प्रत्येक आस्तिक मनाला मोहिनी पडावी असेच कृष्णाचे 'मनमोहन' रूप आहे. कृष्णभक्तीची मोहक रूपे भारतभर दिसून येतात, पण त्यात कमालीचे वैविध्य आहे. तमिळ वेत्रवेणुधारी थिरुमल वेंकटेश्वर, ओडिशातील जगन्नाथपुरीचा कालिया कृष्ण, केरळचा गुरुवायुरप्पन, कर्नाटकाचा उडुपी श्रीकृष्ण, ब्रिजवासीयांचा युगलरूपातला राधारमण, गुर्जर-ओखामंडलाचा राजस द्वारकाधीश आणि राजस्थानातील नाथद्वाराचा गोवर्धनधारी श्रीनाथ! भारतातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमध्ये बालरूपी, युगलरूपी, सखारूपी, प्रेमरूपी, गुरुरूपी किंवा परमात्मारूपी कृष्णाचे वर्णन करणारे साहित्य आहे. त्यातही 'बालक'रूपातल्या नटखट लीलाधर कृष्णावर भक्तांचे प्रेम काकणभर अधिकच.
वैष्णव संप्रदायामध्ये कृष्णरूप हे 'सगुण-लालित-सेवित स्वरूप' मानले जाते, म्हणजे एखाद्या खऱ्याखुऱ्या मानवासारखे. मूर्तिरूपातल्या देवाला सर्व भावभावना असतात, तो बोलतो, ऐकतो, खातो-पितो, झोपतो अशी वैष्णवजनांची श्रद्धा आहे. त्यामुळे जगभरातल्या कोणत्याही कृष्णमंदिरात देवमूर्तीची उत्तम बडदास्त राखलेली दिसून येते. पैकी राजस्थानातल्या पूर्वाश्रमीच्या मेवाड-उदयपूर संस्थानातले 'नाथद्वारा' हे 'पुष्टिमार्गीय' वैष्णवांचे अत्यंत महत्त्वाचे पीठ आहे. करंगळीवर गोवर्धन पर्वत तोललेल्या कृष्णाचे गोजिरवाणे रूप म्हणजेच नाथद्वाराचा ‘श्रीनाथ’.
इथे कृष्ण सात वर्षीय बालकाच्या रूपात पूजला जातो. त्याला 'नंदघरी' - म्हणजे पितृगृहात ठेवल्याचे मानतात. पिता नंदबाबा, आई यशोदा आणि सर्व ग्वाल-गोपाळ कृष्णाला सांभाळतात, त्याचे लाड करतात. कृष्ण इथे 'लाडोबा' आहे, त्यामुळे त्याला 'श्रीनाथ बावा' असे मित्रत्वाचे संबोधन आहे. सात वर्षाच्या मुलाप्रमाणे त्याचा दिवस कल्पिलेला आहे. सकाळी घाईघाईने न उठवता सौम्य रागातील संगीताने आणि हळू आवाजात केलेल्या मंत्रपठणाने श्रीनाथला जाग येते. आई-बाबा ‘बेड टी’ऐवजी गंगा-यमुनेचे पाणी, गाईचे धारोष्ण दूध, ताजे लोणी आणि खडीसाखर प्रेमाने भरवतात. आंघोळ घालून नवीन कपडे देतात. न्याहारीत केशरयुक्त दही, बदामाचा शिरा, ‘मठरी’ आणि 'ठोर'सारखे कोरडे पदार्थ असा आहार दिल्यानंतरच त्याच्या हाती बासरी देण्यात येते, नाहीतर छोटा श्रीनाथ बासरी वाजवण्यात गुंग होऊन खाण्याकडे दुर्लक्ष करेल, असा मातृभाव असतो. खाऊन झाले की नंदगृहातल्या गाई घेऊन गोपालक कृष्ण अरावलीच्या टेकड्यांवर जातो. गाई तिथे चरतात आणि बासरी वाजवत हा 'बावा' रानात उंडारतो. दुपारी भूक लागली की घरी येतो. भव्य प्रमाणात केलेला 'राजभोग' ओरपून थोडा वेळ झोपतो. मग त्याचे मित्र येतात, त्यांच्याशी खेळतो. गोरज मुहूर्तावर आपले गोधन परत घेऊन घरी येतो. धुळीने माखलेल्या ह्या द्वाड मुलाला माता यशोदा पटकन ऊन-ऊन पाण्याने आंघोळ घालते, त्याची दृष्ट काढून तहानलाडू-भूकलाडू देते. दिवेलागणीला परत सखा-मित्र येतात, त्यांच्याशी खेळतो, भजन-कीर्तन ऐकत रात्रीच्या जेवणाची वाट बघतो. जेवण झाले की थोडा वेळ सोंगट्यांचा खेळ आणि मग अंगाई गीत ऐकत सुखशय्येवर झोप.... लाडक्या सुकुमार नंदपुत्राचा दर दिवस असाच, रमतगमत.
भागवत पुराणात बालक कृष्णाने इंद्राच्या पर्जन्यकोपापासून वृंदावनवासीयांना अभय देण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलून धरल्याची कथा येते. देवराज इंद्राचे गर्वहरण करणाऱ्या गोवर्धनधारी कृष्णासाठी गर्गसंहितेतल्या गिरिराज खंडात पहिल्यांदाच 'देवदमन श्रीनाथ' असे नाव येते. हा श्रीनाथ मूळचा मथुरेजवळील गोवर्धनचा. दुर्मीळ काळ्याशार संगमरवरात घडवलेली आजची सुडौल मूर्ती साधारण १६७२ सालची असावी. प्रसिद्ध वैष्णव संत श्री वल्लभाचार्यांनी भगवतभक्तीचा शुद्धाद्वैत - 'पुष्टिमार्ग' सांगितला. त्यांचे पुत्र आचार्य विठ्ठलनाथांनी तोच मार्ग पुढे नेऊन कृष्णाच्या सगुण उपासनेची आखीव-रेखीव परंपरा घालून दिली. मथुरेत गोवर्धनधारी कृष्णाचे रूप 'देवदमन श्रीनाथ' म्हणून प्रसिद्ध होते, त्यालाच वल्लभाचार्यांनी 'गोपाल' म्हणून आळवले आणि पुढे विठ्ठलनाथांमुळे त्याला 'श्रीनाथ' हे नाव मिळाले. मूर्तिभंजकांच्या भीतीने भक्तगणांनी मूर्ती आडमार्गाने मथुरेहून दूर नेण्याचे ठरवले असता तत्कालीन मेवाड राज्याच्या 'सिंहाड' नामक गावात मूर्ती असलेला रथ रुतून बसला. हा दैवी संकेत असल्याचे गृहीत धरून त्याच जागी श्रीनाथाला 'घर' बांधून देण्याची जबाबदारी मेवाडच्या महाराणा राजसिंहने सहर्ष स्वीकारली. तेव्हापासून हा 'श्रीनाथ बावा' तिथेच नांदतोय. कधीतरी तो परत मथुरेला जाणार आहे अशी भक्तांची श्रद्धा आहे.
आज नाथद्वारात दिसते ते मंदिर १७२८ साली बांधलेले आहे. मंदिराची रचना अन्य मंदिरांपेक्षा अगदीच वेगळी आहे. या मंदिराला 'शिखर' नाही, आतील रचनाही एखाद्या राहत्या महालासारखी आहे. कदाचित त्यामुळेच ह्या स्थानाला श्रीनाथजींचे ‘मंदिर’ न म्हणता ‘श्रीनाथजी हवेली' म्हणतात. मानवनिर्मित तलावांच्या रमणीय उदयपूर शहरापासून नाथद्वारा जेमतेम ५० किलोमीटरवर आहे. अरावलीच्या खुज्या पर्वतरांगा आणि फक्त पावसाळ्यातच पुरेसे पाणी असलेली 'बनास' नदी दोन्ही श्रीनाथाचे सोबती.
वल्लभाचार्यांचे पूर्वज तेलुगुभाषी तेलंगी, पण वाराणसीत स्थायिक झालेले, त्यांचा जन्म आणि बालपण आजच्या छत्तीसगड राज्यातल्या चंपारण गावातले, त्यांनी स्थापन केलेली श्रीनाथाची हवेली राजस्थानात, बहुसंख्य सेवेकरी ब्रजवासी आणि भक्त मुख्यतः गुजराती मंडळी, असे भारतभरच्या विविध प्रांतांना भक्तिपाशात बांधणारा हा श्रीनाथ. हनुवटीत जडवलेला मोगल बादशहा अकबरने अर्पण केलेला ठसठशीत हिरा, बादशहा जहाँगीरने २०००० गाई आणि ६४ गावे श्रीनाथला अर्पण केल्याचे लेखी आज्ञापत्र, मूर्तिभंजक म्हणून कुख्यात असलेल्या औरंगजेबाच्या बेगमेने श्रीनाथ बावाला केलेले आणि फेडलेले नवस आणि बावाच्या डोळे दिपवणाऱ्या संपत्तीचा मोह पडून हवेली लुटणारे इंदूरकर होळकर अशी थोडी वेगळी कीर्ती आहे ह्या बावाची.
नाथद्वाराचा ‘श्रीनाथ बावा’
श्रीनाथाचे निवासस्थान सर्व सोईंनी युक्त वैभवशाली 'नंदघर' कल्पिलेले असून माता-पित्याच्या घरी बालकाला लागणाऱ्या कोठल्याही वस्तूची कधीच कमतरता भासणार नाही अशी व्यवस्था करण्यासाठी वैष्णवजनांचा आटापिटा असतो. हवेलीत दूधदुभत्यासाठी 'दूध घर', विडा-सुपारीसाठी 'पान घर', साखर ठेवण्यासाठी 'मिश्री घर', वेगवेगळ्या मिठाया तयार करण्यासाठी 'पेढा घर', सुवासिक फुलांच्या राशी ठेवण्यासाठी 'फूल घर', नैवैद्य तयार करण्यासाठी 'रसोई घर', बावाचे माणिकमोत्यांचे हजारो दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी 'गहना घर', रथाच्या राजेशाही घोड्यांसाठी 'अश्वशाळा', सुमारे बावीस हजार गाई असलेल्या ७ मोठ्या गोशाळा, नैवैद्यासाठी लागणारे केशर-कस्तुरी दळण्यासाठी खऱ्या सोन्याचे जाते असलेले 'चक्की घर', शुद्ध तूप साठवण्यासाठी तर विहिरी शोभाव्यात अशा आकाराचे काही रांजण आणि उत्सवप्रसंगासाठीची 'महाप्रभू बैठक' असलेले सभागृह असा मोठाच जामानिमा आहे.
श्रीनाथबावाच्या अष्टौप्रहर सेवेसाठी रसोईये, प्रसादिये, भीतरीये, अधिकारी, सेवावली, झपटीए, ग्वाल, नंदबालक, झारीसेवक, पंडित, फूलघरीये, पानघरीये, दर्जी, खवास, रंगरेज, शृंगारी, आरसीये, ज्योतिषी, निगरा असे शेकडो लोक दररोज तत्पर असतात. दर दिवशी प्रचंड गुंतागुंतीचे अनेक धार्मिक विधी साजरे होतात. ही रोजची वैभवशाली सेवा कमी की काय, म्हणून सरासरी एका आठवड्यात तीन असे विशेष उत्सव इथे होतात. श्रीनाथजींच्या मनोरंजनासाठी नवनवीन 'मनोरथ' सोहळे होतात, शेकडो प्रकारचे नैवैद्य आणि सेवा अर्पण करण्यात येतात.
श्रीनाथ बावाचा नित्य (दैनिक) भोग
पण दररोज रस-वैभव पुरेपूर भोगणाऱ्या श्रीनाथ बावाला खरी प्रतीक्षा असते ती दिवाळीची. तो सण मोठाच. इतर लहान मुलांसारखा चोहीकडे दिव्यांची आरास आणि उत्तमोत्तम मिठाया-फराळाचा आनंद बावालाही मिळतो, पण त्याहीपेक्षा मोठा उत्सव होतो दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी - गोवर्धन पूजा आणि अन्नकूट महोत्सव. डाव्या हाताच्या करंगळीवर गोवर्धन तोलणे हे बावाचे प्रमुख अवतारकार्य नाही का? नाथद्वाराप्रमाणेच मथुरा, वृंदावन, ब्रज, बरसाना, द्वारिका यासारख्या, कृष्णावताराच्या कथांशी संबंध असलेल्या भागात दिवाळीचा पाडवा 'अन्नकूट' महोत्सवासाठी आणि गोवर्धन पूजेसाठी राखीव आहे. सर्व मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात अन्नकूट सेवा मोठ्या आकर्षणाचा विषय असतो.
तर दिवाळीचे दिवे मंद होत असतानाच पाडव्याच्या पहाटे बावा जागा होतो. रात्रीच त्याने गोशाळेतल्या गाईंची 'कान जगायी' केली असते, म्हणजेच उद्या आपण रोजच्या जागी चरायला न जाता गोवर्धन पूजा आणि त्यांनतर होणाऱ्या अन्नकूट प्रसंगाला जाणार आहोत हे गुपित कानात सांगितले असते. त्यामुळे त्याही नटूनथटून तयार असतात.
श्रीनाथ बावाचे गोधन
आवळा-चंदन आणि केशरयुक्त तेलाने अभ्यंगस्नान केलेल्या बावाचा आज पहाटेचा विशेष नैवेद्य म्हणजे केशर दूध, ताजे लोणी आणि उडीद डाळीच्या पिठाची शुद्ध तुपात तळलेली बुंदी, एकदम प्रोटीन-पॅक्ड ब्रेकफस्ट! भल्या पहाटेच हा 'मंगलभोग' ओरपून स्वारी सवंगड्यांच्या साथीने गोवर्धन उचलायला तयार!
तोवर मुख्य चौकात गोशाळेतल्या गाईंचे वाजतगाजत आगमन होते. तिथे गोमेयातून साकारलेल्या गोवर्धनाच्या प्रतिकृतीची श्रीनाथ बावा आणि त्याचे सवंगडी पूजा करतात. शृंगारलेल्या गाईंना ओवाळून त्यांना 'थूली' (पातळ शिरा) आणि लापशी खायला देतात. प्रतिकात्मकरीत्या गोवर्धन करंगळी आणि काठ्यांवर तोलतात. तदनंतर इंद्रावर विजयाचे प्रतीक म्हणून श्रीनाथाचे गोधन शेणाचा गोवर्धन ओलांडून आपल्या गोशाळेत परत जाते. सगळ्या समारोहात अनेक किचकट आणि प्रतीकात्मक धार्मिक विधी असतात, पण सगळ्यांवर ताण असतो तो जमलेल्या गोपालकांचा ओसंडणारा उत्साह!
गोवर्धन - एक प्रतीकात्मक चित्र
आता मात्र बावाला करकचून भूक लागते आणि सगळेच कामाला लागतात. आता अन्नकूट उत्सवाची वेळ येऊन ठेपलेली असते. अन्नकूट म्हणजे अन्नाचा डोंगर. सात दिवस करंगळीवर गोवर्धन तोलल्यामुळे बालक कृष्णाला श्रम झाले आणि खूप भूक लागली. एका दिवसात आठदा जेवणारा तो, त्याला असा सलग निर्जळी उपवास घडला. पाऊस थांबला, तसे सर्व गोपालकांनी आपापल्या घरून उत्तम पदार्थ बनवून कृष्णासाठी नैवेद्य म्हणून आणले. ७ दिवस आणि प्रत्येक दिवसाचे ८ असे एकूण ५६ पदार्थ! त्यामुळे कृष्णाला ह्या विशेष मेजवानीत 'छपन्न भोग' चाखायला मिळाले आणि तीच प्रथा पुढे सुरू राहिली.
श्रीनाथ बावाचा 'अन्नकूट' साजरा करताना देवळासमोरच्या रतनचौकात सुमारे ४००० किलो भाताचा भलामोठा डोंगरच रचण्यात येतो. त्याच्या पायथ्याशी मातीच्या घागरींमध्ये आणि वेताच्या टोपल्यांमध्ये बाजऱ्याची खिचडी, कढी, खीर, माखन मिश्री, ३३ प्रकारच्या भाज्या मिळून केलेली 'गड्ड की सब्जी', घेवर, फेणी, मालपुवा, रबडी, मनोर लाडू, मगज लाडू, मख्खनबडा, खाजा, श्रीखंड, मलाई लाडू, मलाई पुरी, केशर बासुंदी, चंद्रकला, थूली, लापशी, मेव्याचे लाडू, तळलेली मटकी, दही, गोघृत, नवनीत उर्फ ताजे लोणी, मलई, मठरी, ठोर, मोहनथाल, कर्पूर सखडी, बदाम शिरा, मूगडाळीचा शिरा, जिलबी, बदामपाक, डिंकलाडू अशा अनेक प्रकारच्या मिठाया, नानाविध फळे, ताक आणि लस्सी, तुपात तळलेला सुका मेवा इत्यादी खाद्यपदार्थ रचले जातात. गोड पदार्थांवर भर असला, तरी चव बदलण्यासाठी म्हणून खजूर, आवळा आणि आंबट द्राक्षांची लोणची, पापड असतात. शेवटी अर्थातच गोविंदविडा उर्फ गिलोरी पान.
असे शेकडो प्रकारचे उत्तम खाद्यपदार्थ एका ठरावीक क्रमाने रचण्याचे काम काही तास चालते. केशर-केवडा-कस्तुरीचा, गुलाबपाण्याचा शिडकावा सर्वत्र करून, शंखध्वनीच्या, टाळमृदंगाच्या स्वरकल्लोळात श्रीनाथला 'अन्नकूट भोग आरोगण्यासाठी' हाळी दिली जाते. सर्वत्र प्रचंड उत्साह संचारतो, बावा मनसोक्त जेवतो आणि आणि मग काही वेळाने हा 'भोग' भाविकांमध्ये वाटला जातो.
अन्नकूट भोगणाऱ्या श्रीनाथ बावाचे एका बालिकेने काढलेले कल्पनाचित्र
भाताचा डोंगर रात्री उशिरापर्यंत सरत नाही. शेजारच्या गावातील आदिवासी भिल्ल युवक मग तो डोंगर प्रतीकात्मकरीत्या 'लुटतात' आणि सगळ्यांनी मनसोक्त खादाडी करून हा महोत्सव संपतो. तोवर उजाडायला लागते आणि मंगल वाद्यांच्या मंजुळ स्वरांनी श्रीनाथाचा पुढचा वैभवशाली दिवस सुरू होणार असतो.
थोडी दंगामस्ती, मित्रांसह थेट देवराज इंद्राशी घेतलेला पंगा, सवंगड्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केलेले श्रम, जिद्दीने-कष्टाने इंद्रावर मिळवलेला विजय, त्याचे सर्वांनी केलेले कौतुक आणि मग खाण्यापिण्याची केलेली मनसोक्त चंगळ असे एका सात वर्षीय बालकाच्या भावविश्वाचे पुरेपूर प्रतिबिंब श्रीनाथ बावाच्या दिवाळी उत्सवात पडलेले दिसते.
समाप्त.
लेखातील काही अल्पपरिचित शब्दांचे अर्थ :-
वेत्र = ग्वालांच्या हाती गुरे हाकण्यासाठी असलेली काठी
वेणु = बासरी
गुरुवायुरप्पन = कृष्णाचे एक रूप, जसा आपल्याकडे पांडुरंग
पुष्टिमार्ग = सगुण कृष्णभक्तीची एक पद्धत
* * *
लेखातील काही चित्रे जालावरून साभार.
(पूर्वप्रसिद्धी - मिसळपाव दिवाळी अंक २०१९)
मनात एक सब-प्रोजेक्ट आहे,
मनात एक सब-प्रोजेक्ट आहे, सर्व ५६ भोग तयार करून प्रत्येक पदार्थामागचे कारण, कथा, गमतीजमती, इतिहास, प्रमाणासह रेसिपी असे सगळे निगुतीने documentation करावे.
फार वेळखाऊ आणि किचकट आहे याची कल्पना आहे, एकट्याचे काम नाही. घरातले तीनही व्हॉलेंटियर सध्या फारच व्यस्त आहेत, पण यावर्षी दिवाळीच्या आसपास हे जमवण्याचा विचार आहे. इन्शागोविंदा
नक्की करा. मला एकदा तरी
खूपच सुरेख वर्णन आणि लेख.
फक्त हे सगळे बाराही महिने - न थांबता, अविरत तितक्याच आनंदा- उत्साहाने निरंतर करत राहणं किती कठीण असेल !
आपल्याला रोजच्या स्वयंपाकाचा कंटाळा येतो!
… काय काय आणि कसे …
… काय काय आणि कसे …
हे ५६ पूर्व-पश्चिम-उत्तर-दक्षिण मंदिरांचे प्रत्येकाचे वेगवेगळे ! ज्या जागी जे पिकतं ते स्थानिक घटक वापरून केले जाणारे. म्हणूनच तिरुपतीचा वेंकटेश्वर चिंचेचा कोळ घातलेला पुलिहारा भोगतो तर द्वारकाधीश पांढऱ्या भाताबरोबर आमसुलांचं ओसामण आरोगतो
अच्छा...:-) म्हणजे आपण
अच्छा...:-) म्हणजे आपण महाराष्ट्रात भाजणीचे थालीपीठ, साबुदाणा खिचडी, दलियाची खीर...असे देऊ शकतो.....काहीपण?
अमा प्रतिसाद छान आहेत तुमचे.
अमा प्रतिसाद छान आहेत तुमचे.
@ आंबटगोड,
@ आंबटगोड,
नसेल तशी प्रथा तर सुरु करायला काय हरकत आहे ? जे आपण आवडीने जेवतो तेच देवाला
स्वयंपाकाचा कंटाळा मात्र नाही करता येणार !
@ अन्जू
@ अन्जू
@ हिरा
बलिप्रतिपदेला शेणाच्या गोवर्धन प्रतिमेचे पूजन ही प्रथा महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी आहे, विशेषतः पूर्व भागात, गोपालक कुटुंबात.
माझ्या गावातल्या घरी गोठ्यातल्या गाई बाहेर पडण्याच्या दारात भल्यापहाटे शेणाचा गोवर्धन रचून त्याची पूजा होत असे. मग गाईंच्या दावणी सोडल्या की त्यांच्या खुरांनी पूजा मोडत असे.
३३ भाज्या एकत्र करून भाजी आणि भाकरी असा त्यादिवशीचा मेन्यू. अनेकांकडे हाच मेन्यू संक्रांत / भोगी / रथसप्तमीला असतो.
छान माहीती अनिंद्य. एवढे
छान माहीती अनिंद्य. एवढे डीटेल्स माहीती नव्हते बलिप्रतिपदेच्या पुजेचे.
आमच्या ओळखीच्या एक कर्जत, नेरळजवळील आगरी समाजाच्या आहेत (जात उल्लेखाबद्दल क्षमस्व, फक्त माहितीसाठी), त्यांच्यामुळे मला समजलं की त्यादिवशी गोधनपुजा आणि नैवेद्य असतो काही ठिकाणी. तोपर्यन्त वसुबरसेला गाय वासरू पुजन आणि पोळ्याला बैलपुजन असतं एवढंच मला माहिती होतं.
<<बलिप्रतिपदेला शेणाच्या
<<बलिप्रतिपदेला शेणाच्या गोवर्धन प्रतिमेचे पूजन ही प्रथा महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी आहे, << होय.. खान्देशात पण दिवाळीत शेणाच्या बाहुल्या आणी शेणाचा गोवर्धन पर्वत कराय्चे पुर्वी.. असे आई सांगते.
अनिंद्य खूपच छान लेख. आणि
अनिंद्य खूपच छान लेख. आणि मूर्ती तर अतिसुंदर! देवाला बालरूपात कल्पून त्याचे लाड पुरवण्याचा कौतुकाचा सोहळा. छप्पन भोग हा शब्द अनेकदा ऐकला होता आणि अर्थही माहीत होता पण हे स्पष्टीकरण आज मिळालं.
माझ्या एका कलिगकडे हा चित्रकूट सोहळा वर सांगितल्याप्रमाणे साजरा होतो. त्याची आई, बायको मिळून छप्पन भोग घरी तयार करतात. दुसऱ्या दिवशी आम्हाला मेजवानी असते.
चित्रकूट ?
चित्रकूट ?
तुम्हाला अन्नकूट म्हणायचे असावे.
अन्नकूट = अन्नाचा डोंगर
चित्रकूट = मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशच्या सीमेवरील रामाच्या वनवासाशी संबंधित एक रमणीय स्थान
तयार छपन्नभोग मेजवानीचे नियमित आमंत्रण म्हणजे तुम्ही लकी आहात
सुरेख वर्णन केलं आहे सगळ्या
सुरेख वर्णन केलं आहे सगळ्या संस्कृतीचं आणि सोहळ्यांचं.
छप्पन भोग या शब्दप्रयोगाचा उलगडा आत्ताच झाला मलाही.
वैयक्तिकदृष्ट्या मला एवढ्या मोठ्या प्रमाणावर अन्न (४००० किलोंचा भात वगैरे) बघायला कदाचित नाही आवडणार. जगन्नाथपुरीला तिथला प्रचंड मोठ्या प्रमाणावर शिजलेला प्रसाद बघून तो घ्यावासा वाटला नव्हता. पण करणाऱ्यांचं कौतुक आहे.
इस्कॉनमधले भक्तसुद्धा अशीच सगुण रूपातल्या कृष्णाची भक्ती करतात ना? त्यांच्या दैवताचं नाव विसरले. आमच्या समोरच्या घरात एक बाई रहायच्या पूर्वी. त्यांच्याकडे हे इस्कॉनचं खूप प्रस्थ होतं. घरातल्या दोनपैकी एक बेडरूम पूर्णपणे देवाची. त्यात त्याचा पाळणा. पाळण्यात दोन छोट्या मूर्ती. दोन्हींची नावं असतात काही तरी विशिष्ट. मूर्तींच्या अंगावर सुंदर कपडे असायचे. थंडीच्या दिवसात त्या मूर्तींना स्वेटर घालायच्या ( हो! ) आठवड्यातून एका दिवशी संध्याकाळी त्यांच्या घरी आरतीसाठी शेजाऱ्यापाजाऱ्यांना आमंत्रण असायचं आणि असेच छान चविष्ट प्रसाद असायचे.
अनिंद्य- हो अन्नकूटच टायपायचे
अनिंद्य- हो अन्नकूटच टायपायचे होते.
माझा सहकारी आमच्यासाठी मोठे मोठे डबे भरून आणतो. आमच्या दिवाळी फराळाचे त्यांनंतर वार लावले जातात.
अप्रतिम लेख.
अप्रतिम लेख.
नव्हता. पण करणाऱ्यांचं कौतुक
नव्हता. पण करणाऱ्यांचं कौतुक आहे...... खरंय वावे!
@ वावे,
@ वावे,
मोठ्या प्रमाणावर शिजवले जाणारे अन्न...
यात सर्वात मोठा मुद्दा स्वच्छतेचा. आपल्याकडे वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता ह्याबद्दल चांगले बोलावे असे फार नाही
त्यामुळे कॅन रिलेट.
इस्कॉनचे अनुयायी कृष्ण-बलराम यांची संयुक्तपणे आराधना करतात, त्यामुळे तुमच्या शेजाऱ्यांकडे दोन विग्रह असतील, एक गौरवर्णी आणि एक श्यामसुंदर.
इस्कॉननी फार मोठ्याप्रमाणावर स्वयंपाक करण्यासाठी 'Untouched by human hands" असे पूर्णपणे स्वयंचलित आधुनिक किचन वापरण्यात प्राविण्य मिळवलेले आहे.
@ शामली,
@ देवकी,
@ rr38
@ वावे
@ मी_आर्या
@ अन्जू
सुंदर प्रतिसादांसाठी सर्वांचे आभार !
इस्कॉन वाले त्यांना गौरांग -
इस्कॉन वाले त्यांना गौरांग - निताई म्हणतात ना?
गौरांग - निताई, हो !
गौरांग - निताई,
हो !
सुंदर. माझा नवरा आणि
सुंदर. माझा नवरा आणि सासर्मंडळी पुष्टिमर्गिय वैष्णव आहेत. त्यामुळे अनिंध्य तुम्ही वर्णन केलेले सगळे भोग दर्शन सासरी रोज केले जातात. अंनकुटा बद्दल काय वर्णावे. लग्नानंतर सुरवातीला मला पण" बापरे एवढे सगळे" असेच मानत आले पण हळूहळू त्यामागचा भाव लक्षात आला आणि आवडले सगळे. तुमचा लेख तर अप्रतिम त्यामुळे त्या बाळकृष्ण साठीचा प्रेमभाव द्विगुणित झाला. तो श्रीरंग तुमचे कल्याण करो. जय श्री कृष्ण
आमच्या गावात धनगरवाडे सोडुन
आमच्या गावात धनगरवाडे सोडुन इतरत्र फार मोजकेच गोठे उरलेत. या गोठ्यांत पुजा होते. ही पुजा सकाळी साडेचार पाच वाजता करतात.
बलीप्रतिपदेला दारात उम्बर्याच्या दोन्ही बाजुना शेणाचे गोल पाच गोळे व मधे एक मोठा गोळा अशी रचना करतात व त्यावर हळद्कुंकुफुल वाहतात. जास्त मोठी नसते ही रचना, आपण जशी दोन्ही बाजुला रांगोळी घालतो तशीच ही रचना असते. घरात आतबाहेर करताना पाय पडत नाही. त्या दिवशी देवळांच्या बाहेरही देवळीण ही रचना करताना पाहिले आहे. फोटो होता माझ्याकडे, सापडला तर देईन.
आपल्याला रोजच्या स्वयंपाकाचा
आपल्याला रोजच्या स्वयंपाकाचा कंटाळा येतो!>>>>>
हाहा, मलाही येतो कधी कधी. पण रोजचा सैपाक मन लावुन प्रेमाने करावा हे मला पटलेले आहे. स्त्री/पुरुष करियर, सेटल होणे, घर, गाडी आणि त्या सोबतच्या अनंत गोष्टींना आपण अनंत महत्व दिलेले आहे पण अन्न ही आयुष्यातील सर्वाधिक महत्वाची गोष्ट आहे आणि बाकिच्या सगळ्या गोष्टी अन्नाची पुर्ण उपलब्धता असली तरच सुचतात हे मला पटलेले आहे. ही उपलब्धता असणे हि इतकी बेसिक गरज आहे की आपण तिला गृहित धरतो. अन्न मला सर्व गरजांपेक्षा वरचे वाटते म्हणुन मी सहसा स्वयंपाकाचा कंटाळा करत नाही आणि तो कंटाळत करत नाही.
)
(इथे सहसा हा शब्द महत्वाचा आहे
function at() {
[native
साधना, प्रतिसाद आवडलाच.. आणि
साधना, प्रतिसाद आवडलाच.. आणि पटलाही !
रोजचा स्वयंपाक मन लाऊन, प्रेमाने केला तर अधिक चवदार, न्युट्रीशस होतो हे तर सर्व विदीतच आहे....!
फक्त हे बाकी तर्हेतर्हेच्या व्याप - तापांमुळे नेहमी शक्य होत नाही.....
Totally agree. I also make
Totally agree. I also make sure to eat fresh home made. And simple food and pray to God for the privilege of every meal. Just now finished a royal veg thaali at Viviana rRajdhani restaurant though. Weekend treat.
@ साधना,
@ साधना,
अन्न मला सर्व गरजांपेक्षा वरचे वाटते .. रोजचा सैपाक मन लावुन प्रेमाने करावा ..
Respect !
हे खरेच फार महत्वाचे आहे. भुकेल्या पोटी ना भक्ती होते ना विचार ना कृती. नेहेमी स्वतःसाठी सर्वोत्तम अन्न निवडावे. तो प्रत्येक जीवाचा अधिकार आहे.
@ आंबट गोड
@ अमा
अनुमोदन.
@ मेघ,
@ मेघ,
तुमच्या घरीच कौतुक सोहळे असल्यामुळे तुम्हाला परस-अपरस, सखडी- अनसखडी हे शब्द परिचयाचे असतील.
वैष्णव खाद्यपरंपरेप्रमाणे सर्व सात्विक खाद्यपदार्थ तीन प्रहरांच्या आतच खाऊन संपले पाहिजेत. तद्नुसार बावाच्या मंदिरातील काही सेवकांना रोख पगार न देता नैवैद्याचे पदार्थ वाटून देण्यात येतात. रोज-रोज तुपामेव्याचे इतके गरिष्ठ खाणे शक्य नसल्यामुळे सेवक ते पदार्थ देवळाबाहेरच्या मिठाईविक्रेत्यांना देतात/विकतात आणि तेच भाविकांना खायला उपलब्ध होतात.
सुंदर प्रतिसादाबद्दल, शुभेच्छांबद्दल आभार.
हो ते शब्द व त्याचा अर्थ
हो ते शब्द व त्याचा अर्थ माहित आहेत मला.धन्यवाद अनिंद्य
गरिष्ठ शब्दही फार आवडला मला..
गरिष्ठ शब्दही फार आवडला मला..
हाय कॅलरी अशा अर्थी ना?
हाय कॅलरी, पचायला जड.
हो
हाय कॅलरी, पचायला जड.
शब्दप्रयोगावरून आठवले, वर
शब्दप्रयोगावरून आठवले :- वर साधना यांनी 'देवळांच्या बाहेरही देवळीण ही रचना करताना पाहिले' असे लिहिले आहे.
देवळीण म्हणजे काय ?
देवालयातली सेवेकरी महिला असा साधारण अर्थ मी लावला आहे.
यावर्षी सूर्यग्रहणामुळे
यावर्षी सूर्यग्रहणामुळे अन्नकूट उत्सवाचे वेळापत्रक गडबडले असे ऐकतो.
श्रीनाथ बावाचे माहित नाही पण मला मात्र अनुजेच्या कृपेने आज ३३ भाज्यांची एकत्रित 'गड्ड की सब्जी' खायला मिळाली
ही तयारी

आणि हे फायनल प्रॉडक्ट !
Pages