एका गरीब मुलाचे मणक्याचे ऑपरेशन

Submitted by सुनिधी on 12 May, 2022 - 20:48

एका मोठ्या पेचात सापडले आहे. मदत करा.
मी युट्युबवर 'संदीप भट' म्हणून एका मुलाचे चॅनल पहात असते. तो वेगवेगळ्या गावांना जाऊन फार कुटुंबातल्या आजारी व्यक्तीला मदत गोळा करुन देतो. त्याच्या एका व्हिडिओत 'इटा' गावातल्या एका मुलाला दाखवले. तर त्या मुलाची हकिकत खूपच वेदनादायक होती. तो १७ वर्षाचा असताना झाडावरुन पडला व मणक्याला जबर दुखापत झाली. तेव्हा त्याच्या पाठीत प्लेट घालण्यात आली. त्याला आता ५ वर्षे झाली व तो मुलगा गेल्या पाच वर्षापासुन बिछान्याला खिळून आहे. आज तो २२ वर्षाचा आहे. पाय अगदी बारीक झालेत. आता ती प्लेट काढायची आहे पण पैशा अभावी अडलंय.
त्या व्हिडिओची लिंक खाली देते पण खूप दु:खद दृष्ये आहेत त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. जपून पहा.
https://m.youtube.com/watch?v=7fTKVJY08FE

त्यात तो मुलगा कळवळून सांगत होता की त्याला फक्त चालायचंय. त्यानंतर तो खूप मेहनत करुन काम करेल वगैरे वगैरे... व उपचाराचा खर्च तिनेक लाख आहे असही त्याच्या मातेने सांगितले. तर काही लोकांनी त्याला मदत केली ज्यात मीही एक होते व तितके पैसे गोळा झाले.
मी त्या मुलाला सहज मेसेज करुन ठेवला होता की सर्जरी झाली की कळव.
तर काल तो दवाखान्यात सर्जरीसाठी गेला. त्याने मला मेसेज केला की आंटी मै जा रहा हून वगैरे.
पण तेथील डॉक्टरांनी सांगितले की ते ऑपरेशन खूप गुंतागुंतीचे आहे व ते करु शकणारे एकच डॉक्टर भारतात आहेत व ते म्हणजे कोईमतुरच्या गंगा हॉस्पिटलचे डॉ. राजाशेखरन. व त्याचा खर्च किमान १० लाख येईल.

तर आज सकाळी घरी परत जाताना त्या मुलाचा व्हिडिओ मेसेज आला ज्यात त्याने हे सर्व रडतरडत सांगितले व त्याने मला ४-४ दा विनंती केली की 'आंटी मुझे मदद करो, मुझे ठीक होना है'. Sad

१७ ते २२ अशा पुर्ण वाढीच्या वयात तो कायम पलंगाला खिळून आहे. आता जरा आशा निर्माण झाली होती तर ती ही संपली. यापुढचे पुर्ण आयुष्य कदाचित असेच झोपुन जायची शक्यता आहे हा विचार किती भयानक आहे याचा विचारही करवत नाही.

मला मणक्याच्या दुखापतीच्या कमीजास्त प्रकाराबद्दल काहीच माहिती नाही. त्याने अक्षरशः याचना केलीये माझ्याकडे पण मी काय करु? अजुन ७ लाख कुठून आणायचे? भारतात ते एकच डॉक्टर आहेत का जे हे व्यवस्थीत करु शकतात? त्यात कायकाय अडथळे आहेत? त्याला चालता येईल का? दुसरे कोणीच ही सर्जरी करु शकत नाही का? जरा कमी पैशात होऊ शकेल का? हे आणि असंख्य प्रश्न आता मला पडलेत.

अज्ञानात सुख असतं ते खोटं नाही. कारण असे असंख्य. दुर्दैवी जीव असतील जे बरे होऊ शकतात पण केवळ पैसा नसल्याने कधीच बरे होऊ शकत नाहीत. पण आपल्याला ते माहिती नसतं म्हणून सगळं छान चाललंय असं वाटतं. आता कोणीतरी कळवळीने मदत मागतंय आणि मला त्याकडे दुर्लक्ष करता येत नाहीये. ही भावना फार भयानक आहे. काहीही कळत नाही काय करावे. प्लीज सुचवा काहीतरी. दुसरे कोणी डॉक्टर, दुसरा काही उपाय, किंवा अजुन काही त्याच्याबद्दल माहिती हवी आहे का ते सांगा, मी त्याला विचारेन.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप दिवसांनी लिहीत आहे इथे कारण प्रयत्न चालू होते. आधी लिहिल्याप्रमाणे गंगा हॉस्पिटल मधे प्रथम तपासणीकरता बोलावले आहे व नंतरच कायकाय करता येईल ते कळेल.
त्या मुलाचे नातेवाईक त्याला रेल्वेने कोईमतूरला न्यायला १० जुलै नंतरच उपलब्ध होते. त्यामुळे २८ जुलैला सकाळी ९ वाजता डॉ. राजशेखरन् यांची appointment मिळाली आहे व त्याप्रमाणे तो मुलगा व त्याला घेऊन जाणारी मंडळी यांची आग्रा-कोईमतुर व ३१ ला परत अशी तिकीटे काढलीत. पण ती आरेसी आहेत जी कन्फर्म होतील असे म्हणालेत. आता लॉज शोधत आहोत पण जे सापडले ते आधी रिजर्वेशन करत नाहीत, २च दिवस आधी करता येती. बाकी लॉज बरेच महाग असल्याने विचारले नाही.
तपासणी झाल्यावर इथे लिहीच.
हॉस्पिटलचे लोक लगेच सर्जरी करावी लागली तर करू म्हणत होते पण मी “तितके पैसे कदाचित नसतील त्यामुळे आधी किती खर्च येईल ते पाहिल्यानंतरच निर्णय घेऊ” असे कळवले. सध्या त्याला साडेतीनलाख मदत मिळाली आहे. जर डॉ.नी पाचेक लाखात होईल सांगितले तर मदत करणारे मिळायला अवघड जाणार नाही पण खूप सांगितले तर अवघड आहे. तेव्हा डॉक्टरांनाच अजुन काय करता येईल विचारणार. डोनेशन मिळाले तर उत्तमच. पण किमान ही ट्रीप तर करायची गरज होतीच खरे चित्र कळायला. कोणाला मदत करायची असल्यास कळावे म्हणून आधीच लिहिले.

हे सगळे करणे मला एकटीला शक्य नव्हते. माझ्या इथल्या कोईमतुरशी संबंध असलेल्या काही अनोळखी लोकांनी तिथली लॉज व हॉस्पिटलची माहिती काढायला खूप मदत केली. आपल्या कवीनने appointment मिळवून दिली. मनोज्/अंतरंगी यांचे मित्र लॉज पहात आहेत. अकु, महेन्द्र, प्राची, निखिल पण आहेतच. त्यामुळे मलापण धीर आलाय.

कळवीनच काय होते ते.

अपडेट्स :

गंगा हॉस्पिटलमध्ये तपासण्या झाल्या. त्यांनी सुरवातीला बेड सोअर्स साठी काही सर्जरी सुचवली. त्यानंतर फिजिओथेरपी आणि रिहॅब सेंटरमध्ये उपचारासाठी रहावे लागेल असे सुचवले. एक महिनाभर हे सगळे करुन मग स्पाईन सर्जरीसाठी ते परत केस तपासणी करतील हे तिथले अपडेट्स होते.

दरम्यान सेकंड ओपिनियन घ्यावे असे आम्हाला वाटल्याने अजून एका ओळखीच्या डॉक्टरना सुनिधीने केस फॉरवर्ड केली व सल्ला विचारला. त्यांच्या सल्ल्यानुसार एम्स दिल्ली येथे जर त्याची अपॉइंटमेंट घेता आली आणि तिथल्या डॉ ना दाखवता आले तर त्या पेशंटला काही सरकारी योजनांचा लाभ घेता येईल. हा पर्याय आम्हालाही योग्य वाटला कारण ते त्याला गंगा हॉस्पिटलपेक्षा नक्कीच जवळ होते व तिथे रहाण्याची सोय त्याच्या नातेवाईकांकडे होण्यासारखी होती.

दिवाळी संपल्यानंतरची तारीख आम्हाला मिळाली. हि अपॉइंटमेंट आम्ही एम्सच्या वेबसाईटवरुन ऑनलाईन पद्धतीने त्याचे आधारकार्ड आणि इतर तपशील भरुन घेतली.

दरम्यानच्या काळात पेशंट त्याच्या घराजवळच्या डॉक्टरांकडून बेड सोअर्ससाठी नियमित औषधोपचार/ बॅंडेज करणे वगैरे जे आवश्यक होते ते करतच होता.

ठरलेल्या दिवशी पेशंट आणि त्याचे नातेवाईक तिथे गेले. डॉक्टरांनी ब्लड टेस्ट पासून ते MRI पर्यंत आवश्यक त्या तपासण्या करुन मग असे निदान केले कि बेड सोअर्स आता बऱ्यापैकी भरुन आले आहेत व त्यासाठी आहे ते उपचार सुरु ठेवणे पुरेसे आहे. मणक्यासाठी मात्र ऑपरेशनचा उपयोग होणार नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितले. पण त्याच बरोबर हे हि सांगितले कि स्पेशलाईज्ड व्हीलचेअरच्या सहाय्याने (बॅटरी ऑपरेटेड टिल्ट रिक्लाईन टाईप) तो पुन्हा हिंडू फिरु शकेल, कामकाजही करु शकेल मोबिलीटी आल्यामुळे. आणि पुर्णवेळ झोपून रहावे लागले नाही कि बेड सोअर्स पुन्हा होण्याची शक्यताही कमी. या जोडीने त्याला फिजिओथेरपी करण्याचा आणि त्यात जसे सांगितले जाईल तशा प्रकारे व्यायाम / हालचाली करण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला. फिजिओथेरपी आणि व्हीलचेअर या दोन्हीमुळे अगदी १००% नाही तरी बऱ्याच प्रमाणात इंडीपेंडंट होऊ शकतो असे त्यांचे म्हणणे पडले.

अशा प्रकारच्या व्हीलचेअर भारतात कुठे व कितीला मिळतील? कोणती NGO अशी मदत करते का? किंवा कुणाकडून होलसेलरचा नंबर मिळतोय का?, या सगळ्याची माहिती सध्या मी आणि सुनिधी काढत आहोतच. तसेच पेशंट आणि त्याचे नातेवाईक देखील माहिती काढून आमच्या पर्यंत पोहोचवत आहेत.

तुमच्या पैकी कोणाला या प्रकारच्या व्हीलचेअर बद्दल काही माहिती असल्यास किंवा कुणा डिलरचा नंबर वगैरे माहिती असल्यास मला किंवा सुनिधीला संपर्कातून कळवलेत तरी चालेल.

पुढची प्रगतीही जसा वेळ मिळेल इथे कळवूच.

धन्यवाद.

SAVE_20221128_072314.jpgSAVE_20221128_072306.jpg

हि एक आम्हाला रेफरन्स म्हणून इमेज मिळाली आहे

विस्को म्हणून एक कंपनी आहे तिच्या होलसेलरचा नंबरही एका डॉक्टरांनी दिला आहे.

अजून बाकीच्या पर्यायांचे अपडेट्स मिळवत आहोत.

विस्को म्हणून एक कंपनी आहे तिच्या होलसेलरचा नंबरही एका डॉक्टरांनी दिला आहे >>> होय, एकदा आमच्या युनिव्हर्सिटीमधल्या प्रोस्थेटिक व ऑर्थेटिक्स (शारीरिकदृष्टया कमजोर वा मर्यादा असलेल्या व्यक्तींसाठी कुत्रिम हात व पाय आणि ब्रसेस व स्प्लिंट्स संबंधीत शास्त्र) विभाग प्रमुखानेही विस्को ह्या कंपनीचे प्रॉडक्ट उत्तम असतात असे सांगितल्याचे आठवते.

भरत पुन्हा गंगा हॉस्पिटलमध्ये जाणर नाही कारण ते तसेही खूप दूर आणि खर्चिक आहे. एम्समधेही आवश्यक त्या सगळ्या तपासण्या करुन घेतल्या आहेत

ओके कविन. पाठीचे सपोर्ट बेल्ट, मानेच्या कॉलर्स, क्नी कॅप्स इ. सगळे व्हिस्को बनवते.
व्हीलचेअर साठी फंडिंगची गरज असेल तर संपर्कातून कळवा.

धन्यवाद भरत. जरुर कळवेन

इथेही अपडेट पोस्ट करेनच. सध्या विस्को आणि इझी मुव्ह मोबिलिटी या बॅंगलोर बेस्ड कंपनीच्या एका डिलरकडून माहिती पत्रक आणि इतर माहिती मिळाली आहे. पण अजून काही ठिकाणी चौकशी करुन, सुनिधीच्या ओळखीच्या डॉक्टरांचेही यासंदर्भात मत (व्हिलचेअर निवडी संदर्भात) घेऊन आणि जरा बाकी गोष्टीही विचारात घेऊन (वॉरेंटी/ रिव्ह्यु / कस्टमर सपोर्ट/ रिपेअर वगैरे) मगच निर्णय घेता येईल. जे काही असेल त्याचे अपडेट इथे लिहेनच.

अशी चेअर दुसर्‍या देशातुन खरेदी करुन भारतात पाठवता येणे शक्य असेल का? उदा. ऑस्ट्रेलियात यूज्ड Spex electric wheelchair साधारण $२५०० (सव्वा ते दिड लाख रुपये) ला मिळू शकेल. पण transportation and future maintenance चा प्रश्न आहेच .xxx.JPG

सर्वांना खूप धन्यवाद.
चंबू, अशी खुर्ची भारतात मिळते पण प्रॉब्लेम असा आहे की त्याला खुर्चीतच उभे रहाता येईल अशी जी खुर्ची डॉक्टरांनी सुचवली आहे त्या खुर्चीत शरीर आपोआप योग्य तिथे आधार मिळून उभे होते. ती बसायला पण योग्य आहे. खालील लिंक पाहिली तर कळेल.
https://youtu.be/C-ZhkmYN4E4
यामुळे व्यक्ती बरीच स्वतंत्र होऊ शकतमिळून्क्त आर्थिक गणित जुळायला हवी. कविन लवकरच सर्व माहिती टाकेल इथे. पण किमान ऑपरेशन होऊ शकणार नाही याची मानसिक तयारी विकासची झाली आहे. मध्यंतरी कोलमडून पडला होता पण दिल्लीला जाऊन आल्यावर जरातरी आशा मिळाली त्याला की खुर्चीच्या सहाय्याने तो स्वतंत्र होऊन काही कामधंदा करु शकेल.
आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट. बेड सोर्स चे ऑपरेशन करायला व नंतरचा इतर खर्च खूप आला असता. पण त्याला इटामधेच एक डॉक्टर मिळाले व त्यांनी औषध, लेप दिले त्यामुळे ते बरे झाले आहे. त्यात बरेच पैसे खर्च झाले , अगदी गंगा हॉस्पिटल इतके नसले तरी. त्याला आधाराशिवाय बसुन रहाता येत नाही खूप वेळ. खुर्चीत येईल. त्यामुळे पुन्हा बेडवर झोपुन रहावे लागले तर बेड सोर्स पुन्हा होतील व ते चक्र पुन्हा सुरु होईल. म्हणुन लवकर प्रयत्न करावे लागतील.
कविनला पुढील माहिती मिळाली की ती कळवेलच.

History channel वर OMG मधे एक व्हीलचेअर दाखवली होती. ती एका दक्षिण भारतीय माणसाने बनवली आहे. आणि ते स्वतः पण ती वापरतात. ती घरात व्हीलचेअर आणि बाहेर 2 wheeler सारखी वापरता येते.
त्या व्यक्तीचे नाव आठवत नाहीय.. किंमत सांगितली नव्हती. खूप उपयुक्त वाटत होती.
लिंक शोधून बघते..

धन्यवाद धनवंती

त्या कंपनीच्या वेबसाईटवरचा कॉंटॅक्ट फॉर्म भरुन पाठवला आहे. त्यांच्याकडून संपर्क केला जाईलच तेव्हा आपण जे शोधत आहोत तसे काही त्यांच्याकडे आहे का विचारते

१) युट्युब व्हिडीओत दाखवलेय तशी व्हिलचेअर उपयोगी असली तरी आपण जशी शोधत आहोत (एम्सच्या डॉक्टरांनी रेकमन्ड केलेली) तशी त्यांच्याकडे नाही.
२) चंबू तुम्ही सुचवलेला पर्याय चांगला आहे. फक्त तो पर्याय वापरुन आपण शोधत आहोत त्या प्रकारातली मिळते का युज्ड व्हिलचेअर याबद्दक अजून सर्च करुन युजफुल असे काही आम्हाला मिळालेले नाही. शोध सुरु आहे
३) बॅन्गलोर बेस्ड इझी मुव्ह कंपनी आणि विस्को या दोनच कंपन्यांचे सध्या कॅटेलॉग आले आहेत. दोन्ही कॅटेलॉगमधले पर्याय बघून त्यावर एक्स्पर्ट मत मागवले आहे पण ते डॉक्टर सध्या त्यांच्या हॉस्पिटलच्या उद्घाटन आणि व्यवस्थापनात व्यस्त असल्याने त्या कामाला थोडा वेळ लागत आहे. आणि मी त्यांना त्याबद्दल सतत आठवण करुन देणेही उचीत वाटत नाही म्हणून जरा वाट बघून मग परत विचारणा करेन.

इझी मुव्ह कॅटेलॉग

इथल्या डॉक्टरांना केस बद्दल माहिती देऊन त्यांच्याकडून मिळालेला सल्ला
विस्को आणि इतर कंपन्यांचे प्रॉडक्ट कॅटेलॉग आणि किंमती वगैरेची तुलना आणि त्यासाठी घेतलेला डॉक्टरी सल्ला
हे सगळे मुद्दे विचारात घेऊन विस्कोचा पर्याय आम्हाला ठिक वाटत आहे. त्यासाठी लागणारी रक्कम सध्या त्याच्याकडे जमलेली आहे.
उरलेली काही रक्कम फिजिओथेरपी सेशन्स करिता तो वापरु शकेल असे आत्ता जमा माहितीवरुन वाटत आहे.

विस्कोच्या डिलीव्हरी संदर्भात पेशंटला नाव नंबर पत्ता याची माहिती दिली आहे. ते त्यांच्या इथल्या डॉक्टरशी बोलून त्या संदर्भात आता पुढे जातील. काही गरज लागली तर आम्हाला संपर्क करतील

तस्मात आमच्यामते सध्या तरी त्याच्याकडे जमा असलेल्या निधीतून हे काम होण्यासारखे आहे.

इथे आणि मेसेज करुन ज्यांनी मदतीची इच्छा व्यक्त केली त्यांचे आभार.

इथे चर्चेला योग्य दिशा देऊन मदत कार्यात हातभार लावणाऱ्या प्रत्येकाचेच आभार.

धन्यवाद __/\__

चांगलं झालं.
त्या मुलाचं पुढचं आयुष्य सुकर व्हावं.
तुम्ही आणि सुनिधी , दोघींची तळमळ, चिकाटी, इ. प्रशंसनीय आणि अनुकरणीय आहे.
सोशल मीडियाचा असाही वापर होऊ शकतो हे पुन्हा एकदा पाहूनही बरं वाटलं.

कविन आणि सुनिधी,
दोघींची तळमळ, चिकाटी, इ. प्रशंसनीय आणि अनुकरणीय आहे. + १

कविन आणि सुनिधी,
दोघींची तळमळ, चिकाटी, इ. प्रशंसनीय आणि अनुकरणीय आहे. >>>>+१.

_/\_

_/\_

Pages