सुबक ठेंगणी देखणी गुलाबो : रेसिपी

Submitted by शांत माणूस on 10 December, 2021 - 11:39
Marshmelo
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

सुबक ठेंगणी देखणी गुलाबो

पूर्वतयारी
साहित्य :
१. आयसिंग शुगर ( एक मोठा टेस्पून साखर + दीड चमचा कॉर्न फ्लोअर मिक्सी मधे कुटून)
२. मोल्ड ( पेढ्याच्या अर्ध्या किलोच्या बॉक्स इतका). काचेचं भांडं, स्टीलचं भांडंही चालेल.
३. साखर
४. एक काचेचा बाऊल,
५. जिलेटिन
६. तेल
७. फ्राईंग पॅन

क्रमवार पाककृती: 

एक चमचा तेल टाकून मोल्डच्या आतल्या सर्व पृष्ठभागावर ते पसरवा. ब्रश किंवा हातात पॉलिथिनचे ग्लोव्हज घालून. आता यावर आयसिंग शुगर टाकून ती सर्व पुष्ठभागाला लावायची.

काचेच्या बाऊल मधे दोन मोठे चमचे जिलेटिन टाकायचे. एक तृतियांश कप पाणी टाका. चमच्याने थोडा वेळ हलवून घ्या. आता आपली सुबक ठेंगणी मऊ गुलाबो बनवायला घेऊ.

गॅसवर पॅन गरम करायला ठेवा. त्यात आता एक कपभर साखर टाका. एक कप साखरेला पाव कप पाणी टाका. प्रमाण हेच असू द्यावे. आता गॅस पेटवा. म्हणजे बर्नरला लायटरच्या ठिणग्यांनी गोळ्या घाला. गॅस पेटवा म्हणजे सिलेंडरला आग लावू नये. हे धोकादायक होऊ शकते. जगला वाचलात आणि पत्नी घरी आली तर जगण्याची खात्री नाही. महिला असाल तर या टीप्स कडे लक्ष देऊ नये.

गॅसची ज्योत मध्यम ठेवा. मध्यम आंचेवर साखरेचा चांगला पाक होऊ द्या. साखर चांगली वितळेपर्यंत आणि उकळी येईपर्यंत हलवत रहा.
इथे आपणही या गाण्यावर थोडं थोडं हलायला हरकत नाही. तुम्ही स्वत:: नवरा हा प्राणी असाल तर दोन्ही गाण्यात अक्षयकुमार आहे. रविनाबरोबर त्याला जास्त हलावे लागले आहे. करतिना सोबत तो नळीवर बसून पाय हलवतोय. यातला जो झेपेल तो प्रकार करा. महिला असाल तर पिवळी साडी कुठेही मिळेल. कॅटरीना चा ग्रे कलर लवकर मिळणार नाही. पण दोन्ही कडे चांगलेच हलावे लागणार आहे. पावसात जर बनवत असाल तर वायुवेगाने बाहेर जाऊन भिजून येऊ शकता. साखर तोपर्यंत कळ काढू शकते.

आता साखरेच्या पाकाला उकळी आली असेल. पाक म्हटलं की एक तारी कि दोन तारी अशी शंका येईल.
त्यासाठी किचन च्या कोपयात ठेवलेली एकतारी घेऊन "एकतारी संगे लागली समाधी, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो" हे म्हणायला सुरूवात करू नये. म्हणजे दोन तारी साठी तंबोरा घ्यावा कि काय ?
तर ते ही नाही.
आपल्या पाकाचे बॉल्स झाले पाहीजेत. तार येऊन चालणार नाही. बोटाने बॉल्स झालेत का हे पहावे. त्यासाठी एका बाऊलमधे पाणी घ्या. पॅनमधली साखर बोटाने अलगद घेऊन पाण्यात टाका. तार नाही पण बॉल आलेला असेल तर आपण योग्य मार्गावर आहात.
आता मंद आचेवर थोडा वेळ पकू द्या.
आपणही यमुना जळी खेळू खेळ कन्हैय्या का या गाण्यावर सूर लावून शेजारपाजारच्यांना चांगले पकवावे. काही काही लोक हळूच पाकृ पाहून जातात. मग आपलीच म्हणून युट्यूबवर टाकतात. त्याला अशा गाण्याने आळा बसतो.

आपण जिलेटिन पाण्यात टाकले होते ते आता घ्या. जिलेटिनने पाणी शोषले असेल. जिलेटिन साखरेच्या पाकात टाका. वेळ दोन मिनिट. आंच मंदच राहू द्या. चमच्याने हलवत रहा. याचं टेक्श्चर बदलले असेल.

गॅस बंद करून हे मिश्रण एका बाऊल मधे टाका.
गरम असल्याने एक मिनिटभर चमच्याने ढवळून थोडे थंड होऊ द्या.
यात व्हिस्करने कमी स्पीडवर पाच मिनिटे ढवळून घ्या. व्हिस्कर नसेल तर चमच्याने हलवावे लागेल. पण वेळ खूप लागेल. रवीने करून पाहू शकता. कल्पना नाही. काट्याच्या चमच्याने फेटून घेताना मिश्रणावर लक्ष ठेवावे लागेल. या मिश्रणाचे टेक्श्चर फोम प्रमाणे होईपर्यंत फेटावे लागते. पांढ-या रंगाची क्रीम दिसली पाहीजे. ओतताना रिबन प्रमाणे पडले पाहीजे.

cream.jpg

आता यात पाव चमचा व्हॅनिला स्वाद टाका. आता एक मिनिट मध्यम गतीने फेटून घ्या. (आधी पाच मिनिट मंद गतीने फेटले होते).
आता रिबनचं टेक्श्चर थोडंसं घट्ट होईल.

आता हे घट्ट मिश्रण घेऊन काय करायचं ?

हे गाणं मोठ्याने म्हणत गादीवर कोलांट उड्या खात उसळ्य़ा घ्यायच्या. त्याचा व्हिडीओ बनवायला विसरू नका.
मग हे मिश्रण आपला मोल्ड होता ना त्यात ओतावे. ओतताना ते आता रिबनप्रमाणे नाही पडत.
घट्ट झालं असेल तर ओके आहे.

ते समान पद्धतीने तळाला समांतर लेयर मधे टाका. सपाट झाले पाहीजे. अर्धे मिश्रण ओतून झाले की थांबा

मग खिडकीशी या.
ती खिडकी उघडी ठेवून केस झटकत असेल.

तुम्ही हळूच लाल छडी मैदान खडी हे गाणं म्हणा. तिला ऐकू जाईल न जाईलसं.
आणि
तिथेच न रेंगाळता परत या. यासाठीच नव-यांना किचन मधे लुडबूड करू देत नाहीत बायका. डिश सोडून कुठेही लक्ष देत बसतात. हीच ती सुधारण्याची वेळ.
हे घट्ट व्हायच्या आधी मोल्ड मधे चप्पट चमच्याने मस्त आकार देऊन सेट करा.

उरलेल्या अर्ध्या बाऊल मधे गुलाबी रंग चार पाच थेंब अंदाजानुसार टाका. अर्ध्या मिनिटासाठीच आता फेटून घ्या. जास्त नको. घट्ट झाले तर ओतताना अडचण होईल. रंग पिंक होईपर्यंतच फेटा. लाल होऊ देऊ नका.
cream 2.jpg

हलका गुलाबी रंग आला कि ते आपल्या मोल्ड मधे आधीच्या सेट झालेल्या मिश्रणावर ओतायला सुरूवात करा. ओतताना सर्वत्र ते एकसारखे आले पाहीजे. मग चप्पट चमचाने थोडे पसरवा. हे मिश्रण खूपच चिकट आणि लिबलिबीत झाले असेल.

त्याच्यावर आपण आधी बनवलेली आयसिंग शुगर वरून टाका. सर्वत्र टाका. त्यामुळे चिकटपणा कमी होईल. आयसिंग शुगरचा एक पातळ थर जमा झाला कि वरचा गुआबी स्तर पण छान सेट होईल.

आता दोन तास मोल्ड फ्रीज मधे ठेवा.

दोन तास काय करायचं हे पण सांगायचं का ?
या मायबोलीवर. कुठेतरी जीव तोडून चाललेल्या राजकीय चर्चेत हळूच एक फाको टाका. भुताटकीच्या धाग्यावर चट्ट्यापट्ट्याच्या विजारीचाआ नाडा कसा ओवायचा ही शंका विचारा. यात वेळ छान जाईल.

मग पुन्हा आपल्या फ्रीजकडे या.

तुम्ही पती असाल आणि मिश्रण फ्रीजरमधे ठेवले असेल तर सगळेच मुसळ केरात. मग ही कृती पहिल्यापासून करायला घ्या.
महिला असाल तर तुम्हाला बरोब्बर ठाऊक आहे कि फ्रीजर मधे ठेवायचे नाही.

आता हा मोल्ड डिश मधे, लाकडी बोर्डवर उलटा करा. थोडंसं हाताने थापट्या मारून बाहेर काढा. चीजसारखा चौकोनी तुकडा बाहेर येईल.

आता उरलेली आयसिंग शुगर घेऊन ती सुरीला लावा. नाहीतर कट करताना चिकटून बसेल. उभे आणि आडवे काप घेत चौकोनी एकसारख्या वड्या बनवा.

गुलाबी आणि शुभ्र अशी सुबक ठेंगणी देखणी गुलाबो तयार.
तुकडे कट करताना आयसिंग शुगर वापरा. ही स्पंजसारखी गुलाबो आता नटूनथटून तयार असेल. बोटाने दाबून पहा. पुन्हा मूळचा आकार धारण करते.
pink.jpg

स्त्रोत - रश्मी यांचा चॅनल

pink.jpg

वाढणी/प्रमाण: 
आमच्याकडे एकच जण गट्टम करू शकतो.
अधिक टिपा: 

शंका विचारू नयेत. बल्लवाचार्य नवीन आहेत.

माहितीचा स्रोत: 
रश्मीजी यांचे युट्यूब चॅनल
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

किती ती गाणी , लिंक्स डकवा नाही तर कशी होणार सुबक ठेंगणी.... जुन्या टीप टीपसाठी टडोपा. फारच बुवा मल्टिटास्कर तुम्ही Wink
मस्तच लिहिले आहे. Lol
छान झाली आहे.

मार्शमेलो ना हे?
घरी मार्शमेलो बनवलं म्हणजे दंडवत स्वीकारावे.

काहीही अशक्य नाही. राम और शाम. Lol
थोडी कळ काढायची ना. लिहीलेय कि रश्मी यांचा चॅनल. ही त्यांचीच रेसिपी आहे.
जरा चंमतग चालू होती. कुणी तरी ते शोधणारच होतं.

हे घरी बनवता येतात? हेच माहीत नव्हते. छान लिहिले आहे. इतकी गाणी व भरपूर व्यायाम!!! आहे मध्ये मध्ये. मग इतके गुलाबो लागतीलच. हॅपी हॉलिडेज.