शोध : एका अदृश्य शहराचा - भाग ३

Submitted by रानभुली on 13 May, 2022 - 13:07

आधीच्या भागाकडे जाण्यासाठी कृपया इथे टिचकी मारा.

"ए फटिग, अँकर नीट इन्स्टॉल कर "
" गप रे उन्मेष. कळतंय मला "
" हूक टाक. चार कॅराबिनर जोड आणि रोप सोड खाली"
" ऊं .. हूं हूं .. घे. झालं. जरा थांब आता. रोप सोडतोय"

उन्मेषने सर्वांना कमरेभोवती रोप गुंडाळून कोणती गाठ मारायची , कॅराबिनर कसा लावायचा आणि चढण्यासाठी काय काय वापरायचे याची माहिती दिली.
वरून रोप सोडलेला त्याच्या अंगावर पडला. एक टोक त्याने कमरेच्या कॅराबिनरमधून घेतले. गाठ मारली.
आणि दुसर्‍या टोकाला खाली ओढत तो वर चढू लागला.
मधेच त्याने दोर लॉक करून हवेत तरंगून दाखवले.
तिथून मग वेगाने खाली येऊन एकेकाला वर जायच्या सूचना करू लागला.
इतक्यात चहावाल्याने फोन आणून दिला.
"उन्मेष भाई, तुझी दिदी आहे. खूप वेळचा फोन करतेय "
उन्मेषने पाहिलं. झिलमिल कॉलिंग !
त्यानंतर खूप वेळ तो त्या कॉलवर बिझी झाला.
******************************************************
त्यानंतर...
जवळपास दीड महीन्यांनी आज ते गोरखपूरच्या थोडे पुढे आले होते.
चहा पराठा खाताना पुढच्या मुक्कामाबाबत चर्चा चालू होती. झिलमिलने थोडक्यात काय करायचंय याची रूपरेखा तर दिली होती.
पण कुठे थांबणार, कुठल्या मार्गे जाणार हे काही ती सांगायला तयार नव्हती. तशी अटच तिने घातली होती.
उन्मेषला थोडी फार कल्पना असल्याने त्याने इतरांना कन्विन्स केले होते.
"पुढे काय ?"
" बस्स. आलंच सिद्ध महाराज आश्रमात पोहोचू आपण "
"आपण आश्रमात रहायचं ?"
" इलाज नाही."
" अगं पण वेळ असा वाया गेला तर खर्चही वाढेल. शिवाय अशाने आपण कधी शोधणार आपल्याला हवे ते"
" पेशन्स ठेवा. सगळं सांगते तुम्हाला "

मनालीच्या हिमालयीन स्पोर्ट्स क्लब मधे मिळालेले मित्र तिच्या या मोहीमेत सामील झाले होते. उन्मेष तिच्या काकाचा मुलगा वयाने झिलमिलपेक्षा थोडा लहान होता. त्याचा हा सगळा गोतावळा होता. झिलमिल साईट सीईंग , धार्मिक यात्रा अशा कारणांसाठी हिमालयात आलेली. पण उन्मेष दरवर्षी उन्हाळ्यात त्याची सॅक बांधून सायकल ट्रक मधे टाकून हिमालयात जायचा. त्याचे माउंटन बाईक्सचे स्टंट्स युट्यूबवर लोकप्रिय झाले होते. तसा सेलेब्रिटीच होता तो. पण लहानपणापासून झिलमिलचं त्याच्याशी अजिबात जमायचं नाही. याचं कारण म्हणजे त्याचा अशांत आणि अस्वस्थ स्वभाव. तिची कोणतीही नवीन गोष्ट त्याच्या हातात गेली कि पाच मिनिटात उघडून बसणार. मग पुढे जोडता आले नाही कि जवळच्या दुकानात जाऊन शंभर दीडशे रूपये घालवणे आणि वॉरंटी गेली हे ऐकणे आलेच.

पण त्याच्या मित्रपरिवाराबद्दल तिने मनातल्या मनात फुल्ल मार्क्स दिले होते. यातले बहुतेक कार्टून्स त्याच्याच सारखे होते. यांना नियंत्रणात ठेवणे हा एक मोठा टास्क होता. सारख्या सूचना दिल्या तर हे बंड करतील ही आणखी भीती होती वरून.

त्यांची उत्सुकता तिला समजत होती. एक तर अ‍ॅडव्हेंचरच्या कल्पनेने सगळे उत्तेजित झालेले होते. त्यांना खूप काळ काहीही न सांगता कंट्रोल मधे ठेवणे पण अवघड जात होते.
तिच्या धाकट्या भावावरून "बॉईज मधे बिल्कुल पेशन्स नसतात " हे तिचे मत अजूनच पक्के झाले होते.
सगळे एक से एक अस्वस्थ आत्माज.
गरमा गरम पराठे आले होते. सर्वांसाठी आलू पराठे आणि तिच्यासाठी कोबीचे पराठे.
मुलं तुटून पडली. आपल्यापेक्षा मोठे पराठे मिळतात इथे. पण एका पराठ्याने त्यांची भूक भागत नव्हती.

पराठे खाता खाता तिने हुषारीने संभाषणाला सुरूवात केली.
" माझ्या बाबाची आणि माझी एक कोड लॅंग्वेज होती. ती मी बनवली होती लहानपणी. बाबा कधी कधी मूड मधे आला कि मला त्या कोड लॅंग्वज मधे आईला समजणार नाही असे काय काय लिहायचा. नंतर त्याने त्याची एक खास लॅंग्वेज मला शिकवली"
" ओह ! कसली लॅंग्वेज आम्हाला पण सांग ना दिदी "
" शिकवीन. आता वेळच वेळ आहे ना आपल्याकडे ? "
" अंकलनी काय लिहीलं होतं दिदी तुझ्यासाठी ?"
" बाबाने ? घरातून जाताना त्याने कुणाच्या हातात पडू नये म्हणून या आश्रमाचा पत्ता दिला आहे. शिवाय इथे काय सांगायचे ते ही लिहीलेले आहे. तू नक्कीच शोध घेशील म्हणून सांगितलेय. एकटीने दु:साहस करू नकोस. अचूक निर्णय घेशील वगैरे वगैरे लिहीलेय "
" पण अंकलनी असं कोड लॅंग्वेज मधे का लिहीले ? "
" मराठी , हिंदी, इंग्लीशच काय बंगाली, तमिळ, तेलगू अशा कोणत्याही भाषेत हा मजकूर लिहीला असता आणि पोलिसांच्या ताब्यात पडला असता तर तो केव्हांच डिकोड झाला असता "
" ग्रेट ! अंकल भारीच आहेत. तुझे बाबा ग्रेट आहेत झिलमिल दिदी "

सगळी गँग दिदी म्हणून रिस्पेक्ट देत होती तेच खूप होतं. हसूही यायचं आणि तारांबळही उडायची. यांना नेमका विषय पूर्ण सांगितला तर हे धाडकन तिथेच पोहोचू म्हणाले असते.

काकाचा आईचा विरोध मोडून काढताना बराच काळ गेला होता. ते सगळे प्रकरण आठवून आता हसू येत होतं.
तिची आई जितकी सुंदर होती तितकीच ती कणखर होती. करारी होती.
बाबा खूपदा घरी नसायचा. घरी फोन करून काही सांगायचा नाही. पण तिने हा संसार ओढला होता.

बाबाच्या माघारी त्याचे कपाट, टेबलाचा खण तपासताना तिने आईला पाहिले होते.
आईच्या या संशयी स्वभावाला ती हसायची.
" आई, तुला काय वाटत? बाबा तसा असेल का गं ? सगळ्या बायका एक सारख्याच"
" आणि तू कोण आहेस ?"
" आई ! मी अजून मुलगी आहे. तुझ्यासारखी लग्न करून नाही बसलेले "
" हो करशीलच ना पण लग्न ?"
" अज्जिबात नाही."
" बरं बघू ना "
आई हसून म्हणायची.

बाबाला केंद्र सरकारकडून बाहेरदेशी जाणार्‍या येणार्‍या लोकांची पत्रे तपासण्याचे काम मिळाले होते. त्या वेळी संगणकीकरण पूर्ण झाले नसल्याने अशा संस्थांकडून या प्रकारची कामे करून घेतली जायची. बाबाचा व्याप खूप मोठा असल्याने तो कधी कधी घरीही काम आणून उशीर पर्यंत करत बसायचा.

खूपदा झिलमिल बाबाच्या शेजारी येऊन बसायची. तिच्याशी अर्धवट बोलत, अर्धे किंवा जास्त लक्ष कामाकडे ठेवत तो तिला मग एखादे काम द्यायचा. कपाटातल्या एका विशिष्ट खणातली मोठी रिकामी पाकिटे घेऊन ये म्हणायचा. त्या पाकिटाच्या कागदाला आतून जाळीचं कापड असायचं. विरलेलं कापड असावं असं.

तिने जास्त डिस्टर्ब करू नये म्हणून मग तो तिला काही चिकटवून बंद केलेली पत्र त्या पाकिटात घालायला सांगायचा.
"या पाकिटात हे पत्र टाक , पाकिटाचे तोंड चिकटवून बंद कर. आता हे सील मेणबत्तीवर गरम करून त्याच्यावर लाव आणि हा शिक्का त्यात उमटव. शाब्बास.. याला म्हणतात सीलबंद पत्र. समजलं ?"

एकदा सगळे जण कधी नाही ते हॉलमधे निवांत बसलेले असताना झिलमिलने विचारले.
" बाबा तुझी किती ऑफीसेस आहेत रे एकूण ?"
" अगं वेडू म्हणजे काय ? एकच तर आहे "
" आणि हेडऑफीस ?"
" एकच तर आहे , मग तेच हेड ऑफीस "
" बाबा तू सीक्रेट एजंटचं वगैरे काम करतोस का रे ?"
यावर बाबाला ठसका लागला. एकदम शॉक लागल्यासारखा उडाला. आईनेही चमकून पाहिले.
" झिलमिल, काहीही विचारत असतेस "
" पण तू असं का विचारलंस बेटा ?"
" कारण तुझ्या काही पत्रांवर हेडक्वार्टर लिहीलेलं असतं आणि वरच्या बाजूला सांकेतिक लिपीत काहीतरी लिहीलेलं असतं "
" अस्स होय, अगं तसं काही नाही. ते पत्र कुठे पाठवायचं हे लक्षात रहावं म्हणून लिहीलेलं असतं. तू कुठून असे तर्क लढवतेस ?"
" जेफ डॉमनिक च्या एका नॉव्हेल मधे आहे असं "
" जेफ डॉमनिक ?"
" स्पाय स्टोरीज म्हणून याहू वर एक कम्युनिटी आहे. तिची मेंबरशिप घेतली कि पीडीएफ स्टोरीज येतात ईमेल मधे. तिथला आघाडीचा लेखक आहे तो "
" ओह. हे मला काही माहिती नाही. मला तर निरक्षर असल्यासारखे वाटू लागले आहे"
बाबा असे म्हणत उठून गेला. आई मात्र विचारात पडली होती.

झिलमिलने मात्र बाबाच्या मागे सांकेतिक लिपी शिकण्याचा लकडा लावला होता.
पुन्हा तिने चारचौघात असले काही आरोप करायला नकोत म्हणून त्याने लिपी कशी बनवायची, कशी ओळखायची, अनोळखी लिपीचं डिकोडिंग कसं करायचं यामागचं तर्कशास्त्र शिकवलं होतं. जेव्हढा सराव करशील तेव्हढी तू यात पारंगत होशील असे सांगितले होते.

त्यानंतर तिला वेडच लागले होते. छंद असावा तसे. पण तो छंद तिने सीक्रेट ठेवला होता.
बाबाच्या आणि तिच्या गप्पांकडे आई एकटक कौतुकाने बघत रहायची. लक्ष देऊन ऐकायची.

विशेषत: प्राचीन लिपीचा विषय आला कि ती समजून घ्याय़चा प्रामाणिक प्रयत्न करायची. तिला किती समजायचं ते कळायचं नाही. पण झिलमिलला आईला तसं ऐकताना पाहून हसायला यायचं. मग आई लटक्या रागाने तिच्याकडे बघायची. बाबाच्या हे लक्षात आलं की मग आईची फिरकी घेण्याचा कार्यक्रम सुरू व्हायचा.

किती सुंदर दिवस होते ते !
गाडीला ब्रेक लागताच बसलेल्या झटक्याने ती भानावर आली.

पंचेचाळीस तासाचं अंतर कापून ते इथपर्यंत पोहोचले होते. एकच रात्र ते एका मोटेल मधे झोपले होते. तेव्हढा वेळ वजा केला तर अधे मधे जेवण आणि इतर गरजेच्या गोष्टींसाठीच रस्त्यात थांबले असतील.

सिद्ध महाराज किंवा सिद्धाश्रम आला होता.
तिने बाहेरूनच पाहिलं.

मोठ्ठंच्या मोठ्ठं होर्डिंग होतं.
त्यावर भगवान शंकराचं भलं मोठं चित्र होतं आणि पाठीमागे कैलासाची खूण होती.
सिद्धाश्रमाच्या सर्वच बोर्डावर कैलासाची ती विशिष्ट खूण होती.

बाबाने डायरीत त्या खूणेचं चित्रं काढलं होतं.
ते कैलासाचं आहे हे ओळखायला तिला मेहनत घ्यावी लागली होती. आणि खाली झोपडी दर्शवणार्‍या चार रेषा आणि त्यावर ओम रेखाटलेला.
ते डिकोड केल्यावर हा आश्रम आहे हे तिला समजले होते.

कैलास पर्वत आणि आश्रम हे शोधताना तिला सिद्धाश्रम सापडले होते.
बाबाच्या एका पाकिटावर पण सांकेतिक भाषेत सिद्धाश्रम लिहीलेले होते.

कोणती लिपी होती ती ?
सम्राट अशोकाच्या स्तंभावरची ?
सिद्धाश्रम हा शब्द तेव्हांच तिच्या डोक्यात बसला होता.
त्याचं कोडिफिकेशन करतानाच ही दिसते फार्सीसारखी आणि संस्कृतसारखीही.
वाचणारा एक तर संस्कृत किंवा फार्सी समजून डिकोड करेल आणि गोंधळात पडेल हे तिच्या तल्लख बुद्धीने हेरलं होतं.
म्हणजेच ही पत्र साधीसुधी नव्हती तर.
जर ती कुणाच्या हाती पडली तर कदाचित अनर्थ होणार असावा.

बाबाच्या सावध राहण्याचा अर्थ आता तिला नीट समजला होता.

हे सगळं या कार्टून्सला कधी सांगायचं याच्या विचारातच तिने आश्रमात पाऊल टाकलं.

(पुढील भागाकडे जाण्यासाठी कृपयाइथे टिचकी मारावी).

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सर्वांचे.
पुढचे भाग यायला वेळ होत असल्याने जी गैरसोय होतेय त्याबद्दल मनापासून क्षमा करा ही विनंती.
मध्यंतरी असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे, काहिलीने काही सुचत नव्हते आणि टायपिंग साठी बसणे अशक्य झाले होते. आपण आपला अमूल्य वेळ देऊन वाचत आहात याची जाणीव आहेच. मात्र या कथेच्या प्लॉटमधे द्यायच्या तपशीलांची माहिती पुढचा भाग लिहीण्याआधी पुन्हा पुन्हा तपासून देताना थोडा वेळ लागतो आहे. आपण समजून घ्याल ही आशा आहे. चुकभूल देणे घेणे.
__/\__

हा भागही मस्त..!!
एकंदरीत कथाबीज पाहता तुला लिहायला वेळ लागणार हे लक्षात येते.. पुढील लेखनास खूप शुभेच्छा तुला..!!