माला फेरत जुग भया

Submitted by स्वेन on 15 January, 2022 - 22:55

मध्ययुगीन काळात जन्मलेला कबीर आजही या ना त्या स्वरूपात अस्तित्वात आहे, तो त्याने रचलेल्या दोह्याच्या रूपाने. त्याचे दोहे हे कालातीत आहेत कारण त्यांचा अनेक अंगांनी आकलन करण्याचा प्रयत्न केला तरीही प्रत्येक वेळी त्यांच्यात नवीन अर्थ दडलेला दिसतो. हे जसे गीतेतला एखाद्या श्लोकाचा उकल करण्याचा प्रयत्न केला तर तो श्रीकृष्णाने गीता सांगितली तेंव्हापासून आताच्या काळापर्यंत त्या त्या काळाला साजेसे अर्थ देऊन जातो, तसेच कबिराचे दोहे, कालमानाप्रमाणे वेगवेगळे अर्थ सांगून जातात.

'कबीर’ या नावाचा अर्थ सर्वज्ञ असा आहे परंतु हे नाव भक्तीचे प्रतीक मानले गेले आहे. त्यांची महानता हिंदू आणि मुस्लीम दोघांनाही मान्य आहे. संत तुलसीदास यांच्याप्रमाणे त्यांचे लक्ष भारतीय ‘अद्वैतवाद’ आणि मुस्लीम ‘एकेश्वरवाद’ यांच्यातील सूक्ष्म भेदांकडे आकर्षित झाले नाही. हिंदू धर्मातल्या कर्मकांड आणि अवडंबर या दोन्ही गोष्टीला त्यांनी फटकारले आणि ‘रामा’ला सगुण आणि निर्गुण या दोन्ही रूपात स्वीकारले.

" निर्भय निर्गुण गुण रे गाऊंगा
मूल कमल दृढ आसन बाँधु जी
उलटी पवन चढ़ाऊंगा, मन ममता को थिर कर लाऊँ जी पाँचों तत्व मिलाऊँगा " असे म्हणत कबीरने रामाला निर्गुण रुपात स्विकारताच अनेक मुस्लीम संतांनी ‘रामा’ला जणू काही दत्तकच घेतले. कबीर यांच्या संगतीने, दादू, रजब, जयासी, रहीमदास, वाजिद जी, शेख, आलम, मुबारक असे अनेक संत रामनामाचा जप करू लागले आणि राम-रहीम तसेच केशव-करीम हे शब्द सर्वतोमुखी झाले. अशा तऱ्हेने हिंदू-मुस्लीम यांच्यातली दरी मिटवण्याचे अतिशय महान कार्य कबीरांनी केले.

कबीराने अशी काय जादू केली आहे की तो मानवी मनाच्या पटलावर जेंव्हा दोह्यांचा कुंचला घेऊन सफाईदार चित्र साकारतो तेंव्हा माणसात आमूलाग्र बदल घडला जाईल याची ग्वाही देतो, ते ही सडेतोड टीका करत आणि डोळ्यात अंजन घालत, फटकारे मारत करतो. पण हे करत असताना तो पर्यायही सुचवतो आणि मानवी विचारसरणीला, जर तुमच्यात स्वतःची मानसिक भूमिका बदलण्याची इच्छा असेल तर, एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो.

आज इंटरनेटच्या वेगवान जमान्यात स्वसंवाद किंवा आत्मचिंतन मनुष्य पूर्ण विसरून गेला आहे. माणूस चोवीस तास इतरांशी संवाद साधतोय परंतु स्वतःच्या मनात डोकवायला वेळ नाही. कारण इतरांना समजावताना स्वतःची समजूत घालण्याचा प्रसंग येतो तेव्हा मानसिक आंदोलनं लोलकाच्या रुपात पुढे मागे होत राहतात आणि त्याला निराशेची एक गडद छाया व्यापायला लागते. अशा परिस्थितीशी सामना करताना मग मनाशी संवाद सुरू होतो आणि मग तो एखादा आधार शोधू लागतो. असा आधार मिळाला की हा स्वसंवाद तत्त्वज्ञानाशी ओळख करून देतो. हे जग मिथ्या आहे असे वाटायला लागले, जे जन्माला येणार त्याचा नाश अटळ आहे हे कळाले की अध्यात्माची पहिली पायरी आपण गाठली याची जाणीव होते. आणि नेमके इथेच, पुढची मार्गक्रमणा करण्यासाठी, कबीर आपल्या मदतीला येतो. तो म्हणतो:

"माला फेरत जुग भया
फिरा न मन का फेर,
कर का मनका डारि दे
मन का मनका फेर।"

कबीराचा हा फक्त चार ओळींचा दोहा तत्वज्ञानाच्या अर्थाने काठोकाठ भरला आहे. एखाद्या देवाचा मंत्र हातात जपमाळ घेऊन वर्षानुवर्षे जपत असताना देखील ऐहिक गोष्टीकडे लक्ष देण्यापलीकडे मनाचा आवाका जात नाही. हातात जपमाळ असते पण सूनबाई मुलाशी काय खुसरपुसर करते याकडे कान टवकारलेले असतात. नातवंडे काय उद्योग करून ठेवत आहेत, कामवाल्या बाईने भांडी नीट घासली की नाही, दूध उतू गेले की काय असे विचार मनात येत राहतात. मंदिरात हात जोडताना बाहेर ठेवलेली नवी कोरी चप्पल कोणी चोरणार नाही ना, याची चिंता वाटत असेल तर त्या भक्तीला कसला आला आहे भाव! माळ फिरवताना देखील त्यांच्या मनोभूमिकेत काडीचा फरक आढळत नाही. म्हणून कबीर म्हणतो, "
"माला फेरत जुग भया, फिरा न मन का फेर." हातात जपमाळ आणि मनात कचरा ठासून भरलेला असेल, मेंदूत नको ते विचार थैमान घालत असतील तर असा जप केला काय आणि नाही केला काय, कसला फरक पडणार आहे? म्हणून कबीर पुढे सांगतो, " कर का मनका डारि दे," हातातली जपाची माळ टाकून दे, " मन का मनका फेर," मनाचा मणी फिरव.

आणि असा मनाचा मणी फिरवत असताना जेव्हा एखादी व्यक्ती अध्यात्मिकदृष्ट्या प्रगती करू लागते तेव्हा ती व्यक्ती प्रत्येक मुद्द्याकडे जागरूकतेन पाहते आणि या पाहण्यात सद्भावना आणि करुणा या दोन्ही गोष्टी सामावलेल्या असतात. विचारसरणी आपोआपच सकारात्मक बनते. जेव्हा आपण इतरांना स्वत:चाच विस्तारलेला भाग म्हणून पाहणे प्रारंभ करतो तेव्हा आपली ग्रहणक्षमता आणि खुलेपणा वाढतो आणि निश्चलता आणि मन:शांती याचा विस्तार होत जातो.

रोजच्याच जगण्यातलं वास्तव मांडताना कबीरला केवळ या चार ओळी पुरेश्या वाटतात. कबीरला इथे नास्तिक लोकांबद्दल टीका करायची नाही. आस्तिक आणि नास्तिक या नात्यापलीकडे जाऊन तो त्याची भूमिका परखडपणे मांडतो आणि म्हणूनच तो कालातीत आहे. त्याच्या शब्दांच्या निवडीला कुठलाही संवेदनशील माणूस दाद दिल्याशिवाय राहणार नाही.

मानवी मनाची खोली समुद्राच्या तळाइतपत जाऊनही संपत नाही. अगदी ॲरिस्टोटलच्या काळापासून आतापर्यंत मानवी मनाच्या अंत:पटलाचा आणि त्याला जोडलेल्या तत्वज्ञानाचा शोध घेण्याचा प्रयत्न अनेक वैज्ञानिकानी केला. तो शोध अजूनही अव्याहत चालू आहे. हे असे लोक आणि आपण यात काय फरक आहे असं विचारलं तर त्यांनी मनाचा मणी फिरवला. "मन का मनका फेर" हे आचरणात आणलं. कुठल्याही कर्मकांडात अडकायचं नाही हे व्रत अंगीकारले तरच वैज्ञानिक प्रगती होते हे त्यांनी जाणले. पृथ्वी गोल आहे असे सांगणाऱ्या गॅलिलिओला चर्चच्या कर्मकांडात अडकलेल्या धर्मगुरूंनी तर कैदेत टाकले होते. कित्येक शतकांनंतर मानसिकता बदलली गेली आणि गॅलिलिओचे म्हणणे खरे होतें हे कळले. अशा पद्धतीने जग बदलून टाकेल असे तंत्रज्ञान, नवनवीन विषय घेऊन निर्माण होणारे साहित्य, जुन्या तत्वज्ञानाचे विस्तारित विवेचन, अशा सर्व नवीन गोष्टींची निर्मिती झाली. त्याच त्याच कर्मकांडात ही मंडळी अडकली असती तर मध्ययुगीन काळ अजूनही लांबला असता आणि तंत्रज्ञानाची फळे चाखायला बराच मोठा अवधी लागला असता. असे जे परिवर्तन नंतरच्याच काळात झाले त्यासाठी ज्यांनी हे परिवर्तन घडवून आणले त्यांनी स्वतःला बदलले. स्वतःच्याच व्यक्तिमत्त्वात बदल घडवून आणला. आपण इतरांना बदलायला जातो, आपली मते इतरांवर लादतो इथेच आपण चुकतो. आपण स्वतःत कितीसा बदल घडवतो ह्याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आपण आपला हट्ट सहजासहजी सोडत नाही. माझेच कसे खरे आहे हे पटवून देण्यासाठी आपण हट्टाला पेटतो, प्रसंगी भांडतो. आपल्याला " मन का मनका फेर" करायचं आहे हे कळत असून देखील वळत नाही. इथूनच आपल्या मनात नको त्या गोष्टींचा कचरा साठायला सुरुवात होते. माळेतला मणी फिरवण्या इतकी ही सोपी गोष्ट नाही हे खरे आहे तरीही तसा प्रयत्न करून आपण स्वतःला बदललं की समोरचं आपोआप बदललेलं दिसतं. आजूबाजूला असणारं रोजचं विश्व बदलत नाही पण आपली बघण्याची दृष्टी नव्याने मिळाल्याने त्याच विश्वातलं नवंपणआपल्याला कळायला लागतं.

जप करताना मंत्राऐवजी इतर अनावश्यक गोष्टीवर लक्ष जाते तसेच आपल्याला इतरांनी चांगले म्हणावे अशी इच्छा असताना इतरांच्यातले वैगुण्य आपण शोधत बसतो. आपले जे उद्दिष्ट असते त्यापासून आपण च्युत होतो. मग त्यावर उपाय काय? उपाय एकच, "मन का मनका फेर..."
.........................

Group content visibility: 
Use group defaults

अतिशय सुंदर लिहिले आहे. माझे आवडते भजन 'राम निरंजन न्यारा रे, अंजन सकल पसारा रे' !!

हे निर्गुणाच्या ध्यानातल्या प्रक्रियेचे वर्णन वाटते.

मूल कमल दृढ आसन बाँधु जी
उलटी पवन चढ़ाऊंगा
(पद्मासनात बसून श्वासावर लक्ष केंद्रित केल्यास प्राण उर्ध्वमुखी होतो किंवा त्यावर नियंत्रण येऊन तो वर जायला लागतो.)

मन ममता को थिर कर लाऊँ जी
पाँचों तत्व मिलाऊँगा
( मन स्थिर करून शरीरातील पंचेद्रियांवर ताबा मिळवता येतो. )

इंगला पिंगला सुखमन नाड़ी जी
त्रिवेणी पे हाँ न्हाऊंगा
(इडा व पिंगला या दोन मुख्य नाड्या ज्या सुषुम्नेस येऊन मिळतात, त्या (अभौतिक) जागेला त्रिवेणी म्हणतात. इडा, पिंगला व सुषुम्ना या सुक्ष्मातील गंगा , यमुना व सरस्वती आहेत. )

पांच पचीसों पकड़ मंगाऊं जी
एक ही डोर लगाऊंगा

(मग हा प्रवास मुलाधारापासून सुरू होत वरच्या पाच चक्रात हळूहळू चढत जातो.)

शून्य शिखर पर अनहद बाजे जी
राग छतीस सुनाऊंगा
(अनाहत चक्रात असताना अनाहत नाद म्हणजे अन् आहत कुठल्याही दोन वस्तूंचा एकमेकांना स्पर्श न होता होणारा आवाज , स्वर्गीय नाद जो हृदयातून येतो. ज्यात मृदंग, वीणा, घंटा, चिपळ्या असे प्रकार आहेत.)

कहत कबीरा सुनो भाई साधो जी
जीत निशान धुराऊँगा

आणि सहस्त्रारात जाऊन जीवशिवाचे मिलन होते.
(यावर कबीरांचाच एक वेगळा दोहा आहे. 'बरसे कंबल भींजे पाणी' म्हणजे हा अमृतवर्षाव साधकाच्या टाळूतून किंवा ब्रह्मरंध्रातून खाली ठिबकतो. )

हे मला झालेले आकलन आहे, चूक/बरोबर असू शकते. तुम्ही इतके सुंदर लिहिले आहे की रहावले नाही. आवडले नसेल तर क्षमस्व , स्वेन Happy

वा!

“बुरा जो देखन मैं चला, बुरा मिला न कोयI
जो मन खोजा अपना तो, मुझसे बुरा न कोयII”

हा दोहा पण भारीय अन समजला लगेच! Happy

माझा अतिशय आवडता दोहा -

'' ना जाने तेरा साहिब कैसा है।
मसजिद भीतर मुल्ला पुकारै, क्या साहिब तेरा बहिरा है?
चिंटी के पग नेवर (घुंगर) बाजे, सो भी साहिब सुनता है।
पंडित होय के आसन मारै लम्बी माला जपता है।
अन्दर तेरे कपट कतरनी, सो भी साहब लखता है।''

"माला फेरत जुग भया
फिरा न मन का फेर,
कर का मनका डारि दे
मन का मनका फेर।"

वाह! हा दोहा नवीन काही देऊन गेला... लहानपणी किर्तनात ऐकलेले आठवते...सासू पंढरपूरला जायला निघते पण काळजी ( वेगळ्या अर्थाने) सुनेची. आपल्या पश्चात चंगळ करेल वगैरे वगैरे...
सुन म्हणते...
आवा जाते पंढरपूरा
वेशीपासूनी येते माघारा...

सुंदर लिहीलं आहे.
सगळ्यांनी आपले आवडते दोहे लिहून अजूनच रोचक झालं.
माझा आवडता दोहा
'धीरे धीरे रे मना, धीरे सबकुछ होय
माली सिचे सौ घडा, ऋत आये फल होय'

@अस्मिता, अहो क्षमस्व कशासाठी ? इथे मायबोलीवर आपण सगळे भाऊ बहिणी आहोत. निदान या लेखाला प्रतिसाद देणारे तरी निश्चितच. त्यामुळें तसे काही लिहून मला उगीच फार मोठे ज्ञानी बनवू नका. मला कबीर आवडतो म्हणून सहज लेख लिहिला इतकेच. असो.

निर्भय निर्गुण या पदाचे तुम्ही केलेले विश्लेषण किंवा विवेचन किंवा अर्थ किंवा तुम्हाला झालेले आकलन अतीशय सुंदर आणि चपखल आहे यात वादच नाही. तुमचा राम निरंजन याबद्दलचा लेख मी वाचला आहे. तुमचा कल अध्यात्माकडे जास्त झुकलेला आहे हे कळते. कबीर ज्यांना आवडतो ते बहुतेक असे असतात किंवा मी कोण, माझा जन्म कशासाठी, असे प्रश्न ज्यांना पडतात त्यांना कबीर स्वतःच स्वतःची ओळख करून देतो. Synchronicity ?

कबिराचे दोहे असे असतात की त्यांचा शंभर अंगांनी शंभर अर्थ निघतात . मी केलेले विश्लेषण बरोबर आणि तुमचे चुकीचे असे काही नसते. निर्भय, निर्गुण या गीतात किंवा दोह्यात कबिराने , आपल्याला प्राप्त झालेल्या अमूल्य शरीराचा उपयोग करून योगसाधना केल्यानंतर येणारा अनुभव वर्णन केला आहे. याची अनुभूती प्रत्येक मानवाने घ्यावी आणि ईश्वराच्या चरणी लीन होऊन मुक्ती साधावी असे कबिराला वाटते. कबीर हा नुसता संत नव्हता तर योगी ही होता हे मात्र नक्की.

कबीर नेमका कोण होता, म्हणजे तो मुस्लीम होता की हिंदू याचा, त्या काळातल्या अध्यात्मिक प्रगती करू इच्छिणाऱ्या लोकांना संभ्रम निर्माण झाला होता. अर्थात दोन्ही समाजातल्या भक्तांना तशी प्रगती करायची होती पण आपापला समाज आपल्याला कबिराचे भक्त होण्यापासून रोखतील, टीका करतील, मागे ओढतील, वाळीत टाकतील याची भीती होती. कबीराने स्पष्ट केले होते की मी हिंदू नाही आणि मुस्लीम ही नाही. मी जुलाहा जातीचा आहे. म्हणून तो म्हणतो की अध्यात्मिक प्रगती करायची असेल तर भीती हा पहिला आणि सर्वात मोठा अडथळा आहे. तो पार करावा लागतो. तसे केले तरच (प्र)गतीचा मार्ग सापडणार आहे. तो मी पार करून दाखवणार आहे. मी निर्भय होऊन निर्गुणाचे गुण गाणार आहे. निर्गुण अथवा निराकार असणे हाच ज्याचा ( ईश्वराचा) गुण आहे तेच मी भजणार आहे. इथे कबिराच्या शब्द लालित्याला दाद द्यावी लागते. मग अध्यात्मिक प्रगतीचा प्रवास कसा असेल हे विषद करताना आपल्याला मुळारंभ आरंभ करावा लागणार आहे म्हणजेच जमिनीतून, मातीतून वरती यायचे आहे. इथे कमळ चिखलातून वरती येते हे प्रतीकात्मक उदाहरण घेतले आहे. चिखल म्हणजे नकारात्मक बाबी आणि त्यातून उगवणारे पण जमिनीच्या विरुद्ध दिशेने वरती जाणारे अध्यात्मरुपी कमळ म्हणजे गुरुत्वाकर्षणाला दिलेले आव्हानच. तेच आव्हान मी देणार आहे असे कबीर म्हणतो. पण त्याच वेळी कमळाला मिळणारी ऊर्जा चिखलातूनच मिळते म्हणून ही जी भीती आहे तिला वेगळ्या दिशेने वळवायची आहे. तिचा उपयोग अध्यात्म रुपी कमळ उगवायला करुन घ्यायचा आहे. हे कमळ जसजसे वरती जाईल तसे अवकाशातील ब्रह्मांडाकडे प्रवास करेल. परंतु हा काळ परीक्षेचा असतो. वर जाणारी ऊर्जा, अग्नी, आपल्याला पदोपदी खाली खेचणार असते कारण ऐहिक सुखा हाका मारत असतात. म्हणून आपल्या मनाला एकाग्र करणे फार जिकिरीचे असते म्हणून चित्त एकाजागी स्थिर ठेवायचे आहे.(मन का मनका फेर!!! ). म्हणजे अग्नी तत्वाकडून पृथ्वी तत्वाकडे आणि मग वायू तत्वाकडे वाटचाल सुरू होते. हे जमले की जल तत्व ( ईश्वरासाठी डोळ्यात येणारे अश्रू,मायेचा ओलावा) कह्यात येते आणि मग बाकी राहिलेले आकाश तत्व, चित्त स्थिर ठेवत साधना करत राहिली कि आपल्याला गवसते. ही साधना साधली की भूत, वर्तमान आणि भविष्य असे काहीच रहात नाही आणि या क्षणी इंगला, पिंगला आणि सुषुम्ना या तीन नाड्या जागृत होऊन त्यांचा त्रिवेणी संगम व्हायला असा कितीसा वेळ लागणार आहे? या त्रिवेणी संगमात न्हाल्यानंतर मी अमर होणार, मला मुक्ती मिळणार हे निःसंशय. (अलाहाबाद इथे जाऊन त्रिवेणी संगमात न्हाल्यानंतर पापापासून मुक्ती मिळते असे म्हणतात पण कबीराला तो अर्थ अभिप्रेत नाही. मनातली जळमटे दूर करायला हवीत. इथे वरती सीमंतिनी यांनी उल्लेख केलेला दोहा पहा. सीमंतिनी धन्यवाद. इथे काजल या चित्रपटातील आशा बाईंनी गायलेली " तोरा मन दरपन कहलाए" हे गाणे आठवते). मग पाच तत्वेच काय पण अशी पंचवीस तत्वे जरी आणली तरी त्याला या योग साधनेच्या एकाच दोऱ्याने मी बांधू शकतो. योग साधनेची ती माळ मी ईश्वराच्या गळ्यात घातली की मी शून्यात जातो.( ओम् पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते।) तिथे अनहद नाद आहे ओंकाराचा, ज्याला सीमा नाही असा नाद. त्यात छत्तीस प्रकारचे नाद आहेत, शंख आहे, वीणा आहे, डमरू आहे, मुरली आहे, चिपळ्या आहेत, टाळ आहे, मृदंग आहे, या बरोबर गंधर्व गात आहेत, असे हे छत्तीस नाद मी ऐकवणार आहे. मी, कबीर, आता पंचतत्वावर विजय मिळवलाय म्हणून मी विजयाची पताका फडकविणार आहे.

निर्भय निर्गुण हे भजन, कुमारजी, ए आर रेहमान, राहुल देशपांडे, चेन्नई वाद्यवृंद या सर्वांनी म्हंटले आहे, परंतु कुमारजी यांचा आवाज मात्र वेगळ्या विश्वात नेतो. त्यांच्या गळ्यातून कबीरच गातोय की काय किंवा कुमारजी कबीर झालेत की काय असे वाटते. असो.

या लेखाच्या निमित्ताने सामो यांचा चिंटी के पग नेवर (घुंगर) बाजे, सो भी साहिब सुनता है हे फारच आवडलं. मंजूताई, आबा, दत्तात्रय साळुंके, अनया, मीना १८३, भाग्यश्री १२३, धन्यवाद.

हद-हद करते सब गए. बेहद गयो न कोए. अनहद के मैदान में. रहा कबीरा सोए
हद हद जपे सो औलिये, बेहद जपे सो पीर
हद अनहद दोनों जपे सो वाको नाम फ़कीर

>>>>>>>>>.या लेखाच्या निमित्ताने सामो यांचा चिंटी के पग नेवर (घुंगर) बाजे, सो भी साहिब सुनता है हे फारच आवडलं.
धन्यवाद. माझाही सर्वात आवडता दोहा आहे तो. किती आश्वासक, किती विश्वास वाटून ईश्वराच्या कुशीत शिरावसं वाटायला लावणारा. मुंगीच्या पायातल्या घुंगराचाही नाद त्याला ऐकू जातो. निव्वळ ....!!!

अस्मिता क्षमस्व कशाला. छान लिहीले आहेस तू. Albeit रिलेट करता येत नाही कारण आपण गृहस्थाश्रमी त्या पायर्‍या न चढलो आहोत ना ९९.९९% लोकांबरोबर, त्या चढण्याची शक्यता आहे. पण तू लावलेला अर्थही मस्त आहे.

इथे काजल या चित्रपटातील आशा बाईंनी गायलेली " तोरा मन दरपन कहलाए" हे गाणे आठवते >> Happy माझे भाऊ शोभलात!!!
मला इथलं सगळं समजत नाही पण सामो, अस्मिता येतात म्हणून मी येते. प्रसादाच्या आशेने तासभर किर्तन ऐकणारी कार्टी असतात त्यातली मी. पण प्रतिसाद समजला, आवडला.

>>मला इथलं सगळं समजत नाही पण सामो, अस्मिता येतात म्हणून मी येते. प्रसादाच्या आशेने तासभर किर्तन ऐकणारी कार्टी असतात त्यातली मी.<< मूळ चातुर्मास वाचल्याशिवाय त्याची
पॅरोडी कशी काय जमेल?

खूप छान !
जब मैं था तब हरि नहीं, अब हरि है मैं नाँहि।
सब अँधियारा मिटि गया, जब दीपक देख्या माँहि॥

ते
'गुरु गोबिंद दोनो खडे, काके लागू पाय
बलिहारी गुरु आपकी, गोविंद दियो बताय' - हाही कबीर यांचाच दोहा आहे ना?

याचे २ अर्थ आहेत - गुरु व गोविंद सामोरे आले आणि मी द्विधा झालो कोणाच्या पाया आधी पडू
१ - गोविंद म्हणाले 'बलिहारी गुरु आपकी' - अर्थात आधी तू गुरुच्या पाया पड
२ - गुरु म्हणाले - गोविंदच्या पाया पड

सामो, हो. पण मला माहीत असलेला अर्थ वेगळा आहे. गुरू आणि गोविंद दोघेही भक्ताच्या दारी एकाच वेळी उभे राहिले आहेत आणि भक्त विचारात पडतो की मी आधी कोणाच्या पाया पडू? तेव्हा कबीर म्हणतात की भक्ताने गुरूच्या प्रथम पाया पडावे कारण गुरूच्या मार्गदर्शनाविना गोविंद कसे भेटतील? बलीहारी गुरू आपणे, गोविंद दियो मिलाय!

लेख सुरेख आहे!

वाह हा अर्थही मस्त आहे जिज्ञासा. दोह्यात किंचीत फरक आहे. पण त्यामुळे, तीसरा अर्थ निघतोय. हेच होते मौखिक परंपरेत.

सामो, धन्यवाद हा दोहा आठवून दिल्याबद्दल. जिज्ञासा यांनी या दोह्याचा अर्थ बरोबर सांगितला आहे. जिज्ञासा, धन्यवाद.

>>हद-हद करते सब गए. बेहद गयो न कोए. अनहद के मैदान में. रहा कबीरा सोए
हद हद जपे सो औलिये, बेहद जपे सो पीर
हद अनहद दोनों जपे सो वाको नाम फ़कीर<< चिडकु. मस्त दोहा आहे. आवडला.

<<<<जब मैं था तब हरि नहीं, अब हरि है मैं नाँहि।
सब अँधियारा मिटि गया, जब दीपक देख्या माँहि॥>>>> व्वा. विकास, खूप छान.

सुप्रभात, कुणी प्रल्हाद सिंह टिप्पनिया यांची अमरिका मे कबिरवानी ही सीडी पहिली आणि ऐकली आहे काय? फार फार सुंदर आहे. यु ट्यूब वरती पण आहे.

>>>>प्रल्हाद सिंह टिप्पनिया यांची अमरिका मे कबिरवानी ही सीडी पहिली आणि ऐकली आहे काय? फार फार सुंदर आहे. यु ट्यूब वरती पण आहे.<<<< होय. खूप छान आहे. लिंडा हेसचा कबीर प्रोजेक्ट. धन्यवाद शरदजी.

Pages