एका गरीब मुलाचे मणक्याचे ऑपरेशन

Submitted by सुनिधी on 12 May, 2022 - 20:48

एका मोठ्या पेचात सापडले आहे. मदत करा.
मी युट्युबवर 'संदीप भट' म्हणून एका मुलाचे चॅनल पहात असते. तो वेगवेगळ्या गावांना जाऊन फार कुटुंबातल्या आजारी व्यक्तीला मदत गोळा करुन देतो. त्याच्या एका व्हिडिओत 'इटा' गावातल्या एका मुलाला दाखवले. तर त्या मुलाची हकिकत खूपच वेदनादायक होती. तो १७ वर्षाचा असताना झाडावरुन पडला व मणक्याला जबर दुखापत झाली. तेव्हा त्याच्या पाठीत प्लेट घालण्यात आली. त्याला आता ५ वर्षे झाली व तो मुलगा गेल्या पाच वर्षापासुन बिछान्याला खिळून आहे. आज तो २२ वर्षाचा आहे. पाय अगदी बारीक झालेत. आता ती प्लेट काढायची आहे पण पैशा अभावी अडलंय.
त्या व्हिडिओची लिंक खाली देते पण खूप दु:खद दृष्ये आहेत त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. जपून पहा.
https://m.youtube.com/watch?v=7fTKVJY08FE

त्यात तो मुलगा कळवळून सांगत होता की त्याला फक्त चालायचंय. त्यानंतर तो खूप मेहनत करुन काम करेल वगैरे वगैरे... व उपचाराचा खर्च तिनेक लाख आहे असही त्याच्या मातेने सांगितले. तर काही लोकांनी त्याला मदत केली ज्यात मीही एक होते व तितके पैसे गोळा झाले.
मी त्या मुलाला सहज मेसेज करुन ठेवला होता की सर्जरी झाली की कळव.
तर काल तो दवाखान्यात सर्जरीसाठी गेला. त्याने मला मेसेज केला की आंटी मै जा रहा हून वगैरे.
पण तेथील डॉक्टरांनी सांगितले की ते ऑपरेशन खूप गुंतागुंतीचे आहे व ते करु शकणारे एकच डॉक्टर भारतात आहेत व ते म्हणजे कोईमतुरच्या गंगा हॉस्पिटलचे डॉ. राजाशेखरन. व त्याचा खर्च किमान १० लाख येईल.

तर आज सकाळी घरी परत जाताना त्या मुलाचा व्हिडिओ मेसेज आला ज्यात त्याने हे सर्व रडतरडत सांगितले व त्याने मला ४-४ दा विनंती केली की 'आंटी मुझे मदद करो, मुझे ठीक होना है'. Sad

१७ ते २२ अशा पुर्ण वाढीच्या वयात तो कायम पलंगाला खिळून आहे. आता जरा आशा निर्माण झाली होती तर ती ही संपली. यापुढचे पुर्ण आयुष्य कदाचित असेच झोपुन जायची शक्यता आहे हा विचार किती भयानक आहे याचा विचारही करवत नाही.

मला मणक्याच्या दुखापतीच्या कमीजास्त प्रकाराबद्दल काहीच माहिती नाही. त्याने अक्षरशः याचना केलीये माझ्याकडे पण मी काय करु? अजुन ७ लाख कुठून आणायचे? भारतात ते एकच डॉक्टर आहेत का जे हे व्यवस्थीत करु शकतात? त्यात कायकाय अडथळे आहेत? त्याला चालता येईल का? दुसरे कोणीच ही सर्जरी करु शकत नाही का? जरा कमी पैशात होऊ शकेल का? हे आणि असंख्य प्रश्न आता मला पडलेत.

अज्ञानात सुख असतं ते खोटं नाही. कारण असे असंख्य. दुर्दैवी जीव असतील जे बरे होऊ शकतात पण केवळ पैसा नसल्याने कधीच बरे होऊ शकत नाहीत. पण आपल्याला ते माहिती नसतं म्हणून सगळं छान चाललंय असं वाटतं. आता कोणीतरी कळवळीने मदत मागतंय आणि मला त्याकडे दुर्लक्ष करता येत नाहीये. ही भावना फार भयानक आहे. काहीही कळत नाही काय करावे. प्लीज सुचवा काहीतरी. दुसरे कोणी डॉक्टर, दुसरा काही उपाय, किंवा अजुन काही त्याच्याबद्दल माहिती हवी आहे का ते सांगा, मी त्याला विचारेन.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://www.gangahospital.com/neuro-surgery

Dr. V. RAJESH BABU is a Senior Neurosurgery Consultant at Ganga Hospital and also the President of the Indian medical association (IMA), Coimbatore. He completed his MBBS in 1987, M.S (General Surgery) in 1997 & M.Ch.(Neuro Surgery) in Sep 2001 & has been working as a consultant neurosurgeon at Ganga Hospital since 2010.

अशी पात्रता असणारे डॉकटर प्रत्येक मेट्रोसिटीमध्ये आहेत.

वर प्रधानमंत्री विमा योजना आणि महात्मा फुले विमाआ योजनेची एक लिंक कुणीतरी डकवलेली आहे. हे महाग असतील तर कल्पना नाही. तसेच ते सरकारी नसतील तर माहिती नाही.

त्या विमा योजना नाहीत

पंतप्रधान जन आरोग्य योजना , आयुष्यमान भारत
गरीब लोकांसाठी आहे , वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी
तर एक कार्ड मिळते

https://pmmodiyojanaye.in/pm-jan-arogya-yojana-application-free-5-lakh/

म फुले योजना , साधारण तशीच , राज्य सरकारची आहे

https://www.jeevandayee.gov.in/

ब्लॅककॅट, त्या लिंकवर जाऊन एकदा वाचा तरी. जगातली सर्वात मोठी विमा योजना असे म्हटलेले आहे. दोन्ही योजना नीट वाचल्यावर प्रतिसाद दिला होता. तुमचा वेळ वाचला असता.

त्या योजना विमा योजना असल्या तरी सरकारने त्या खरेदी करून , विमा कँपन्यांना मध्यस्थ करून , विविध हॉस्पिटलमधून ती स्कीम गरिबांसाठी चालवली आहे

जनता स्वतः त्याचा प्रीमियम भरत नाही , त्यामुळे आपल्यादृष्टीने त्यात स्वस्त महाग असे काही नाही, जर पात्र असेल तर आयडी मिळेल व त्याचा फायदा घेता येईल.

थोडक्यात , योजना सरकारी , पण ती ऑपरेशनल फंक्शनसाठी विविध विमा कम्पन्या , टिपीए इ कडे औटसोर्स केलेली आहे. ( ह्यांचे क्लेमही अजून एका कंपनीकडून ऑडिट केले जातात, मी कधीकधी तिकडे काम करत होतो.)

आणि यात बहुतेक आजार हे पॅकेजप्रमाणे कव्हर होतात, म्हणजे उदा ( काल्पनिक उदाहरण) नॉर्मल डिलिव्हरी 3000 रु , त्यात 3 दिवस रहाण्याचे पॅकेज , म्हणजे कुठेही केले तरी इतकेच मिळणार , पाच लाखाची पॉलिसी आहे म्हणजे उद्या कुणीही उठून बॉम्बे हॉस्पिटलात डिलिव्हरी करून 90000 चा क्लेम करतो म्हटला तर मिळणार नाही

यात क्लेम संक्शन होणे , त्या तुटपुंज्या रकमा यातून बर्याच हॉस्पिटलनी त्यांना नंतर नाही म्हटले आहे

https://www.jeevandayee.gov.in/#

यात operational guidelines ला क्लिक करा
त्यात package costs क्लिक करा

एक्सेल येईल , प्रत्येक सर्जरीसाठी किती , हे बघा

ह्या केस मध्ये जास्तीत जास्त दीड लाख मंजूर होऊ शकतात.

त्यामुळे नॉर्मल हेल्द इन्शुरन्स पॉलिसीबरोबर हे पूर्णपणे कंपेरेबल नाही.

या मुलाच्या केस मधे जर १० लाख खर्च येणार असेल आणि समजा ४ च लाख आयुष्यमान भारतकडून मिळणार असतील तरी हरकत काय आहे ? तेव्हढा लोड तर कमी होईल ना ? शिवाय ४ लाख सरकारी मंजूर झालेला खर्च असेल तर हॉस्पिटलमधल्या सामाजिक विंगला १० लाख का घेता हे विचारणे शक्य होते. अनेकदा हॉस्पिटल्स त्या लिमिटमधे ऑपरेशन्स करतात. त्यांनाही चॅरिटेबल ट्रस्टखाली नोंद झालेली असल्यास ३० टक्के गरीबांसाठी कामे करावीच लागतात. रूग्णाला फायदा मिळतोय ना ? मग त्याचे मेकॅनिझम काय आहे याच्याशी काहीच संबंध नाही. त्यांनी तिकडे काहीही करावे. विमा काय असतो आणि त्यात आणि यात फरक काय या चर्चेची इथे अजिबात आवश्यकता नाही असे मला तरी वाटते.
या विषयावर इथे मी थांबतो. निष्कारण कीस पाडण्यात दोघांचाही वेळ जाईल.

4 पण नाही हो , कदाचित दीड लाखच मिळतील , मी त्या यादीमधील स्पाईन सर्जरीमधील जास्तीत जास्त अमाउंटचा उल्लेख केला , कदाचित यापेक्षा कमीच , जास्त नाही.

स्टेशनवर पाच रुपयात चहा मिळतो म्हणून सर्व हॉटेल वर तोच दर लावायचे बंधन घालता येणार नाही ना ?

आज हा व्हिडीओ हिंमत करून पाहिला. संदीप भटचं काम प्रशंसनीय आहे. खूप प्रभावित झालो. त्याने फक्त आवाहनच नाही केले तर अडीच लाख रूपयांचा फंड गोळा करून त्या परिवाराच्या हातात दिला. फंड देणारे बहुतेक सर्व आसामी आणि गोरखा फॅमिलीज वाटल्या. रूग्ण उत्तर प्रदेशातला आहे. मदत करण्याची भावना असेल तर प्रांत वगैरे काही आड येत नाही हेच खरे. त्या सर्व मदत करणार्‍यांना सलाम !! हॅट्स ऑफ !!
दीड लाख रूपये एका कुटुंबाकडून, ५० हजार एका कुटुंबाकडून आणि उरलेले पन्नास हजार अनेकांकडून आहेत. त्यात कुणी दहा हजार कुणी चार कुणी दोन हजार रूपये दिले आहेत. आता नक्कीच मदतीचा ओघ सुरू झाला असेल.
आयुष्यमान भारत योजनेत एक पैसाही द्यावा लागत नाही. जे या योजनेच्या क्रायटेरियात बसतात त्यांना अर्जही करावा लागत नाही. या योजनेची हॉस्पिटल्स आहेत. तिथे या शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात. या रूग्णालाही ते शक्य आहे. वरचे काही पैसे लागले तर क्राऊड फंडातून देणे शक्यच होईल.
अशा वेळी अमक्याच डॉक्टरकडे ट्रीटमेंट घ्यायची हा आग्रह सोडायला हवा. ससून हॉस्पिटल सरकारी आहे. अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया इथे होतात. ज्यांना गरज आहे ते इथे येऊन करतात. लहान असताना आम्ही सुद्धा ससून वर अवलंबून होतो.
तरीही विशिष्ट रूग्णालयातच ट्रीटमेंटचा आग्रह असल्यास आयुष्यमान भारत पूर्ण खर्च देत नाही म्हणून त्या योजनेचा एक पैसा नको हा विचार कुणाकडून ऐकणे हे पचनी पडायला जडच आहे. कुठे राजकारण करावं कुठे नाही याचं भान सुटायला नको. वाटल्यास या योजनेत कशी लुटालूट होते हा वेगळा धागा काढावा. योग्य वाटल्यास सहमतीचा प्रतिसाद देता येईल. पण या धाग्याचा विषय आणि हवी असलेली मदत पाहता दहा लाख नाही दीडच लाख मिळतात, त्यापेक्षा कमी मिळतात हे कशासाठी सांगितले जातेय हे समजण्याच्या पलिकडे आहे.

सांगितले , कारण सरकारी योजना आहेत , म्हणून प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट कव्हर होते , असा गैरसमज होऊ नये म्हणून ते लिहिले

जर सरकारी योजनेची मदत हवी असेल तर आधी त्याहॉस्पिटलमध्ये जाऊन तिथून सगळे कागद एपृव्हलसाठी पाठवावे लागतात , मग सर्जरीच्या त्या तारखेसाठीच व त्या हॉस्पिटल साठीच एपृव्हल येते , उरलेला खर्च तुम्ही हॉस्पिटलला देऊ शकता. तारीख /हॉस्पिटल बदलले तर जुने कँसल करून पुन्हा नवीन एपृव्हल घ्यावे लागते.

पण हॉस्पिटल एक्सट्रा चार्जेस घेऊ शकते का , इ इ अनेक वादास्पद मुद्दे आहेत.

https://timesofindia.indiatimes.com/city/navi-mumbai/hospital-served-not...

पण काहीही असले तरी आधी हॉस्पिटलला एप्रोच व्हा व कागद पाठवा.

सरकारची अपेक्षा आहे की हॉस्पिटल नी तितकेच चार्जेस घ्यावेत , लहान मोठी ऑपरेशन उदा आपेडिक्स सर्जरी , पिशवी काढणे , हर्निया इ इ छोटे मोठे डॉकटर हॉस्पिटल सेवा म्हणून करतात.

फार मोठ्या सर्जरीबाबत सरकारने अजून मदत वाढवायला हवी

एम्स नवी दिल्ली आणि एम्स ऋषिकेश ही या मुलाला जवळ पडणारी चांगली हॉस्पिटल्स आहेत. इथे कमी खर्चात काम होऊ शकेल.
एम्स सोबत असणारे एनजीओज आर्थिक मदत सुद्धा करतात. ही यांची यादी.
https://www.aiims.edu/en/ngos-associated-with-aiims,-new-delhi.html

मंगेशकर हॉस्पिटलला सुद्धा काही वर्षांपूर्वी एका सामाजिक कार्यकर्त्याशी भेट झाली होती. ते हॉस्पिटलने रिकमेंड केलेल्या केसमधे मदत मिळवून देतात.

रूबी हॉल इथे डॉ हिरेमठ हे स्वतः काही केसेस मधे स्वतःची फी आकारत नाहीत. तसेच गरजू रूग्णांना मदत मिळवून देत. आता बहुतेक ते हे काम करत नाहीत. पण त्यांच्यामुळे मदत मिळालेले किमान चार जण जवळचे आहेत. रूबी येथे काही रूग्णांना खर्च कमी करून देण्यात आला आहे.

बुधरानीला तर ३०% रूग्णांना मदत होतेच. त्यापेक्षाही जास्त लोकांना सिंधी लोकांच्या मदतीतून मदत केली जाते. दी ड वर्षे कोमात असलेल्या एका मुलाचा संपूर्ण खर्च हॉस्पिटलने उचलला. इथून जवळच असलेल्या झोपडपट्टीत (कोरेगाव पार्क) तो राहतो. रस्त्यावर त्याला भरधाव कारने उडवले. माझ्या भावाने व मित्रांनी त्याला इनलॅक्सला आणले. (पाचच मिनिटाच्या अंतरावर अपघात झाला होता. ) हॉस्पिटलने पोलिसांना कळवण्यापासून ते रूग्णाची आर्थिक मदत पाहून मदतीसाठी सिंधी कम्युनिटीला आवाहन करण्याबाबत सगळे केले. एक नवा पैसा लागला नाही.

माझ्या आजोबांना गावाकडून आणले होते तेव्हां सोबतचे लोक पाहून रूग्णालयाने मोफत इलाज करण्याचा निर्णय घेतला. पण आम्ही तिथे पोहोचल्यानंतर माझे वडील आणि एक चुलते यांनी आम्ही खर्च उचलू असे सांगितल्यावर तिथल्या सीएमओ ने अभिनंदन केले होते. ही मदत दुसर्‍या गरजूला मिळू शकते.

प्रत्येक नावाजलेल्या रूग्णालयात एक सोशल विंग असते. तसेच स्पेशालिस्ट सर्जन देखील ते बाहेरून बोलवतात.
खासगी विमा कंपन्यांच्या बाबतीत हॉस्पिटल्स अव्वाच्या सव्वा चार्जेस लावतात याचा या केसशी काहीच संबंध नाही. अनावश्यक माहिती इथे नकोच असे वाटते.

मी तुटपुंजी मदत पाठवत आहे (हे सांगणे बरोबर नाही. सागण्याचे कारण या केस मधे चर्चेचे गुर्‍हाळ लावण्यात वेळ जातोय पण पुढच्या वेळी आपण संबंधिताला ही माहिती देणे जास्त फायदेशीर राहील. ) ही माहिती जर रूग्णापर्यंत कुणाला पोहोचवता आली आणि त्याला मदत झाली तर कमी खर्चात त्याचे काम होऊ सुद्धा शकेल.

जी हॉस्पिटल्स क्राउंड फंडींग किंवा एनजीओशी संलग्न नाहीत तिथे शक्यतो जाऊ नये. गरजू रूग्णांनी सुद्धा हे पथ्य पाळले तर जे लोक मदत करू इच्छितात त्यांच्याकडून मिळणार्‍या मदतीत अजून तीन चार जणांना पदत मिळेल. चार लाखाचे थेट दहा लाख सांगणार्‍या हॉस्पिटलच्या बाबतीत सेकंड ओपिनियन गरजेचा आहे.

हॉस्पिटलने पेशंटसाठी चालू केलेल्या खात्याच्या केस मधे जरूरीपेक्षा जास्त मदत स्विकारता येत नाही. क्राऊड फंडींगचे काही प्रतिष्ठीत फंड आहेत त्यात किती मदत अपेक्षित आहे आणि किती जमली याचे अपडेट येतात. पैसे जमल्यावर तो फंड आपोआप बंद होतो. संपर्क साधता आला तर बरे होईल.
पर्सनल खात्याच्या बाबतीत चार लाख मिळाले की वीस लाख मिळाले याचा हिशेब नसतो.
माफ करा . बरेच प्रतिसाद झाले इथे.

मला वाटतं की पार्ला ( खरं तर इरला) येथल्या होमिओपॅथी कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये कन्सल्ट करा. त्यांच्याकडे ( होमिओपॅथी) काही अफलातून औषधे आहेत. केसपेपर काढण्याचे पैसे लागतात त्यातच औषध मिळते. पेशंटचे अगोदरचे तपासणी पेपर्स दाखवून विचारा काही होईल का. स्पष्ट सल्ला तरी मिळेल.

वर उल्लेख केलेल्या सरकारी योजनेतुन माझ्या काकांसाठी मदत मिळालेली आहे. अशी मदत कुठल्या होस्पिटलात आहे हे आधी शोधुन आम्ही त्यापैकी आम्हाला जवळच्या होस्पिटलात गेलो. तिथे या योजनेचा एक काउन्टर होता. तिथल्या माणसाला भेटताच त्याने आधार कार्ड व केशरी रेशनकार्ड पाहुन मदतीसाठीचे अप्प्रुवल दिले. विम्याची एकुण रक्कम अडिज लाख होती, काकाची ओपन हार्ट सर्जरी होती. किती खर्च झाले माहित नाही. एकदा रक्त बाहेरुन घ्यावे लागले त्याचा चार हजार खर्च वगळता आम्हाला काहीही खर्च करावा लागला नाही.

योजनेची सर्व माहिती, किती कव्हर मिळते, कुठल्या जिल्ह्यात कुठल्या होस्पिटलात ह्या योजनेचे लाभ मिळु शकतात व त्या होस्पिटलात कुठल्या आजारावर उपचार होउ शकतात ह्याची पुर्ण माहिती योजनेच्या वेब साइटवर आहे. माझी माहिती २०१७ ची आहे, त्यानन्तर काही बदल झाला असल्यास कल्पना नाही.

https://www.jeevandayee.gov.in/

होमिओपॅथी हे छद्मविज्ञान (pseudoscience) आहे.
होमिओपॅथी कॉलेज आणि हॉस्पिटल संदर्भात निरर्थक सल्ला देऊन कृपया या गंभीर विषयाचा विचका करू नये, अशी नम्र विनंती.

सर्वांना पुन्हा एकदा खूप धन्यवाद. (हे वाक्य आता नेहमीच लिहावे लागणार आहे) Happy

शान्त माणुस, तुमच्या व ब्लॅककॅट यांच्या चर्चेतुन खूप चांगली माहिती मिळाली आहे. त्यामुळे मतमतांतरे झाली तरी चालेल.

ते सरकारी विम्याचे नाव नोंदणी वगैरे पहायला लागेल. तुम्ही दोघांनी दिलेली दवाखान्याची माहिती पहाते.

गेले २-३ दिवस जरा विकासच्या (त्या मुलाचे नाव) आत्ताच्या डॉक्टरांबरोबर संपर्क करायच्या प्रयत्नात होते. त्यांचा १-२ दा व्हॉट्सपने संपर्क झाला. हळुहळु त्यांच्याकडुन माहिती घेत आहे.

शांतमाणुस, केलेल्या मदतीबद्दल लिहायला काहीच हरकत नाही. ती माहिती म्हणुनच आहे. मदतीबद्दल खूप आभार. पोच हवी असेल तर सांगा. नाहीतर व्हिडिओच्या खाली विकासचा फोन नंबर आहे, त्याला विचारले तरी चालेल.

स्पाईन सर्जरीचे जे होईल ते होईल पण आज तातडीचे पाऊल म्हणून, विकासला मी थोडे पैसे पाठवलेत व उद्यापासुन रोज अंडी, कोशिंबीर, थोडे फळ व दूध्/दही अशा पौष्टीक गोष्टी थोड्या प्रमाणात तरी आहारात समाविष्ट करायला सांगितले आहे. त्यामुळे अंगात ताकद येईल. पायाची न थांबणारी जखम कदाचीत जरा बरी होईल. तो तसे काही जास्त खात नाही असे त्याच्याकडुन कळले.
ब्लॅककॅट हे पाऊल , पदार्थ योग्य वाटते का? आहारात काय घ्यावे त्याने जे पचेल?
आहारतज्ञ आहे का कोणी मायबोलीवर जो मदत करेल?

मणक्याच्या समस्या समजणारे आणि त्यावर उपचार करणारे खूप कमी डॉक्टर भारतात आहेत.
मणक्याच्या त्रास हल्ली सर्रास खूप लोकांना होत आहे.
शस्त्रक्रिया करून पण तो संपेल ह्याची शाश्वती खूप कमी असते..
हे सत्य आहे.
अतिशय किचकट आणि नाजूक आणि महत्वाचा अवयव आहे तो.
कमरे खाली सर्व शरीर लुळे पांगळे करू शकतो.
ह्या अशा स्थिती मुळे लोक physiotherapy कडे वळत आहेत.
वजन लावून बऱ्याच लोकांना आराम मिळतो.
लाखो ची अयशस्वी ऑपरेशन करण्याची गरज भासत नाही.

मनक्या वर हक्क नी मत व्यक्त करण्या इतकी पात्रता ब्लॅक cat ह्यांच्या कडे नाही.
खुप मोजकीच लोक त्या वर मत व्यक्त करू शकतात..
अशी खूप कमी लोक भारतात आहेतं.

फक्त १२०० neurologist भारतात आहेत आणि त्या मधील ४०० megacity मध्ये आहेत..
ही रिॲलिटी आहे
पूर्ण जिल्ह्यात एक पण neurologist नाही अशी महाराष्ट्रात अवस्था आहे बाकी राज्यांविष्यी न बोलणेच उत्तम.

Neurology in India - PMC - NCBI

हा आधार आहे पोस्ट चा.आणि स्व अनुभव पण आहे

इटा चा लोकल सपोर्ट गॄप सापडत नाही गुगलवर.

आजच्या घडामोडी:

गंगा हॉस्पिटलचे आज उत्तर आले. त्यांनी सांगितले की विकासची तपासणी करून ट्रिटमेंटची पुर्ण माहिती देऊ शकतील व खर्चाची पण. ते पैशात जास्तीतकास्त सवलत देतील हे ही सांगितले. किती सवलत देतील हे मी लगेच विचारले नाही पण निदान त्यांनी सांगितले आहे हे पण छान वाटले. किमान काय उपचार आहेत, किती खर्च येईल ही माहिती तरी काढावी लागेलच.
रेल्वेनी इटा ते कोईमतुरला जाणे बेस्ट असेल असेही ते म्हणाले. एका दिवसात सर्व रिपोर्ट्स, माहिती देतील म्हणाले. तिथेच जवळ एखाद्या स्वस्त हॉटेलात त्यांना एक दिवस थांबावे लागेल असेही म्हणालेत. मुलाला स्टेशनवर न्यायला येतील सांगितले आहे. याचा खर्च किती येईल मी अजुन विचारले नाही म्हणा कारण ही अगदीच पहिली पायरी आहे.

मुलाचे डॉ. दिपक गोयल यांनी दिल्ली इंडिया स्पाईन इंजूरी सेंटरला गेले तरी चालेल म्हणालेत. त्यांना पण संपर्क करायचा विचार आहे.

सध्या तरी इतकेच.

मुंबई मध्ये डॉ अतुल गोयल हे ख्यातनाम neurosurgeon आहेत. ते केईएम हॉस्पिटल शी निगडित आहेत. त्यांचा ओपिनियन हि घेऊ शकता.

दिल्ली इंडिया स्पाईन इंजूरी सेंटरला डॉ छाब्रा हे हि फारच मोठे सर्जन आहेत.

PGIMER चंदिगढ ला प्रवीण साळुंखे हे मराठी neurosurgeon आहेत. त्यांनाही संपर्क करून बघू शकता.

च हवी असेल तर सांगा. नाहीतर व्हिडिओच्या खाली विकासचा फोन नंबर आहे, त्याला विचारले तरी चालेल. >>> पोच नकोच. शक्यतो अशा प्रकरणात आपला फोन नंबर पलिकडे जाऊ नये असे वाटते. तुम्ही चांगल्या भावनेतून काम करत आहात याबद्दल आभार. मात्र काही ठिकाणचे अनुभव पाहता आता कानाला खडा. ही केस वेगळी आहे.

मोठ्या नैसर्गिक आपदा, संकटे यासाठी देशपातळीवर पसरलेल्या आमच्या संस्थेत आवाहन केले जाते. मोठा फंड पीएम / सीएम फंडात दिला जातो. कोरोना काळात ३०० कोटी रूपये जमा झाले होते. स्थानिक पातळीवर काही जणांच्या पुढाकाराने ठराविक शाखातून संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडे मदत पोहोचवली जाते. पण त्यानंतर त्याच कारणासाठी सोसायटीतले उत्साही पुढारी, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, नगरसेवक, पक्ष कार्यकर्ते, वृत्तपत्रांचे वाचक ग्रुप्स यांचा अक्षरशः ससेमिरा चालू होतो. रोजचे संबंध असल्याने थोडी रक्कम देऊन बोळवण करावी लागते. पण त्याबद्दल लेक्चर मिळते. आपण प्रत्येक ठिकाणी पुरे पडू शकत नाही. पण नकारात्मकता नको म्हणून गप्प बसणे योग्य वाटते. तुमची धडपड स्तुत्य आहे. मात्र मदतीचे योग्य चॅनल्स असल्यास गरजेपेक्षा जास्त किंवा खूप कमी मदत टाळता येऊ शकते म्हणून या धाग्यावर लिहीले गेले.

Pages