भारत का दिल देखो : तान्हा पोळा, मारबत आणि गोटमार

Submitted by मनिम्याऊ on 2 September, 2019 - 14:18

भारत का दिल देखो : तान्हा पोळा, मारबत आणि गोटमार

इडा पीडा, रोगराई, भ्रष्टाचार घेऊन जाय गे मारबत ...
इबोला, स्वाईन फ्लू, मंदी घेऊन जाय गे मारबत..

काही अर्थ लागतोय का? नागपूरकरांना नक्कीच लागला असेल. Lol

दरवर्षी येतो पावसाळा आणि पावसाळा संपता संपता येतो बैलपोळा.
इकडे विदर्भात बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी भरतो तान्हापोळा.

प्रत्येक घराची, समाजाची, प्रांताची एक संस्कृती असते. महाराष्ट्राची एक परंपरा म्हणजे बैलपोळ्याचा सण. श्रावणी अमावास्येला साजरा केला जातो. बळीराजा आणि त्याच्या या मित्राचा दिवस कसा साजरा करावा याबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. ---

तैसाचि आला पोळा सण ।
हाहि आहे महत्त्वपूर्ण ।
यांत ठेवावें बैलांचें प्रदर्शन ।
शेती-सामानासहित ॥३२॥

उत्तम रांगेंत बैल ठेवावा ।
साजेल तैसा अंगीं भूषवावा ।
त्यांत ज्याची सफल सेवा ।
त्याचा गौरव त्या दिवशीं ||३३||

कोणीं जोडी उत्तम ठेवली ।
कोण बैलास खुराग घाली ।
इनामें द्यावीं त्यांस भलीं ।
सर्व गांवकर्‍यांनी ॥३४॥

कोणाचें उत्तम शेतीसाधन ।
कोणीं ठेवले नोकर प्रसन्न ।
त्याचें वाढवावें उच्च स्थान ।
पोळयाचिया शुभदिनीं ॥३५॥

हे तर झाले मुख्य दिवसाबद्दल पण या सणाचं एक additional feature पण आहे. इकडे विदर्भात दुसऱ्या दिवशी जोर शोर से भरतो तान्हा पोळा. हा उत्सव बालगोपालांचा आणि त्यांच्या लाकडी नंदीबैलांचा.
मोठ्या पोळ्यात लहानग्यांना विशेष भाग घेता येत नाही म्हणून खास बालकांची हौस पुरवण्यासाठी
नागपूरचे रघूजीराजे भोसले यांनी दिडशे वर्षांपूर्वी ही प्रथा सुरू केली आणि बघता बघता पूर्ण विदर्भात मोठ्या उत्साहात तान्हा पोळा साजरा केला जाऊ लागला.

तान्ह्या पोळ्याच्या दिवशी मोहल्ल्यातल्या मारोती मंदिरात आपापले लाकडी बैल घेऊन मुले एकत्र जमतात. तोरण बांधलेले असते.
IMG_20190902_233023.JPG
A
IMG_20190902_233419.JPG
विविध वेशभूषा स्पर्धा, बैल सजावटीच्या स्पर्धा, बैल घेऊन धावण्याची शर्यत असे भरगच्च कार्यक्रम होतात.
नंतर मारूतीची आरती होऊन खाऊ वाटप झाले की तोरण तुटते आणि पोळा फुटतो. मुले आपापले बैल घेऊन घरोघरी जातात.

मुलांचे तोंड गोड केले जाते आणि त्यांच्या बैलांना ओवाळून बोजारा म्हणून काही रुपये देतात.
IMG_20190902_232925.JPG

तान्ह्या पोळ्याच्या खास तान्हा बाजार भरतो. चिमूकल्यांसाठी मातीची भातुकली , मातीचे बैल, लहान मुलांची खेळणी कपड्यांनी बाजार सजला असतो. छोट्या मुलींना भातुकली भेट दिली जाते.
IMG_20190902_233110.JPG

हा आमचा घरचा नंदी ( 3 पिढ्यांनी वापरलेला)
IMG_20190827_220926.JPG

आणि हे त्याचे नैवेद्याचे ताट (घरीच बनवलेले #art attack) Lol
IMG_20190827_221035.JPG

याच दिवसाचे अजून एक खास आकर्षण म्हणजे मारबत. ही अनोखी पद्धत मात्र फक्त नागपूर शहरातच बघायला मिळते. पिवळी आणि काळी मारबत आणि त्यांचा सोबती असतो बडग्या. पूर्वी नागपूरकर भोसल्यांच्या घराण्यातील बांकाबाई नामक स्त्रीने इंग्रजांशी हातमिळवणी केली त्याचा निषेध म्हणून माराबतीची पद्धत सुरू झाली. बांकाबाईच्या नवर्याने तिला पाठिंबा दिला म्हणून मग त्याचाही पुतळा (बडग्या) बनवून त्याचीपण मिरवणूक काढतात.
images (1).jpeg
(source: internet)
काठ्या बांबू आणि पोत्यांचा वापर करून मोठे पुतळे बनवतात. त्याला चिंध्या गुंडाळतात, काळ्या आणि पिवळ्या रंगांनी रंगवतात. टायरच्या माळा घालतात . बडग्याच्या हाती मुसळ देतात आणि वाजत गाजत शहरातून मिरवणूक निघते. त्या त्या वर्षीचे राजकीय मुद्दे, रोगराई, सामाजिक समस्या अश्या चर्चेचा मुद्दा घेऊन बडग्या येतो.
या साऱ्या समस्या आपल्यासोबत घेऊन जा गे मारबत अशी आरोळी दिली जाते आणि मग माराबतींचे दहन होते. समाजातले वाईट घटक, चालीरीती, रोगराई दूर करण्याचे प्रतीक म्हणजे मारबत

थोडं पलीकडे मध्यप्रदेशात डोकावलं तर पांढुरणा शहरात या दिवशी एक वेगळाच 'गोटमारचा मेळा' साजरा होतो. अक्षरशः दगडफेकीचा खेळ खेळला जातो. जाम नदिच्या मधोमध एक पळसाची फांदी रोवली जाते. तिला लाल कापड, नारळ, हार घातले जातात
download.jpeg
(source: internet)
आणि मग सकाळी सुरू होतो दगडफेकीचा खेळ. ढोल ताश्यांच्या ( हल्ली DJ च्या) गजरात आणि भगाव - भगावो च्या ओरड्यात दोन्ही कडचे गडी कुऱ्हाड घेऊन नदीत उतरतात आणि फांदी कापायला निघतात. इकडे
अल्याड आणि पल्याडचे गावकरी एकमेकांवर दगडफेक करतात. प्रतिस्पर्ध्याला फांदी पर्यंत पोचता येऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात दगडफेक केली जाते. अगदी गोफणीचा वापर करून लांबवर नेम साधला जातो. अखेर जो गट फांदी कापण्यात यशस्वी होईल त्याला विजेता घोषित करून चंडीमातेच्या जयघोषात हे युद्ध संपते. यात कित्येकांची डोकी फुटतात, कित्येकजण जीवाला मुकतात, नागपूरचे दवाखाने दुसऱ्या दिवशी पूर्ण भरलेले असतात. पण
प्रशासनाने कितीही बंदी घातली तरी लोकांच्या आस्थेशी जुळलेली असल्याने ही पध्दत मात्र सुरूच आहे.

[भारत का दिल अर्थात मध्य भारत. काही दिवसांपूर्वी माझ्याच एका पाककृतीच्या धाग्यावर मी मध्य भारतीय समाजरितींचा उल्लेख करून कधीतरी त्यावर लिहिण्याचा विचार व्यक्त केला होता
https://www.maayboli.com/node/67167
आता जरा सवड काढून लिहून बघितलं. इथल्याच एका सणाची काही वैशिष्ट्यं. अशा प्रकारच्या लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे. बघा जमतय का. पुढे कधी मध्य भारताबद्दल अधिक लिहिले (सामाजिक/ स्थलवर्णन/ पाककृती) तर याच नावाने (भारत का दिल देखो) प्रकाशित करेन.
आपल्या स्पष्ट प्रतिक्रिया आणि सूचनांच स्वागत आहे
- मृण्मयी ]

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा मस्त माहिती.

टीव्हीवर दाखवतात मारबत मिरवणूक पण डीटेल्स माहिती नव्हते.

तान्हा पोळा फार गोड. नगर जिल्ह्यात पण लहान मुलं घरी छोटे खेळण्यातील बैल पूजताना बघितलं आहे.

लिहा आणखी मध्य भारताबद्दल..
Btw मारबत आमच्या भंडारा जिल्ह्यात पण काढतात.
गोटमार छिंदवाडा जिल्हातील पांढुर्णा आणि सावरगाव या दोन गावात होते. यावर्षी पांढुर्णा ला ध्वज मिळाला म्हणे.
माझ्या खूप आठवणी आहेत पांढुर्णा शी जुळलेल्या. पण कधी गोटमार बघायचा योग नाही आला.

माहितीपूर्ण लेख.
तान्हा पोळा माहीत होतं.
मारबत बद्दल ऐकलं होत पण एवढी माहिती न्हवती.
गोटमार विषयी पहिल्यांदाच कळलं

व्वा !! आमच्या नागपुरातल्या तान्हा पोळा चे वर्णन वाचुन मजा आली. मारबत पहायला आम्ही अगदि खास धरमपेठ हुन तिकडे पुलाच्या पलीकडे जायचो Wink इकडे आमच्या ऑफिस मधला एक पोट्टा आहे, त्याचा चेहेरा अगदि पिवळ्या मारबती सारखा आहे.... Lol Lol Lol
तो जॉइन झाल्यवर काहि दिवसांनी फार आगाउ पणा करत होता, तेव्हा त्याला ए पिली मारबत..ज्यादा शानपट्टी मत कर न बे म्हणुन झापलेला . तो अजुन ही विचारतो सर, ते पिली मारबत का काय म्ह्णाला होतात ते काय हो

मस्त माहिती आणि फोटो. तान्हा पोळा या विषयी नुकतेच समजले होते. फारच छान कल्पना आहे ही. मुख्य पोळ्यापेक्षा हा 'तान्हा पोळा' जास्त रंगत असणार. मारबतचे फोटो नेहमीच वर्तमानपत्रात पहायचो पण पार्श्वभुमी प्रथमच समजली.
गोटमार हा माणसाने शोधलेला पहिला सण असणार. Sad

दुसऱ्या फोटोतील आश्रमकन्या मारुतीवर भाळलेली दिसतेय आणि मारुतीही तिला सांगतोय "कन्ये मी ब्रम्हचारी आहे, तू पुढे जा" Lol
मस्तच आहे हे दोन्ही पोळ्याचे सण.

छानच फोटो व लेख. असे अजून लिहीत जा. ती मुलींची भातुकली फारच गोड आहे. पण आता मुलींना पण बैल व नांगर द्यावा ही नम्र विनंती. पोळ्या आधी पुण्यात पण आमच्या घराखाली बैल विकायला येत.

क्युट आहेत फोटो
एक प्रकारे मुलांचे फन फेअरच हे.
ऋषी मुनी आश्रम कन्या एकदम ब्युटीफुल सजल्यात.

सगळ्यांचे मनापासून आभार.
>>गोटमार छिंदवाडा जिल्हातील पांढुर्णा आणि सावरगाव या दोन गावात होते. यावर्षी पांढुर्णा ला ध्वज मिळाला म्हणे.
माझ्या खूप आठवणी आहेत पांढुर्णा शी जुळलेल्या. पण कधी गोटमार बघायचा योग नाही आला.
Submitted by @Shraddha on 3 September, 2019 >>
हो. वो एक लम्बी कहानी है.
17 व्या शतकात सावरगावची छोरी आणि पांढुर्णा चा छोरा यान्ची बाजारात भेट झाली. मग काय
बीच बजारी दंगे लग गए दो तलवारी अखियो के...
के जान कटे के जिगर कटे इन दोधारी आँखियों से..

बात बढ़ते बढ़ते आगे बढ़ गई. पण दुनिया जालिम है. मुलगी होती आदिवासी आणि मुलगा गावकरी. दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. श्रावण अमावास्येला रात्री दोघे नदीकाठी भेटले. पण याचा सुगावा लागताच दोन्हीकड़चे गावकरी संतापून नदीकाठी जमले आणि या दोघावर दगड़फ़ेक केली. यातच त्यांचा नदिच्या मधोमध असताना मृत्यू झाला. Sad
गोटमार प्रथा हि त्या दुर्दैवी घटनेची आठवण

@तेव्हा त्याला ए पिली मारबत..ज्यादा शानपट्टी मत कर न बे म्हणुन झापलेला . तो अजुन ही विचारतो सर, ते पिली मारबत का काय म्ह्णाला होतात ते काय हो
Submitted by प्रसन्न हरणखेडकर on 3 September, 2019
Lol Lol Lol

@ दुसऱ्या फोटोतील आश्रमकन्या मारुतीवर भाळलेली दिसतेय आणि मारुतीही तिला सांगतोय "कन्ये मी ब्रम्हचारी आहे, तू पुढे जा" Lol
Submitted by शाली on 3 September, 2019
शालीदा.. अगदी अगदी

@ बडग्याचा फोटॉ नाही का..? की ती काळी मारबतच बडग्या आहे..?
Submitted by DJ.. on 3 September, 2019

नाही. काली मारबत म्हनजे बाकाबाई आणि पिवली मारबत म्हन्जे इन्ग्रज सरकार. असे प्रतीक आहे.
या वर्षीचा बड़गा
images (2).jpeg
यंदा बडग्याने इम्रान खानचे रूप धारण केले होते

बात बढ़ते बढ़ते आगे बढ़ गई. पण दुनिया जालिम है. मुलगी होती आदिवासी आणि मुलगा गावकरी. दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. श्रावण अमावास्येला रात्री दोघे नदीकाठी भेटले. पण याचा सुगावा लागताच दोन्हीकड़चे गावकरी संतापून नदीकाठी जमले आणि या दोघावर दगड़फ़ेक केली. यातच त्यांचा नदिच्या मधोमध असताना मृत्यू झाला. Sad
गोटमार प्रथा हि त्या दुर्दैवी घटनेची आठवण>> अरे रे ऑनर किलिन्ग ला आपल्याक डे असे रेगुलराइज करून नॉर्मल करून टाकले आहे. वाइट वाटते. खरे तर दोन लोकांमधले प्रेम ही फार अमुल्य बाब आहे. जी ए कुलकर्णींसारखी प्रतिभा असती तर एखादी सुरेख कथा झाली असती. त्यांची एक आहे सुद्धा. पण त्यात अज्ञानी लहान मुलीचा बळी दिला जातो अगदी वाचवत नाही शेवटी.

छान लेख आहे! काहीच माहिती नव्हती या मारबत आणि पोळ्याच्या प्रथेबद्दल. त्या दगडफेकीबद्दल कोठेतरी वाचले होते.

लिहा अजून. आवडेल वाचायला.

ईंट्रेस्टिंग माहिती आहे.
गोटमार प्रथेमागची लवस्टोरी टाईमपास घुसडलेली वाटते.
अशीच Medieval प्रथा (गोफणगुंडा) कोपरगावजवळील दोन लहान गावांमध्ये आहे, फक्त ते हाताने दगड फेकण्याऐवजी गोफणी वापरतात. पाऊस पडावा म्हणून करतात म्हणे. लोक जखमी होतात म्हणून पोलिस बंद करायला गेले तर पोलिसांनाही बदडून काढतात गावकरी.
ट्रॅक्टर भरून दगडी आणून पाचेक दिवस वगैरे करतात मारामारी आणि दिवस संपल्यावर पार्टीही करतात Lol ... कायच्या काय?

धन्यवाद अमा, हर्पेन, स्वाती2, फ़ारएण्ड, हायजेनबर्ग, उपाशी बोका, जिद्दू

@अरे रे ऑनर किलिन्ग ला आपल्याक डे असे रेगुलराइज करून नॉर्मल करून टाकले आहे. वाइट वाटते.
Submitted by अमा on 3 September, 2019 -
+100

@फक्त ते हाताने दगड फेकण्याऐवजी गोफणी वापरतात. पाऊस पडावा म्हणून करतात म्हणे. लोक जखमी होतात म्हणून पोलिस बंद करायला गेले तर पोलिसांनाही बदडून काढतात गावकरी.
ट्रॅक्टर भरून दगडी आणून पाचेक दिवस वगैरे करतात मारामारी आणि दिवस संपल्यावर पार्टीही करतात
Submitted by हायझेनबर्ग on 3 September, 2019 -

इथे पण असेच आहे. ट्रॅक्टर भरून दगडी आणि नंतर पार्टीही
वगैरे वगैरे.
फ़क्त दाखवायला कारणे वेगळी.
शेवटी काय तर सब हमाम मे नं* होते हैं

पुर्वी काही गावांमध्ये नारळातलं खोबरं छिद्रावाटे बाहेर काढून, वाळवून त्या नारळांमध्ये फटाक्यांची दारू भरत व वात पेटवून विरूद्ध गावच्या लोकांवर फेकत. अशा प्रसंगात जी विरश्री संचारते, की तिच्यामुळे हात पाय तुटला तरी वेदना जाणवत नाहीत. सेम दहीहंडी चे थर लावताना.

दोन गावांत मारामारी वगैरे प्रथा बऱ्याच ठिकाणी दिसतात पूर्वापार, कारण काही असो. आधी माहिती नव्हतं काही पण tv मुळे समजतं. मला जाम भीती वाटते अशा प्रथांची. कुठेतरी एकमेकांना शिव्या द्यायची प्रथापण समजली दोन गावांत पण त्यात मारामारी नसते. पण उद्धार करत असतील. होळीला बोंबा मारतात ते वेगळं पण ही प्रथा होळीच्या वेळी नव्हती बहुतेक.

बाकी ती गोटमारची कथा खरी असेल तर फार वाईट वाटलं वाचून. गोव्यातल्या दोना पावलाची अशीच आहे का काही स्टोरी, म्हणजे तिथे मारामारी वगैरे नाही पण पाण्यात मृत्यू वगैरे झालेला ना त्यांचा.

@बाकी ती गोटमारची कथा खरी असेल तर फार वाईट वाटलं वाचून. गोव्यातल्या दोना पावलाची अशीच आहे का काही स्टोरी, म्हणजे तिथे मारामारी वगैरे नाही पण पाण्यात मृत्यू वगैरे झालेला ना त्यांचा.
Submitted by अन्जू on 4 September, 2019>>

अशा कथा खऱ्या की खोट्या याबाबतीत काहीच तर्क लावता येत नाही. खरी असेल तर फ़ारच वाईट Sad

छान लिहिलंय. पुढचे भाग वाचायला आवडतील. तीस वर्षे नागपूरात राहून मारबत पाहिली नाही. तान्हा पोळा मात्र दरवर्षी पाहत आलो. त्यादिवशी शाळंनाही सुटी असते.... इतर भागात नसते ना !

तान्ह्या पोळ्याचे दिवशी लहान मुले शेजारी तसेच ओळखीच्या लोकांकडे मातीचा किंवा लाकडाचा बैल घेवून जातात,त्यांना खाऊ म्हणून पैसे किंवा चॉकलेट दिले जाते.तसेच यादिवशी सूर्य उगवण्याआधी गावातून मारबत काढल्या जाते.शाळेला सुट्टी राहते.

Pages