दोस्त हवा!

Submitted by मुग्धमानसी on 7 August, 2022 - 04:18

दूर दूर सांगाती
निष्कारण फिरणारा
राने, वाटा, प्रवास..
रम्य धुंद करणारा
दुखर्या जागा जपून
आवाजी ओळखून
"चल भेटू नाक्यावर"
म्हणणारा दोस्त हवा!

चिडल्यावर हसणारा,
हसल्यावर चिडणारा
बेफ़िकरे काहीही
का ही ही बकणारा
मनी येते ते सारे
अघळपघळ सलणारे
शब्दा मौनांत शांत
जगणारा दोस्त हवा!

चुकते माझे बरेच
धडक्या वाटेत ठेच
गडबडूनी वाटे मग
आता चालू नयेच.
नेमक्या अशाच क्षणी
काढूनीया आय-भणी
"उठ साल्या, बाजिंद्या!"
डसणारा दोस्त हवा!

मौल्यवान काहिसे
हृदयाशी जपलेले
हरवतेच काही असे
काळजात लपलेले
तेवढ्या भयाण क्षणी
भणभणत्या रिक्त रणी
"आहेना मी अजून..."
म्हणणारा दोस्त हवा!

सांज शांत होताना
वय निवांत होताना
नसत्या कल्लोळांतून
पार पार होताना
गुपिते हळवी हिरवी
काही जुनी, काही नवी
"फोडीन बघ" धमकावून
छळणारा दोस्त हवा!
तरी सगळे तहहयात
जपणारा दोस्त हवा!

सोबतीने जगण्याला
भिडणारा दोस्त हवा!
सगळ्या गांभिर्यावर
हसणारा दोस्त हवा!
एकुटवाण्या जिण्यात
भरणारा दोस्त हवा!
शेवटचे क्षण कातर
करणारा दोस्त हवा

दोस्त हवा!

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

काय सुंदर आहे. मस्त!!!
>>>>>"उठ साल्या, बाजिंद्या!"
डसणारा दोस्त हवा!
येस्स्स्स!!!

छान!