मराठीत ऑफलाईन टंकलेखन

Submitted by shantanuo on 11 September, 2018 - 09:51

गुगल इनपुट टूल्स वापरून ऑनलाईन टाइप करता येते.
https://www.google.com/inputtools/

पण मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये टाईप करण्यासाठी त्याचा उपयोग नाही. भाषाइंडीया या साईटवरून डाऊनलोड केलेल्या इनपुट एडिटरचा अनुभव कसा आहे?
https://bhashaindia.com/downloads.aspx

यात स्पेल चेक / एटो करेक्ट नाही. तशी अपेक्षाही नाही कारण हे फक्त इनपुट टूल आहे. हा मजकूर मी याच टूलाचा वापरा करूंन वर्डमध्ये लिहिला आहे. मजकूर सेव्ह होण्यात काही अडचण (सध्या तरी) आलेली नाही. बरहाच्या आठवणीने अजूनही व्यथित होणार्या मंडळीनी वापरून बघायला हवे असे. ऑफलाईन टंकलेखन कारण्याकरता अजून काय मार्ग आहेत?

Group content visibility: 
Use group defaults

अजय यांनी याच धाग्यात एक प्रश्न विचारला होता. (२९ मार्च २१)

२) अ‍ॅप शब्द मायबोलीवरच्या फाँटवर योग्य दिसतोय पण कॉपी+पेस्ट केल्यावर नेटवर अनेक ठिकाणी नीट दिसत नाही . मायबोलीच्या अ‍ॅप लिहिण्यात काही चूक आहे का?

त्याचे उत्तर देताना मी (नेहमीप्रमाणे) भरकटलो आणि नेमके काय ते सांगायचे राहून गेले. होय, मायबोलीच्या ॲप लिहिण्यात चूक आहे. या पानावरील ही स्ट्रींग
GgaDev['E']='u+0905u+200Du+0945'
बदलून अशी कराः
GgaDev['E']='u+0972'

गूगल इन्पुट साधनांच्या अ‍ॅ लिहिण्यामध्ये पण हीच चूक आहे का? तिथे अ ऐवजी ए वरती चंद्र येतो. तो अ‍ॅ यावा ह्यासाठी काय करायला हवे? (अँड्रॉईड मोबाईलवर गमभन सारखा कळपाट असल्यास वापरायला आवडेल).

रोहित होळकर यांनी जोडाक्षरांच्या मांडणीबाबत अभ्यास केलेला दिसतो.

ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेत ते म्हणतातः

आजकाल लोकांना उभी जोडाक्षरे वाचणे तितके सोपे नाही हे ध्यानात आल्यावर जैनी आणि जैनी पूर्वा हे दोन वेगवेगळे टंक बनवले. पहिल्यात आडवी जोडाक्षरे आहेत नि दुसऱ्यात उभी.  जैनी पूर्वा हा जैनीपेक्षा पाने वाचवतो. पहिल्या अध्यायापासून ते शेवटच्या अध्यायपर्यंत जैनी टंकास ७३३ पृष्ठे लागली तर जैनी पूर्वास ७२९. आमच्या मते जैनी पूर्वा ग्रंथामधील रंगीत ज्ञानेश्वरी ही या पाचांत सर्वांत देखणी आहे.

उभ्या मांडणीतील जोडाक्षरे जागा वाचवतात आणि सुबक (देखणी - लेखकाचा शब्द‍) दिसतात. त्याचबरोबर उभी जोडाक्षरे वाचणे तितकेसे सोपे नाही हे देखील त्यांनी कबूल केले आहे. त्याकरता नवीन टंक बनवून दोन्ही पद्धतीने ज्ञानेश्वरी उपलब्ध करून दिली आहे.

https://sites.google.com/site/latexmrbooks/pustake-utarava

रत्नागिरी की रत्‍नागिरी अशी चर्चा विकीवर झाल्याचे मला आठवते पण नेमका दुवा माझ्याकडे नाही. आडव्या मांडणीतील रत्‍नागिरी लिहिण्यासाठी त्यात जॉईनर टाकावा लागतो. तो टाकणे कोणत्याच इनपुट मेथडमध्ये सोपे नाही. त्यामुळे "ज्याला जे सोपे वाटले ते त्याने लिहिले" असे झाले नसावे. त्यामागे निश्चित असा विचार आहे.

जोडाक्षरांची उभी मांडणी आडवी करण्यासाठी नवीन टंकाची गरज नाही. लिनक्सची सेड कमांड वापरून हव्या त्या जोडाक्षरात जॉईनर टाकला की काम झाले.

echo "अख्खा रत्नागिरी किल्ला" | sed 's/क्/क्‍/g;s/ख्/ख्‍/g;s/ग्/ग्‍/g;s/घ्/घ्‍/g;s/ल्/ल्‍/g;s/त्/त्‍/g'
अख्‍खा रत्‍नागिरी किल्‍ला

लिब्रे ऑफिस वापरत असाल तर फाईंड - रिप्लेस वापरता येईल, फक्त रेग्युलर एक्स्प्रेशनचा चेक बॉक्स सिलेक्ट करावा लागेल. आणि एक एक अक्षर शोधून बदलावे लागेल.

रत्नागिरी हा शब्द आडव्या पद्धतीने रत्‍नागिरी असा लिहिला पाहिजे असा विकीपीडियाचा विचार बरोबर मानला तर खाली दिलेले शब्द देखील आडव्या मांडणीत लिहावे लागतील.

टेक्निकल टेक्‍निकल
लग्न लग्‍न
विघ्न विघ्‍न
रत्नागिरी रत्‍नागिरी
तद्नुसार तद्‍नुसार
अन्न अन्‍न
स्वप्न स्वप्‍न
निम्न निम्‍न
स्नान स्‍नान
प्रश्न प्रश्‍न

त्यासाठी जॉईनर वापरावा लागू नये म्हणून युबंटूच्या गमभन की बोर्डमध्ये ही सुधारणा केली आहे.

याचा अर्थ पहिल्या कॉलममध्ये दिसणारे शब्द लिहिताच येणार नाहीत. ते कायम दुसऱ्या कॉलममध्ये दाखविल्याप्रमाणे दिसतील (कोणत्याही फॉंटमध्ये). जर कोणाला पहिल्या कॉलममध्ये दिसतो तसा शब्द टाईप करायचाच असेल तर की-बोर्ड बदलून फोनेटिक किंवा इंस्क्रिप्ट करावा लागेल. "लग्न" हा शब्द "लग्र" सारखा दिसतो आणि ऑनलाईन वाचायला कठीण जातो या गृहितकावर हा सगळा खटाटोप चालू आहे. कोणाला हे व्यर्थ वाटत असेल तर इथे लिहावे किंवा जिटहबवर पुल रिक्वेस्ट पाठवून व्हर्जन रद्द करावी.

फॉंट बदलून देखील ही समस्या काही प्रमाणात दूर होऊ शकते. उदाहरणार्थ टेक्निकल हा उभ्या मांडणीतील शब्द बहुतेक सर्व फॉंटमध्ये टेक्‍निकल असा आडव्या मांडणीतच दिसतो. पण वाचक जर नेटवर किंवा वॉट्‍सॲपवर वाचणार असेल तर कोणता फॉंट वापरला जाईल ते सांगता येत नाही. डी. टी. पी. चे काम करणाऱ्यांना कदाचित हा की-बोर्ड अडचणीचा वाटू शकेल. जलदगतीने लेखन आणि ऑनलाईन वाचन सुलभ करण्याचा हा प्रयत्न आहे.

अक्ष, ज्ञान आणि श्रीराम ही जोडाक्षरे वास्तविक आडव्या मांडणीत अक्‍ष, ज्‍ञान आणि श्‍रीराम अशीही लिहिता आली असती. पण आपल्याला लहानपणापासून क्ष, ज्ञ आणि श्र मुळाक्षरांच्या बरोबरीनेच शिकवली गेल्यामुळे ती उभ्या मांडणीतील जोडाक्षरे आहेत हेच आपण विसरून गेलो आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे ही तीन जोडाक्षरे आडव्या मांडणीत कोणीही लिहीत नाही त्यामुळे आपल्या डोळ्यांना ती अक्षरे एका विशिष्ट पद्धतीने पहायची सवय झाली आहे. सध्या श्व आणि श्च ही दोन जोडाक्षरे श्‍व आणि श्‍च अशीही सर्रास लिहिली जातात. माझ्यामते लाखो वाचकांनी दोन्ही पद्धतीने वाचण्याची सवय लावून घेण्याऐवजी काही हजार लेखकांनी / प्रकाशकांनी / वेबसाईट्सनी कोणतीतरी एक पद्धत स्वीकारणे जास्त सोपे आहे! वाचकांच्या (आणि युनिकोडच्या) सोयीसाठी विद्वानांनी व जनतेने खाली दिलेल्या दोनपैकी एक(च) पद्धत निवडावी.

निश्चय निश्‍चय
अश्व अश्‍व
उद्गार उद्‍गार
उद्घाटन उद्‍घाटन
हद्द हद्‍द
उद्धव उद्‍धव
उद्भव उद्‍भव
पद्म पद्‍म
पद्य पद्‍य
केंद्र केद्‍र
विद्वान विद्‍वान
उद्बोधन उद्‍बोधन

इंग्रजी शब्दांसाठी उपयोगी जोडाक्षरेः
द्झ द्‍झ
द्ड द्‍ड
द्ढ द्‍ढ
द्न द्‍न
द्ल द्‍ल

स्पेलचेकचे सॉफ्टवेअर दोन्ही शब्द योग्य असल्याचे दाखवत आहे. त्याचे कारण मी या आधी सांगितले आहेच.

क्रोम किंवा फायरफॉक्समध्ये उभी मांडणी आडवी (किंवा उलट) करून मिळण्यासाठी हे जावा-स्क्रिप्ट बुकमार्कलेट लिहिले आहे.
https://codepen.io/shantanuo/pens/loved?grid_type=list
क्लिक-ड्रॅग करून बुकमार्क टूलबारवर ओढून घ्यावे लागेल. मग जे पान आपण वाचत असाल ते उभ्या मांडणीत वाचायचे की आडव्या ते आपणच ठरवू शकाल. उभी जोडाक्षरे आडवी करून प्रिंट-आऊट घ्यायचा असेल तर ते देखील या एका क्लिकने शक्य आहे.

शर्वरी गोविलकर यांचा मराठी शब्दांपासून मूळ शब्द शोधण्याचा अभ्यासपूर्ण पेपर इथे वाचायला मिळेल.

या पेपरमध्ये काय करायला हवे ते दिले आहे पण ते कसे करायचे या बाबत काहीच उल्लेख नाही. ते काम अनूप कुंचुकुट्टम यांनी पायथॉनमध्ये उपलब्ध करून दिले आहे. अनूप यांचा स्टेमर आणि हंस्पेल या दोन्हींचा उपयोग करून बनविलेली शब्दांची यादी मी याच धाग्यात १६ मे २१ च्या पोस्टमध्ये दिलेली आहे.

काही शब्दांच्या बाबतीत तर हंस्पेल अधिक चांगल्या तऱ्हेने काम करू शकतो. उदाहरणार्थ शर्वरी यांनी बनविलेल्या सॉफ्टवेअरमध्ये "करत” आणि "करून” या दोन शब्दांचे मूळ रूप अनुक्रमे "कर” आणि "करून” असे होत आहे. हंस्पेलने मात्र "करणे” असे एकच क्रियापद दोन्ही शब्दांसाठी सुचविले आहे. त्याचा कोड इथे पाहता येईल.

जे कोणी ही पोस्ट वाचत असतील त्यांना मराठी स्पेलचेक या विषयाची पुरेशी माहिती असणार असे गृहीत धरायला हरकत नाही. लिब्रे ऑफिसच्या रायटरमध्ये एक एक्स्टेंशन वापरून आपण इंग्लिशप्रमाणे लाल ओळीवर राईट क्लिक करून पर्यायी शब्दांतील योग्य शब्द निवडतो. पण जर मजकूर खूप मोठा असेल तर अनेक शब्दांखाली लाल लाईन येते आणि एक-एक शब्दावर राईट क्लिक करण्यात खूप वेळ जातो. त्यासाठी मी एक नवीन ऍड-ऑन बनविले आहे. मजकूर लिहून झाला की मी स्टॅंडर्ड टूलबारवरील वर्ल्ड बटनावर क्लिक करतो. तसे केले की मजकुरातले फ्क्त चुकीचे शब्द निवडले जाऊन एका नवीन फाईलमध्ये जमा होतात. प्रत्येक शब्दासाठी राईट क्लिकवर जे पर्यात दिसत होते ते देखील शब्दाच्या पुढे लिहिले जातात.
उदाहरणार्थ वर दिलेल्या मजकुरासाठी हे पर्याय मिळाले.

ऍड-ऑन : आड-ऑन, धड-ऑन, फड-ऑन, ऍडची-ऑन, ऍडऑन
टूलबारवरील : फूलबाजीवरील
पर्यात : परक्यात, आर्यात, पर्णात, पथ्यात, पर्याप्त, पर्याय, तात्पर्य
फ्क्त : फक्त
राईट : राई, नाईट, फाईट, राकट
रायटरमध्ये : टर्ममध्ये
लिब्रे : सेलिब्रेट
स्पेलचेक : स्पेलचेकर, स्पेलचेकच्या

याचा उपयोग मोठ्या मजकुराचा चटकन स्पेल चेक करण्यासाठी तसेच स्पेल चेकचे पर्याय समाधानकारक वाटत आहेत की नाही हे पाहण्यासाठी होतो. लिखाणात किती आणि कोणत्या चुका होत आहेत याचा मागोवा घ्यायला ही सुविधा उपयुक्त आहे.

वर दिलेल्या चित्रावरून हा नवीन स्पेल्चेक कसा काम करतो ते पाहता येईल. याला मी मराठी स्पेलचेक "प्लस” असे नाव दिले आहे कारण हा नेहमीच्या स्पेल चेकपेक्षा थोडा वेगळा आणि जास्त चांगला चालतो. अर्थात याची शब्दयादी मूळ एक्स्टेंशन मधूनच येत असल्यामुळे तो स्पेलचेक आधी इंस्टॉल करणे जरुरी आहे.

हीच सुविधा इंग्रजी आणि हिंदी भाषेसाठीदेखील उपलब्ध आहे.
https://extensions.libreoffice.org/en/extensions/show/20644
टूलबारवरील सेव्ह आणि प्रिंट बटणाच्या मध्ये जे जगाचे वर्तुळ दिसत आहे त्यावर क्लिक केली की आपण टाईप केलेल्या मराठी/ हिंदी/ इंग्रजी मजकुरातील चुकीचे शब्द वेगळे काढून नवीन फाईलमध्ये साठविले जातात. त्या चुकीच्या शब्दांचे योग्य ते पर्याय देखील त्यांच्यासमोर लिहून मिळतात. लाल रेघेवर राईट क्लिक करण्याचा पर्याय सोपा आहे हे बरोबर पण सर्व चुकांचा एकत्र आढावा यात घेता येतो त्याचा एखाद्याला फायदा होऊ शकतो.

मराठी/ इंग्रजी वाक्यांचे बायग्रॅम आणि ट्रायग्रॅम तयार करण्याची स्क्रीप्टदेखील याच एक्स्टींशनमध्ये उपलब्ध आहे. बायग्रॅम म्हणजे दोन तर ट्रायग्रॅम म्हणजे तीन - तीन शब्दांच्या जोड्या. फक्त यातील पहिले दोन शब्द आधीच्या जोडीतील घ्यायचे. म्हणजे जर वाक्य असे असेल "लाल रेघेवर राईट क्लिक करण्याचा पर्याय सोपा आहे हे बरोबर पण सर्व चुकांचा एकत्र आढावा यात घेता येतो" तर त्याचा ट्रायग्रॅम असा दिसेल.

लाल रेघेवर राईट
रेघेवर राईट क्लिक
राईट क्लिक करण्याचा
क्लिक करण्याचा पर्याय
करण्याचा पर्याय सोपा
पर्याय सोपा आहे
सोपा आहे हे
आहे हे बरोबर
हे बरोबर पण
बरोबर पण सर्व
पण सर्व चुकांचा
सर्व चुकांचा एकत्र
चुकांचा एकत्र आढावा
एकत्र आढावा यात
आढावा यात घेता
यात घेता येतो

याचे बरेच फायदे आहेत. उदा. पुढचा शब्द कोणता असेल हे ओळखण्यासाठी याचा उपयोग करता येतो. म्हणजे "लाल" शब्दानंतर रेघ तर "राईट" शब्दानंतर क्लिक हा शब्द येण्याची शक्यता वाढवता येते.
अवांतरः शब्द जतन करण्याची ही पद्धत भारताला कित्येक हजार वर्षांपासून माहीत आहे! वेदांचे घनपाठ दोन / तीन क्वचित चार / पाच ग्रॅम पद्धतीने पाठ असलेले पंडित आता आता पर्यंत होते. सध्याची स्थिती माहीत नाही!

जुलै २१ च्या "कोश काय सांगतात.." या लेखात वैशाली पेंडसे - कार्लेकर म्हणतात...

या व्यतिरिक्तही अनेक कोशांमध्ये इंग्रजी शब्द आहेतच, पण तरीही मराठीत वापरल्या जाणाऱ्या अधिकाधिक इंग्रजी शब्दांच्या व्याकरणिक नोंदीसह विस्तृत माहिती समाविष्ट करण्यासाठी कोश अद्ययावत करण्याची किंवा ऑनलाइन अर्थात आभासी माध्यमातून एखाद्या ई-कोशाच्या निर्मितीची गरज वाटते.

https://www.loksatta.com/navneet/dictionary-in-marathi-marathi-language-...

अशा प्रकारच्या कोषाची खरच गरज आहे. स्पेल चेकच्या डिक्शनरीत देखील असे शब्द घ्यायचे आहेत पण त्याची परिपूर्ण यादी कुठेच उपलब्ध नाही. क्वचित कोणी प्रयत्न केला आहे, पण तो अपुरा आहे. उदा. प्रा. यास्मिन शेख यांच्या "मराठी शब्दलेखनकोश" या पुस्तकातील प्रस्तावनेत लिहिले आहे की...

ज्या इंग्रजी शब्दांना अजूनही मराठीत पर्याय उपलब्ध झालेले नाहीत, किंवा जे शब्द मराठीत इतके रुळले आहेत, की ते मराठीच झाले आहेत अशा शब्दांची यादी परिशिष्ट क्र. तीन मध्ये समाविष्ट केली आहे. वानगीदाखल पुढील शब्द पाहा. स्टोव्ह, गॅस, लाइटर, फ्लॅट, क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटन, टेलिफोन. हे शब्द भूषण राक्षे यांनी निवडले आहेत.

मराठीत पर्याय उपलब्ध असले तरी इंग्रजी शब्द लिहिण्या बोलण्यात येतच असतात. त्यांचे लिंग प्रत्येक जण आपापल्या मतानुसार ठरवतो. तो इमेल/ ती इमेल, तो स्क्रीन/ ती स्क्रीन, तो साईज / ती साईज, ते गिफ्ट/ ती गिफ्ट असे वाद आहेत. त्यापुढे इंग्रजी शब्दांचे अनेकवचन कसे करायचे ही दुसरी समस्या लेखिकेने मांडली आहे. उदा. बँक- बँका, बॅग- बॅगा, गॅलरी- गॅलऱ्या, मॅच/ मॅचेस. पण माझ्यामते खरी समस्या इंग्रजी शब्दांचे देवनागरीत लेखन कसे करायचे ही आहे. "अ‍ॅक्टीव्हिटी" शब्दातील इकार पहिला दुसरा कसा ठरवायचा? "इलेक्ट्रिशिअनची" हा शब्द स्पेलचेक मध्य शुद्ध दाखवायचा की चुकीचा ठरवायचा? "चॅनलचे" ऐकायचे की "चॅनेलचे" ? डिजाईन, डिझाइन की डिज़ाइन? ड्रायव्हर की ड्राइव्हर? नॉस्ट्राडेमस हे नाव देवनागरीत नेमके कसे लिहू?

अधिक विस्तारित अशी यादी कोणी बनविली तर फार चांगले होईल.

सी-डॅक या सरकारी कंपनीने बनविलेले आय.एस.एम. (Intelligent Script Manager) वापरून पाहिले.

https://www.cdac.in/index.aspx?id=ev_corp_gist_ism_launch

हे सॉफ्टवेअर बराहला चांगला पर्याय ठरू शकेल. यातील इझी फोनेटिक हा पर्याय गमभनच्या अगदी जवळ जाणारा आहे. यात इन्स्क्रिप्ट आणि टाईपरायटर असे की-बोर्ड देखील उपलब्ध आहेत जे "प्रमुख"च्या सॉफ्टवेअरमध्ये दिसत नाहीत. टायपिंग करताना कीबोर्ड सहज दिसू शकेल अशी व्यवस्था करता येते या चित्रात दाखविल्याप्रमाणे...

गूगलसारखे पर्याय यात दिसत नसले तरी वापरून बघण्यास हरकत नाही असे (सरकारमान्य) सॉफ्टवेअर.

पाषाणभेद यांनी त्यांच्या ब्लॉगवर याच विषयाची अधिक माहिती दिली आहे. ती वाचण्यासारखी आहे.

http://pashanbhed.blogspot.com/2022/07/blog-post_7.html

जे लोकं कायम ऑनलाईन असतात ते गुगल डॉक्समध्ये मराठीत लिहून त्यातील स्पेलचेकदेखील वापरू शकतात. त्यासाठी फक्त फाईल - लॅंग्वेज या लिस्टमधील मराठी हा पर्याय स्वीकारावा. या चित्रात दाखविल्याप्रमाणेः

आता कीबोर्ड फोनेटिक असा बदलून घेतला की गमभनसारखे लिहिता येईल.

जीमेलमध्ये देखील की-बोर्ड बदलण्याची सुविधा आहे.

"स्पेलचेक" म्हणजे मराठी शुद्धलेखनातील चूका ?? "म" अक्षर निवडून टाईप केलं (त्या किबोर्डला काय म्हणतात ते माहिती नाही) तर शुद्धलेखन तपासले जाईल का?

शंतनू, धन्यवाद. अजून ते वापरून पाहिले नाहीत. पण तुम्हाला ग म भ न जे म्हणायचं आहे, ते फोनेटिक नाहीत ना? अक्षरागणिक transliterate होईल ना त्यात (मायबोलीप्रमाणे किंवा बरहा प्रमाणे)? मला फोनेटीक कळपाट नको आहे.

>> "स्पेलचेक" म्हणजे मराठी शुद्धलेखनातील चूका ??
हो. "स्पेलचेक" म्हणजे मराठी शुद्धलेखनातील चुका. त्यात धक्का बसण्यासारखे काय आहे? गूगल डॉक्स आणि जीमेलमध्ये ही सुविधा फार पूर्वीपासून आहे. पण त्यासाठी कायम ऑनलाईन रहावे लागते. ऑफलाईन स्पेलचेकर हवा असेल तर लिब्रे ऑफिस किंवा फायरफॉक्स एक्स्टिंशन वापरावे लागते. ह्या धाग्यात त्याची भरपूर चर्चा झालेली आहे, पण तरी देखील पुन्हा एकदा लिंक देवून ठेवतो. तेवढीच जाहिरात!

https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/marathi-dictionary/

>> "म" अक्षर निवडून टाईप केलं (त्या किबोर्डला काय म्हणतात ते माहिती नाही) तर शुद्धलेखन तपासले जाईल का?
हो, तसेही लेखन तपासले जात आहे. त्या कीबोर्डला गूगलने काही नाव दिलेले नाही. आपण त्याला गमभन कीबोर्ड म्हणतो!

>> अजून ते वापरून पाहिले नाहीत.
का बरं? वापरून पाहिल्या की खूप गोष्टी आपोआप लक्षात येतात. गूगलच्या बहुतेक सर्व सेवा "युजर फ्रेंड्ली" आहेत.

>> तुम्हाला ग म भ न जे म्हणायचं आहे, ते फोनेटिक नाहीत ना?
गमभन ही फोनेटिकचीच सुधारून वाढविलेली आवृत्ती आहे.

>> अक्षरागणिक transliterate होईल ना त्यात (मायबोलीप्रमाणे किंवा बरहा प्रमाणे)?
हो. जरूर होईल.

>> मला फोनेटीक कळपाट नको आहे.
मग इन्स्क्रिप्ट किंवा गमभन वापरा. त्या यादीत पेन्सीलच्या आकाराचा जो चौथा की बोर्ड आहे तो वापरून मराठीत पाटीवर लिहिल्यासारखे टचस्क्रिनप्रमाणे लिहू शकता.

हाताने टाईप करण्याचा कंटाळा येत असेल तर नुसते बोलूनही टाईप करू शकता. त्यासाठी Tools - Voice Typing असा पर्याय निवडावा लागतो या चित्रात दाखविल्याप्रमाणे

या सेवेची क्वालिटी सध्या तितकीशी चांगली नसली तरी मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटलिजंस वापरून त्याच्या अचूकतेत अक्षरशः रोज सुधारणा होत आहे.

अहो मला हाताने टाईप करायचा अजिबात कंटाळा नाही. फोनेटीक आवडत नाहीत कारण ते अनेकदा चुकीचे शब्द लिहितात. वरती चित्रात देवनागरी फोनेटीक लिहिलं आहे पण वर्णनावरून फोनेटीक वाटत नाही, म्हणून तो गोंधळ झाला. म्हटलं आधी खात्री करून मगच वापरू, म्हणून तुम्हाला आधी विचारलं. पण मग मीच दोन आठवड्यापूर्वी वापरून बघितली आणि छान वाटली. मी मग इतर धाग्यांवर इतरांना ह्या सुविधेबद्दल सांगितलं आहे आणि त्यांनीही चांगला अभिप्राय दिला आहे.

बाकी लोकांना तुम्ही दिलेला प्रतिसादही बघितला. एवढे रागावू नका हो. सगळ्यांचे प्रश्न प्रामाणिक आहेत. Happy

उ बो, उदाहरण देतो. माझ्याकडच्या फोनेटीक कळपाटात 'कळपाट' टंकल्यास काळपट, कळपात, कल्पात - असे पर्याय येतात. आध्यात्मिक हा शब्द अध्यात्मिक असा येतो. बाष्पगद्गदित हा शब्द बाशपागडगदित असा येतो. पाहिजे तेच टंकन करता येणारा हा कळपाट नाही.

फोनेटिक वर हे शब्द पुढीलप्रमाणे लिहून बघितले का? (गूगल Gboard वापरून. गूगल Indic जास्त चांगला होता, असे माझे मत आहे पण आता तो उपलब्ध नाही.)

कळपाट =
kaLpaaT असे लिहून येत नाही हे मान्य.
kal (मग पर्यायातून कळ निवडून मग पाट असा लिहिता येतो).

aadhyatmic = आध्यात्मिक (बरोबर लिहिता येतो)

बाष्पगद्गदित शब्द वाचून मी गद्गदित झालो. हा शब्द मी आयुष्यात कधीही वापरायची शक्यता नाही. असले काहीतरी क्लिष्ट लिहिण्याऐवजी मी "कंठ दाटून आला" वगैरे काहीतरी किंवा अजून सोपे लिहीन. (व्यक्तिगत मत).

हो, म्हणजे कळपाट चांगला नाही म्हणून आपण पाहिजे ते शब्द न वापरता पर्यायी शब्द वापरत असू तर ते न पटण्यासारखे आहे. एखादा शब्द तुम्ही वापरत नाही किंवा बरेच जण वापरत नाहीत म्हणून तो टंकन करताच येऊ नये हे दुर्दैवी आहे.

वरती दिलेला तो शब्द केवळ उदाहरण म्हणून आहे. मी सहसा असे शब्द वापरत नाही, पण कधी कधी विनोदनिर्मितीसाठी मला असे शब्द हवे असतात. तेव्हा आधी बाष्प लिहा, मग गद्य लिहून य खोडा, मग गदित लिहा अशी कसरत करावी लागते. शिवाय हे कळपाट उपलब्ध शब्दाच्या सांख्यिकीवर अवलंबून असल्याने जर मोठ्या प्रमाणात तो विशिष्ट कळपाट वापरणारे लोक एखादा शब्द चुकीचा लिहीत असतील तर तसाच पायंडा पाडला जातो. मला तो बरोबर लिहायचा असूनही तो चुकीचाच लिहिला जातो.

हा प्रश्नदेखील वैयक्तिक प्राधान्याचा आहे. एखाद्याला एवढं काटेकोर राहणं पटत नसेल आणि त्यापेक्षा सुलभता हे प्राधान्य असेल तर फोनेटीक वापरायला काहीच हरकत नाही. पण ज्यांना हवे तेच टंकन करायचे आहे त्यांच्यासाठी सुविधा कुठली, तर सध्या वरती शंतनू यांनी सांगितलेली त्यातल्या त्यात चांगली वाटते आहे. इतरांनी तीच वापरावी असा आग्रह नाही.

<< आपण पाहिजे ते शब्द न वापरता पर्यायी शब्द वापरत असू तर ते न पटण्यासारखे आहे. >>

https://f-droid.org/en/packages/org.smc.inputmethod.indic/
हा पर्याय आहे. FLOSS software चा फायदा म्हणजे स्वतःला हवे ते बदल तुम्हाला करता येतील. Proprietary software मध्ये तो पर्याय तुम्हाला नाही.

त्यात धक्का बसण्यासारखे काय आहे? गूगल डॉक्स आणि जीमेलमध्ये ही सुविधा फार पूर्वीपासून आहे. >> धक्का नाही, जरा आश्चर्य वाटले कारण गूगल डॉक्स बरेच वर्ष वापरले तरी त्यातील स्पेलचेक मराठी लिहीताना लक्षात आले नव्हते किंवा वापरले नव्हते.

मी अशा शब्दांसाठी वेगळी पद्धत वापरतो. प्रथम मला हवा तसा शब्द नीट काटेकोरपणे लिहून त्यावर राईट क्लिक करून "add to dictionary” असा पर्याय वापरून डिक्शनरीत सेव्ह करून ठेवतो. मग एखाद्या निष्पाप मुलासारखे "बाषपगदगदित ” असे टाईप करून राईट क्लिकवरचा योग्य शब्द निवडतो. खालील चित्रात दाखविले आहे अशा पद्धतीने

डिक्शनरीचा कौशल्याने उपयोग केला की इनपुट मेथडमुळे येणाऱ्या अनेक समस्यांवर सहज मात करता येते. हवे तर टूल्स – स्पेलिंगच्या ऑप्शनमध्ये जाऊन हा शब्द नंतर काढूनही टाकता येईल, या चित्रात दाखविल्याप्रमाणे.

वर दिलेल्या दुव्यातील चित्रात "बाष्पगद्गदित" या शब्दानंतर बरोबरचे चिन्ह दाखविले आहे. ते कशासाठी आहे ते पाहू या. खूप मोठे शब्द जर ओळीच्या शेवटी आले तर हायफनेशनचा पर्याय वापरून आपण त्यामध्ये डॅश आणू शकतो. हे असे…

पण जर एखादा शब्द एकत्रच हवा असेल तर डिक्शनरीमधील त्या शब्दासमोर बरोबरचे चिन्ह (=) द्यावे लागते. त्यामुळे लिब्रे ऑफिसला हे समजेल की "बाष्पगद्गदित" ओळीत अगदी शेवटी आला तरी हायफनेट करायचा नाही. जागा नसेल तर पूर्ण शब्द पुढच्या ओळीत ढकलला गेला पाहिजे.
आता इतका विचार कोण करतो असे म्हणून गद्गदित होण्याचे कारण नाही. विनोद निर्मितीसाठी जसे हे शब्द लागतात तसे डि.टी.पी. व इतर कामांसाठी असे फिचर्स लागतात.

उभ्या मांडणीतील "श्वासोच्छ्वास" हा शब्द आडव्या मांडणीत "श्‍वासोच्छ्‌वास" असा दिसेल, ह्या चित्रात दाखविल्याप्रमाणे...

माझ्या मते हा शब्द आडव्या मांडणीत लिहावा. पण त्यासाठी श आणि व मध्ये जॉईनर (200D) तर छ आणि व मध्ये नॉन जॉईनर (200C) टाकावा लागतो.
दोन्ही शब्दांची फोड ही अशी दिसेल.

उभी मांडणी
'श ् व ा स ो च ् छ ् व ा स'

आडवी मांडणी
'श ् \u200d व ा स ो च ् छ ् \u200c व ा स'

टाईप करताना हा तक्ता उपयोगी पडेल.
200D 200C (unicode)
joiner non-joiner (name)
sh--v sh---v (Pramukh IME phonetic keyboard)
श्‍व श्‌व (Display)

श आणि ल च्या लेखन विषयक ही बातमी लोकसत्ताच्या (१५ नोव्हेंबर) पहिल्या पानावर आली यावरून शासन आणि मिडीया या दोघांच्याही दृष्टीने हा महत्त्वाचा विषय असावा असे वाटते. तर बातमीचे शीर्षक आहेः 'ल', 'श' च्या नियमामुळे गोंधळ; शिक्षण क्षेत्रातून सूर, निर्णयाच्या लाभावर प्रश्नचिन्ह
बातमीचा सारांश पुढे देत आहे. पूर्ण बातमी या पानावर वाचता येईल.

मराठी देवनागरी लिपीत पाकळीयुक्त 'ल' आणि देठयुक्त 'श' लिहिण्याचा नियम अडचणीचा ठरणार असल्याचा सूर शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांची वर्षांनुवर्षांची सवय मोडणे कठीण असून, या निर्णयाने हित साधले जाण्यापेक्षा गोंधळ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

डॉ. वसंत काळपांडे - "भाषेशी संबंधित नियम हे वापरसुलभ असायला पाहिजेत. स्वतःला भाषातज्ज्ञ म्हणवून घेणाऱ्या मंडळींची मराठी बोलणाऱ्यांशी नाळ तुटली आहे. भाषेतील बदलांची दिशा तरुण पिढी ठरवत असते, भाषातज्ज्ञ नव्हे. त्यामुळे हा शासन निर्णय मराठी भाषेच्या दृष्टीने एक धोक्याची घंटा आहे. या निर्णयाने फायदा होण्यापेक्षा गोंधळच निर्माण होऊ शकतो"

धनवंती हर्डीकर - "आता मात्र ताबडतोब बदल करण्याचे फर्मान आहे. त्यासाठी विद्यार्थी, शिक्षक यांना किती त्रास होईल, किती वेळ वाया जाईल आणि मुख्य म्हणजे हे सगळे करून काय फायदा होईल, याचा विचार केलेला नाही. गेल्या शतकातील मराठीच्या अभ्यासकांनी लोकांविषयीच्या तळमळीने आणि विचारपूर्वक बदल सुचवले, ते केंद्र स्तरावर मान्यही झाले, ते रद्द करणाऱ्या लोकांनी त्यासाठी आधी योग्य कारणे कोणती, यांची जाहीर चर्चा करायला हवी होती."

मराठीचे शिक्षक - "नव्या शासन निर्णयातील बदल अंगवळणी पडण्यास शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांनाही काही काळ अडचणी येतील."

यास्मिन शेख - 'श' देठयुक्त आहे की गाठयुक्त, 'ल' पाकळीयुक्त आहे की दंडयुक्त याने काही बिघडत नाही. दोन्हीचा वापर योग्यच आहे.
_____

हातात काठी घेऊन उभा असलेला लंगडा 'ल' आणि टक्कल पडलेला 'श' ज्यांना बघवत नसेल त्यांनी फाँट बदलून पहायला हरकत नाही. पण त्यात अडचण ही आहे की शासनाला हवा असलेला ल आणि श फारच थोड्या फाँटमध्ये दिसून येतो. मी गूगल फाँटमध्ये पाहिले तर फक्त "टिरो देवनागरी मराठी" हा एकच फाँट या नियमात बसू शकतो. त्या व्यतिरिक्त शोभिका, यशोवेणू असे काही दोन – तीन चांगले पर्याय मला माहीत आहेत. पण डी. टी. पी. वगैरे कामांसाठी जसे फाँट लागतात तसे आणि तितके उपलब्ध नाहीत हे नक्की. हा मुद्दा प्रतिष्ठेचा करण्यात काही अर्थ नाही. मराठीतील 'श’ आणि 'ल’ साठी भविष्यात नवीन युनिकोड संकेतांक आणले गेले तर असलेल्या गोंधळात अधिक भर पडेल. स्पेल चेक, मशीन लर्निंग, टेक्स्ट टू स्पीच वगैरे तंत्रज्ञान मराठीत नीट चालणार नाही आणि मराठीचेच नुकसान होईल. याचे कारण गूगल, फेसबुकसारख्या कंपन्या मराठीची वर्गवारी "देवनागरी” या गटात करतात. त्या गटातून बाहेर काढले गेले तर नवीन गुंतवणूक करायला कोणीही तयार होणार नाही. स्वप्नाळू ध्येयवाद आणि प्रत्यक्षातील वस्तुस्थिती या दोन्हीतील फरक जाणून घेतला पाहिजे असे मला वाटते.

लॅंग्वेज टूल्सचा ग्रामर चेक वापरण्यासाठी खाली दिल्याप्रमाणे दोन बदल करावे लागतात.

Tools - Options - Language Settings - Server Setting - Enable Language tools (https://api.languagetool.org/v2)

Tools - Options - Language Settings - Writing Aids - Remote Grammar Checker

आता "a apple" असे लिहिले तर त्या खाली निळी रेघ येईल. (लाल नव्हे, ती स्पेल चेकसाठी असते) त्यावर राईट क्लिक केली की "an apple" असा पर्याय स्वीकारता येईल.

मराठी व्याकरणासाठी अशी काही सोय (सध्या) नाही. कोणी त्यात लक्ष घातले तर कदाचित भविष्यात मराठी ग्रामर चेक देखील बनू शकेल!

गूगल ट्रांस्लेट वापरून कोणतेही पान कोणत्याही भाषेत भाषांतरित करता येते ही गोष्ट क्रोम वापरणाऱ्यांना माहीत असेलच. उदाहरणार्थ मनीकंट्रोल या साईटवरील गुजराती लेखाचे मराठी किंवा इंग्रजीतील भाषांतर असे दिसेल.

पण जर आपल्याला गुजराती लिपी वाचता येत नसेल पण भाषा समजत असेल तर भाषांतर न करता लिप्यंतर करता येते हे असे…

यासाठी एक ऍड ऑन वापरले आहे ते येथून डाऊनलोड करता येईल.

https://chrome.google.com/webstore/detail/aksharamukha-script-conve/nahd...

सुमारे पंधरा वर्षांपूर्वी मी फायरफॉक्ससाठी असेच एक एक्स्टिंशन बनविले होते. फायरफॉक्सने जावास्क्रिप्टमध्ये आमूलाग्र बदल केल्यामुळे ते आता उपलब्ध नाही पण त्याविषयावरील चर्चा उपक्रमाच्या या पानावर वाचता येईल.

विनोद रंजन यांच्या या "अक्षरमुख" प्रकल्पात शंभराहून अधिक स्क्रिप्ट (थाई / ब्राह्मी वगैरे) आणि रोमन लिपीचे पंधरा-वीस प्रकार उपलब्ध आहेत. उदा. 'धर्म भारत की श्रमण परम्परा से निकला धर्म और दर्शन है' हे वाक्य खाली दाखविलेल्या वेगवेगळ्या पद्धतीने रोमन लिपीत लिहिता येते.

RomanReadable: dharm bhaarat kee shraman paramparaa se niklaa dharm aur darshan hai
Itrans: dharm bhArat kI shramaN paramparA se niklA dharm aur darshan hai
IAST: dharm bhārat kī śramaṇ paramparā se niklā dharm aur darśan hai
IPA: d̪ʰəɾm bʰɑːɾət̪ kiː ʃɾəməɳ pəɾəmpəɾɑː s̪eː n̪ɪklɑː d̪ʰəɾm əuɾ d̪əɾʃən̪ ɦəɪ

त्यासाठी हा दोन ओळींचा पायथॉन कोड वापरता येईल.

from aksharamukha import transliterate
transliterate.process('Devanagari', 'RomanReadable', 'धर्म भरत की श्रमण परम्परा से निकला धर्म और दर्शन है', pre_options=['RemoveSchwaHindi'])

केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील अनेक लिपींचा सखोल अभ्यास करून त्यातील आंतरसंबंध लक्षात घेऊन असे पॅकेज बनविणे हे काम अतुलनीय आहे. म्हणून विनोद रंजन व त्यांच्या सहकाऱ्यांची आवर्जून दखल घेतली पाहीजे असे मला वाटते.

'च्यायला' किंवा 'आयला' या शब्दांखाली लाल रेघ येते कारण ते शब्द डिक्शनरीत (मुद्दामच!) घेतलेले नाहीत. पण राईट क्लिकवर असंबद्ध शब्द दिसतात (उदा. घ्यायला, न्यायला, भ्यायला किंवा आलाय, आईला, आखला) या बोली भाषेतील शब्दांना प्रमाण भाषेतील 'अरेच्चा' हा शब्द वापरता येईल. तो शब्द जर राईट क्लिकवर दाखवायचा असेल तर डिक्शनरीतील नोंद अशी दिसेल.

अरेच्चा ph:च्यायला ph:आयला

अर्व्याच्य शिव्यांना असे पाणी घालून पातळ केलेले शब्द कोणी सुचविले तर ते डिक्शनरीत घेता येतील. हीच पद्धत इंग्रजी शब्दांना लागू होईल. उदा.

भाडे ph:रेंट
खरेदी ph:पर्चेस
लांबी ph:लेंथ

मोठ्या प्रमाणावर दिसणाऱ्या हिंदी/ उर्दू शब्दांसाठी देखील हा ph: टॅग वापरता येईल. 'अदालत' या शब्दाखाली लाल रेघ येते खरी पण राईट क्लिकवर भलतेच शब्द दिसतात. म्हणून डिक्शनरीतील 'न्यायालय' आणि 'कचेरी' या शब्दांपुढे हिंदी शब्दाची नोंद करावी म्हणजे हिंदी शब्दाला योग्य मराठी शब्द सुचवला जाईल. त्यासाठी...

न्यायालय ph:अदालत
कचेरी ph:अदालत

वर दिलेले दोन बदल केले की 'अदालत' शब्दाच्या राईट क्लिकवर न्यायालय आणि कचेरी असे दोन्ही शब्द दिसतील. अदालत शब्द नको असेल तर यातील कोणताही एक शब्द आपण निवडू शकतो. समजा 'कचेरी' शब्द निवडला तर त्यावर परत राईट क्लिक करून 'सिनॉनिम' या पर्यायात 'कार्यालय, खाते, दप्तर' असे समानार्थी शब्द पाहता येतील.

नदीचे मूळ आणि ऋषींचे कूळ शोधू नये असे म्हणतात. शब्दांची मुळे तरी कशाला शोधायची? कोणताही अभिनिवेष न ठेवता सुचविलेल्या बदलांचे स्वागतच आहे.

कस्टम डिक्शनरी बनविताना एक्स्ल्युड चेकबॉक्स सिलेक्ट करून आपण त्यात जर "कुत्रा” हा शब्द टाकला तर आपल्या मूळ डिक्शनरीतून तो शब्द बाद होतो हे आपण १५ जून २०२१ च्या पोस्टमध्ये पाहिले. त्या शब्दाखाली लाल रेघ येईल आणि राईट क्लिकवर "श्वान” (किंवा आपल्याला हवा तो शब्द) आपण दाखवू शकतो. अर्थात हा बदल आपल्या संगणकापुरताच मर्यादित असेल कारण इतरांनी कोणते शब्द वापरावेत ते आपण ठरवू शकत नाही. एक्स्ल्युड डिक्शनरीच्या नावात वजा चिन्ह (-) असते. त्यावरून डिक्शनरीचा प्रकार आपल्याला समजू शकतो.

आज आपण दुसरी एक युक्ती (इन्क्ल्युड डिक्शनरी) शिकणार आहोत. समजा मी एक कथा लिहीत आहे आणि कथेच्या नायकाचे नाव आहे "निहाल”. आता या शब्दाखाली अर्थातच लाल रेघ येईल आणि राईट क्लिकवर काही असंबद्ध पर्याय दिसतील. हे टाळण्यासाठी मी राईट क्लिकवरील "Add to dictionary" हा पर्याय वापरीन. हा शब्द या कादंबरीपुरताच मर्यादित असल्यामुळे तो मी कॉमन डिक्शनरीत जमा न करता एका वेगळ्या डिक्शनरीत जमा करून ठेवीन. अशी डिक्शनरी तयार करण्यासाठी ऑप्शन – न्यू - लॅंग्वेज – मराठी असा पर्याय निवडीन या चित्रात दाखविल्याप्रमाणे.

आता इतके करून ही समस्या संपत नाही. कारण या कादंबरीत निहाल या शब्दाची बरीच रूपे वापरली जाणार आहेत. उदा. निहालचं, निहालचा, निहालच्या, निहालनंतर, निहालने, निहालला, निहालसाठी वगैरे. आता त्या प्रत्येक शब्दावर राईट क्लिक करून तो शब्द कस्टम डिक्शनरीमध्ये ऍड करणार का?

हे टाळण्यासाठी आपण निहाल शब्द जमा करताना "Grammar by” या पर्यायात "अमिताभ” हा शब्द लिहायचा आहे. असे केल्यामुळे अमिताभ शब्दाची जी आणि जशी रूपे होतात तशीच निहाल शब्दाची देखील होतील आणि आपल्याला निहाल शब्दाची इतर रूपे कस्टम डिक्शनरीत टाकण्याची गरज उरणार नाही. अमिताभ हा शब्द मूळ डिक्शनरीत आधीपासूनच आहे आणि त्याला “Aac” असे तीन हंस्पेल टॅग देखील आहेत. तेच तीन टॅग "निहाल” शब्दालाही मिळतील. कादंबरी लिहून झाली की मी ती कस्टम डिक्शनरी डिसेबल करीन म्हणजे इतर शब्द तपासताना चुकून निहाल शब्द आला तर त्याखाली लाल रेघ आली पाहिजे.

मोठ्या प्रमाणावर जलद आणि निर्दोष लेखन करायचे असेल तर लिब्रे ऑफिसमधील अशा सोयी सुविधांचा उपयोग करून घेता येईल असे मला वाटते.

वर आपण कथेचा नायक "निहाल” या शब्दाची सोय लावली. पण समजा कथेची नायिका "दिपाली” असेल तर तो शब्द देखील अशाच तऱ्हेने "अमिताभ” या शब्दाला जोडून घ्यावा लागेल. असे करण्यापेक्षा दिपाली/Aac अशी नोंद मूळ डिक्शनरीतच करता येणार नाही का? करता येईल. पण मग डिक्शनरीचा आकार विनाकारण वाढेल, स्पेलचेकर स्लो होईल आणि हा शब्द "दिपली, दीपावली” अशा शब्दांखाली येईल ते असंबद्ध दिसेल.
तेव्हा सध्यातरी लेखकाला असे शब्द कस्टम डिक्शनरीत जमा करण्याचाच पर्याय उपलब्ध आहे. आता एकेक करून असे शब्द डिक्शनरीत असलेल्या शब्दांशी जोडून घेण्यात खूप वेळ जाईल. ती अडचण असेल तर कस्टम डिक्शनरीची फाईल उघडून त्यात "दिपाली==अमिताभ” अशी नोंद करावी. फाईल कशी उघडायची ते मी माझ्या २८ जून २०२१ च्या पोस्टमध्ये लिहिले आहे. उदाहरणार्थ माझ्या संगणकावरील फाईल ही अशी दिसत आहे.

OOoUserDict1
lang: mr-IN
type: positive
---
ख़ाँसाहेब
ज़माना
ज़ावेदना
निहाल==अमिताभ
दिपाली==अमिताभ

पहिली ओळ – ही युजर डिक्शनरी फाईल असल्याची घोषणा
दुसरी ओळ – भाषा मराठी
तिसरी ओळ – डिक्शनरीचा प्रकार - इ न्क्ल्युड (पॉझिटीव्ह) / एक्स्ल्युडसाठी निगेटिव्ह पर्याय वापरा
चौथी ओळ – तीन डॅश म्हणजे शब्दयादी सुरू
इतर ओळी - निहाल, दिपाली असे शब्द अमिताभ या शब्दासारखे चालतात. सर्व शब्द शुद्ध समजावेत.

ओपन सोर्स सॉफ्टवेअर वापरण्याचा मुख्य फायदा हा की आपल्याला थेट सोर्स कोडमध्ये सुधारणा करता येते.

पेज ट्रान्स्लेट नावाचे लिब्रे ऑफिस एक्स्टिंशन वापरून रायटरमध्येच भाषांतर करता येते. त्यामुळे गूगलमध्ये कॉपी पेस्ट करण्याचा त्रास वाचतो.

https://extensions.libreoffice.org/en/extensions/show/pagetranslate

या चित्रात दाखविल्याप्रमाणे टूल्स - पेज ट्रान्स्लेट - आशिया या पर्यायात हिंदी भाषा निवडता येते.

मराठीचा पर्याय त्यात नसल्यामुळे मी सोर्स कोडमध्ये आवश्यक ते बदल करून नवीन एक्स्टिंशन येथे उपलब्ध करून दिले आहे.

आता मी माझे विचार थेट इंग्रजीत लिहू शकतो. हे असे...
Let me type this comment in english and then use shantanu’s libre office extension to translate it in Marathi.

गूगल त्याचे कामचलावू भाषांतर करून देईल, वरील चित्रात दाखविल्याप्रमाणे हे असे...
मी ही टिप्पणी इंग्रजीत टाईप करू आणि नंतर ती मराठीत भाषांतरित करण्यासाठी shantanu's libre office extension वापरू.

शेवटी पॅराफ्रेज टूल वापरून मी त्याला घासून पुसून अगदी "शुद्ध" मराठीत लिहू शकतो. हे असे...
मी ही टिप्पणी इंग्रजीत टाईप करेन आणि नंतर शंतनूचे लिबर ऑफिस एक्स्टेंशन तिचे मराठीत भाषांतर करेल.

भाषांतर, शुद्धलेखन आणि वाक्यरचना या सर्व बाबतीत तंत्रज्ञानाने आपले काम चोख बजावलेले आहे. इतके असूनही जर कोणीच हे वापरत नसेल तर त्याला नाइलाज आहे!

उपयुक्त काम आहे, त्याबद्दल तुमचं अतिशय कौतुक, पण प्लॅटफॉर्म तेवढा लोकप्रिय नाही. लिब्रे ऑफिस कुणी वापरत नाही हा प्रॉब्लेम आहे. मी उबंटू वापरत असलो तरी लीब्रे ऑफिस अजिबात वापरत नाही. मुळीच आवडत नाही मला. मग लिनक्स न वापरणारे तर जाऊच दे. हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोहोचणार कसं? दोष लोकांचा नाही.

दॉक्युमेंट्स तयार करायला लॅटेक, प्रेझेंटेशन्ससाठी बीमर, एक्सेल सहसा लागत नाही, पण लागलंच तर ऑफिस३६५ ऑनलाईन आवृत्ती वापरतो. वर्ड - पॉवरपॉईण्ट लागले तर ते सुद्धा ऑफिस३६५वर वापरतो, लिब्रे ऑफिसपेक्षा.

असो, सांगायचा उद्देश हा, की मराठी वापरकर्ते मोठया प्रमाणावर मायक्रोसॉफ्टचीच उत्पादनं वापरतात. त्यामुळे इतर उत्पादनांमध्ये उपलब्ध असलेली गोष्ट कितीही उपयोगी असली, तरी ती वापरली जाण्याची शक्यता फारच कमी.

कोणाला शाहरूख खान आवडत नाही तर कोणाला सलमान खान आवडत नाही. हा तसा वैयक्तिक आवडी-निवडीचा प्रकार आहे की त्यामागे काही तार्किक कारण आहे? लिब्रे मधील काही बग्स / गंभीर त्रुटी आपल्या नजरेस आल्या आहेत का?
मी भाषांतरासाठी खाली दिलेले एक्स्टेंशन बनविले आहे.

https://extensions.libreoffice.org/en/extensions/show/27503

ते वापरून मराठीत लिहिलेली एक कविता फक्त Ctrl + Shift + e वापरून इंग्रजीत भाषांतर करता आली. आता हीच गोष्ट मी कॉपी-पेस्ट करून गूगलच्याच ट्रान्स्लेशन पानावरून पुन्हा इथे आणू शकलो असतो. पण मग सर्व मजकूर दोन कॉलम मध्ये बसवण्यापासून इतर सर्व फॉर्मॅटिंग़ परत करावे लागले असते.

लिब्रे ऑफिसमध्ये सर्व भर स्टाईल वापरण्यावर असतो. अगदी फॉन्ट बदलणे , बोल्ड, सेंटर अलाईन करणे या गोष्टी देखील टूलबार न वापरता स्टाईल बार मधील पॅराग्राफ/ कॅरेक्टर स्टाईल वापरून कराव्या अशी अपेक्षा असते. वर्ड वापरणाऱ्यांना हे स्टाईल प्रकरण म्हणजे धर्मसंकट वाटते. त्यामुळे कदाचित त्याचा जास्त प्रचार झाला नसावा.

मराठी आणि भाषांतरित इंग्रजी या दोन्ही स्क्रीन शॉटमध्ये मी poem नावाची स्टाईल वापरली आहे. ती मी Default Paragraph Style वरून नव्याने बनविली होती, कशी ते या चित्रात पाहता येईल. तुम्हाला न आवडलेल्या गोष्टीचा अजिबात आग्रह चाललेला नाही तर इतर कोणाला याचा उपयोग होईल अशी आशा आहे.

छे छे! तसं मुळीच म्हणायचं नव्हतं. उलट मी स्वतः वापरून बघेन. पण इतर एखाद दोन सोडले तर फार कुणी वापरण्याची आशा ठेवण्यात हशील नाही. आपण लिनक्स वापरणारे फार कमी लोक आहोत.

मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये मेन्यूबार, टूलबार किंवा की-बोर्ड शॉर्टकट वापरून एखादी गोष्ट करता येते. या तिन्हीपैकी कोणताही मार्ग निवडला तरी तुमची फाईल एकाच पद्धतीने सेव्ह होणार. आता अशी फाईल लिब्रे मधील रायटरमध्ये अगदी सहज उघडता येते हा मोठा फायदा आहे. पण त्याचा तोटा असा की लिब्रे वापरणारी दुसरी व्यक्ती "स्टाईल" वापरणार. वर्डमधील कोडची अंतर्गत रचना आणि लिब्रेच्या स्टाईलची रचना पूर्ण वेगळी आहे. त्यामुळे आता अशी भेसळ झालेली फाईल जेव्हा तिसऱ्या व्यक्तीकडे जाते तेव्हा त्या व्यक्तीला अगदी वेड लागायची पाळी येते. कारण वर्डमधील फॉर्मेटिंग बदलण्यासाठी वर्डची पद्धत वापरावी लागते आणि लिब्रेमध्ये काही बदल करण्यासाठी स्टाईलचा अभ्यास करावा लागतो. म्हणून बऱ्याच कंपन्यांनी "आमचे येथे फक्त वर्डमध्ये डॉक्युमेंटेशन बनवून मिळेल" असा अलिखित नियम केला आहे. लिब्रेच्या डाऊनलोड पानावर तर "Ideal for home users, students and non-profits" असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. अर्थात या सगळ्याचा अर्थ कॉर्पोरेट कंपन्यांनी लिब्रे वापरू नये असा नव्हे. फक्त लिब्रे ऑफिसच्या मर्यादा लक्षात घ्याव्यात. वर्ड फाईल उघडून परत त्यातच सेव्ह करता आले पाहीजे म्हणून लिब्रेने काही तडजोडी केल्या आहेत, त्यांची अपरिहार्यता लक्षात घ्यावी. कर्मचाऱ्यांना पुनर्प्रशिक्षण देऊन कंपनीतील डॉक्युमेंट्स सुरवातीपासूनच लिब्रे स्टाईलमध्ये सेव्ह होतील हे पाहावे. ते जमणार नसेल तर सरळ वर्ड वापरावे. पण भविष्यात वर्ड / एक्सेल वापरणे अत्यंत महाग होणार आहे. तसेच त्यात युनिकोड सपोर्ट नीट नसल्यामुळे इंग्रजी व्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेत काम करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागेल, त्याचीही तयारी ठेवावी. वर्डचा सोर्स कोड ओपन नसल्यामुळे तिकडे लिब्रे ॲड-ऑन सारखी काही संकल्पनाच नाही. मायक्रोसॉफ्ट ही कंपनी प्रत्येक सोयीसाठी दमड्या (डॉलरमध्ये मोजून-मापून) घेते, याचे भान ठेवावे.

तुमच्या प्रतिसादात तुम्ही "आपण लिनक्स वापरणारे फार कमी लोक आहोत” असे म्हटले आहे. ते खरेच आहे. पण सगळीकडे मेजॉरिटीचा विचार कशासाठी करायचा? लेम्बोर्गिनीतून फिरणारे लोक काय असा विचार करतात का? शिवाय लिब्रे आणि फायरफॉक्स विंडोज् वर पण चांगले चालते, त्यामुळे लिनक्सचा विषय काढण्याचे कारण कळले नाही. मी बनविलेल्या तुर्की भाषेतील "स्पेल चेक प्लस"ला एका महिन्यात शेकडो युजर्स मिळाले. मराठीला फारसा प्रतिसाद नसला तरी ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत ही सोय पोहोचेल असे वाटते.

पण सगळीकडे मेजॉरिटीचा विचार कशासाठी करायचा? >> आधी नव्हतो करत. तुमच्याच "इतके असूनही जर कोणीच हे वापरत नसेल तर त्याला नाइलाज आहे!" ह्याला उत्तर म्हणून तो विचार केला. तुम्हाला मेजॉरिटीने ते वापरावे ही अपेक्षा आहे असं वाटलं हे वाचून.

शिवाय लिब्रे आणि फायरफॉक्स विंडोज् वर पण चांगले चालते >> लिब्रे विंडोज् वर पण चालते हे माहीत नव्हते. मी लिनक्सातच वापरले आहे.

रच्याकने, इथल्या आणखी काही जणांना अशी मराठी स्पेलचेक सोय असावी असे वाटते आहे; कदाचित त्यांच्यापर्यंत हा धागा पोहोचला नसावा. त्यांना या धाग्याची लिंक मी पाठवतो आहे. जेवढे वापरकर्ते वाढतील तेवढे चांगलेच आहे.

संस्कृतसाठी फायरफॉक्स आणि लिबर ऑफिसमध्ये स्पेल चेक बनविला आहे.

https://extensions.libreoffice.org/en/extensions/show/27509

https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/sanskrit-dictionary/

योग्य शब्दाला चुकीच्या शब्दाचा पर्याय दिसला असे क्वचित होऊ शकते. त्याकडे दुर्लक्ष करावे. उदाहरणार्थ भाषणमकुर्वन् हा शब्द योग्य असला तरी लाल रंगात अधोरेखित होत आहे. राईट क्लिकवर भाषणमुकर्वन् हा चुकीचा शब्द दिसत आहे. हा चुक़ीचा शब्द हन्स्पेलने भाषणम्" + "उ" + "कुर्वन्" अशी संधी करून बनविला आहे! फक्त आपल्याला आणि पाणिनीला ही फोड भाषणम् + अकुर्वन् अशी आहे हे माहीत आहे.
काही चुकीचे शब्द डिक्शनरीत आलेले असण्याचीही शक्यता आहे. नेटवरील विकिपीडिया वगैरे पानांवर मिळालेला शब्द पाच सहा पेक्षा जास्त वेळा तशाच पद्धतीने लिहिलेला असेल तर तो शब्द शुद्ध आहे असे समजून हे साडेपाच लाख शब्द जमवलेले आहेत. एखादा तज्ज्ञ वेगळी पद्धत सुचवत असेल तर त्याचे स्वागतच आहे. स्पेल चेकर १००% अचूक असावा अशी अपेक्षा बरोबर आहे पण हे पहिले पाऊल आहे, त्यातून इतरांना प्रेरणा / आयडिया मिळून अधिक प्रगती होईल अशी आशा आहे. या बरोबरच प्लस ही सुविधा वापरून चुकीचे शब्द वेगळे काढून त्यांचा अभ्यास करता येईल.

इतर काही नाही तर युनिकोडच्या चुका म्हणजे जॉईनरचा चुकीचा वापर, इनपुट मेथडमधील चुकीचा रफार वगैरे चुका सुधारल्या गेल्या तरी काही कमी फायदा नाही!

गूगल क्रोमसाठी मायक्रोसॉफ्टने बनविलेले ऍड - ऑन येथे उपलब्ध आहे...

https://chrome.google.com/webstore/detail/microsoft-editor-spelling/gpai...

यात मराठी स्पेल चेक अंतर्भूत आहे. इंग्रजीशिवाय २० पेक्षा जास्त भाषेतील स्पेलिंग / व्याकरण तपासता येते असा त्यांचा दावा आहे.

इंग्रजी आद्याक्षरांपासून बनणारे बरेच शब्द मराठीत वापरात आहेत. उदा...

आरएमएस आरएमडी आरएस आरएसव्ही आरएसव्हीचा आरटी आरटीपीसीआर आरपीएम आरपीएमचे आरसीएचकडून

असे शब्द डिक्शनरीत जमा करण्यासाठी हंस्पेलमधील कंपाऊंड फ्लॅग Y वापरता येतो. त्याच्यासोबत Aac असे फ्लॅग वापरल्यामुळे "चा", "चे" सारख्या प्रत्ययांसकट हे शब्द वापरता येतील.

COMPOUNDMIN 1
COMPOUNDFLAG Y

ए/YAac
बी/YAac
सी/YAac
डी/YAac
ई/YAac
एफ/YAac
जी/YAac
एच/YAac
आय/YAac
जे/YAac
के/YAac
एल/YAac
एम/YAac
एन/YAac
ओ/YAac
पी/YAac
क्यू/YAac
आर/YAac
एस/YAac
टी/YAac
यू/YAac
व्ही/YAac
डब्ल्यू/YAac
एक्स/YAac
वाय/YAac
झेड/YAac

"मराठी स्पेल चेक प्लस" हे एक्स्टिंशन इन्स्टॉल असले तर फक्त F9 दाबून आपण चुकीचे शब्द कसे निवडू शकतो ते ८ मे २०२२ च्या पोस्टमध्ये पाहिले. उदाहरणादाखल एक कथा लिहून त्यातील चुकीचे शब्द निवडले F9 वापरून.

देनं : देणं, दे, देईन, देऊन, देऊ, खेन, देठ, दफन, देश, जेन, फेन, केन, जेन, हेन
पाउल : पाऊल, पाल,
मीठीमध्ये : मिठीमध्ये, मठीमध्ये, आर्मीमध्ये, वाय्‌मध्ये
मीनिटात : मिनिटात, मॅटर्निटी
होवून : होऊन, खोवून, भोवून, होमरण

चुका तर समजल्या. पण आता या सुधारणा मूळ लेखात करायला हव्यात. यातील एकच शब्द अनेक वेळा आलेला असू शकतो. तो वेळही वाचवायचा असेल तर हे शब्द अ‍ॅटो-करेक्टमध्ये टाकावे लागतील. तसे केले की जिथे जिथे "पाउल" असे चुकीचे लिहिलेले असेल तिथे तिथे "पाऊल" असे बदलून मिळेल. त्यासाठी shift + F9 हा शॉर्टकट आहे. तो वापरला की चुकीचा शब्द व त्यापुढील यादीतील पहिला शब्द अ‍ॅटोकरेक्टमध्ये जमा होईल. आता "tools – autocorrect – apply" हा पर्याय वापरला की मूळ लेखातील या सर्व चुका आपोआप दुरुस्त होतील. थोडक्यात सांगायचे तर प्रथम F9 आणि त्यानंतर shift + F9 हे दोन शॉर्टकट वापरून आपण आपला खूप वेळ वाचवू शकतो.

मराठी शब्द स्पेल चेक करण्यासाठी मी एक (एन्ड्रॉइड) अ‍ॅप बनविले आहे. हे मोफत अ‍ॅप गूगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करता येईल.

https://play.google.com/store/apps/details?id=com.myapp.marathispellchec...

एखादा शब्द नक्की कसा लिहायचा याची शंका असेल तर तो यात टाईप करता येईल. उदा. 'नागरीक' किंवा 'अनुषंगीक' असे टाईप केले तर 'नागरिक' अथवा 'आनुषंगिक' असे योग्य शब्द सुचविले जात आहेत. 'पोलीसाचा' असे टाईप केले तर 'पोलिसाचा' असा योग्य शब्द मिळत आहे. डिक्शनरीत पाहणे हा एक पर्याय आहे पण त्यात सर्व सामान्यरूपे छापणे शक्य नसते. मोबाईल अ‍ॅपमध्ये अशी काही शब्दमर्यादा नाही. शब्द योग्य असेल तर "no mistake" असा संदेश येईल. जर अपेक्षित शब्द पर्याय दिसला नाही तर मला तसे कळवा म्हणजे सुधारणा करता येईल.

बरेच मराठी शब्द हे संस्कृतातून आलेले असल्यामुळे यात संधी करून पाहण्याची देखील सोय आहे. उदा. "हिम आलय" असे लिहिले तर "हिमालय" असा शब्द मिळतो. तर "कर्मणि एव अधिकारः ते" याला "कर्मण्येवाधिकारस्ते" असा प्रतिसाद मिळतो.

अ‍ॅप मोफत आहे हे वर लिहिले आहेच. पण कोणाला देणगी मूल्य देऊन वापरायचे असेल तर जिटहबवर स्पॉन्सर लिंक आहे!

कोणत्याही इमेजमधील मराठी मजकूर google lens या अ‍ॅपद्वारे वर्ड किंवा इतरत्र कॉपी-पेस्ट करता येतो. कसा ते या व्हिडिओमध्ये फार छान सांगितले आहे.

https://youtube.com/shorts/1xNNUJfNtmM?si=k_ZoplgUqEd5zY5N

गुगल लेन्समधून कॉपी केलेला संपूर्ण मराठी मजकूर marathi spell check या अ‍ॅपमध्ये पेस्ट करून स्पेल चेक घेता येतो. त्यामध्ये मूळ लेखातील शुद्धलेखनाच्या चुका आणि गुगल लेन्सने तो मजकूर वाचताना केलेल्या चुका अशा दोन्ही प्रकारच्या चुका दाखविल्या जातात. त्यांचा विचार करून वर्डमधील फाईल अधिक निर्दोष बनविता येईल. मजकूर जर खूपच मोठा (७-८ पानांहून अधिक) असेल तर दोन मिनिटांपेक्षा थोडा जास्त वेळ लागू शकतो.

प्ले स्टोअरवर marathi spell check असा शोध घेतला तर हे अ‍ॅप सहज मिळू शकते. पण कोणाला लिंक हवीच असेल तर

https://play.google.com/store/apps/details?id=com.myapp.marathispellchec...

ही सुविधा आवडली तर अ‍ॅप स्टोअरवर स्टार देऊन लाईक करा, शेअर करा आणि शक्य असल्यास स्पॉन्सर करा !

Pages