शहरं/ठिकाणं यांच्या अधिकृत नावांऐवजी जुनी नावे वापरणे कितपत योग्य्/अयोग्य ?

Submitted by DJ....... on 18 November, 2021 - 10:33

प्रत्येकाचं आयुष्य धावत असतं. धावणार्‍या आयुष्यात सतत काहीतरी बदलत असतं. आपली चेहरेपट्टी, रंग-रूप काय अगदी आपले शेजारी-पाजारी-नातेवाईक-मित्र-मैत्रिणीही सतत बदलत असतात. जुने जात असतात अन नवे येत असतात. बरीच माणसं घरही बदलतात एवढंच काय गावं, शहरं, देशही बदलतात. स्वभावाला औषध नसतं असं नुसतंच म्हणतात परंतु वेळ-काळ-स्थळ पाहून मनाला मुरड घालत स्वभावही बदलावा लागतो. भारतात तर रस्त्यांच्या नावां पासून ते सरकारी संस्थांची, इमारतींची, पुरस्कारांची नावंच काय अगदी योजनांची नावं बदलण्याचाही उपद्व्याप केला जातो. ठिकाणांची अन शहरांची नावं बदलण्याची तर रीतच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

भारत स्वतंत्र झाल्यावर सरकारी पातळीवर बर्‍याच इंग्रजी नावांच्या ठिकाणांचं नाव बदलून त्या त्या राज्यातल्या थोर व्यक्तिमत्वांची नावं देण्यात आली हे एकवेळ आपण स्वीकारू शकू. परंतू राजकीय फायदे घेण्यासाठी इतिहासकालीन शहरांची नावं बदलणे तितके सहजपणे स्वीकारलं जात नाही हेही आपण पहातो.

इंग्रजांनी बर्‍याच शहरांची नावं त्यांच्या उच्चाराच्या सोयीची केलेली होती जी नंतर त्या त्या राज्यसरकारांनी बदलली ज्यात मुंबई (बॉम्बे), चेन्नई (मद्रास), कोलकाता (कलकत्ता), थीरुअनंतपुरम (त्रिवेंद्रम) ई. नावांचा समावेश होतो. ही नावे इंग्रजांना नीट उच्चारता आली नाहीत म्हणुन तयार झाली होती तर काही ठिकाणी इंग्रजांनी आपल्या इंग्रजी व्यक्तींची नावे त्या शहरांना दिली होती.

राजकीय लाभ व्हावा म्हणुनही भारतातील काही शहरांची नावे बदलण्यात आली ज्यात मुक्ताईनगर (एदलाबाद), प्रयागराज (अलाहाबाद) वगैरे शहरं येतात.

इंग्रजांनी बांधलेल्या वास्तुंना अन बागांनाही इंग्रजी माणसांची/राजांची/राण्यांची नावे दिलेली असत. पारतंत्र्याची आठवण राहू नये या हेतूने ती नावे बदलली गेली ज्यात व्हिक्टोरिया टर्मिनसचं (व्हीटी) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सी.एस.एम.टी) झालं, इंग्रजांची राणीची बाग नंतर वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान झाली. पारतंत्र्याच्या खुणा अशा नामकरणांनी हळू हळू पुसल्या गेल्या. परंतु हे तिथं रहाणार्‍या लोकांना अंगवळणी पडतंच असं नाही. आजही बरीच माणसं सी.एस्,एम.टी. ला व्हीटी म्हणतात (काहीजण तर व्हीटीच्या आधीचं नाव - बोरीबंदरही म्हणतात म्हणे..! Wink ) तर बरेचजण वीरमाता जीजाबाई भोसले उद्यानाला राणीचा बाग म्हणतात. वास्तविक जीवनात होतं काय की तिथल्या प्रस्थापीत लोकांनी जुनीच नावे व्यवहारात बोलल्यामुळे विथापित किंवा काही काळासाठी त्या शहरात पाहुणे म्हणुन येणार्‍यांना नव्या अन जुन्या नावांचा संबंध कळत नाही अन त्यांना मानसिक, शारिरीक अन आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.

उदाहरण म्हणुन एक घटना सांगतो. आमचे एक (मुंबई बाहेरील) स्नेही त्यांच्या मुलां-पुतण्यांसोबत मुंबईत एक दिवस फिरण्यासाठी गेले. रात्रभर रेल्वेने प्रवास करून पहाटे सी.एस.एम.टी. स्थानकात उतरले. एका बर्‍या हॉटेलात जाऊन फ्रेश होऊन नाष्ता वगैरे करून गेटवे ऑफ ईंडिया कडे जाणारी बेस्ट बस पकडली. तिथून भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानला जाण्यासाठी त्यांनी टॅक्सी ठरवली तर टॅक्सीवाल्याला वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान कळेना. शेवटी त्या स्नेह्यांनी गुगल मॅप वर ते उद्यान दाखवल्यावर तो टॅक्सीवाला "अरे भाय राणीचा बाग बोलो ना..!" म्हणुन डोक्यावर हात मारता झाला. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान बघितल्यावर तिथुन सी.एस.एम.टी. ला कसं जायचं हे विचारलं तर तिथल्या लोकांनी व्ही.टी. ची बस पकडावी असं सांगितलं. बराच वेळ झालं तरी व्ही.टी. बोर्ड असलेली एकही बस दिसेना. शेवटी येणार्‍या प्रत्येक बस मधे "व्ही.टी.ला जाते का..?" असं त्यांनी कंडक्टरलाच विचारलं तेव्हा एका बस कंडक्टरने "चला..या लवकर" म्हणत आत घेतलं अन तिकिट हातात टेकवलं ज्यावर "सी.एस.एम.टी." असा स्थान उल्लेख होता.

उदाहरणादाखल खालील ठिकाणांची इंग्रजांच्या काळातील नावे डावीकडे तर उजवीकडे बदललेली नवीन नावे -

१. बेंगलोर स्टेशन - केंपेगौडा बेंगलुरू स्टेशन
२. पालम एअरपोर्ट - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा
३. सहार आंतरराष्ट्रीय विमानतळ - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ
४. डमडम एअरपोर्ट - नेताजी सुभाषचंद्र आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा
५. हबीबगंज रेल्वे स्टेशन - रानी कमलापती रेल्वे स्टेशन (हे आत्ताच १४ नोव्हेंबर २०२१ रोजी बदलण्यात आलं जे केवळ धार्मिक हेतुने बदललं गेलं हे सहज लक्षात येतं)

नवं ते सगळं स्वीकारलं जातं परंतु जुन्याचा सोस अजुनही काही ठिकाणी दिसतोच. वांद्र्याला बँड्रा म्हणणं असो, की शीवला सायन म्हणणं असो, वरळीला वरली म्हणणं असो, हिंजवडीला हिंजेवाडी म्हणणं असो, वानवडीला वानौरी म्हणणं असो, लोहगांवला लोहेगाव म्हणणं असो या उल्लेखांमुळे आपण अजुनही पारतंत्र्यात रमत आहोत हे तर दिसतंच परंतु त्या शहरात बाहेरून आलेल्या माणसांना अशाप्रकारे बुचकळ्यात पडण्याचे प्रसंग येऊन मनस्ताप होऊ शकतो. प्रादेशिक किंवा धार्मिक अस्मिता ठेऊन ठिकाणांची/शहरांची नावं बदलल्यावर ती नवी नावं आपसूक सर्वांच्या तोंडी रुळतात परंतू पारतंत्र्यातल्या नावांचा आग्रह धरून अजुनही आपण पारतंत्र्यातच आहोत अन आमच्यासोबत तुम्हीही पारतंत्र्यात रहा अशी मानसिकता असावी का हा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही.

कदाचित या पारतंत्र्यात रममाण होण्याच्या मानसिकतेमुळेच शहराबाहेरून/ राज्याबाहेरून/ देशाबाहेरून आलेल्या काही ठराविक विचारसरणीच्या लोकांचा गैरसमज होऊन त्यांच्या कडून खर्‍या स्वातंत्र्याला भीक समजलं जात असावं..!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< मुंबईतल्या मुळून्द स्टेशनचे नाव १९७५-८० पर्यंत मुळून्द होते. >>
मुंबईत मुळून्द स्टेशन कुठे आहे? मुलुंड बद्दल म्हणत असाल तर ते खरे नाही, १९७५-८० पर्यंत तर १००% नाही.

गेल्या शतकात मुलुंड हे मुळूंद होते हे खरे आहे. बदलाची वर्षे कदाचित चुकली असतील. जवळच्या वृद्ध लोकांच्या तोंडून नक्कीच ऐकले आहे. आणि मुळूंद हे देखील मूळ नाव नव्हे. पण खूप मागे गेले (३०० - ४००वर्षांहून अधिक काळ) तर सगळीच नावे वेगळी दिसतील. म्हणून एक दोन शतकांपुरतेच पाहिले पाहिजे.
तुर्भे हे तुरुंबे तरुंबे, (उच्चार त् रुंबे ) होते. trombay ह्या उच्चाराच्या जवळपास.
तसे तर सव्वाशे दीडशे वर्षांपूर्वी शीव स्टेशन हे माहीम रोड होते आणि गोरेगाव हे पहाडी. आणि मान खुर्दचे मूळ नाव माणे (खुर्द) स्टेशनचे इंग्लिश स्पेलिंग Manne khurd हे तर मी स्वत: पाहिलेले आहे.
साष्टीची बखर पाहून लिहीन पुन्हा कधीतरी.

तसे तर सव्वाशे दीडशे वर्षांपूर्वी शीव स्टेशन हे माहीम रोड होते
>>>

ईंटरेस्टींग आहे. हे माहीत नव्हते. अर्थात सव्वाशे वर्षांपूर्वी म्हणजे माहीत नसणे साहजिकच आहे. पण येस्स, असेलच.
म्हणजे वेस्टर्नला माटुंगा रोड नंतर माहीम यायचे तर सेंट्रलला माटुंगा नंतर माहीम रोड येत होते. वेस्टर्नहून सेंट्रलला जाताना रोड माटुंग्याचा माहीमला जात होता Happy

>>तसे तर सव्वाशे दीडशे वर्षांपूर्वी शीव स्टेशन हे माहीम रोड होते <<
याबाबतीत अधिक माहिती वाचायला आवडेल. कारण सायन आणि माहिम स्टेशन मधे बरंच अंतर आहे. शिवाय, ट्रॅकहि वेगळा; एक सेंट्रल तर दुसरा वेस्टर्न. तरीहि, नविन माहितीच्या प्रतिक्षेत.

बाकि, घाटकोपरचं घाट के उपर, नायगांव (हे बहुतेक वसईच्या आसपासचं असावं. भोईवाडा नाहि) नया गांव हा अपभ्रंश खरा आहे? कि आपले मनाचे श्लोक?..

मनाचे श्लोक.
बाकी आमच्या राणीच्या बागेला काही भलते नाव दिले की त्याचा वापर करा म्हणताय त्याला जनतेनी केराची टोपली दाखवली तर काय नवल? तर हेच नवं अधिकृत लॉजिक उत्तर प्रदेशातील व्यक्तीच्या नावाला पण लावायचं का तेव्हा काही वेगळी पळवाट काढणार? Wink

माहीम हे दीडशे वर्षांपूर्वी मोठे गाव होते.( एके काळी ' बिंबस्थान'ची राजधानी होते.) विस्तारही खूप होता. खूपसा दादरचा आणि परळ पर्यंतचा भाग माहीम मध्ये येत असे. ह्या माहीमची पूर्वेकडची सीमा म्हणजे शींव. ही एक नगण्य अशी कोळ्यांची छोटीशी वस्ती होती. जेव्हा जी आय पी रेल मार्ग सुरू झाला तेव्हा ह्या मार्गावरच्या प्रवाशांना जर माहीमला जायचे असेल तर शींव येथे उतरावे लागे. म्हणून स्टेशनचे नाव माहीम रोड असे होते. ही ब्रिटिश nomenclature पध्दती आहे. जसे खार रोड, माटुंगा रोड, चरणी रोड, नासिक रोड, रोहा रोड,( आता रोहाच आहे वाटते. रोहा रोड नको, रोहाच हवे अशी लोकांची मागणी होती.) वसई रोड, मिरा रोड वगैरे. पूर्वी ( आणि अजूनही) रेल मार्ग बांधताना भर वस्तीतून किंवा वस्तीलगत आखले जात नसत. शक्यतो वस्तीला/ शहराला दूर राखून आखले जात. त्या वस्तीपासून नजीकच्या स्टेशनला नाव देताना त्या वस्ती/ शहराला जाण्याचा मार्ग असे नाव दिले जाई. स्टेशने ही भर वस्ती, सुपीक जमीन टाळून शक्यतो जिथे स्टेशन बांधल्याने स्थानिकांचे फारसे नुकसान होणार नाही आणि वेगवान प्रवासाला अडथळाही येणार नाही अशा ठिकाणी, निर्जन, पडीक ठिकाणी बांधली जात. त्यामुळे displacements सुद्धा टाळल्या जात असत.

नॉन इंडियन लोकांशी बोलताना अजूनही बॉम्बेच म्हटलं जातं. मुंबईही अंगवळणी पडलं आहे. व्हिटी मात्र व्हिटीच आहे आणि राहील. सायन, बांद्रा हे ही तसंच.

Pages