हेचि खाणे देगा बावा

Submitted by अनिंद्य on 4 July, 2022 - 03:38

प्रत्येक आस्तिक मनाला मोहिनी पडावी असेच कृष्णाचे 'मनमोहन' रूप आहे. कृष्णभक्तीची मोहक रूपे भारतभर दिसून येतात, पण त्यात कमालीचे वैविध्य आहे. तमिळ वेत्रवेणुधारी थिरुमल वेंकटेश्वर, ओडिशातील जगन्नाथपुरीचा कालिया कृष्ण, केरळचा गुरुवायुरप्पन, कर्नाटकाचा उडुपी श्रीकृष्ण, ब्रिजवासीयांचा युगलरूपातला राधारमण, गुर्जर-ओखामंडलाचा राजस द्वारकाधीश आणि राजस्थानातील नाथद्वाराचा गोवर्धनधारी श्रीनाथ! भारतातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमध्ये बालरूपी, युगलरूपी, सखारूपी, प्रेमरूपी, गुरुरूपी किंवा परमात्मारूपी कृष्णाचे वर्णन करणारे साहित्य आहे. त्यातही 'बालक'रूपातल्या नटखट लीलाधर कृष्णावर भक्तांचे प्रेम काकणभर अधिकच.

वैष्णव संप्रदायामध्ये कृष्णरूप हे 'सगुण-लालित-सेवित स्वरूप' मानले जाते, म्हणजे एखाद्या खऱ्याखुऱ्या मानवासारखे. मूर्तिरूपातल्या देवाला सर्व भावभावना असतात, तो बोलतो, ऐकतो, खातो-पितो, झोपतो अशी वैष्णवजनांची श्रद्धा आहे. त्यामुळे जगभरातल्या कोणत्याही कृष्णमंदिरात देवमूर्तीची उत्तम बडदास्त राखलेली दिसून येते. पैकी राजस्थानातल्या पूर्वाश्रमीच्या मेवाड-उदयपूर संस्थानातले 'नाथद्वारा' हे 'पुष्टिमार्गीय' वैष्णवांचे अत्यंत महत्त्वाचे पीठ आहे. करंगळीवर गोवर्धन पर्वत तोललेल्या कृष्णाचे गोजिरवाणे रूप म्हणजेच नाथद्वाराचा ‘श्रीनाथ’.

इथे कृष्ण सात वर्षीय बालकाच्या रूपात पूजला जातो. त्याला 'नंदघरी' - म्हणजे पितृगृहात ठेवल्याचे मानतात. पिता नंदबाबा, आई यशोदा आणि सर्व ग्वाल-गोपाळ कृष्णाला सांभाळतात, त्याचे लाड करतात. कृष्ण इथे 'लाडोबा' आहे, त्यामुळे त्याला 'श्रीनाथ बावा' असे मित्रत्वाचे संबोधन आहे. सात वर्षाच्या मुलाप्रमाणे त्याचा दिवस कल्पिलेला आहे. सकाळी घाईघाईने न उठवता सौम्य रागातील संगीताने आणि हळू आवाजात केलेल्या मंत्रपठणाने श्रीनाथला जाग येते. आई-बाबा ‘बेड टी’ऐवजी गंगा-यमुनेचे पाणी, गाईचे धारोष्ण दूध, ताजे लोणी आणि खडीसाखर प्रेमाने भरवतात. आंघोळ घालून नवीन कपडे देतात. न्याहारीत केशरयुक्त दही, बदामाचा शिरा, ‘मठरी’ आणि 'ठोर'सारखे कोरडे पदार्थ असा आहार दिल्यानंतरच त्याच्या हाती बासरी देण्यात येते, नाहीतर छोटा श्रीनाथ बासरी वाजवण्यात गुंग होऊन खाण्याकडे दुर्लक्ष करेल, असा मातृभाव असतो. खाऊन झाले की नंदगृहातल्या गाई घेऊन गोपालक कृष्ण अरावलीच्या टेकड्यांवर जातो. गाई तिथे चरतात आणि बासरी वाजवत हा 'बावा' रानात उंडारतो. दुपारी भूक लागली की घरी येतो. भव्य प्रमाणात केलेला 'राजभोग' ओरपून थोडा वेळ झोपतो. मग त्याचे मित्र येतात, त्यांच्याशी खेळतो. गोरज मुहूर्तावर आपले गोधन परत घेऊन घरी येतो. धुळीने माखलेल्या ह्या द्वाड मुलाला माता यशोदा पटकन ऊन-ऊन पाण्याने आंघोळ घालते, त्याची दृष्ट काढून तहानलाडू-भूकलाडू देते. दिवेलागणीला परत सखा-मित्र येतात, त्यांच्याशी खेळतो, भजन-कीर्तन ऐकत रात्रीच्या जेवणाची वाट बघतो. जेवण झाले की थोडा वेळ सोंगट्यांचा खेळ आणि मग अंगाई गीत ऐकत सुखशय्येवर झोप.... लाडक्या सुकुमार नंदपुत्राचा दर दिवस असाच, रमतगमत.

भागवत पुराणात बालक कृष्णाने इंद्राच्या पर्जन्यकोपापासून वृंदावनवासीयांना अभय देण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलून धरल्याची कथा येते. देवराज इंद्राचे गर्वहरण करणाऱ्या गोवर्धनधारी कृष्णासाठी गर्गसंहितेतल्या गिरिराज खंडात पहिल्यांदाच 'देवदमन श्रीनाथ' असे नाव येते. हा श्रीनाथ मूळचा मथुरेजवळील गोवर्धनचा. दुर्मीळ काळ्याशार संगमरवरात घडवलेली आजची सुडौल मूर्ती साधारण १६७२ सालची असावी. प्रसिद्ध वैष्णव संत श्री वल्लभाचार्यांनी भगवतभक्तीचा शुद्धाद्वैत - 'पुष्टिमार्ग' सांगितला. त्यांचे पुत्र आचार्य विठ्ठलनाथांनी तोच मार्ग पुढे नेऊन कृष्णाच्या सगुण उपासनेची आखीव-रेखीव परंपरा घालून दिली. मथुरेत गोवर्धनधारी कृष्णाचे रूप 'देवदमन श्रीनाथ' म्हणून प्रसिद्ध होते, त्यालाच वल्लभाचार्यांनी 'गोपाल' म्हणून आळवले आणि पुढे विठ्ठलनाथांमुळे त्याला 'श्रीनाथ' हे नाव मिळाले. मूर्तिभंजकांच्या भीतीने भक्तगणांनी मूर्ती आडमार्गाने मथुरेहून दूर नेण्याचे ठरवले असता तत्कालीन मेवाड राज्याच्या 'सिंहाड' नामक गावात मूर्ती असलेला रथ रुतून बसला. हा दैवी संकेत असल्याचे गृहीत धरून त्याच जागी श्रीनाथाला 'घर' बांधून देण्याची जबाबदारी मेवाडच्या महाराणा राजसिंहने सहर्ष स्वीकारली. तेव्हापासून हा 'श्रीनाथ बावा' तिथेच नांदतोय. कधीतरी तो परत मथुरेला जाणार आहे अशी भक्तांची श्रद्धा आहे.

आज नाथद्वारात दिसते ते मंदिर १७२८ साली बांधलेले आहे. मंदिराची रचना अन्य मंदिरांपेक्षा अगदीच वेगळी आहे. या मंदिराला 'शिखर' नाही, आतील रचनाही एखाद्या राहत्या महालासारखी आहे. कदाचित त्यामुळेच ह्या स्थानाला श्रीनाथजींचे ‘मंदिर’ न म्हणता ‘श्रीनाथजी हवेली' म्हणतात. मानवनिर्मित तलावांच्या रमणीय उदयपूर शहरापासून नाथद्वारा जेमतेम ५० किलोमीटरवर आहे. अरावलीच्या खुज्या पर्वतरांगा आणि फक्त पावसाळ्यातच पुरेसे पाणी असलेली 'बनास' नदी दोन्ही श्रीनाथाचे सोबती.

वल्लभाचार्यांचे पूर्वज तेलुगुभाषी तेलंगी, पण वाराणसीत स्थायिक झालेले, त्यांचा जन्म आणि बालपण आजच्या छत्तीसगड राज्यातल्या चंपारण गावातले, त्यांनी स्थापन केलेली श्रीनाथाची हवेली राजस्थानात, बहुसंख्य सेवेकरी ब्रजवासी आणि भक्त मुख्यतः गुजराती मंडळी, असे भारतभरच्या विविध प्रांतांना भक्तिपाशात बांधणारा हा श्रीनाथ. हनुवटीत जडवलेला मोगल बादशहा अकबरने अर्पण केलेला ठसठशीत हिरा, बादशहा जहाँगीरने २०००० गाई आणि ६४ गावे श्रीनाथला अर्पण केल्याचे लेखी आज्ञापत्र, मूर्तिभंजक म्हणून कुख्यात असलेल्या औरंगजेबाच्या बेगमेने श्रीनाथ बावाला केलेले आणि फेडलेले नवस आणि बावाच्या डोळे दिपवणाऱ्या संपत्तीचा मोह पडून हवेली लुटणारे इंदूरकर होळकर अशी थोडी वेगळी कीर्ती आहे ह्या बावाची.

473FA9B1-6EBA-4A84-B31E-79C072B1E8BD.jpegनाथद्वाराचा ‘श्रीनाथ बावा’

श्रीनाथाचे निवासस्थान सर्व सोईंनी युक्त वैभवशाली 'नंदघर' कल्पिलेले असून माता-पित्याच्या घरी बालकाला लागणाऱ्या कोठल्याही वस्तूची कधीच कमतरता भासणार नाही अशी व्यवस्था करण्यासाठी वैष्णवजनांचा आटापिटा असतो. हवेलीत दूधदुभत्यासाठी 'दूध घर', विडा-सुपारीसाठी 'पान घर', साखर ठेवण्यासाठी 'मिश्री घर', वेगवेगळ्या मिठाया तयार करण्यासाठी 'पेढा घर', सुवासिक फुलांच्या राशी ठेवण्यासाठी 'फूल घर', नैवैद्य तयार करण्यासाठी 'रसोई घर', बावाचे माणिकमोत्यांचे हजारो दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी 'गहना घर', रथाच्या राजेशाही घोड्यांसाठी 'अश्वशाळा', सुमारे बावीस हजार गाई असलेल्या ७ मोठ्या गोशाळा, नैवैद्यासाठी लागणारे केशर-कस्तुरी दळण्यासाठी खऱ्या सोन्याचे जाते असलेले 'चक्की घर', शुद्ध तूप साठवण्यासाठी तर विहिरी शोभाव्यात अशा आकाराचे काही रांजण आणि उत्सवप्रसंगासाठीची 'महाप्रभू बैठक' असलेले सभागृह असा मोठाच जामानिमा आहे.

श्रीनाथबावाच्या अष्टौप्रहर सेवेसाठी रसोईये, प्रसादिये, भीतरीये, अधिकारी, सेवावली, झपटीए, ग्वाल, नंदबालक, झारीसेवक, पंडित, फूलघरीये, पानघरीये, दर्जी, खवास, रंगरेज, शृंगारी, आरसीये, ज्योतिषी, निगरा असे शेकडो लोक दररोज तत्पर असतात. दर दिवशी प्रचंड गुंतागुंतीचे अनेक धार्मिक विधी साजरे होतात. ही रोजची वैभवशाली सेवा कमी की काय, म्हणून सरासरी एका आठवड्यात तीन असे विशेष उत्सव इथे होतात. श्रीनाथजींच्या मनोरंजनासाठी नवनवीन 'मनोरथ' सोहळे होतात, शेकडो प्रकारचे नैवैद्य आणि सेवा अर्पण करण्यात येतात.

AF9BBB19-14D4-4652-9F1F-9E20C3A14501.jpegश्रीनाथ बावाचा नित्य (दैनिक) भोग

पण दररोज रस-वैभव पुरेपूर भोगणाऱ्या श्रीनाथ बावाला खरी प्रतीक्षा असते ती दिवाळीची. तो सण मोठाच. इतर लहान मुलांसारखा चोहीकडे दिव्यांची आरास आणि उत्तमोत्तम मिठाया-फराळाचा आनंद बावालाही मिळतो, पण त्याहीपेक्षा मोठा उत्सव होतो दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी - गोवर्धन पूजा आणि अन्नकूट महोत्सव. डाव्या हाताच्या करंगळीवर गोवर्धन तोलणे हे बावाचे प्रमुख अवतारकार्य नाही का? नाथद्वाराप्रमाणेच मथुरा, वृंदावन, ब्रज, बरसाना, द्वारिका यासारख्या, कृष्णावताराच्या कथांशी संबंध असलेल्या भागात दिवाळीचा पाडवा 'अन्नकूट' महोत्सवासाठी आणि गोवर्धन पूजेसाठी राखीव आहे. सर्व मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात अन्नकूट सेवा मोठ्या आकर्षणाचा विषय असतो.

तर दिवाळीचे दिवे मंद होत असतानाच पाडव्याच्या पहाटे बावा जागा होतो. रात्रीच त्याने गोशाळेतल्या गाईंची 'कान जगायी' केली असते, म्हणजेच उद्या आपण रोजच्या जागी चरायला न जाता गोवर्धन पूजा आणि त्यांनतर होणाऱ्या अन्नकूट प्रसंगाला जाणार आहोत हे गुपित कानात सांगितले असते. त्यामुळे त्याही नटूनथटून तयार असतात.

1462F290-CC9D-47FB-AC3B-FF69A3156E32.jpegश्रीनाथ बावाचे गोधन

आवळा-चंदन आणि केशरयुक्त तेलाने अभ्यंगस्नान केलेल्या बावाचा आज पहाटेचा विशेष नैवेद्य म्हणजे केशर दूध, ताजे लोणी आणि उडीद डाळीच्या पिठाची शुद्ध तुपात तळलेली बुंदी, एकदम प्रोटीन-पॅक्ड ब्रेकफस्ट! भल्या पहाटेच हा 'मंगलभोग' ओरपून स्वारी सवंगड्यांच्या साथीने गोवर्धन उचलायला तयार!

तोवर मुख्य चौकात गोशाळेतल्या गाईंचे वाजतगाजत आगमन होते. तिथे गोमेयातून साकारलेल्या गोवर्धनाच्या प्रतिकृतीची श्रीनाथ बावा आणि त्याचे सवंगडी पूजा करतात. शृंगारलेल्या गाईंना ओवाळून त्यांना 'थूली' (पातळ शिरा) आणि लापशी खायला देतात. प्रतिकात्मकरीत्या गोवर्धन करंगळी आणि काठ्यांवर तोलतात. तदनंतर इंद्रावर विजयाचे प्रतीक म्हणून श्रीनाथाचे गोधन शेणाचा गोवर्धन ओलांडून आपल्या गोशाळेत परत जाते. सगळ्या समारोहात अनेक किचकट आणि प्रतीकात्मक धार्मिक विधी असतात, पण सगळ्यांवर ताण असतो तो जमलेल्या गोपालकांचा ओसंडणारा उत्साह!

6BE9CC5E-E4FE-4D5F-B1BA-C34B9E4786C4.jpegगोवर्धन - एक प्रतीकात्मक चित्र

आता मात्र बावाला करकचून भूक लागते आणि सगळेच कामाला लागतात. आता अन्नकूट उत्सवाची वेळ येऊन ठेपलेली असते. अन्नकूट म्हणजे अन्नाचा डोंगर. सात दिवस करंगळीवर गोवर्धन तोलल्यामुळे बालक कृष्णाला श्रम झाले आणि खूप भूक लागली. एका दिवसात आठदा जेवणारा तो, त्याला असा सलग निर्जळी उपवास घडला. पाऊस थांबला, तसे सर्व गोपालकांनी आपापल्या घरून उत्तम पदार्थ बनवून कृष्णासाठी नैवेद्य म्हणून आणले. ७ दिवस आणि प्रत्येक दिवसाचे ८ असे एकूण ५६ पदार्थ! त्यामुळे कृष्णाला ह्या विशेष मेजवानीत 'छपन्न भोग' चाखायला मिळाले आणि तीच प्रथा पुढे सुरू राहिली.

श्रीनाथ बावाचा 'अन्नकूट' साजरा करताना देवळासमोरच्या रतनचौकात सुमारे ४००० किलो भाताचा भलामोठा डोंगरच रचण्यात येतो. त्याच्या पायथ्याशी मातीच्या घागरींमध्ये आणि वेताच्या टोपल्यांमध्ये बाजऱ्याची खिचडी, कढी, खीर, माखन मिश्री, ३३ प्रकारच्या भाज्या मिळून केलेली 'गड्ड की सब्जी', घेवर, फेणी, मालपुवा, रबडी, मनोर लाडू, मगज लाडू, मख्खनबडा, खाजा, श्रीखंड, मलाई लाडू, मलाई पुरी, केशर बासुंदी, चंद्रकला, थूली, लापशी, मेव्याचे लाडू, तळलेली मटकी, दही, गोघृत, नवनीत उर्फ ताजे लोणी, मलई, मठरी, ठोर, मोहनथाल, कर्पूर सखडी, बदाम शिरा, मूगडाळीचा शिरा, जिलबी, बदामपाक, डिंकलाडू अशा अनेक प्रकारच्या मिठाया, नानाविध फळे, ताक आणि लस्सी, तुपात तळलेला सुका मेवा इत्यादी खाद्यपदार्थ रचले जातात. गोड पदार्थांवर भर असला, तरी चव बदलण्यासाठी म्हणून खजूर, आवळा आणि आंबट द्राक्षांची लोणची, पापड असतात. शेवटी अर्थातच गोविंदविडा उर्फ गिलोरी पान.

असे शेकडो प्रकारचे उत्तम खाद्यपदार्थ एका ठरावीक क्रमाने रचण्याचे काम काही तास चालते. केशर-केवडा-कस्तुरीचा, गुलाबपाण्याचा शिडकावा सर्वत्र करून, शंखध्वनीच्या, टाळमृदंगाच्या स्वरकल्लोळात श्रीनाथला 'अन्नकूट भोग आरोगण्यासाठी' हाळी दिली जाते. सर्वत्र प्रचंड उत्साह संचारतो, बावा मनसोक्त जेवतो आणि आणि मग काही वेळाने हा 'भोग' भाविकांमध्ये वाटला जातो.

2D4CC7F5-4136-414E-A356-C85057763016.jpegअन्नकूट भोगणाऱ्या श्रीनाथ बावाचे एका बालिकेने काढलेले कल्पनाचित्र

भाताचा डोंगर रात्री उशिरापर्यंत सरत नाही. शेजारच्या गावातील आदिवासी भिल्ल युवक मग तो डोंगर प्रतीकात्मकरीत्या 'लुटतात' आणि सगळ्यांनी मनसोक्त खादाडी करून हा महोत्सव संपतो. तोवर उजाडायला लागते आणि मंगल वाद्यांच्या मंजुळ स्वरांनी श्रीनाथाचा पुढचा वैभवशाली दिवस सुरू होणार असतो.

थोडी दंगामस्ती, मित्रांसह थेट देवराज इंद्राशी घेतलेला पंगा, सवंगड्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केलेले श्रम, जिद्दीने-कष्टाने इंद्रावर मिळवलेला विजय, त्याचे सर्वांनी केलेले कौतुक आणि मग खाण्यापिण्याची केलेली मनसोक्त चंगळ असे एका सात वर्षीय बालकाच्या भावविश्वाचे पुरेपूर प्रतिबिंब श्रीनाथ बावाच्या दिवाळी उत्सवात पडलेले दिसते.

समाप्त.

लेखातील काही अल्पपरिचित शब्दांचे अर्थ :-

वेत्र = ग्वालांच्या हाती गुरे हाकण्यासाठी असलेली काठी
वेणु = बासरी
गुरुवायुरप्पन = कृष्णाचे एक रूप, जसा आपल्याकडे पांडुरंग
पुष्टिमार्ग = सगुण कृष्णभक्तीची एक पद्धत

* * *

लेखातील काही चित्रे जालावरून साभार.

(पूर्वप्रसिद्धी - मिसळपाव दिवाळी अंक २०१९)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त माहिती.

ह्या मन्दिराला भेट देण्याचा योग आलेला पण आम्हाला जायला उशिर झाला. १२ वाजता बंद होणार असे काहितरी
सांगुन तिथल्या एकाने आम्हाला आत भरपुर धावडवुन एकदाचे दर्शन घडवले खरे पण निवांतपणे मंदिर भेट घडली नाही. परत एकदा जावे लागेल.

५६ भोग हे ५६च का हा प्रश्न कायम पडे, त्याचे उत्तर मिळाले. धन्यवाद.

ही वैष्णवी खाद्य यात्रा क्रमशः असणार आहे ना? तसं असेल तर सुरुवात तर झकास झाली.
आता पुढची मेजवानी चाखण्यास आतुर.

शीर्षकावरून पारशी खाद्यसंस्कृती वर लेख असेल असं वाटलं.
सुरेख, ओघवते लिहिले आहे.
वापरलेल्या संज्ञांचे, अपरिचित नावा़चे अर्थ टीप म्हणून द्या.

सुंदर लेख!
५६ भोग हे ५६च का हा प्रश्न कायम पडे, त्याचे उत्तर मिळाले. धन्यवाद......+१.

मला ही पारशी खाद्य संस्कृती बद्दल असेल लेख असं असे वाटलं होतं, पण मस्तच लिहिलय मजा आली वाचताना.

५६ भोग हे ५६च का हा प्रश्न कायम पडे, त्याचे उत्तर मिळाले. धन्यवाद....... >> अगदी अगदी साधना

मुळात देवाच्या बाळरूपाची अशी पूजा मांडून त्याचा रोजच उत्सव साजरा करणं हेच किती गोड आहे!! आपणही रांगता बाळकृष्ण पुजतो, पण हे असं रोजच्या रोज त्याला आंजारून गोंजारून त्याचं देवत्व आणि बालरूपही एकत्र साजरं केलं आहे असं नाही होत.

लेख सुरेखच आहे. कृष्णरावांची मज्जा आहे!!

अरे वा मस्तच ओघवते रसदार वर्णन.

मज्जा आहे ब्वा श्रीनाथ बावाची. बाकी त्या इंद्राला धडा शिकवला गोवर्धन उचलून ही गोष्ट लहानपणापासून आवडीची.

दिवाळीच्या पाडव्याला म्हणजे बलिप्रतिपदेला गोधनपुजन इथेही काही जणांच्यात बघायला मिळते.

हो..आमच्याकडेही खूप पूर्वी शेणाची चित्रे (प्रतिमा) करून त्यांची पूजा केली जायची.
पण इतरांच्या दारात छान छान रांगोळ्या, रंगीबेरंगी पणत्या आणि आमच्या अंगणात शेणाचा ढीग म्हणून आम्ही मुलांनीच मागे लागून (आजी गेल्यावर) ती प्रथा बंद पाडली. खरे तर हे सारे दारासमोरच पण एका कोपऱ्यात असायचे. त्याची खरी अडचण आम्हाला फटाके उडवताना व्हायची.
अवांतराबद्दल क्षमस्व.

रोचक लेख आहे
रोजच्या रोज हे सगळे कौतुक करणे म्हणजे कमालच आहे.
बावा बरोबर खेळायला कोणती मुलं येतात म्हणजे खरी की कपोलकल्पित असा उगाच प्रश्न पडलाय.
५६ भोग बद्दल माहिती नव्हती.

@ कुमार१

तुमचा प्रतिसाद उत्स्फूर्त असतो आणि नेहेमी आनंद देतो.

@ साधना,

'धावडवुन नेले' .. भारीच शब्द आहे Happy सगळी प्रसिद्ध कृष्णमंदिरं दिवसात पुनःपुन्हा देवदर्शनासाठी बंद असणे आहेच. आता त्याचे रोज आठदा जेवण, वामकुक्षी, सुखशयन वगैरे म्हटले की हे होणारच.

@ हिरा,

... ही वैष्णवी खाद्य यात्रा क्रमशः ...

प्रयत्न तर तसाच आहे. बघू कसे जमते ते. हा पूर्वप्रसिद्ध लेख २०१९ साली लिहिला होता, म्हणून नवीन काही श्रम नव्हते. सध्या हाती उपलब्ध वेळ कमी आणि अंगभूत कंटाळा जास्त असे व्यस्त प्रमाण आहे Happy

अप्रतिम लिहिले आहे.
श्रीनाथद्वारा येथिल रोजचा तिन्हि त्रिकाळ साज शृन्गार नेटवर पाहिला होता. पण यामागची पार्श्वभुमी माहित नव्ह्ती.
आज या मागच्या सगळ्या कथा उमगल्या.

खुपच सुंदर लेख. व माहिती. मला पण ते बावा मुळे पारसी खाद्य संस्कृतीवर लेख आहे का असे वाटले होते हे झाले की त्यावरही लिहा. पात्रानी मच्छी धानशाक अने लगन नु कस्टर्ड.

दिली फूड वॉक्स अनुभव साप्रा ह्यांची ह्या गावाची व खास मंदिर स्पेसिफिक फूड टूर आहे त्यात हे सर्व पदार्थ दिसतात व ५६ भोग ची माहिती ही
दिली आहे. त्यातील मंदिरातला सेवेकरी पण अगदी गोंडस बाल कपडे घातलेला. पांढर्‍या रंगित ठिपक्यांचा ड्रेस साधार ण गुजराती मुले गरब्यात घालतात तसा. व काजळ घातलेला.

अगदी मुग्ध करून सोडणारे बाल रूप. देवाला ही इथून कधी मथुरेला जाउच नये असा मोह होत असेल. हार्ट हार्ट.

@ भरत.
@ मनीमोहोर
@ अश्विनीमावशी

शीर्षकात 'बावा' ऐवजी ओरिजिनल 'देवा'च लिहिणार होतो पण मला 'बावा' हे संबोधन फारच आवडल्याने असे केले. ते पारशी बावाला लागू होते हे नंतर लक्षात आले Happy

पारशी रेसिपींबद्दल नंतर. ऑथेंटिक पारशी खानपान दक्षिण मुंबईत सुद्धा आता दुर्मिळ. BTW मुंबई-सिल्वासा रस्त्यावर एकेठिकाणी माझा मनपसंत स्पॉट आहे पारशी 'भोणू' साठी, वेगळा सचित्र धागा काढतो नंतर.

.. वापरलेल्या संज्ञांचे, अपरिचित नावा़चे अर्थ ..

कोणते शब्द अपरिचित आहेत ? पदार्थांची नावे तर आहेत तीच ठेवावी लागतील. (Being proper nouns)

सुंदर प्रतिसादांबद्दल आभार !

तेलुगु/ तेलंग् णा मध्ये तर बावा म्हणजे साडु भाउ. त्यामुळे अजूनच गोंधळायला झाले. बावागारु हे एक प्रस्थ असते मोठ्या बहिणीचा नवरा

लेख फारच गोड आहे. शब्द मनातील मृदु आई भावना जागवतात. लहान मुलग्याला जेवायला घालणे त्याला बघणे हा इतका नैसर्गिक प्रेमाचा भाग आहे.

अवांतर मी बॅक ऑफिस फंक्षन्स बघते त्यामुळे अनेकदा एका पेन ड्राइव्ह वर आपण वरचा सर्व गोवर्धन तोलुन धरला आहे व नन्हे मुन्ने रिक्वेस्टर
भुकेने कावुन व भिजत भिजत आपल्या उत्तरा साठी थांबले आहेत असे रूपक कायम डोळ्यासमोर असते.

अतिशय सुंदर झालाय लेख, श्रीनाथ बावा व त्याचे गोपीजनवल्लभ दोघेही धन्य _/\_
हवेली काय, त्याचे रूटीन काय, सात वर्षाच्या बालकावर करावं तसं प्रेम , कौतुक ,भक्ती, जपणूक वगैरे , संपूर्ण सशरीर अस्तिव व भक्तांचा तसा निर्व्याज भाव हे सर्वच हृद्य आहे. तुमचं वर्णनही इतकं ओघवतं आहे की सगुण रूपात श्रीकृष्ण तिथे असल्याची जाणीव एक वाचक म्हणून खरोखरच माझ्यापर्यंत पोचली. मनाने तिथे जाऊन आल्यासारखं वाटलं. Happy

वेत्रवेणुधारी, गुरुवायुरप्पन , पुष्टिमार्गीय यांचा अर्थ सांगा. काही पदार्थांच्या नुसत्या नावावरून त्यांचा अंदाज येत नाही.

वेत्र = ग्वालांच्या हाती गुरे हाकण्यासाठी असलेली काठी

वेणु = बासरी

गुरुवायुरप्पन = कृष्णाचे एक रूप, जसा आपल्याकडे पांडुरंग

पुष्टिमार्ग = सगुण कृष्णभक्तीची एक पद्धत

लेखात तसे अपडेट करतो.

@ एस
@ देवकी
@ BLACKCAT
@ rmd
@ सामो
@ मामी
@ मी_आर्या
@ रागीमुद्दे

सर्वांनी लेखन आवडल्याचे सांगितले, फार आनंद झाला.

अनेक आभार !

@ सावली

... बावा बरोबर खेळायला कोणती मुलं येतात...

ही एक मजेशीर परंपरा आहे. बावाला मथुरेहून आणणाऱ्या वल्लभाचार्यांचे आणि त्यांच्या सवंगड्यांचे कुटुंब आता प्रचंड विस्तारले आहे, त्यांचे आताचे वंशज 'वल्लभकुल के बालक' म्हणवले जातात. हे बालक, अन्य भक्त आणि सेवेकरी बावासोबत खेळतात, भजन-कीर्तन करतात आणि अर्थातच खादाडी सुद्धा Happy

@ प्रज्ञा९
@ सावली
@ अमा
@ अस्मिता,

रोजच उत्सव साजरा करणं, कृष्णाची वात्सल्ययुक्त सेवा-भक्ती हेच मर्म असावे. celebrating every day as special day !
हे सगळे वैभव, सगळे सुख फक्त पाषाणमूर्तीसाठी नसावे. त्यानी भक्तांना आनंद, सौख्य मिळतेच. जे देवाला दिलंय म्हणतो ते भक्त स्वतःच उपभोगतो, मग व्हाय नॉट डू/गिव्ह द बेस्ट असे असावे ते. त्यामुळे बावासोबत भक्तांचीही चंगळ Happy

अर्थात हे माझे मत.

सुंदर प्रतिसादांसाठी आपणा सर्वांचे आभार !

चांगले राहणे, जगणे हेच जीवनाचे मर्म आहे व वरील सर्व प्रोसीजर बघितली तर त्यात काही वाइट निघेटिव्ह नाही. देवासाठी म्हणून का होईना
शाकाहारी उत्तम आहार. रोज बाहेर मोकळ्या हवेत खेळणे, जंगलात वनात गवतावर गाया चारायाला सोडून सावली त बासरी वाजवणे - कलेची उपासना सूर रंग शोधणे - मित्रांशी छान नाती जमवणे, खोड्या व मिश्किली पण ह्यात गुंडगिरी भीतिदायक असे काही नाही. प्राण्यांना प्रेमाने वागवणे, मुली / गोपी ह्यांच्याशी निरोगी मैत्री व नाती हे खरे खूपच आनंद दायक आहे आपल्यासाठी सुद्धा. व सोबतीने तो चविष्ट पौष्टिक आहार. जीवनाला प्रेमाचे बटर लावलेले आहे. ( संदर्भ स्पॉटि फाय वर मुंब ई बटर अश्या नावाच्या प्लेलिस्ट असतात. त्यात गोड भावुक गाणी असतात.) एक भाबडा प्रेमळ जीवन क्रम. आईचे प्रेम वडिलांचे लक्ष असणे हे तर अमूल्य.

वर त्या अन्नाची फ्लेवर प्रोफाइल फार सुरेख आहे. मिक्स फ्रूट्स, बटर - बटर प्लस केशर वेलची कस्तुरी तूप ताज्या भाज्या हे मस्त व पूर्ण पणे भारतीय. ताजे ताक अदमुरे दही. कुठेही मिरची जहाल असे नाही. सर्व मर्यादेत. कारण ते बाळ अलौकिक आहे. मर्यादा पुरुषोत्तमाचाच पुढील अवतार. कसलेही लेबल न लावता मला ही जीवन शैली आवडते.

अमा,

You interpreted perfectly Happy

Pages