अवचिता परिमळू । झुळकला अळुमाळु ।
मी म्हणे गोपाळू । आला गे माये ।।
चांचरती चांचरती । बाहेरी निघाले ।
ठकचि मी ठेले । काय करु।।
मज करा का उपचारू । अधिक तापभारू ।
सखी ये सारंगधरू । मज भेटवा का ।।
तो सावळा सुंदरू । कासे पीतांबरू ।
लावण्य मनोहरू । देखियेला।।
भरलिया दृष्टी । जव डोळा न्याहाळी ।
तव कोठे गेला वनमाळी । गे माये ।।
बोधुनी ठेले मन । तव जाले अनेआन ।
सोकोनि घेतले प्राण । माझे गे माये ।।
बाप रखुमादेवीवरू । विठ्ठल सुखाचा ।
तेणे काया-मने-वाचा । वेधियेले ।।
रात्रीची जेवणे झाली, आवरा आवर करून मी झोपायला निघाले. अचानक कुठून तरी मंद सुगंध येऊ लागला. कशाचा बरं सुगंध आहे हां? असा विचार करता कान्ह्याच्या कस्तुरी टिळ्याचा असावा का? असा भास झाला आणि मी मनात म्हटलं, बहुतेक बाहेर आनंदकंद गोपाळु आला!
अवचिता परिमळू । झुळकला अळुमाळू ।
मी म्हणे गोपाळू । आला गे माये ।।
मन एकाच वेळी आनंद आणि भीती यांनी व्यापलं!
तरीही मनाला लागलेली कान्ह्याला पाहण्याची आस वरचढ ठरली...कुणी बघत तर नाही ना? याचा अंदाज घेत बाहेर आले. पण बाहेर आले तर कान्हा नव्हताच तिथे ! असं ठकवलं त्यानं मला. काय करावे हे न सुचून मी काही क्षण तशीच काष्ठवत् उभी होते बाहेर.
चांचरती चांचरती । बाहेरी निघाले ।
ठकचि मी ठेले । काय करू ।।
कान्हा असंच करतो. दर्शनाची आस लावतो आणि दिसत नाही! हा विरहाचा ताप आता सहन होत नाही.
मनातल्या मनात मी तुम्हा सगळ्या सख्यांनाच म्हटलं, काही तरी उपाय करा या माझ्या विरहवेदनेवर. तो सारंगधर आता मला भेटवा, त्याशिवाय जिवाला चैन नाही पडणार!
एवढ्यात...डोळ्यांसमोर प्रत्यक्ष श्रीकृष्ण !!
काय वर्णू त्याचं रूप. बुद्धी, शब्द सगळे थिटेच त्याच्यापुढे. तो श्यामल, सुंदर, आपल्या लावण्याने कुणाचेही मन हरुन घेणारा मनोहर असा पीतांबर नसलेला गोपाळ मला दिसला.
गोपाळ हे नावही सार्थ करीत माझ्या इंद्रियांवरचा ताबाही त्याने माझ्या हाती ठेवला नाही.
मी डोळे भरून त्याला पाहत असताना आनंदातिशयाने डोळे भरून आले. (डोळे भरणे या शब्दावर काय छान श्लेष साधला गेलाय)
डोळे पाण्याने भरल्याने समोरचे अंधुक दिसू लागले. जणु कान्ह्याचा सावळा रंग, पीतांबराचा रंग हे सगळे एकमेकांत मिसळून मोरपिसाचा रंग तयार झाला एकसंध ! आणि पुन्हा तो खट्याळ वनमाळी निसटला !
भरलिया दृष्टी । जव डोळा न्याहाळी ।
तव कोठे गेला वनमाळी । गे माये ।।
आता मात्र मीच मनाला समजावले की कान्हा आहे इथेच, दिसेल पुन्हा. कान्हा संध्याकाळी भेटला होता तेव्हा बोलता बोलता बोलून गेला की "मी सगळीकडेच आहे, अगदी तुझ्यातही!"
ते आठवलं आणि मनाची पक्की धारणा झाली की हे तो हेतुपुरस्सर बोलला होता. मला बोध व्हावा म्हणूनच. मग मात्र मी स्वतःला समर्पित केलं त्या कृष्णतत्त्वात. मगाशी जो मोरपिशी रंग तयार झाला होता तो भास नव्हताच! त्या अंधारात हजार मोरांची पिसे अंगाला स्पर्श करत आहेत असा अनुभव आला. जणू ती मोरपिसे माझे पंचप्राण शोषून घेत होती. त्या आल्हादानं डोळे आपोआप मिटले! मी कान्ह्याशी अनेआन म्हणजे अनन्य झाले होते.
बोधुनी ठेले मन । तव जाले अनेआन ।
सोकोनि घेतले प्राण । माझे गे माये ।।
आता माझे प्राणच माझे नाहीत तर काया-वाचा आणि मनाला कान्ह्याशिवाय अन्य काही सुचेल का?
मी काया-वाचा-मनाने कृष्णमयी झाले !
माउली म्हणतात की त्या गोपिकेसारखीच माझी अवस्था आहे. माझ्या काया-वाचा-मनाला आता रखुमादेवीवर विठ्ठलाशिवाय काही दिसत नाही!
माझ्या काया-वाचा-मनाच्या सबाह्य अभ्यांतरी केवळ सुखराशी विठ्ठल आहे!
गोपिकांचे जीवन किती साधे, पण त्यांचा कृष्णप्रति असलेला भक्तिभाव मात्र अत्युच्च ! म्हणून तर उद्धवासारख्या ज्ञानी पुरुषालाही त्यांनी भक्तिमार्ग दाखवला! कसलासा सुगंध येणे ही सामान्य जीवनातली तशी कधीही घडू शकणारी आणि त्यामुळेच सामान्य अशी घटना! पण ही गोपिका त्या सुगंधालाही कृष्णाशी जोडते. तसंच पाहायला गेलं तर ही संपूर्ण रचना त्या गोपिकेच्या धारणेतून तिच्या मनाने मांडलेला कल्पनांचा, भासांचा एक गोफ आहे असं म्हणता येईल. काया-वाचा आणि मन या सगळ्यांना आलंबन एकच श्रीकृष्ण! काय अवस्था असेल ती ! पंच ज्ञानेंद्रियांचे विषय सगळे कृष्णमय !
सुगंध आला तर कृष्णच आला असावा अशी धारणा, डोळे भरून मला दिसतो कोण? तर पीतांबरधर सावळा कृष्णच ! पंचप्राणच त्या कृष्णाने शोषून घेतलेत, माझं काही उरलंच नाही माझ्याकडे !!
किती अनन्यता!! काय कमालीची भावावस्था!!
ही रचना दोन समर्थ गायिकांनी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. दोन्ही रचना त्या त्या जागी अतुलनीयच आहेत.त्यातल्या किशोरीताईंच्या संगीतरचनेबद्दल थोडेसे....
'सारंगधरु भेटवा' असं म्हणणारी गोपिका किशोरीताईंनी सारंग रागातून आपल्या समोर आणली आहे.
पहिल्यांदा किशोरीताईंच्या आवाजात ही रचना ऐकताना मला असं वाटलं की "किशोरीताई किती ठासून भरल्या आहेत यात, किती प्रखर अभिव्यक्ती आहे. पण जसजसा ही रचना ऐकत गेलो, तसतसे त्यातले अनेक पदर उलगडत गेले. पहिली गोष्ट जाणवली ती ही की किशोरीताई स्वरांना शरण गेल्यात, स्वरांशी अनन्य आहेत. सर्वसामान्यपणे एखादे सुगम गीत, अभंग गाताना त्यात 'भाव' आणून स्वर-शब्द उच्चारले जातात. पण किशोरीताईंची रचना, म्हणजे त्यातले सांगीतिक कॉम्पोझिशन, इतकं प्रभावी आहे की वेगळे भाव ओतावे लागतच नाहीत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मूळ रचना संपूर्ण घेतली गेली आहे.
बोधुनी ठेले मन | तव जाले अनेआन - इथे अनेआन आणि आन- हे पाठभेद मानता येतील. (लताबाईंच्या रचनेत 'आन' एवढाच शब्द वापरलाय).
रचनेच्या सुरुवातीचा आलाप म्हणजे जणू ताईंनी एक 'कॅनव्हास' तयार केलाय, पुढच्या चित्रकलेसाठीचा.
(लताबाईंच्या रचनेतही सुरुवातीचा आलाप तसेच काम करतो
)
या रचनेतली 'झुळकला' या शब्दाचीच कलाकुसर इतकी लोभस आहे की फक्त तेवढंच ऐकत रहावंसं वाटतं. अगदी खरोखरीच परिमळू झुळकल्याचा आभास होतो. 'गोपाळू आला गे माये' यातले 'आला गे माये' या तीन शब्दांना दिलेले झोके आणि स्वरांच्या मींड.. आहाहा !
'ठकचि मी ठेले, काय करु' यातल्या 'काय करू' चे स्वरच त्या गोपिकेची अगतिकता डोळ्यांसमोर उभी करतात. 'काय करू' म्हणून झाल्यावर थोडा विराम आहे तालाला... हीसुद्धा त्या अगतिकतेचीच सूचना !
तो सावळा सुंदरू | कासे पीतांबरू.. यात पीतांबरू या शब्दातला 'पी' छान दीर्घ उच्चारलाय आणि अगदी सहज 
'भरलिया दृष्टी जव डोळा न्याहाळी | तव कोठे गेला वनमाळी गे माये | यातला 'कोठे' हा शब्द.. त्याचे स्वर जणू एक पोकळी दाखवतात. 'वनमाळी गे माये' इथे छंददृष्ट्या एक शब्द कमी पडतो खरं तर आणि म्हणून 'वनमाळी' हा शब्द लांबवला गेलाय जरासा...आणि त्यानेच मजा आणली आहे.
बोधुनी ठेले मन.. सोकोनि घेतले प्राण माझे गे माये.... यानंतरही तालाला किंचित विराम आहे. यातून सांगीतिक दृष्ट्या एक समतोल साधला जातोय असं वाटतं.
तेणे काया मने वाचा- यात काया, मने, वाचा यांचे स्वर एकामागून एक चढते आहेत. अस्तित्वाच्या कायिक, मानसिक आणि वाचिक अशा पायर्या चढत जाव्या तसे.
खरं तर माउलींच्या शब्द-रचनेबद्दल लिहिल्यावर अजून काही लिहूच नये असे वाटत होते, पण मला आवडलेल्या जागाही सांगायचा मोह आवरला नाही म्हणून जरा पाल्हाळ लावलं. गेले काही दिवस हे गाणं खूपदा ऐकलंय, दर वेळी अजून काही तरी नवीन सापडतं. ऐकताना अगदी एखादाच क्षण का होई ना... त्या गोपिकेच्या भावविश्वाचा अनुभव येतो. संगीत हा ईश्वराशी जोडलं जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग आहे असं म्हणतात, त्याची प्रचीती येते.
~ चैतन्य दीक्षित.
आभार चैतन्य!
आभार चैतन्य!
खूपच सुंदर लिहिलंय.
खूपच सुंदर लिहिलंय. किशोरीताईंचं पण ऐकलं, नाही भावलं अजिबात, त्यांची इतर भक्तिगीते मात्र खूपच आवडतात, बहुदा इथे तुलना झाली असेल. हे आणि 'अजि सोनियाचा दीनु' म्हणजे फक्त लताच.
हीरा तुमचा प्रतिसाद खूपच
हीरा तुमचा प्रतिसाद खूपच सुंदर. धन्यवाद त्याबद्दल .
https://youtu.be/tz6rb6xeDcI
https://youtu.be/tz6rb6xeDcI
खूप छान प्रतिसाद हीरा. ते 'ठक
खूप छान प्रतिसाद हीरा. ते 'ठक' म्हणजे आपण ज्याला 'थक्क' होणे म्हणतो तेच आहे का?
खूप छान...
खूप छान...
हीरा यांचा प्रतिसाद आवडला.
खूपच छान लिहिलं आहे चैतन्य.
खूपच छान लिहिलं आहे चैतन्य. त्यानिमित्ताने किशोरीताईंचं 'अवचिता परिमळू' अनेक वर्षांनी ऐकलं.
हरचंद, तसे असू शकेल. पण 'एका
हरचंद, तसे असू शकेल. पण 'एका जनार्दनी पायी ठकचि ठेले ' चा काय अर्थ असावा? सर्व भान हरपून पायांशी उभा आहे?
ठक चा विस्मित असा एक अर्थ कोशात आहे खरा. त्यातून थक्क शक्य आहे. किंवा थक्कचा पूर्वी सुरुवातीला मोहित झालेला, भूल पडलेला असा अर्थ असावा आणि त्यात हळू हळू बदल होत आजचा विस्मय/ आश्चर्यचकित हा अर्थ आला असावा
मला लहानपणी वाटत असे की ठक म्हणजे सर्वस्व - तनमनधन - हे तुझ्या पायांवर ठेवले आहे. पण ठेले आणि ठेवले ह्यातला फरक कळला आणि शंका निमाली.
प्रफुल्ल होवोनि सुपुष्प ठेले
प्रफुल्ल होवोनि सुपुष्प ठेले .... ठेले म्हणजे ठाकले - हे आठवलं
>खूप छान प्रतिसाद हीरा. ते
>खूप छान प्रतिसाद हीरा. ते 'ठक' म्हणजे आपण ज्याला 'थक्क' होणे म्हणतो तेच आहे का?<< +१
हो, बहुतेक तोच अर्थ अपेक्षित असावा.
हीरा यांनी दिलेलं स्पष्टिकरण, प्रा. राम शेवाळकर यांनी केलेल्या निरुपणाशी ("कानडा वो विठ्ठलु" या लताबाईंचा अल्बम मधे) खूप जवळ आहे. माझ्याकडे आय्ट्युनवर आहे, युट्युब वर देखील असायला हवं. ज्ञानेश्वरांच्या निवडक ओव्यांचं प्रा. राम शेवाळकरांनी केलेलं निरुपण हा मराठी माणसांकरता एक अमुल्य ठेवा आहे...
ठेले हे स्था तिष्ठ वरून आले
ठेले हे स्था तिष्ठ वरून आले आहे. ठाकणे किंचित वेगळे. ठेले म्हणजे नुसते उभे असणे, त्या ठायी असणे, नुसतेच असणे --
असे वाटते.
अच्छा
अच्छा
खरे आहे राज. राम शेवाळकर
खरे आहे राज. राम शेवाळकर म्हणजे प्रकांड विद्वत्ता आणि सोपेपणा, रसाळपणा ह्यांचा संगम. वैदर्भीय साहित्य पुण्यामुंबईच्या सर्वसाधारण वाचकापर्यंत फारसे पोचत नाही. त्यातून धार्मिक आध्यात्मिक साहित्य तर नाहीच.
वि स पागे यांचीसुद्धा कीर्तन प्रवचने फार रसाळ असत. तीन पिढ्यांमागच्या ल. रा. पांगारकर ( भक्तिमार्गप्रदीप आणि संतचरित्रे वाले) ह्यांच्याविषयीही खूप ऐकले वाचले आहे.
आणि निरुपणात विद्वत्तेबरोबर सहृदयता, आत्मीयता असली की ज्ञान आणि विद्वत्ता परिपूर्ण होते. शुष्कपणा जाऊन आर्द्रता येते. हे गुण शेवाळकरांच्या साहित्यात दिसतात.
हरचंद, इतके अवांतर झाले आहे
हरचंद, इतके अवांतर झाले आहे तर त्यात आणखी थोडी भर. धागाकर्ते , माफी असावी.
स्था तिष्ठ हा धातू P I E तून वेगवेगळ्या रूपांत सर्वत्र पसरला आहे. stand, stehen, stop, station, static, state, stationary, stay, ठहर, थाडे/ ठाडे, stance, हे तर परिचयाचे आहेतच पण अन्य आधुनिक युरोपीय भाषांतही त्याचा सुळसुळाट आहे. एकदा मी अशी यादी केली होती पण जर्मन शिवाय अन्य भाषांतील शब्द लक्षात राहिले नाहीत.
असो. अवांतर समाप्त.
हीरा, जबरी!
हीरा, जबरी!
हीरा, तुमच्या पोस्ट्स खासच!
हीरा, तुमच्या पोस्ट्स खासच!
लेख सुरेख आहे. ही रचना लतादीदींचीच ऐकली आहे. आता किशोरीताईंनी गायलेली ऐकते.
Pages