गेले ऐकायचे राहून

Submitted by प्रकाश घाटपांडे on 29 August, 2022 - 08:39

सकाळी फिरायला जातो ते महात्मा सोसायटीजवळ असलेल्या डीपी रोडपर्यंत. तिथे रस्त्यावर दामलेकाकांची एक मोफत व ओपन लायब्ररी आहे. लोक पुस्तके नेतात व आणतात. अनेकांनी पुस्तके भेटही दिली आहेत. काही जण उपक्रमासाठी स्वयंसेवक म्हणूनही मदत करतात. दामले काका जगन्मित्र व नर्मदा परिक्रमा केलेले. त्यामुळे ग्रंथालायचे नाव ही नर्मदे हर! मी थोडावेळ गप्पा मारायचो. माझे यंदा कर्तव्य आहे हे पुस्तक ही ग्रंथालयाला भेट दिले.मग गप्पांमधून त्यांना व तेथील स्वयंसेवकांना, माझ्या व्यत्किमत्वाचा परिचय होत गेला. शिरिष नावाचे एक गृहस्थ माझे बोलणे लक्षपूर्वक ऐकायचे.पण त्यांच्या बोलण्यात मला अस्वस्थता जाणवायची. बर्‍याचदा ते माझी वाट पहात उभे असायचे. माझं लक्ष नसेल तर मला हाक मारायचे .एकदा त्यांनी भावाचे श्राद्ध असल्याचे सांगितले. मग मी विचारले," कधी गेले तुमचे भाउ? "
"वीस वर्षांपुर्व."
"कशाने गेले?"
"त्याने नियोजित आत्महत्या केली."
कारण काय असावे ?
"आमचे बाबा!" असे काहीतरी म्हणायचे. बोलताना अस्वस्थ व्हायचे. खाजगी संवेदनशील गोष्टी बाबत आधिक खोदून विचारणे मलाही प्रशस्त वाटेना. एकदा त्यांनी मला मन सावर रे व संशयी स्व्भाव अशी दोन पुस्तके मला वाचायला दिली. खर तर वाचायला भाग पाडले. मी ती वाचली सायकॉलॉजिस्ट डॉ संदीप लोंढे यांची ती पुस्तके होती. सोप्या भाषेत मानसशास्त्रीय सोदाहरण विवेचन होते. एका पुस्तकाला डॉ उल्हास लुकतुके यांची प्रस्तावना होती. मी वाचून ती पुस्तके परत केली. मी पुस्तके आवडली असल्याचा अभिप्राय दिला. मग ते मला म्हणाले," माझ्या भावाने ती पुस्तके लिहिली आहेत." मी कौतुक केले. मग बोलण्याच्या ओघात त्यानेच आत्महत्या केल्याचे सांगितले. माझ्या मनात सायकॉलॉजिस्ट , कौन्सिलर असलेल्या माणसाने आत्महत्या का करावी असा प्रश्न होताच. पण मी त्यांना तो विचारला नाही. मग कधी तरी ते घरगुती हिंसाचाराची बातमी बद्दल बोलायचे. मद्रास कोर्टाच्या एका निर्णयाचया बातमीचे कटिंगही ठेवलेले दाखवले. हळूच एकदा तो प्रकार आपल्याच घरात होत असल्याबद्दल सांगितले व बोटाला झालेली जखम दाखवली. मी त्यांना मॅरेज कौन्सिलरचा सल्ला घ्या ही गोष्ट गंभीर आहे असे सांगितले. एका भेटीत मी त्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल मला जाणवलेले निरिक्शण न राहून सांगितले. तुमचे भाउ एवढे सायकॉलॉजिस्ट होते . डॉ उल्हास लुकतुक्यांच्या तालमीत तयार झालेले. स्वत:चे क्लिनिक असलेले मग तुम्ही एखाद्या चांगल्या सायकॉलॉजिस्ट/ सायकियाट्रिस्टची मदत घेणे गरजेचे आहे. संकोच बाळगू नका. तुमच्या भावाच पुस्तक तुम्ही नीट वाचले आहे ना?"
मग मानसिक आरोग्य किती महत्वाचे यावर चर्चा व्हायची. त्यांच्याकडे एक अंतर्देशीय पत्र खिशात असायचे. ते मला दाखवू की नको अशा संभ्रमात काढून परत खिशात ठेवायचे. मी ते पत्र वाचावे अशी त्यांची सुप्त इच्छा मला त्यांच्या देहबोलीतून जाणवायची. मी त्यांना तुम्ही तुमच्या मनातले जिवाभावाच्या मित्रमंडळींशी बोलत जा, सुख दु:ख शेअर करत जा! या क्षेत्रातील तज्ञ लोक हेच सांगतात. मानसिक तणावाचा शरीरावर मोठा परिणाम होत असतो. शारिरिक आरोग्याचा मनावर परिणाम व मानसिक आरोग्याचा शरीरावर परिणाम असे दुष्टचक्र चालू होते. तुम्हाला जे काय वाटते ते डायरी मधे लिहित जा. मोकळे व्हा! असे लेक्चर वजा सांगितले. मी तुमच्या आयुष्यातील घटनांचा साक्षीदार नसल्याने तुम्ही सांगितलेल्या गोष्टींच भावनिक महत्व कदाचित मला नीट समजणार नाही. तुम्ही ते तज्ञ कौन्सिलरशी बोला. दुसरे असे की ज्याच्याशी तुम्हाला शेअर करावसं वाटते तो तरी सक्षम आहे का? हा प्रश्नही महत्वाचा आहे. लोकांना रडगाणे ऐकायला आवडत नाही. तुमच्या आनंदात शेअर करायला अनेक लोक तयार होतील पण दु:खात शेअर करायला लोकांना नकोसे वाटते.ते तज्ञही नसतात. त्यामुळे तुम्ही व्यावसायिक समुपदेशकाची मदत घेणे केव्हाही चांगले.
तज्ञ कौन्सिलर म्हणजे नेमेके कोण? नेमके कुणाला जाउन भेटायचं? हा उपप्रश्नही मग उपस्थित झाला. त्यावरही काही चर्चा झाली
तुम्हीअसं का करत नाही, डॉ लुकतुक्यांशीच का नाही बोलत हे सगळं?"
त्यावर ते विचारात पडले.
"मी तुम्हाला ते भावाचे पत्र लॅमिनेट केल्यावर दाखवतो. त्याने ते दुसर्‍याच्या नावाने लिहिले होते. मला तुम्हाला काही सांगायचेही आहे."
मी त्यांना अगोदर तुम्ही लुकतुक्यांना भेटा व त्यांना तुमच्या मनातले सर्व काही सांगा्च असे आग्रहाने सांगितले व त्यांचा निरोप घेतला.
मला जरा त्यांची चिंताच वाटत होती. तो मनुष्य आत्महत्या वगैरे करेल की काय अशी भीती मला वाटायची. मी एकदा त्यांना एकदा तसे अप्रत्यक्षपणे बोलून दाखवलेही होते.पण तेव्हा ते म्हणाले की डोंट वरी, मी माझा संदीप होउ देणार नाही. मग मला हायसं वाट्ले. पण नंतर ते मला दिसलेच नाहीत. मला वाटले मी भेटल्यावर त्यांना तुम्ही लुकतुक्यांना भेटलात का? असे विचारेन म्हणून ते कदाचित तोंड दाखवत नसावेत. मग आजूबाजूच्यांकडून कळले की ते जरा आजारी असल्याने सध्या येत नाहीत. हा विषय एकदा माझा मेहुणा डॉ मंदार बेडेकर याच्याशी बोललो होतो. योगायोगाने त्याच्या ते परिचयाचे निघाले. मित्रमंडळींच्या ग्रुपमधे होते.
एक दिवस त्यांच्या ग्रुपवर अचानक कळले की ते हार्ट फेल ने गेले. मी सुन्न झालो. त्यांना मला जे सांगायचे होते ते तसेच राहून गेले आणि माझे ऐकायचे. आयुष्यात अनेक गोष्टी राहून जातात. करु, बघु, बोलू,भेटू म्हणता म्हणता आयुष्य सरुन जातं. कधी घ्यायचं राहून जातं तर कधी द्यायचं राहून जात. आरती प्रभूंची कविता आठवते का?
गेले दयायचे राहून
तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्या पास आता कळया
आणि थोडी ओली पाने
आलो होतो हासत मी
काही श्वासांसाठी फक्त
दिवसांचे ओझे आता
रात्र रात्र शोषी रक्त
आता मनाचा दगड
घेतो कण्हत उशाला
होते कळयांचे निर्माल्य
आणि पानांचा पाचोळा
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख आवडला.
आयुष्यात अनेक गोष्टी राहून जातात. करु, बघु, बोलू,भेटू म्हणता म्हणता आयुष्य सरुन जातं. >> +११

आमचे बाबा, घरगुती हिंसाचार, मद्रास हायकोर्ट केस ... तुमचा लहानसा लेख वाचुन मलाच इतके प्रश्न पडले. शेवटी गेले ऐकायचे राहुनि! Happy
लेख आवडला. अजिबात प्रिची न करता काय सांगायचं ते जोरकसपणे पोहोचलं.

<< त्यांना मला जे सांगायचे होते ते तसेच राहून गेले आणि माझे ऐकायचे. आयुष्यात अनेक गोष्टी राहून जातात. करु, बघु, बोलू,भेटू म्हणता म्हणता आयुष्य सरुन जातं. कधी घ्यायचं राहून जातं तर कधी द्यायचं राहून जात. >>
+१

चांगला लेख. आयुष्यात अनेक गोष्टी राहून जातात, हे सत्य आहे. पण महत्त्वाचे म्हणजे त्याची खंत करू नये. आयुष्यात सर्व प्रश्नांची उत्तरे नेहमीच मला मिळणार नाहीत, अशी माझी स्वतःची तरी खात्री झाली आहे. त्यामुळे मी closure चा आग्रह धरत नाही.

हुरहुर दाटून आली.

त्यामुळे मी closure चा आग्रह धरत नाही.>>> कठीण आहे हे जमणे, शिकावे लागेल.

लेख चांगला आहे पण....

"मी त्यांना अगोदर तुम्ही लुकतुक्यांना भेटा व त्यांना तुमच्या मनातले सर्व काही सांगा्च असे आग्रहाने सांगितले व त्यांचा निरोप घेतला."
हे वाक्य आणि त्या अगोदरची काही वाक्ये तुम्ही (स्वतःला तज्ञ / सुयोग्य समजत नसल्याने असेल कदाचित) त्यांना व्यवस्थितरित्या टाळलेत असे दर्शवतात.

त्यामुळे 'गेले ऐकायाचे राहुनी' अजीबात वाटत नाहीये.

हे वाक्य आणि त्या अगोदरची काही वाक्ये तुम्ही (स्वतःला तज्ञ / सुयोग्य समजत नसल्याने असेल कदाचित) त्यांना व्यवस्थितरित्या टाळलेत असे दर्शवतात.>>>>>> हर्पेन, होय. बरोबर ओळखलेत. जेव्हा त्यांनी कौटुंबिक हिंसाचाराबद्दल सांगितले त्यावेळी मी त्यांना अशा स्टोर्‍या आता वाढू लागल्या आहेत. असे म्हटलो. तेव्हा ते म्हणाले होते की ही स्टोरी नसून वस्तुस्थिती आहे. त्यावेळी मी स्टोरी म्हणजे घटना अशा अर्थाने म्हटल असल्याचे सांगितले व वेळ मारुन नेली. पण माझ्या मनात सत्यते विषयी शंका असल्याने मी स्टोरी शब्द वापरला होता.

त्यामुळे 'गेले ऐकायाचे राहुनी' अजीबात वाटत नाहीये.>>>>>तसे मात्र नाही. मलाही नेमके काय घडले हे ऐकायची उत्सुकता होतीच. फक्त इतक्यात नको अगोदर ते लुकतुक्यांकडे जाउन तर येउ देत असा विचार होता. लुकतुक्यांकडे जाउन आल्यावर कदाचित त्यांना माझ्याशी शेअर करण्याची गरजही लागणार नाही असे देखील वाटत होते.

चांगले लिहिलेय.
उबोंशी सहमत. अगदी काही जवळच्या व्यक्तींबाबतही कधीकधी नशीब म्हणून स्वीकार करावा लागतो. उत्तरं मिळतंच नाहीत, आपल्यालाही मर्यादा असतात त्यामुळे adapt करणे भागंच असते.

एक पुस्तक वाचलेले आहे. जिच्यात लेखिकेच्या मुलाला फार रेअर अशी डिसॉर्डर होती. आणि तो मुलगा पांगळ्या स्थितीत जीवन कंठत होता. ही हॅड अ व्हिक्टिम मेंटॅलिटी ऑब्विअसली.
या पुस्तकात त्या मुलाचा प्रवास 'व्हाय मी?' ते 'व्हाय नॉट मी?' असा व्हिक्टिम फ्री आणि वस्तुस्थिती स्वीकारणे या टप्प्यापर्यंत मांडलेला होता.
खूप पॉवरफुल पुस्तक वाटले मला.