50 वर्षांची चिरतरुण ‘राजधानी’

Submitted by पराग१२२६३ on 15 May, 2022 - 04:59

मुंबईहून दिल्लीला रेल्वेने जाण्या-येण्यासाठी आजही पहिली पसंती असलेली 12951/52 राजधानी एक्सप्रेस येत्या 17 मेला 50 वर्षांची होत आहे. आज ही रेल्वेगाडी हायटेक झाली असली तरी तिच्यात येत्या काळात अजूनही सुधारणा होत जाणार आहेत.

विविध राज्यांच्या राजधान्या देशाच्या राजधानीशी जलद आणि आरामदायक रेल्वेसेवेने जोडण्यासाठी राजधानी एक्सप्रेस ही संकल्पना आणली. त्यानुसार भारतातील पहिली राजधानी एक्सप्रेस सुरू झाली 1 मार्च 1969 ला नवी दिल्ली आणि हावड्यादरम्यान. संपूर्ण वातानुकुलित असलेल्या या वेगवान रेल्वेगाडीत विमानाप्रमाणे सेवा पुरवण्यात येत असल्याने पुढील काळात ही संकल्पना लोकप्रिय होत गेली. परिणामी विविध राज्यांच्या राजधान्यांपासून दिल्लीसाठी एकापाठोपाठ एक राजधानी एक्सप्रेस सुरू होत गेल्या. आज देशात 26 राजधानी एक्सप्रेस धावत आहेत. मुंबई आणि नवी दिल्लीदरम्यान धावणारी 12951/52 राजधानी त्यापैकीच एक.

मुंबई आणि नवी दिल्ली या देशातील सर्वांत मोठ्या शहरांना कमीतकमी वेळेत जोडणारी राजधानी एक्सप्रेस भारतीय रेल्वेची एक प्रतिष्ठीत गाडी आहे. 17 मे 1972 ला ही गाडी सुरू झाली. त्यावेळी ही आठवड्यातून दोनदा धावत असे. कालांतराने वाढत्या मागणीमुळे ही गाडी आठवड्यातून 3 दिवस, 4 दिवस, सहा दिवस असं करत करत रोजच धावू लागली. सुरुवातीला 151 डाऊन आणि 152 अप असा गाडी क्रमांक असलेल्या मुंबई राजधानीचा क्रमांक जानेवारी 1989 पासून 2951/2952 आणि 10 डिसेंबर 2010 पासून 12951/12952 असा झाला आहे.

काळानुरुप मुंबई राजधानी बदलत गेली आणि नवनव्या तंत्रज्ञानांचा स्वीकार करत गेली. त्यामुळे या गाडीकडे भारतीय रेल्वेच्या तांत्रिक प्रगतीचे प्रतीक म्हणूनही पाहिले जाऊ लागले. या गाडीचे गार्ड आणि चालक यांच्यादरम्यान दूरध्वनी संपर्क यंत्रणा सुरू करण्यात आली. त्यानंतर या यंत्रणेत सुधारणा करून त्याद्वारे प्रवाशांना STD/ISD दूरध्वनी सेवा उपलब्ध करून देण्यात आली. भारतीय रेल्वेवर चालत्या रेल्वेगाडीत अशा प्रकारची सेवा पहिल्यांदाच उपलब्ध झाली होती.

लोकप्रियता वाढल्यामुळे सुरुवातीची 8 डब्यांची मुंबई राजधानी 1984 पासून 18 डब्यांची झाली. पुढे मुंबई राजधानीला वातानुकुलित 3-टियर शयनयान डबाही जोडला जाऊ लागला. तोपर्यंत या गाडीत वातानुकुलित प्रथम श्रेणी, वातानुकुलित 2-टियर शयनयान आणि वातानुकुलित खुर्ची यान श्रेणी उपलब्ध होती.

नव्या शतकात मुंबई राजधानी अधिक आकर्षक स्वरुपात प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. तेव्हापासून जर्मनीच्या Linke Hofmann Busch (LHB) कंपनीच्या (पुढे Alstom कंपनी) सहकार्याने बनवण्यात आलेले अधिक वेगवान, अधिक आरामदायी आणि अधिक प्रवासी क्षमतेचे अत्याधुनिक, आकर्षक डबे मुंबई राजधानीला जोडले जाऊ लागले आहेत. या डब्यांबरोबर धावण्याचा पहिला मान मुंबई राजधानीलाच मिळाला होता. यावेळी राजधानी एक्सप्रेसच्या पारंपारिक रंगसंगतीमध्येही बदल झाला. LHB डब्यांमुळे या गाडीला तीनएवजी दोनच जनरेटर यान जोडण्याची गरज राहिली. आज मुंबई राजधानी 1 वातानुकुलित प्रथम श्रेणी, 1 हॉट बुफे कार, 5 वातानुकुलित 2-टियर शयनयान, 11 वातानुकुलित 3-टियर शयनयान, 2 सामान ब्रेक आणि जनरेटर यान आणि 1 पार्सल यान अशा 21 डब्यांसह धावत आहे.

नव्या डब्यांमुळे मुंबई राजधानीचा वेग वाढण्यासही मदत झाली. आधीचा 19 तासांचा प्रवास आता 15 तास 40 मिनिटांपर्यंत कमी झाला आहे. आता या गाडीचा वेग वाढवण्याच्या हेतूने 1380 कि.मी. अंतराच्या मुंबई-दिल्ली लोहमार्गाचे आधुनिकीकरण सुरू आहे. येत्या काही वर्षांमध्ये ते काम पूर्ण झाल्यावर ही गाडी ताशी 160 कि.मी. वेगाने धावू शकेल. परिणामी तिचा प्रवासाचा कालावधी 12 तासांपर्यंत खाली येऊ शकेल. त्याचबरोबर भविष्यात ही गाडी ताशी 200 कि.मी. वेगाने चालवण्याचा विचार आहे. तसे झाल्यास हे अंतर मुंबई राजधानी 8 तासांमध्ये कापू शकेल. या प्रयत्नांच्या दिशेने एक पाऊल म्हणून मुंबई राजधानीच्या ताशी 145 कि.मी. वेगाच्या चाचण्या घेतल्या गेल्या आहेत. या गाडीचे संचालन अधिक गतिमान होण्याच्या दृष्टीने काही वर्षांपूर्वी ही गाडी ढकल-ओढ तंत्राद्वारे (Push-Pull) चालवण्यात आली होती.

प्रवाशांच्या मागणीमुळे मुंबई राजधानीला 2006 पासून सुरतमध्येही थांबा देण्यात आला. तोपर्यंत ती संपूर्ण प्रवासात तीनच थांबे घेत होती. सध्या ती बोरिवली, सुरत, बडोदा, रतलाम, नागदा, कोटा हे थांबे घेते. 19 जुलै 2021 पासून मुंबई राजधानीला अत्याधुनिक तेजस डबे जोडले जाऊ लागले आहेत. त्यामुळे ती आता मुंबई तेजस राजधानी बनली आहे. यावेळी राजधानीची रंगसंगती पुन्हा एकदा बदलली गेली आहे. या डब्यांमध्ये विविध प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत.

मुंबई राजधानीमध्ये सुरुवातीची बरीच वर्षे Public Announcement System वरून गाडी धावत असताना आसपासच्या परिसराची माहिती देण्यात येत असे. आज या यंत्रणेद्वारे प्रवाशांना soft music, बातम्या ऐकवल्या जात असून प्रवाशांसाठी उद्घोषणाही केल्या जातात. मध्यंतरी काही वर्षे मुंबई राजधानीच्या प्रवाशांना गाडीत वाचण्यासाठी रेलबंधू हे मासिक पुरवले जात असे.

अशा या मुंबई राजधानीची लोकप्रियता भविष्यातही टिकून राहणार आहे.

link
https://avateebhavatee.blogspot.com/2022/05/50.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उदा: चेन्नई-दिल्ली ग्रॅण्ड ट्रंक एक्सप्रेस चे वेळापत्रक
https://www.gettraininfo.com/train/12615-456643

एका विभागामधे दोन स्थानकांमधला तिचा वेग पाहिला तर साधारण ६०-७० किमी असतो. पण रेल्वेचा विभाग बदलताना बफर टाइम दिसतो. सेण्ट्रल वरून वेस्टर्नला येताना इटारसी व त्या आधीचे स्टेशन यात ती दोन तासांत फक्त ७० किमी जाते. इतर विभाग बदलतानाही तसेच आहे. शेवटी हजरत निजामुद्दीन ते नवी दिल्ली या ७ किमीकरता तिला २५ मिनीटे दिली आहेत.

वेग वाढवणे - तो वाढला तरी पोहोचण्याची वेळ महत्त्वाची असते. म्हणजे ती लवकर करून उपयोग नाही. मग निघण्याची वेळ उशिरा केली तर इतर गाड्यांच्या मध्ये येते.

मध्य रेल्वेकडे राहणाऱ्यांना पश्चिम रेल्वेच्या बांद्रा, दादर,मुं सेंट्रलवरच्या गाड्या पकडायच्या तर निघण्याची वेळ पाहावी लागते.

फारएण्ड यांच्या लिखाणात रेल्वे बद्दल आत्मियता जाणवते पण आता ते जब वी मेट मधल्या करिना सारखे "उदयजी आप कन्विन्स हो गये हो या मै और बोलु (लिखु)" असे विचारतील असे वाटते. Happy
असो माझ्या ऑफिसच्या केबिन मधुन कांजुर स्टेशन दिसते. माझे निरीक्षण असे आहे की आजकाल डेक्कन क्विन बर्याचदा लेट असते. तिचा तो नवा डबा विस्टाडोम भारी दिसतो. एकदा पावसाळ्यात जायला हवे.
दरम्यान, आज मुंबईला जाऊन मुंबई सेंट्रलवर पार पडलेल्या राजधानीच्या 50 व्या वर्धापन समारंभात सहभागी होऊन आलो.>> अरे वा परागजी. याचे काही फोटो असतील तर टाका येथे.

Happy नाही उदय यांच्या पोस्ट्समधूनही चांगली माहिती मिळाली. मला राजधानीचा वेग वाढवल्यामुळे फार परिणाम होईल असे वाटत नाही इतकेच.

त्यांचा एकूण अ‍ॅप्रोच जरा सोशालिस्टिक वाटला, अमितव ला वाटला तसाच. वेगाच्या बाबतीत माझा ट्रिकल फीड इकॉनॉमी वर विश्वास आहे Happy

डेक्कनच्या विस्टाडोमने मलाही जायचे आहे. ऑफिसमधून्/घरातून गाड्या दिसणे याचे मला लहानपणापासून असलेले अप्रूप अजूनही आहे.

मुंबई राजधानीच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबई सेंट्रलमध्ये पार पडलेल्या समारंभाची क्षणचित्रे

IMG_7062_edited.jpg20220517_161805_edited.jpg20220517_162022_edited.jpg20220517_163602_edited.jpg20220517_163717_edited.jpgIMG_7116_edited.jpg

>>>मुंबई राजधानीच्या सुवर्ण महोत्सवी समारंभावरचा माझा व्हिडिओ खालील लिंकवर आहे.>>> यात समारंभ कोणता होता ?
बाकी माहिती अफाट होती

Pages