फोन

Submitted by पाचपाटील on 8 February, 2022 - 09:13

"आरे पत्त्या कुठाय तुजा‌.! किती फोन केलं मी.! सगळं बंदच असतंय गा कायम?"

हॅलोs ? कोण ?

"बास का आता? आता आवाज पन इसरला का आमचा?"

नाय रे.. आवाज नाय ओळखला मी.

"आरे पवन बोलतोय पवन.!"

पवन ?.. पवन ताटे का? मला आवाजाची काय ओळख
लागली नाय रे आजून.

"पवन जाधव बोलतो. पळशीवरनं."

आरे हां हां.. हां.. बोल बोल.. कसा काय फोन केला..?

"काय नाय.. बगावं म्हणलं काय चाललंय..! तुजा काय फोन नाय काय नाय..कुठं हाईस कुटं तू ? "

हाय की.. हितंचाय.. चाललंय निवांत.

"आरं पन आसं कुटं आस्तंय गा ? एवडं करूनी लगा.. एवडं कुटं तोडत आस्तेत गा? समजाय पायजे तुला बी."

नाय नाय. तसं काय नाय. खरंच काय नाय..

"नाय कसं.? कदी यितू न् कदी जातू कळत बी नाय..हिकडं आल्यावर बी भेटत नाय.. येक फोन करायला बी जीवावर येतं गा?"

आरे तुमचे तुमचे कामंधंदे चालल्याले आस्तेत आणि त्यात कशाला उगंच खोळंबा?

"आमची कसली कामं न् काय.! म्हागं पुण्याला आलतू एक दोनदा तवा भेटावं म्हणलं पण तुजा फोन बंद..! माणसानं
हुडकायचं तरी कुटं तुला.! "

बरं काय विशेष मग? कसा काय फोन केला आज?

"त्ये आपला आबा जगदाळे है ना. त्यो इचारत हुता. त्येच्या मिशेसची चुलतबहीण हाय. इंजन्यरींग झालंय. आता
तिकडंच जॉबला आसतीय कंपनीत. तर त्येनं परवा सज
माज्यापाशी इषय काडला की बग इचारून तुला.
काय इचार है का तुजा बग म्हणत हुता"

आरर्र.. नाय नाय नको .. आयला हेच्यासाठीच फोन केल्ता गा काय तू?

"आरं थांब थांब.. जरा येक मिनिट थांब.. मी आता येक काम करतू.. ही फोन झाल्यावर तुला व्हॉट्सअप वर तिजा
बायोडाटा पाठवतू..! एकच नंबर पोरगी है..! नुसतं बगायला काय जातंय तुला? लगीच पास करचील बग तू..! गॅरंटीच है मला"

चांगल्या वाईटाचा काय विषय नाय..! पोरी चांगल्याच
आसतेत..! पण नकोचाय आपल्याला तर..! काय पाठवू
बिठवू नको.

"असं कसं नगो ? मला काय कळतच नाय तुजं..! किती दिवस नगो नगो म्हणणाराय? आं? पाठवतूय बग
बायोडाटा..! दोन दिवस इचार कर निवांत अन् मग सांग. एवढं आईकच माजं..! आनी पार्टीबी चांगली है तिकडची.
मानसं बी चांगली हैत बगण्यातली. आनी आपली त्येंच्यात वाट बी पडल्याली है कासेगावच्या मामीच्या बाजूनं..!
हेज्यापेक्षा चांगली जागा मिळनार नाय बग तुला."

बरं बरं सांगतो मी तुला नंतर.. मी फोन करतो नंतर.

"तू कसला फोन करतूय..! तुजं तिकडं काय तरी गॅटमॅट हाय भौतेक..! तसं आसलं तरी काय आडचन नाय..! सांगून टाक आपल्याला बिनदास.! मी बोलतो आण्णांला.. दुसरं कुनी
डोक्यात हाय का तुज्या?"

नाय नाय.. तसलं काय नाय.

"आरं पन हिकडं पै पावन्यात तसाच कालवा उठलाय.! तुजं तू तिकडंच कायतरी जुळवलंय म्हणून.! सांग तसं काय आसलं तर.! कास्ट बिस्टचा बी काय विषय राह्यला नाय आता येवडा..! त्येचं बी काय कमी जास्त आसलं तरी काय आडचन नाय..! चालवून घिऊ आपन..! आं?"

आरे आस्तं तर सांगितलं आसतं मी..! आता काय नाईचाय तर काय पदरचं सांगू का? आनी लोकांचं काय मनावर
घ्यायचं.! ते बोंबलतच आस्तेत.! त्येंचं तोंड कोण धरनार!
बरं ठिऊ का आता. काम है जरा.

"आरं कामावरनं आठवलं..! त्ये बी येक इचारायचंच हुतं. जॉबला कुटं अस्तो म्हणं तू आता ?"

जॉब बिब नाय करत मी.! सध्या मी माझी पॅशन फॉलो करतो.

"व्होय काय? चांगलंय चांगलंय..! पण म्हंजे काय करतूस नेमकं?"

विशेष काय नसतं..! हितं लोकांना कार पार्कींगसाठी स्वतःचा ॲसिस्टन्स देतो..! ॲसिस्टन्स म्हणजे एखादी कार आसपास घुटमळाय लागली की मी लगेच उठून उभा राहतो.! आनी मग उजवा हात हवेत चक्राकार हलवत 'येऊ द्याss येऊ द्याss फुल्ल माराss' वगैरे आवाज काढतो..! आनी कार नीट पार्क झाली की मग लगीच खिडकीवर हात आपटून मजूरी
मागतो...! लोकं देतेत त्येंच्या खुशीनं दहा वीस रूपै..! आनी
पैशाचं बी काय नसतंय रे एवडं..! कामाचा आनंद महत्वाचा.! तो बक्कळ मिळतो..! बाकी वेळ मग हितंच फुटपाथवर बसून असतो दिवसभर..! हॅलोss पवन.. हॅलोss.. ऐकतोयस ना? च्यायला ठेवला वाटतं फोन पव्यानं..!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली आहे आयड्या Lol

ते क्रेडीट कार्ड आणि लोन वोन वाले फालतूचे फोन आले की त्यांना आपला पगार चार पाच हजाराचा सांगावा. वर त्यांचाही विचारावा. आणि तुमच्याकडे जमतेय का बघा नोकरीचे म्हणून त्यांच्याच मागे लागावे ..

आई ग्गं! पवन भाऊंची लईच पंचाईत केली की तुम्ही!
काही म्हणा जोपर्यंत लोकांना इतरांच्या पोरापोरींची किंवा अगदी आपल्या मित्रमैत्रिणींची लग्न जुळवावीशी वाटतात ना तोपर्यंत सगळे बरे चालले आहे असे म्हणावे. मला काय त्याचे ही अलिप्तता अजून आली नाही हे फार चांगले आहे!
अर्थात त्यापायी कोणाच्या डोक्याला भुंगा लावू नये हे ही मान्य आहे.

Filmy, धनवन्ती, विवेक, महेंद्र, भरत, वावे, सस्मित, धनि, दत्तात्रय साळुंखे-पाटील, मोहिनी, स्वाती, ऋन्मेषशेठ, मंजुताई, ललिता-प्रीति, हर्पेन, भाग्यश्री, जिज्ञासा, aashu, SharmilaR..
तुम्हा सर्वांच्या प्रतिसादाबद्दल अनेकानेक आभार..! Happy

बाकी पव्याशेठ आजकाल सदर कथानायकाचे फोन उचलत नाहीयेत. आणि कथानायक माफक भोळा आहे. त्यामुळे पव्याशेठ असे का वागतायत हा पेच नायकास फारच सतावतो आहे.
मी बोललो बरं का नायकास की बहुदा तुझ्या कामाच्या स्वरूपामुळेच पव्याशेठ तिकडे निपचित गार पडले असावेत.! परंतु तू बिलकुल टेन्शन घेऊ नको भावा. मी इथे आजून जित्ता असता तू कशासाठी मनाला लावून घेतोस? तुझ्यासाठी मी पोरींची रांग उभी करतो..!

तर मग इथे हा वृत्तांत मांडण्याचे प्रयोजनही थोडेसे तेच आहे की जर कुणाच्या ओळखीपाळखीत, गोतावळ्यात एखादी कुणी असेल तर कळवावे बुवा आम्हांस..!
आमच्या बाजूने अपेक्षा वगैरेंचा काही प्रश्नच नाही म्हणजे..!
बाकी नायकाची पार्कींग लाईन एकदम सेट आहे.. शिवाय जागाही मोक्याची असल्यामुळे पार्कींगसाठी गाड्यांची काईच कमतरता नसते.. त्यामुळे समजा पुढेमागे होणाऱ्या बायकोलाही त्याकामी हातभार लावावा लागेल.. पण तो काही मोठा इश्यू नाही..! अर्धी अर्धी लेन वाटून घेता येईल. आणि बायकोच म्हटल्यावर तिला काही ते सांगावं लागणार नाही..! पुढे समजून उमजून करेलच सगळं ती..!
शिवाय एक सकारात्मक निर्मळ नजर जवळ असेल तर माणसाला आणखी काय लागतं आयुष्यात..!

तर सांगा मग..! औ? आणि शेवटी असं असतं की या सगळ्या योगायोगाच्या गोष्टी असतात..! त्यातून समजा जुळलं तर जुळलं..! नाय तर नाय..!
त्याच्यामधी 'दिलं- घेतलं' काय नसतं..! आपण आपला प्रयत्न करत रहायचं..! दुसरं काय असतं आपल्या हातात..! बाकी तुम्ही सगळे मुरलेले हैत म्हणा..! तुम्हाला आणखी वेगळं काय सांगणार आमी..! Wink
तरीबी तेवढं लक्ष आसू द्या बरं का जरा..! औ?
_/\_

आवं, मी काय म्हनतो, पार्किंग करायला येईल की फटाकडी एखादी, तिलाच गटवून टाका की, मग काय गोष्टच नाही काही…
बगा, जमतयं का….

>>>पार्किंग करायला येईल की फटाकडी एखादी, तिलाच गटवून टाका की,>>>
व्हय जी हे बी खरं हाय...फेफरात आल्त की न्यायाधीशच आरोपीच्या पीरतीत आडाकला...ते काय तरी म्हणत्यात ना ईस्टाक व्हम सिंडरम का काय ते..... तसंच काहीसं.
बाकी पाचपाटील तुमचा प्रदिर्घ प्रतिसादही आवडला...
Happy

Pages