भारत का दिल देखो : (पाककृती ) बाळकांद्याचे उन्हातले लोणचे

Submitted by मनिम्याऊ on 12 May, 2022 - 03:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ दिवस
लागणारे जिन्नस: 

लहान कांदे १/२ किलो
कैऱ्या - ३ (मध्यम आकाराच्या)
कैरी लोणचे मसाला - १०० ते १५० ग्रॅम
मीठ - ३-४ चमचे (अन्दाजानुसार कमी जास्त करावे)
काचेची बरणी
कडकडीत ऊन

क्रमवार पाककृती: 

'भारत का दिल देखो' या माझ्या मध्यभारतीय लोकजीवनावर आधारित असलेल्या मालिकेत एक खास वैदर्भीय प्रकार सांगते तो म्हणजे उन्हातले लोणचे. विदर्भातील कडक ऊन सर्वपरिचितच आहे. या अशा कडकडीत उन्हात इतर वाळवणांबरोबरच घातले जाते उन्हातले लोणचे. हे अनेक प्रकारचे असते पण प्रामुख्याने लिंबाचे ऊन-लोणचे प्रसिद्ध आहे. त्यामानाने कांद्याचे लोणचे इतके केले जात नाही. पण हा एक अफलातून चवदार प्रकार आहे. करून बघा.

छोटे छोटे १/२ किलो कांदे निवडून आणा.
कांद्यांची साले काढून प्रत्येकी ४ फोडी कराव्यात.
कैऱ्या साल काढून किसून घ्याव्यात
आता कैरीचा किस आणि कांद्याच्या फोडी एकत्र करून त्यात मीठ आणि लोणचे मसाला मिसळून घ्यावा. (मी शक्यतो केप्र लोणचे मसाला वापरते. त्याने घरगुती चवीच्या बऱ्याच जवळ जाणारी चव मिळते असा अनुभव आहे)

काचेच्याच बरणीत भरून कडकडीत उन्हात ३-४ दिवस ठेवून द्यावे. रोज साधारण ५-६ तास कडक ऊन मिळायला हवे
कांदा चांगला मुरला की मऊ पडतो. त्यानंतर शक्यतो फ्रीज मध्ये ठेवावे

वाढणी/प्रमाण: 
एक बार खाओगे तो खाते रह जाओगे...
अधिक टिपा: 

तेल अजिबात लागत नाही.

चपाती/पोळी/पराठ्यासोबत तर खातातच पण याची चव सर्वात जास्त दहीभाताबरोबर खुलून येते.

माहितीचा स्रोत: 
पारंपरिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

कालच अगदी छोटे बाळ कांदे दिसले होते , तेंव्हा वाटले होते काहीतरी करावे की काय

मस्तच

बाळकांदे म्हणजे पांढरे कांदे का ? जे छोटे असतात ते ?

छान दिसतंय लोणचं. ताजी कांदा कैरी बरेचदा करते त्यातला कुरकुरीत/क्रंची कांदा छान लागतो. इकडे पुण्यात कांदा कैरी प्रकार माहीत नव्हता. कच्चा फणस कैरी लोणचं पण छान लागतं.

छान आहे पाकृ... आता या मालिकेतील इतरही पाकृ बघते.
किती दिवस टिकतं हे लोणचे ?

छान रेसिपी , माबोकर मुण्मयी आठवली ती पण याच रेसिपीने करायची लोणच, हे आणी वाळवलेल्या भेन्द्र्याच लोणच याचा नेहमी उल्लेख असायचा.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद
>>>>बाळकांदे म्हणजे पांढरे कांदे का ? जे छोटे असतात ते ?>>
कोणतेही छोटे कांदे. लाल /पांढरे कोणतेही.

>>कच्चा फणस कैरी लोणचं पण छान लागतं. >>
हो. ते मात्र जून महिन्यात घालायच.

>> किती दिवस टिकतं हे लोणचे >>
फार जास्त नाही टिकत. महिन्यात संपवावे. म्हणूनच एका वेळी फक्त अर्धा किलोचे घालायचे

>>>हे आणी वाळवलेल्या भेन्द्र्याच लोणच याचा नेहमी उल्लेख असायचा.>>
वाळवलेल्या भेन्द्र्याच लोणच... तोंडाला पाणी...

छान पाकृ.
मला ही सिरीज आवडते. हटके आणि विविध प्रांतातल्या रेसिपीज कळतात.

छान

धन्यवाद नगरीच.
<<<फोडणी नाही? किती दिवस टिकते>>>
फोडणी नाही त्यामुळे फ्रीज मध्ये महिनाभर टिकते. बाहेर ठेवल्यास ८-१० दिवस. म्हणून मग छोट्या छोट्या बॅचेस मध्ये करायचे. एप्रिल पासून जून पर्यंत २ ते 3 वेळेला होते.