राजधानीची सफर (भाग-२)

Submitted by पराग१२२६३ on 29 March, 2022 - 07:00

खेरवाडीला संध्याकाळी 6:48 वाजता तपकिरी रंगातील कल्याणच्या WCAM-2 इंजिनासह संक्रेल गुड्स टर्मिनलकडून आलेली आणि छत्रपती शिवाजी महाराज (ट) कडे निघालेली पार्सल विशेष एक्सप्रेस क्रॉस झाली. 19:05 वाजता लासलगाव आले. स्टेशन ओलांडत असताना तिथे आणखी एक एक्सप्रेस गाडी लूप लाईनवर उभी करून आमच्या ‘राजधानी’ला मार्ग मोकळा करून देण्यात आला होता. ती होती लोकमान्य टिळक (ट)हून पाटण्याला निघालेली एक्सप्रेस. लासलगाव स्टेशनमधून ‘राजधानी’ बाहेर पडत असतानाच WAG-7 कार्यअश्वांची एक जोडी गाडीविनाच नाशिक रोडकडे निघून गेली.

दरम्यान, गाडीत असलेला OBHK वाला डब्यात साफसफाई करून गेला. ठीक 19:19 ला ‘राजधानी’ने मनमाड जंक्शन ओलांडलं. रात्री 8:01 वाजता आमची ‘राजधानी एक्सप्रेस’ आणि WAP-7 इंजिनासह धावणारी दानापूर-पुणे एक्सप्रेस एकाचवेळी चाळीसगाव जंक्शन ओलांडून आपापल्या गंतव्याच्या दिशेने निघून गेल्या. पुढच्या 10 मिनिटांतच जेवण दिले जाऊ लागले. आमच्या कंपार्टमेंटमधल्या त्या कुटुंबानं गाडीतल्या जेवणाबरोबरच स्वत:जवळचं जेवणही बाहेर काढलं. सगळ्यांचं जेवण होईपर्यंत पुढचा अर्धातास गेला.

जळगाव जंक्शन - ‘राजधानी’चा तिसरा थांबा. तिथे गाडीचे चालक, गार्ड, तपासनीस, गाडीतील पोलिस सगळे बदलले गेले. ‘राजधानी’ जळगावमध्ये येताच पलीकडच्या दोन नंबरच्या फलाटावरून भुसावळ-सुरत एक्सप्रेस सुटली. ‘राजधानी’ आत येण्याचीच ती वाट पाहत उभी होती. जळगावात आलेलेही आपल्या सीटवर स्थानापन्न झाल्यावर डब्यातलं वातावरण झोपाळू होऊ लागलं होतं. दरम्यान, 21:13 वाजता पुरी-अहमदाबाद एक्सप्रेस शेजारून झुमझुमझुम करत निघून गेली. पुढच्या दोनच मिनिटांत भुसावळ जंक्शन ओलांडले. तिथे लोकमान्य टिळक (ट)हून बरौनी जंक्शनकडे जाणाऱ्या विशेष एक्सप्रेसला ओलांडून ‘राजधानी’ पुढे निघाली. त्याचवेळी फलाट 5 वर गोरखपूर-लोकमान्य टिळक (ट) एक्सप्रेस उभी असलेली दिसली, तर भुसावळच्या बाहेर पडत असताना मधल्या सिग्नलला नागपूर जंक्शन-पुणे जंक्शन हमसफर एक्सप्रेस फलाटाकडे जाण्याची परवानगी मिळण्याची वाट बघत उभी होती. पुढे वाटेत अनेक मालगाड्या, मेमू, सेवाग्राम एक्सप्रेस अशा गाड्या आम्हाला क्रॉस होत गेल्या. आता मुंबईपासून गाडीत ऐकवले जात असलेल्या गाण्यांच्या धूनही बंद झाल्या होत्या.

वेगानं पळणारी ‘राजधानी’ रात्री 11:41 ला अचानक हर्दा स्थानकात थांबली. जळगाव जंक्शनपर्यंत उशिरा धावत असलेल्या ‘राजधानी’नं आता चांगलाच वेग पकडला होता. ती तिच्या नियोजित वेळेच्या साधारण 20 मिनिटं आधीच मधली स्थानकं पार करू लागली होती. दरम्यान, डब्यात सगळे झोपलेले असल्यामुळे शांतता पसरलेली होती आणि त्यात वेगानं धावत असलेल्या ‘राजधानी’च्या ‘टापां’चा ऐकू येणारा आवाज मस्त वाटत होता. मध्यरात्री 12:13 ला बनापूर आणि त्यानंतर 12:24 ला खुटवांसा स्थानकं ओलांडताना ‘राजधानी’ला लूप लाईनवर जावं लागलं. कारण तिथे मुख्य मार्गावर इटारसी जंक्शनच्या दिशेनेच जाणाऱ्या मालगाड्यांना रोखून ठेवण्यात आले होते. पुढे 12:41 ला इटारसी जंक्शन ओलांडले. गाडीत अधूनमधून आरपीएफचे जवान गस्त घालत होतेच. पँट्री कर्मचाऱ्यांचीही आता झोपायले होते. इटारसीत BOXNHS वाघिण्यांची मालगाडी भारतीय रेल्वेवरील सर्वात अत्याधुनिक आणि शक्तिशाली WAG-12 कार्यअश्वासह पुढच्या प्रवासाची तयारी करत होती. त्याचवेळी BOXN वाघिण्यांची मालगाडी WAG-9 कार्यअश्वासह विश्रांती घेत होती.

नर्मदापुरम (होशंगाबाद) नंतर बुदनी ओलांडत असताना ह. निजामुद्दिनहून सिकंदराबाद जंक्शनला निघालेली दुरोंतो एक्सप्रेस झुमझुमझुम करत क्रॉस झाली. भोपाळ जंक्शनला पोहचेपर्यंत अनेक गाड्या आमच्या राजधानीला क्रॉस होत होत्या किंवा त्यांना आमची ‘राजधानी’ ओलांडून पुढे जात होती. मधल्या स्थानकांच्या स्टेशन मास्टरकडून आमच्या ‘राजधानी’ला दिली जात असलेली परवानगी आणि त्यासाठी त्याने हातात धरलेला लुकलुकणारा हिरवा दिवा बघताना मस्त वाटत होतं. असं दृश्य मला कायमच रोमांचक वाटत आलेलं आहे.

मध्यरात्री 1:34 ला 22222 हजरत निजामुद्दिन-छत्रपती शिवाजी महाराज (ट) ‘राजधानी’ क्रॉस झाली. त्यानंतर 1:50 ला रानी कमलापती (हबीबगंज) स्थानक ओलांडून पुढच्या तीनच मिनिटांत आमची ‘राजधानी’ भोपाळ जंक्शनवर दाखल झाली. त्यावेळी शेजारच्या फलाटावर 12433 चेन्नई सेंट्रल-ह. निजामुद्दिन राजधानी एक्सप्रेस उभी होती.

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/03/2.html

भाग-1 लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/03/1.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त चाललीय सफर! Happy
चाळीसगाव ,जळगाव, भुसावळचा उल्लेख आल्याने मन भूतकाळात गेलं! जळगावला माझी एक पार्टनर भुसावळची, तर एक पाचोऱ्याची होती! त्यांच्या बोलण्यात नेहमी "गोरखपूर गेली का? ","निजामुद्दीन लागली का"... वै अस असायचं! गंमत वाटायची! भुसावळवाली पार्टनरचे तर वडील रेल्वेत! दर शनी-रवी भुसावळला पळायची. दोघींबरोबर मी त्यांच्या घरी जाऊन, मुक्काम करून आलेले! पाचोरावालीचे तर जळगाव स्टेशनला पोचल की प्लॅटफॉर्मवर तळहातावर मूठ आपटून विशिष्ट आवाजात अपडाऊनवाल्यांना संकेत दिले जायचे! मोबाइल तेव्हा आलेले नव्हते! मजा आली, हे सगळं आठवून. Happy

स्वच्छतेच्या बाबतीत आपल्या इकडच्या अन साऊथकडच्या रेल्वेस्टेशन्समध्ये फार फरक जाणवलेला! भाऊ हैद्राबादमध्ये चंदानगरला रहायचा!
इतकं छोटेसे स्टेशन पण कमालीची स्वच्छता! स्टाफ ही तत्पर!

फक्त गाड्या आल्या व गेल्या या शिवाय आणखी मनोरंजक येऊ द्या ना राव.... उदा सहप्रवाशी, जेवण, बेडिंगचा दर्जा, नवीन काय होते इ.