अवचिता परिमळू

Submitted by चैतन्य दीक्षित on 11 May, 2016 - 03:32

अवचिता परिमळू । झुळकला अळुमाळु ।
मी म्हणे गोपाळू । आला गे माये ।।
चांचरती चांचरती । बाहेरी निघाले ।
ठकचि मी ठेले । काय करु।।
मज करा का उपचारू । अधिक तापभारू ।
सखी ये सारंगधरू । मज भेटवा का ।।
तो सावळा सुंदरू । कासे पीतांबरू ।
लावण्य मनोहरू । देखियेला।।
भरलिया दृष्टी । जव डोळा न्याहाळी ।
तव कोठे गेला वनमाळी । गे माये ।।
बोधुनी ठेले मन । तव जाले अनेआन ।
सोकोनि घेतले प्राण । माझे गे माये ।।
बाप रखुमादेवीवरू । विठ्ठल सुखाचा ।
तेणे काया-मने-वाचा । वेधियेले ।।

रात्रीची जेवणे झाली, आवरा आवर करून मी झोपायला निघाले. अचानक कुठून तरी मंद सुगंध येऊ लागला. कशाचा बरं सुगंध आहे हां? असा विचार करता कान्ह्याच्या कस्तुरी टिळ्याचा असावा का? असा भास झाला आणि मी मनात म्हटलं, बहुतेक बाहेर आनंदकंद गोपाळु आला!

अवचिता परिमळू । झुळकला अळुमाळू ।
मी म्हणे गोपाळू । आला गे माये ।।

मन एकाच वेळी आनंद आणि भीती यांनी व्यापलं!
तरीही मनाला लागलेली कान्ह्याला पाहण्याची आस वरचढ ठरली...कुणी बघत तर नाही ना? याचा अंदाज घेत बाहेर आले. पण बाहेर आले तर कान्हा नव्हताच तिथे ! असं ठकवलं त्यानं मला. काय करावे हे न सुचून मी काही क्षण तशीच काष्ठवत् उभी होते बाहेर.

चांचरती चांचरती । बाहेरी निघाले ।
ठकचि मी ठेले । काय करू ।।

कान्हा असंच करतो. दर्शनाची आस लावतो आणि दिसत नाही! हा विरहाचा ताप आता सहन होत नाही.
मनातल्या मनात मी तुम्हा सगळ्या सख्यांनाच म्हटलं, काही तरी उपाय करा या माझ्या विरहवेदनेवर. तो सारंगधर आता मला भेटवा, त्याशिवाय जिवाला चैन नाही पडणार!

एवढ्यात...डोळ्यांसमोर प्रत्यक्ष श्रीकृष्ण !!
काय वर्णू त्याचं रूप. बुद्धी, शब्द सगळे थिटेच त्याच्यापुढे. तो श्यामल, सुंदर, आपल्या लावण्याने कुणाचेही मन हरुन घेणारा मनोहर असा पीतांबर नसलेला गोपाळ मला दिसला.
गोपाळ हे नावही सार्थ करीत माझ्या इंद्रियांवरचा ताबाही त्याने माझ्या हाती ठेवला नाही.
मी डोळे भरून त्याला पाहत असताना आनंदातिशयाने डोळे भरून आले. (डोळे भरणे या शब्दावर काय छान श्लेष साधला गेलाय)
डोळे पाण्याने भरल्याने समोरचे अंधुक दिसू लागले. जणु कान्ह्याचा सावळा रंग, पीतांबराचा रंग हे सगळे एकमेकांत मिसळून मोरपिसाचा रंग तयार झाला एकसंध ! आणि पुन्हा तो खट्याळ वनमाळी निसटला !

भरलिया दृष्टी । जव डोळा न्याहाळी ।
तव कोठे गेला वनमाळी । गे माये ।।

आता मात्र मीच मनाला समजावले की कान्हा आहे इथेच, दिसेल पुन्हा. कान्हा संध्याकाळी भेटला होता तेव्हा बोलता बोलता बोलून गेला की "मी सगळीकडेच आहे, अगदी तुझ्यातही!"
ते आठवलं आणि मनाची पक्की धारणा झाली की हे तो हेतुपुरस्सर बोलला होता. मला बोध व्हावा म्हणूनच. मग मात्र मी स्वतःला समर्पित केलं त्या कृष्णतत्त्वात. मगाशी जो मोरपिशी रंग तयार झाला होता तो भास नव्हताच! त्या अंधारात हजार मोरांची पिसे अंगाला स्पर्श करत आहेत असा अनुभव आला. जणू ती मोरपिसे माझे पंचप्राण शोषून घेत होती. त्या आल्हादानं डोळे आपोआप मिटले! मी कान्ह्याशी अनेआन म्हणजे अनन्य झाले होते.

बोधुनी ठेले मन । तव जाले अनेआन ।
सोकोनि घेतले प्राण । माझे गे माये ।।

आता माझे प्राणच माझे नाहीत तर काया-वाचा आणि मनाला कान्ह्याशिवाय अन्य काही सुचेल का?
मी काया-वाचा-मनाने कृष्णमयी झाले !

माउली म्हणतात की त्या गोपिकेसारखीच माझी अवस्था आहे. माझ्या काया-वाचा-मनाला आता रखुमादेवीवर विठ्ठलाशिवाय काही दिसत नाही!
माझ्या काया-वाचा-मनाच्या सबाह्य अभ्यांतरी केवळ सुखराशी विठ्ठल आहे!

गोपिकांचे जीवन किती साधे, पण त्यांचा कृष्णप्रति असलेला भक्तिभाव मात्र अत्युच्च ! म्हणून तर उद्धवासारख्या ज्ञानी पुरुषालाही त्यांनी भक्तिमार्ग दाखवला! कसलासा सुगंध येणे ही सामान्य जीवनातली तशी कधीही घडू शकणारी आणि त्यामुळेच सामान्य अशी घटना! पण ही गोपिका त्या सुगंधालाही कृष्णाशी जोडते. तसंच पाहायला गेलं तर ही संपूर्ण रचना त्या गोपिकेच्या धारणेतून तिच्या मनाने मांडलेला कल्पनांचा, भासांचा एक गोफ आहे असं म्हणता येईल. काया-वाचा आणि मन या सगळ्यांना आलंबन एकच श्रीकृष्ण! काय अवस्था असेल ती ! पंच ज्ञानेंद्रियांचे विषय सगळे कृष्णमय !
सुगंध आला तर कृष्णच आला असावा अशी धारणा, डोळे भरून मला दिसतो कोण? तर पीतांबरधर सावळा कृष्णच ! पंचप्राणच त्या कृष्णाने शोषून घेतलेत, माझं काही उरलंच नाही माझ्याकडे !!
किती अनन्यता!! काय कमालीची भावावस्था!!

ही रचना दोन समर्थ गायिकांनी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. दोन्ही रचना त्या त्या जागी अतुलनीयच आहेत.त्यातल्या किशोरीताईंच्या संगीतरचनेबद्दल थोडेसे....
'सारंगधरु भेटवा' असं म्हणणारी गोपिका किशोरीताईंनी सारंग रागातून आपल्या समोर आणली आहे.
पहिल्यांदा किशोरीताईंच्या आवाजात ही रचना ऐकताना मला असं वाटलं की "किशोरीताई किती ठासून भरल्या आहेत यात, किती प्रखर अभिव्यक्ती आहे. पण जसजसा ही रचना ऐकत गेलो, तसतसे त्यातले अनेक पदर उलगडत गेले. पहिली गोष्ट जाणवली ती ही की किशोरीताई स्वरांना शरण गेल्यात, स्वरांशी अनन्य आहेत. सर्वसामान्यपणे एखादे सुगम गीत, अभंग गाताना त्यात 'भाव' आणून स्वर-शब्द उच्चारले जातात. पण किशोरीताईंची रचना, म्हणजे त्यातले सांगीतिक कॉम्पोझिशन, इतकं प्रभावी आहे की वेगळे भाव ओतावे लागतच नाहीत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मूळ रचना संपूर्ण घेतली गेली आहे.
बोधुनी ठेले मन | तव जाले अनेआन - इथे अनेआन आणि आन- हे पाठभेद मानता येतील. (लताबाईंच्या रचनेत 'आन' एवढाच शब्द वापरलाय).
रचनेच्या सुरुवातीचा आलाप म्हणजे जणू ताईंनी एक 'कॅनव्हास' तयार केलाय, पुढच्या चित्रकलेसाठीचा.
(लताबाईंच्या रचनेतही सुरुवातीचा आलाप तसेच काम करतो Happy )
या रचनेतली 'झुळकला' या शब्दाचीच कलाकुसर इतकी लोभस आहे की फक्त तेवढंच ऐकत रहावंसं वाटतं. अगदी खरोखरीच परिमळू झुळकल्याचा आभास होतो. 'गोपाळू आला गे माये' यातले 'आला गे माये' या तीन शब्दांना दिलेले झोके आणि स्वरांच्या मींड.. आहाहा !
'ठकचि मी ठेले, काय करु' यातल्या 'काय करू' चे स्वरच त्या गोपिकेची अगतिकता डोळ्यांसमोर उभी करतात. 'काय करू' म्हणून झाल्यावर थोडा विराम आहे तालाला... हीसुद्धा त्या अगतिकतेचीच सूचना !
तो सावळा सुंदरू | कासे पीतांबरू.. यात पीतांबरू या शब्दातला 'पी' छान दीर्घ उच्चारलाय आणि अगदी सहज Happy
'भरलिया दृष्टी जव डोळा न्याहाळी | तव कोठे गेला वनमाळी गे माये | यातला 'कोठे' हा शब्द.. त्याचे स्वर जणू एक पोकळी दाखवतात. 'वनमाळी गे माये' इथे छंददृष्ट्या एक शब्द कमी पडतो खरं तर आणि म्हणून 'वनमाळी' हा शब्द लांबवला गेलाय जरासा...आणि त्यानेच मजा आणली आहे.
बोधुनी ठेले मन.. सोकोनि घेतले प्राण माझे गे माये.... यानंतरही तालाला किंचित विराम आहे. यातून सांगीतिक दृष्ट्या एक समतोल साधला जातोय असं वाटतं.
तेणे काया मने वाचा- यात काया, मने, वाचा यांचे स्वर एकामागून एक चढते आहेत. अस्तित्वाच्या कायिक, मानसिक आणि वाचिक अशा पायर्‍या चढत जाव्या तसे.
खरं तर माउलींच्या शब्द-रचनेबद्दल लिहिल्यावर अजून काही लिहूच नये असे वाटत होते, पण मला आवडलेल्या जागाही सांगायचा मोह आवरला नाही म्हणून जरा पाल्हाळ लावलं. गेले काही दिवस हे गाणं खूपदा ऐकलंय, दर वेळी अजून काही तरी नवीन सापडतं. ऐकताना अगदी एखादाच क्षण का होई ना... त्या गोपिकेच्या भावविश्वाचा अनुभव येतो. संगीत हा ईश्वराशी जोडलं जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग आहे असं म्हणतात, त्याची प्रचीती येते.

किशोरीताईंचे अवचिता परिमळु

~ चैतन्य दीक्षित.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर म्हणजे सुंदरच लिहीलं आहेस! साहित्यिक आणि सांगितीक विश्लेषण दोन्ही! Happy

सर्वसामान्यपणे एखादे सुगम गीत, अभंग गाताना त्यात 'भाव' आणून स्वर-शब्द उच्चारले जातात. पण किशोरीताईंची रचना, म्हणजे त्यातले सांगीतिक कॉम्पोझिशन, इतकं प्रभावी आहे की वेगळे भाव ओतावे लागतच नाहीत.>>>>> एकदम खरं! ऐकताना ती रचना अनुभवता येते!

माझी अतिशय आवडती रचना . किती ही वेळा ऐकलं तरी प्रत्येक वेळी तोच आनंद मिळतो. सुरवातीपासून शेवटपर्यंत तो चढत्या भाजणीने वाढत जातो. यातील मला सर्वात आवडत काया वाचा मने आणि बोधियेले

रचने इतकच लिखाण ही सुंदर झालंय चैतन्य. पुन्हा पुन्हा वाचतेय.

धन्यवाद इतक्या सुंदर लेखासाठी.

धन्यवाद इतक्या सुंदर लेखासाठी

रचने इतकच लिखाण ही सुंदर झालंय चैतन्य. >> +१

किशोरीताईंच्या आवाजात ऐकलेले नाहिय... लिन्क आहे का?

किशोरीताईंचे मराठी अभंग म्हणजे काय बोलू असे आहेत जनी म्हणे, बोलवा विठ्ठल, माझे माहेर, कानडा विठ्ठलु, पहातोस काय आता पुढे करी पाय, रंगी रंगला श्रीरंग, .. यु ट्युब वर आहेत vt220 जरूर ऐका. ऐकताना डोळे कधी पाझरू लागतील ते कळणार नाही. मन शांत होईल. स्वर्गीय सुखाचा आनंद मिळेल.

ही विरहीणी आहे की अभंग ?

संत ज्ञानेश्वरांच्या अनेक विरहीण्या प्रसिध्द आहेत.

ही रचना त्याच धर्तीची आहे असे वाटते.

हा आवाज इतके वर्षे ऐकुन तो किशोरीताईंचा आहे हे माहित नव्हत. या करिता खास धन्यवाद

प्रतिसादांबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार !
किशोरीताईंच्या या गीताची लिंक लेखात समाविष्ट केली आहे.

~चैतन्य

चैतन्य, फार सुरेख लिहिलंयस.
तुझे स्पेशली हे संतरचनांवरचे लेख वाचताना जाणवतं की मी इतक्या तादात्म्यानं कधीच काही ऐकलेलं नाही.

मला फक्त लताबाईंनी गायलेलीच रचना माहिती आहे. किशोरीताईंची ऐकते आता.

सुंदर लिहलंय ! माउलींच्या शब्दात किती गोडवा भरलेला असतो !

लताचे 'अवचिता परिमळू' लहानपणापासून ऐकत आले आहे. एक-दीड वर्षांपूर्वी किशोरीताईंचे ऐकण्यात आले. लताचे स्वर- हृदयनाथाचे संगीत अतुलनीय आहेतच पण किशोरीताईंचे हे गाणे काहीतरी वगळे वाटते, जास्त खोल वाटते. आम्हीही हे बरेचदा ऐकत असतो Happy

चांचरती चांचरती । बाहेरी निघाले । ठकचि मी ठेले । काय करु

ज्ञानेश्वरांनी इथे स्त्रीलिंगी रूप वापरले आहे ते प्रत्यक्ष स्त्री साठी नसून देह-मन-बुध्दी साठी असे असू शकेल का ? देहावरचे ममत्व ,इतर विषयांवरची आसक्ती आवरण्याचा प्रयत्न करता करता, ध्यान करताना आता मनाने त्या कृष्णाचाच ध्यास घेतला आणि अंतरात निरंतर सुखाच्या, शांतीच्या रुपाने विठ्ठलाने वास केला !

पुनश्च धन्यवाद सर्वांना.
@पारू,
माउलींनी वापरलेले स्त्रीलिंगी रूप >>>>
हा अजून एक वेगळा आयाम आहे असे वाटते. त्या बाजूने अर्थान्वयन करायला हवे या रचनेचे.

चैतन्या - सुंदरच...

यानिमित्ताने माधव यांना उमगलेला हा एक आयाम देत आहे .....

<<<<<<जिप्सी, अर्थ अनेक अंगांनी काढता येईल. मला समजलेला अर्थ सांगतो.

अष्टांग योगातल्या समाधी अवस्थेचे वर्णन आहे ते. यम, नियम, आसने, प्राणायाम ही तर केवळ शरीराने साधायची अंगे आहेत. प्रत्याहारापासून साधक खोल जायला लागतो. तरी प्रत्याहार, धारणा आणि ध्यान या तिन्ही अवस्थात देहबुद्धी ('मी'पणा) शिल्लक असतेच. आत्तापर्यंतच्या ७ साधनांमध्ये तिला कह्यात आणायचा प्रयत्न चालू असतो पण तरी तीच राणी असते, तिचीच अमर्याद सत्ता असते. पण आता तिला गोपाळाची आस लागलेली असते.

आणि अशातच अचानक 'तो' अनुभव येतो - पंचेद्रियांनी अनुभवता येणारा असतो तो अनुभव. स्वर्गीय सुगंध, अनाहत नाद असे काहीही असू शकते. माउलींनी स्वर्गीय गंधाचे उदाहरण घेतले आहे. त्या गंधाने देहबुद्धी संमोहीत होऊन जाते. तिला कळते की ज्याची आस होती तो आलाय. देहबुद्धीच ती ! देह सोडून कधीच बाहेर पडलेली नसते. पण 'त्या'ला बघायची उर्मी एवढी जबरदस्त असते की ती देह सोडून बाहेर येते. चाचरत चाचरत येते, पण येते. बाहेर आल्यावर ती देहाची साम्राज्ञी पूर्णपणे ठकवली जाते, लुबाडली जाते. कशी?

आत्तापर्यंत ज्याच्याबद्दल फक्त ऐकले होते ते सावळे सौंदर्य साक्षात समोर उभे असते. ते दर्शन इतके अलौकीक असते की ती भान हरपते. त्या अवस्थेतच 'तो' तिला बोध देतो. आजपर्यंत अनेक प्रवचने ऐकलेली असतात, बरेच वाचन केले असते. त्यातले काही मनात झीरपलेले असते आणि बाकीचे सगळे वाहूने गेले असते. पण आज सांगणारा 'तो' असतो. साक्षात गीता-कथनाचा प्रसंग! मन प्रत्येक शब्दच काय काना, मात्रा, वेलांटीसह प्रत्येक अक्षर टिपून घेते. मग आत्मबोध झालेले ते मन मन उरतच नाही. दुसरेच (आन) काही बनून जाते.

ज्याच्या जोरावर देहबुद्धी देहावर सत्ता चालवत असते ते मनच तिचे रहात नाही. त्या देहबुद्धीचे सार, तिचा प्राणच तो श्रीहरी शोषून (सोकोनी) घेतो. तिची सत्ता संपते. उरतो फक्त साधक - ज्याचे वर्णन शशांकनी वर केलेच आहे.>>>>>>>>> ( http://www.maayboli.com/node/49241 )

धन्यवाद...

किशोरीताईंचे कधी ऐकले नाहीये. माझ्यापुरते तरी हे गाणे म्हणजे लता आणि हृदयनाथ. दिवसभर रिपीट मोड वर ऐकू शकतो इतके आवडते ते.

शशांक Happy

पुन्हा एकदा सर्वांचे आभार.
शशांकजी, माधवची पोस्ट इथे दिल्याबद्दल अनेक आभार.
माधव, ग्रेट लिहिलंयस_/\_

आज परत हा लेख वाचला आणि पुन्हा ऐकलं अवचिता परिमळू... आह!
जव डोळा न्याहाळी मध्ये डोळा वर घेतेलेली आन्दोलने पण ऐकताना भिरभिरणारे डोळे दिसतात अगदी!
जिथे जिथे माये अशी हाक घातली आहे तिथे तिथे आर्तता केवढी ती!

सुंदर लेख.
>>>>>>>या रचनेतली 'झुळकला' या शब्दाचीच कलाकुसर इतकी लोभस आहे की फक्त तेवढंच ऐकत रहावंसं वाटतं. अगदी खरोखरीच परिमळू झुळकल्याचा आभास होतो.
वाह!! वाह!! काय छान जागा मांडल्या आहेत.

ठक ह्या शब्दाचा अर्थ एकाग्रता, आश्चर्य, विस्मित असाही आहे.
आरती ज्ञानराजा ह्या आरतीमधे : प्रगट गुह्य बोले l विश्व ब्रह्मचि केले l रामा ( एका) जनार्दनी l पायी ठकचि ठेले ll
आणि हिंदीमध्ये भूल पडणे, मोहित होणे असाही आहे.

Kulu, सामो, हीरा,
मनःपूर्वक धन्यवाद Happy
Kulu धागा वर काढलास, बरं झालं. आता मीही ऐकतो हे पुन्हा.
जव डोळा न्याहाळी- डोळा ची जागा तू म्हणतोस तशी.
आणि माये शब्द खरंच खूप आर्ततेने उच्चारलाय.
किशोरीताई कमाल आहेत _/\_

माउलींनी वापरलेले स्त्रीलिंगी रूप : ह्यावर माझ्या अल्पमतीप्रमाणे थोडेसे स्पष्टीकरण :
ही आत्मरती आहे. प्रियकर मी आणि प्रेयसीही मीच. प्रेमही मीच. सखा मी, सखी मी आणि सख्यभावही मीच. आत्यंतिक आनंदाची, आत्मानंदाची, सहजानंदाची अवस्था असते ही. काहीही बाह्य कारण नको. हा आनंद आतून उसळत असतो. देहभाव राहात नाही. ' आमोद सुनास जाले.' सुगंध हाच नाक झाला. कोणी कोणाला भोगावे? हा अमृतानुभव. (नऊवा अध्याय). तसे तर २/५४-५६, ४/३३ असे अनेकदा वर्णन आहे ह्या स्थितीचे. रामा तू माझा यजमान हा
मध्वमुनीश्वरांचा अभंग काय किंवा अगदी विसाव्या शतकातील कशी काळनागिणी सखे ग वैरीण झाली नदी हे गीत काय; भोग - भोग्य - भोक्ता अशी त्रिपुटी जुळलेली दिसते. काही लोक क्षणिकच ह्या भावात असतात तर महात्मे सदैव ह्या भावात रहातात. देहभाव, लिंगभाव सुटतो.
बहुतेक सर्व सूफी तत्त्वज्ञान ह्याच भावाने भरलेले आहे. रूमी , अमीर खुसरो आणि इतर अनेक पारसी महाकवींच्या काव्यातून स्वतःला प्रेयसी मानून प्रियकराला भेटण्याची, त्याच्याशी एकरूप होण्याची तळमळ व्यक्त झालेली दिसते. कोणी मधुराभक्ती म्हणतात, कोणी आत्मानंद, सहजानंद, आत्मरती. ह्या भावाने परमात्म्याला आळवणे, त्याच्याशी अद्वैत साधण्याची आस धरणे ही मधुराभक्ती आणि ते अद्वैत जुळले, परमानंद झाला, अमृतानुभव मिळाला, की मग ती आत्मरती.
अमृतानुभव म्हणजे सिद्धावस्थेचे सार आहे. ते उकलून सांगण्याची माझी पात्रता नाही. चुका झाल्याच असणार, तर तज्ज्ञ लोकांनी क्षमा करावी. देवदूत धीर करीत नाहीत तेथे मूर्ख लोक पुढे सरसावतात त्यातली ही गत आहे.

Pages