भिकार्‍यांना भिक देणे योग्य आहे का?

Submitted by छावा on 7 December, 2009 - 08:00

आजकाल शहरात रस्त्यांवर, मंदिरांच्या बाहेर भिकार्‍यांची मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुर्वी पाच्-दहा पैशाची भिक मागणारे आज एक रुपया ते पाच रुपये मागतात. चार-आठ आणे दिलेत तर ही मंडळी आपली इज्जत काढते.
काही जण पुण्य मिळवण्यासाठी तर कधी देवाच्या भितीने भिकार्‍यांना काहीना काही भिक्/दान देतात, तर काही लोक भिकार्‍याची कटकट आपल्या मागुन लवकर जावी म्हणुन का होईना पण भिक देतात.
या भिकार्‍यात धष्टपुष्ट, अपंग, कुष्ठरोगी, लहान मुले अशांचा भरणा असतो. मग देव देवतांचे फोटो गळ्यात लटकविले जातात. त्यांच्या भिक / दानाची रक्कम त्याच्या असहायतेनुसार ही वाढते. या पैश्या पैकी मोठा भाग भिकारी नशा पाणी व मजा करण्या साठी खर्ची करतात. यात भिकारी मुलेही मागे नाहीत.

मग भिकार्‍यांना भिक देणे योग्य आहे का? हा विचार मनात येतो.
याचा विचार करतांना खालिल मुद्दे समोर येतात-
यात पहिल्यांदा भिकार्‍यांचे वर्गिकरण करणे आवश्यक आहे.
अ) धष्ट्पुष्ट भिकारी
ब) म्हातारे भिकारी
क) बाल भिकारी
ड) अपंग भिकारी
इ) वेडे भिकारी
ई) व्हाईट कॉलर भिकारी.

अ) धष्ट्पुष्ट भिकारी :- आजकाल मजुरांचा प्रचंड तुटवडा असुन ही मंडळी भिक मागते. आणि आपण देतो. याची काम करण्याची द्यानतच नसते. अशांना सर्वांनी भिक देणे बंद केले पाहिजे. म्हण्जे त्याना जगण्यासाठी काम करावेच लागेल.

ब) म्हातारे भिकारी:- म्हातारा काम करु शकत नाही म्हणून त्यांची मुले त्या म्हातार्‍याला भिक मागुन कमाई करायला लावतात. जर खरोखर असहाय्य असतिल तर वृध्दाश्रमात त्यांना भरती होता येईल. पण असे खुप कमी असतात.

क) बाल भिकारी:- आई वडील बळजबरी आपल्या मुलाला भिक मागण्यास भाग पाडतात. लहान मुलांनी भिक मागितल्यावर कोणीही लवकर भिक देतो. अशा मुलांचे शिक्षण बंद होते. यामुळे ही मुले व्यसनी ही होतात. ते मोठे झाल्यावर भिक मिळत नाही आणि काम करण्याची द्यानत नाही. म्हणुन ही मंडळी गुन्हेगारी कडे वळतात. उदा. चोरी, हप्तावसुली, खुन व इतर अनेक.

ड) अपंग भिकारी:- अपंगाचा बाऊ करुन ही मंडळी भिक मागते. परंतु जेष्ठ समाजसेवक मा. बाबा आमटे नी हे आनंदवन अपंग आणि कुष्ठरोग्यांच्या उपचार आणि पुर्नवसनासाठी सुरु केले. आज किती तरी लोकांचा आधार हे आनंदवन झाले आहे. तेथे अपंगांना ही स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षित केले जाते.याच धर्तीवर काम करणार्‍या अनेक शासकिय-अशासकिय संस्था आहेत. असे असतांना बर्‍याच अपंग लोकांनी भिक मागण्याचा सोपा मार्ग पत्करला आहे. त्यानी ठरवले तर त्यांनाही स्वयंपुर्ण होता येईल. पण त्याना आता कष्ट करण्याचे जिवावर येते म्हणुन बाय चॉईस ते भिकारी झालेत.

इ) वेडे भिकारी:- यांचे प्रमाण नगण्य आहे. परंतु अशा लोकांना पोलिस, तहसिदार यांच्या मदतीने वेड्यांच्या इस्पितळात नेऊन चांगले आणि स्वयंपुर्ण बनवता येऊ शकते.

ई) व्हाईट कॉलर भिकारी:- नव्या जमाण्यात असेही भिकारी निर्माण झालेत. चांगले कपडे घालायचे आणि माझे पाकिट चोरीला गेले. मला इंटरव्ह्युव ला जायला आणि घरी जायला पैसे नाहीत. मला मदत करा. मी घरी गेल्यावर तुमचे पैसे तुमच्या पत्त्यावर MOने परत पाठविन. कृपया मदत करा. असे सांगणारे व्यवसाईक भिकारी ही निर्माण झाले आहेत.
अशांना तर पोलिसांच्या ताब्यातच दिले पाहिजे. हे भिक मागत नाहीत तर लोकांची फसवणुक करतात.

मग अशा भिक मागणार्‍यांना आपण भिक /दान देऊन चांगले काम करतो कि वाईट?
आपणच भिक देणे बंद केले तर भिकार्‍यांना जगण्या करिता काम करावेच लागेल ना.
म्हणुन, भिकार्‍यांना भिक देणे योग्य आहे का?
आपल्याला काय वाटते?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पैसे द्यावे (किंवा दुसरं काहीही) न द्यावे हा ज्याचा त्याचा ?

[भिकारी असा उल्लेख न करता गरीब असा केला तर बरं.]

पुजा सान्गणारे भट- हि कॅटेगिरी यात नाही का? Sad भिकार्‍यापेक्षा कमी वाईट अवस्था नाहिये. लहाणपणी तिर्थरूपान्नी पोटर्‍या सोलवटून एवढे शुद्ध भाषेतले श्लोक अन मन्त्रपठण कशासाठि शिकविले असा प्रश्न आता पडतो. थन्डी, उन्हा-वार्‍यात बसून दोन तासभर पुजा सान्गावि, तर खोळीत काय- पसाभर तान्दूळ. सत्यनारायणापुढचे किडूकमिडूक पैसे. पुन्हा यात फाटलेल्या, चुरगाळलेल्या, न चालणार्‍या नोटा अन नाणी. शिवाय खवट काजू बदाम खारका, किडलेल्या सुपार्‍या. खराब होण्याच्या मार्गावर आलेली फळे. Sad सरळच म्हणा ना की आम्ही भिकारी म्हणोन. तोन्डाने बोलून दक्षिणा मागितली, तर म्हणतात बोम्ब्या भट माजला. Uhoh पण बोम्बीने सान्गितल्याप्रमाणे लाज गुन्डाळून ठेवतो मागताना. म्हणू देत भिकारी. बोम्बीला दोन पोरे झालीहेत, त्यान्ची अशी परवड नको.

.

स्त्रीया, अगदी लहान मुले, गाणारे, हिजडे, अपंग,वृद्ध .... अशा लोकाना 'मदत'देतो... तेही जगले पाहिजेत... कुणी सांगावे कालांतराने त्यांचे नातेवाईक त्याना भेटतीलही...

आजकाल मजुरांचा प्रचंड तुटवडा असुन ही मंडळी भिक मागते. आणि आपण देतो. याची काम करण्याची द्यानतच नसते. अशांना सर्वांनी भिक देणे बंद केले पाहिजे. म्हण्जे त्याना जगण्यासाठी काम करावेच लागेल.
>>>>>>>>>>>>>>>
अगदी बरोबर...

लहान मुलांना नेहमी देते. पुढे जाऊच शकत नाही. कुणीच वाली नसतो त्यांना. हात पसरलेली, तोंडे वेंगाडलेली लहान मुले यापेक्षा करूण दृष्य जगाच्या पाठीवर कुठलेही नाही. Sad

दुर्दैवाने या भावनेने आपण दिलेले पैसे त्या मुलांच्या पोटी जात नाहीत. इतरच कुणाच्या तरी घशात जातं ते.
त्यामुळे वेळ असेल तर भीक मागणार्‍या लहान मुलांना जवळपासच्या खायच्या स्टॉलवर खायला घालणे बरे. किंवा आपल्याकडे पाण्याची भरलेली बाटली असेल तर ती देऊन टाकणे तरी निदान.

खूपच अपंग किंवा अतीवृद्ध भिकार्‍यांना देते.

भिकारी असा उल्लेख न करता गरीब असा केला तर बरं.]>>>> असहमत. गरिबी असली म्हणजे माणूस लाचार होतोच असं नाही. कष्ट करुन मानाने जगता येते गरीब असलं तरी. भिक मागणे ही वृत्ती आहे. भिक्षापात्र अवलंबिणे, जळो जिणे लाजिरवाणे !

जे भरपूर कष्ट करतात आणि तरीही त्यांना जगण्यापुरेसं मिळत नाही, त्याच धडधाकट व्यक्तींना मदत करावी, ते भिकारी नाहीत.

- दारावर येणार्‍या मागणार्‍या बायका. त्यांना चार दोन रुपये द्यावे तर त्यांची अपेक्षा मुलींचे कपडे द्यावे. बर कपडे एक दोन द्यावे तर त्यांना साडीचा लोभ सुटतो. अशा बायकाचे काय ? जे मिळेल त्यामध्ये त्या समाधानी नसतात. बर वयाने देखिल जास्त नसतात. मजूरकाम किंवा धुणी भांडी तरी करू शकतात.पण त्या भीक मागतात. अशांना तर काहिच देऊ नये असे वाटते.

- आमच्याकडे सकाळी सात - आठ च्या सुमारास शिळे पाके मागणार्‍या लहान मुली/मुले येतात. त्यांच्या कडे जमा झालेले अन्न पहावे तर ते एखाद्या कुटुंबाला ७-८ दिवस पुरेल एवढे असते. तरी त्या मुली/मुले मागतच फिरतात. प्राथमिक शाळा सर्वांसाठी मोफत असून व तिथे गरम गरम अन्न (त्यामुळे का होईना शाळेची गोडी लागावी व कोणी लहान मुले उपाशी राहू नये- सरकारचा एक स्तुत्य उपक्रम) पोटभर मिळत असून देखिल ती मुले शाळेत जात नाहीत. चकाट्या मारत गावभर हिंडतात.

नीधप, अग खायला देतो म्हटल कि नको म्हणणारी मुलहि भेटलीत, त्यांना भीक म्हणुन पैसेच हवे असतात. बहुतेक मुले व्यसनांच्या अधीन झालेले असतात, नको त्या सवयी लागलेल्या असतात, त्या साठि त्यांना पैसेच लागतात. खरतर गरजु मुले खुपच कमी असतात. Sad
पण कलाकारांना मीहि डावलत नाहि. एखादा चांगला गाणारा, वाद्य वजवणारा, चित्रे काढणारा ह्यांना मदत केल्याशिवाय नाहि वाटत पुढे जावस. Happy

धडधाकट बाया आणि पुरूषांना काहीच देऊ नये या मताची मी आहे.
लहान मूल दाखवत भीक मागणार्‍यांनाही मी काही देत नाही. मूल जन्माला घालायची गरज/ अधिकारच काय जर भीक मागितल्याशिवाय एक कण त्या मुलाच्या पोटात तुम्ही घालू शकत नाही तर?
मजा तुमची, मूल तुमचं आणि आम्ही काय म्हणून आमच्या कष्टाचा पैसा द्यायचा?
रस्त्यावरच्या सगळ्या भिकारणींना मूल होणार नाही अशी व्यवस्था कायद्याने करावी असंही कधी कधी मनात येतं. ते तितकसं बरोबर नाही हे माहीत असलं तरी मनात येतंच...

कायद्याने तर नी, घरटी जास्तीत जास्त दोनच मुले होऊ द्यावीत असं करावं असंही मला वाटतं. गरीबी आणि बेकारीचे प्रश्न बरेचदा या लोकसंख्येच्या महापुरातूनही उद्भवतात. नाहीतर एक दिवस चायनासारखं करावं लागेल.

कायद्याने तर नी, घरटी जास्तीत जास्त दोनच मुले होऊ द्यावीत असं करावं असंही मला वाटतं.
- अग भाग्यश्री, ते आपल्याकडे होणे नाहि, बहुतांशी राजकारण्यांना आणि सरकारी कर्मचार्‍यांना दोन पेक्षा अधिक मुले असतात.:स्मित:

मी देते. घरी जेवायचे पॅकेट घेउन जाताना बाया पोरे आली तर देते. कोणाचेही एका वेळचे जेवण (अगदी वडापाव तरी) निभेल एवढे देते. शुक्रवारी स्त्रीला, शनीवारी म्हातार्‍याला नक्की देते. लहान मुलांना पण. काही मोठे काम झाले तर, अ‍ॅक्सिडेन्ट आजारातुन उठले तर देवाने जीव वाचविला म्हणून क्रुतज्ञतेपोटी देते. आज आपण त्यांच्या जागी असतो तर ? या भावनेने. माझ्याकडे थोडे पैसे आहेत म्हणून मी आज रोड्वर नाही नाहीतर ती देखील माझ्यासारखीच आहेत. सर्व देवाची मुले आहेत. त्यांच्या वाइट नशीबामुळे आज त्यान्च्यावर ही वेळ आली आहे. अश्या भावनेतून. पाणी, जास्तीचे अन्न - भारतीय मिठाइचे प्याकेट नक्की., कपडे.

देवळासमोरील लोकांना देत नाही.

अ) धष्ट्पुष्ट भिकारी, क) बाल भिकारी, ड) अपंग भिकारी, ई) व्हाईट कॉलर भिकारी.

वरील वर्गातल्या भिका-यांना मी अजिबात भिक घालत नाही Happy माझ्याकडे खायच्या वस्तु असतील तर त्या बाल भिका-यांना देते, पण कधीकधी त्यांना त्या नको असतात असाही अनुभव आलाय. अपंग भिकारी खरोखर अपंग असेल तर खायचे देते. पैसे मात्र अजिबात कोणालाच देत नाही.

ब) म्हातारे भिकारी - यांना मुद्दाम खायचे विकत घेऊन देते. पण परत पैसे देत नाही.

इ) वेडे भिकारी - मला यांची जराशी भितीच वाटते, त्यामुळे असले सोंग रस्त्यात दिसले की मी सरळ रस्ता क्रॉस करते Happy

व्हाईट कॉलर भिका-यांसारखेच ब्लॅक कॉलर भिकारीही खुप झालेत नव्या मुंबईत. चांगला धडधाकट तिशीतला नवरा, त्याची तशीच बायको, कडेवर एक झोपलेले मुल आणि हातात एक पिशवी, त्यात कपडे वगैरे. दिसायला निम्न मध्यमवर्गिय. आधी ताई, तुम्ही मराठी बोलता का अशी चौकशी आणि मग, 'मुंबईत आलो, आता परत गावी जायचेय, पैसे द्या' म्हणुन मागतात. मी एकदोनदा १० रु काढुन दिले. पण आता असले लोक सगळ्याच नाक्यांवर दिसायला लागलेत.

त्यादिवशी रात्री मी जेवण पार्सल घेउन परतत होते तर एक म्हातारा, म्हातारी असेच पुढे आले आणि जेवण मागायला लागले. सरळ पार्सल हवाली केलं त्यांच्या. एका माणसांचच होतं जेवण :(. तेवढ्यात एक दुसरे गृहस्थ बाईकवरुन आले आणि अजुन एक पार्सल त्यांना देऊन गेले. दुस-या दिवशी पाहिले तर म्हातारबाबा शेजारच्या वडापाव गाडीवर प्लेट्स विसळण्याचे काम करत होते, आजीबाई बाजुला बसुन पाहात होत्या. मनात आले, परिस्थिती माणसाला काय काय करायला लावते.....

भीक मागून त्या पैशातून फ्लॅट घेतलेले उदाहरण मुंबईतच आहे. संपूर्ण कुटुंब भीक मागतं. आणि त्यांचा टू बी एच के चा फ्लॅट आहे मुंबईत.
दिवसाला दरडोई ५० रूपयाची भीक तरी मिळत असेल असं समजलं तरी महिना १५०० चा पगार झाला. तोही बिना टॅक्सचा. लाइफस्टाइल एक्स्पेन्सेस काही नाहीत. एका कुटुंबातले चार जण भीक मागत असतील तर महिन्याला ६००० रूपये मिळतात त्यांना कमीतकमी. काहीही काम न करता.
हे खरंच मोठंच नशीब.
माफ करा पण धडधाकट असलेल्या कुणाही व्यक्तीला मुंबईत अगदी बेसिक पोटापाण्यापुरतंही काम मिळणार नाही यावर माझा विश्वास नाही. हा नशीबाचा भाग असं पण मी मानत नाही.
काम न करता फुकटात कमावण्याची वृत्ती असं मला वाटतं.
आणि अश्या लोकांना भीक देऊन आपण ही वृत्ती पोसतो.

फ्लॅटवाल्या उदाहरणात. रोज त्यांना १ रूपयाची भीक घालणार्‍याचंही स्वतःचं घर नसेल मुंबईत.

मी फक्त लहान मुलांना, ते ही खाण्याचे पदार्थ देतो.
नियमित पणे दारावर "शिळे पाके " गोळा करण्या साठी काही येतात. आन्न टाकून देण्या ऐवजी कुणाच्या तरी पोटात जाईल या भावनेने आपण शिल्लक अन्न देतो. या बद्दल मझा अनुभव चांगला नाही. हे लोक भरमसाठ अन्न रोज गोळा करतात. त्यातील चपात्या, भाकरी सारखे पदार्थ उन्हात कडक वाळवतात. त्याचे पीठ करून विकतात. हे पीठ विकत घेणारे समाज कंटक त्या पासून boby नावाचा तळून खाण्याचा पदार्थ बनऊन आपल्यालाच विकतात.

भीक मागून त्या पैशातून फ्लॅट घेतलेले उदाहरण मुंबईतच आहे.

मीही वाचलंय.... म्हणुनच मी पैशांची भीक कधीही घालत नाही.

गाणार्‍यांना/इतर कलाकारी करून पैसे मागणार्‍यान्ना मी पण देते पैसे.
धडधाकट लोकांना अजिबात देत नाही, काही लहान मुलांना मात्र दिली जाते .
पण कधी कधी भिकार्‍यांच्या टोळीतली लहान पोरही अतिशय उर्मट असतात , त्यांची दया वगैरे येत नाही, राग च येतो, भीक पण दम दिल्या सारखी गुर्मीत मागतात!
अरोरा टॉवर्स मधे ऑफिस होतं तेंव्हा अशी वात्रट लहान मुल् फार भेटायची मेन स्ट्रीट वर !
भिक न देणार्‍यांना त्रास देत मागेमागे जात रहायची, पैसे नाही दिले तर पर्स ओढायची अक्षरशः, अशा मुलांना कितीही झापलं तरी काssही वाटायचं नाही त्यांना !
काही लहान मुलं मार्झोरिन बाहेर उभी असायची, बर्गर किंव आइस क्रीम मागायची, कधी तरी दया येउन देण ठिक आहे पण ही मुलं कायम तिथेच पडिक आणि पुन्हा तेच, धमकी दिल्या सारखं खायला मागायच् येणार्‍या लोकांना !
एकदा मी आणि माझी मैत्रीण सॉफ्टी खात होतो, २ टार्गट लहान पोर आली, आगदीच खाताना समोर आली म्हणून काहीतरी पैसे दिले तर म्हणे आम्हाला म्हणे ५० रु प्रत्येकी द्या , नाही म्हंटल् तर म्हणे मग सॉफ्टी घेउन द्या , वेळ नाही म्हंटल तर म्हणे "जो आप खा रहे हो, वो दे दो" कमालीची निर्लज्ज असतात ही लहान मुलं !
लहन मुलाला घेउन भीक मागणार्‍या बायकांचा, धडधाकट भिकारी आणि व्हाइट कॉलर भिकार्‍यांचा फार राग येतो.
व्हाइट कॉलर भिकारी यु.एस मधे पण आजकाल जरा जास्तच दिसतात.
शॉपिंग काँप्लेक्स च्या पार्किंग एरीया मधे हमखास !
पार्किंग एरीया मधे 'पैसे सम्पलेत, २०$ द्या' टाइप चे सभ्यतेचे ढोंग करणारे भिकारी तर नेहेमीचेच पण परवा मी गाडीत पेट्रोल भरत होते तर एक बाई आली म्हणे माझी पर्स घरी राहिलीये आणि पेट्रोल भरणं अर्जंट आहे, माझी पण गाडी आणते पेट्रोल भरायला, तुझं क्रेडिट कार्ड स्वाइप कर माझ्या साठी..काहीही ! Uhoh

सर्वात राग येतो ते फाटके (ऑलमोस्ट नाही मधे मोडणारे) कपडेवाल्या भीक मागणार्‍यांचा.. अशा बायकांना आवर्जून सगळ्या बायका काही तरी पांघरायला देतात पण त्यांना कितीही कपडे द्या पुन्हा त्या दुसर्‍या दिवशी त्याच अवस्थेत भीक मागताना दिसतात .. !:राग:

आपल्या सर्व बहुमुल्य प्रतिक्रियां बद्दल धन्यवाद! Happy

मी गाणार्‍यांना देते. कलाकाराला उपाशी राहू द्यायचं नाही हे माझं तत्व म्हणून.>>>>
नीधप अनुमोदन.
पण ती भिक नव्हे. ते त्यांच्या कलेला दिलेले बक्षिस आहे. मग तो गाणारा असो वा वाद्य वाजवणारा, अगर तो डोंबारी असो, ते भिकारी नाहीत. ते आपल्या कलेचे प्रदर्शन करुन पैसे कमावतात.
माझ्या घरी दर रविवारी भारुड, पोवाडा, गित म्हणणारा एक म्हातारे बुवा येतात. मी त्याना दरवेळेस दक्षिणा देतोच. तसेच नंदी बैल वाला, वासुदेव यांना आवर्जुन दक्षिणा देतो. कारण त्यांच्या मुळेच आपली जुनी संस्कृती टिकुन आहे.

स्त्रीया, अगदी लहान मुले, गाणारे, हिजडे, अपंग,वृद्ध .... अशा लोकाना 'मदत'देतो... तेही जगले पाहिजेत...>>>>>>>>>>>
काम न करता! आम्ही घाम गाळावा आणि यांना पोसावे. :फि
कुणी सांगावे कालांतराने त्यांचे नातेवाईक त्याना भेटतीलही...>>>>>>>
तुम्हाला असे वाटते का कि, या भिकार्‍यांचे या जगात कोणीच नाही?
जरा ट्रफिक सिग्नल सिनेमा पहा. सगळे गैसमज दुर होतील. खुप वास्तविक चित्रण केलय भिकार्‍यांचे आणि फुट्पाथ वासियांचे.

मामी,
आज आपण त्यांच्या जागी असतो तर ?>>>>>>>>>>
काम करुन पोट भरले असते. आजकाल कामगांचा तुटवडा आहे. त्यामुळे काम करणारा उपाशी मरणार नाही. पण भिकारी मंडळी आळशी झालीत. काम करायची द्यानत नाही. आणि मोलमजुरी करणार्‍यांपेक्षा जास्त कमाई होते यांची. मग कशाला काम करतील?

लहान मुलांना भिक तर अजिबात देवु नये. कारण मागितल्यावर मिळाले कि असच मागुन खाण्याची सवय बळावते अन अगदि लहानपणापासुन मागण्याची सवय आपण त्यांना लावतो मग आहेच आयुष्यभर मागुन खावुन जगणं. काम करणारच नाहित हि मुल कधी. भिक मागणारी हाती पायी धडधाकट असतात काम करणार्‍याला हजार काम असतात. शहरात असले तर रस्त्याची काम, इतकी सारी बांधकाम होत असतात तिथे काम मिळु शकत, कुणाची गाडी धुवुन देण्याची कामं.. कितीतरी असतील कामं का करत नाहित? शेवटी मागुन खायची सवयच लागलेली असते ना?
मी काम करते तिथल्या आमच्या बिल्डींगखाली एक बाई तिच्या छोट्या मुलाला घेवुन आली होती.. मुलगा अगदि तेव्हा लहान होता अन आता काम करण्याइतपत मोठा झालाय. फुटपाथवरच त्या मुलाला तिने वाढवल. काम कधीच कुणाचं करताना ती दिसली नाहि पण याच्यात्याच्याकडे पैसे, चहा मागताना पाहिलय तिला मी. धडधाकट होती काम करायच ना? पण नाहि मागुन खायची सवय काम कुणाला हवीत?
कितीतरी वृध्दांना मी कष्ट करुन पैसे कमावताना पाहिलय.. गाडीमध्ये एक म्हातारा येतो.. म्हणतो वडापावसाठी कुणी पैसे द्या ना.. असतो पिवुन टाईट.. म्हणजे वडापावच्या नावावर याची दारु पिण्याची हौस लोकांनी भागवायची.

लहान मुलांना भिक तर अजिबात देवु नये. कारण मागितल्यावर मिळाले कि असच मागुन खाण्याची सवय बळावते >>>>>>>>>>>
गाडीमध्ये एक म्हातारा येतो.. म्हणतो वडापावसाठी कुणी पैसे द्या ना.. असतो पिवुन टाईट.. म्हणजे वडापावच्या नावावर याची दारु पिण्याची हौस लोकांनी भागवायची.>>>>>>>
अगदि मान्य. Happy

.

>>दुर्दैवाने या भावनेने आपण दिलेले पैसे त्या मुलांच्या पोटी जात नाहीत. इतरच कुणाच्या तरी घशात जातं ते.त्यामुळे वेळ असेल तर भीक मागणार्‍या लहान मुलांना जवळपासच्या खायच्या स्टॉलवर खायला घालणे बरे. किंवा आपल्याकडे पाण्याची भरलेली बाटली असेल तर ती देऊन टाकणे तरी निदान.

मान्य!

>>बहुतेक मुले व्यसनांच्या अधीन झालेले असतात, नको त्या सवयी लागलेल्या असतात, त्या साठि त्यांना पैसेच लागतात. खरतर गरजु मुले खुपच कमी असतात.

ह्याच्याइतका मोठ्ठा विनोद मी कित्येक वर्षात ऐकला नव्हता. Proud
तुम्हाला काय वाटतं? ही सगळी मुले शाळेत जायला नको, काम करायला नको म्हणून भीक मागतात? असेच त्यांना ऐश करण्यासाठी पैसे हवे म्हणून भीक लागतात? भीक मागणे हा सगळ्यांनीच सुखासुखी निवडलेला पर्याय आहे? चूक.
ज्या सुरक्षित चौकटीत आपण जगतो तिथे बसून असा विचार करणं खूप सोपं आहे. मुले पळवून आणून भीकेला लावणे हे केव्हढे मोठे रॅकेट आहे याची कल्पनासुद्धा करता येणार नाही. ही अजाण, निष्पाप मुलं त्यांचा काहीही अपराध नसताना हे ओंगळवाणं जगणं जगायला भाग पाडली जातात. त्याच समाजाचा आपण भाग आहोत ह्याची खरतर आपल्याला लाज वाटली पाहिजे. मला वाटते. खूप अपराधी वाटतं. कितीही देणग्या दिल्या आणि कितीही फंड रेझिंगचे कार्यक्रम केले तरी ती बोच कमीच होत नाही. आणखी केलं पाहिजे, आणखी करू शकतो पण तेव्हढं केलं जात नाही ही जाणिव विंचवासारखी नांगी मारते.
काही आईवडिल लावतही असतील आपल्या मुलांना हे घृणास्पद काम करायला पण त्याचे प्रमाण ह्या पळवून आणलेल्या मुलांच्या तुलनेत नगण्य आहे. सर्वांना त्याच मापदंडाने तोलणं योग्य नव्हे.
ही मुलं ड्रग्स का करतात माहित आहे? अवचटांचे लेख वाचा म्हणजे उत्तर मिळेल. पोटाची खळगी भरायला जेंव्हा अन्नाचा तुकडाही मिळत नाहीना तेंव्हा ७-८ वर्षापासूनची ही छोटी मुलं मिळेल त्या साधनाने (बूट पॉलिश, आयोडेक्स आणि इतर अश्याच चीप आणि हानीकारक गोष्टींनी) नशा मिळवण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून पोटाची आग जाणवणार नाही. किती सोपं आहे हे म्हणणं की त्यांना व्यसनांसाठी पैसेच लागतात. Sad
किती चिमुकले जीव असतात ते! त्यांना काय खायला नको असणार आहे तुम्ही दिल्यावर? पण ते पैसे मागतात कारण त्यांना माहित असतं पैसे मिळवले नाही तर नंतर फटके पडणार आहेत. कुणाला सांगणार? Sad
म्हणून समतोल सारख्या संस्थांची गरज आहे. बुडत्याला काडीचा आधार म्हणतात तशी. कारण ते तरी कुठे कुठे पुरे पडणार? आपल्यासारख्या लोकांनी त्यांना जमेल तशी पैशाची मदत केली तर त्यांना अजून बळ मिळेल.

>>लहान मूल दाखवत भीक मागणार्‍यांनाही मी काही देत नाही. मूल जन्माला घालायची गरज/ अधिकारच काय जर भीक मागितल्याशिवाय एक कण त्या मुलाच्या पोटात तुम्ही घालू शकत नाही तर?
मजा तुमची, मूल तुमचं आणि आम्ही काय म्हणून आमच्या कष्टाचा पैसा द्यायचा

ही मुलं बर्‍याचदा त्या बायकांची नसतातच. हॉस्पिटलमधून इ. जी लहान बाळं पळवली जातात ती ह्या कामाला लावली जातात. बर्‍याचदा त्यांनी रडावं (म्हणजे अजून भीक मिळेल) ह्यासाठी जे अघोरी प्रकार केले जातात त्याचा तर उल्लेखसुद्धा करवत नाही. Sad

एक उदाहरण आठवलं. माझ्या मैत्रिणीच्या नागपूरातल्या घराशेजारच्या बंगल्यातला मुलगा ५-६ वर्षाचा असताना कुणीतरी पळवून नेला. त्यानंतर काही वर्षांनी एक १०-११ वर्षाचा आंधळा मुलगा त्यांच्याच घरासमोर भीक मागताना त्यांना दिसला. बाहेर येऊन पाहिले तर तो त्यांचाच मुलगा होता. त्याचे दोन्ही डोळे गेलेले होते. आतडं पिळवटून टाकणारी ही घटना देव न करो पण कुणा आपल्या ओळखीच्या व्यक्तीत झाली असती तर?:(

मुंबईसारख्या महानगरांमध्ये अनाथ लहान मुलांचे हाल अक्षरशः कुत्राही खाणार नाही अशी परिस्थिती आहे. आपल्याला हे माहित असतं आणि तरीही आपण काहीही करू शकत नाही. जे घडतं ते अनेक सेन्सिबल माणसांना ठाऊक असतं आणि तरीही ते घडण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. हे अक्षम्य आहे.

बहुतांशी राजकारण्यांना आणि सरकारी कर्मचार्‍यांना दोन पेक्षा अधिक मुले असतात.

>>>

प्रतिभा Angry

जबानको लगाम दो...

यात खरोखर दयनीय क्लास म्हनजे म्हातार्‍या वेश्या. त्यांचा 'उपयोग' सम्पल्यावर त्यांची मालकीन त्याना रस्त्यावर फेकून देते. शिक्षण तर राहूद्यात जगण्याचे कोणतेही स्किल अंगी नाही. त्यामुळे काही काम करून जगता येत नाही. शरीर असाध्य विकारानी पोखरलेले. पुनर्वसनाची शक्यताच नाही. या परिस्ठितीत भिके शिवाय काहीच पर्याय नाही.....

अश्विनि मलाहि अगदि हेच म्हणायच होत, तु सांगितलेल उदाहरण खरोखरच आतड पिळवटुन टाकणार आहे. मुळात लहान मुलांनि स्वतः काम करुन पोट भरावे अशि अपेक्षा करणे मला तरि पटत नाहि, अगदि कायद्याने नाहि पण साधारण समज येइल त्या वयापर्यंत (१६/१७) मुलांना काम करायला लागु नये अस मला वाटत नाहितर ती 'बालमजुरि' झालि. पाश्चात्य देशात लहान मुले सुटित/ फावल्या वेळात स्वतःच्या पॉकेट्मनि साठि काम करतात, पण शाळा, अभ्यास, खेळ सांभाळुन स्वतःच्या मजेसाठि (गरजेसाठि नाहि त्या आई वडिल पुरवतात) काम करण वेगळ आणि आठवड्याचे सातहि दिवस उरस्फोड करुन किंवा ती करण्याचि संधि न मिळाल्यामुळे उपाशि रहायला लागण वेगळ. ह्याच साठि 'सुपंथ' ची स्थापना केलि पण तरिहि आपण खुप कमि पडतोय हि जाणिव नेहमि अस्वस्थ करते.

Pages