कौन प्रवीण तांबे? - एका वेड्या स्वप्नाची कहाणी

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 April, 2022 - 19:31

आज रात्री जेवून झाल्यावर जेव्हा मी बायकोला म्हटले मला प्रवीण तांबेचा पिक्चर बघायचा आहे तेव्हा बायकोने हेच विचारले ... कोण प्रवीण तांबे?

एक्झॅक्टली हेच पिक्चरचे नाव आहे - कौन प्रवीण तांबे?

बायकोने काय स्टोरी आहे विचारले.
मी थंडपणे म्हणालो, आयपीएल खेळणारा एक क्रिकेटर आहे. त्याची कथा आहे.

अरे देवा.. आधीच दिवसरात्र तुझे आयपीएल सुरू झालेय, ते कमी आहे की आता पिक्चरही आयपीएलचाच बघणार आहेस... बायकोची वैतागलेली प्रतिक्रिया!

आमचे संभाषण ऐकून आतल्या खोलीतून आई बाहेर आली. कोण रे, तुझ्या ऑफिसमध्ये ज्याचा भाऊ होता तो का?
मी होकारार्थी मान डोलावली.

काय बोलतोस? त्याच्यावर पिक्चर आला?? - आईची आश्चर्याने ओथंबलेली प्रतिक्रिया.

अर्थात मी देखील त्याचा भाऊ आमच्या ऑफिसमध्ये आहे हे आईला कौतुकाने तेव्हाच सांगितले होते जेव्हा तो चमकला होता.
पण तरीही त्याच्यावर पिक्चर? जे मलाच पचवणे अवघड होते ते त्यांना कसे पटवून देणार होतो?

मग मी शांतपणे त्यांना ट्रेलर दाखवला.
https://www.youtube.com/watch?v=5XZia9c4fVU

मला हा ट्रेलर आवडलेला. त्यांनाही आवडला. म्हणून सर्वांनी एकमताने चला बघूया म्हटले,

आणि सुरू झाला आमचा "कौन प्रवीण तांबे?" या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रवास Happy

चित्रपटाच्या सुरुवातीलाच जेव्हा खुद्द `द वॉल राहुल द्रविड' म्हणतो की आज मी तुम्हाला सचिन, गांगुली, लक्ष्मण, कुंबळे यांची नाही तर प्रवीण तांबेची स्टोरी सांगणार आहे, तेव्हाच आपल्याला विश्वास बसतो की आता आपण काहीही उथळ बघणार नाही आहोत.

एका टिपिकल चाळीतील, टिपिकल मध्यमवर्गीय मराठी घर. आई बाप दोन पोरे. त्यापैकी एक पोरगा चित्रपटाचा नायक म्हणजेच प्रवीण तांबे. त्याचीही एक बायको. थोडक्यात चाळीशीत पोहोचलेला एक मध्यमवर्गीय संसारी माणूस. ज्याला क्रिकेटचे वेड. पण हे वेड चारचौघांसारखे क्रिकेट बघण्याचे नसून क्रिकेट खेळण्याचे वेड आहे. आणि एकदा तरी नॅशनल लेव्हलला म्हणजे रणजी सामन्यात खेळायचे हे त्याचे वेडे स्वप्न.

असे स्वप्न या देशात कित्येक युवा बघत असतील. मोजक्यांचीच पुर्ण होतात, ज्यांना आपण ओळखतो. बाकी सारे जण ती केव्हा सोडून देतात किंवा आयुष्यभर कवटाळून बसतात, याची आपल्याला कल्पनाही नसते.

अश्याच एका वेड्या स्वप्नाची ही कहाणी - कौन प्रवीण तांबे

क्रिकेट खेळायला मिळावे म्हणून जिथे क्रिकेट खेळले जाते अश्याच कंपनीत नोकरी करणे. भले त्यासाठी पडेल ते काम करावे लागले तरी हरकत नाही. मग ते वेटरचे का असेना, आपल्या शैक्षणिक पात्रतेचे का नसेना. पण ते काम सुद्धा जिद्दीने शिकून आत्मसात करणे आणि आवडीने करणे, कारण त्याचमुळे आपल्याला क्रिकेट खेळायला मिळतेय याचे भान असणे. स्वप्नांच्या मागे धावताना कुटुंबाची जबाबदारीही न विसरणे. संकटांना झुगारून देणे, अपयशातही न डगमगणे, अपमानांना पचवणे, अपघातातून सावरणे हे एखाद्या खेळाडूच्या स्ट्रगल स्टोरीत असणारे सारे टप्पे ईथेही आपल्याला दिसतात.

पण स्तिमित करून जाते ते त्याचे वय. कितीही म्हटले, "एज ईजे जस्ट अ नंबर" तरी आपल्या आजूबाजूचा समाज आपल्याला आपल्या वयाची जाणीव करून देतोच. "वाटत नाही हं तुझे वय ईतके", असे कोणी कितीही म्हटले तरी आपल्याला वागणूक मात्र आपल्या खर्‍या वयाला अनुसरूनच मिळते. आणि जे क्रिकेट खेळतात , बघतात त्यांना नक्कीच समजू शकते की ४१ हे वय काय असते एखाद्या खेळाडूसाठी... एण्ड ऑफ करीअर.. पण नाही!

४० वर्षांचा सचिन तेंडुलकर आयपीएलसह क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतो.
आणि ४१ वर्षांचा प्रवीण तांबे आपला पहिला आयपीएल सामना खेळतो.

४२ व्या वर्षी तो आपले स्वप्न पुर्ण करणारा पहिला रणजी सामना खेळतो.
तर ४५ वर्षे पुर्ण झाल्यानंतर मुंबईतर्फे आपला पहिला "लिस्ट ए" एकदिवसीय सामना खेळतो.

४१ वर्षांपर्यंत खेळणे आणि ४१ वर्षानंतर खेळायला सुरुवात करणे यात फार मोठा फरक आहे. तोपर्यंत तग धरून ठेवणे, आशा मावळू न देणे, प्रयत्न करायचे न सोडणे...,म्हणजे तो खरेच वेडाच होता असेच चित्रपट संपता संपता वाटतेच.

तसेही आयुष्यभर जो मध्यमगती गोलंदाज म्हणून मुंबईच्या रणजी संघात जागा मिळवू ईच्छित होता तो वयाची चाळीशी जवळ आल्यावर स्पिन गोलंदाजी करायला सुरुवात करतो हा देखील एक वेडेपणाच झाला.

चित्रपटात एक चांगला डायलॉग आहे - आयुष्य असो वा क्रिकेटची मॅच, तुम्हाला फक्त एका चांगल्या ओवरची गरज असते.

चित्रपटात जेव्हा त्याचे स्ट्रगल संपून त्याला यश मिळताना दाखवलेय त्या सामन्यात निर्णायक क्षणी तो गोलंदाजीला येतो आणि त्या ओवरला चक्क हॅट्रीक घेत सामना जिंकवून देतो. ते पाहून मन एकदम खट्टू झाले. अरे एवढा चांगला चित्रपट बनवला, उगाच कश्याला हॅट्रीक वगैरे दाखवून सिनेमेटीक लिबर्ट्री घेतली असे झाले.

पण तरी खरे खोटे बघूया म्हटले. पिक्चर तिथेच पॉज करून गूगल केले. नक्की घेतली होती का याने कधी हॅट्रीक हे चेक करायला... तर खरेच... एक नाही तर चक्क दोन हॅट्रीक सापडल्या, ईतकेच नाही तर त्याचे बरेच पराक्रम आढळले. जे चित्रपटात दाखवले नाहीत, म्हणून विकीवरून कॉपीपेस्ट करून ईथेच डकवतो.

Pravin took a hat-trick against Kolkata Knight Riders on 5 May 2014 in Ahmedabad by dismissing Manish Pandey, Yusuf Pathan and Ryan ten Doeschate which also helped him to earn the man of the match award.
He also got the purple cap for the first time in his career by becoming the highest wicket taker in IPL 2014 (till the 25th match).
He ended 2014 IPL season on a high by taking 15 wickets. he was also the leading wicket taker for Rajasthan Royals in 2014 season.

in 2013 Champions League Twenty20 He received the Golden Wicket award (for taking most wickets in the tournament)
He ended up taking 12 wickets in five matches with an impressive average of 6.50
He was also the most economical bowler for the Royals in the 2013 CLT20 final against the Mumbai Indians where he delivered a crucial spell of 2/19 in 4 overs.

T10 format - he set a record by becoming the first player to take a 5 wicket haul in the history of T10 format when he dismissed Chris Gayle, Eoin Morgan, Kieron Pollard, Fabian Allen and Upul Tharanga.
In the same match, he coincidentally completed a hat-trick by dismissing Morgan, Pollard and Allen on consecutive balls.
He also became the second player after Shahid Afridi to take a hat-trick in T10 league.

In July 2020, He became the first Indian cricketer to get a contract in the CPL. On 26 August 2020, he played in the match between Trinbago Knight Riders and the St Lucia Zouks, to become the first ever Indian cricketer to play in the CPL......... आणि तेव्हा तो ४८ वर्षांचा होता Happy

.. तरीही प्रवीण तांबे कौन है हा प्रश्न पडत असेल वा नसेल, क्रिकेटप्रेमी असाल वा नसाल, तरी नक्की बघा हा चित्रपट. चित्रपटात गाणी नावाचा फारसा प्रकार नाही. श्रेयस तळपदेने या आधीही ईक्बालमधे एका क्रिकेटरची भुमिका केलेली. यातही तशीच जान ओतली आहे. तो आणि त्याच्या मराठमोळ्या मध्यमवर्गीय घरातले वातावरण छान दाखवले आहे. चित्रपट कुठेही रेंगाळत नाही, की बोअर करत नाही. ईतक्या वर्षांचे स्ट्रगल आहे, कसे करणार म्हणा Happy

कुठे बघू शकता? - मी हॉटस्टारवर बघितला

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच होता.. सुरवात ते शेवट एकदमच जबरदस्त..सगळ्यांनीच भारी काम केलंय.. आवडलेला डायलॅाग- ज्यादा सोचनेका नही, जहा सोचा वही लोचा

मस्त लिहीले आहे! कालच ट्रेलर बघितला. द्रविड च्या मुलाखतीची क्लिप काही दिवसांपूर्वी पाहिली होती. नक्कीच बघायचा आहे पिक्चर!

विषयाशी प्रामाणिक चित्रपट आहे. सगळ्यांची कामे छान आहेत.
मध्ये मध्ये सहज ओघात येणारे मराठी संवाद छान वाटतात.
positivity आणि motivation देणारा चित्रपट वाटला , उगाचच आसूगाळू नाही.
श्रेयसचा फीटनेस कमाल आहे.

धन्यवाद ! रुन्मेष .
छान लेख लिहिलाय .
प्रवीण तांबे बद्दल ची माहिती विस्मरणात गेली होती .
पण आता पुन्हा चकाकून निघाली आहे .
थोड्याच वेळात मुलांसोबत बघायला सुरवात करतो !!

छान लेख
प्रवीण तांबे ची कहाणी ही it's never too late
प्रकारातली आहे म्हणून आवडली
नक्की बघणार हा चित्रपट
मला क्रिकेट फारसे आवडत नसले तरीही

जबरदस्त !
अप्रतिम !!!!
प्रवीण तांबे इतका संघर्ष करून यशस्वी झाला हे माहीत नव्हते .
कुठेही बोअर होत नाही , मुलाला तर खूप आवडला !
श्रेयस च्या अभिनयात कृत्रिमपणा अजिबात जाणवला नाही .
सिनेमा संपे पर्यंत श्रेयस म्हणजेच प्रवीण तांबे हे समीकरण डोक्यात फिट्ट बसते .
प्रवीण च्या बायकोची भूमिका करणाऱ्या अंजली पाटील ने छान केली आहे .
गल्ली क्रिकेट खेळून जिंकलेली बक्षिसे तो विकून संसार चालवतो , मिळेल ती नोकरी करतो .
शेवट थोडा बॉलिवूड स्टाईल दाखवलाय असे वाटते .
प्रवीण वर जळणारा स्पोर्ट्स जर्नालिस्ट साडी नेसून प्रवीण ला ओवळतो ते दृश्य !

वर्णद्वेशासाठी असलेली बंदी उठल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या टीममधे पन्नाशीचे खेळाडूही होते. मुख्य खेळाडूंचे सरासरी वय ४० च्या पुढे होते. १९९० - ९१ साली जेव्हां दक्षिण आफ्रिकेची टीम भारतात आली तेव्हां तीत तिशीच्या आसपासचे खेळाडू घेतले गेले होते. अ‍ॅलन डोनाल्ड तिशीचा होता आणि त्याच्या जोरावर टीमचा दबदबा होता. पण अनुभवी खेळाडू चाळीशीच्या पुढचेच होते. काही चाळीशीला पोहोचलेले होते. नवीन खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव नाही हे कारण होते. क्रेग मॅथ्यूजची कामगिरी उत्तम होती. त्याचे वय २७ होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पदार्पणाचे हे वय नसते. कप्तान क्लाईव्ह राईसच ४२ वर्षांचा होता.

झिंबाब्वेच्या टीममधेही सुरूवातीला चाळीशीच्या पुढचेच खेळाडू असायचे. अँडी फ्लॉवर ४४ वय असताना खेळलेला आठवतोय.
या दोन्ही टीमचं रूपांतर वेगाने व्यावसायिक टीममधे झालं.

सनथ जयसूर्या ४२ च्या चर्षी शेवटचं खेळला होता. शेवटपर्यंत तो उत्तम खेळत होता.
१९३५ साली जॅक हॉब्स नावाचा खेळाडू इंग्लंडकडून ५२ व्या वर्षी क्रिकेट खेळत होता. हे रेकॉर्ड असेल कदाचित. पहिल्या महायुद्धामुळे तरूण मुलं फौजेत भरती झाली होती हे कारण असावे.

सी के नायडू भारताकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ४१ व्या वर्षी खेळले. पण पहिल्या दर्जाचे क्रिकेट ६१ व्या वर्षीपर्यंत खेळत राहीले.
अशा काही आणखी खेळाडूंची यादी.
https://www.sportskeeda.com/slideshow/cricket-all-time-40-world-xi?ref=t....

Thanks Hrinmesh for the Article on Praveen Tambe. Jabardasttt. Thanks Chapras for the twitter link of Praveen reaction after watching the movie. Its very touchy. Emotional

खऱ्या प्रवीण ची रिएक्शन चित्रपट पाहिल्यानंतर >>>>>>>>>>
सकाळी मुव्ही आणि हा व्हिडिओ आता पाहिला !
/\

सिनेमा म्हणून बोअर झाला

बहुतांश वेळ स्ट्रगल आणि शेवटच्या १२ मिनिटां मधे सकारात्मक क्लायमॅक्स. त्यातही राहुल द्रविडला तांबे बद्दल कसं कळलं, कुणाकडून कळलं, डायरेक्ट आयपीएल खेळायची ऑफर कशी दिली हे विस्तारानी येत नाहीं.
नुसता कुरुविला ला द्रविडचा व्हिडीओ कॉल आला आणि त्याने तांबे ला विचारलं, इतकंच आहे.

अभिनय चांगला असला तरी कथा अजून फुलवायला हवी होती

मस्त सिनेमा. मुंबईत असे अनेक तांबे पहाण्यात असल्याने सिनेमा हृदयाला भिडला. गल्ली क्रिकेट मधले बारकावे बघुन तर नॉस्टॅल्जिक झालो. आय्पिएलचे खरंच आभार मानायला हवेत, होतकरु/मेहनती क्रिकेटर्स्ना संधी आणि रेकग्निशन दिल्याबद्दल. आवर्जुन बघा...

हाच प्रवीण एखाद्या क्रिकेटर चा मुलगा किंवा एखाद्या श्रीमंत घरातील कुलदीपक ( दादा सारखा) असता तर?
कदाचित तो विशीतच भारतीय संघात आला असता.. आज इतिहास वेगळा असता...
किती कुजवला त्याला...

खऱ्या प्रवीण ची रिएक्शन चित्रपट पाहिल्यानंतर-
>>>>

मस्त.. सोबत मुंबई रणजीचे सहकारी नायर, कुलकर्णी, सध्याचा ऊभरता सितारा अय्यर आदींना बघूनही छान वाटले. पन्नास वर्षांचा आहे तो आता. बिलकुल वाटत नाही..

आवडलेला डायलॅाग- ज्यादा सोचनेका नही, जहा सोचा वही लोचा
>>>>
हो, तो टिपिकल श्रेयस तळपदे टाईप्स डायलॉग आहे Proud

प्रवीण च्या बायकोची भूमिका करणाऱ्या अंजली पाटील ने छान केली आहे .
>>>>>>
हो, आणि दिसायला ती सोनाली कुलकर्णी (सिनिअर) सारखी वाटते Happy

मुंबईत असे अनेक तांबे पहाण्यात असल्याने सिनेमा हृदयाला भिडला. गल्ली क्रिकेट मधले बारकावे बघुन तर नॉस्टॅल्जिक झालो
>>>>>

+७८६
या आठवणींवर फुरसतीने आणि हक्काने एकदा लिहायलाच हवे Happy

किती कुजवला त्याला...
>>>>
पिक्चरमध्ये तरी त्याच्याशी काही पॉलिटीक्स झाली असा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष उल्लेख आढळला नाही. तो स्पिन फार नंतर टाकू लागला. ऐन ऊमेदीत मध्यमगती गोलंदाज होता. कदाचित तितकासा प्रभावी नसावाही म्हणून सिलेक्शन होत नसावे.

त्याच्यासोबत ॲबी कुरुविल्लाही दाखवला आहे. नंतर तोच त्याची मदतही करतो. ते बघूनही छान वाटले.

हो, आणि दिसायला ती सोनाली कुलकर्णी (सिनिअर) सारखी वाटते Happy
>>> अर्रर्रर्रर्र... असे नको रे म्हणू... अंजली सुंदर आहे...आणि अभिनयही कळतो तिला.. न्यूटन किंवा माय क्लायंट वाईफ बघा...

अंजली सुंदर आहे >>> हो. सो कूल सुद्धा छान आहे. मराठी मुली मला नेहमीच सुंदर वाटतात Happy

आणि अभिनयही कळतो तिला.. न्यूटन किंवा माय क्लायंट वाईफ बघा... >>>> सुचवल्याबद्दल धन्यवाद. तिच्यासाठी मुद्दाम बघावे असे काही नाहीये पण पिक्चर चांगले असतील तर जरूर बघेन Happy

जबरदस्त मूव्ही आहे. शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. सगळ्यांची कामं मस्त जमून आली आहेत. मराठी कॅरेक्टर्स मराठी लोकांनी सादर केल्यामुळे त्यांचं मराठी खूप नैसर्गिक जमलंय.

त्या पत्रकाराला तांबेची का एवढी चीड असते कळत नाही. कुठल्या पत्रकारावर ते व्यक्तिचित्रण आहे, बोरिया मजुमदार?

मला पण एक असाच गल्ली क्रिकेट मधील गोलंदाज माहित आहे, योगायोगाने त्याचे नाव पण प्रवीण आहे. चेंडू इतका सुसाट येत असे की दांडके तरी गुल होईल नाहीतर अंग शेकून निघेल. पण प्रत्येकाला योग्य मार्गदर्शक मिळेलच याची खात्री नसते.

Pages