50 वर्षांची चिरतरुण ‘राजधानी’

Submitted by पराग१२२६३ on 15 May, 2022 - 04:59

मुंबईहून दिल्लीला रेल्वेने जाण्या-येण्यासाठी आजही पहिली पसंती असलेली 12951/52 राजधानी एक्सप्रेस येत्या 17 मेला 50 वर्षांची होत आहे. आज ही रेल्वेगाडी हायटेक झाली असली तरी तिच्यात येत्या काळात अजूनही सुधारणा होत जाणार आहेत.

विविध राज्यांच्या राजधान्या देशाच्या राजधानीशी जलद आणि आरामदायक रेल्वेसेवेने जोडण्यासाठी राजधानी एक्सप्रेस ही संकल्पना आणली. त्यानुसार भारतातील पहिली राजधानी एक्सप्रेस सुरू झाली 1 मार्च 1969 ला नवी दिल्ली आणि हावड्यादरम्यान. संपूर्ण वातानुकुलित असलेल्या या वेगवान रेल्वेगाडीत विमानाप्रमाणे सेवा पुरवण्यात येत असल्याने पुढील काळात ही संकल्पना लोकप्रिय होत गेली. परिणामी विविध राज्यांच्या राजधान्यांपासून दिल्लीसाठी एकापाठोपाठ एक राजधानी एक्सप्रेस सुरू होत गेल्या. आज देशात 26 राजधानी एक्सप्रेस धावत आहेत. मुंबई आणि नवी दिल्लीदरम्यान धावणारी 12951/52 राजधानी त्यापैकीच एक.

मुंबई आणि नवी दिल्ली या देशातील सर्वांत मोठ्या शहरांना कमीतकमी वेळेत जोडणारी राजधानी एक्सप्रेस भारतीय रेल्वेची एक प्रतिष्ठीत गाडी आहे. 17 मे 1972 ला ही गाडी सुरू झाली. त्यावेळी ही आठवड्यातून दोनदा धावत असे. कालांतराने वाढत्या मागणीमुळे ही गाडी आठवड्यातून 3 दिवस, 4 दिवस, सहा दिवस असं करत करत रोजच धावू लागली. सुरुवातीला 151 डाऊन आणि 152 अप असा गाडी क्रमांक असलेल्या मुंबई राजधानीचा क्रमांक जानेवारी 1989 पासून 2951/2952 आणि 10 डिसेंबर 2010 पासून 12951/12952 असा झाला आहे.

काळानुरुप मुंबई राजधानी बदलत गेली आणि नवनव्या तंत्रज्ञानांचा स्वीकार करत गेली. त्यामुळे या गाडीकडे भारतीय रेल्वेच्या तांत्रिक प्रगतीचे प्रतीक म्हणूनही पाहिले जाऊ लागले. या गाडीचे गार्ड आणि चालक यांच्यादरम्यान दूरध्वनी संपर्क यंत्रणा सुरू करण्यात आली. त्यानंतर या यंत्रणेत सुधारणा करून त्याद्वारे प्रवाशांना STD/ISD दूरध्वनी सेवा उपलब्ध करून देण्यात आली. भारतीय रेल्वेवर चालत्या रेल्वेगाडीत अशा प्रकारची सेवा पहिल्यांदाच उपलब्ध झाली होती.

लोकप्रियता वाढल्यामुळे सुरुवातीची 8 डब्यांची मुंबई राजधानी 1984 पासून 18 डब्यांची झाली. पुढे मुंबई राजधानीला वातानुकुलित 3-टियर शयनयान डबाही जोडला जाऊ लागला. तोपर्यंत या गाडीत वातानुकुलित प्रथम श्रेणी, वातानुकुलित 2-टियर शयनयान आणि वातानुकुलित खुर्ची यान श्रेणी उपलब्ध होती.

नव्या शतकात मुंबई राजधानी अधिक आकर्षक स्वरुपात प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. तेव्हापासून जर्मनीच्या Linke Hofmann Busch (LHB) कंपनीच्या (पुढे Alstom कंपनी) सहकार्याने बनवण्यात आलेले अधिक वेगवान, अधिक आरामदायी आणि अधिक प्रवासी क्षमतेचे अत्याधुनिक, आकर्षक डबे मुंबई राजधानीला जोडले जाऊ लागले आहेत. या डब्यांबरोबर धावण्याचा पहिला मान मुंबई राजधानीलाच मिळाला होता. यावेळी राजधानी एक्सप्रेसच्या पारंपारिक रंगसंगतीमध्येही बदल झाला. LHB डब्यांमुळे या गाडीला तीनएवजी दोनच जनरेटर यान जोडण्याची गरज राहिली. आज मुंबई राजधानी 1 वातानुकुलित प्रथम श्रेणी, 1 हॉट बुफे कार, 5 वातानुकुलित 2-टियर शयनयान, 11 वातानुकुलित 3-टियर शयनयान, 2 सामान ब्रेक आणि जनरेटर यान आणि 1 पार्सल यान अशा 21 डब्यांसह धावत आहे.

नव्या डब्यांमुळे मुंबई राजधानीचा वेग वाढण्यासही मदत झाली. आधीचा 19 तासांचा प्रवास आता 15 तास 40 मिनिटांपर्यंत कमी झाला आहे. आता या गाडीचा वेग वाढवण्याच्या हेतूने 1380 कि.मी. अंतराच्या मुंबई-दिल्ली लोहमार्गाचे आधुनिकीकरण सुरू आहे. येत्या काही वर्षांमध्ये ते काम पूर्ण झाल्यावर ही गाडी ताशी 160 कि.मी. वेगाने धावू शकेल. परिणामी तिचा प्रवासाचा कालावधी 12 तासांपर्यंत खाली येऊ शकेल. त्याचबरोबर भविष्यात ही गाडी ताशी 200 कि.मी. वेगाने चालवण्याचा विचार आहे. तसे झाल्यास हे अंतर मुंबई राजधानी 8 तासांमध्ये कापू शकेल. या प्रयत्नांच्या दिशेने एक पाऊल म्हणून मुंबई राजधानीच्या ताशी 145 कि.मी. वेगाच्या चाचण्या घेतल्या गेल्या आहेत. या गाडीचे संचालन अधिक गतिमान होण्याच्या दृष्टीने काही वर्षांपूर्वी ही गाडी ढकल-ओढ तंत्राद्वारे (Push-Pull) चालवण्यात आली होती.

प्रवाशांच्या मागणीमुळे मुंबई राजधानीला 2006 पासून सुरतमध्येही थांबा देण्यात आला. तोपर्यंत ती संपूर्ण प्रवासात तीनच थांबे घेत होती. सध्या ती बोरिवली, सुरत, बडोदा, रतलाम, नागदा, कोटा हे थांबे घेते. 19 जुलै 2021 पासून मुंबई राजधानीला अत्याधुनिक तेजस डबे जोडले जाऊ लागले आहेत. त्यामुळे ती आता मुंबई तेजस राजधानी बनली आहे. यावेळी राजधानीची रंगसंगती पुन्हा एकदा बदलली गेली आहे. या डब्यांमध्ये विविध प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत.

मुंबई राजधानीमध्ये सुरुवातीची बरीच वर्षे Public Announcement System वरून गाडी धावत असताना आसपासच्या परिसराची माहिती देण्यात येत असे. आज या यंत्रणेद्वारे प्रवाशांना soft music, बातम्या ऐकवल्या जात असून प्रवाशांसाठी उद्घोषणाही केल्या जातात. मध्यंतरी काही वर्षे मुंबई राजधानीच्या प्रवाशांना गाडीत वाचण्यासाठी रेलबंधू हे मासिक पुरवले जात असे.

अशा या मुंबई राजधानीची लोकप्रियता भविष्यातही टिकून राहणार आहे.

link
https://avateebhavatee.blogspot.com/2022/05/50.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती

राजधानी चा इतिहास सांगताना "द बर्निंग ट्रेन" चित्रपटाचा उल्लेख व्हायला हवा होता असे वाटते.

छान लेख
लहानपणी केळवा बीचला पिकनिकला जायचो तेव्हा परतताना सफाळेला संध्याकाळी राजधानीचा थरार अनुभवायचो.
प्रवास करायचा योग आजवर अला नाही त्या ट्रेनने. पण समोरून धडधड जाताना बघायलाही छान वाटायचे.

छान लेख. राजधानीतून एकदाच प्रवास केला आहे. पण त्यात इतकं मस्त काय काय खायला देतात, ते पण इतक्या वेळा, की पुन्हा कधी प्रवास करायचा चान्स मिळतो आहे याची वाट बघतो आहे. सहसा खूप आधीपासून प्लॅन करावा लागतो. बुकिंग खुले झाल्या झाल्या संपून जाते असा अनुभव आहे. एकदा माझे वेटींग लिस्ट मध्ये क्रमांक १ वर असलेले तिकीट ३ महिन्यानंतरही कन्फर्म किंवा आर ए सी झाले नव्हते.

छान लेख. ३० वर्षापुर्वी दिल्ली मुंबई राजधानी ने जाण्याचा योग आला होता. त्यावेळी फक्त AC-1, AC-2 आणि चेअर कार होती. दुरदर्शन वरील रात्रीच्या बातम्या रेकॉर्ड करुन सकाळी सात वाजता लावत असत . त्यावेळी ह्या गोष्टीचे आश्चर्य वाटले होते.

छान लेख! मी दोनदा राजधानीने प्रवास केलाय . एकदा बेंगळुरू व छत्तीसगड . छत्तीसगढवाली रायपूर राजधानी बिलासपूर पर्यंत जाते का

<< आता या गाडीचा वेग वाढवण्याच्या हेतूने 1380 कि.मी. अंतराच्या मुंबई-दिल्ली लोहमार्गाचे आधुनिकीकरण सुरू आहे. येत्या काही वर्षांमध्ये ते काम पूर्ण झाल्यावर ही गाडी ताशी 160 कि.मी. वेगाने धावू शकेल. परिणामी तिचा प्रवासाचा कालावधी 12 तासांपर्यंत खाली येऊ शकेल. त्याचबरोबर भविष्यात ही गाडी ताशी 200 कि.मी. वेगाने चालवण्याचा विचार आहे. तसे झाल्यास हे अंतर मुंबई राजधानी 8 तासांमध्ये कापू शकेल. या प्रयत्नांच्या दिशेने एक पाऊल म्हणून मुंबई राजधानीच्या ताशी 145 कि.मी. वेगाच्या चाचण्या घेतल्या गेल्या आहेत. या गाडीचे संचालन अधिक गतिमान होण्याच्या दृष्टीने काही वर्षांपूर्वी ही गाडी ढकल-ओढ तंत्राद्वारे (Push-Pull) चालवण्यात आली होती. >>

----- आपले आज असलेले railway infrastructure मधे सुधारणा करुन हे आव्हान पेलेल अशी अपेक्षा आहे. पण निव्वळ वेग आणि कमी वेळांत दिल्लीला पोहोचण्यापेक्षा इतर अनेक ठिकाणी चांगला दर्जा / सेवा देण्यासाठी प्रयत्न व्हावेत. ताशी १६० कि मी किंवा २०० कि मी वेग शक्य असला तरी त्याचे अनेक तोटे असणार आहेत.

राजधानी विक्रमी वेळांत दिल्लीला पोहोचेलही पण त्याच वेळी त्याची किंमत मार्गातल्या इतर ४० प्रवासी गाड्यांना आणि त्या गाड्यां मधून प्रवास करणार्‍यांना मोजावी लागणार नाही का? भरधाव धावणार्‍या राजधानीचा मार्ग मोकळा ठेवण्यासाठी पुढे धावणार्‍या प्रवासी गाडीला साईडिंगला (siding) थांबावे लागेल. आजही थांबावे लागतेच, पण गाडीचा वेग वाढवल्यामुळे पुढे मोकळे ठेवावे लागणारे अंतरही वाढवावे लागेल. हा भाग काही काळापुरता वापरला जाणार नाही. राजधानीसाठी खास वेगळा मार्ग ठेवणे परवडणारे नाही आहे.

संपुर्ण रेल्वे मार्ग दोन्ही बाजूंनी मोकळे आहेत.... जवळपासच्या नागरिक, प्राण्यांना इजा पोहोचण्याचे प्रमाण / शक्यता आज आहे त्यापेक्षा वाढणार आहे.

खर तर राजधानीत आता फक्त ३ Tier AC च परवडते. 2nd AC, First AC पेक्षा विमानचे तिकीट स्वस्त पडते (वेळेत काढले तर). नशिब आता जेवण optional ला टाकले आहे.
उदय यांचा मुद्दा पण योग्य आहे.

माझा या राजधानीनं प्रवास राहिला आहे. पण सात वर्षांपूर्वी ऑगस्ट क्रांती आणि दोन महिन्यांपूर्वी सीएसएमटी राजधानीनं प्रवास केला होता.

उदयजी, मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे, विशेषतः सायडिंगबाबतच्या. केवळ राजधानीच नाही, तर देशात ज्या 151 खासगी रेल्वेगाड्या सुरू करण्याचा प्रयत्न होत आहेत, त्यांच्यासाठीही इतर गाड्या अशाच बऱ्याच आधी सायडिंगला काढल्या जाणार आहेत. त्या नियमाचा फटका शताब्दी, दुरंतोलाही बसू शकेल.

फार छान माहिती! आत्ताच्या आत्ता राजधानीने प्रवास करावासा वाटतो आहे.
हल्ली रेल्वेचे तिकीट दर खूप महाग झाले आहेत/मागणी प्रमाणे दर वाढतात असे काही बदल झाले आहेत का? म्हणजे विमानाच्या तिकीटसारखे?
हल्ली किती दिवस आधी तिकीट बुक करता येते? राजधानीचे तिकीट किती दिवस आधी बुक करावे?

हल्ली राजधानी, शताब्दी आणि दुरंतो या गाड्यांचे दर जशा जागा कमी होत जातील, तसे वाढत जातात. 3-एसीच्या सामान्य तिकीट आणि शेवटचे तिकीट यांच्या दरातील फरक साधारण 850 रुपयांपर्यंत जातो. राजधानी, शताब्दी आणि दुरंतो हे ब्रँड प्रस्थापित आणि लोकप्रिय आहेत, म्हणूनच असे दर लागू करण्यात आलेले आहेत, असे वाटते. या गाड्यांचे दर जास्त होत असल्यामुळे ते प्रवासी विमानांकडे वळत आहेत. या गाड्यांचे तिकीट बुकींग 120 दिवस आधी करता येते. तरीही सुट्ट्यांचा कालावधी सोडला तर इतर वेळी काही दिवस आधीही या गाड्यांचे तिकीट सहज मिळू लागले आहे.

धन्यवाद पराग! विडिओ नक्की बघते. काल एका you tuber चा हिंदी भाषेतला विडिओ बघितला. तेव्हाच तुमची आठवण झाली होती.

मस्त लेख. बर्‍याच वर्षांपूर्वी गेलो होतो मुंबई-दिल्ली राजधानीने. मस्त अनुभव होता.

गाडीचा वेग वाढवल्यामुळे इतर गाड्यांवर कसा परिणाम होईल? जर हा बदल कायमस्वरूपी असेल तर तो अमलात आणताना रेल्वे इतर गाड्यांच्या वेळापत्रकात बद्ल करेल. सहसा गाड्या अडवल्या जातात त्या लेट असलेल्या. बाकी भारतात स्वस्त प्रवास ते लक्झरी सोयी असलेला प्रवास - दोन्हीची गरज आहे आणि डिमाण्डही. पुढे आधुनिक ब्रेकिंग सिस्टीम्स मुळे दोन गाड्यांत ठेवावे लागणारे अंतर कमी होत जाणार आहे.

बाकी रेल्वेचे मार्ग जास्त सुरक्षित करायला हवेत यात काही वाद नाही.

उलट मी तर म्हणेन की वेग फक्त राजधानीच का, सर्वच गाड्यांचा वाढवा. मुंबई-बंगलोर उद्यान एक्सप्रेस २४ तास लावते. आता हायवेज सुधारल्याने बसेस त्यापेक्षा लौकर जातात. गाड्या वाढवल्या व वेगवान केल्या तर त्यातून जाणारे वाढतील व हायवेज वरचे अपघातही कमी होतील. रेल्वेचे भाडेही सहसा इतर पर्यायांपेक्षा कमी असते. पुणे मुंबई तर वेगही वाढवायची गरज नाही. ताशी १०० च्या हिशेबाने सुद्धा गाडी अडीच तासात पोहोचू शकते - अगदी घाटातील अर्धा तास वेगळा धरून. सुरूवातीला डेक्कन क्वीन म्हणे २ तास ५० मिनिटात पोहोचायची.

<< गाडीचा वेग वाढवल्यामुळे इतर गाड्यांवर कसा परिणाम होईल? >>

------ राजधानीसाठी खास वेगळी लाईन नसणार आहे आणि इतर गाड्यांच्या तुलनेने, राजधानीला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. संपुर्ण मार्गात अनेक छोटी/ मोठी शहरे आहेत, आणि त्या ट्रॅकवर इतरही शेकडो गाड्या / मालगाड्या धावत आहेत. अर्थात तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याच ट्रॅकवर पुढे असलेली गाडी पटकन कळेल.

वेग जास्त, म्हणजे थांबण्यासाठी लागणारे अंतर, braking distance वाढणार. ताशी १६० धावणार्‍या गाडीला थांबण्यासाठी सहज १२००-१५०० मिटर अंतर लागणार. या अंतराच्या काही पट पुढचा ट्रॅक मोकळा ठेवावा लागेल. पुढचा ट्रॅक मोकळा ठेवण्यासाठी कमी महत्वाच्या गाड्यांना बाजूच्या ट्रॅकवर ( siding) घेणे आले. एक मोठी गाडी दिल्ली पर्यंत भरधाव वेगाने धावते, तेव्हा किती गाड्यांना siding मधे जावे लागते हे मला माहित नाही. गाड्यांची वर्दळ / संख्या बघितल्यावर सहज ३०-४० असाव्यात (जास्त किंवा कमी असतील).

दोन लहान स्टेशन अ, ब मधले अंतर २० कि मी आहे. छोटी गाडी (ताशी ९० किमी वेग) अ स्टेशनवर आलेली आहे आणि ब कडे जाण्याच्या तयारीत आहे. त्याच दिशेने राजधानी धावत आहे, आणि राजधानी अ पासून १५ कि मी आहे आणि ब च्या कडे ताशी १६० किमी वेगाने धावते आहे. अशावेळी छोट्या गाडीला अ स्टेशनवरच रखडावे लागेल कारण १५ मिनटांत तिला पुढच्या छोट्या स्टेशनवर पोहोचता येणार नाही. अ आणि ब ' लहान' स्टेशनच्या दरम्यान ताशी ९० किमी च्या गतीच्या लहान गाडीला सायडिंगला टाकायला जागा नाही.

गाड्यांचे वेळापत्रक ठरवतांना कमीत कमी गाड्यांना त्रास व्हावा हा मुद्दा विचारांत घेत असतीलच.... पण त्यालाही मानवी / तांत्रिक मर्यादा आहेत. शेकडो गाड्या आज धावत आहेत, आणि अनेकांना मोठ्या शहरांत सकाळी ६ वाजता पोहोचणारी गाडी हवीच असते.

चार लोकांना त्यांच्या गंतव्य स्थानावर कमी वेळेत पोहोचवतांना त्याचा फटका इतरांना बसणार नाही किंवा त्यांच्या गैरसोयी वाढणार नसतील तर गाडीचा वेग वाढवायला हरकत असायचे कारण नाही.

थोडे आवांतर, माल वाहणारी लांब लचक मालगाडीला राजधानीसाठी थांबवणार, मग दुरांतोसाठी... शताब्दी आणि इतरही मध्यम पल्ल्याच्या गाड्या आहेत.... शेवटी रेल्वेला मालवाहतूकी मधेच पैसा / नफा मिळतो.

उत्तम धागा, राजधानीच्या ५०वर्षांचे सेलिब्रेशन आवडले,

उदयजी, तुमचा रेल्वेज ऑपरेशन्स मधील आणि रेल ट्राफिक मॅनेजमेंटमधला अभ्यास दांडगा दिसतोय

उदय तुमचे लॉजिक बरोबर आहे पण आज असंख्य ठिकाणी एकापेक्षा जास्त ट्रॅक्स आहेत. तेथे एकाच दिशेने जाणार्‍या दोन गाड्या समांतर जाउ शकतात. एकीमुळे दुसरी रखडत नाही. यू ट्यूबवर तुम्हाला राजधानीचे "ओव्हरटेक्स" दिसतील बाजूच्या रूळावरून त्याच दिशेने जाणार्‍या गाड्यांना केलेले. दुसरे म्हणजे राजधानी फार क्वचित लेट असते. तिचे वेळापत्रक गृहीत धरून इतर गाड्यांचे थांबे ठरवत असतील, कारण तिला प्राधान्य असते. रेल्वेची अनेक अगम्य कारणे असतात गाड्या रखडण्याची. चांगली स्टेशनच्या एक किमीपर्यंत वेगात आणि वेळेत पोहोचलेली गाडी स्टेशन बाहेर अर्धा तास उभी राहते. तीही कल्याण, पुण्या सारख्या ७-८ प्लॅटफॉर्म असलेल्या स्टेशनजवळ. त्यात राजधानी मुळे साइडिंगला टाकण्याचा परिणाम इतका नसावा. इतर गाड्या ज्या सहसा लेट होतात व इतरांचे वेळापत्रक बिघडवतात त्यांचा परिणाम कितीतरी जास्त असेल.

आज पुणे मुंबई जेव्हा डेक्कन क्वीन जाते तेव्हा मुंबईत फास्ट लोकलच्या ट्रॅकवरून ती जाते. तेव्हा फास्ट लोकल्स च्या वेळापत्रकातच २० मिनीटे ओपन ठेवलेली असतात. पण स्लो लोकलच्या ट्रॅकवरून गाड्या जातच असतात. अर्थात आता पारसिक बोगद्याला वळसा घालून अजून एक लाइन वाढवली आहे.

मालगाड्यांबद्दल सहमत आहे. त्या अशाच मजल दरमजल करत जातात. एखाद्या स्टेशनात रात्रभर थांबतात. अनेकदा ज्या कंपन्या (बहुधा सरकारी) त्यातून माल पाठवतात त्या त्याबरोबर एखाद दुसरा कर्मचारी पाठवतात, गाडी बरोबर जायला - म्हणजे ती गाडी जशी जाइल तसे त्या त्या शहरात जायचे व लागले तर रात्री राहायचे. माझ्या एका मित्राचे वडील अनेकदा जात. मला तो जॉब लहानपणी एकदम इंटरेस्टिंग वाटत असे Happy

पण हे सगळे बदलत आहे. "डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर" हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू होत आहे. त्यावर दोन तीन छान माहिती देणार्‍या क्लिप्स आहेत.

नॅशनल जिओग्राफिक चा व्हिडीओ
https://www.youtube.com/watch?v=Z6dSYqH8cRo

अजून एक
https://www.youtube.com/watch?v=mSsRmbUnvK4

छान लेख.
मला वाटतं मुंबई-दिल्ली तीन राजधानी सध्या धावतात. दोन प.रे वरुन आणि एक म.रे वरुन.
उदय, तुमचे म्हणणे काही फारसे पटले नाही. वर्ग विरहीत समाज इ. वर जाणारे वाटले. वर्गभेद हे माणसाचे आणि निसर्गाचे व्यवच्छेदक लक्षण आहे हे आता मला पटलेले आहे. आणि जग फेअर नाही हे ही. असो.

मला वाटतं मुंबई-दिल्ली तीन राजधानी सध्या धावतात. दोन प.रे वरुन आणि एक म.रे वरुन. >>> हो. मूळची राजधानी व ऑगस्ट क्रांती राजधानी हे प.रे. व नवीन म.रे. ची. तोपर्यंत म.रे. च्या पूर्ण सिस्टीम मधे एकही राजधानी नव्हती.

त्यावरून आठवले. प.रे. च्या दोन्हीपैकी किमान एक किंवा दोन्ही मुंबईत परतताना दादरला थांबत नाहीत म्हणून आमच्या ऑफिस मधला एक जण वर्क ट्रिपवरून परतताना मुंबई सेण्ट्रल पर्यंत गेला. किमान त्याने ते कारण दिले. आणि अकाउंट्सच्या अ‍ॅप्रूव्हल प्रोसेस मधे काहीतरी क्लिष्ट प्रकार होता (बहुधा जवळच्या स्टेशन पर्यंत चालते वगैरे) त्यात ते अ‍ॅप्रूव्ह करणारा माणूस खूप प्रयत्न करून ते खरे आहे का याची माहिती काढत होता. फक्त दादर व मुंबई सेण्ट्रल च्या फरकात. मला तर भाड्यात फरक असेल असेच वाटले नव्हते. नंतर बहुधा रेल्वेने ब्लॉक्स तयार केले अंतरांचे आणि त्यात सगळीकडे सारखीच भाडी असे काहीतरी वाचले होते. पण अकाउण्ट्स जेव्हा या सूक्ष्म फरकाच्या अ‍ॅप्रूव्हलकरता माहिती काढत होते तेव्हा तेथील एक जण म्हणाला की अहो ते कन्सल्टण्ट्स पाहा. ते इथे नक्की काय करतात ते पाहा आणि त्यांना रोजचा रेट काय आहे ते पाहा - त्याच्या तुलनेत याचा विचार करा Happy

उदय, तुमचा मुद्दा बरोबर आहे. 160 च्या वेगानं जाताना braking distance वाढवावं लागणार आहे.

दरम्यान, आज मुंबईला जाऊन मुंबई सेंट्रलवर पार पडलेल्या राजधानीच्या 50 व्या वर्धापन समारंभात सहभागी होऊन आलो.

<< उदयजी, तुमचा रेल्वेज ऑपरेशन्स मधील आणि रेल ट्राफिक मॅनेजमेंटमधला अभ्यास दांडगा दिसतोय >>
------- धन्यवाद..... अभ्यास दांडगा वगैरे अजिबातच नाही. बालपण ट्रॅकच्या अगदी जवळच घालविले आणि थोडे फार निरीक्षण. Happy प्रवास करायला आवडतो.

<< पण आज असंख्य ठिकाणी एकापेक्षा जास्त ट्रॅक्स आहेत. तेथे एकाच दिशेने जाणार्‍या दोन गाड्या समांतर जाउ शकतात. एकीमुळे दुसरी रखडत नाही. >>
-------- एकापेक्षा जास्त म्हणजे चौपदरी? दोन अपचे मार्ग आणि दोन डाऊन साठी... १४०० किमी अंतरात किती किमी चा मार्ग चौपदरी आहे?
मुंबई आणि आसपासचे जाळे सहा / आठ पदरी असतील.... पण सर्वत्र अशी परिस्थिती नाही आहे.

<< चांगली स्टेशनच्या एक किमीपर्यंत वेगात आणि वेळेत पोहोचलेली गाडी स्टेशन बाहेर अर्धा तास उभी राहते. तीही कल्याण, पुण्या सारख्या ७-८ प्लॅटफॉर्म असलेल्या स्टेशनजवळ. >>
------- हे महत्वाचे आहे. गाड्यांची वर्दळ वाढली आणि भविष्यात आणखी वाढणारच आहे. प्लॅटफॉर्म भले चार सहा आठ असतील... प्लॅटफॉर्म वरुन बाहेर पडणारी गाडी, स्टेशन बाहेर पडून आणि मुख्य ट्रॅकवर (जो केवळ दोन पदरीच आहे) मिळेपर्यंत कुठे तरी हे ट्रॅक एकमेकांना cross होत असतात ( स्टेशन येण्या अगोदर दोनाचे सहा किंवा आठ आणि स्टेशन सोडतांना याच्या विरुद्ध ). संपुर्ण ट्रॅक मोकळा असेल तरच signaling system कडून clearance मिळणार. बॉटलनेक आहे.
प्लॅटफॉर्म मोकळा नसणे हे अजून कारण आहे. असो.

<< उदय, तुमचे म्हणणे काही फारसे पटले नाही. >>
------- अमितव Happy
मत नोंदवावे असे वाटले.

उदय ते बरोबर आहे. पण अनेकदा दुहेरी ट्रॅक वर विरूद्ध दिशेला त्याच वेळेला गाडी नसेल तर एक गाडी त्यावर आणून प्राधान्य असलेली गाडी पुढे काढतात. तेथेही दुसरी गाडी येणार असेल तर मात्र थांबवतात. येणारा व जाणारा ट्रॅक एकमेकांना असे अनेकदा मधे भेटत असतात, ते बहुधा याकरताच.

मुळात वेळापत्रक आखताना भारतीय रेल्वे तंत्रज्ञान व भारतीय जुगाड या दोन्हीचा फार हुशारीने वापर करते. कोणती गाडी केव्हा कोठे थांबणार आहे वगैरे मधे बरेच "बफर" असते. शिवाय बहुतांश गाड्यांना अधेमधे त्या रखडल्या तरी पुढे कॅच अप करायला स्लॉट्स दिलेले असतात, ते वापरून त्या शेवटच्या स्टेशनवर वेळेवर पोहोचू शकतात (**)

त्यामुळे वेळापत्रकानुसार धावणार्‍या गाड्या राजधानीमुळे रखडायची शक्यता खूप कमी असते. कारण वेळापत्रक आखताना त्या वेळा क्लिअर केलेल्या असतात. मग त्या रखडतात का? तर ट्रॅकची कामे/बिघाड, इंजिने वेळेवर न मिळणे किंवा नेहमीपेक्षा वेगळे व वेगळ्या क्षमतेचे इंजिन वापरणे यामुळे वेळापत्रक बिघडते. व अशी लेट झालेली गाडी मग दुसर्‍या गाडीच्या मार्गात येते. पण एकूण लेट होण्याची कारणे इतकी आहेत की एक राजधानीकरता त्यात फार काही फरक पडत नाही. दुसरे म्हणजे याचा वेग वाढवण्याशी कमी संंबंध आहे. त्यातही आधुनिक यंत्रणांमुळे ठेवायला लागणारे अंतरही कमी होत चालले आहे.

याव्यतिरिक्त वेग वाढवणे हे राजधानीपुरते मर्यादित नाही. जवळजवळ सर्वच गाड्यांचे वेग वाढवले जात आहेत. उद्या त्या इतर गाड्यांचेही वेग वाढणारच आहेत.

मी डेक्कनबद्दल हे पाहिले आहे. तिच्यामुळे वेळेवर असलेल्या गाड्या रखडत नाहीत. पण त्या गाड्या जर इतर कारणांनी लेट झाल्या तर मधे येतात व एकतर स्लो लोकल ट्रॅकवर जातात, किंवा स्टेशन्स वर थांबवल्या जातात. म्हणजे कल्याणला सकाळी ८ ला कसारा साइडने येणारी गाडी जर तासभर लेट झाली, तर ती कल्याणला डेक्कन जाईपर्यंत थांबवली जाते. पुण्याला डेक्कन ने परतताना कर्जतला हमखास अशी वाट पाहणारी एखादी गाडी दिसते.

** यात थोडी रेल्वेची चलाखी आहे - म्हणजे गाडी अधे मधे लेट झाली तर बिघडत नाही. ती जर शेवटच्या स्टेशनवर वेळेवर पोहोचली तर एकूण "वेळेवर" गणली जाते Happy तसे करता यावे म्हणून वेळापत्रकात लांब पल्ल्याच्या गाड्यांना काही ठिकाणी दोन स्थानकांमधे अंतराच्या मानाने खूप जास्त वेळ दिलेला असतो.

Pages