मलाच झेलणं सोपं नाही!

Submitted by मुग्धमानसी on 21 April, 2022 - 10:32

तुझं काहीच चुकत नाही...
मलाच झेलणं सोपं नाही!

मी भुरभुर पावसासारखी तुझ्या मातीत रुजले असते
रंगा-गंधा-स्पर्शातून मी तुला स्पष्ट दिसले असते...
तर... तूही थरथरला असतास...
ओंजळभर हुळहुळला असतास...
पण मी काही बरसत नाही
चामडीबाहेर पसरत नाही
तुझं काहीच चुकत नाही...
माझंच कोडं सोपं नाही!

मी तुझ्या वाटेवर कधी हिरवळ झाले असते
कधी काटे, कधी खडे, चिखल ओंगळ झाले असते
तर तुलाही माझ्यासाठी हसू-रडू आले असते?
पण... मी तर झुळूक झाले! मला कुठलीच वाट नाही.
असलीच तरी ती काही तुझ्या वाटेला जात नाही.
तुझं काहीच चुकत नाही...
मलाच सोसणं सोपं नाही!

मला बोलता आलं असतं... समजा...
तर तुला कान फुटले असते?
तुला डोळे कळते माझे...
तर मी हमसून रडले असते?
माहीत नाही नक्की कधी कसे काय झाले असते...!

मी निमुट फुलले असते अन् तशीच चुरगळले असते...
तर तुझ्याही शेजेवरती चांदणे दरवळले असते... हो ना?
पण मी उमलण्याचे शोधत बसते कारण
माहीत नाही कसले कुठले भ्रम करते धारण
मी मुकाट जळत नाही.
धड निमुट विझत नाही.
उमलत नाही सुकत नाही.
कचरा होऊन कुजत नाही.
काय करावं माझं मग ते तुला काही उमजत नाही.
तुझं काही चुकत नाही...
मीच कळणं सोपं नाही!

हेच खरं आहे पण... एक तुला विचारू का?
मी तुला न कळणं - तुला कधी कळलं का?
कळलं असेल समजा तर ते बोचत असेल ना खोलवर?
त्याच खोलात मार बुडी अन् शोध मला... जमलं तर....

तू बुडी मारत नाहीस
माझ्यामध्ये शिरत नाहीस
तोवर तूच तुझ्यामध्ये
पुरेसा मुरत नाहीस.
पण तरिही खरंय की तुझं काही चुकत नाही....
पावसानं कुठं किती पडावं... ते तुझ्या हातात नाही!

मलाच झेलणं सोपं नाही!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वाह