‍याची कटकट आपल्या मागुन लवकर जावी म्हणुन का होईना पण भिक देतात.
या भिकार्‍यात धष्टपुष्ट, अपंग, कुष्ठरोगी, लहान मुले अशांचा भरणा असतो. मग देव देवतांचे फोटो गळ्यात लटकविले जातात. त्यांच्या भिक / दानाची रक्कम त्याच्या असहायतेनुसार ही वाढते. या पैश्या पैकी मोठा भाग भिकारी नशा पाणी व मजा करण्या साठी खर्ची करतात. यात भिकारी मुलेही मागे नाहीत.

मग भिकार्‍यांना भिक देणे योग्य आहे का? हा विचार मनात येतो.
याचा विचार करतांना खालिल मुद्दे समोर येतात-
यात पहिल्यांदा भिकार्‍यांचे वर्गिकरण करणे आवश्यक आहे.
अ) धष्ट्पुष्ट भिकारी
ब) म्हातारे भिकारी
क) बाल भिकारी
ड) अपंग भिकारी
इ) वेडे भिकारी
ई) व्हाईट कॉलर भिकारी.

अ) धष्ट्पुष्ट भिकारी :- आजकाल मजुरांचा प्रचंड तुटवडा असुन ही मंडळी भिक मागते. आणि आपण देतो. याची काम करण्याची द्यानतच नसते. अशांना सर्वांनी भिक देणे बंद केले पाहिजे. म्हण्जे त्याना जगण्यासाठी काम करावेच लागेल.

ब) म्हातारे भिकारी:- म्हातारा काम करु शकत नाही म्हणून त्यांची मुले त्या म्हातार्‍याला भिक मागुन कमाई करायला लावतात. जर खरोखर असहाय्य असतिल तर वृध्दाश्रमात त्यांना भरती होता येईल. पण असे खुप कमी असतात.

क) बाल भिकारी:- आई वडील बळजबरी आपल्या मुलाला भिक मागण्यास भाग पाडतात. लहान मुलांनी भिक मागितल्यावर कोणीही लवकर भिक देतो. अशा मुलांचे शिक्षण बंद होते. यामुळे ही मुले व्यसनी ही होतात. ते मोठे झाल्यावर भिक मिळत नाही आणि काम करण्याची द्यानत नाही. म्हणुन ही मंडळी गुन्हेगारी कडे वळतात. उदा. चोरी, हप्तावसुली, खुन व इतर अनेक.

ड) अपंग भिकारी:- अपंगाचा बाऊ करुन ही मंडळी भिक मागते. परंतु जेष्ठ समाजसेवक मा. बाबा आमटे नी हे आनंदवन अपंग आणि कुष्ठरोग्यांच्या उपचार आणि पुर्नवसनासाठी सुरु केले. आज किती तरी लोकांचा आधार हे आनंदवन झाले आहे. तेथे अपंगांना ही स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षित केले जाते.याच धर्तीवर काम करणार्‍या अनेक शासकिय-अशासकिय संस्था आहेत. असे असतांना बर्‍याच अपंग लोकांनी भिक मागण्याचा सोपा मार्ग पत्करला आहे. त्यानी ठरवले तर त्यांनाही स्वयंपुर्ण होता येईल. पण त्याना आता कष्ट करण्याचे जिवावर येते म्हणुन बाय चॉईस ते भिकारी झालेत.

इ) वेडे भिकारी:- यांचे प्रमाण नगण्य आहे. परंतु अशा लोकांना पोलिस, तहसिदार यांच्या मदतीने वेड्यांच्या इस्पितळात नेऊन चांगले आणि स्वयंपुर्ण बनवता येऊ शकते.

ई) व्हाईट कॉलर भिकारी:- नव्या जमाण्यात असेही भिकारी निर्माण झालेत. चांगले कपडे घालायचे आणि माझे पाकिट चोरीला गेले. मला इंटरव्ह्युव ला जायला आणि घरी जायला पैसे नाहीत. मला मदत करा. मी घरी गेल्यावर तुमचे पैसे तुमच्या पत्त्यावर MOने परत पाठविन. कृपया मदत करा. असे सांगणारे व्यवसाईक भिकारी ही निर्माण झाले आहेत.
अशांना तर पोलिसांच्या ताब्यातच दिले पाहिजे. हे भिक मागत नाहीत तर लोकांची फसवणुक करतात.

मग अशा भिक मागणार्‍यांना आपण भिक /दान देऊन चांगले काम करतो कि वाईट?
आपणच भिक देणे बंद केले तर भिकार्‍यांना जगण्या करिता काम करावेच लागेल ना.
म्हणुन, भिकार्‍यांना भिक देणे योग्य आहे का?
आपल्याला काय वाटते?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिन्मय, शक्य झाल्यास आकांक्षाची माहीती इथे पोस्ट करुन ठेव (वाकडेवाडी व मुंबई दोन्ही कडील). अशा अजून संस्था कळल्यास चांगले.

आपण स्वतः जेव्हा कुठल्या उपक्रमांना आपला जास्तीचा वेळ व पैसा देतो तेव्हा आपली मानसिक इन्वोल्व्हमेंटही वाढते व कुणाचे आयुष्य थोडं सुखकर करण्यास आपला खारीचा सहभाग झाल्याचे समाधानही मिळते (स्वानुभव).

रॉबीनहुड, अश्वीनी, मन:स्विनी, चिनुक्स धन्यवाद!:)

हे करण्या आधी समुपदेशन करावं लागेल.>>>>>>>>
१००% बरोबर!
माझा एक चांगला अनुभव पण थोडा वेगळा तो थोडक्यात सांगतो.

आमच्या कंपनीचे क्षेत्र हे १२५० स्क्वे. कि.मी. रहिवासी आणि जंगली विभागात विखुरलेले आहे. आणि यात जामदे नावाचे गावात फासे पारधी जमातीचे लोक राहतात. त्यांचा पारंपरिक व्यवसाय चोरी करणे आणि तितर, लाहुरी पकडणे हाच आहे. या लोकांनी आमचे कं.चे कॉपर चोरी करणे सुरु केले. त्यामुळे कं.चे फार नुकसान झाले. कं. स्थलांतरीत करणे हा पर्याय फक्त समोर होता. अशा वेळेस जामदे गावातील आमचे सिक्युरिटी गार्ड च्या मदतीने आम्ही गावात समुपदेशनाव्दारे सुधारणेचे काम सुरु केले. कं. मार्फत गावात विविध कार्यक्रम राबविले. आता त्या गावाचे लोक अजिबात चोरी करत नाहीत. उलट जर कुठे चोरी झाली तर चोर आणि माल शोधुन आणतात.
हे काम सोपे नव्हते. आणि त्यास सुमारे २ वर्ष लागले. हे सर्व त्यांना समुपदेशना व्दारे जनजागॄती करुनच शक्य झाले. त्यांना चोरी ची चटक घालवुन रोजगाराच्या नव्या दिशा दिल्यात. तसेच भिकार्‍यांच्या बाबतीत करता येईल असे वाटते. Happy

सर्व लेख वाचले. सर्वांनी अत्यंत तळमळीने चांगले मुद्दे मांडले आहेत.
पंजाब बद्दल जो उल्लेख आहे, ते अगदी खरे आहे.
त्यांच्या कडे कोणी भिक न मागण्याचे कारण म्हणजे,
अनेक ठिकाणी गुरूद्वारा मधून लंगर (भोजन) ची सोय असते.
या सोयीमुळे निदान पोट भरण्याकरीता तरी कोणाला भिक मागायची वेळ येत नाही.
आपल्याकडे (महाराष्ट्रात) काही ठराविक ठिकाणी असे प्रसाद भोजन मिळते. शिर्डी, गोंदावले, ई.
बाकी राज्यांची कल्पना नाही.
ही अशी धर्मादाय भोजन व्यवस्था खुप ठिकाणी सुरू केली गेली तर
कदाचित भिक मागण्याचे प्रमाण कमी होऊ शकेल.
हे असे करणे सोपे नाही याची कल्पना आहे,
पण आजकाल लोकांचा वाढलेला धार्मिकपणा पहाता अनेक जण अशा कार्याला मदत करतील असे वाटते.
या बाबत आपली मते कळविणे.

बहुतेक लोक केवळ दोन वेळचे जेवण मिळावे म्हणून भीक मागत नाहीत्.तसे असते तर फारच सोपे झाले असते. हा एक बिन भांडवली, बिन कष्टाचा व्यवसाय आहे. आणि चांगल्यापकी कमाइ होते. स्वाभिमान , स्वकमाइचे समाधान वगैरे संस्कार त्यांच्यावर झालेले नसतात. काही दिवस त्यात काढल्यावर त्यातून बाहेर पडणे अवघ्ड वाटते (ते तर साले नोकरी सोडून व्यवसाय सुरू करणारानाही वाटते. एम बी बी एस डोक्टर ही काही दिवस सरकारी अथवा हॉस्पिटल मध्ये नोकरी केल्यास प्रॅक्टीसकडे वळण्याचा कंटाळा येतो, रिस्क घ्यावीशी वाटत नाही, आत्नविश्वास जातो. असुरक्शितता वाटते. तर यांचे काय ?)२५ टक्के लोक केवळ असहायतेने भीक मागत असावेत्.उदा. धन्द्यातून बाहेर फेकल्या गेलेल्या वेश्या. अपंग्.ई. सिग्नलवरचे तर बोगसच असतात. ती पोरे एरव्ही मारामार्‍या करताना तिथेच दिसतात आणि सिग्नल पडला रे पडला की 'ड्युटी'वर हजर.

सर्व त्यांना समुपदेशना व्दारे जनजागॄती करुनच शक्य झाले. त्यांना चोरी ची चटक घालवुन रोजगाराच्या नव्या दिशा दिल्यात. तसेच भिकार्‍यांच्या बाबतीत करता येईल असे वाटते. >>
तुमच्या कंपनीने केलेलं हे काम खरच स्तुत्य आहे.


सिग्नलवरचे तर बोगसच असतात. ती पोरे एरव्ही मारामार्‍या करताना तिथेच दिसतात आणि सिग्नल पडला रे पडला की 'ड्युटी'वर हजर.
>> हे ही तेवढच खरं आहे.

मी मात्र आधी भिका-याना भिक देण्याच्या विरोधात होतो. माझ्याकडे कुणी भिक मागितल्यास दटावुन हाकलुन देत असे. पण रमा मॅडमनी कित्येक वेळा मी हाकललेल्या भिका-याना बोलावुन भिक (किमान ५ रुपये) दिलेत, व मला खडसावले, तेंव्हा पासुन मी कुणाला दटावत वैगरे नाही पण धडधाकट माणसं सोडुन इतराना किमान ५ रुपये देतो. ५ रुपये देण्यामागे मॅडमचा लॉजीक असा होता (आहे) की भिक दिल्यास किमान एवढे दया की भिका-याला काहीतरी घेऊन खाता आले पाहीजे, त्याचा त्या दिवशीचा पोटाचा प्रश्न सुटला पाहिजे. आजकाल ५ रुपयात काहिच येत नाही म्हणुन मॅडमनी आकडा वाढविला आहे. त्या आता १० रुपये देतात, म्हणुन मी पण आता १० रुपये देतो. बाकी मला कष्ट न करणा-यांचा फार राग येतो.

एक किस्सा सांगतो.
एक भिकारिन रोज अन्न मागायल यायची व मॅडम तिला रोज अन्न दयायच्या, एक वेळा साडी दिली. नंतर ती भिकारीन बळजबरिने साडया व कपडे मागयची. एकदा मॅडमच्या हातात माधवीसाठी घेतलेली चांगली महाग साडी होती, तेवढ्यात ती आमची ठरलेली भिकारीन आली व हातातलीच साडी दया म्हणुन हटट धरला व मॅडमनी ती साडी देऊनही टाकली, वरुन मला बजावलं की बाहेर तिला गाठुन रागवू नकोस.
आपल्याला देव गरजेपेक्षा जास्त देतोय, याच भान ठेव. ती भिकारीन आजही मला दिसते व मी आपला मुग गिळुन बसतो. मी आणि माधवी आम्ही दोघेही चंद्रपुरला राहायचो व तिकडे मॅडमनी अशाप्रकारे भरपुर वस्तु वाटल्यात (वाटल्यात कसल्या भिका-यानी बळजबरिने घेतल्यात म्हणा). चांगल्या माणसाना लुबाडणारी अशीही भिका-यांची जात असते.

असो, भिक देणे पुर्णतः व्यक्तीसापेक्ष आहे, भिकेस पात्र भिका-याला मी १०ची नोट देतो.

हा एक बिन भांडवली, बिन कष्टाचा व्यवसाय आहे. >>>>>
अगदी प्रॅक्टीकल परिस्थिती लिहतात तुम्ही. अनुमोदन.

२५ टक्के लोक केवळ असहायतेने भीक मागत असावेत्.उदा. धन्द्यातून बाहेर फेकल्या गेलेल्या वेश्या. अपंग्.ई. सिग्नलवरचे तर बोगसच असतात.>>>>>
पण २५% ही टक्केवारी मोठ्या शहरातील आहे. पण इतर शहरात व गावात ही टक्केवारी ५% असावी. पण त्यांनी ठरविले तर त्यांचे पुनर्वसन होऊ शकते. म्हणुन त्यांना पुर्ण पणे असहाय म्हणता येणार नाही. म्हणुनच म्हणतात ना " इच्छा तेथे मार्ग."

तुमच्या कंपनीने केलेलं हे काम खरच स्तुत्य आहे.>>>>>>
धन्यवाद मधुकर! Happy

एकदा मॅडमच्या हातात माधवीसाठी घेतलेली चांगली महाग साडी होती, तेवढ्यात ती आमची ठरलेली भिकारीन आली व हातातलीच साडी दया म्हणुन हटट धरला व मॅडमनी ती साडी देऊनही टाकली,>>>>>>
मधुकर, नंतर तिने त्या साडीचे काय केले याचाही जरा तपास करा ना.

जेफ्री आर्चर चे स्ट्रीट लॉयर नावाचे पुस्तक आहे, त्यामधे हा विषय चांगला मांडला आहे.
या पुस्तकात पाश्चिमात्य जगात बेघर आणि भिकारी लोकांसाठी असणार्‍या कम्युनिटी सेंटर्सचा उल्लेख आहे.
मला तरी असे वाटते की सरकार, सामाजिक/धार्मिक संस्था जर भुकेच्या वेळी पोट भरण्याची
आणि तात्पुरत्या का होईना पण सुरक्षित निवार्‍याची सोय करू शकतील तर,
भिक मागणार्‍यांचे प्रमाण कमी होण्यास निश्चित मदत होईल.

सामाजिक/धार्मिक संस्था जर भुकेच्या वेळी पोट भरण्याची
आणि तात्पुरत्या का होईना पण सुरक्षित निवार्‍याची सोय करू शकतील तर,
भिक मागणार्‍यांचे प्रमाण कमी होण्यास निश्चित मदत होईल.
>>>>

पण पुढे काय? तात्पुरतं ठीक आहे. पण नेहमीच धडधाकट लोकांना असं देत रहायचं का?

ज्यांना स्वकष्टाने कमावणं शक्य नाही त्यांच्यासाठी तात्पुरतंच नाही तर कायमचं काही करण आवश्यक आहे.

मला तरी असे वाटते की सरकार, सामाजिक/धार्मिक संस्था जर भुकेच्या वेळी पोट भरण्याची
आणि तात्पुरत्या का होईना पण सुरक्षित निवार्‍याची सोय करू शकतील तर,
भिक मागणार्‍यांचे प्रमाण कमी होण्यास निश्चित मदत होईल.>>>>>>>>>>>>>

नुसते अन्न आणि निवारा (विनाश्रम) हा पर्याय भिकारी कमी होण्याची शक्यता कमीच वाटते. कारन आता खरी गरज भिकार्‍यांना श्रम करुन उदर्निर्वाह करण्यासाठी प्रेरीत करणे हीच आहे. मी मागे लिहले आहे कि, पंजाब मध्ये भिकार्‍याला भिक देण्या ऐवजी लंगर मध्ये जेवण दिले जाते. पण पुन्हा जर तोच इसम भिक मागतांना दिसला, तर पोलिसांच्या ताब्यात ही दिले जाते. ही पध्दत हवी.

मुलांसाठी काही करायचं असेल पण वेळ देता येत नसेल तर आपण बाल रक्षा, भारत यांना चेक्स देऊ शकतो. त्यांचे कर्मचारी (मार्केटींग काँट्रॅक्टवाले नव्हे) स्वतः आपल्याकडे येऊन चेक्स घेऊन जातात. आजच अमरावती/मेळघाटातल्या मुलांसाठीच्या प्रोजेक्ट्साठी चेक न्यायला एकजण हापिसात येऊन मला भेटून गेला. आपण नियमित देणार असू तर त्यांना तसं सांगून ठेवायचं. रु.५०००/- मधे ४ मुलांचा १ वर्षाचा शिक्षणाचा खर्च निघतो. रु.३६००/- मधे १ मुलाचा प्रोटेक्शन, शिक्षण वगैरेचा खर्च निघतो. त्यांचेच लोक्स येतात त्यामुळे मार्केटींग कंपन्यांचे मार्जिन न जाता सगळे पैसे प्रोजेक्टला जातात. त्यांची DNA etc पेपर्समधे जाहिरातही आली आहे अमरावती प्रोजेक्टसाठी.

पुर्वी मी क्राय साठी द्यायचे पण मार्केटींग कंपन्यांना त्यातला सब्स्टॅन्शियल वाटा जातो हे कळल्यावर मी इतर ठिकाणीही ही चौकशी करते व मगच पैसे देते.

एक माबोकर श्री आशिष दामले मला वाट्टं बाल रक्षा (save the children) मधे सक्रिय होते/आहेत. त्यांनी एकदा अफगाणिस्तानात या कामावर असताना लेख लिहिल्याचं आठवतंय.

मी नांदेड येथल्या गुरूद्वारा मधे गेलो होतो, त्यावेळी तिथल्या संयोजक समितीतल्या लोकांशी बोलण्याचा योग आला होता. त्यांना विचारले की लंगरची सोय असल्यामुळे अनेक लोक रोजच येत असतील. लोकांना काही न करता जेवण मिळते तर त्याची सवय लागत असेल. यावर समितीचे लोक म्हणाले की आम्ही शक्यतो कोणालाच अडवत नाही. एक तर अनेक लोकांना रोजच लंगरच्या जेवणाचा कंटाळा येतो त्यामुळे अगदी रोज येत नाहीत. जर कोणी रोज येऊ लागला तर समितीच्या लोकांच्या लक्षात येते, मग अशा व्यक्तीला तिथे काही तरी काम दिले जाते. ज्यांना कामाचा कंटाळा असतो असे लोक मग येईनासे होतात.

मी वर जो उपाय लिहिला आहे तो साधारण याच प्रकारचा आहे. अशी केंद्रे कायमस्वरूपी चालू केली तरी त्यामधे येणारे लोक तेच तेच नसतील. या आधी अनेक लेखांमधे लिहिल्याप्रमाणे बरेचदा धडधाकट लोकांना काही कारणांनी तात्कालिक गरज असू शकते.

देऊळ आणि भिकारी यांचा घनिष्ट संबंध आहे. त्याबद्दल नंतर लिहिन.

मागिल अठवड्यात एका धार्मिक स्थळी जाण्याचा योग आला. सोबत नवविवाहित मित्र दांपत्य होते.
गाभार्‍यात पुजारी होता. सरळ रु.५१/- दक्षिणा द्या म्हटला. मित्राने नव वधुसमोर तावातावाने रु.५१/- दिलेही. तेथुन आम्ही बाहेर आलोत. बाहेर तिन ५५-६० वयाच्या महिला भिक मागत होत्या. मी नकार दिला तर म्हणे आत आमच्या पेक्षा मोठे बसलेत. मित्राने त्यापैकी एकिला रु. २/- दिलेत. तर म्हणे साहेब रु. ५/- तरी द्या. मग पठ्ठ्याने रु. ५/- दिलेत. तर म्हणे जुनी नोट नको तर कोरी नोट नाही तर नाण द्या. मी ती रु. ५/- ची नोट त्यांच्या कडुन परत घेतली आणि सांगितले कि नवी नोट आत्ता नाहीये उद्या देतो. हातातिल नोट जातांना पाहुन तिचा पवित्रा बदलला, म्हणाली राहु द्या चालेल.

नंतर शेजारील पुजा साहित्य विकणार्‍या बाईने सांगितले, "साहेब, या बायांचे घरदार मुले सगळे आहे. पण हा भिक मागुन नव्या नोटां गोळा (संग्रह) करतात या बाया."

आता काय म्हणाव यांना? Happy

<<रस्त्यावरच्या सगळ्या भिकारणींना मूल होणार नाही अशी व्यवस्था कायद्याने करावी असंही कधी कधी मनात येतं. ते तितकसं बरोबर नाही हे माहीत असलं तरी मनात येतंच...>>

नी अगदि बरोबर.

कालच अम्रुतसरवरुन परतलो. खरोखरच तिथे भिकारी दिसत नाहीत. गुरुद्वर्यात लंगर आहेच...

पण, तिथे सुवर्ण मन्दीरा सारखेच एक हिंदुंचे दुर्ग्याणा मन्दीर आहे. तिथे बुट काढतांना एक लहान मुलाने (अगदी ४-५ वर्षांचा असेल), मला पोक केले आणि मी वळून पहिले तर तो पैसे मागत होता. येवढा निरागस मुलगा तो....पैसे न देणे मझ्या जिवावार आले (मी सहसा भिकार्यांन्ना पैसे देत नाही). मन्दिराच्या परीसरात पुर्ण वेळ तोच माझ्या डोळ्या समोर होता. बाहेर आल्यावर भिरभिरत मी आधी त्याला शोधले... आता त्याच्यासोबत २ मुलीही होत्या, त्याच वयोगटातल्या. अम्रुतसरला बर्यापैकि थन्डी आहे. त्या मुलांच्या अंगावर फार कमी कपडे होते. त्यांना काही खायचेपण नव्हते. तितक्यातच त्यांच्यातल्या एका मुलीने मला एक लाइट असलेला चेन्डू मागीतला. मी तो विकत घेवुन दिल्यावर ती मुले एकदम हरखून गेली. काही वेळासाठी का असेना, त्यांच्या चेहर्यावर हास्य दिसले..... निरागस हसू जे आत्ताही माझ्या डोळ्यासमोर आहे.

परतीच्या प्रवासातील business class ची seat मला अक्षरश: टोचत होती. खरचं आपण किती कमी परत देतो समाजाला. आपण सगळ्यांनी ठरवले तर किमान बाल भिकार्यांचा प्रश्न नेहमीसाठी निकालात काढू शकतो.

मोदींना एक पत्र लिहावे का? ह्या मुलांसाठी प्रत्येक राज्यात एक सैनिक स्कुल काढुन त्यांना तिथे ट्रेन करता येईल का? देश्यासाठी किती मोठी संपत्ती होईल ही........

लहान मुलांना तर चुकून हि भिक देऊ नका. कारण जर का लहान मुलांना हमखास भिक मिळते तर त्यांना जास्त मोठय प्रमाणात धंद्यात आणले जाते ( पळवून ).
mata / लोकसत्ता मध्ये आलेल्या बातम्या -
ठाणे स्टेशन वर भिकारी मुलांचे महिना उत्पन २५ ते ३० हजार. drug च्या आधीन.
मुंबई मधील श्रीमंत भिकारी. ८० लाखाचा flat . महिना ५० / ७५ हजार उत्पन ..

या बाफ वर सुपंथचा उल्लेख झाला आहे म्हणून www.maayboli.com/node/53020 ही लिंक देतेय

या लिंकेत सामाजिक उपक्रम विषयी माहिती आहे. उपक्रमाद्वारे लहान मुलांच् आयुष्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यार्या संस्थाना मदत केली जाते . या उपक्रमात देणगी देऊन तुम्ही या मुलांच् आयुष्य सुकर करू शकता

धर्मशास्त्रानुसार दान हे सत्पात्री असावे. याचा विचार करून योग्य त्या गरजू माणसास आवश्यक ती मदत करणॅ हे योग्य ठरेल

हा लेख वाचला. डोकं सुन्न झालं.
सर्व भयंकर आहे. भिकारी पाहिल्यावर या सर्व मुद्द्यांचा विचार डोक्यात येईलच. या आधी झुलेलाल यांची गाडीतील भिकारी मुलांना खाणं आणि पैसे दोन्ही द्या कारण खाणं त्यांना मिळतं आणि पैसे मिळाले तर दादाकडून होणारा त्यांचा छळ वाचतो या आशयाची गोष्ट वाचली होती ती पण पटली होती.
एक विचार डोक्यात हा पण येतो की सरकारने ईच्छाशक्ती ठेवून कुठेही भीक मागू देणं कायद्याने पूर्ण बंद केलं तर ही चेनच खुंटेल ना? प्रत्येक वेळी आपण देत असलेला पैसा भिकार्‍याचं भलं करणार आहे की पळवणे-भीक मागायला लावणे वालं रॅकेट वाढवणार आहे का याचं योग्य जजमेंट होणं शक्य नाही. (हे कोणत्याही इन्सेन्सेटिव्हिटीमधून लिहीलेलं नाही, खरोखर एखाद्याचं भलं होणार असेल तर तोंडचा घास काढूनही द्यावा.)

Pages