भारत का दिल देखो : तान्हा पोळा, मारबत आणि गोटमार
इडा पीडा, रोगराई, भ्रष्टाचार घेऊन जाय गे मारबत ...
इबोला, स्वाईन फ्लू, मंदी घेऊन जाय गे मारबत..
काही अर्थ लागतोय का? नागपूरकरांना नक्कीच लागला असेल.
दरवर्षी येतो पावसाळा आणि पावसाळा संपता संपता येतो बैलपोळा.
इकडे विदर्भात बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी भरतो तान्हापोळा.
प्रत्येक घराची, समाजाची, प्रांताची एक संस्कृती असते. महाराष्ट्राची एक परंपरा म्हणजे बैलपोळ्याचा सण. श्रावणी अमावास्येला साजरा केला जातो. बळीराजा आणि त्याच्या या मित्राचा दिवस कसा साजरा करावा याबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. ---
तैसाचि आला पोळा सण ।
हाहि आहे महत्त्वपूर्ण ।
यांत ठेवावें बैलांचें प्रदर्शन ।
शेती-सामानासहित ॥३२॥
उत्तम रांगेंत बैल ठेवावा ।
साजेल तैसा अंगीं भूषवावा ।
त्यांत ज्याची सफल सेवा ।
त्याचा गौरव त्या दिवशीं ||३३||
कोणीं जोडी उत्तम ठेवली ।
कोण बैलास खुराग घाली ।
इनामें द्यावीं त्यांस भलीं ।
सर्व गांवकर्यांनी ॥३४॥
कोणाचें उत्तम शेतीसाधन ।
कोणीं ठेवले नोकर प्रसन्न ।
त्याचें वाढवावें उच्च स्थान ।
पोळयाचिया शुभदिनीं ॥३५॥
हे तर झाले मुख्य दिवसाबद्दल पण या सणाचं एक additional feature पण आहे. इकडे विदर्भात दुसऱ्या दिवशी जोर शोर से भरतो तान्हा पोळा. हा उत्सव बालगोपालांचा आणि त्यांच्या लाकडी नंदीबैलांचा.
मोठ्या पोळ्यात लहानग्यांना विशेष भाग घेता येत नाही म्हणून खास बालकांची हौस पुरवण्यासाठी
नागपूरचे रघूजीराजे भोसले यांनी दिडशे वर्षांपूर्वी ही प्रथा सुरू केली आणि बघता बघता पूर्ण विदर्भात मोठ्या उत्साहात तान्हा पोळा साजरा केला जाऊ लागला.
तान्ह्या पोळ्याच्या दिवशी मोहल्ल्यातल्या मारोती मंदिरात आपापले लाकडी बैल घेऊन मुले एकत्र जमतात. तोरण बांधलेले असते.
A
विविध वेशभूषा स्पर्धा, बैल सजावटीच्या स्पर्धा, बैल घेऊन धावण्याची शर्यत असे भरगच्च कार्यक्रम होतात.
नंतर मारूतीची आरती होऊन खाऊ वाटप झाले की तोरण तुटते आणि पोळा फुटतो. मुले आपापले बैल घेऊन घरोघरी जातात.
मुलांचे तोंड गोड केले जाते आणि त्यांच्या बैलांना ओवाळून बोजारा म्हणून काही रुपये देतात.
तान्ह्या पोळ्याच्या खास तान्हा बाजार भरतो. चिमूकल्यांसाठी मातीची भातुकली , मातीचे बैल, लहान मुलांची खेळणी कपड्यांनी बाजार सजला असतो. छोट्या मुलींना भातुकली भेट दिली जाते.
हा आमचा घरचा नंदी ( 3 पिढ्यांनी वापरलेला)
आणि हे त्याचे नैवेद्याचे ताट (घरीच बनवलेले #art attack) 
याच दिवसाचे अजून एक खास आकर्षण म्हणजे मारबत. ही अनोखी पद्धत मात्र फक्त नागपूर शहरातच बघायला मिळते. पिवळी आणि काळी मारबत आणि त्यांचा सोबती असतो बडग्या. पूर्वी नागपूरकर भोसल्यांच्या घराण्यातील बांकाबाई नामक स्त्रीने इंग्रजांशी हातमिळवणी केली त्याचा निषेध म्हणून माराबतीची पद्धत सुरू झाली. बांकाबाईच्या नवर्याने तिला पाठिंबा दिला म्हणून मग त्याचाही पुतळा (बडग्या) बनवून त्याचीपण मिरवणूक काढतात.
(source: internet)
काठ्या बांबू आणि पोत्यांचा वापर करून मोठे पुतळे बनवतात. त्याला चिंध्या गुंडाळतात, काळ्या आणि पिवळ्या रंगांनी रंगवतात. टायरच्या माळा घालतात . बडग्याच्या हाती मुसळ देतात आणि वाजत गाजत शहरातून मिरवणूक निघते. त्या त्या वर्षीचे राजकीय मुद्दे, रोगराई, सामाजिक समस्या अश्या चर्चेचा मुद्दा घेऊन बडग्या येतो.
या साऱ्या समस्या आपल्यासोबत घेऊन जा गे मारबत अशी आरोळी दिली जाते आणि मग माराबतींचे दहन होते. समाजातले वाईट घटक, चालीरीती, रोगराई दूर करण्याचे प्रतीक म्हणजे मारबत
थोडं पलीकडे मध्यप्रदेशात डोकावलं तर पांढुरणा शहरात या दिवशी एक वेगळाच 'गोटमारचा मेळा' साजरा होतो. अक्षरशः दगडफेकीचा खेळ खेळला जातो. जाम नदिच्या मधोमध एक पळसाची फांदी रोवली जाते. तिला लाल कापड, नारळ, हार घातले जातात
(source: internet)
आणि मग सकाळी सुरू होतो दगडफेकीचा खेळ. ढोल ताश्यांच्या ( हल्ली DJ च्या) गजरात आणि भगाव - भगावो च्या ओरड्यात दोन्ही कडचे गडी कुऱ्हाड घेऊन नदीत उतरतात आणि फांदी कापायला निघतात. इकडे
अल्याड आणि पल्याडचे गावकरी एकमेकांवर दगडफेक करतात. प्रतिस्पर्ध्याला फांदी पर्यंत पोचता येऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात दगडफेक केली जाते. अगदी गोफणीचा वापर करून लांबवर नेम साधला जातो. अखेर जो गट फांदी कापण्यात यशस्वी होईल त्याला विजेता घोषित करून चंडीमातेच्या जयघोषात हे युद्ध संपते. यात कित्येकांची डोकी फुटतात, कित्येकजण जीवाला मुकतात, नागपूरचे दवाखाने दुसऱ्या दिवशी पूर्ण भरलेले असतात. पण
प्रशासनाने कितीही बंदी घातली तरी लोकांच्या आस्थेशी जुळलेली असल्याने ही पध्दत मात्र सुरूच आहे.
[भारत का दिल अर्थात मध्य भारत. काही दिवसांपूर्वी माझ्याच एका पाककृतीच्या धाग्यावर मी मध्य भारतीय समाजरितींचा उल्लेख करून कधीतरी त्यावर लिहिण्याचा विचार व्यक्त केला होता
https://www.maayboli.com/node/67167
आता जरा सवड काढून लिहून बघितलं. इथल्याच एका सणाची काही वैशिष्ट्यं. अशा प्रकारच्या लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे. बघा जमतय का. पुढे कधी मध्य भारताबद्दल अधिक लिहिले (सामाजिक/ स्थलवर्णन/ पाककृती) तर याच नावाने (भारत का दिल देखो) प्रकाशित करेन.
आपल्या स्पष्ट प्रतिक्रिया आणि सूचनांच स्वागत आहे
- मृण्मयी ]
शहरात इतरत्र आयोजित तान्हा
शहरात इतरत्र आयोजित तान्हा पोळा




तोरण तुटले
विविध वेशभुषा केलेले छोटे स्पर्धक
,
,
,
या आमच्या ढमाबाई
#आधुनिक शेतकरीण
गोटमार
गोटमार



जय माँ चंडी
,
ध्वज जिंकून नेताना
छान सजवलेत बैल! सजवलेले बैल
छान सजवलेत बैल! सजवलेले बैल घेऊन यायची मुलं बिस्किटे चॉकलेट आणून ठेवावी लागायची.
आधुनिक शेतकरीण गोड आहे.
तान्हा पोळा, मारबत आणि गोटमार
तान्हा पोळा, मारबत आणि गोटमार>>> हे तीन्ही शब्द पहिल्यांदाच ऐकतेय.. छान आहे सेलिब्रेशन.. कधीतरी मुलांबरोबर ह्या सणाचा अनुभव घ्यायला आवडेल..सगळेच सजवलेले बैल क्युट आहेत.
आधुनिक शेतकरीण गोड आहे. >>>
आधुनिक शेतकरीण गोड आहे. >>> अगदी अगदी.
मारबत टीव्हीवर बघितली, कसली भारी गर्दी, मस्त माहोल.
ही आधुनिक शेतकरीण म्हणजे
ही आधुनिक शेतकरीण म्हणजे गेल्या गणेशोत्सवात ग्रीटिंग कार्ड केलेली तीच का? दोन टपोरे छान पोनी/ बो घातले होते ती?
गोड!!!
आधुनिक शेतकरीण म्हणजे गेल्या
आधुनिक शेतकरीण म्हणजे गेल्या गणेशोत्सवात ग्रीटिंग कार्ड केलेली तीच का? दोन टपोरे छान पोनी/ बो घातले होते ती?
हो... हीच ती. यावर्षी बो नाहीत. (१-२ महिन्यात घालावे लागतीलच)
आधुनिक शेतकरीण खूपच गोडं आहे
आधुनिक शेतकरीण खूपच गोडं आहे.
तान्हा पोळा बघताना लेकीला पण घेऊन यावेसे वाटतेय.
मनिम्याऊ एक टूर पण आयोजित करा . इंट्रेस्टेड मायबोलीकर जॉईन करतीलच.
आपल्या मायबोलीवर कुणी टूर्स आणि ट्रॅव्हल्स मधले असतील तर विचार करा. असे काही वेगळे बघायला खूप जणांना आवडेल.
Pages