शहरं/ठिकाणं यांच्या अधिकृत नावांऐवजी जुनी नावे वापरणे कितपत योग्य्/अयोग्य ?

Submitted by DJ....... on 18 November, 2021 - 10:33

प्रत्येकाचं आयुष्य धावत असतं. धावणार्‍या आयुष्यात सतत काहीतरी बदलत असतं. आपली चेहरेपट्टी, रंग-रूप काय अगदी आपले शेजारी-पाजारी-नातेवाईक-मित्र-मैत्रिणीही सतत बदलत असतात. जुने जात असतात अन नवे येत असतात. बरीच माणसं घरही बदलतात एवढंच काय गावं, शहरं, देशही बदलतात. स्वभावाला औषध नसतं असं नुसतंच म्हणतात परंतु वेळ-काळ-स्थळ पाहून मनाला मुरड घालत स्वभावही बदलावा लागतो. भारतात तर रस्त्यांच्या नावां पासून ते सरकारी संस्थांची, इमारतींची, पुरस्कारांची नावंच काय अगदी योजनांची नावं बदलण्याचाही उपद्व्याप केला जातो. ठिकाणांची अन शहरांची नावं बदलण्याची तर रीतच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

भारत स्वतंत्र झाल्यावर सरकारी पातळीवर बर्‍याच इंग्रजी नावांच्या ठिकाणांचं नाव बदलून त्या त्या राज्यातल्या थोर व्यक्तिमत्वांची नावं देण्यात आली हे एकवेळ आपण स्वीकारू शकू. परंतू राजकीय फायदे घेण्यासाठी इतिहासकालीन शहरांची नावं बदलणे तितके सहजपणे स्वीकारलं जात नाही हेही आपण पहातो.

इंग्रजांनी बर्‍याच शहरांची नावं त्यांच्या उच्चाराच्या सोयीची केलेली होती जी नंतर त्या त्या राज्यसरकारांनी बदलली ज्यात मुंबई (बॉम्बे), चेन्नई (मद्रास), कोलकाता (कलकत्ता), थीरुअनंतपुरम (त्रिवेंद्रम) ई. नावांचा समावेश होतो. ही नावे इंग्रजांना नीट उच्चारता आली नाहीत म्हणुन तयार झाली होती तर काही ठिकाणी इंग्रजांनी आपल्या इंग्रजी व्यक्तींची नावे त्या शहरांना दिली होती.

राजकीय लाभ व्हावा म्हणुनही भारतातील काही शहरांची नावे बदलण्यात आली ज्यात मुक्ताईनगर (एदलाबाद), प्रयागराज (अलाहाबाद) वगैरे शहरं येतात.

इंग्रजांनी बांधलेल्या वास्तुंना अन बागांनाही इंग्रजी माणसांची/राजांची/राण्यांची नावे दिलेली असत. पारतंत्र्याची आठवण राहू नये या हेतूने ती नावे बदलली गेली ज्यात व्हिक्टोरिया टर्मिनसचं (व्हीटी) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सी.एस.एम.टी) झालं, इंग्रजांची राणीची बाग नंतर वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान झाली. पारतंत्र्याच्या खुणा अशा नामकरणांनी हळू हळू पुसल्या गेल्या. परंतु हे तिथं रहाणार्‍या लोकांना अंगवळणी पडतंच असं नाही. आजही बरीच माणसं सी.एस्,एम.टी. ला व्हीटी म्हणतात (काहीजण तर व्हीटीच्या आधीचं नाव - बोरीबंदरही म्हणतात म्हणे..! Wink ) तर बरेचजण वीरमाता जीजाबाई भोसले उद्यानाला राणीचा बाग म्हणतात. वास्तविक जीवनात होतं काय की तिथल्या प्रस्थापीत लोकांनी जुनीच नावे व्यवहारात बोलल्यामुळे विथापित किंवा काही काळासाठी त्या शहरात पाहुणे म्हणुन येणार्‍यांना नव्या अन जुन्या नावांचा संबंध कळत नाही अन त्यांना मानसिक, शारिरीक अन आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.

उदाहरण म्हणुन एक घटना सांगतो. आमचे एक (मुंबई बाहेरील) स्नेही त्यांच्या मुलां-पुतण्यांसोबत मुंबईत एक दिवस फिरण्यासाठी गेले. रात्रभर रेल्वेने प्रवास करून पहाटे सी.एस.एम.टी. स्थानकात उतरले. एका बर्‍या हॉटेलात जाऊन फ्रेश होऊन नाष्ता वगैरे करून गेटवे ऑफ ईंडिया कडे जाणारी बेस्ट बस पकडली. तिथून भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानला जाण्यासाठी त्यांनी टॅक्सी ठरवली तर टॅक्सीवाल्याला वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान कळेना. शेवटी त्या स्नेह्यांनी गुगल मॅप वर ते उद्यान दाखवल्यावर तो टॅक्सीवाला "अरे भाय राणीचा बाग बोलो ना..!" म्हणुन डोक्यावर हात मारता झाला. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान बघितल्यावर तिथुन सी.एस.एम.टी. ला कसं जायचं हे विचारलं तर तिथल्या लोकांनी व्ही.टी. ची बस पकडावी असं सांगितलं. बराच वेळ झालं तरी व्ही.टी. बोर्ड असलेली एकही बस दिसेना. शेवटी येणार्‍या प्रत्येक बस मधे "व्ही.टी.ला जाते का..?" असं त्यांनी कंडक्टरलाच विचारलं तेव्हा एका बस कंडक्टरने "चला..या लवकर" म्हणत आत घेतलं अन तिकिट हातात टेकवलं ज्यावर "सी.एस.एम.टी." असा स्थान उल्लेख होता.

उदाहरणादाखल खालील ठिकाणांची इंग्रजांच्या काळातील नावे डावीकडे तर उजवीकडे बदललेली नवीन नावे -

१. बेंगलोर स्टेशन - केंपेगौडा बेंगलुरू स्टेशन
२. पालम एअरपोर्ट - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा
३. सहार आंतरराष्ट्रीय विमानतळ - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ
४. डमडम एअरपोर्ट - नेताजी सुभाषचंद्र आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा
५. हबीबगंज रेल्वे स्टेशन - रानी कमलापती रेल्वे स्टेशन (हे आत्ताच १४ नोव्हेंबर २०२१ रोजी बदलण्यात आलं जे केवळ धार्मिक हेतुने बदललं गेलं हे सहज लक्षात येतं)

नवं ते सगळं स्वीकारलं जातं परंतु जुन्याचा सोस अजुनही काही ठिकाणी दिसतोच. वांद्र्याला बँड्रा म्हणणं असो, की शीवला सायन म्हणणं असो, वरळीला वरली म्हणणं असो, हिंजवडीला हिंजेवाडी म्हणणं असो, वानवडीला वानौरी म्हणणं असो, लोहगांवला लोहेगाव म्हणणं असो या उल्लेखांमुळे आपण अजुनही पारतंत्र्यात रमत आहोत हे तर दिसतंच परंतु त्या शहरात बाहेरून आलेल्या माणसांना अशाप्रकारे बुचकळ्यात पडण्याचे प्रसंग येऊन मनस्ताप होऊ शकतो. प्रादेशिक किंवा धार्मिक अस्मिता ठेऊन ठिकाणांची/शहरांची नावं बदलल्यावर ती नवी नावं आपसूक सर्वांच्या तोंडी रुळतात परंतू पारतंत्र्यातल्या नावांचा आग्रह धरून अजुनही आपण पारतंत्र्यातच आहोत अन आमच्यासोबत तुम्हीही पारतंत्र्यात रहा अशी मानसिकता असावी का हा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही.

कदाचित या पारतंत्र्यात रममाण होण्याच्या मानसिकतेमुळेच शहराबाहेरून/ राज्याबाहेरून/ देशाबाहेरून आलेल्या काही ठराविक विचारसरणीच्या लोकांचा गैरसमज होऊन त्यांच्या कडून खर्‍या स्वातंत्र्याला भीक समजलं जात असावं..!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरेचसे मराठी लोक कश्मीरला काश्मीर, रावलपिंडीला रावळपिंडी, अलप्पुळाला अलप्पुझा, मारतहळ्ळीला मराठाहल्ली वगैरे म्हणतात. मग हे पण मराठी लोकांनी अन्य भाषिक लोकांच्या जागांचं केलेलं अनधिकृत नामांतरण म्हणावं का?

मराठाहळ्ळी हे बेंगलोरचा भाग आहे. कोरोमंगला या भागाच्या उभारणीचं काम हे आदिलशहाने शहाजीराजांकडे सोपवलेलं होतं. त्याकाळी शहाजीराजांनी इतर मराठा सरदारांच्या देखरेखीखाली मजुरंकरवी या भागाची उभारणी केली हा इतिहास आहे. याबाबत बेंगलोर राईडच्या बसेस मधल्या गाईडकडुन देखील आवर्जुन सांगितलं जातं. मराठा सरदारांच्या रहाण्याची व्यवस्था ज्या भागात केली होती त्या भागाला मराठाहळ्ळी असं म्हणु लागले. मराठाहळ्ळी म्हणजे आपल्या भाषेत मराठावाडी..!

आजही कर्नाटकात विजापूर, बेंगलोर, बेळगाव आणि हुबळ्ळी भागात बराच मराठा समाज आहे. कर्नाटकातील भूमीत ते बेमालुमपणे मिसळले असले तरी त्यांचे बरेच नातेवाईक महाराष्ट्रातील कोल्हापूर-सांगली-सोलापूर-लातूर या जिल्ह्यांत आहेत. त्यांच्याशी रोटी-बेटीचे व्यवहारही होत असतात.

ओह! हे माहीत नव्हतं. माहितीबद्दल आभार.
तरी बाकीच्या नावांचा प्रश्न उरतोच.

मग हे पण मराठी लोकांनी अन्य भाषिक लोकांच्या जागांचं केलेलं अनधिकृत नामांतरण म्हणावं का?>> आपण म्हणतो म्हणुन तिकडे नावं बदलतात का?? इथे मुंबई-पुणे जाऊद्या, पण अन्य शहरांचीही नावं बदलण्याचा प्रयत्न होतो आहे.
उदा. धुळे - धुलिया.

पाचगणी. - पंचगणी.
पुणे पूना
ठाणे थाना.
धुळे. धुलीया.
हे आणि अशी अनेक नाव अनधिकृत पने बदलेली आहेत.
उच्चार प्रत्येकाचा वेगळा असू शकतो पण लीहताना ते वेगळेपण नसते .
हिंदी प्रसार मध्यम लिहतात पण चुकीची च नाव

राणी बागे विषयी म्हणाल तर मराठी माणसांना पण जिजामाता उद्यान हे नाव माहीत नाही.
राणी ची बाग हे नाव मात्र दोन्ही जुन्या नव्या नावाला एकरूप होणारच आहे
प्रवीण चे परवीन.होते.
माणसाची पण नाव बदलतात

आपण म्हणतो म्हणुन तिकडे नावं बदलतात का?? >> नाही. पण मग आपण आपली नावं का बदलतो? चूक आपली आहे, त्यांची नाही.

डीजे, तुमच्या (मराठाहळ्ळी) माहितीचा संदर्भ द्याल का?
विकी आणि इतरत्र असलेल्या माहितीनुसार बंगळूरातलं ते ठिकाण मराठाहळ्ळी नाही, मारतहळ्ळीच आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने मारुत नावाचे एक फायटर जेट बनवले होते (त्या भागात). त्यावरून त्या भागाला ते नाव पडले आहे. मराठे/शहाजी राजे अशी कुठली कथा असल्याचा संदर्भ दिसला नाही.

कर्नाटक इतिहासाच्या पुस्तकात असेल तर ते शोधावा लागेल. परंतु कोणी माबॉ वाचक बेंगलोर मध्ये असल्यास लगोलग शहानिशा करता येईल.

काही झाले तरी विमानात बसला असाल तर बाँबे म्हणू नका. ताबडतोब विमान जमेल तिथे उतरवून सगळ्यांना बाहेर काढतील, नि तुम्हाला धरून नेतील, हाल हाल करतील नि विचारत रहातील, बाँब कुठे आहे?
व्हिटी म्हणायचे नाही कारण ते पारतंत्र्याची आठवण आहे, मग सी एस टी हे काय स्वतंत्र भारतीय आहे का? नि स्टेशन ला स्थानक का नाही म्हणत? छ. शि. स्था. ला जायचे आहे असे म्हणा!!
उग्गीच काहीतरी फालतू गोष्टींवरून वाद घालायचे.

स्टेशन हा इंग्लिश शब्द आहे इंग्लिश भाषा हीच प्रमाण भाषा नावांसाठी असली पाहिजे.
भारतात पन्नास भाषा आहेत सर्व च प्रतेक नावाचे विचित्र उच्चार करतात.
कोणाला कशाचा मेळ लागणार नाही
व्हिक्टोरिया ही ब्रिटिश राणी होती तिचे नाव हे परांतंत्र ची निशाणी आहेच की.
स्टेशन ह्या शब्द ला कसे बोल लावून चालेल.

ब्रिटिश लोकांनी त्यांनी बांधलेल्या वास्तू ना त्यांचीच नाव दिली .त्यांचीच नाव देणे त्या ब्रिटिश लोकांना फालतू वाटले नाही.
किंग जॉर्ज हॉस्पिटल.

किंग एडवर्ड हॉस्पिटल(kem)
व्हिक्टोरिया टर्मिनस.
Sandhsust road.
देशात अनेक वास्तू ना त्यांनी त्यांचीच नाव दिली.
किती तरी उदाहरण देशभर आहेत.
भारतीय लोकांची किंवा प्रतीकांची नाव दिली नाहीत.

इंग्रज जाऊन ७५ वर्ष झाली की आता.. इंग्रजांच्या पेंशनी खाणारे आजोबा पण निवर्तले असतील.. आता पणतुंच्या राजवटीत इंग्रजांच्या पेंशनिना जागण्यासारखे काय कारण आहे असं वाटत नाही.

उलट ब्रिटिश आणि मुस्लिम नावे टिकली पाहिजेत

म्हणजे तेंव्हाचे एतद्देशीय राजे किती कुचकामी होते हे पुढच्या पिढीला समजेल, आणि मुस्लिम राजे राजपुतांचे जावई होते. हिंदू संस्थानिक इंग्रजी राणीने दिलेली सर्टिफिकेट पदके आजही सांभाळतात.

नैतर बांधणार इंग्रज , नाव जुन्या पणजोबाचे आणि त्याचा बोर्ड बदलून नातू आमदार नैतर खासदार

इंग्रजांनी किंवा अन्य कोणी बनवलेल्या वास्तूंचं , वाढवलेल्या गावांचीं नावं केवळ ती आपल्या पारतंत्र्याची खूण म्हणून बदलण्यात काही अर्थ वाटत नाही. तसंच इतिहासातला विशिष्ट भाग नको म्हणून नावं बदलल्याने तो इतिहास पुसला जात नाही. हे कोणत्याही वास्तूसाठी आणि कोणत्याही पक्षाने केलेल्या बदलासाठी.
त्या तोडीच्या नव्या वास्तू रचा आणि द्या नावं.

छत्रपतींची खरी स्मारकं म्हणजे त्यांचे किल्ले. त्यांचं जतन करता येत नाही. आणि व्ही टीचं नाव आधी सी एस टी करणं आणि मग त्यात आदर कमी पडला म्हणून एम वाढवणं हे पटत नाही.

इंग्रजांना किंवा अन्य कोणाला ती ती नावं उच्चारता येत नाहीत म्हणून त्यांनी बदललेली रूपं टाकून मूळ रूपाला चिकटणं पटतं. विशेषनाम कोणत्याही भाषेत तेच राहिलं पाहिजे. मालाडचं हिंदी आणि इंग्रजीत मलाड होणं चूक. बाकीची उदाहरणं आलीत वर. आता तर बेस्ट बसेसमध्येही पुढच्या स्टॉपच्या नावाच्या घोषणेचे रेकॉर्डेड मेसेजेस वाजतात. ती ऐकून लोक हसत असतात.

वर मराठी भाषिकांनी इतर प्रदेशातील जागांच्या नावाचं मराठीकरण करण्याचा मुद्दा आलाय. आपल्याला आपली नावं बदललेलं खटकतं तर आपणही वडोदराचं बडोदा , इंदौरचं इंदूर करायला नको.

Black कॅट आणि भरत ह्यांचे मत पण अयोग्य नाही
स्वतः निर्माण करा आणि हवं ते नाव ध्या.
योग्य च आहे.
हजारो मैल दूर असून पण इथे येवून सत्ता धारी जे बनले ह्याचा अर्थ च ऐतदेशिक राजे ऐश आरामात,आणि पंचायती करण्यात व्यस्त होते..हा ब्लॅक cat ह्यांचा विचार पण नाकारता येत नाही ..
तरी आता हळू हळू बदल तर घडलाच पाहिजे.
इतिहास किती दिवस उकरत बसणार.
पण प्रमाण भाषा इंग्लिश समजून ( अशी पण ती जागतिक भाषा आहे हे मान्य करणारे बहुसंख्य आहेत)
विशेष नाम चा उच्चार एक सारखाच असला पाहिजे ही अपेक्षा योग्य च आहे.
मला पण तेच वाटते.

ब्रिटिशांनी मराठी नावांचे विकृतीकरण फारसे केलेले नाही. उलट ज्या स्पेलिंगस् मुळे मूळ स्थानिक उच्चारांच्या जास्तीत जास्त जवळ पोचणारे उच्चार त्यांच्याकडून घडतील अशी स्पेलिंगस् त्यांनी केली. Sion ह्या शब्दाचा उच्चार सींव असा आहे. मूळ शीव शब्द शींव असा आहे कारण तो अनुनासिकयुक्त ' सीमा ' ह्या शब्दाचे तद्भव रूप आहे.
हाच उच्चारानुसार स्पेलिंगचा नियम Kirki, Poona ह्या
स्पेलिंगस् नासुध्दा लागू आहे. पुणं हा उच्चार रोमन अल्फाबेटस् मध्ये कसा बसवणार? Pune चा उच्चार त्या लोकांनी प्यून असा केला असता कदाचित. Book, cook, food, वगैरे शब्दांत पहिले अक्षर ऱ्हस्व उच्चारले जाते.
ह्या स्पेलिंगस् चे उच्चार आम्ही तरखडकरी किंवा कुठलेतरी उच्चार नियम लावून करू लागलो हा ब्रिटिशांचा दोष नाही.
( खरे तर तरखडकरांनीही बरेच उच्चार त्यातल्या त्यात इंग्रज लोकांप्रमाणे होतील असे देवनागरीत लिहिले आहेत. उदाहरणार्थ Women ह्या शब्दाचा उच्चार उईमेन असा त्यांनी दिला आहे.)आपण V आणि W ह्यांच्या उच्चारात गडबड करतो, तसेच F आणि V आणि Ph च्या उच्चारांतही.

हिरा ह्यांच्या शी सहमत.
कोणत्याही शहरांची नाव भाषा आणि प्रदेशातील अस्मिता ह्या मुळे बदलणे हे स्वीकारणे अशक्य आहे..
चेन्नई आपण स्वीकारले आहे काहीच अडचण नाही..
बडोदा चे वडोदरा स्वीकारण्यात आणि तोच उच्चार करण्यास काहीच अडचण नाही.
इंदूर चे इंदोर असा उच्चार करण्यास काहीच आक्षेप नाही.
पण घाटकोपर चा घाट के ऊपर.
नायगाव चे नया गाव.
पुणे चे पुना.

ठाणे चे थाना ह्याला तीव्र आक्षेप आहे.
ETC

ब्लॅक कॅट
प्रश्न वर्तमान काळातील आहेत तुम्ही भूत काळात का जात आहात.
भूत काळात खील वर जायचे झाले तर आशिया खंड पण नव्हता.

सोपी नावे, जी संस्कृत शब्दांची सोपी मराठी रूपे आहेत, ती बदलून पुन्हा कठीण संस्कृत शब्दांकडे वळण्यात अर्थ नाही. कारण आम आदमी ती तशी उच्चारणारच नाही. हिंदी देवनागरीने मराठीतले ण, ळ हे लिपीत सामावून घ्यावेत. कुठल्याही स्टेशनचे किंवा रस्ता, गाव ह्यांच्या नावाचे बोर्ड तिथल्या मूळ नावाप्रमाणे अथवा स्थानिक प्रमाण भाषेनुसार असावेत. हिंदीमध्ये बोर्ड रंगवताना ते आधी जाणत्या माणसांकडून तपासले जावेत. नामफलकावरची देवनागरी हिंदी आणि देवनागरी मराठीतली रूपे समान असावीत आणि महाराष्ट्रात ती मराठी लेखनाप्रमाणे असावीत. इतर ठिकाणी ती त्या त्या प्रादेशिक भाषेप्रमाणे असावीत.
मुंबईतल्या मुळून्द स्टेशनचे नाव १९७५-८० पर्यंत मुळून्द होते. जसजशा ब्रिटिश काळातल्या पाट्या जुन्या झाल्यामुळे किंवा अन्य कशाने हटल्या तेव्हा नव्या रंगवताना पुष्कळशा चुका त्यात शिरल्या आहेत. मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर कामशेट ही अक्षरे दिमाखाने मिरवतात. मराठी नावांचे आपापल्या बुद्धीनुसार केलेले इंग्लिश स्पेलिंग रंगाऱ्याकडे देऊन ते मराठीत रंगवण्यास सांगितले जात असावे. गेल्या वीसबावीस वर्षांत बांधलेल्या ठाणे बेलापूर रेल मार्गावरच्या स्टेशनांची नावे अशीच विकृत झाली आहेत.
रंगाऱ्यालासुद्धा व्यवस्थित सूचना देऊन त्यावर देखरेख ठेवली गेली पाहिजे.

रंगारी प्रकांड पंडीत असून भाषेचा व्यासंगी असायला हवा. कंत्राटात ही अट घातली तर चुका होणार नाहीत.

रंगार्‍यांत एसटीचे रंगारी एकदम बेस्ट असतात. पांढरपेशे रबाळे म्हणतात... चूक बरोबर कल्पना नाही पण ते शुद्ध वाटतं. पण पब्लिक राबाडा म्हणतात, एसटी 'ठाणे-राबाडा' अशाच पाट्या रंगवते. Proud

ऑफिस मध्ये एक जॉन्सन नावाचा सहकारी होता त्याचे नाव बदलून आम्ही आम्हला सोयी च पडेल असे जानबा नाव ठेवले होते

दुसऱ्यांची चांगली नाव बदलून विचित्र नाव ठेवणे हा मानवी स्वभाव च असावा.

Pages