निरोप

Submitted by पराग र. लोणकर on 31 January, 2022 - 07:26

निरोप

घराची बेल वाजली तसं रविनं टी.व्ही.चा आवाज बंद करून उठून दार उघडलं. आज सुट्टी असल्यानं तो घरीच होता.

दारात तीन-चार अनोळखी माणसं.

``आहेत का जोशी साहेब?`` त्यातल्या एकानं विचारलं.

``मीच जोशी. बोला...`` रवी म्हणाला.

``तुम्ही नाही, सिनिअर जोशी साहेब...``

``बसा... बोलावतो.`` त्यांना बसायला सांगून रवीनं आपल्या वडिलांना- सुधाकर रावांना `कुणीतरी` आल्याची वर्दी दिली.

काही क्षणात सुधाकरराव काठी टेकत टेकत हॉलमध्ये येऊन त्यांच्या आवडत्या ठिकाणी नव्याने येऊन बसलेल्या सोफ्यावर स्थानापन्न झाले. त्या ठिकाणची त्यांची आवडती आरामखुर्ची मात्र भंगारवाल्याच्या मालकीची झाली होती- काहीच दिवसांपूर्वी.

समोरची मंडळी सुधाकरांना अनोळखी नव्हती. ते हिंडते फिरते असताना त्यांचा या मंडळींशी चांगला परिचय होता.

समोर उभ्या असलेल्या रवीची प्रश्नार्थक नजर सुधाकरांच्या आताशा अंधुक झालेल्या नजरेलाही चांगली समजली.

``रवी, जास्त प्रस्तावना लावत नाही. ओळख वगैरे करून देत नाही. तुझा जास्त बोललेलं आवडत नाही. ही सगळी मंडळी वाईच्या एका आश्रमातील आहेत. मला घेऊन जायला आली आहेत... कायमची!``

``पण बाबा...`` रवीला काय बोलावं सुचेना. मनातला आनंदही लपवता येत नव्हता आणि व्यक्तही करता येत नव्हता. त्यानं नुकत्याच आतून बाहेर आलेल्या सुचेताकडे- आपल्या बायकोकडे पाहिलं. तिलाही मनातील आनंद लपवता येत नाहीये इतकं मात्र त्याच्या लक्षात आलं. आपण काहीतरी बोलायचो, आणि सुधाकररावांचा plan बदलायचा, असंही व्हायला नको, हेही त्याच्या डोक्यात आलं. इतक्यात त्याच्या काहीतरी लक्षात आलं आणि न राहवून तो बोलून गेला,

``पण बाबा, शशी...``

``काळजी करू नकोस. मी त्यालाही घेऊन जाणार आहे. तोही आता पस्तीशीला आला आहे. लग्नानंतर जरा उशीराच आम्हाला झालेली तुम्ही दोघं मुलं. त्यात तू हुशार निपजलास तर शशीची मानसिक वाढ होऊ शकली नाही. आता माझं म्हातारपण आणि शशीची जन्मभराची जबाबदारी दोन्हीही हिच्या जाण्यानं तुझ्याच खांद्यावर पडली. सुदैवानं आर्थिक बाबतीत आम्ही दोघेही एका रुपयानेही तुझ्यावर अवलंबून कधीच राहणार नाही हे तुलाही माहीत आहे. उलट शशी असा निपजल्यानं माझ्यानंतर माझं सगळं तुझं एकट्याचंच झाल्यासारखं होतं...`` इतकं सलग बोलण्यानं सुधाकररावांना कमालीचा थकवा जाणवला. ते काही क्षण थांबले.

``तर... ही मंडळी आम्हा दोघांनाही घेऊन जायला आली आहेत. मी आणि माझ्यानंतर शशी जिवंत असेल तोपर्यंत आमची आश्रमात व्यवस्थित काळजी घेतली जाईल यासाठी आवश्यक ती सगळी सोय मी केलेली आहे. शशीच्या मर्यादित क्षमतांना ओळखून त्याचा वेळ योग्य प्रकारे कसा व्यतीत होईल, तो त्याला आवडतील अशा कामांमध्ये कार्यक्षम कसा राहील आणि तो जास्तीत जास्त आनंदी कसा राहील याकडे तिकडे खास लक्ष दिलं जाईल. मुख्य म्हणजे तिथे त्याला सतत हिडीसफिडीस केलं जाणार नाही. त्याच्या अंगावर हात टाकला जाणार नाही आणि सतत न झेपणारी, तो जी करायला घाबरतो अशी कामं मुद्दाम त्याच्यावर सोपवली जाणार नाहीत. तर... आम्ही दोघंही आता तुमचा दोघांचा निरोप घेतो. सुखी राहा...``

परक्यांसमोर आपल्यावर असे अप्रत्यक्ष आरोप झाल्यानं रवी आणि त्याची पत्नी अस्वस्थ झाले. पण तरीही ते गप्प राहिले. सुधाकरराव खोटं नक्कीच बोलले नव्हते. तोपर्यंत या पाहुण्यांपैकी एक जण आतमध्ये जाऊन शशीला बाहेर घेऊन आला होता.

आपल्या काठीची मदत घेत सुधाकरराव सोफ्यावरून उठले. बरोबर न्यायला आवश्यक तेव्हढं त्यांनी आपल्या खांद्याला अडकवलेल्या पिशवीत आधीच ठेवलेलं होतं. बाकी या घरातून त्यांना काहीही न्यायचं नव्हतं. आवश्यक कपड्यालत्त्यांची खरेदी ते आता वाईला जाऊनच करणार होते.

आलेल्या मंडळींपैकी दोन व्यक्ती शशीला घेऊन सुधाकररावांच्या पहिल्या मजल्यावरच्या त्या flatमधून जिन्यानं खाली जाऊ लागली. उरलेल्या दोन मंडळींबरोबर सुधाकरराव आपल्या flatच्या दरवाजाबाहेर पडले.

दरवाजाबाहेर पडल्यावर सुधाकरराव थांबले. वळले. त्यांनी आपल्या घराला मनापासून शेवटचा नमस्कार केला. त्यांचं ते स्वकष्टार्जित घर होतं. खूप हौसेनं घेतलेलं. अगदी प्रशस्त. ते चांगले धडधाकट, हिंडतेफिरते असताना या घरातच त्यांनी संपूर्ण कुटुंबीयांबरोबर अतिशय आनंदाचे असंख्य क्षण घालवलेले होते, काही समस्यांचाही अगदी धाडसाने सामना केला होता.

या आपल्याला अतिशय प्रिय असलेल्या घराला सुधाकररावांनी अखेरचा नमस्कार केला. समोर त्यांचा ज्येष्ठ पुत्र रवी आणि त्याची पत्नी उभी होती. त्या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपवण्याचा त्यांचा प्रयत्न अपयशी ठरताना अगदी स्पष्ट दिसत होता.

``रवी, सुनबाई, निरोप घेतो आता या घराबरोबर तुमचाही. आणखी एक सांगायचं राहिलं. महिनाभरानंतर आज आलेली ही मंडळी पुन्हा येतील.``

दोघांच्याही चेहऱ्यावर आता एक प्रश्नचिन्हही उमटले.

``हे आपले चार बेडरूमचे इतक्या मोक्याच्या जागेवरचे आणि अतिशय उच्चभ्रू इमारतीतले घर माझे स्वकष्टार्जित आहे. मी हे लवकरच विकून टाकणार आहे. माझी सारी बँकेतली रक्कम आणि हा flat विकून येणारी सर्व रक्कम मी एक ट्रस्ट करून त्या ट्रस्टतर्फे सुरक्षित ठिकाणी गुंतवणार आहे. आमची दोघांची काळजी वाईचा आश्रम घेणारच आहे. आमच्या नंतर या रकमेच्या व्याजातून आश्रमातून गरजूंसाठी विधायक कामे केली जातील.

महिनाभरात ही मंडळी या घराचा ताबा घ्यायला येतील तेव्हा तुम्हालाही या घराला निरोप द्यावा लागणार आहे. त्यामुळे नवीन भाड्याची जागा पाहायला आजपासूनच सुरुवात करा. इतकी वर्ष माझ्या जीवावर जी उधळपट्टी चालू होती ना, ती आता जमणार नाहीये तुम्हाला. त्यामुळे उत्पन्न-खर्चावरही लक्ष द्या आता थोडं... आणि एक लक्षात घ्या. ही वेळ तुम्हीच तुमच्यावर आणली आहे. मी वेळोवेळी तुमच्याकडून जे जे चुकीचं होत होतं, ते ते तुम्हाला दाखवून देत होतो. अगदी न चिडता, व्यवस्थित. पण तुम्हाला एका थेरड्याची ती नेहमीचीच कुरकुर वाटत होती. मग पुढे नाईलाजानं मी घरात काही सांगणं, बोलणं बंद केलं आणि शेवटी मला हृदयावर दगड ठेवून हा टोकाचा निर्णय घ्यायला लागला आहे. चला जातो मी...``

सुधाकरराव वळले. आज कित्येक दिवसांनी समोरच्या लिफ्टचे बटण न दाबता, काठीच्या आधाराने त्यांनी जिन्याची एक एक पायरी उतरायला सुरुवात केली.

रवी आणि त्याची पत्नी यांचे पाहण्यासारखे झालेले चेहरे पाहायला आता तिथे कुणीच नव्हते..

**

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हाहा मस्त.. तरीच वाचताना विचार करत होतो. घर आपल्याच नावावर आहे म्हणत होते तरीही सोडून जात होते ..

चांगली गोष्ट..!!

तुमचा प्रभावळकरांबरोबरचा फोटो पण आवडला. लकी आहात.

लव यु म्हाताऱ्या. वक्त बदल दिया, जजबात बदल दिये, जिंदगी बदल दी. अशी गेम चेंजर माणसं बघितली की बरं वाटतं. पण हेही दुःख वाटत की ही माणसं गोष्टीतच जास्त असतात प्रत्यक्ष लाईफमध्ये क्वचितच.

रवी आणि त्याची पत्नी यांचे पाहण्यासारखे झालेले चेहरे पाहायला आता तिथे कुणीच नव्हते..>>>> हाहाहा. छान लिहीता तुम्ही.

कथा आवडली. शेवट उत्तम.
असा / हाच शेवट असलेली अजुन एक कथा माबोवर वाचल्यासरखी वाटते. आहे का?

प्रतिसादांबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद! मीरा यांच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे असाच शेवट असलेल्या कथेबद्दल माहिती मिळाल्यास मलाही ती वाचायला आवडेल.

छान.
मला पण अशाच आशयाचं काही कुठेतरी वाचलेलं आठवतंय.