लगे रहो.... जो जो रॅबिट !

Submitted by शांत प्राणी on 16 February, 2022 - 02:31

हल्ली चित्रपटच पहावासा वाटत नाही. न जाणो कसा असेल ही भीती वाटते. एका जागी बसून पुस्तक वाचणे, चित्रपट पाहणे यासाठी संयम शिल्लक राहिलेला नाही असे वाटत होते. अशातच कुणीतरी जो जो रॅबिटबद्दल सांगितले. पूर्वी कुणीतरी नवीन आलेल्या चित्रपटाबद्दल पाच सहा वाक्यात सांगावे आणि आपल्याला उत्सुकता निर्माण व्हावी तसे झाले. हे मिसिंग आहे तर ! या कारणाने का होईना जो जो रॅबिट बघायचं ठरवलं. सांगणार्‍याने इतक्या छान सांगितले की जाताना गाडीतच पाहिला. बरोब्बर सव्वा तासात चित्रपट आणि प्रवास संपला आणि मग जो काही अनुभव घेतला तो कुणाला तरी सांगण्याची बेचैनी दाटू लागली. पण ती दोन चार ओळीत सांगण्यासारखी नाही म्हणून वेगळा धागाच लागेल.
***
images_0.jpg

एखादी गोष्ट कोणत्या माध्यमातून सांगायची त्यावर असलेली पकड प्रेक्षकाला / वाचकाला वेगळाच अनुभव देऊन जाते. जो जो रॅबिटची कथा वाचताना कदाचित जो अनुभव मिळाला असता त्यापेक्षा वेगळा बहुमितीय असा अवर्णनीय आनंद हा चित्रपट देतो. संकल्पना किंचितशी लगे रहो मुन्नाभाईसारखी आहे. मुन्नाभाई अर्थातच विनोदी अंगाने जातो. पण तो जे भाष्य करतो त्यापेक्षा अधिक सखोल भाष्य जो जो रॅबिट करतो ते ही कुठेच प्रचारकी न होता. कुठेही तत्त्वज्ञानाचे डोस पाजलेले नाहीत. उलट इथे आदर्शवादी गांधींच्या ऐवजी क्रूरकर्मा खलनायक अ‍ॅडॉल्फ हिटलर आहे. त्याने जर्मनांवर लादलेले तत्त्वज्ञान आपल्याला तिरस्काराला भाग पाडते. त्याचा लोकांवर होणारा परिणाम एका दहा वर्षांच्या मुलाच्या माध्यमातून आपल्यासमोर येतो आणि आपण पहिल्या फ्रेमपासून गंभीर होतो.

यात कित्येक फ्रेम्स मधे प्रतिमांचा वापर आहे. हिटलरचा वावर आणि वापर तर अफलातूनच आहे. त्याचे पात्र विनोदी ढंगाने रंगवले आहे. पण चित्रपटातला विनोद अधिक अंतर्मुख करत नेतो.
एक दहा वर्षांचा मुलगा, ज्याचा हिरो हिटलर आहे, ज्याला हिटलर सारखे बनायचे आहे, त्याची शाबासकी मिळवायची आहे आणि तो हिटलरच्या बालसेनेत (युवासेनेत) भरती झालेला आहे. या लहान मुलांना तुम्ही आता मोठे झालेला आहात असे ऐकवले जातेय. युद्धासाठी तयार केले जातेय. त्यांना ज्यू द्वेषाचे प्रशिक्षण दिले जातेय. ज्यूंबद्दल जे जे त्यांना सांगितले जाते ते सर्व तिरस्करणीय आहे. त्यांना घाण आवडते, ते घातकी असतात, लालची असतात इत्यादी. ज्यूंंना ठार मारणे हे आपले कर्तव्य आहे. जोजो खरे तर मनातून भित्रा आहे. पण आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम म्हणून तो स्वत:ला मनाविरूद्ध धीट असल्याचे दाखवतोय. पण ही गोष्ट लपून राहत नाही. त्याला एका सशाला मुंडी पिरगाळून ठार मारण्याचा हुकूम दिला जातो. त्यात तो सपशेल अपयशी होतो ज्यामुळे त्याचे नाव जो जो रॅबीट पडते.

अशा वेळी एकांतात हिटलर त्याला धीर देतो. तुझ्यात एक कट्टर नाझी होण्याची सर्व लक्षणे आहेत. तू लवकरच या मूर्खांना तुझी खरी जागा दाखवून देशील असे हिटलर त्याला सांगत असतो. इथे त्या मुलाचे विश्व ज्या पद्धतीने अचूक उलगडत जाते त्याला दाद द्यायलाच हवी. कित्येक अशा जागा आहे जिथे स्तिमित व्हायला होतं. काही काही फ्रेम्स तर भन्नाट.
images (1).jpg

इन मिन सात ते आठ पात्रांभोवती सिनेमा फिरतो. त्यातून महायुद्धाचे वातावरण जिवंत होते. ज्यूंचा द्वेष. त्यांना मदत करणार्यांच्या मनातली दहशत आणि चौकात संशयावरून फाशी दिलेले लोक. जोजो ची आई त्याच्या मनातला हिटलर बाहेर काढण्याचा प्रयत्न करतेय. तस तसा हिटलर एकांतात त्याला जास्तच भडकवतोय. त्याची आई एक दिवस त्याला चौकात फाशी दिलेले लोक पहायला सांगते. त्यांच्या पायाला चिट्ठ्या बांधल्यात. ज्यात त्यांचा अपराध लिहीलेला आहे.

छोटा जोजो आईला विचारतो कि, "यांचा अपराध काय ?" ती चेहरा कोरा ठेवण्य़ाचा प्रयत्न करत उत्तरते " स्वातंत्र्याची इच्छा". हे सांगताना खिन्नतेची सूक्ष्म छटा तिच्या चेहर्यावर उमटते.

या दृश्यांचा परिणाम जोजोवर होतोच आहे. त्या मानाने त्याचा मित्र खूपच व्यवहारी आहे. जोजो भारावलेला आहे.
एक दिवस त्याला आईच्या रूममधे एका गुप्त जागेत एक तरूण ज्यू मुलगी सापडते. ती बराच काळ तिथे राहत असते. जोजो ला आता काय करायचे ते समजत नाही. जर हिला इथे ठेवले तर त्याची शिक्षा आईला मिळेल. पण ती मुलगी म्हणते जर तू कुणाला सांगितलंस तर मी म्हणेन की तू आणि तुझ्या आईने मला इथे लपवण्यात मदत केली आहे. तू आईला पण सांगू नकोस की तुला माझे इथले अस्तित्व ठाऊक आहे.

आता जोजो संकटात सापडतो.
तो युवासेनेच्या कप्तानाला ज्यु भेटला तर आपण काय कराय़चे असे प्रश्न विचारत असतो. युवासेनेचे काम करत असताना त्याला आईच्या संशयास्पद हालचाली नजरेला पडत असतात. पण त्याला नेमके समजत नसते.

हळूहळू त्या ज्यु मुलीला रोज भेटणे हा त्याचा कार्यक्रम होतो. जो जो तिला विचारतो कि तू मला तुमच्याबद्दल सांग. ती जे जे सांगते ते सर्व माणसासारखे असते. आवडी निवडी त्याच्याच सारख्या असतात. पण जोजोला हे ऐकायचे नसते. त्याने लहानपणापासून ज्यूज बद्दल जे ऐकलेय ते तिच्याकडून ऐकायचे असते. शाळेत शिकवलेले ऐकायचे असते. त्यांना एक शिंग असते, ते सैतानाचे लोक आहेत याबद्दल जाणून घ्यायचे असते. आपण आर्यन आहोत आणि हे आपल्या पायाची धूळ आहेत हे ऐकायचे असते. मात्र ती सांगते की आम्ही प्रत्यक्ष देवाचे वंशज आहोत ज्याने सैतानाशी लढा दिलाय.

जोजो नाराज झाला म्हणून मग ती त्याला आवडेल असे सांगतो की आम्ही झोपताना स्वत:ला उलटे टांगून घेतो. हे ऐकल्यावर त्याला आनंद होतो. हे त्याने जे शिकले आहे त्याच्याशी जुळणारे आहे. हळूहळू त्याला ती आवडू लागते. मात्र एक नाझी आणि एक ज्यू कधीच एकमेकांवर प्रेम करू शकत नाहीत हे तो स्वत:ला बजावतोय.

तो खाली आल्यावरची एक फ्रेम आहे. हिटलर अंगावर घेऊन पडला आहे. आजार्‍यासारखा. ही फ्रेम फारच बोलकी आहे. जितका ज्यू आणि नाझींमधे संवाद वाढेल तितका हिटलर आजारी होत जातो असे सांगणारी वाटली ही फ्रेम. इथे पुन्हा कोणताही डोस नाही. हिटकर ही प्रवृत्ती आहे. ज्यू आणि नाझी या तर द्वेषाच्या प्रतिमा आहेत. पण त्यांच्यातला संवाद द्वेषाची पुटं गळून पडायला कारणीभूत ठरतोय. इथे त्या दोघांचेही अनुक्रमे दहा वर्षांचे आणि १७ वर्षांचे असणे सुद्धा महत्वाचे आहे.

एक दिवस जो जो ला फुलपाखरू दिसते. त्या फुलपाखराला पकडायला तो त्याच्या मागे मागे धावत असतो. ते खाली बसलेले असते. त्याची नजर फुलपाखरावर खिळलेली असताना ते अचानक उडते आणि जो जो वर पाहतो.

एका स्त्रीचा मृतदेह लटकत असतो. तिच्या पायाला चिट्ठी लावलेली असते. तो मृतदेह त्याच्या आईचा असतो. संशयावरून तिला फाशी दिलेली असते. तो तिच्या पायाला मिठी मारून आपले दु:ख लपवत आतल्या आत रडत राहतो. त्याची आई शूजच्या लेस न बांधण्यावरून त्याला नेहमी टोकत असते. तिच्या मृतदेहाच्या पायातल्या शूजच्या खुल्या लेस तो हुंदका दाबून बांधत राहतो. या दृश्यात एकदाही त्याच्या आईचा चेहरा दिसत नाही. घरांच्या खिडक्यांचे डोळे पाणावलेले आहेत असे भास होतात. जोजो ला हे दु:ख व्यक्त न करण्याची समज या वयात आहे.
jojorabbit4.jpg
इथे जोजो च्या दुनियेत प्रचंड उलथापालथ होते. इथून पुढे कथा न सांगण्यात आणि ऐकण्यातच मजा आहे.

बस्स, शेवटचा एक प्रसंग.
शहरात रशियन सैन्य घुसलेय. दुसरीकडून दोस्त सेना घुसतेय. हिटलरचा पराभव झालेला आहे. आयुष्यभर अवघडलेला कप्तान त्याला पहिल्यांदाच सांगतो , अगदी मन मोकळेपणाने सांगतो "तुझी आई खूप चांगली स्त्री होती. खरोखर चांगली होती". आणि जो जो कप्तानाच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडू पाहतो. कधीचे कोंडलेले अश्रू बाहेर पडत असतात. आजूबाजूला बॉंबचा वर्षाव होत असतो.

स्वातंत्र्य म्हणजे काय हे सांगणारा हा प्रसंग अतिशय मार्मिक आहे. असे प्रसंग एखाद्या आवडत्या पदार्थाची चव बराच काळ जिभेवर रेंगाळत रहावी तसे खोल रुतून बसतात.

कलाकारांची नावे सांगितली काय आणि न सांगितली काय, त्याने काहीही फरक पडत नाही. एकही नाव ओळखीचे नाही. अभिनय कसा आहे वगैरे प्रश्न पडलेच नाहीत. बस्स सव्वा तास खिळवून ठेवले होते. गुंगवून ठेवले होते. गोष्टीवेल्हाळाने गोष्ट सांगावी त्याहीपेक्षा तरल काहीतरी होते. आणि ते म्हणजे सिनेमाचे माध्यम होते. या माध्यमाचा पुरेपूर उपयोग केला गेलाय. सर्वांना आवडेल अशी शैली नक्कीच नाही. विनोदी म्हणावा तर तसाही नाही. तरीही एक नितांतसुंदर अनुभव देऊन जाणारा चित्रपट आहे. ज्यांना असे चित्रपट पाहण्याचे साहस करावेसे वाटते त्यांनी जरूर पहावा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम सिनेमा आहे. जरुर बघा. आई बरोबर पहिले सायकल वर फिरता त तो सीन व नंतर्चा आई वारल्याचा सीन मध्ये अग दी ढसा ढसा रडु येते.
ताता वायकिकी का काहीतरी असे विचित्र नावाचा दिग्दर्शक आहे त्यानेच हिटलर चा रोल केला आहे. सर्वांग सुंदर चित्रपट. स्कार जो व तो पोरगा एकदम अप्रतिम काम

छान लिहिलेय.
हिटलर हे जगाच्या ईतिहासातील अत्यंत रोचक व्यक्तीमत्व आहे. अगदी गांधीजींसारखेच. दोघे कोणाला पुर्णपणे समजणे अवघडच असे वाटते.
माझाही एक धागा होता यावर. रिक्षा फिर्वतो.

आणि हिटलर हसला ... (५७५)
https://www.maayboli.com/node/64653

छान लिहीलय. विश लिस्टमध्ये आहेच हा सिनेमा. नक्की बघणार. Schindler's list पण बघायचाय. त्यावर कोणी लिहीलेय का आधी?

छान लिहीले आहे.
अप्रतिम सिनेमा आहे. जरुर बघा. आई बरोबर पहिले सायकल वर फिरता त तो सीन व नंतर्चा आई वारल्याचा सीन मध्ये अग दी ढसा ढसा रडु येते.>>>>+१ इथले वाचूनही डोळे भरून आले.
असाच Life is beautiful(1997) खूप आवडला होता.

मस्त सिनेमा आहे तो.
माझे काही विशेष आवडते प्रसंग (टायका वाटीटी चे सगळे हिटलर प्रसंग अर्थात आवडले.)

- जोजोची आई चिडून वडिलांचा वेष धारण करून जोजोला ओरडते. मस्त लिहिलाय प्रसंग !
- गेस्तापोचे (नाझी पोलीस) सगळे प्रसंग अगदी थरारक ! (ज्यांना गेस्तापोच्या तपासाचा थरार आवडला त्यांनी Tarantino चा Inglorious Bastards पाहिला नसेल तर अगदी न न न न चुकवता पाहा ! ब्रॅड पिट आणि ख्रिस्तोफर वॉल्टझ नी कमाल केलीये.)

- ती मुलगी आणि जोजो आपापल्या धर्मातल्या यशस्वी लोकांची नावं चढाओढीत घेत असतात तो.

- शेवटचा प्रसंग. डेव्हिड बोवीचे गाणे आणि स्वातंत्र्य !

Ing bastarda pan jabardast favourite . I am a world war two information addict.

फारच सुंदर परीक्षण . चित्रपट न बघताही चित्रपटाचा परिणाम अंगावर आला. मला वाटते चित्रपट माध्यम किती प्रभावीपणे आणि सूक्ष्मतेने between the lines अर्थवाही असे वापरता येते हा ह्या चित्रपट आदर्श ठरला असावा.
नक्की बघणार.

स्कारलेट जोहानसन भारी आहे. मारवल नंतर असा काही पाहून बरं वाटलं. सुरवातीचा जोजो कॅम्प ला जायला निघतो तो प्रवास आणि बिटल चं आय वाना होल्ड यूर हँड चा जर्मन व्हर्जन भन्नाट जमलाय. तसाच जोजो आणि त्याच्या आईची सायकल राइड. येताना भेटलेले ट्रक मधून परातणारे सैनिक. त्यांना गो किस योर मदर सांगणे. असे अनेक सीन्स आहेत.

कलाकारांची नावे सांगितली काय आणि न सांगितली काय, त्याने काहीही फरक पडत नाही. एकही नाव ओळखीचे नाही.
>>> *le स्कार्लेट जोहान्सन - कुठेयत ते मार्व्हल वाले... त्यांच्या नानाची टांग...

सर्वांचे आभार.
सोनाली एस आणि कॉमी सुचवलेल्या चित्रपटांबद्दल आभार.
चिडकू, अमा, >> अचूक आहे निरीक्षण.'
हीरा - कळवा पाहिल्यावर

च्रप्स - मला माहिती नाही. मी अलिकडे सिनेमे खूप कमी बघतो. मार्वल वगैरे माझ्या टाईपचे नाहीत. मुलगा बघायचा तो ही चौदा वर्षांचा झाला. त्यालाही आता सुपरहिरोज , अ‍ॅव्हेंजर्स बोअर होतात. पण मला ती अभिनेत्री या रोलमधे आवडली. तिचा सूक्ष्म अभिनय आवडला. कॉमीने लिहीलेय वर तेव्हांचा तिचा अभिनय आणि फाशी दिलेल्या ठिकाणचा मख्ख चेहरा ठेवण्याचा अभिनय.
(जान्हवी कपूरकडून शिकली असेल तर माहिती नाही Proud )

Craps Lol

स्कार्लेट खूप ताकदीची अभिनेत्री आहे. वूडी अ‍ॅलन च्या सिनेमांमध्ये तिने केलेले रोल्स बघा. मार्वेल वगैरे करतात पैसा कमवायला. मार्वेल मध्ये आता डाँ स्ट्रेंज मल्टिवर्स बघाय चा आहे. आपण लहान पणी कॉमिक बुक वाचायचो तसेच आहेत हे सिनेमे. पण कंव बजेट

मी ट्रेलरपहिलेलं
पण हे परीक्षण ट्रेलर पेक्षा भारी आहे
लवकरच बघतो आता

सुरेख लिहिले आहे.
चित्रपट न बघताही चित्रपटाचा परिणाम अंगावर आला .>>> खरंय.

छान लिहिलं आहे तुम्ही.

Taika वैतीती हा एकदम आवडता दिग्दर्शक आहे. त्याचे इतर दिग्दर्शित चित्रपट / इन्व्हॉल्व्हमेंट असेलेले टीव्ही शोस हि फार मस्त आहेत.